Showing posts with label नेवासा. Show all posts
Showing posts with label नेवासा. Show all posts

Monday, June 29, 2020

आदित्याची झाडे । सदा सन्मुख सूर्याकडे । तेवीं समोर शत्रूपुढें । होणे सदा ।। ( एकतरी ओवी अनुभवावी)

 
सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत माणसांची वैचारिक बैठकही विस्कळित झाली आहे. धावपळीच्या जगात झटपट उत्तरे हवी आहेत. सकाळी पेरणी केली की संध्याकाळी त्याचे उत्पन्न हवे असते. पण शेतीमध्ये तसे होत नाही. धीर धरावा लागतो. हा धीर कोणालाच धरवेनासा झाला आहे. 
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685 

आदित्याची झाडे । सदा सन्मुख सूर्याकडे । 
तेवीं समोर शत्रूपुढें । होणे सदा ।। 865 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 18 वा 

ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणे सूर्याच्या झाडाची फुले सूर्याकडे सदा सन्मुख असतात, त्याप्रमाणे शत्रूपुढे नेहमी समोर होणे (शत्रूला कधी पाठ न दाखविणे ) 

सुर्यफुलाचे झाड हे नेहमी सूर्याकडे तोंड करून उभे असते. उन्हाळ्यात उन्हाची दाहकता प्रचंड असते. या उन्हामध्ये काही काळ उभे राहणेही शक्‍य होत नाही. सुर्यफुल मात्र यामध्ये दिवस-रात्र उभे असते. त्याच्या दाहकतेचा फुलाच्या पाकळ्यावर किंचितही परिणाम दिसून येत नाही. पिवळ्या धम्मक पाकळ्या उन्हाच्या तीव्रतेतही तितक्‍याच ताज्यातवान्या असतात. असे सामर्थ्य आपल्या अंगात असायला हवे. 

शेतकरीही या आदित्याच्या झाडाप्रमाणेच काटक असतो. उन्ह नाही म्हणत, वारा नाही म्हणत, धो धो पडणारा पाऊस नाही म्हणत, थंडीतही तो असाच राबत असतो. त्याला या सर्वांशी सामना करतच कष्ट करावे लागतात. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग या प्रमाणे त्याला सदैव जागरूक राहावे लागते. वेळ चुकवून चालत नाही. जवान जसा युद्धभूमीवर पहारा देत असतो. तसा शेतकरीही शेतात असेच राबत असतो. कामात कुचराई करून चालत नाही. दोघांचे जीवनही सारखेच आहे. कष्टाचे व सदैव जागरूकतेचे आहे. इतके कष्ट करूनही हाती काय मिळेल याची अपेक्षा शेतकरी कधीही ठेवत नाही. मिळाले ते निसर्गाने दिले, देवाने दिले या भावनेने तो त्याचा स्वीकार करतो. यंदा कमी उत्पादन मिळाले पुढच्या वर्षी भरभरून मिळेल अशा आशेने तो राबत राहातो. कमी मिळाले म्हणून तो खचून जात नाही. 

सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत माणसांची वैचारिक बैठकही विस्कळित झाली आहे. धावपळीच्या जगात झटपट उत्तरे हवी आहेत. सकाळी पेरणी केली की संध्याकाळी त्याचे उत्पन्न हवे असते. पण शेतीमध्ये तसे होत नाही. धीर धरावा लागतो. हा धीर कोणालाच धरवेनासा झाला आहे. यामुळे पिकाचा कालावधी कमी करून जास्तीत जास्त पिके कधी घेता येतील यावर अधिक भर दिला जात आहे. बदलत्या काळात याची गरजही आहे. पण याला मर्यादा आहेत. निसर्गाच्या नियमापुढे नतमस्तक हे व्हावेच लागते. निसर्गाचा नियम मोडून कार्य करता येत नाही. नियम मोडू लागल्यानेच सध्या अनेक प्रश्‍न उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. 

