Monday, May 25, 2020

नगरेचिं रचावीं । जळाशयें निर्मावीं ।


आत्माची खरी गरज ऑक्‍सिजन आहे. हा ऑक्‍सिजन श्‍वासोच्छवाव्यतिरिक्त पाण्यावाटेही त्याला मिळतो. शरीरातील पेशीतून तो मिळतो. सध्या प्रदूषण वाढले आहे. हवेतील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे आपणास विविध आजार होत आहेत. प्रदुषणमुक्तीसाठी आपण लढा उभारतो आहोत. जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी पर्यावरणाचा समतोल ढळू न देणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी आवश्‍यक उपाययोजनांची गरज आहे. - राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

नगरेचिं रचावीं । जळाशयें निर्मावीं ।
लावावीं । नानाविधें ।। 233 ।। अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ - शहरेच वसवावीत, जलाशय वैगरे पाण्याचे साठे बांधावेत. नाना प्रकारचे मोठे बगीचे लावावेत.

पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. देह हा विविध पेशींनी तयार झाला आहे. पाण्यामुळे शरीरातील या पेशी जिवंत राहतात. पेशींची संख्या कमी जास्त झाली तर देहावर याचा परिणाम होतो. कधीकधी जीवन प्रवासच संपतो. यासाठी प्रत्येक सजिवासाठी पाणी हा आवश्‍यक घटक आहे. पृथ्वीवर पाणी आहे म्हणूनच तर येथे जीवसृष्टी आहे. इतर गृहावर जीवसृष्टी आहे का नाही हे पाहण्यासाठी तेथे पाणी आहे का हे प्रथम तपासले जाते. मंगळावर पाणी आढळल्याचा दावा केला जातो. पाणी असेल तर तेथे निश्‍चितच जीव असणार. पण पृथ्वी वगळता इतर कोठेही पाणी नाही.

पाणी म्हणजे काय? तर एचटुओ. दोन हायड्रोजनची संयुगे व एक ऑक्‍सिजन मिळूण पाणी तयार होते. हा ऑक्‍सिजनच महत्त्वाचा आहे. हा प्राणवायू आहे. श्‍वास घेतो व सोडतो म्हणजे आपण नेमके काय करतो? ऑक्‍सिजन आतमध्ये घेतो आणि कार्बनडायऑक्‍साईड बाहेर सोडतो. श्‍वास हाच आपला प्राण आहे. श्‍वास आहे तर आपण जिवंत नाहीतर देह दगड. श्‍वासोच्छवासाची क्रिया थांबली की जीवन संपते. ही क्रिया हाच आपला आत्मा आहे. देहात श्‍वास येतो आणि बाहेर जातो. आत्मा असे पर्यंत ही क्रिया सुरू राहते. या देहातून आत्मा बाहेर पडला की ही क्रिया थांबते.

आत्माची खरी गरज ऑक्‍सिजन आहे. हा ऑक्‍सिजन श्‍वासोच्छवाव्यतिरिक्त पाण्यावाटेही त्याला मिळतो. शरीरातील पेशीतून तो मिळतो. सध्या प्रदूषण वाढले आहे. हवेतील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे आपणास विविध आजार होत आहेत. प्रदुषणमुक्तीसाठी आपण लढा उभारतो आहोत. जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी पर्यावरणाचा समतोल ढळू न देणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी आवश्‍यक उपाययोजनांची गरज आहे. जीवनात पाण्याचे, ऑक्‍सिजनचे महत्त्व विचारात घेता. पर्यावरणामध्ये हवेचे व पाण्याचे प्रदूषण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. पाणी आहे तरच आपला विकास आहे.

घर बांधले पण पाणी नसेल तर तेथे राहणार कसे? पाणी आहे तेथेच वस्ती वसते. पाणी नाही त्या वाळवंटात कोणी राहू शकत नाही. नदी पात्रात डोह आहेत त्या ठिकाणी पूर्वी वस्ती उभी राहिली. डोंगरावर, उंच पठारावर पाणी जिथे सापडले तेथे वसाहती निर्माण झाल्या. पाणी असेल तरच शेतकरी पिके घेऊ शकेल ना? पाण्याचे साठे करण्यासाठीच धरणे, जलाशले बांधली गेली. विहिरी, कूपनलिका खोदल्या गेल्या. पाऊस पडला तरच पिके येऊ शकतात. अन्यथा उत्पन्न मिळणार नाही. पावसाचे पाणी जमीनीत मुरवले तरच विहिरी, कूपनलिकांना पाणी येईल. पाणी असेल तरच बागायती शेती करता येईल. अन्यथा पावसावर जितके पिके घेता येतील तितकीच पिके घेणे शक्‍य होईल.

