Friday, June 19, 2020

जैसी बीजें सर्वथा आहाळली । तीं सुक्षेत्रीं जऱ्ही पेरिली । तरी न विरुढतीं सिंचली । आवडे तैसीं ।। ( एकतरी ओवी अनुभवावी )

गवत हे मातीच्या संवर्धनासाठी आवश्‍यक आहे. अन्यथा सर्व माती पावसाच्या पाण्याने वाहून गेली असती. केवळ दगडच येथे राहिले असते. पिकांच्या बियाण्यांचेही संरक्षण शेतकऱ्यांना करावे लागते. रोगमुक्त बियाण्याची पेरणी होण्याची गरज आहे. यासाठी बीज प्रक्रिया केली जाते. अनेक रोगाच्या विषाणू उष्णतेने मरतात.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

जैसी बीजें सर्वथा आहाळली । तीं सुक्षेत्रीं जऱ्ही पेरिली । 
तरी न विरुढतीं सिंचली । आवडे तैसीं ।।66।। अध्याय 2 रा 

ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेले बी उत्तम जमिनींत पेरले व त्यास हवे तितके पाणी जरी घातले तरी त्यास अंकुर फुटणार नाही. 

जंगलात वणवा पेटतो. तेव्हा त्यात अनेक वनस्पती नष्ट होतात. या वणव्यामुळे अनेक वनौषधी दुर्मिळ झाल्या आहेत. अशा वनस्पतींचे संवर्धन हे गरजेचे आहे. वणव्यामध्येही बीजाचे संरक्षण होते. बीज एकदा भाजले की ते अंकुरत नाही. त्याची प्रजनन क्षमता नष्ट होते. पण अनेक बीजामध्ये वणव्यापासून संरक्षण करण्याची क्षमता आहे. निसर्गानेच त्याचे प्रयोजन केले आहे. बीजाला काही विशिष्ट प्रथिनांमुळे संरक्षण मिळते. उष्णतेपासून ही प्रथिने संरक्षण करतात. ही प्रथिने बीजाची प्रजनन क्षमता टिकवून ठेवतात. त्यामुळे बीज नष्ट होत नाही. तसे संरक्षण नसते तर वणव्याने जंगलांचे वाळवंटच झाले असते.  गवत पुन्हा कधी उगवलेच नसते.
 
गवत हे मातीच्या संवर्धनासाठी आवश्‍यक आहे. अन्यथा सर्व माती पावसाच्या पाण्याने वाहून गेली असती. केवळ दगडच येथे राहिले असते. पिकांच्या बियाण्यांचेही संरक्षण शेतकऱ्यांना करावे लागते. रोगमुक्त बियाण्याची पेरणी होण्याची गरज आहे. यासाठी बीज प्रक्रिया केली जाते. अनेक रोगाच्या विषाणू उष्णतेने मरतात. धग लागली की ते नष्ट होतात. त्यांची अंकुरण्याची क्षमता नष्ट होते. या विषाणूंचा हे गुणधर्म अभ्यासण्याची गरज आहे. पिकाच्या बियाण्यांचे संरक्षण करण्यासाठी तरी याचा अभ्यास आवश्‍यक आहे. 

उसाचे सर्वच्या सर्व गुणधर्म जसेच्या तसे पुढच्या पिढीत येतात. परंतु यामध्ये चांगल्या गुणधर्माबरोबर काही तोटे आहेत. कांडीमध्ये असलेले जंतू पिकांमध्ये येतात. काणी, गवताळ वाढ, लाल्या रोग, मोझेक इत्यादी रोगग्रस्त कांडीची लागण केल्यास हा रोग पिकांमध्ये वाढतो. यासाठी कांडीवर प्रक्रियेची आवश्‍यकता असते. हे विषाणू गरम हवेने मरतात. यासाठी बिजोत्पादनात कांडीतील रोगजंतू नाहीसे करण्यासाठी कांडीस 54 अंश सेल्सिअस तापमानाचे चार तास बाष्प हवा प्रक्रिया दिल्याने जंतू मरतात. उष्ण बाष्प हवा प्रक्रियेने उसाचे डोळे खराब होण्याचाही धोका असतो. त्याची उगवणक्षमता घटते. म्हणून उतिसंवर्धनाच्या सूक्ष्म अग्रांकूर पद्धतीचा वापर करून बेणे रोगमुक्त केले जाते. अशा या नव्या तंत्रज्ञानाने आता शेती करण्याची गरज आहे. 

ज्ञानेश्‍वरीमध्ये शेतीतील अनेक सिद्धांत सांगितले आहेत. या सिद्धांतावर नवे तंत्रज्ञान विकसितही होत आहे. याचा वापर आता शेतकऱ्यांनी करायला हवा. काळ कितीही बदलला तरी सिद्धांत तोच आहे. काळानुसार त्याचा वापर बदलला आहे. गरजेनुसार त्याचे तंत्र बदलत आहे. याचा विचार करून शेतकऱ्यांनी हे तंत्र आत्मसात करायला हवे. पूर्वीचे ऋषी हे संशोधक होते. आता शेतकऱ्यांनीच संशोधक होऊन शेती करण्याची गरज आहे.

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
 
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे    

 

No comments:

Post a Comment