जागतिक तापमानवाढ हा त्यातीलच एक भाग आहे. पृथ्वीचे तापमान वाढत आहे. मानवनिर्मित यंत्रांनी निसर्गचक्र मोडले आहे. मानवाला थांबायला वेळ नाही. थांबला तो संपला हे पक्के त्याच्या मनात रुजल्याने तो थांबायला तयारच नाही. झटपट निर्णयामुळे त्याची मानसिकताही तशीच झाली आहे. स्वतःचे जीवन संपविण्याचा विचार तो झटक्‍यात करू लागला आहे. केव्हा जीवन संपवेल याचा नेम नाही. सुख-शांतीच नसल्याने त्याचे ही अवस्था झाली आहे. सुखाच्या शोधात तो दुःखाच्या गर्तेत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्यामागे हीच कारणे आहेत. धीर सुटल्यानेच त्याची ही अवस्था झाली आहे. घाईगडबडीच्या या जीवनात धीराची गरज आहे. यासाठी चांगल्या सवयी अंगी जोपासायला हव्यात. 

मनाला सवयी लावल्यावर चुका होणार नाहीत. नियम करून बऱ्याचदा तो मोडल्याने मानसिकता ढळू शकते. याचसाठी नियम करण्याऐवजी मनाला सवयी कशा लागतील यावर विचार करायला हवा. नियमाने बोजड वाटते. नियम नकोसे वाटतात. पण मनाला सवय लावली तर नियमाची गरजच वाटणार नाही. आज चांगले वागायचे. आज खूप काम करायचे. आजपासून चुका करायच्या नाहीत असा मनाचा दृढनिश्‍चय केला तर चुका होणार नाहीत. यासाठीच मनामध्ये हा संकल्प करायला हवा. मानसिक तयारी करायला हवी. शेतकऱ्याची कष्ट करण्याची मानसिक तयारी असते. कार्यालयात काम करणारी व्यक्ती नियमात काम करत असते. 

नियमाने कामावर जाणे. नियमाने काम करणे. नियमाने काम वेळेत पूर्ण करणे. काम वेळेवर पूर्ण झाले नाही तर वरिष्ठांची बोलणी खावी लागतात. या भीतीने तो काम करत असतो. बऱ्याचदा त्याला मनाविरुद्ध काम करावे लागते. नियमांचे उलंघन करून चालत नाही. शेती करताना नियमापेक्षा कामाची सवय असावी लागते. मारून मुरगटून येथे काम होत नाही. जबरदस्तीने येथे काम होत नाही. कष्टाची सवय असावी लागते. आदित्याच्या झाडाप्रमाणे समोरच्या परिस्थितीशी सामना करावा लागतो. शेतीत ही नियम असतात. पण ते शास्त्राचे नियम असतात. शास्त्रोक्त नियम हे पाळावेच लागतात. आळस हा शेतकऱ्यांचा सर्वांत मोठा शत्रू आहे. शेतातील तण काढण्यास आळस केला तर त्याचा उत्पन्नावर परिणाम होतो. कामात आळस करून चालत नाही. 

शेतकऱ्याचे जसे जीवन आहे तसेच आत्मज्ञानाची ओढ असणाऱ्या साधकाचे आहे. साधकासही सदैव जागरूक राहावे लागते. साधनेत मन विचलित होणार नाही. मन भरकटणार नाही. यासाठी जागरूक राहावे लागते. मन भरकटले तर वासनांच्या, विषयांच्या माऱ्याला साधक बळी पडतो. साधनेचे ते शत्रू आहेत. साधनेत मन रमावे यासाठी त्याला मनावर नियंत्रण ठेवावे लागते. यासाठी काही नियम त्याला पाळावे लागतात. काही नियम हे तयार करावे लागतात. नियमनाने सवय लागते. मनाला या नियमांची सवय व्हावी लागते. मनाची तशी तयारी व्हावी लागते. साधनेतील सोऽहम चा नाद मनाने ऐकण्याची सवय लावावी लागते. कधी चार ते पाच वेळाच ऐकले जाते. तर कधी एकदाच ऐकला जातो. आता हा स्वर सतत ऐकण्याची सवय ठेवावी लागते. 

