Thursday, June 18, 2020

जालया सुबीजप्रसंगु । पडे क्षेत्रवाफेचा पांगु । ( एकतरी ओवी अनुभवावी)

संकरित बियाण्यांबाबत किंवा अशा पद्धतीच्या संकराबाबत आत्ताच भीती व्यक्त केली जाते असे नाही. अगदी महाभारतही धर्नुधर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णास संकराबाबत प्रश्‍न केला होता अशा संकराने कुळाचा नाश होईल अशी भीती व्यक्त केली होती. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685 

जालया सुबीजप्रसंगु । पडे क्षेत्रवाफेचा पांगु । 
तैसाचि दानाचा हा लागु । देखतसें ।। 267 ।। अध्याय 17 वा 

बियाणे नसेल तर शेती कशी करणार? जमीन सुपीक आहे, पाण्याचीही सुविधा आहे पण हवे तसे बियाणे नाही. काय उपयोग आहे का? बी आहे पण वांजोटे आहे. चालेल का? बी आहे पण भाजलेले आहे. ते कसे उगवेल. बिजाचा अंकुर हा महत्त्वाचा आहे. भाजल्यानंतर बिजाचा अंकुर मरतो. अंकुरण्याची क्षमता नाहीशी होते. असे बियाणे पेरून ते उगविण्याची केवळ प्रतीक्षाच करावी लागेल. यासाठी बीजास महत्त्व आहे. बी कसे असावे. उगवण क्षमता उत्तम असलेले बी हवे. काही काही बिया कठीण असतात. पण त्यात उगविण्याची क्षमता असते. ते रुजते. फक्त त्यास कालावधी थोडा अधिक लागतो. शेतीतील बिजाचे महत्त्व ओळखून संशोधकांनी यावर अनेक प्रयोग केले. पूर्वापार हे प्रयोग सुरू आहेत. बी कसे उत्तम वाढते याचा अभ्यास पिढ्यान पिढ्या सुरू आहे. यातूनच ते कसे पेरावे, कसे वाढवावे याचे तंत्रज्ञान विकसित झाले. उत्पादनक्षम बियाणे कसे तयार करायचे याचेही तंत्रज्ञान कालांतराने विकसित झाले. बी कसे तयार होते. यावरही अभ्यास झाला. परागीकरण वाढवून उत्पादन वाढविता येते यावरही संशोधन झाले.
 
मधमाशा असलेल्या शेतामध्ये परागीकरण अधिक होते यामुळे उत्पादन वाढते. असे अनेक शोध लागले. जनुकीय साखळीही शोधण्यात आली. उत्पादनक्षम, उत्तम उत्पादकता असणारे, रोगमुक्त, कीड व रोग प्रतिकारक शक्ती असणारे बियाणे हवे. असे बियाणे तयार करण्यावर अधिक भर देण्यात आला. पिकाचा कालावधीही कमी करण्याचे प्रयोग झाले. बिजाची सुप्तावस्था कमी करण्याचाही प्रयत्न झाला. असे अनेक प्रकारचे बियाणे सध्या विकसित करण्यात आले आहे. संकरित बियाण्यांबाबत किंवा अशा पद्धतीच्या संकराबाबत आत्ताच भीती व्यक्त केली जाते असे नाही. अगदी महाभारतही धर्नुधर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णास संकराबाबत प्रश्‍न केला होता अशा संकराने कुळाचा नाश होईल अशी भीती व्यक्त केली होती. 

उत्तम अधर्मी संचरती । ऐसे वर्णावर्ण मिसळती । तेथ समूळ उपडती । जातिधर्म ।। 250 ।। अध्याय 1 

संकर हा त्याकाळातही होता. याचा अभ्यास त्याकाळातही केला जात होता. याचेही शास्त्र त्याकाळात होते. केवळ मानसांमध्येच अशी पद्धत होती असे नाही. तर बियाण्याबाबतही साधू संतांचे संशोधन सुरू होते. सध्या पारंपरिक बियाण्यांच्या बाबतीतही हीच भीती व्यक्त केली जात आहे. जुन्या पारंपरिक बियाण्यांच्या जाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. नव्या संकरित जातींचा विकास झाल्याने त्यांनाच महत्त्व आले आहे. ही भीती व्यर्थ आहे. कारण मुळात नव्या सुधारित जाती विकसित केल्या जातात त्या या पारंपरिक जातींच्या संकरातून केल्या जातात. यासाठी पारंपरिक जातींचे जतन हे होतेच व ते केलेही जात आहे.
 
