Tuesday, July 28, 2020

जेणे देवांचा मानु गिवसिला । धर्मासि जीर्णोद्वार केला । सूर्यवंशी उदेला । सूर्य जो का ।। (एकतरी ओवी अनुभवावी)


देव, देव म्हणजे काय ? देव देवळातच असतो असे नाही तर देहाच्या या मंदिरातही देवाचे अस्तित्व आहे. हे विसरता कामा नये. सर्वांच्या ठायी देव आहे. सर्व जीवमात्रांत देव आहे. हे देवाचे अस्तित्व जाणणे हा खरा स्वधर्म आहे.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

जेणे देवांचा मानु गिवसिला । धर्मासि जीर्णोद्वार केला ।
सूर्यवंशी उदेला । सूर्य जो का ।। 254 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 10 वा

ओवीचा अर्थ - ज्या रामचंद्राने देवांचा गेलेला मान शोधून काढला व धर्माचा जीर्णोद्धार केला. सूर्यवंशात जो प्रतिसूर्यच उदयास आला.

श्री रामचंद्र हे सूर्यवंशात प्रतिसूर्यच म्हणून उदयास आले. यावर चिंतन, मनन केले तर असे लक्षात येते की देवांचा सुद्धा उद्धार राजाला करावा लागतो. यासाठी राजाला जन्म घ्यावा लागतो. देवांचे म्हणजेच धर्माचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे. हा त्याचा राजधर्म आहे. पण देव म्हणजे कोण ? सर्व सामान्य जनता सुद्धा देवासमान आहे बरं का !

देव म्हणजे देवळात असणारा देव. देव म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात पुजला जाणारा दगड. मानला तर देव नाहीतर दगड असे म्हटले जाते. दगडाची प्रतिष्ठापणा केल्यानंतर त्याला देवत्व प्राप्त होते. नाहीतर तो दगडच असतो. म्हणजे देवत्व प्रतिष्ठापणेनंतर येते. म्हणजेच त्यात शक्ती निर्माण होते. ती संकल्पना रुजवावी लागते. हे सर्व कशासाठी केले जाते. आपल्या मनाची तयारी करण्यासाठी केले जाते. मनात तो विचार भरावा लागतो. म्हणजेच मनाच्या शांती, सुख समाधानासाठी, मनाच्या स्थिरतेसाठी हे सर्व आहे. मनाची स्थिरता प्राप्त झाली तरच अध्यात्मिक प्रगती होते.
दगडात देव आणणे. मंदिरात देव आणणे. म्हणजेच मनाच्या मंदिरात देवाचे स्थान निर्माण करणे. मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे करावे लागते. हे प्रथम विचारात घ्यायला हवे. मगच कृती करायला हवी. म्हणजेच दगडाची पुजा करायला हवी. त्यामुळे त्या दगडाला देवत्व प्राप्त होईल. या देवावर कोणी शिंतोडे उडवले तर मनाच्या भावना निश्तिचत दुखावल्या जातात. मनाच्या भावना भडकतात. इतके सामर्थ या कृतीत आहे.
दगडात देवत्व निर्माण करण्यासाठी, धर्माच्या जीर्णोद्धारासाठी प्रभुरामचंद्रांना जन्म घ्यावा लागतो. भक्त प्रल्हादाच्या भक्तीसाठी खांबातून नृसिंहाला प्रकट व्हावे लागते. धर्म रक्षणासाठी भगवान कृष्णाला जन्म घ्यावा लागतो. दुष्टांचा नाश करण्यासाठी देवीला अवतार घ्यावा लागतो. ही सर्व या देवतांची मंदिरे आहेत. या मंदिरांचा उद्देश काय आहे हे समजून घ्यायला हवे. तरच त्या मंदिरात देव नांदेल. देवाचे अस्तित्व राहील. त्यानुसार या मंदिरांचे पावित्र्य जपायला हवे.
या मंदिरातील देवांना काय लागते ? ते कशाचा स्विकार करतात ? हे प्रथम भक्तांनी विचारात घ्यायला हवे. देव फक्त पान, फुल अन् फळ यांचाच स्वीकार करतो. म्हणून देवाला नारळ फुले वाहीली जातात. धनाचा लोभ त्या देवाला नाही. याचा विचार प्रथम भक्तांनी करून कृती करायला हवी. लाच घेणारा व लाच देणारे हे जसे दोघे दोषी असतात. हाच नियम मंदिरातील पुजाऱ्यांना सुद्धा आहे. मुळाच देणाऱ्याने लाचच दिली नाही तर घेणाऱ्याचे अस्तित्वच राहणार नाही. म्हणून भक्तांनी प्रथम आपल्या मनाची तयारी करायला हवी. मी देवाला काय देणार हे त्यानेच प्रथम विचारात घ्यायला हवे. देव जे स्वीकारतो त्या व्यतिरिक्त अन्य देणे व्यर्थ आहे. ते देवापर्यंत पोहोचतच नाही. हा विचार समजून घ्यायला हवा.
देव, देव म्हणजे काय ? देव देवळातच असतो असे नाही तर देहाच्या या मंदिरातही देवाचे अस्तित्व आहे. हे विसरता कामा नये. सर्वांच्या ठायी देव आहे. सर्व जीवमात्रांत देव आहे. हे देवाचे अस्तित्व जाणणे हा खरा स्वधर्म आहे. त्याचे पालन प्रथम करायला हवे. या स्वधर्माचा उद्धार करण्यासाठीच सदगुरुंच्या रुपाने ते प्रकटले आहेत. अशा या धर्माचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे. तो त्याचा राजधर्म आहे. जनतेला त्यांचा हक्क मिळवून देणे हा त्याचा राजधर्म आहे. यासाठी युगे युगे धर्म रक्षणासाठी राजाला जन्म घ्यावा लागतो. मग तो कृष्णाच्या रुपात असेल किंवा प्रभुरामचंद्रांच्या रुपात असेल. स्वधर्माच्या पालनासाठी, रक्षणासाठी, अध्यात्मिक परंपरा, गुरु-शिष्य परंपरा जीवंत ठेवण्यासाठी तसेच ती पुन्हा जागृत करण्यासाठी तीचा उद्धार करण्यासाठी राजाला जन्म घ्यावा लागतो. म्हणून तो संन्यासी असतो. श्रीमान योगी असतो. जाणता राजा असतो. स्वयंभू असतो. सूर्यवंशाचा तो प्रतिसूर्यच होऊन प्रकट होत असतो.