सद्‌गुरू हा स्वर सतत ऐकत असतात. चालता-बोलता हा स्वर त्यांच्या मनाने ते ऐकत असतात. हा स्वर सतत ऐकायला यावा यासाठी ही सवय लावावी लागते. मन त्यातच रमवावे लागते. एकदा तो स्वर ऐकण्याची सवय लागली की मन आपोआप त्यामध्ये रमते. आज चार स्वर ऐकले उद्या दहा परवा पंधरा ठरवा एक माळ अशी माळांची संख्या वाढवावी लागते. हळूहळू माळ ओढण्याचीही गरज पडत नाही. मोजत बसण्याचीही गरज लागत नाही. 

ती सवय होऊन जाते. स्वर सदैव ऐकू येऊ लागतो. ही अवस्था साधकाला प्राप्त होते. तेव्हा तो आत्मज्ञानाचा स्वीकार करण्यास योग्य होतो. त्याला उचित फळ प्राप्त होते. शेतकऱ्याप्रमाणे मात्र कष्टात राहावे लागते. स्वर ऐकण्याचे कष्ट करावे लागतात. या स्वरात राहिल्यानंतर कष्ट कमी होतात. शहाणा शेतकरी या स्वरात राहातो. नांदतो. त्याला कष्ट पडत नाहीत. तो स्वरांच्या मागे धावतो. काम होत जाते. संसार होत जातो. स्वर ऐकण्याच्या नादात केलेल्या कष्टाचा विसर पडतो. अंगाला कष्टाची सवय लागते. मनाला स्वर ऐकण्याची सवय लागते. यातच त्या शेतकऱ्याचा आत्मज्ञानाचा मळा फुलतो. बहरतो. त्यातूनच ज्ञानाचा सुवास दरवळतो. 

  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
 
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे    
 

Sunday, June 28, 2020

मद्यपाआंगीचें वस्त्र । लेपाहातीचें शस्त्र । बैलावरी शास्त्र । बांधलें आहे ।। (एकतरी ओवी अनुभवावी)

विचार केला तर आता शेतीचा विस्तार कमी होत आहे. कमी क्षेत्रावर आता अशाप्रकारे ठिबक सिंचन वापरणे खर्चाचे झाले आहे. अनुदानासाठी हेलपाटे मारण्यातच अनुदान संपते. शासकीय योजनांचा लाभ केवळ मोठ्या शेतकऱ्यांना होतो कमी क्षेत्रावर लाभच पोहोचत नाही. अशा या अल्पभूधारक शेतकऱ्यांना ठिबकच्या योजनांचा लाभ कसा द्यायचा हे आव्हान आहे. 
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685 

मद्यपाआंगीचें वस्त्र । लेपाहातीचें शस्त्र ।
बैलावरी शास्त्र । बांधलें आहे ।। 532 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - मद्यपान केलेल्या मनुष्यास जशी आपल्या वस्त्राची आठवण नसते किंवा चित्राच्या हातांत दिलेल्या शस्त्राचे जसे त्या चित्रास भान नसते, अथवा बैलाच्या पाठीवर लादलेल्या शास्त्रांच्या पोथ्यांची त्याला जाणीव नसते.

देशातील कृषी विद्यापीठामध्ये संशोधन होते. नवनवे तंत्र विकसित केले जाते, पण अद्यापही हे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत का पोहोचले नाही? या तंत्राचा वापर किती शेतकरी करतात. साधेच उदाहरण घ्यायचे झाले तर ठिबक सिंचनाचे घेता येईल. राज्यातील किती शेतकरी ठिबक सिंचनाने शेती करतात. पाण्याची बचत होते. विजेची बचत होते. उत्पादन खर्चात बचत होते. उत्पादनही वाढते. मग ठिबक सिंचन शेतकरी का करत नाहीत? शंभर टक्के शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन वापरावे यासाठी का प्रयत्न होत नाही. यासाठी अनुदानही दिले तरीही ही योजना यशस्वी का होत नाही. हे शास्त्र अद्याप शेतकऱ्यांना का रुजले नाही. संशोधन तर झाले आहे. उत्तम आहे याचीही माहिती आहे. मग हे शास्त्र वापरण्यात आपण मागे का?