पारंपरिक जाती ह्या उच्च प्रतीच्या आहेत यात शंकाच नाही. त्यांचे संवर्धन होणे गरजेचेच आहे. पण वाढत्या लोकसंख्येमुळे भावी काळात उद्‌भवणारे प्रश्‍न विचारात घेता उत्पादनक्षम जातींचा विकास हा गरजेचा आहे. कुपोषणाचा प्रश्‍न आहे. आरोग्याचा प्रश्‍न आहे. हे विचारात घेऊनच या जातींचा विकास केला जात आहे. भगवान श्रीकृष्णांनी या संकरास विरोध केला नाही. भगवंताना यातून उत्पन्न होणाऱ्या समस्यांची जाणीव होती. संकर हा चांगल्यासाठी घडविला जातो. या शास्त्रानुसार उत्पादनक्षम, उत्तम प्रतीच्या जाती विकसित करण्यासाठी हे संकर घडविले जातात. टोमॅटोची साल पातळ असेल तर तो टोमॅटो लगेच खराब होतो. टणक सालीचा टोमॅटो अधिक दिवस टिकतो. यासाठी पातळ सालीच्या टोमॅटोचा टणक सालीच्या टोमॅटोशी संकर घडवून टणक सालीच्या टोमॅटोच्या नव्या जाती विकसित केल्या जातात. संकरामुळे नव्या जातीमध्ये असे बदल घडविले जातात. रोग प्रतिकारशक्ती, कीड प्रतिकारक शक्ती ही अशाच पद्धतीने नव्या जातीमध्ये विकसित केली जाते. 
 
पाण्याचा ताण सहन करू शकणारी जात, कमी उंचीची न लोळणारी जात, विविध प्रकारचे टरफलाची जाती, सुप्तावस्था कमी असणारी जात, लवकर पिकणारी जात असे विविध बदल या नव्या जातींमध्ये घडविले जात आहेत. हे बदल शेतीसाठी आवश्‍यक आहेत. अशा संकरित वाणांची आज गरज आहे. संकर हा चांगल्या गोष्टी घडतो याची जाणीव भगवंतांना असल्यानेच त्यांनी याला विरोध केला नाही. आजकाल प्रेम विवाहाचे फॅड आले आहे. मुले-मुली स्वतःचेच लग्न स्वतः ठरवत आहेत. मला योग्य वाटतो तो वर, ती वधू मी निवडणार. आई-वडिलांना यात अधिकारच उरला नाही. पण पूर्वी यासाठी अट्टहास का होत होता.
 
नेमके आई-वडील काय पाहात होता हे या नव्या पिढीने पाहिले असते तर त्यांनी या जुनाट विचार म्हणून याला कधीही विरोध केला नसता. शास्त्रामध्ये आम्ही शिकलो. आता आम्ही शहाणे आहोत असा गर्व करण्यापेक्षा स्वतःचे आई-वडील कोणते शास्त्र सांगत होते याचा विचार केला तर अधिक बरे होईल असे मला वाटते. आई-वडील मुलाची काळजी घेतात. त्याची पुढची पिढीही उत्तम असावी यासाठी वधू निवडताना योग्य ती काळजी घेतात. काही गोष्टींचा विचार ते जरूर करतात. लग्नामध्ये काय पाहिले जाते? मुलगा चांगला आहे की नाही त्याचे आचार-विचार कसे आहेत. तो मुलीला सूट होईल का नाही. अशा अनेक गोष्टी पाहिल्या जातात. कशासाठी? भावी आयुष्यात अडचणी येऊ नयेत यासाठीच ना? संकरित जाती करतानाही हेच पाहिले जाते ना? शास्त्र काय सांगते हे आपण विचारात घेतच नाही. आपले भारतीय संस्कार हे शास्त्रावर आधारित आहेत याचा विचारच आपण करत नाही. पूर्वी शेतकरी पारंपरिक बियाणे साठवून ठेवत होता. 
 
