Sunday, March 24, 2019

डाॅ. यशवंत पाठक यांनी कृषि ज्ञानेश्वरीस दिलेली प्रस्तावना



कृषी विषयक ज्ञानेश्वरीतील ओव्या घेऊन लिहिलेल्या पुस्तकास संत साहित्याचे गाढे अभ्यासक डाॅ. यशवंत पाठक यांची प्रस्तावना लाभली. आता सध्या ज्ञानेश्वरीतील असे विविध पैलू मांडण्याची गरज असल्याचे यावेळी डाॅ. पाठक म्हणाले होते.  पर्यावरण संदर्भातील ज्ञानेश्वरीतील ओव्या शोधून त्यांनी वनराईचे मोहन धारीया यांना दिल्याचेही या निमित्ताने सांगितले. त्यांच्या सहवासामध्ये खूप काही शिकण्यास मिळाले. असा हा गाढा अभ्यासक आपणातून निघून गेल्याने खूप दुःख होत आहे. असा अभ्यासक आणि मार्गदर्शन फार क्वचितच घडतो.  डाॅ. पाठक यांना भावपूर्ण श्रद्धाजली. त्यानिमित्ताने त्यांनी कृषी ज्ञानेश्वरीस दिलेली प्रस्तावना खास आपल्यासाठी....


ज्ञानेश्‍वरीतील विशिष्ट ओव्या निवडून कृषि जीवनाचा शोध श्रीयुत राजेंद्र घोरपडे यांनी या पुस्तकात केला आहे. सद्‌गुरू दादा महाराज सांगवडेकर यांची कृपा त्यांच्यावरची आहे. ज्ञानेश्‍वरी हा त्यांच्या अभ्यासाचा ग्रंथ आहे. ज्ञानेश्‍वरीतील ओव्या कशारीतीने लावावयाच्या असतात, याविषयी त्यांना अभ्यासाची ओढ आहे. या संदर्भात त्यांनी अभ्यासही केलेला आहे. ते पत्रकार असल्यामुळे त्यांना वर्तमानातील संदर्भ सहज मिळालेले आहेत. याबाबतीत त्यांनी सेंद्रिय शेतीसाठी अनेक संस्थामध्ये सुरू प्रयोगासही भेटीही दिल्या आहेत.
 

या ओव्यांमधून श्री. घोरपडे यांनी शेती आणि शेतकऱ्यांचे जीवन यांचा विचार केलेला आहे. शेतकऱ्यांचे जीवन ऋृतूंवर अवलंबून आहे. त्याला कधीही रजा घेता येत नाही. प्रत्येक ऋतूत त्याला काम करावे लागते. शेतीतील अडचणींना सामोरे जावे लागते. हे सर्व जरी असले तरी शेतीमधील निष्ठा महत्वाची आहे. शेतात काही पिकले नाही तर शेतकरी उपाशी राहील. त्यामुळे शेती हा मानवी जीवनाचा फार मोठा आधार आहे. शेतीबरोबर गोधनाचे महत्त्व ज्ञानदेवांनी ज्ञानेश्‍वरीत वेळोवेळी वर्णिले आहे. मातीला "आई' इतके जपावे लागते. त्या-त्या पिकाला नेमके पाणी घालावे लागते. जमिनीचा पोत बिघडता कामा नये. याची काळजी घ्यावी लागते. या साऱ्यांच्या मुळाशी ज्ञानदेवांनी एक मूलभूत तत्त्व सांगितले आहे. पिकाला मुळाशी पाणी दिले तर ते सगळ्या अंगांनी वाढते. त्यासाठी ठिबक सिंचन पद्धत उपयोगाची आहे. पक्षी हा पक्व पळाला झोंबतो. त्याचा आश्‍वास घेतो. परंतु, त्याआधी तो खूप विचार करतो. माणसाला फक्त आयते फळ हवे असते. पावसाळा सांभाळण्यासाठी विविध वृक्ष लावावे लागतात. शेती करताना प्राण्यांना आणि सृष्टीला सांभाळून घ्यावे लागते. गवतामुळे जमिनीची धूप कमी होते. गणपतीला दूर्वा वाहण्याच्या निमित्ताने मातीचे संवर्धन करावे. हा विचार महत्त्वाचा आहे.
 

नगरे रचावी. निर्मळ जलाशये निर्माण करावीत. महावने लावावी. यामुळे आरोग्य आणि समाजस्वास्थ उत्तम राहाते. जलाशयाची जपणूक मोलाची आहे. निर्मळ जलाशये हे नगराचे हृद्‌य आहे. पाणी जर जपले तरच उन्हाळा सुसह्य होतो. ज्ञानेश्‍वरांनी वड, पिंपळ, कडुनिंब, औदुंबर, चिंच, आंबा या साऱ्या वृक्षांचे महत्त्व सांगितले आहे. वड हा साधनेचा वृक्ष आहे. पिंपळ हा कर्मयोगाचे भान देणारा वृक्ष आहे. औदुंबर हा भक्तीचा अनुभव देणारा वृक्ष आहे. कडुनिंब हा कर्तव्य तत्परतेचा संदेश देणारा वृक्ष आहे. तर, चिंचेचे झाड प्रेम आणि बंधुतेची सावली देणारा वृक्ष आहे. ज्ञानदेवांना हे सारे वृक्ष योगी वाटतात. हे वृक्ष म्हणजे शेतातील देवळे आहेत. या साऱ्यातून जे वात्सल्य निर्माण होते ते ज्ञानदेवांना अत्यंत प्रिय आहे. वासराला बघितल्यावर गाईला पान्हा फुटतो. हे विलक्षण वात्सल्य ज्ञानदेवांना देवाचे रूप वाटते. याचा ते विशेषत्वाने नेहमी उल्लेख करतात.
 

