Tuesday, June 2, 2020

कां महावृक्षीं अविसाळें । पक्षिजातीची ।।


देवाच्या नावाने असणारे हे जंगल पुन्हा वाढविण्याची गरज आहे. अशा विस्तृत वृक्षांवर पक्षांची घरटी असायची. या वृक्षांच्या वनराई आता पुन्हा उभारायला हव्यात. प्रत्येक गावात यासाठी याचे प्रयोजन असायला हवे. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

अहो आकाशाचिये खोळे । दिसती ग्रहगणांची कुळें । 
कां महावृक्षीं अविसाळें । पक्षिजातीची ।। 258।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 11 वा 

ओवीचा अर्थ - महाराज, आकाशाच्या खोळेंत ग्रहसमुदायाचे मेळे दिसतात किंवा विस्तीर्ण वृक्षावर अनेक पक्ष्यांची घरटी असावीत. 

शेतीमध्ये पक्षांचा काय संबंध? असा प्रश्‍न पडू शकतो. पण मनुष्य केवळ आपलाच विचार करू लागला आहे. इतरांचा विचार त्याने सोडून दिला आहे. अशा या विचारांमुळे त्याचेच नुकसान होत आहे. निसर्गाच्या चक्रात विविध साखळ्या आहेत. लहान प्राणी मोठ्या प्राण्यांचे भक्षण करतात. ही साखळी मानवी हव्यासामुळे मोडली जात आहे. मानवाच्या वाढत्या गरजांमुळे वृक्षांची तोड होत आहे. पूर्वीचे मोठ-मोठे विस्तार असणारे वृक्ष आज पाहायला मिळत नाहीत. अशा वृक्षांची संख्या घटल्याने पक्षांचीही संख्या घटू लागली आहे. अशा वृक्षांच्या डोलीमध्ये पक्षी घरटी बांधतात. अंडी घालतात. पण हे वृक्ष कमी झाल्याने अंडी घालण्यास त्यांना सुरक्षित जागा मिळेनाशा झाल्या आहेत. अनेक अंड्यांचे भक्षण होत आहे. पक्षांची अंडी साप खातात. या व अशा प्राण्यांपासून अंड्याचे संरक्षण होणे आवश्‍यक आहे. मोठ्या वृक्षांवर सुरक्षित जागा असायची. अशा वृक्षावर हे प्राणी पोहोचू शकत नाहीत. पण हे वृक्षच आता नष्ट झाले आहेत. अशा अनेक कारणांनी पक्षांची संख्या घटली आहे. पण या पक्षांचा आणि शेतकऱ्यांचा संबंध काय? साप उंदीर खातो. उंदरापासून शेतीचे होणारे नुकसान यामुळे टाळले जाते. यासाठी सापास शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. तसे पक्षीही अनेक कीटक खातात. तज्ञांच्या माहितीनुसार पक्षांची संख्या घटल्याने कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेती करताना या गोष्टींचा विचार हा शेतकऱ्यांनी करायला हवा. यासाठी आवश्‍यक एकात्मिक उपाययोजना करायला हव्यात. सकाळी नांगरट केली, तर उसातील हुमणीचा प्रादुर्भाव आठ ते दहा टक्‍क्‍यांनी कमी होतो. असे तज्ञांचे मत आहे. याचा विचार करून शेतकऱ्यांनी उसाशेतीची नांगरट सकाळच्यावेळी करायला हवी. हरभऱ्यावरील घाटे अळी, सोयाबिनवरील पाने खाणारी अळी अनेक पक्षी खातात. पक्षी हे मांसाहारी आहेत. अनेक कीटक खाऊन ते जगतात. शेतकऱ्यांना सापा प्रमाणेच पक्षी, मधमाशा हे सुद्धा मित्र आहेत. याचा विचार करून या पक्षांचे संवर्धन कसे करता येईल याचा विचार होणे गरजेचे आहे. जंगलक्षेत्र घटू लागल्याने पक्षांची संख्या कमी होत आहे. विस्तृत वृक्षांची संख्याही घटत आहे. पारावरचे वृक्षही आता पाहायला मिळत नाहीत. वसाहती वाढल्या तसे हे पारच नष्ट झाले. खेड्यातही जंगले तोडून जमिनी लागवडी खाली आणण्याचे प्रमाण वाढले आहे. बांधावरचे वृक्ष तर केव्हाच नष्ट झाले आहेत. याचा विचार करता देवराईचे महत्त्व आता वाटू लागले आहे. तेथील वृक्ष तोडू नयेत यासाठी लोकांच्या मनात भीती घालण्यात आली होती. पण आता या देवराईही नष्ट झाली आहे. देवाच्या नावाने असणारे हे जंगल पुन्हा वाढविण्याची गरज आहे. अशा विस्तृत वृक्षांवर पक्षांची घरटी असायची. या वृक्षांच्या वनराई आता पुन्हा उभारायला हव्यात. प्रत्येक गावात यासाठी याचे प्रयोजन असायला हवे. आदर्श गावांमध्ये याचा समावेश असायला हवा. पक्षी हा सुद्धा शेतकऱ्यांचा मित्र आहे. याचा विचार करून त्यांचे संवर्धन हे व्हायला हवे.  

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621




#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे

No comments:

Post a Comment