Wednesday, June 3, 2020

सुक्षेत्रीं जैसी । पेरणी केली ।।


सद्‌गुरू हे आत्मज्ञानी असतात. शिष्याच्या या सर्व सवयींची त्यांना कल्पना असते. फक्त ते आपणास माहित आहे हे दाखवून देत नाहीत. शिष्यामध्ये बदल घडावा, शिष्य सुधारावा. हाच त्यांचा उद्देश असतो.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

परि निरूपिली जैसी । तैसीच स्थिति मानसीं ।
सुक्षेत्रीं जैसी । पेरणी केली ।। 232 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ - पण ज्याप्रमाणे मी, मनाची स्थिती निरूपण केली, त्याचप्रमाणे मनाच्या ठिकाणी स्थिती असेल, तर तशा मनांत हा भक्तीयोग म्हणजे उत्तम शेतात पेरणी केल्याप्रमाणे आहे.

पेरणी कशी केली यावर पिकाचे उत्पन्न ठरते. दाट पेरणी केली तर पिकांची वाढ व्यवस्थित होत नाही. साहजिकच याचा उत्पन्नावर परिणाम होतो. विरळ पेरणी केली तर पिकाची संख्या घटते साहजिकच उत्पन्नही घटते. यासाठी पेरणी योग्य अंतरावर करावी लागते. बऱ्याचदा पेरणी केल्यानंतर काही ठिकाणी बियाणे उगवत नाही. अशा ठिकाणी जादाची उगवलेली रोपे उपटून त्या ठिकाणी लावावी लागतात. पेरणी करताना जमिनीत घात असणे महत्त्वाचे असते.

घात नसेल तर पेरणी करता येत नाही. पाऊस असावा पण तो अधून मधून थांबण्याचीही गरज असते. संततधार पावसामुळे जमिनीत ओलावा राहातो. जमिनीला घात येत नाही. यासाठी पेरणीच्या कालावधीत पावसाची उघडझाप आवश्‍यक असते. अध्यात्मातही असेच आहे. सद्‌गुरू शिष्यामध्ये बीज पेरतात. शिष्याला गुरुमंत्र देतात. शिष्य हे सद्‌गुरुंचे शेत आहे. शेतात बीजाची पेरणी करताना आवश्‍यक गोष्टी शेतकरी पाहतो. तसे सद्‌गुरूही शिष्यामध्ये बीजाची पेरणी करतानाही आवश्‍यक गोष्टी पाहतात. शेतकरी बीज वाया जाणार नाही याची काळजी घेतो. तसे सद्‌गुरूही काळजी घेतात.

पेरणी अगोदर शेताची मशागत करावी लागते. सद्‌गुरूही गुरुमंत्राचे बीज पेरताना शिष्याची मशागत करतात. अनुग्रह मागितला आणि गुरूंनी दिला असे क्वचितच प्रसंगी घडते. शिष्याची पात्रता पाहूनच पेरणी करावी लागते. त्याची मानसिक स्थिती पाहावी लागते. त्याच्या मनावर आध्यात्मिक विचारांचा पाऊस सतत पडत असतो. पण तो पाऊस पडून पेरणी योग्य जमिन असणे आवश्‍यक असते. त्या विचारांचे पाणी त्या मातीत मुरले आहे का? वरून वाहून गेले हे पाहणे गरजेचे असते. मातीत पाणी मुरले तरच ते बीजाला मिळेल. तरच बीज अंकुरेल. अन्यथा बीज अंकुरणार नाही.

शेतात पाणी अतिप्रमाणात असूनही चालत नाही. त्याही स्थितीत बीज अंकुरत नाही. अशा जमिनीतही पेरणी करता येत नाही. नुसत्या जपाच्या माळा ओढून चालत नाही. अति करणेही अयोग्य आहे. यासाठी शिष्याने स्वतःच स्वतःची चाचपणी करायला हवी. हे अति होत नाही ना? आपण करत आहोत हे नाटक नाही ना? हे तपासायला हवे. सद्‌गुरू हे आत्मज्ञानी असतात. शिष्याच्या या सर्व सवयींची त्यांना कल्पना असते. फक्त ते आपणास माहित आहे हे दाखवून देत नाहीत.

शिष्यामध्ये बदल घडावा, शिष्य सुधारावा. हाच त्यांचा उद्देश असतो. शिष्य पेरणी योग्य झाला आहे की नाही. हे त्यांना समजते. अशा शेतात मग बीजाची पेरणी केली जाते. अशा स्थितीत बी वाया जात नाही. उद्या तुम्ही म्हणाल आता नवीन तंत्रज्ञानात जमिनीच नाही कॉकपिटात पिके घेतली जात आहेत. पण तेथेही बीज अंकुरण्या योग्य परिस्थिती ठेवावी लागते तरच उत्पन्न येते. अन्यथा तेथेही पेरणी वाया जाते.
 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621


#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे

No comments:

Post a Comment