कडूलिबाचा पाला घालून किंवा राखेमध्ये असे बियाणे साठविले जायचे. पण आता या पद्धती कालबाह्य झाल्या आहेत. बियाणे खराब होऊ नये म्हणून ही काळची घेतली जायची. आता यामध्ये नवे तंत्रज्ञान आले आहे. बियावर प्रक्रिया केली जाते. कीड व रोग लागू नये यासाठी विविध रसायने बियाण्यास लावण्यात येतात. हे कशासाठी बीज असेल तरच अंकुर फुटेल ना? 

वांचूनि मनींची नाहीं । तें वाचेसि उमटेल काई । बीजेवीण भुईं । अंकुर असे ।। 299 ।। अध्याय 13 वा 

बीज नसेल तर अंकुर कुठे फुटेल. यासाठी बीजाची काळजी घ्यावी लागते. लग्नांमध्येही याच गोष्टी पाहिल्या जातात ना? सध्या आपण या गावंढळ विचार म्हणून टाकून देत आहोत. ते विचार किती उपयुक्त होते याची काळजी आपण घेतच नाही. सध्याच्या नव्यापिढीत काय चालले आहे. तो विचार काय आहे. हे जाणून घेण्याचा संयमच राहिलेला नाही. जाणून घेण्या अगोदरच मते व्यक्त केली जात आहेत. यासाठी नव्या पिढीवर संस्कार करताना याचा विचार जरूर करायला हवा. मुलांना एखादी गोष्ट जाणून घेण्याच्या सवयी लावायला हव्यात. त्याच्यात संयम, दुसऱ्यांचा आदर करण्याचे संस्कार शिकवायला हवेत हे यासाठीच. असे संस्कार आता नव्या पिढीत घडत नसल्याने आता वेगळ्याच समस्या उद्‌भवत आहेत. 
 
सद्‌गुरू शिष्याची निवड करताना काय पाहतात? त्यांच्या दृष्टीने शिष्य हे एक बीज आहे. या बीजाचे रोपट्यात रुंपातर कसे होईल ते कसे वाढेल त्याच्या वाढीसाठी पोषक वातावरण कसे निर्माण होईल याचा विचार सद्‌गुरू करतात. अनुग्रह देताना या सर्व गोष्टींचा विचार सद्‌गुरू करतात. अनुग्रह हे बीजारोपणच असते. बी जमीनीत पेरण्याची क्रियाच असते. निवडलेले बी कसे आहे हे पेरताना पहावे लागते. बी अंकुरेल की नाही याचा विचार केला जातो. अंकुरणार नाही त्या बिजास अनुग्रह कसा मिळेल? अंकुरण्या योग्य त्यात बदल घडविणे हे गरजेचे आहे ना? शिष्यामध्ये तसे बदल सद्‌गुरू घडवितात व त्यानंतरच सद्‌गुरूंचा अनुग्रह शिष्यास प्राप्त होतो. हे बीज कसे वाढते? त्याला आवश्‍यक वातावरण मिळते का? ही क्रिया नैसर्गिक आहे. शिष्याची अध्यात्मिक वाढ ही सुद्धा नैसर्गिक आहे. पण बीज हे सुबीज असणे गरजेचे आहे. रोगट बी लावले तर रोगट रोपच उगवणार. चांगली रोपे लावली तर चांगली झाडे येणार. 

शुद्ध बीजा पोटी । फळे रसाळ गोमटी। 

बीज पेरतो ते शुद्धच असावे. तरच त्याला येणारी फळे ही रसाळ व उत्तम प्रतीची असतील. दर्जेदार उत्पादन तेव्हाच मिळेल. आत्मज्ञानी शिष्यही व्हावा यासाठी सुबीज असणे आवश्‍यक आहे.  

 
  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
 
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे    

No comments:

Post a Comment