Monday, June 22, 2020

आतां चेंडुवें भूमि हाणिजें । हें नव्हे तो हाता आणिजे । कीं शेतीं बी विखुरिजे । परी पिकीं लक्ष ।। ( एकतरी ओवी अनुभवावी)


रासायनिक खतांच्या अधिक मात्रेमुळे जमिनीला मीठ फुठते. नायट्रोजनच्या अधिक मात्रेमुळे कधीकधी पीक करपण्याचा, जळून जाण्याचाही धोका असतो. अशा गोष्टी विचाऱ्यात घ्यायला हव्यात. शेती करताना नियोजनाचा अभाव असल्यानेच शेतीत नुकसान होत आहे. पिकावर लक्ष न ठेवल्याने नुकसान होते. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685 

आतां चेंडुवें भूमि हाणिजें । हें नव्हे तो हाता आणिजे । 
कीं शेतीं बी विखुरिजे । परी पिकीं लक्ष ।। 100 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 16 वा 

ओवीचा अर्थ - आतां चेंडू जमिनीवर आपटावयाचा तो चेंडूने जमिनीला मारण्याकरितां नव्हे तर चेंडूला उशी येऊन तो आपल्या हातांत यावा म्हणून अथवा शेतांत बी फेकावयाचे ते नुसतें बी फेकणें नसतें परंतु त्या फेकण्यांत पिकावर नजर असते. 

कोणतेही कर्म करताना फळाची अपेक्षा ठेवून कर्म करू नका असा सल्ला दिला जातो. म्हणजे असे नव्हे की सर्वच गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे. चेंडू जमिनीवर आपटायचा तो जमिनीला मारण्यासाठी आपटायचा नसतो. तो आपोआप परत येतो. आलेला चेंडू हातात पकडायचा असतो. जमिनीत बी पेरायचे ते पीक हाती मिळावे यासाठीच. नैसर्गिक आपत्तीने बऱ्याचदा पिकांचे नुकसान होते. यासाठीच अपेक्षा ठेवून कर्म करायचे नाही. मन निराश होऊ नये, मन खचू नये यासाठीच फळाची अपेक्षा ठेवायची नसते.
 
एकदा नुकसान होईल, दोनदा नुकसान होईल, तिसऱ्यांदा तरी चांगले पीक हाती येईलच ना? प्रयत्न सोडायचे नाहीत. सकारात्मक विचार करून वाटचाल सुरु ठेवायची. जे सदैव अपयशाची चर्चा करतात. त्यांना नेहमीच अपयश येते. जे सदैव यशाची, समृद्धीची चर्चा करतात ते सदैवी यशस्वी होतात. सकारात्मक विचारांमुळे मनाला नेहमीच धैर्य मिळते. उत्पन्न मिळावे यासाठी प्रयत्न करायला हवेत. उत्पन्न कसे वाढविता येते याचे आधुनिक तंत्र आत्मसात करायला हवे. पण हे वापरताना आवश्‍यक ती काळजी घ्यायला हवी. रासायनिक खतांमुळे उत्पन्न वाढते म्हणून हव्यासापोटी वाट्टेल तशी खतांची मात्रा देणे योग्य नाही. आवश्‍यकतेनुसारच खतांचा वापर करावा. अधिक रासायनिक खत वापरले तर एकदा, दोनदा उत्पन्न वाढते. पण जमिनीचा त्यामुळे पोत बिघडतो याचाही विचार करायला हवा.
 
रासायनिक खतांच्या अधिक मात्रेमुळे जमिनीला मीठ फुठते. नायट्रोजनच्या अधिक मात्रेमुळे कधीकधी पीक करपण्याचा, जळून जाण्याचाही धोका असतो. अशा गोष्टी विचाऱ्यात घ्यायला हव्यात. शेती करताना नियोजनाचा अभाव असल्यानेच शेतीत नुकसान होत आहे. पिकावर लक्ष न ठेवल्याने नुकसान होते. पेरणी झाल्यानंतर अनेक जण शेताकडे फिरकतच नाहीत. थेट कापणीलाच शेतात जातात. उसाच्या बाबतीतही असेच केले जाते. पिकाला पाणी देताना पहिल्या सरीत पाणी सोडले जाते. त्यानंतर पाणी पुढे कोठे गेले हे पाहिलेच जात नाही.
 
