Monday, June 8, 2020

एकें पवनेंचि पिती । एकें तृणास्तव जिती ।


वांगी, भेंडी व इतर किडकी फळे शेतात किंवा इतरत्र उघड्यावर न टाकता त्याचे छोटे ढीग करून त्यावर दोन इंच मातीचा थर दिल्यास फळातील अळ्या मरून उपद्रव मोठ्या प्रमाणात कमी होतो. किडक्‍या फळातून किडीचे पतंग बाहेर येऊन किडीचा जीवनक्रम सुरू राहिल्याने पिकाचे नुकसान होते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

एकें पवनेंचि पिती । एकें तृणास्तव जिती ।
एकें अन्नाधारें राहती । जळें एकें ।। 38 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 7 वा

ओवीचा अर्थ - कित्येक वाराच पितात, कित्येक गवतावर जगतात, कित्येक अन्नावर राहातात आणि कित्येक पाण्यानें जगतात.

कीटकांचे जीवनचक्र कसे होते. कोणत्या अवस्थेत किडी काय खातात? काही कीटक त्यांच्या विविध अवस्थांत अन्नपाण्याविना जगतात. काही पाने खाऊन जगतात. तर काही हवेतील रस शोषून जगतात. या सर्वांचा अभ्यास शेतकऱ्यांना असायला हवा. किडीच्या मुख्यता चार अवस्था असतात. अंडी, कोश, अळी आणि पतंग या चार अवस्था आहेत. वेगवेगळ्या अवस्थेत किडीचे कार्य वेगवेगळे असते.

अळीच्या अवस्थेत पिकांचे मुख्यतः नुकसान होते. या अवस्थेत दाणे, पाने अळी खाते. याचा परिणाम उत्पादनावर होतो. फळे पोखरतात. विविध अवस्थेत अळी खाद्यही वेगवेगळे असते. हुमणीमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. हुमणी अळी पिकांची मुळे खाते. यामुळे रोपे मरतात. पण याच हुमणीचा भुंगा मात्र काहीही न खाता आठ दिवस जगतो. रेशीम किडीचा पतंग कोशातून बाहेर आल्यानंतर पतंग मादीशी मिलन होऊन अडी घालेपर्यंत काहीही खात नाही. उत्पादनासाठी आवश्‍यक ऊर्जा लागते ती कोशामध्ये जाताना अळीने साठवून ठेवलेली असते. अशी विविध उदाहरणे देता येऊ शकतील.

या अवस्थांचा अभ्यास हवा कारण पिकावरील किडीच्या नियंत्रणासाठी याचा उपयोग होतो. कोणत्या अवस्थेत नियंत्रण करायचे ते निश्‍चित करता येते. अळीच मारली तर पुढचे उत्पादनच होणार नाही. किंवा अडीच नष्ट केली तरीही पुढच्या अवस्थाच रोखता येतात. हे कीटक अंडी घालतात कोठे? पानाच्या खालच्या बाजूस अंडी दिसली की ती पाने लगेच काढून जाळल्यास किडीचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. पाने खाणाऱ्या व फळे पोखरणाऱ्या अळ्यांचे नियंत्रणासाठी अशा पद्धती उपयुक्त ठरतात.

पाने खाणाऱ्या अळ्या पीक 30 ते 40 दिवसांचे झाल्यावर काही झाडांच्या पानावर बारीक हिरवट अळ्या शेकडोंच्या संख्येने आढळतात. अशी पाने जाळीदार अर्धवट सुकल्यासारखी दिसतात. त्याखाली केसाळ अळ्या किंवा पाने खाणाऱ्या अळ्या 5 ते 7 दिवस झुंडीत राहून नंतर छोटे झुंड तयार करून शेतात पसरू लागतात. या अळ्या एक सेंटीमीटर पेक्षा लहान असतानाच पानासकट हळूच गोळा करून केरोसिनयुक्त पाण्यात टाकून माराव्यात. यामुळे पुढे त्यांचा उपद्रव होत नाही. वांगी, भेंडी व इतर किडकी फळे शेतात किंवा इतरत्र उघड्यावर न टाकता त्याचे छोटे ढीग करून त्यावर दोन इंच मातीचा थर दिल्यास फळातील अळ्या मरून उपद्रव मोठ्या प्रमाणात कमी होतो.

किडक्‍या फळातून किडीचे पतंग बाहेर येऊन किडीचा जीवनक्रम सुरू राहिल्याने पिकाचे नुकसान होते. प्रत्येक वेळी कीडनाशकांच्या फवारण्या कराव्या लागतात असे नाही. यासाठी शेतामध्ये वारंवार फेरफटका मारायला हवा. पिकाची पाहणी करायला हवी. पिकावर रोग, कीड हे काही अचानक पडत नाही. यासाठी त्याचा अभ्यास हा असायला हवा. पूर्वीच्या काळी संतांनी प्रवचनातून, कीर्तनातून प्रबोधन केले. संत ज्ञानेश्‍वरांनी तर अशी शेतीतील अनेक उदाहरणे देऊन अध्यात्म सांगितले आहे.
 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621


#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे


No comments:

Post a Comment