बैलाच्या पाठीवर शास्त्र बांधले. त्या बैलाला याची कल्पना नसते..ते शास्त्र आहे की कागदाचे ओझे आहे. त्याला काहीच फरक पडत नाही. दारूड्याला आपण दारू पिऊन कोठे पडलो आहे याचे भानही नसते. अंगावर कपडे आहेत की नाही याचीही कल्पना त्याला नसते. अशी अवस्था आज कृषी संशोधनाची झाली आहे. संशोधन अमाप झाले आहे. पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाही. ते संशोधन माहित झाले आहे. पण त्याचा वापर शेतकरी करताना दिसत नाही. नुसते पुस्तकी ज्ञान काय कामाचे? हजार वेळा ज्ञानेश्‍वरी वाचली, पण एक ओवीही समजली नाही. अशा वाचनाचा काय उपयोग. एखादे पारायण जरी मन लावून केले असते, ते ज्ञान समजावून घेतले असते तरी चालते. नुसते वरवरचे वाचन उपयोगी नाही. काही काम धंदा नाही म्हणून वाचन करून काय उपयोग? उतारवयात वेळ जात नाही. मग काय उद्योग. तर धार्मिक पुस्तकांची पारायणे करायची? चांगली गोष्ट आहे. पुस्तके जरूर वाचावीत. पण ती समजून घेऊन वाचावीत. नुसते वरवरचे वाचन नसावे.

घरात सर्व शास्त्राची पुस्तके आहेत. पुस्तकांच्यासाठी उत्तम फर्निचरही तयार केले आहे. अगदी नवी कोरी पुस्तके आहेत. त्यावर धूळ पडणार नाही. किंवा त्याला कीड लागणार नाही याची काळजीही घेतली आहे. पण ती पुस्तके कधी उघडून पाहण्याचे धाडस कधी केले नाही. मग त्या पुस्तकांचा काय उपयोग? इतकी उत्तम दर्जाची सुविधा त्यासाठी उपलब्ध करून काय उपयोग? आजकाल तंत्रज्ञान खूपच प्रगत झाले आहे. झटपट लोकांपर्यंत पोहोचते. मोबाईल तर आता प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. मग असे असताना शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत का पोहोचत नाही? त्याचा वापर शेतकरी का करत नाही? या प्रश्‍नाचा कधी आढावा घेतला गेला आहे का?

नुसती आकडेवारी सादर करून चर्चा करण्याने प्रश्‍न सुटत नाहीत. या चर्चेतून प्रश्‍नावर शोधलेले उत्तर अमलात आणावे लागते. तसे होत नाही. यामुळेच हे संशोधन विद्यापीठातच राहिले आहे. ज्ञान विस्तार ही प्रक्रिया हळू आहे. कोणतीही गोष्ट शेतकरी पटकन स्वीकारत नाही. त्याने पटकन स्वीकारावे असा आत्मविश्‍वास आपल्या देशातील कोणत्याही पक्षाच्या सरकारने निर्माण केला आहे का? ते का करता आले नाही. ठिबक सिंचनाचा विचार संत ज्ञानेश्‍वरांनी त्या काळात सांगितला. झाडाच्या मुळाशी, रोपाच्या मुळाशी पाणी दिले तरच ते झाडाला मिळते. त्याकाळात मडकी जमिनीत पेरली जायची. सध्याचे डिफ्युजर तंत्रज्ञान त्याकाळात वापरले जात होते. मग आत्ता हे तंत्र शेतकरी का वापरत नाही. ते वापरण्यात शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी आहेत. याचा विचार तरी झाला आहे का?