धान्य निवडावे लागते. भुसा बाजूला काढावा लागतो. सशक्त देशी वाणांचे धान्य निर्माण करणे आणि समाजाला पौष्टिक अन्न देणे ह ज्ञानदेवांना आवडते. शेतीतला भाजीपाला फार काळ टिकत नाही. त्यामुळे भाजीपाल्याची आवक बऱ्यापैकी घ्यावी लागते. उसापासून गूळ, साखर तयार होते. दुधापासून दही, लोणी तयार होते. आंब्यापासून रस, वड्या तयार होतात. कैरीचे लोणचे आणि मुरांबे तयार होतात. हे सगळे पदार्थ तो आळी-पाळीने चवीने खातो. त्यामुळे विविध उद्योगांना वाव मिळतो. पक्ष्यांमुळे शेती सुखरूप राहते. शेतातले किडे पक्षी नाहीसे करतात. लालभडक गाजरे दिसायला सुंदर असतात. पण देशी गाजराची गोडी त्याला नाही. फळे नुसती दिसायला सुंदर असून चालत नाही, त्याची चवही तितकीच सुंदर असावी लागते. काही फळे वरवर सुंदर पण बिनचवीची असतात. त्यात माणसे फसतात. म्हणून आरोग्याला उत्कृष्ट असणारा भाजी- व्यापार आणि फळ व्यापार आपण निर्माण केला पाहिजे. 

वृक्षतोड झाल्याने घरटी नष्ट होतात. पक्षीही नाहीसे होतात. वृक्षतोड झाल्याने घरटी नष्ट होतात. पक्षीही नाहीसे होतात. यासाठी पक्ष्यांना आवडेल असे धान्य त्यांच्या आसपास ठेवले पाहिजे. यामुळे निसर्ग स्वच्छ राहातो. गाई समाधानाने वावरतात. पशुपक्षी समाधानाने वावरतात. त्यासाठी कष्ट करावे लागतात. जे मनापासून कष्ट करतात ते मोठे होतात. कष्टातून आणि अनुभवातून माणूस खूप शिकतो. तोच खरा कर्मयोग असतो. म्हणून माउलींनी कष्टमय जीवनाला महत्त्व दिले आहे. अरण्यात वणवा पेटला की, तो पेटतोच. त्यासाठी एकच उपाय असतो. तो म्हणजे, वणवा लागेल असे काहीही न करणे. अरण्यात वणवा पेटला की, तो पेटतोच. त्यासाठी एकच उपाय असतो. तो म्हणजे वणवा लागेल असे काहीही न करणे. अरण्यात काही प्रमाणात ओलावा ठेवणे. लसूण उग्र असला तरी प्रकृतीला उपकारक असतो. पिकांवरील कीड घालविण्यासाठी लसणाचा उपयोग करतात.
 

ज्ञानेश्‍वरीत शेतीच्या सुबोध दृष्टांतातून जगण्याची परिणामकारकता सूचित केली आहे. मऊ जमीन ओळखण्याची खूण म्हणजे मातीतून सहज अंकुर फुटतो. त्याप्रमाणे मनाला संस्काराचा ओलावा मिळाला की, ते मन सुंदर होते. त्याला चंगलवाद बाधत नाही. त्याला पैशाची किंमत कळते. तो कधीही पैसे उधळत नाही. म्हणून मनाला सुसंस्कारित करण्यासाठी ज्ञानेश्‍वरीचे मनन करणे आवश्‍यक आहे. चांगले बियाणे असेल तरच शेत उत्तम पिकते. म्हणून शेतकरी चांगल्या बियाण्यांच्या शोधात असतो. बीज असे शुद्ध असेल, तर फळ उत्कृष्ट येते. ज्ञानदेवांनी शेतीच्या उदाहरणामधून हे सांगितले आहे.
 

श्रीयुत घोरपडे यांनी यानिमित्ताने आजच्या काळात ज्ञानेश्‍वरीच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष वेधले आहे. यातून दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत. पहिला म्हणजे कष्टपूर्वक केलेले कोणतेही चांगले काम देवपूजा ठरते. दुसरा म्हणजे आपण नेहमी शुद्ध मनाने सत्कर्म केले की, त्यांच्या पाठीशी माउली उभी राहाते. आजही आम्हाला माउली हवी आहे. हे लक्षात आले म्हणजे, या पुस्तकाचे महत्त्व सहज कळते.

- डॉ. यशवंत पाठक

No comments:

Post a Comment