Friday, June 26, 2020

तरी भूमि बीज नांगरु । यया भांडवलांचा आधारु । घेऊनि लाभु अपारु । मेळवणें जें ।। ( एकतरी ओवी अनुभवावी)

 
उन्ह, वारा, थंडी याची त्याला तमा नसते. शत्रू केव्हा हल्ला करेल याचा नेम नाही. आता तर तो कशाप्रकारे हल्ला करेल याचाही भरवसा नाही. नागरिकांच्या वेशात घुसखोरी तो करतो आहे. अशा परिस्थितीत लढणारा जवान हा श्रेष्ठच आहे. त्याचे श्रेष्ठत्व आहे म्हणूनच देशातले सर्व नागरिक आज सुरक्षित आहेत. 
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685
 
तरी भूमि बीज नांगरु । यया भांडवलांचा आधारु ।
घेऊनि लाभु अपारु । मेळवणें जें ।। 880 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - तर जमीन, बी व नांगर या भांडवलाचा आधार घेऊन जो पुष्कळसा नफा मिळविणें.

शेतीसाठी आवश्‍यक भांडवल कोणते? तर जमिन, बियाणे आणि अवजारे हे शेतीचे भांडवल आहे. याचा आधार घेऊन नफा मिळविणे हे शेतकऱ्याचे कर्म आहे. सीमेवर देशाचे रक्षण करणारा शिपाई मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो तो क्षत्रिय आहे आणि देशात शेती करून, व्यापार करून जगणारा कोणतीही व्यक्ती ही वैश्‍य आहे. ही रचना कर्मानुसार आहे. यात उच्चनिचता नाही. सीमेवर लढतो म्हणूनच तर देश सुरक्षित आहे. अन्यथा देशात पारत्रंत्र्य येईल. जिवाचा पर्वा न करता लढतो.
 
उन्ह, वारा, थंडी याची त्याला तमा नसते. शत्रू केव्हा हल्ला करेल याचा नेम नाही. आता तर तो कशाप्रकारे हल्ला करेल याचाही भरवसा नाही. नागरिकांच्या वेशात घुसखोरी तो करतो आहे. अशा परिस्थितीत लढणारा जवान हा श्रेष्ठच आहे. त्याचे श्रेष्ठत्व आहे म्हणूनच देशातले सर्व नागरिक आज सुरक्षित आहेत. सुखाने नांदत आहेत. त्याच्या या कर्माला सलाम हा करावाच लागेल. जय जवान जय किसान हा नारा आहे. जवानांच्या बरोबरच शेतकरी हा सुद्धा श्रेष्ठ आहे. व्यापारी किंवा इतर उद्योजकांपेक्षा शेतकरी श्रेष्ठ का? कारण हा व्यवसाय श्रेष्ठ आहे. इतर धंद्यात, व्यापाऱ्यांत फसवणूक करून पुष्कळसा नफा कमविता येतो. पण शेती हा असा व्यवसाय आहे. येथे फसवणूक ही करताच येत नाही.
 
जे काही कमविले जाते त्याला कष्ट पडतात. जे काही मिळते ते नैसर्गिक परिस्थितीवर मिळते. आता ग्रीन हाउस किंवा तापमान नियंत्रण करून शेती केली जात आहे. व्हर्टिकल फार्मिंग आदी अनेक तंत्रज्ञान शेतीमध्ये आले आहे. टेरेस फार्मिंगही केले जात आहे. पण येणारे उत्पादन हे नैसर्गिक आहे. निसर्गावर अवलंबून आहे. वातावरण निर्मिती करून उत्पादनात वाढ करू शकतो. पण तरीही येणारे उत्पादन हे नैसर्गिकच असते. कृत्रिमपणा त्यामध्ये नसतो. म्हणजे येथे फसवणूक नसते. फसवणूक करण्यास वावही नसतो. शेतकऱ्यांच्या रक्तातच हा गुण नाही आणि तो येणारही नाही.
 
उत्पादन वाढीच्या हव्यासापोटी काही शेतकरी विविध प्रकारच्या फवारण्या करतात. त्याचे प्रमाण ठरलेले आहे. पण तरीही प्रमाणपेक्षा अधिक फवारण्या होत आहेत. संजीवकांचा वापरही प्रमाणापेक्षा अधिक केला जात आहे. खतांचा वापरही अधिक केला जात आहे. असा आरोप होतो आहे. पण असे उत्पादन विकताना अनेक अडचणी येतात याची कल्पना शेतकऱ्यांना आहे. यामुळे असा चुका तो आता टाळतो आहे. अशामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होते याचीही कल्पना त्याला आली आहे. शेतीत फसवणूकीचा धंदा हा करता येतच नाही. इतरांची फसवणूक करताना स्वतःचीच येथे फसवणूक होते. यासाठी इतर उद्योजकांपेक्षा शेतकरी हा सर्वश्रेष्ठ उद्योजक आहे. भांडवलाच्या आधारावरच तो पुष्कळसा नफा घेऊ शकतो. आहे ते भांडवल त्याला टिकविणे हाच त्याचा धर्म आहे. यात कोणाचीही फसगत तो करत नाही याच मुळे हा व्यवसाय हा सर्वश्रेष्ठ आहे.

  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
 
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे    
 

No comments:

Post a Comment