Sunday, June 21, 2020

ऐसें सत्त्व सुखज्ञानीं । जीवासि लावूनि कांनी । बैलाची करी वानी । पांगुळाचिया ।। (एकतरी ओवी अनुभवावी)

 

सुख आणि ज्ञान मानसाला आंधळे करते. कामगार सांगतील तसे मान डोलवून शेती करायला तुम्ही काय नंदी बैल आहात का? याचा विचार आता बांधावरच्या शेतकऱ्यांनीच करायला हवा.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621 
 
ऐसें सत्त्व सुखज्ञानीं । जीवासि लावूनि कांनी ।
बैलाची करी वानी । पांगुळाचिया ।। 158 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ - या प्रमाणे सत्वगुण हा जीवाला सुखरुपी व ज्ञानरुपी दावे लावून पांगुळाच्या बैलासारखी (नंदीबैलासारखी ) त्याची स्थिती करतो.

नंदीबैल कधी शेतात काम करताना पाहिला आहे का? तो केवळ माना डोलवतो. पाऊस पडेल का? असे विचारले तर पिंगळा जो सांगेल तशी मान डोलवतो. याचे तंत्र या पिंगळ्यांना अवगत असते. बारामती तालुक्‍यात या पिंगळ्याची घरे आहेत. तेथे याबाबतचे प्रशिक्षण या पिंगळ्यांना मिळते. हे तंत्र शिकल्यानंतर ते गावोगावी हिंडतात. कोणतीही अपेक्षा न ठेवता चेहरा पाहून आपले भविष्य सांगतात. यातील बऱ्याचशा गोष्टी खऱ्या असतात. कसे सांगतात हे त्यांनाच माहिती. पण खरे सांगतात असा अनेकांचा अनुभव आहे. काही गोष्टी सांगून दान मागतात. हा त्यांचा व्यवसाय आहे. नदीबैलाचे खेळ करणे, मनोरंजन करणे व पैसे कमविणे हा त्यांच्या नित्याचा दिनक्रम.
 
हे सुखी जीवन ते जगतात. ज्ञानाचा त्यांना अभिमान असतो. यातच ते अडकून असतात. सध्याचा बांधावरचा शेतकरी हा अशा नंदीबैलासारखा आहे. त्याला कष्ट करण्याची सवयच नाही. पिंगळ्याप्रमाणेच तोही सुख आणि ज्ञानामध्ये अडकला आहे. शेतावर कधी जाणे नाही. घरातूनच सर्व गोष्टी तो बघतो. मीच उत्तम प्रशासक आहे. व्यवस्थापन मलाच जमते. साऱ्या गोष्टी घरातून बघता येणे शक्‍य आहे. व्यवहार समजण्याइतके आपण पारंगत आहोत असे तो समजतो. ज्ञानाच्या जोरावर माणसांकडून काम करून घेण्यासारखे आपण बलवान आहोत असाच त्याचा समज असतो. नंदीबैल काय मालक सांगेल तसेच वागतो. याची सुद्धा कामगार सांगतील तशीच शेती पिकते. असे बांधावरचे शेतकरी आता अधिक झाले आहेत.
 
विशेष म्हणजे हे बागायतदार आहेत. त्यांच्या जमीनी उत्तम प्रकारच्या पिकाऊ आहेत. पण या शेतकऱ्यांकडे कष्ट करण्याची तयारी नाही. जो दुसऱ्याचे भविष्य तोंड पाहून सांगतो. तो स्वतःचे भविष्य का घडवू शकत नाही. त्याला दारोदारी हिंडण्याची का गरज भासते. असे सांगून पैसा कमवणे हा त्याचा पारंपरिक व्यवसाय झाला आहे. सध्या बांधावरच्या शेतकऱ्यांचाही असाच पारंपरिक व्यवसाय आहे. कित्येकांना त्यांच्या शेताचा बांध माहित नाही. फक्त जमिनीची कागदपत्रे माहित आहेत. हा कागदावरचा शेतकरीच कर्ज माफीसाठी चकरा मारत आहे. राबणारा शेतकरी कर्जमाफीची अपेक्षाच ठेवत नाही. मुळात तो कर्ज काढण्याच्या भानगडीतही पडत नाही. कष्टाने चार पैसे मिळतात त्यात तो समाधान मानतो.
 
यावेळी मिळाले नाहीत तरी दुसऱ्यांदा जरूर मिळतील अशी आशा ठेवून कष्ट करतो. सुख आणि ज्ञान मानसाला आंधळे करते. कामगार सांगतील तसे मान डोलवून शेती करायला तुम्ही काय नंदी बैल आहात का? याचा विचार आता बांधावरच्या शेतकऱ्यांनीच करायला हवा. शेतात जाऊन शेतीचा, मातीचा अभ्यास करून मातीशी नाते घट्ट करून शेती करायला हवी. तरच ती माती आपलीशी होईल. अन्यथा ती दुसऱ्याची व्हायला वेळ लागणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन शेती करायला हवी.

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
 
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे    
 

No comments:

Post a Comment