Sunday, May 17, 2020

माणूसकीचा वृक्ष


झाड काय देते? जाणाऱ्या येणाऱ्यांना सावली देते. उन्हापासून संरक्षणासाठी आसरा देते. श्रमीकांना सावली देते. पत्र, पुष्प, फळ त्यापासून मिळते. मोहोर लागल्यानंतर सुवास देते. वातावरण प्रसन्न करते. पण त्या झाडाला आपण काय देतो. कधी पाणी तरी घालतो का? काही न घेता ते सर्वकाही देते.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

पत्र, पुष्प, छाया । फळें मूळें धनंजया ।
वाटेचा न चुके आलिया । वृक्षु जैसा ।। 86 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ - अर्जुना, ज्याप्रमाणें वृक्ष वाटेंने येणाऱ्यास पाने, फुले, छाया, फळे, मुळें देण्यास चुकत नाही.

घर कसे असावे? असा प्रश्‍न केला तर आपल्या मनात उत्तर येते बंगला असावा की झोपडी. सध्या जीवनात पैशाला महत्त्व आहे. जीवन पैशावर चालते. आराम पैशावर मिळतो. पैसा असेल तर जीवनात सुख आहे. पैसा नसेल तर जगणार कसा हा मोठा प्रश्‍न आहे. भीक मागूण भीक मिळेल का? हा सुद्धा मोठा प्रश्‍न आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे जीवनच बदलले आहे. यामुळे घर कसे असावे ? या प्रश्‍नाचे उत्तर हे भावनिक न येता आर्थिक घडामोडीवर आधारित उत्तर मिळाले आहे. घर शांत, स्वच्छ आणि इतरांनाही सुख देऊ शकेल असे असावे. मग ती छोटीशी झोपडी जरी असली तरी चालेल. पण ती सुखाची सावली देणारी असावी. टुमदार बंगला आहे पण त्यामध्ये शांत झोप लागत नसेल तर ते घर कसले. झाडाप्रमाणे घर असावे.

झाड काय देते? जाणाऱ्या येणाऱ्यांना सावली देते. उन्हापासून संरक्षणासाठी आसरा देते. श्रमीकांना सावली देते. पत्र, पुष्प, फळ त्यापासून मिळते. मोहोर लागल्यानंतर सुवास देते. वातावरण प्रसन्न करते. पण त्या झाडाला आपण काय देतो. कधी पाणी तरी घालतो का? काही न घेता ते सर्वकाही देते. निरपेक्ष भावनेने ते सर्व देते. उन्हात चालून चालून थकलेल्या व्यक्तीला ते आसरा देते. शेतात कष्ट करणाऱ्या व्यक्तीला आता बांधावर झाडे नकोशी वाटत आहेत. नांगरटीला अडचण होते. झाडाच्या सावलीमुळे पीक चांगले वाढत नाही. अशा अनेक कारणांमुळे बांधावरील झाडे नष्ट झाली. नांगरट ट्रॅक्‍टरने होऊ लागल्याने शेतात नांगर चालवून थकण्याचा आता प्रश्‍नच उरला नाही. यांत्रिकीकरणामुळे कामांत सहजता आली, पण माणसाचे मनही तितक्‍याच सहजतेने बदलले गेले.

बांधावरच्या झाडावर त्याने कुऱ्हाडी चालवल्या. उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीत दररोज प्रयोग केले जातात. पण उत्पन्नाचे स्रोतच यांनी तोडले. झाडाचा पाला पडत होता. जमीन शेकण्यासाठी त्याचा फायदा होत होता. शेताला सेंद्रिय खत मिळत होते. झाडाची फळे चाखायला मिळत होती. तीही बंद झाली. निवांतपणे झाडाखाली बसून आराम करता येत होता. मन प्रसन्न करणारा, थकवा दूर करणारा हा वृक्ष तोडल्याने शेतकऱ्याचे मन भरकटले आहे. शांतीच्या शोधात तो फिरतो आहे. निवांतपणा शोधतो आहे.

वाड्याचा बंगला झाला, शेणाच्या सारवलेल्या जमीनींची जागा आता स्टाईलच्या फरशांनी घेतली आहे. पण या नव्या घरातील गारवाच नाहीसा झाला आहे. उन्हाच्या दाहकतेने पंख्याचा वाराही गरम वाटू लागला आहे. पांढऱ्या मातीच्या विटांतला वाडा त्याच उन्हात नैसर्गिक गारवा देत होता. मग हा सिमेंटचा बंगला का बांधला? अंगदुखीचा त्रास यानेच तर आला. पैसा आला पण गारवा गेला. निवांतपणा गेला. माणसातले माणूसपणही गेले. माणूसकीचा वृक्ष आता पुन्हा लावला, तरच भावी काळात मनुष्य संस्कृती टिकून राहील.
 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621



No comments:

Post a Comment