Saturday, May 16, 2020

किडकांसाठी गुळ हे विष, कसे ?



गुळामुळे अळीची भूक अधिक वाढते. अळी जास्तीत जास्त विषाणूजन्य पदार्थ खाते. विषाणूमुळे अळी रोगग्रस्त होते व मरते. हरभरा पिकावरील घाटे अळी, सोयाबिनवरील पाने खाणारी अळी, लष्करी अळी, गोगलगाय आदीच्या नियंत्रणासाठी या न्युक्‍लिअर पॉलिहैड्रॉसीस व्हायरस हा वापरला जातो. - राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

पैं आघविया जगा जें विख । तें विख कीडिया पीयूख ।
आणि जगा गुळ तें देख । मरण तया ।। 930 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - सगळ्या जगाला जे विष ते विष किंड्यांना अमृत (जीवन) असते. आणि सगळ्या जगाला गूळ जो गोड तो त्या विषातील किड्यांना मारक असतो.

कीड आणि रोग हे पिकाचे सर्वांत मोठे शत्रू आहेत. याचा परिणाम उत्पादन वाढीवर होत असल्याने याचे नियंत्रण हे गरजेचेच आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कीड व रोगांचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. त्यांचे जीवनचक्र आदीचा अभ्यास हा शेतकऱ्यांनी करायलाच हवा. पिकाच्या कोणत्या भागाला कीड इजा करते. किडीची कोणती अवस्था नुकसान करते हे माहित असणे आवश्‍यक आहे. याचा अभ्यास असेल तर किडीवर सहज नियंत्रण मिळवता येते. जगभरात जवळपास 10 कोटी 17 लाख 18 प्रकारचे कीटक आहेत. या सर्वच किडी शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, असेही नाही. काही कीटक इतर कीटकांना खाऊन जगतात. सर्वच कीटक हे मांसाहारी आहेत, असेही नाही. प्रत्येक पिकांवर आढळणारे कीटक हे सुद्धा वेगवेगळे आहेत. कपाशीमध्ये रसशोषणाऱ्या मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण या किडी व अमेरिकन, ठिपक्‍यांची, शेंदरी आदी बोंड अळी यांचा प्रादुर्भाव होतो. उसामध्ये मावा, हुमणी यांचा प्रादुर्भाव होतो. सोयाबीन पिकास पाने खाणाऱ्या अळ्या, खोडमाशी यांचा प्रादुर्भाव होतो. हरभऱ्यामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव होतो. पिकानुसार नुकसान करणारे कीटकही विविध आहेत. याचे नियंत्रण करण्यासाठी किडनाशकांच्या फवारण्या केल्या जातात. पण सध्या हा फवारणीचा खर्च वाढला आहे. साहजिकच उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. अशानेच आज शेती परवडेणाशी झाली आहे. यासाठी वाढता उत्पादन खर्च कसा कमी करता येईल व उत्पादनही उत्तम प्रतीचे कसे घेता येईल यावर अधिक भर देण्याची गरज आहे. किडनाशकांचा मानवी आरोग्यावरही परिणाम होत आहे. किडनाशकांचे अंश मानवाच्या रक्तांमध्ये आढळले आहेत. अशाने आता रासायनिक किडनाशकांच्या फवारण्या करण्यावरही बंदीची गरज आहे. प्रमाणाबाहेर फवारण्या केल्या जात असल्याने हा परिणाम होत आहे. पिकांवरील कीड व रोग हे काही आत्ताच शोधले गेले आहेत असे नाही. पूर्वी ऋषीमुनींनी याचा शोध लावला होता. ते सुद्धा याचा बंदोबस्त करत होते. पण त्याकाळी वापरात असलेल्या तंत्रज्ञानावर अभ्यासच झाला नाही. कश्‍यप ऋषी हे हृदयरोग तज्ञ होते. पोपईच्या पानाच्या देठाने ते हृदयाचे ठोके मोजायचे. इतके प्रगत तंत्र भारतात अस्तित्वात होते. शेतीमध्येही प्रगत तंत्रज्ञान होते. पण काळाच्या ओघात ते मागे पडले. आता त्या काळात वापरण्यात येणाऱ्या तंत्राचा शोध घेण्याची गरज आहे. संत ज्ञानेश्‍वरांनी बाराव्या शतकात ज्ञानेश्‍वरीमध्ये जीवसृष्टीतील कीटकांचे गुणधर्म सांगितले आहेत. ते तत्त्वज्ञान आजही उपयुक्त आहे. इतरांसाठी जे विष आहे ते कीटकांचे खाद्य (अमृत) आहे असे ज्ञानदेव म्हणाले. यावर शास्त्रातील अनेक उदाहरणे सांगता येतील. सेंट जॉन्स वर्थ किंवा कलमथ नावाचे तण जनावरांनी खाल्ले तर जनावरे दगावतात. पण या तणावर बिटल तसेच अनेक प्रकारच्या अळ्या, फुलपाखरे, मॉथ, लिफ मायनर आदी कीटक जगतात. ज्या झाडाचे पान, खोड जनावरांसाठी विषारी आहे त्यावरच तर हे कीटक वाढतात. तेच त्यांचे खाद्य आहे. कलमथ तण खाल्याने मेढ्यांची लोकर गळते. दुग्ध जनावरांची दूध उत्पादनाची क्षमता कमी होते. जनावरांचे वजन झपाट्याने घडते. 