Friday, June 12, 2020

का भूमीचें मार्दव । सांगे कोंभाची लवलव । नाना आचार गौरव । सुकुलीनाचे ।। (ज्ञानेश्वरी)

 
मनाला कष्टाची सवय नसल्याने मुले शेतीकडे वळत नाहीत. ती काय करणार? शेती विकूनच टाकणार ना? गाडी कष्टाने कमवायची असते शेती विकून आलेल्या पैशातून खरेदी करायची नसते. 
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

का भूमीचें मार्दव । सांगे कोंभाची लवलव ।
नाना आचार गौरव । सुकुलीनाचे ।। 180 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - अथवा अंकुराचा लुसलशीतपणा हा जमिनीचा मृदुपणा सांगतो, किंवा आचार हा चांगल्या कुलवानाचा चोरपणा दाखवितो.

पुरातन कालात साधू-संत हे संशोधक होते. संशोधकांप्रमाणे त्यांची वृत्ती होती. खोलवर विचार करण्याची सवय त्यांना होती. शब्दातून विचारांची खोली समजते. साध्या साध्या गोष्टींचा खोलवर विचार केल्याचे यातून जाणवते. जमीन मऊ आहे हे ओळखायचे कसे? बीजाला अंकुर कसा फुटला आहे. तो कसा उगवला आहे यावरून तेथील जमीन कशी आहे हे समजते. बारीक निरीक्षणातूनच या गोष्टी लक्षात येतात. शेतकऱ्यांनीही शेती करताना असा बारीक-सारिक विचार करावा. तशी सवय मनाला लावून घ्यावी. तसे आचरणही ठेवायला हवे. हे सुकुलिनाचे लक्षण आहे. शेतीमध्ये विकास करायचा असेल तर तसे आचरणही हवे. मनात प्रश्‍न पडायला हवेत. हे असे का होते? हे कशामुळे झाले? यावर उपाय काय? प्रश्‍न पडले तर उत्तरे शोधण्याची ओढ लागते. उत्तरे शोधता शोधता खोलवर विचारांची सवय लागते. विचारांची खोली वाढली की, आपोआपच पक्वता येते. तसे शेतकरी व शेतकऱ्यांच्या मुलांना कष्टाची सवय असते. मनाला कष्टाची सवय असणे हे सध्याच्या काळात गरजेचे आहे. चंगळवादी संस्कृतीच्या आक्रमणामुळे कष्टाची सवयच कमी होत आहे. श्रम करून पैसा कमविणाऱ्याला त्याचे मोल माहीत असते. तो खर्च करताना तसा विचार करतो. श्रमाचा पैसा उधळावा अशी मानसिकता त्याची नसते. कष्टाची किंमत माहित असते. याची जाणीव असते. यासाठी शेतात राबायची सवय अंगी बाणायला हवी. डान्सबार पैसे उधळणारे ही कष्टकरी शेतकऱ्यांची मुले नव्हती. जमीनदारांची मुले होती. त्यांना कष्टाची किंमत माहीत नव्हती. जमीनी विकून गाड्या उडवणारे शेतकरी कसले? आचारावरून तो कोणत्या घरातील आहे हे समजते. कष्टकरी शेतकऱ्यांची मुले डान्सबारवर पैसे उधळण्यासारखी टवाळखोरी कदापी करणार नाहीत. कामातून आलेला थकवा दूर करण्यासाठी ते मनसोक्त पाण्यात डुंबतील, कीर्तनात नाचतील, भजनात रंगतील, भक्तीत न्हातील. पण पैसा उधळणार नाहीत. कष्टाच्या पैशाचे मोल ते चांगल्याप्रकारे जाणतात. सहज मिळाल्यानंतर त्याचे मोल माहीत नसते. जमीनदारांच्या मुलांना सहज संपत्ती मिळते. त्यांना जमीनीची आवडच नसते. गोडीही नसते. कधी शेतात जाऊन काम केल्याचा अनुभवही नसतो. मनाला कष्टाची सवय नसल्याने मुले शेतीकडे वळत नाहीत. ती काय करणार? शेती विकूनच टाकणार ना? गाडी कष्टाने कमवायची असते शेती विकून आलेल्या पैशातून खरेदी करायची नसते. कष्टातून खरेदी करण्यात जो आनंद असतो तो शेत विकून खरेदी करण्यात कसा असेल? यासाठी मुलांना कष्टाची सवय लावायला हवी. सहज मिळाले की त्याचे मोल समजत नाही. कष्टाने मिळवले की त्याचे मोल कळते. चांगले संस्कार होण्यासाठी प्रथम कष्टाची सवय मनाला लावायला हवी. कष्ट हे सुकुलिनाचे लक्षण आहे.

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621


#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे 

No comments:

Post a Comment