Sunday, May 24, 2020

आत्मज्ञान प्राप्ती नैसर्गिक क्रिया़; कसे ते घ्या जाणून ?


सद्‌गुरुंची दृष्टीही सर्वत्र समान असते. शत्रू असो किंवा मित्र दोघांच्याही ठिकाणी ते एकच भाव ठेवतात. उपकार, परोपकार याचेही येथे भाष्य नाही. आत्मज्ञान प्राप्ती ही नैसर्गिक क्रिया आहे. सर्वांना याची प्राप्ती होते. यात भेदभाव नाही. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621

जो खांडावया घावो घालीं । कां लावणी जयानें केली । 
दोघां एकचि साऊली । वृक्ष दे जैसा ।। 199 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 12 वा 

ओवीचा अर्थ - जो तोडण्याकरितां घाव घालतो किंवा जो लागवड करतो, त्या दोघांना वृक्ष जसा सारखी सावली देतो. 

निसर्ग आपणास अनेक गोष्टी शिकवतो. ते निसर्गाचे नियम आहेत. जीवनात जगताना याचा अवलंब आपण करायला हवा. निसर्गाचे नियम हे अध्यात्मात पाळावे लागतात. पर्यावरणाचे नियम न पाळल्याने प्रदूषण वाढले आहे. निसर्गाचा कोप होताना दिसत आहे. जागतिक तापमानात वाढ होत आहे. याचा मानवी जीवनावर अनिष्ट परिणाम होत आहे. निसर्गाचे नियम न पाळल्याचा हा फटका आहे. 

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आवश्‍यक गोष्टींचे पालन हे मानवाने करावेच लागेल. जीवन जगतानाच तसे नियोजन मानवाने करायला हवे. निसर्गाचे नियम मोडणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. अध्यात्मात प्रगती साधताना मात्र निसर्गाचे हे नियम पाळावेच लागतात. तरच प्रगती होते. नियम हा नियमच आहे. जाऊ दे, राहू दे हा स्वभाव येथे उपयोगी नाही. निसर्ग नियम हे सर्वांसाठी आहेत. झाड सावली सर्वांना देते. वृक्षतोड करणाऱ्यासही सावली देते व झाड लावणाऱ्यासही सावली देते. ते यामध्ये भेदभाव करत नाही. यातून आपण काय शिकायचे, तर सर्वांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समान ठेवावा. आपल्या तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे अशा भेद येथे नाही. 

सद्‌गुरुंची दृष्टीही सर्वत्र समान असते. शत्रू असो किंवा मित्र दोघांच्याही ठिकाणी ते एकच भाव ठेवतात. उपकार, परोपकार याचेही येथे भाष्य नाही. आत्मज्ञान प्राप्ती ही नैसर्गिक क्रिया आहे. सर्वांना याची प्राप्ती होते. यात भेदभाव नाही. दुधापासून दही व ताक होणे ही नैसर्गिक क्रिया आहे. पण दुधाचे दही होण्यासाठी त्यात विरजण हे घालावेच लागते. सद्‌गुरू मंत्र, दीक्षा हे विरजणच आहे. या विरजणाशिवाय दही होण्याची प्रक्रिया नाही. दही झाल्यानंतर ताक होण्यासाठी ते घुसळावे लागते. नुसता सद्‌गुरूंचा अनुग्रह झाला म्हणजे झाले. असे नाही. 

दिलेल्या मंत्राचा जप हा करावाच लागतो. साधना ही करावीच लागते. जसे ताक होण्यासाठी दही घुसळावे लागते, तसेच हे आहे. दुधापासून ताक ही निसर्ग क्रिया आहे, तसे आत्मज्ञानप्राप्ती ही सुद्धा निसर्ग क्रियाच आहे. पण या क्रियेत काही प्रक्रियाही करावीच लागते. या प्रक्रियांशिवाय पुढची निर्मिती होत नाही. निसर्गाचे हे नियम समजून घ्यायला हवेत. त्यांचे पालन करायला हवे. वातावरणात प्रदूषण वाढत आहे. निसर्गाचा समतोल ढासळतो आहे. तो ढासळणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अध्यात्मिक प्रगती साधतानाही प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. समतोल ढासळणार नाही हे पहायला हवे. तरच प्रगती होणार आहे.  

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621




No comments:

Post a Comment