आकडेवारीच्या पाहणीनुसार जमिनदार शेतकरीच शासनाच्या योजनांचा लाभ घेतात असे दिसते. केवळ पाच टक्केच सर्वसामान्य शेतकरी शासनाच्या योजनांचा लाभ घेतो. असे का? त्यातही तो समाधानी नसतो. शासनाची योजना आहे. लाभ मिळतो आहे म्हणून तो त्याचा वापर करतो. प्रत्यक्षात ते तंत्रज्ञान वापरण्यात त्याला फारसा रस वाटत नाही. असे का? त्याची मानसिकता अशी का झाली आहे? याचा विचार होणे गरजेचे आहे. शासनाने आता ठिबक सिंचनाची सक्ती केली आहे. भावीकाळात पाण्याची टंचाई विचारात घेता तसे नियोजन हवेच. पूर्वी पाणी साठविण्याच्या फारश्‍या सुविधा नव्हत्या. धरणेही नव्हती. विहिरींची संख्याही कमी होती. अशा काळात पाण्याचा वापर हा काटकसरीने केला जात होता. पाणी उपशाच्या सोयी नव्हत्या. मोटेचे साहाय्याने पाणी किती ओढणार यालाही मर्यादा होत्या. पण झाडाच्या मुळाशी पाणी देण्याचे शास्त्र शेतकऱ्यांना अवगत होते. तसा ज्ञान विस्तारही केला जात होता. इतके जुने तत्त्वज्ञान असूनही सध्या याबाबत ज्ञान विस्तार का करावा लागतो.

विचार केला तर आता शेतीचा विस्तार कमी होत आहे. कमी क्षेत्रावर आता अशाप्रकारे ठिबक सिंचन वापरणे खर्चाचे झाले आहे. अनुदानासाठी हेलपाटे मारण्यातच अनुदान संपते. शासकीय योजनांचा लाभ केवळ मोठ्या शेतकऱ्यांना होतो कमी क्षेत्रावर लाभच पोहोचत नाही. अशा या अल्पभूधारक शेतकऱ्यांना ठिबकच्या योजनांचा लाभ कसा द्यायचा हे आव्हान आहे. पण हे आव्हान स्वीकारावेच लागेल कारण देशातील 70 टक्‍क्‍याच्यावर शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. शेतीच्या योजना आखताना आता अल्पभूधारक विचारात घेऊनच योजना आखायला हवी. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या गटाला ठिबक सिंचनाखाली आणता येऊ शकते. गटच ठिबक सिंचनाखाली आला तर अल्पभूधारक शेतकऱ्याचे शेतही ठिबक खाली येईल. गटशेतीचे इतरही फायदे या शेतकऱ्यांना मिळाल्याने निश्‍चितच शेतकऱ्यांचा विकास होईल. शेतीकडे पाठ फिरवणारे शेतकरीही पुन्हा शेतीकडे वळतील. गटागटाने शेतीला प्रोत्साहन मिळेल.

पूर्वीच्या काळीही गटागटानेच शेती केली जात होती. आजही दुर्गम भागात, कमी विकसित भागात गटागटानेच शेती केली जाते. शेतीची कापणी एकत्रित केली जाते. पेरणीही एकत्रित केली जाते. अशामुळे आज यांच्या शेतात पेरणी केली की उद्या दुसऱ्याच्या शेतात पेरणी होते. काढणीही त्याचप्रमाणे होते. कामाची, वेळेची बचत होते. पण काळाच्या ओघात शेतकऱ्यातील हे ऐक्‍य कमी झाले. मध्यंतरीच्या काळात नवनवे शोध लागले. पाणी उपसण्याची साधने बदलली. मोटेची जागा पंपाने घेतली. विजेच्या वापराने उपसा मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. सिंचनाचे प्रकल्प उभे राहिले. पाण्याची मुबलकता झाली. कोणतीही गोष्ट अति झाली की त्याचे तोटे सुरू होतात. पाण्याचा वापरही वाट्टेल तसा होऊ लागला. तसे ठिबक सिंचनाचा विचार मागे पडला. पाटाने पाणी देण्याची पद्धत विकसित झाली. आता पुन्हा पाण्याची वाढती टंचाई जाणवू लागल्यानेच ठिबक सिंचनाचा विचार आता जोर धरू लागला आहे.

