Monday, May 11, 2020

संत ज्ञानेश्वरांनी भगवान श्रीकृष्णास ही उपमा दिली आहे ?



अध्यात्मात स्वच्छतेला अधिक महत्त्व आहे. स्वतः स्वच्छ राहून इतरांनाही स्वच्छ ठेवणे, स्वच्छ करणे हे गुण अंगी असणे आवश्‍यक आहे. तसा बदल माणसांमध्ये घडविता यावा लागतो. यासाठी तसे स्वतःमध्ये बदल करणे आवश्‍यक आहे. शरीरातील प्रत्येक घटकांत स्वच्छतेचा हा गुण निर्माण व्हायला हवा. तरच गायीप्रमाणे स्वतःमध्येही पवित्रता येईल.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685


तैसें गीतेंचें हे दुभतें । वत्स करूनि पार्थातें ।
दुभीनली जगापुरतें । श्रीकृष्णगाय ।।1689।।अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - त्याप्रमाणें अर्जुनाला वासरूं बनवून श्रीकृष्णरूपी गायीनें हे गीतेचें दुभते जगाला पुरेल एवढे दिले आहे.

भारतीय संस्कृतीत गायीला देवता मानले जाते. हे देवपण कसे येते? कशाने येते? जिवाचा शिव कसा होतो? नराचा नारायण कसा होतो? हे गुण कसे येतात? देशी गाय आपणास या गोष्टी शिकवते. यासाठी देशी गायीचे गुण विचारात घ्यायला हवेत. गाय स्वच्छतेला अधिक महत्त्व देते. स्वतः व आसपासचा परिसर स्वच्छ असावा या दृष्टीने तिचे प्रयत्न असतात. अनेक जनावरे मातीत लोळतात. चिखलात बसतात. सगळे अंग चिखलाने, मातीने माखलेले असते. त्यांना त्यातच अधिक आनंद वाटतो. पण देशी गाय यामध्ये मोडत नाही. गायींच्या अंगावर असे डाग दिसत नाहीत. देशी गाय स्वच्छ राहण्यावर अधिक भर देते. स्वच्छता हा तिचा स्थायी स्वभाव आहे. मलमुत्र विसर्जनही ती एकदाच सकाळी करते. इतर वेळी ती कधीही मुत्र विसर्जन करत नाही. तिच्या मुत्रामध्ये पर्यावरण शुद्ध करण्याचे गुणधर्म आहेत. म्हणूनच घरामध्ये देशी गायीचे गोमुत्र शिंपडण्याची प्रथा आहे. गायीचे शेण आणि मुत्र हे कीडनाशक म्हणूनही वापरले जाते. शेणाने घर सावरल्याने घरातील कीटक, विषाणू नष्ट होतात. घरात स्वच्छता राहाते. गायीचे दूध हे पचायला हलके असते. लहान मुलांना यासाठी ते देतात. दूध, तुपात अनेक औषधी गुणधर्म आहेत. पाचक शक्ती वाढवितात. इतकी पवित्रता गायीमध्ये नांदते आहे. अध्यात्मात स्वच्छतेला अधिक महत्त्व आहे. स्वतः स्वच्छ राहून इतरांनाही स्वच्छ ठेवणे, स्वच्छ करणे हे गुण अंगी असणे आवश्‍यक आहे. तसा बदल माणसांमध्ये घडविता यावा लागतो. यासाठी तसे स्वतःमध्ये बदल करणे आवश्‍यक आहे. शरीरातील प्रत्येक घटकांत स्वच्छतेचा हा गुण निर्माण व्हायला हवा. तरच गायीप्रमाणे स्वतःमध्येही पवित्रता येईल. देवपण येईल. सद्‌गुरू हे गायी प्रमाणे असतात. स्वतः स्वच्छ राहतात व इतरांना स्वच्छ करण्यासाठी झटतात. यामुळे माऊलीने भगवान श्रीकृष्णानांना गाईची उपमा दिली आहे. गाय जशी तिच्या वासरांवर प्रेम करते. माया करते. त्याप्रमाणे सद्‌गुरूही आपल्या भक्तावर माया करतात. प्रेम करतात. गाय जशी स्वतःच्या वासरांना पोसते तसे सद्‌गुरूही त्यांच्या शिष्यांना पोसतात. पूर्वीच्याकाळी ज्याच्याकडे जास्त गायी तो सर्वांत श्रीमंत समजला जात असे. कारण एक गाईवर एक कुटुंब सहज पोसले जाते. देशी गाय एक लिटर दूध देते. शेतीसाठी खत देते. उत्पादनवाढीसाठी पोषक घटक देते. पर्यावरण शुद्ध करते. मन प्रसन्न ठेवते. शेणीचा धूप घर स्वच्छ, प्रसन्न ठेवतो. अशा गायींची जोपासना आता केली जात नाही हे दुर्दैव्य आहे. अशाने देशी गायींची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. पूर्वी गावात हजारो देशी गायी होत्या पण आता एक गायही मिळणे मुश्‍किल झाले आहे. गायींचे महत्त्व ओळखून शेतकऱ्यांनी एक देशी गाय तरी घरात पोसणे गरजेचे आहे.
 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

No comments:

Post a Comment