Friday, May 1, 2020

मी कोण आहे, हे जाणण्याची गरज काय?


आत्मज्ञान प्राप्तीसाठी अभ्यास मात्र आपणालाच करावा लागतो. ज्ञानातून आत्मज्ञान कसे मिळवायचे हे त्यानेच अभ्यासायचे आहे. दैनंदिन जीवन सुखी होण्यासाठी आवश्यक ज्ञान घ्यायलाच हवे पण त्या जीवनाचा खरा अर्थ, जन्माचा अर्थ समजून घ्यायला हवा. 
-राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल ८९९९७३२६८५

अर्जुना वेदु जरी जाहला । तरी मानें नेणतां वायां गेला । 
कणु सांडुनि उपणिला । कोंडा जैसा ।। ३३३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय नववा

ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणे धान्य टाकून नुसता कोंडा उफणावा त्याप्रमाणे अर्जुना मला जाणले नाही तर प्रत्यक्ष एवढा वेद झाला तरी तो व्यर्थ होय.

मी कोण आहे ही जाणण्याची गरज काय? हा धर्म आपण पाळण्याची गरज काय ?मला जाणून मला काय मिळणार ? असे प्रश्न आपणास पडणे स्वाभाविक आहे. पण मानव जन्माचा हा धर्म आहे. तो प्रत्येकासाठी आहे. हाच मानवाचा खरा स्वधर्म आहे. त्याचे आचरण करणे हे गरजेचे आहे. तोच न पाळणे म्हणजेच जन्म व्यर्थ घालवणे असेच आहे. वारंवार हे सांगणे का केले जाते असा प्रश्नही आपणास पडला असेल, पण हेच ध्येय आपणास गाठायचे आहे. आपणास त्याची जाणीव व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. धान्य निवडताना, त्याला वारा देताना वाऱ्याने कोंडा बाजूला होतो अन् धान्य वेगळे होते. पण निवडायच्या धान्यात केवळ कोंडाच असेल तर त्यातून धान्य कसे मिळणार? त्यातून आपणास कोंडाच भेटणार. नुसत्या कोंड्याला वारा देण्यात काय अर्थ आहे? तसेच आत्मज्ञान नाही असे ज्ञान शिकून आपणास कशाची प्राप्ती होणार. जीवन कसे जगायचे याचे ज्ञान हे घ्यायलाच हवे, पण जीवनाचा अर्थ सांगणारे ज्ञानसुद्धा जाणून घ्यायला नको का ? नुसत्या जगण्याला काय अर्थ आहे. त्यात जीवनाचा अर्थ नसेल तर, हेच जगणे व्यर्थ आहे. अमर कोण होतो ? जो आत्मज्ञानी होतो, तोच अमर होतो. मग अमर होण्यासाठी आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग स्वीकारायला नको का ? सर्व वेद शिकला तरी आत्मज्ञानाची ओळख करून घेतली नाही तर जीवनात मिळवलेल्या ज्ञानाचा  काय उपयोग. ते सर्व व्यर्थ नाही का? उच्च असे हे आत्मज्ञान स्वतःहून जाणायचे आहे. गुरूंच्या कृपेने ते आपणास प्राप्त होते. असे ज्ञान देणारे गुरु आपणास भेटायला हवेत. त्यांचा शोध घ्यायला हवा. ज्ञान हे गुरूकडून घ्यावयाचे असते. शालेय शिक्षण आपण गुरूकडून शिकतो, पण त्याचा अभ्यास केला तरच शिष्य पास होतो. गुरु फक्त मार्गदर्शन करतात अभ्यास मात्र शिष्यालाच करावा लागतो. गुरु योग्य रस्ता दाखवतात त्या मार्गाने शिष्याने जायचे असते, तरच त्यांना मार्क मिळतात. तेव्हाच पास होतो. तसेच आत्मज्ञान प्राप्तीमध्ये आहे. मार्गदर्शन गुरु करतात, आत्मज्ञान प्राप्तीसाठी अभ्यास मात्र आपणालाच करावा लागतो. ज्ञानातून आत्मज्ञान कसे मिळवायचे हे त्यानेच अभ्यासायचे आहे. दैनंदिन जीवन सुखी होण्यासाठी आवश्यक ज्ञान घ्यायलाच हवे पण त्या जीवनाचा खरा अर्थ, जन्माचा अर्थ समजून घ्यायला हवा. यासाठी मी कोण आहे? याचा शोध घ्यायला हवा.

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

No comments:

Post a Comment