विसरलेले शास्त्र आता पुन्हा उघडण्याची वेळ आली आहे. पुराणातील वांगी पुराणात असे म्हणणे चुकीचे आहे. जुने तेच सोने आहे. संतांनी सांगून ठेवलेले शास्त्र नेहमीच उपयोगाचे आहे. काळ बदलला तरी तेच शास्त्र उपयोग आणणे गरजेचे आहे. त्या शास्त्राचा आधार धरूनच विकास करणे गरजेचे आहे. शास्त्र सोडून विकास केल्यानंतर सुरवातीला फायदा होतो पण पुन्हा तोटे सुरू होतात. तोटा होऊ लागल्यानंतर पुन्हा पुराणांच्या पोथ्या उघडाव्या लागतात. सेंद्रिय शेतीचेही तसेच आहे. रासायनिक खतांचा शोध लागण्यापूर्वी देशात सेंद्रिय शेतीच केली जात होती. उत्पादनवाढीसाठी रासायनिक खतांचा वापर वाढला. पण उत्पादन पहिल्या टप्प्यात वाढले नंतर उत्पन्नात फरक जाणवू लागल्याने आता पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळण्याची वेळ आली आहे.

आरोग्यासाठी आता तर सेंद्रिय शेतीचाच आधार आहे. स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी तरी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी असा विचार आता पुढे येत आहे. शास्त्राचा आधार सोडून विकासाचे आराखडे तयार केल्यानेच हे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. शेतीमध्ये तरी आता पुन्हा साधुसंतांनी सांगितलेल्या विचाराने शेती करण्याची गरज वाटू लागली आहे. सिंचनाचे प्रश्‍न असो किंवा पावसाची अनियमितता असो, मानवामध्ये वाढते आजाराचे प्रमाण असो किंवा जागतिक तापमान वाढ असो, वाढते हवा, पाण्याचे प्रदूषण असो किंवा जमिनाची बिघडलेले पोत असो या सर्वांची उत्तरे एकच आहेत. शास्त्राचा आधार सोडून विकास केल्यानेच हे प्रश्‍न भेडसावत आहेत. अनेक थोर शास्त्रज्ञांनीही आता हे मान्य केले आहे.

विकास करताना फायदा विचारात घेण्याबरोबरच भावी काळात कोणते तोटे होणार आहेत याचाही विचार होणे गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने विकास झाला असे म्हणता येईल. कारखाने झाले. लोकांना रोजगार मिळाला. वसाहतींचा विकास झाला. विविध सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या. पण त्याबरोबरच विकास करताना प्रदूषणाकडे दुर्लक्ष झाल्याने आता रोगराई वाढली आहे. विविध प्रश्‍न उपस्थित होत आहेत. आता औद्योगिक क्षेत्रात पाणीही शुद्ध मिळत नाही. अशाने विकास कोणता केला हा मोठा प्रश्‍न आहे. विकास करताना या जमिनीवरील वृक्षांची तोड झाली. पिकाऊ जमिन वाया गेली. केवळ औद्योगिक क्षेत्रामुळे जमिनींचा भाव वाढतो या विचाराने विकास केला. भाव वाढ केली पण प्रश्‍नही वाढविले.

अध्यात्म शास्त्रात विकास करू नका असे कोठेही सांगितले जात नाही. विकास करा पण विचार करून विकास करा, शास्त्र सोडून विकास करू नका असे सांगितले जाते. नेमके हेच होत नाही. यामुळेच अध्यात्म शास्त्रास नावे ठेवली जात आहेत. कृषी विद्यापीठांमध्ये सर्वागिंण विचार करून संशोधन विकसित केले जाते. बऱ्याचदा यात चुका होतात. बऱ्याचदा संशोधन अयशस्वी ठरते पण संशोधन केले जाते. ही निरंतर प्रक्रिया आहे. संशोधन विकसित करण्याअगोदर त्याचे विविध क्षेत्रावर प्रयोग केले जातात. ते योग्य आहे की नाही हे तपासले जाते. पण आता या विकासामध्येही राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. बियाणे कंपन्यांच्या नफ्यासाठी वाट्टेल तशी मंजूरी दिली जात आहे. नियंत्रण राहिलेले नाही. अशामुळे उत्पादन वाढ होणारे बियाणे पहिल्यावर्षी उत्पादन देते मात्र नंतर बियाणे खराब निघते. अशा प्रकारावर नियंत्रण आणण्याचीही गरज आहे.

