Friday, May 29, 2020

बीजा आणि भुसा । अंधु निवाडु नेणें जैसा ।


भुईमुगाच्या शेंगांच्या बाबतीतही तेच घडले. संकरित जाती आल्या. एका जाळीला शंभर शेंगा लागायच्या. सुरवातीची तीन चार वर्षे या जातींनी शंभर पर्यंत उत्पादन दिले पण आता याच जातीच्या जाळीला दहा शेंगाही लागत नाहीत. ही परिस्थिती आहे. वाढत्या लोकसंख्येला कुपोषणापासून रोखण्यासाठी उत्पादकता वाढविणे हे आव्हान आहे.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

बीजा आणि भुसा । अंधु निवाडु नेणें जैसा ।
नावेक देखणाही तैसा । बरळे कां पां ।। 234 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 3 रा

ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणे आंधळा धान्य आणि कोंडा यांची निवड जाणत नाहीं त्याप्रमाणें कधी कधीं डोळसालाहि कळत नाही, असे कां व्हावे ?

शेतीमध्ये नवनवे शोध लागत आहेत. उत्पादन वाढीसाठी संकरित बियाण्यांची पैदास केली जात आहे. पण ही पैदास करताना केवळ उत्पादन वाढ हाच एकमेव मुद्दा विचारात घेतला जातो. एखादी जात एकरी 25 क्विंटल उत्पादन देत असेल, तर नवी जात 30 क्विंटल कसे उत्पादन देईल याकडे अधिक लक्ष दिले जाते. उत्पादित होणारे 30 क्विंटल पौष्टिक आहे का नाही? याचा विचार केला जात नाही. काहीजण यावर शंका घेऊ शकतील सर्वच बाबतीत तसे घडत नाही. पण आता जनुकीय सुधारित जाती विकसित होत आहेत. याबाबत आपण हे सांगू शकता का? या जातीचे बियाणे खाण्यास योग्य आहे का? याचा विश्‍वास दिला जातो का? जर नवे उत्पादित धान्य खाण्यास योग्य नसेल तर त्याचे उत्पादन करण्यात अर्थ काय? केवळ उत्पादन अधिक मिळते म्हणून ते पिकवायचे का? उत्पादित होणारा माल बीज आहे की कोंडा याचा विचार नको का? जनावरांनाही खायला घालण्यास अयोग्य असणारे पदार्थ उत्पादित करायचे का? आरोग्यास घातक अशी ही उत्पादने विकसित केली जात आहेत. शेतकऱ्यांना याची कल्पनाही नाही. आपण शेतात अधिक उत्पादन येते म्हणून जे पिकवतो ते एक प्रकारचे विषच आहे. यासाठी आपण काय पिकवतो याचा विचार शेतकऱ्यांनी करायला हवा. कापसाच्या जनुकीय सुधारित जाती आल्या त्यांनी उत्पादनात क्रांती केली. पण त्यानंतर तीन वर्षांनी उत्पादनाचा आलेख ढासळू लागला. आता या सुधारित जाती पूर्वी इतकी उत्पादने देत नाहीत. भुईमुगाच्या शेंगांच्या बाबतीतही तेच घडले. संकरित जाती आल्या. एका जाळीला शंभर शेंगा लागायच्या. सुरवातीची तीन चार वर्षे या जातींनी शंभर पर्यंत उत्पादन दिले पण आता याच जातीच्या जाळीला दहा शेंगाही लागत नाहीत. ही परिस्थिती आहे. वाढत्या लोकसंख्येला कुपोषणापासून रोखण्यासाठी उत्पादकता वाढविणे हे आव्हान आहे. पण हे आव्हान स्वीकारताना उत्पादित होणारा माल आरोग्यास घातक ठरणार नाही किंवा शेतकऱ्यांचे नुकसान करणारा ठरणार नाही याचा विचार करायला नको का? भाताच्या संकरित अनेक जाती आल्या. त्याची यादी लांबलचक आहे. दरवर्षी यामध्ये भरच पडत आहे. पण या जाती घनसाळ, चंपाकळी, काळा जिरगा आदी पारंपरिक देशी जातींची बरोबरी करू शकतात का? त्यांच्या इतके पौष्टिक धान्य देऊ शकतात का? याचा विचार व्हायला नको का? येणारे उत्पादन हे कोंडाच असेल तर ते घेणे योग्य आहे का? आपण काही अंध नाही. यातील फरक आपणास ओळखता यायला नको का? देशी वाणांचे संवर्धन हे यासाठीच गरजेचे आहे. कोंड्याचे उत्पादन करण्यापेक्षा सशक्त देशी वाणांचे धान्य उत्पादित करायला हवे. पौष्टिकतेचा विचार करून आरोग्यदायी अशी उत्पादने शेतकऱ्यांनी घेतली तर देश सशक्त होईल. भावी पिढीही सशक्त राहील. 


 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621



No comments:

Post a Comment