घरची ओढ लागलेली असते. पाणी सोडायचे घर गाठायचे. घरात येऊन टीव्ही पाहात बसायचे. अशाने शेताची वाट लागत आहे. जमिनीला योग्य प्रमाणात पाणी न दिल्याने जमिनीचा पोत बिघडू लागला आहे. योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नसल्याने पिकाची वाढही खुंटत आहे. योग्य वाढ न झाल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. शेती करायची तर मन लावून करायला हवी. नोकरी करायची तर मन लावून करावी लागते. नाहीतर मालक कामावरून काढून टाकतो. या भीतीने काम व्यवस्थित होते. येथे तशी भीती नसतेच. थेट परिणाम होत नसल्याने दुर्लक्ष होते. पण काही वर्षानंतर उत्पादन घटले की मग डोळे उघडतात. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
 
जमिन सुधारण्यासाठी खर्च वाढतो. कर्ज काढण्याची वेळ येते. अशाने नुकसान होण्याची भीती असते. अंग मोडून काम करण्याची सवय नसल्याने कामाचा कंटाळा येतो. शेतीत काही राम राहिला नाही अशी मनस्थिती होते. नुकसानच नुकसान होते, असा व्यवसाय नकोसा वाटू लागतो. मन खचत. अशी अवस्था का होते? पिकावर योग्यप्रकारे लक्ष न ठेवल्याने होते. रुची ठेवून कोणताही व्यवसाय केला तर तो टिकतो. रुचीच नसेल तर तो व्यवसाय वाढणार कसा? आवडीने व्यवसायात हवे ते बदल करता येतात. विहीर आहे तर त्यात वीस-तीस मासे पाळावेत. शेतावर झाडे लावावीत. शेताचा परिसर स्वच्छ, आकर्षक ठेवावा. रस्ते करावेत.
 
पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासारखे नवे तंत्र वापरावे. शेतीत होणाऱ्या नवनव्या बदलांचा अभ्यास करावा. शेतीच्या बाजारपेठेचा अभ्यास करावा. त्यानुसार शेतात नियोजन करावे. सतत बाजारपेठेत होणाऱ्या बदलांचा आढावा घेऊन पिकांची निवड करावी. कोणत्या पिकाची पेरणी किती झाली आहे. कोणती पिके प्राधान्याने घेतली जात आहेत. कोणत्या पिकाच्या बियाण्यास मागणी आहे? कोणते बियाणे यंदा अधिक खपले आहे. याचा एकंदरीत आढावा घेतल्यानंतर कोणत्या पिकास कमी-अधिक दर राहील याची कल्पना येते. बाजारपेठेचाही असाच अभ्यास करायला हवा.
 
काही वर्षे उसाचे पीक अधिक असते. तर काही वर्षे त्यामध्ये घट झालेली आढळते. कधी टोमॅटो अधिक होतो. तर कधी कांदा अधिक होतो. कधी भाजीपाला अधिक होतो. शेतकरी गेल्यावर्षी कोणत्या पिकास दर होता त्याचा विचार करून दुसऱ्यावर्षी त्याची अधिक लागवड करतात. असे योग्य नाही. गेल्यावषीचे गेल्या वर्षी, यंदा काय परिस्थिती आहे याचा विचार शेतकऱ्यांनी करायला हवा. सोयाबीनचेही तसेच आहे. कधी उत्पादन वाढते. कधी घसरते. याकडे लक्ष ठेवून पिकांची निवड करावी.
 
पावसाचे कमी अधिक प्रमाण व दुष्काळ या स्थितीमुळे शेतीच्या पिकात बदल होत आहेत. दुष्काळी पट्ट्यात ऊस अधिक दिसतो आहे. फळबागांची संख्या घटली आहे. अशा गोष्टींचा विचार हा शेतकऱ्यांनीच करायला हवा. अभ्यास केला तर उत्तरे मिळतात. डोळे झाकून बियाणे पेरायचे व शेती करायची हे दिवस आता गेले आहेत. शेतीही अभ्यास करूनच करावी लागणार आहे. पूर्वीची परिस्थिती आता नाही. भाताची काढणी झालेल्या शेतात एक नांगरट करून हरभरा नुसता फेकून दिला जातो. हरभऱ्याचे उत्पन्न मिळते. पण तेच काढणीनंतर नांगर, कुरी मारून हरभऱ्याची योग्य अंतरावर पेरणी केल्यास याहूनही अधिक उत्पन्न मिळते. शेतीची कामे करताना कंटाळा करून चालत नाही.
 
कंटाळा केला तर त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. व्यापारी दुकानात ग्राहक नाही म्हणून दुकान बंद करून फिरायला जात नाही. तो ग्राहकाची वाट पाहतो. आज ग्राहक आला नाही. उद्या येईल या आशेवर तो दुकानात बसून राहातो. त्याचीही सहनशीलता कधी कधी संपते. पण तरी तो व्यवसाय सोडून पळून जात नाही. टिकून राहायला शिकले पाहिजे. सहनशीलता वाढवायला हवी. झटपट पैसा मिळविण्याच्या सवयीमुळे आता ही सहनशीलता कमी होऊ लागली आहे. सहनशीलतेची सवय मोडत आहे. अशानेच जीवनात निराशा वाढत आहे. कंटाळून शेती केली जात आहे. शेती हा व्यवसाय आहे, असे समजून व्यापाऱ्यांच्याप्रमाणे कंटाळा झटकून कामाला जुंपायला हवे. तरच हा व्यवसाय वाढेल. शेतात बियाणे पेरायचे ते जमिनीला दान म्हणून नव्हे तर जमिनीतून भरघोस दाणे मिळावेत यासाठी पेरायचे.  

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
 
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे    
 

 

 

No comments:

Post a Comment