संशोधनाचा प्रसार करताना नियम हे पाळले जाणे गरजेचे आहे. पिकांच्या जाती विकसित झाल्या. उत्तम जातींचा प्रसारही झाला. पण त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. शेती अशी करा? शेती तशी करा? असे सल्ले विद्यापीठाकडून दिले जातात. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत हे सल्ले पोहोचतात का? विविध कंपन्यांच्या हस्तक्षेपामुळे चुकीचे सल्लेही दिले जात आहेत. कीडनाशक, खते यांच्या फवारणीचे नियंत्रण राखले जात नाही. चुकीच्या पद्धतीने फवारण्या होत आहेत. यात नुकसान कोणाचे? शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. त्याबरोबरच शेतमाल खाणाऱ्या जनतेचेही आरोग्य बिघडत आहे. यावर नियंत्रण कसे ठेवणार. योग्य शास्त्र विकसित करण्यासाठी आवश्‍यक ते कायदे करण्याची गरज आहे.

आज सेंद्रिय शेतीचा प्रसार केला जात आहे. पण याला शासनाकडून किती प्रतिसाद मिळतो. पारंपरिक बियाण्यांचे संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाची किती मदत मिळते. हा सुद्धा आता संशोधनाचा विषय आहे. शेतीमधील राजकीय हस्तक्षेप कमी करण्याचीही गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने शेतीचे खरे शास्त्र विकसित करता येईल. शेतीचे शास्त्र आता शेतकऱ्यांनीच विकसित करण्याची गरज आहे. विद्यापीठांनी पुस्तकांत बांधून ठेवलेले हे शास्त्र आता प्रत्यक्षात उपयोगात आणायला हवे. संशोधनाच्या प्रसाराचा वेग जितका वाढेल तितका विकासाचा दर वाढेल. शेतकऱ्यांनीच आता संशोधक वृत्ती ठेवून शेती करायला हवी. तरच शेतीचा विकास झपाट्याने होईल.

गटशेतीतून शेतकऱ्यामध्ये संशोधनाच्या चर्चा घडविल्या गेल्यातर शेतीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार झपाट्याने होईल. गावागावात शेतकऱ्यांचे गट झाले तर एकमेकांमध्ये तंत्रज्ञानावर चर्चा होऊन शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्‍न सुटण्यास मदत होईल. शेतीचे शास्त्र समजून घेण्यातही सहजता येईल. पूर्वीच्याकाळी अशीच शेती केली जायची. बागायतदार शेतकऱ्यांची मुले मामाच्या, काकाच्या शेतात जाऊन त्यांच्याकडून शेतीचे धडे घेत होते. बागायतदार आहे म्हणून मुलांना शेतीची कामे लावायची नाहीत. त्यांना कष्टाची कामे द्यायची नाहीत असा कोणताही नियम तेव्हा नव्हता. उलट बागायतदार स्वतःच्या मुलाला हे तंत्र समजावे यासाठी दुसऱ्या शेतकऱ्याकडे शिक्षणासाठी ठेवत असत. कामाची सवय लागली की आपोआप विकास होतो. मानसिक तयारी होते. चांगले वळण लागते. शास्त्र शिकण्यासाठी, समजावून घेण्यासाठी मानसिक तयारी असावी लागते. वडिलांना पुस्तकांची आवड असते. पुस्तकांचे वाचनालयच त्यांनी घरात उघडलेले असते पण त्यांची मुले ही पुस्तके कधी वाचताना दिसत नाहीत. असा विरोधाभास बऱ्याच घरामध्ये पाहायला मिळतो. असे का होते? तर मुलांची वाचनाची आवड ही निर्माण करावी लागते. त्यासाठी त्याची मानसिकता बदलावी लागते. तशी तयारी करवून घ्यावी लागते. तरच ही सवय लागते. 


  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
 
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे    
 

Friday, June 12, 2020

का भूमीचें मार्दव । सांगे कोंभाची लवलव । नाना आचार गौरव । सुकुलीनाचे ।। (ज्ञानेश्वरी)

 
मनाला कष्टाची सवय नसल्याने मुले शेतीकडे वळत नाहीत. ती काय करणार? शेती विकूनच टाकणार ना? गाडी कष्टाने कमवायची असते शेती विकून आलेल्या पैशातून खरेदी करायची नसते. 
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

का भूमीचें मार्दव । सांगे कोंभाची लवलव ।
नाना आचार गौरव । सुकुलीनाचे ।। 180 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - अथवा अंकुराचा लुसलशीतपणा हा जमिनीचा मृदुपणा सांगतो, किंवा आचार हा चांगल्या कुलवानाचा चोरपणा दाखवितो.