इस्राईलमध्ये खूपच कमी पाऊस पडतो. पण तेथे शेतीचे उत्पन्न आपल्यापेक्षाही अधिक होते. कमी पाण्यावर जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येते. याचे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले. पाण्याचा योग्य वापर केला तर ते शक्‍य आहे. आपल्याकडे पाऊस मुबलक पडतो पण नियोजन नसल्याने भरघोस उत्पादन होत नाही. गरजेपेक्षा अधिक मिळाले की दुर्लक्ष होते. यात नुकसान होते. गरजेपेक्षा कमी किंवा आवश्‍यक तेवढेच मिळाले तर त्याचा वापर योग्य प्रकारे केला जातो. काटकसर, बचत करण्याची सवय लागते. पावसाचे पाणी वर्षभर पुरविता यावे, यासाठी ते साठविणे गरजेचे आहे. शेतीचा विकास साधण्यासाठी पाणी ही मुख्य गरज आहे. विहीर खोदणे, कूपनलिका खोदणे किंवा शेततळे उभारणे ही गरज आहे. पावसाच्या पाण्यावर फक्त खरीप पिके घेता येणे शक्‍य आहे. बारमाही पिकांसाठी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी लागते. सध्या शेततळ्याचा वापर करून शेतीतील पाण्याचा प्रश्‍न मिटवला जात आहे.

ग्रीनहाऊस हे तंत्रज्ञान आता अनेक ठिकाणी वापरले जाऊ लागले आहे. पूर्वी पावसाचे पाणी शेतात पडत होते. ते जमिनीत मुरत होते. साहजिकच भूजल पातळी वाढली जात होती. पण आता ग्रीनहाऊसमुळे पाणी थेट जमिनीत मुरत नाही. ते शेतात पडतच नाही. यासाठी आता पाणी जमिनीत मुरवण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज भासू लागली आहे. रेन वॉटर हार्व्हेस्टिंग हे नवे तंत्र नव्या तंत्राने शेती करणाऱ्यांनी वापरणे गरजेचे आहे. इस्राईलमध्ये पाऊस कमी पडतो त्यामुळे तेथे या तंत्राची सक्ती आहे. आपल्याकडे पाऊस मुबलक पडत असल्याने याकडे दुर्लक्ष केले जाते. तसे होता कामा नये. सध्या भूजलपातळी घटण्याची ही प्रमुख कारणे आहेत. मोठ मोठ्या वसाहती उभ्या राहिल्या. या वसाहतीमध्ये चिखल होऊ नये, घाण होऊ नये यासाठी जमिनीवर फरश्‍या बसविल्या गेल्या. स्वच्छता राखण्यासाठी ही सोय केली पण यामुळे पावसाचे पडणारे पाणी जमिनीत मुरण्याची क्रिया थांबली. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला. भूजलसाठे घटले. प्रदूषित झाले. यासाठी मोठ्या वसाहतीमध्ये आता रेन वॉटर हार्व्हेस्टिंगची गरज आहे.

पावसाचे पाणी जमिनीत मुरावे यासाठीच्या उपाय योजनांची सक्ती हवी. पाण्याचे प्रदूषण होणार नाही याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. नद्यांचे प्रदूषण वाढले आहे. काही शहरात वाहणाऱ्या नद्या ह्या नद्या आहेत की गटारे हे सांगणेही आता कठीण झाले आहे. नदीची गटारगंगा व्हावी ह्या इतके दुर्दैव्य दुसरे कोणते असू शकेल? जीवनासाठी आवश्‍यक घटकांकडे दुर्लक्ष झाले तर जीवनच नष्ट होईल याचा विचार करण्याची गरज आहे. यासाठी संयुक्त लढा, प्रबोधनाची गरज आहे. प्रत्येकाने कर्तव्य म्हणून जीवनात तसा बदल करण्याची गरज आहे. प्रत्येकाने पाणी आणि हवा शुद्ध ठेवण्याचा संकल्प केला आणि त्यानुसार जीवन जगण्याचा निर्धार केला तर ते शक्‍य आहे.

माणसाने काही सवयी लावून घेण्याची गरज आहे. आज नको उद्या बघू असे म्हणत पिढ्यान पिढ्या याकडे दुर्लक्ष होत आहे. आता याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अशी स्थिती उत्पन्न झाली आहे. प्रदूषण कमी करणे ही संयुक्तिक जबाबदारी आहे. हवा शुद्ध ठेवण्यासाठी झाडे लावण्याची गरज आहे. हवेतील ऑक्‍सिजनचे प्रमाण योग्य राखण्यासाठी, शुद्ध ऑक्‍सिजनसाठी प्रयत्न करायला हवेत. तसे वने उभारणे, जलाशयांची निर्मिती करणे, शहरे उभारणे हे राजस गुण आहेत. पण जीवनात हे निर्माण करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. हे उभारतानाच प्रथम पर्यावरणाचा विचार करायला हवा. हवेचे प्रदुषण, पाण्याचे प्रदुषण, आवाजाचे प्रदुषण हे मानवी शरीरावर खूप मोठा परिणाम करते. मानवाचे आरोग्य ठिक राहण्यासाठी याची शुद्धी गरजेची आहे. अध्यात्मात यासाठीच तर शुद्धतेला महत्त्व आहे. शुद्धता मनाच्या प्रसन्नतेसाठी गरजेची आहे. मन प्रसन्न असेल तरच साधनेत मन रमते. यासाठी शुद्धता हवी.

शुद्ध हवा आत घेण्यासाठी परिसर शुद्ध ठेवणे हे याचसाठी गरजेचे आहे. श्‍वासावर नियंत्रण हाच आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग आहे. स्वतःच्या कानांनी श्‍वास ऐकणे हीच साधना आहे. मनाने ऐकल्याने, एकाग्रता वाढविल्याने आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग सुकर होतो.

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

No comments:

Post a Comment