1944 मध्ये या तणाचा 30 देशामध्ये प्रादुर्भाव झाला होता. जवळपास दहा लाख एकरावर हे तण आढळले होते. ऑस्ट्रेलियामध्ये या तणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 1929 पासून संशोधन सुरू होते. त्यांनी या झाडावर आढळणारे कीटक शोधले. या कीटकांचे उत्पादन करून हे तण नियंत्रणात आणण्याचा प्रयोग केला. 1945-46 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये यावर वाढणाऱ्या बिटलच्या पाच हजार वसाहती सोडल्या. याला यश आल्यानंतर 1950 मध्ये जवळपास तीन हजार बिटल्स गोळा करून सोडण्यात आले. अशा प्रकारे या तणावर जैविक पद्धतीने नियंत्रण मिळविण्यात आले. आता हे तण कॅलिफोर्नियात रस्त्याच्या कडेला पाहायला मिळते. पण ते नियंत्रणात आहे. या तणावर नियंत्रण मिळविल्यानंतर त्या जमिनींचे भाव झपाट्याने वाढले. जैविक तण नियंत्रणाचा उपाय भारतात पूर्वीपासून केला जात असावा. त्यावर ऋषीमुनींनी संशोधनही केले असावे पण काळाच्या ओघात यात आपण मागे पडलो. भारतीयांची संशोधक वृत्तीच कमी झाली आहे. गाजर गवतही असेच एक तण होते. पडीक जमिनीवर भारतात मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यावर जैविक तण नियंत्रणाचे उपाय करून तेही अशाच पद्धतीने नियंत्रणात आणले. तणांच्या बंदोबस्तासाठी जसा किडींचा वापर केला जातो. तसा किडींच्या नियंत्रणासाठी विविध विषाणूंचा वापरही केला जातो. हा विषाणू कीटकाच्या अळीने खाल्ला तर ती आळी मरते. पण ही अळी हा विषाणू खाणार कशी? तिला हा विषाणू खाण्यास भाग पाडणे गरजेचे असते. ही विषाणूजन्य बुरशी अळीने खावी यासाठी अळीला गुळाचे आमिष दाखविले जाते. विषाणूजन्य बुरशीची फवारणी करताना प्रत्येक पंपाला 50 ग्रॅम गुळाचे पाणी यासाठीच त्यामध्ये टाकले जाते. याचे दोन फायदे आहेत. बुरशीला अळी, कीटक जरी मिळाले नाही तरी बुरशी मरत नाही. गुळातील अन्नद्रव्यामुळे ही बुरशी जिवंत राहते. त्या विषांणूची उपासमार होत नाही. दुसरा फायदा म्हणजे गुळामुळे, गोडामुळे कीटकांची अळी आकर्षित होते. साहजिकच गुळाला चिकटलेले विषाणू त्या आळीच्या पोटात जातात. विषाणू अळीच्या पोटात गेल्यानंतर ते झपाट्याने वाढतात. गुळामुळे अळीची भूक अधिक वाढते. अळी जास्तीत जास्त विषाणूजन्य पदार्थ खाते. विषाणूमुळे अळी रोगग्रस्त होते व मरते. हरभरा पिकावरील घाटे अळी, सोयाबिनवरील पाने खाणारी अळी, लष्करी अळी, गोगलगाय आदीच्या नियंत्रणासाठी या न्युक्‍लिअर पॉलिहैड्रॉसीस व्हायरस हा वापरला जातो. घाटे अळी (हेलिकोव्हरपा) ज्वारी, हरभरा, तूर, कपाशी, सूर्यफूल, मका, टोमॅटो, करडई या पिकांचे नुकसान करते. ही अळी रंगाने हिरवट. पिवळसर, तांबूस तपकिरी किंवा काळपट असते. मुख्यतः अळी अवस्था पिकाचे मोठे नुकसान करते. हाती आलेले उत्पन्न जाण्याची शक्‍यता असते. सध्या या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे या कीडीमध्ये कीटकनाशक प्रतिकारक्षमता निर्माण होते. त्यावेळी ही अळी किटनाशकास दाद देत नाही. अशामुळे आता या आळीस न्युक्‍लिअर पॉलिहैड्रॉसिस या विषाणूमुळे मारणे गरजेचे आहे. गुळासोबत हा विषाणू फवारून नियंत्रणाची गरज आहे.

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

No comments:

Post a Comment