Monday, June 15, 2020

ते वेळीं जे वाढी ऊंसा । तेचि आंतुला रसां । ( एकतरी ओवी अनुभवावी)

 
पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणारी सुक्ष्म अन्नद्रव्ये व संप्रेरके यांचा वापर शेतकऱ्यांनी करायला हवा. उत्पन्न वाढीस यामुळे मदत होते. 
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685 
 

ते वेळीं जे वाढी ऊंसा । तेचि आंतुला रसां ।
देहाकारु होय तैसा । प्राणियांचा ।। 279 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ - त्यावेळी ज्याप्रमाणे उसाची जी वाढ असते, तीच आंतल्या रसाची वाढ असते; त्याप्रमाणे हिने आश्रय केलेल्या प्राण्याचा देहाकार जसा वाढेल, तशीच ही आंत वाढत असते.

उसाची वाढ जोमदार झाली तर त्यातील रसात वाढ होईल. साहजिकच साखरेचे प्रमाण वाढेल. वाढ जोमदार झाली तरच उसाचे वजनही वाढेल. उत्पन्नही वाढेल. जोमदार वाढीसाठी आता संप्रेरकांचा वापर केला जात आहे. पण ही संप्रेरके बऱ्याचदा आरोग्यास अपायकारक ठरत आहेत. यासाठी सेंद्रिय संप्रेरकांचा वापर आवश्‍यक आहे. आरोग्यास उपाय करणारी उत्पादनांचा वापर हा शेतकऱ्यांनीच टाळायला हवा.
 
सेंद्रिय पद्धतीने संप्रेरके तयार करण्याच्या पद्धती या सोप्या व कमी खर्चाच्या आहेत. सहज घरी करता येण्यासारखी ही पद्धत सोडून महागडी संप्रेरके खरेदी करण्यामागे शेतकरी धावत आहे. यात उत्पादन खर्चात वाढ होते हे त्याच्या लक्षात येत नाही. यासाठीच शेतीचा खर्च मांडण्याची सवय शेतकऱ्यांनी लावून घ्यायला हवी. खर्च किती झाला हे लक्षात आल्यानंतर आपोआपच यावर आळा बसेल. नफा-तोट्याचा विचार करायला हवा.
 
संप्रेरके ही घरी करता येऊ शकतात यावर अनेक शेतकऱ्यांचा विश्‍वास नाही. पण हे करून तर पहा. सुक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना देण्यासाठी आंबवलेल्या फळांचा रस फवारला जातो. हे तयार कसे करायचे. यासाठी पपई, केळी, चिकू, आंबा ही चार फळे घ्यावीत. सालीसकट फळांच्या बारीक फोडी कराव्यात. फोडींच्या वचनाइतका गूळ त्यामध्ये मिसळावा. हे मिश्रण एका बाटलीत बंद करून ठेवावे. कुठलेही मिश्रण भरताना बाटली पूर्ण भरायची नाही. त्यामध्ये थोडी रिकामी जागा राहील याची काळजी घ्यावी.
 
रासायनिक प्रक्रियेसाठी त्यामध्ये थोडी मोकळी हवा असणे गरजेचे असते. बाटलीचे झाकणही घट बंद करून थोडे ढिले करून ठेवावे. सात दिवसानंतर तयार झालेले हे मिश्रण एक लिटर पाण्यात दोन मिली मिश्रण या प्रमाणात मिसळून फवारावे. पिकांना सुक्ष्मअन्न द्रव्ये यातून मिळतात व पिकांची वाढ जोमदार होते. केळीच्या कोंबापासूनही संप्रेरक तयार केले जाते. केळीचे कोंब दोन ते तीन इंच जमीनीतून काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करावेत. या तुकड्यांच्या वजना इतका गूळ त्यामध्ये मिसळावा. हे मिश्रण दहा दिवस बाटलीत बंद करून ठेवावे. एक किलो केळीचे तुकडे घेतल्यास एक किलोच गूळ वापरावा. दहा ते पंधरा दिवसानंतर दोन मिली मिश्रण एक लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे. पिकांची जोमदार वाढ होते.
 
शेंगदाण्याचे बी व एरंडीचे बी दोन्ही एक एक मुठभर घेऊन ते जमीनीत पेरावे. दहा ते पंधरा दिवसानंतर ते उगवून आलेले बी मुळासकट काढावे. ते न धुता तसेच मिक्‍सरमध्ये बारीक करून घ्यावे. ही तयार झालेली पेस्ट एक लिटर पाण्यात पाच मिली पेस्ट या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावी. यामुळेही पिकाची वाढ जोमदार होते. पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणारी सुक्ष्म अन्नद्रव्ये व संप्रेरके यांचा वापर शेतकऱ्यांनी करायला हवा. उत्पन्न वाढीस यामुळे मदत होते. 

  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621


#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे  
 

No comments:

Post a Comment