Wednesday, June 10, 2020

आणि वन्हीं वनीं विचरें । तेथ जळती जैसीं जंगमें स्थावरें ।


शेतीवर अवलंबून राहाणे शक्‍य नाही. अशा या समस्यांमुळेच शहरांकडे नोकरीसाठी लोंढा वाढतो आहे. शिकला तर तो शेती न करता नोकरीचा मार्गच स्वीकारतो. ही त्याची खरी गरज आहे. असे नोकरदार बऱ्याचदा शेती विकण्याचा विचार करतात. पण अशा या व्यवहारामुळेच शेतीवरील विश्‍वास कमी होऊ लागला आहे. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

आणि वन्हीं वनीं विचरें । तेथ जळती जैसीं जंगमें स्थावरें ।
तैसें जयाचेनि आचारें । जगा दुःख ।। 661 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - आणि ज्याप्रमाणे रानांत वणवा लागला म्हणजे वृक्ष, प्राणी वैगरे सर्व पदार्थ जळतात, त्याप्रमाणे त्यांच्या वागणुकीनें सर्व जगास दुःख होतें.

वणवा लागल्यावर त्यात जे काही सापडेल ते जळून जाते. आगीची धग कशी वाढेल याचा अंदाज बांधणेही कठीण असते. आग आणि पाण्यापासून सावधच राहावे लागते. केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. पाण्यात पट्टीचे पोहणाराही बुडाल्याच्या अनेक घटना घडतात. आग कशाने लागेल? कधी लागेल? कशी लागेल? या अंदाज बांधणे कठीण असले तरी काळजी घेता येणे शक्‍य आहे. आवश्‍यक उपाययोजना करता येऊ शकतात. उन्हाळ्यात वणव्याची तीव्रता अधिक असते. त्यातच वारा सुटला तर आग पसरण्याचाही धोका असतो. 


अशामध्ये मोठे नुकसान होते. या आगीतून फिनिक्‍स भरारी घेणारेही आहेत. पण असे सामर्थ्य फारच थोड्या व्यक्तींकडे असते. हा वणवा लागणार याची काळजी घेतली तर नुकसान टाळता येऊ शकते. वणवा हा आयुष्याची राख करतो. याचे दुःख सर्वांनाच होते. यासाठी शेतकऱ्यांनी वणवा शेतालाच नव्हे तर आयुष्याला लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. शेती करताना अनेक समस्या भेडसावत असतात. शेतकऱ्याचे कुटुंब हे निसर्गावर अवलंबून असते. निसर्गाची साथ मिळाली तर भरभराट होते. अवकृपा झाली तर पर्यायही शोधणे भाग पडते. अशा या समस्यांचा सामना करण्याचे सामर्थ्य शेतकऱ्यांत असायला हवे. हे प्रश्‍न भेडसावणार नाहीत याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यायला हवी. 

देशात 80 टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. त्यांच्याकडे एक ते दोन एकरच शेती आहे. सध्याच्या वाढत्या महागाईचा विचार करता इतक्‍या कमी क्षेत्रातून येणाऱ्या उत्पन्नावर कुटुंब चालवणे शक्‍य नाही. देशात करण्यात आलेल्या पाहणीत जवळपास 45 टक्के शेतकरी हे दारिद्र रेषेखाली आहेत. अशा शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून राहाणे शक्‍य नाही. अशा या समस्यांमुळेच शहरांकडे नोकरीसाठी लोंढा वाढतो आहे. शिकला तर तो शेती न करता नोकरीचा मार्गच स्वीकारतो. ही त्याची खरी गरज आहे. असे नोकरदार बऱ्याचदा शेती विकण्याचा विचार करतात. पण अशा या व्यवहारामुळेच शेतीवरील विश्‍वास कमी होऊ लागला आहे. 

शेती परवडत नाही. अशा अपप्रचाराचा वणवा या शेतीला लागला आहे. हा वणवा भडकणार नाही याची काळजी घ्यायला हवी. विविध संशोधन संस्थांनी केलेल्या अभ्यासात असे मांडले आहे की देशातील 27 टक्के शेतकरी हे आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे शेती विकतात. मग या अल्पभूधारक, दुर्बल शेतकऱ्यांसाठी शासनाने किती योजना राबविल्या, कोणत्या योजना राबविल्या याचा विचार होणे गरजेचे आहे. या शेतकऱ्यांसाठी शासनाने किती तरतूद केली हेही तितकेच विचारात घेणे गरजेचे आहे. आर्थिक परिस्थिती कमकूवत असल्यानेच सर्वाधिक शेतकरी हे शेती विकत आहेत. 

कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी जवळपास 15 टक्के शेतकऱ्यांनी शेती विकली आहे. मुलांच्या शिक्षणासाठी आजकाल अनेक शेतकरी शेती विकत आहेत. आरोग्याच्या समस्याही देशात वाढत आहेत. या समस्या वाढण्यामागे कोणती कारणे आहेत यावर उपाय योजले गेलेले नाहीत. घातक खाद्य पदार्थावर बंदीची गरज आहे. भेसळही वाढली आहे. दुधात भेसळ, धान्यात भेसळ यामुळे आरोग्याचे प्रश्‍न गंभीर होऊ लागले आहेत. दवाखान्याची बिले भागविण्यासाठीही अनेक शेतकरी शेती विकताना पाहायला मिळत आहेत. जमीनीला आज सोन्याचे भाव आले आहेत. 

जमीनीकडे शेतकऱ्याचे दुर्लक्ष होताना आढळले तर त्या जमीनीवर वाद घातले जात आहेत. अशा जमीनी विक्री करण्यास भाग पाडणारेही बहाद्दर आता वाढले आहेत. खासगी कंपन्याही आता जमीनी खरेदी करण्याकडे वळल्या आहेत. कॉर्पोरेट फार्मिगमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमीनी खरेदी केल्या जात आहेत. भरगच्च भावाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून जमीनी खरेदी केल्या जात आहेत. जमीनीच्या या व्यवहाराचा हा वणवा वेळीच लक्षात घ्यायला हवा. सरकार योजना आखेल आणि आपण उत्तम शेती करू अशा विचार आता शेतकऱ्यांनी सोडून द्यायला हवा. 

शासनावर अवलंबून न राहता जमीन विक्रीचा लागलेला वणवा आपल्या शेताला लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. यासाठीच शेतकऱ्यांनी कर्जामध्ये न पडता आहे त्या परिस्थितीत शेती कशी टिकवून ठेवता येईल यावर अधिक भर द्यायला हवा. कृषी मुलश्‍चः जीवनम हा मंत्र आठवणीत ठेवायला हवा. सर्व जीवनाचे मुळ हे शेती आहे. शेती नाही तर आपण जगूच शकत नाही. शेतकऱ्यांशिवाय कोणीही जगू शकत नाही. शेतकरी आहेत म्हणून जगातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. शेतकरी संपावर गेला तर सर्व जग थंड होईल. 

उद्योगपतींना स्वतःचा उद्योग सोडून शेती कसावी लागेल. शेतात पिकते म्हणूनच तर खातो ना. शेतात पिकलेच नाही तर खाणार काय? यासाठीच देशातील सर्व उद्योग बंद पडतील पण शेती हा असा व्यवसाय आहे तो कधीही बंद पडणारा नाही. यासाठी शेती सोडण्याचा विचारही कोणी करू नये. तसा विचारही मनात आणू नये. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी हा विचार नेहमी डोक्‍यात ठेवावा. देशातील सरकारच्या योजना हा आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्याचा लाभ आपणाला होत नाही हे सत्य आहे. पण अशा सरकारवर अवलंबून न राहता स्वतःचे शेत कसे विकसित करता येईल याचा विचार करायला हवा. उत्पादित मालाचे मुल्य कसे वाढू शकते. कसे वाढवता येईल. काय करता येणे शक्‍य आहे? हे सर्व विचारात घेऊन शेती करायला हवी. असाच एक शेतकरी मला भेटला. तो म्हणाला माझ्याकडे शेतात पिकविण्यासाठी पैसेही नव्हते. खत खरेदीही करण्याची माझी ऐपत नव्हती. जमीन थोडीच असली तरी पिकाऊ होती. घरापाठीमागेच होती, पण पैसा नव्हता. काय करावे हे मला सुचत नव्हते. असाच डोक्‍याला हात लावून तो गणपतीच्या देवळाच्या कट्ट्यावर बसला होता. 

सिद्धीविनायकाचे मंदीर. दररोज शेकडो लोक देवाच्या दर्शनासाठी यायचे. एक महिला त्याच्याजवळ आली आणि म्हणाली येथे जास्वंदीची फुले कोठे मिळतील. मला जास्वंदीच्या फुलांचा हार देवाला घालायचा आहे. तसे फुलवाले दररोज असतात. पण ठराविक वेळीच असतात. तो त्या महिलेला उत्तर देऊ शकला नाही. पण त्या महिलेच्या प्रश्‍नाने त्याच्या डोक्‍यात वेगळाच विचार शिरला. त्याने विचार केला. आपल्या परसात जास्वंदीचे एकच झाड आहे. त्याला रोज नेमाणे दहा बारा फुले लागतात. आता पावसाळा सुरू होणार आहे. तसे आपणास शेतात पिकवायाला काहीच नाही. पण हे जास्वंदीच्या रोपाच्या कांड्यातरी आपण शेतात पेरू शकू. त्या छोट्याशा शेतात त्या शेतकऱ्याने जास्वंदीच्या कांड्या पेरल्या. काही कांड्या त्याने शेजारी पाजारी गावातील लोकांच्याकडून मागूण आणल्या. तशा या कांड्या कोणीही देते. त्यासाठी खर्चही नाही. 

शेतात पेरायला काही नाही म्हणून त्याने जास्वंदीच्या कांड्या पेरल्या. शेत जमीन पिकाऊ असल्याने दोन तीन महिन्यातच त्या फाद्यांना फुले लागू लागली. मशागतही करण्याची गरज भासली नाही. त्याच शेतात गवतही वाढले. दररोज तो दूर्वा व जास्वंदीच्या फुलांचे हार करून सिद्धिविनायकाच्या मंदीरात विकू लागली. रोज 25-30 हार विकू लागले. पाच रुपयांना एक या प्रमाणे 125 रुपये रोजचे उत्पन्न सुरू झाले. काही दिवसांनंतर 50 हार विकू लागले. रोज 250 रुपये मिळू लागले. काहीही खर्च न करता महिन्याला आठ-नऊ हजारांचे उत्पन्न मिळाले. नोकरीमध्येही ग्रामीण भागात एवढा पगार कोणाला मिळत नाही. 

त्या महिलेच्या प्रश्‍नाने सिद्धीविनायकाने हे उत्तर त्या शेतकऱ्याला दिले. आज त्या शेतकऱ्याने पाच एकरावर ग्रीन हाउस उभारले असून त्यात उत्पादित होणारी फुले तो देशातील मेट्रो शहरात पाठवत आहे. येथे शासनाने त्या शेतकऱ्याला मदत केली काय? शासनाच्या योजनांचा विचार करत तो बसला असता तर त्याला हे सुचले असते का? त्याचे एकच ध्येय होते शेतीला वणवा लागता कामा नये. शेत पडीक राहाता कामा नये. त्यातून येणारे उत्पन्न कमी असले तरी चालेल पण शेती विकायची नाही. हा त्याचा हट्ट होता. 

मनाला विक्रीचा वणवा लागला असता तर तो चार पैसै घेऊन कोठे तरी चार-पाच हजाराची नोकरी करत बसला असता. शेतकऱ्यांनी शेती विकणार नाही. शेतीचे क्षेत्र वाढवणार हा निर्धार करायला हवा. तरच शेतीत प्रगती होईल. वणवा लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांनी हा विचार मनात घट्ट करायला हवा. शेतात काहीही पिकवू पण शेती पडीक पडू देणार नाही. शेती विकणार नाही. अनेक शेतकऱ्यांना आता शहराची ओढ लागली आहे. शहरातील राहणीमान त्यांना आकर्षित करत आहे. वीज, पाणी, शिक्षणाच्या सुविधामुळे शेतकरी शेती विकून शहरात राहण्याचा विचार करत आहे. 

शहरात छोटा-मोठा उद्योग उभारून, व्यवसाय करून जगण्यावर भर देऊ इच्छित आहे. पण उद्योग शेती न विकताही उभारता येऊ शकतो. असलेली संपत्ती, लक्ष्मी विकायचा विचार हा घातक आहे. सध्या बदलत्या जीवनाशैलीमध्ये शेती नकोशी झाली आहे. पण शेतीसारखे सुख इतर कशातही नाही. यासाठी विक्रीचा वणवा शेतीला लागू नये. या वणव्याचे दुःख सर्वांनाच होईल. 

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621


#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे


No comments:

Post a Comment