पुरातन कालात साधू-संत हे संशोधक होते. संशोधकांप्रमाणे त्यांची वृत्ती होती. खोलवर विचार करण्याची सवय त्यांना होती. शब्दातून विचारांची खोली समजते. साध्या साध्या गोष्टींचा खोलवर विचार केल्याचे यातून जाणवते. जमीन मऊ आहे हे ओळखायचे कसे? बीजाला अंकुर कसा फुटला आहे. तो कसा उगवला आहे यावरून तेथील जमीन कशी आहे हे समजते. बारीक निरीक्षणातूनच या गोष्टी लक्षात येतात. शेतकऱ्यांनीही शेती करताना असा बारीक-सारिक विचार करावा. तशी सवय मनाला लावून घ्यावी. तसे आचरणही ठेवायला हवे. हे सुकुलिनाचे लक्षण आहे. शेतीमध्ये विकास करायचा असेल तर तसे आचरणही हवे. मनात प्रश्‍न पडायला हवेत. हे असे का होते? हे कशामुळे झाले? यावर उपाय काय? प्रश्‍न पडले तर उत्तरे शोधण्याची ओढ लागते. उत्तरे शोधता शोधता खोलवर विचारांची सवय लागते. विचारांची खोली वाढली की, आपोआपच पक्वता येते. तसे शेतकरी व शेतकऱ्यांच्या मुलांना कष्टाची सवय असते. मनाला कष्टाची सवय असणे हे सध्याच्या काळात गरजेचे आहे. चंगळवादी संस्कृतीच्या आक्रमणामुळे कष्टाची सवयच कमी होत आहे. श्रम करून पैसा कमविणाऱ्याला त्याचे मोल माहीत असते. तो खर्च करताना तसा विचार करतो. श्रमाचा पैसा उधळावा अशी मानसिकता त्याची नसते. कष्टाची किंमत माहित असते. याची जाणीव असते. यासाठी शेतात राबायची सवय अंगी बाणायला हवी. डान्सबार पैसे उधळणारे ही कष्टकरी शेतकऱ्यांची मुले नव्हती. जमीनदारांची मुले होती. त्यांना कष्टाची किंमत माहीत नव्हती. जमीनी विकून गाड्या उडवणारे शेतकरी कसले? आचारावरून तो कोणत्या घरातील आहे हे समजते. कष्टकरी शेतकऱ्यांची मुले डान्सबारवर पैसे उधळण्यासारखी टवाळखोरी कदापी करणार नाहीत. कामातून आलेला थकवा दूर करण्यासाठी ते मनसोक्त पाण्यात डुंबतील, कीर्तनात नाचतील, भजनात रंगतील, भक्तीत न्हातील. पण पैसा उधळणार नाहीत. कष्टाच्या पैशाचे मोल ते चांगल्याप्रकारे जाणतात. सहज मिळाल्यानंतर त्याचे मोल माहीत नसते. जमीनदारांच्या मुलांना सहज संपत्ती मिळते. त्यांना जमीनीची आवडच नसते. गोडीही नसते. कधी शेतात जाऊन काम केल्याचा अनुभवही नसतो. मनाला कष्टाची सवय नसल्याने मुले शेतीकडे वळत नाहीत. ती काय करणार? शेती विकूनच टाकणार ना? गाडी कष्टाने कमवायची असते शेती विकून आलेल्या पैशातून खरेदी करायची नसते. कष्टातून खरेदी करण्यात जो आनंद असतो तो शेत विकून खरेदी करण्यात कसा असेल? यासाठी मुलांना कष्टाची सवय लावायला हवी. सहज मिळाले की त्याचे मोल समजत नाही. कष्टाने मिळवले की त्याचे मोल कळते. चांगले संस्कार होण्यासाठी प्रथम कष्टाची सवय मनाला लावायला हवी. कष्ट हे सुकुलिनाचे लक्षण आहे.

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621


#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे