Sunday, June 14, 2020

वर्षियेवीन सागरू । जैसा जळे नित्य निर्भरू । तैसा निरुपचारू । संतोषी जों ।। (एकतरी ओवी अनुभवावी)

 
सदैव सुखी-समाधानी राहण्यासाठी आपण हा सकारात्मक विचार जोपासायला हवा. अशा विचारानेच आपण सदैव सुखी होऊ. स्वतः सुखी असू तर आपण इतरांनाही सुख देऊ शकू. दुसऱ्यांना दिलेल्या सुखातून आपणालाही मोठे सुख मिळते. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685 

वर्षियेवीन सागरू । जैसा जळे नित्य निर्भरू ।
तैसा निरुपचारू । संतोषी जों ।। 151 ।। अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ - वर्षा ऋतुशिवाय जसा समुद्र पाण्याने नेहमी पूर्ण भरलेला असतो, तसा जो कोणत्याही बाह्य उपचाराशिवाय संतोषाने नेहमी पूर्ण भरलेला असतो.

सागर नेहमीच पाण्याने भरलेला असतो. नदी, नाले, ओढे, विहिरी आटल्या. कोरड्या पडलेल्या पाहायला मिळतात. पण आपण समुद्र कधी कोरडा पडला आहे. असे पाहिले किंवा ऐकले आहे का? नाही ना ! तो सदैव पाण्याने भरलेला असतो. पण सागराच्या पाण्याचा काहीच उपयोग नाही असे आपणास वाटते. कारण ते खारट आहे. पिण्यायोग्य नाही. शास्त्रोक्त विचार केल्यास सागर आहे म्हणून आपले जीवन आहे.
 
हे विसरता कामा नये. त्या पाण्याशिवाय आपण जगूच शकत नाही. कारण त्या पाण्याची वाफ होते. ती वाफ आकाशात जाते तेथे थंड वारे लागल्यानंतर पाऊस पडतो. म्हणजेच पाऊस सागरामुळे मिळतो. सागराचे पाणी खारट असले तरी पावसाचे पाणी हे गोड असते. ते पिण्यायोग्य असते. ते शुद्ध असते. नदी नाल्यातून अशुद्ध पाणी जरी सागराला मिळाले तरी सागर मात्र आपणास पावसाच्या रुपाने शुद्ध पाणीच देतो. हा त्याचा धर्म तो कधीही सोडत नाही. नदी नाल्यातून शहरातील अशुद्ध पाणी मला मिळाले म्हणून तो या शहरवासियांना अशुद्ध पाणी देऊ असे कधीही म्हणत नाही. किंवा असे कधीही करत नाही. हा सागराचा धर्म आपण समजून घेऊन त्याप्रमाणे त्याचा हा आदर्श घ्यायला हवा.
 
आपले जीवन सागराप्रमाणे मन मोठे करायला हवे. दुसऱ्याने कितीही तिरस्कार केला. कितीही उलटसुलट बोलले तरी त्याचा अनादर न करता त्याला चांगले बोलून त्याच्यातील राग कमी करायला हवा. सागराप्रमाणे आपले मन आपण मोठे करायचे. मोकळे करायचे. सदैव आपले मन संतोषी ठेवायचे. कशाचिही इच्छा, आशा, आकांक्षा ठेवायची नाही. नदी आटली कि सागराला पाणी मिळत नाही म्हणून सागर काही नदीवर राग काढत नाही. तो पावसाच्या रुपाने पाणी हा देतोच. किंवा नदीच्या पाण्याने त्याच्या पातळीत वाढही होत नाही.
 
हे सागराचे गुण आपण घेऊन त्यालाही आपण शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करायला नको का ? जर सर्वच घाण तो आपल्या पोटात घेतो म्हणून त्याला घाण देणे योग्य नाही. सद्‌गुरुही सागराप्रमाणे सर्व अपराध आपल्या पोटात घेतात म्हणून सद्‌गुरुंना केवळ आपले दुःख सागावे. सुख मिळाले की सद्‌गुरुंना विसरायचे हे योग्य नाही. उलट सुख सांगून त्यांच्यातील आनंद आपण घ्यावा. आपले जीवनही सागराप्रमाणे समाधानी करायला शिकले पाहीजे. मनात संतोष ठेवला तर आपण सदैव सागराप्रमाणे सदैव समाधानी राहू. हा विचार लक्षात घ्यायला हवा.
 
सदैव सुखी-समाधानी राहण्यासाठी आपण हा सकारात्मक विचार जोपासायला हवा. अशा विचारानेच आपण सदैव सुखी होऊ. स्वतः सुखी असू तर आपण इतरांनाही सुख देऊ शकू. दुसऱ्यांना दिलेल्या सुखातून आपणालाही मोठे सुख मिळते. हे विचारात घ्यायला हवे. यासाठीच सागरासारखे संतोषी राहायला हवे. तसे मन मोठे करायला हवे. 

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621


#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे  

 

No comments:

Post a Comment