Saturday, July 25, 2020

एऱ्हवी साचचि गा धनुर्धरा । नाही शेवटु माझिया विस्तारा । पै गगना ऐसिया अपारा । मजमाजीं लपणें ।।


भले आपण अमिबापेक्षा मोठे असू पण विश्वाचा विचार करता आपणही एक किरकोळ पेशीच आहोत. मग कशाचा गर्व आपण करतो आहोत ? कोणात्या फुशारक्या आपण मारत आहात ?
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल ८९९९७३२६८५
एऱ्हवी साचचि गा धनुर्धरा । नाही शेवटु माझिया विस्तारा ।पै गगना ऐसिया अपारा । मजमाजीं लपणें ।। ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय  १० वा
ओवीचा अर्थ - एऱ्हवी अर्जुना, खरोखरच माझ्या व्याप्तीचा अंत नाही, अमर्याद अशा आकाशालाही माझ्यात लपून बसता येते.

विश्वाचा अभ्यास करणाऱ्यांनाही अद्याप विश्वातील या पोकळीचा अंत सापडलेला नाही. विज्ञानाने प्रगती केली. भौतिक प्रगती केली पण या अमर्याद विश्वाची अवकाशाची मर्यादा शोधू ते शकलेले नाहीत. याचा विचार केला तर आपण आपले अस्तित्व जरुर समजू शकू. विश्वाचा विचार, वैश्विक विचार जेव्हा आपण करू लागतो तेव्हा अध्यात्माची अनुभुती आपणास होऊ लागते. विश्वाचे अमर्याद रुप जेव्हा आपल्यात उतरते तेव्हा आपण आपले अस्तित्व शोधायला सुरु करतो. खरंच मी कोण आहे ? याचा शोध घेण्याचा विचार डोकावू लागतो. तेव्हाच आपणाला स्व ची अनुभुती येऊ लागते. अमर्याद विश्वात मी आहे तरी कोण ? खरचं आपण याचा शोध घ्यायला नको का ?

आपल्या जीवनाचा तो उद्देश का असू नये. स्वतःच जेव्हा स्वतःचा शोध करु लागलो तेव्हाच अध्यात्म समजण्यास प्रारंभ होतो. स्वरुप आपले आहे तरी कसे आणि हे कशासाठी निर्माण झाले आहे. अमर्याद विश्वाच्या पोकळीत आपण किती छोटे आहोत. सूर्याच्या मालिकेत पृथ्वी सुद्धा छोटी आहे. मग या पृथ्वीवरील मी किती छोटा. पेशींचा आकार मोजू शकतो. सर्वात लहान पेशी, अमिबा सुद्धा आपण जाणतो. पण ही पृथ्वीच विश्वात लहान असेल तर मग आपण किती लहान आहोत.

भले आपण अमिबापेक्षा मोठे असू पण विश्वाचा विचार करता आपणही एक किरकोळ पेशीच आहोत. मग कशाचा गर्व आपण करतो आहोत ? कोणात्या फुशारक्या आपण मारत आहात ? धर्माच्या नावावर इथे युद्ध करत आहोत. पण धर्म म्हणजे काय हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का ? प्राप्त परिस्थितीमध्ये आपणाकडून आवश्यक असे जे कर्म केले जाते त्याला धर्म म्हणतात. ते कर्म करणे म्हणजेच धर्माचे पालन करणे असा याचा साधा सोपा अर्थ आहे. ही धर्माची व्याख्या आहे. ती केवळ एखाद्या जातीसाठी किंवा त्यावर कुणाची मक्तेदारी नाही. तर तो समस्त मानवाजातीचा धर्म आहे. तो सर्वांसाठी आहे. योग्य कृती, योग्य वेळी, योग्य प्रकारे हा आपला धर्म आहे. जगा व जगू द्या हा आपला धर्म आहे.

धर्म कोणावर लादता येत नाही. मारून मुरगुटून तो शिकवताही येत नाही. मग धर्म बाटण्याचा तर यात प्रश्नच नाही. स्वतःच स्वतःची ओळख करून घेणे हा प्रत्येकाचा स्वधर्म आहे.  मग मी म्हणजे कोण ? मी म्हणजे आत्मा. हा आत्मा देहात आला आहे. त्यामुळे तो आपणास जाणवत नाही. देहातून तो मुक्त होतो तेव्हा त्याच्या अमर्याद स्वरुपाची ओळख होते. तो अमर आहे. त्याला अंत नाही. त्याला वास नाही. तो रंगहीन आहे. असा हा आत्मा सर्वांच्यात आहे. मग रंगावरुन धार्मिक वाद घालण्यात काय अर्थ आहे. कारण सर्वांच्या ठायी असणारा रंगहीन आत्मा एकच आहे. मोठा आहे म्हणावे तर त्याला आकारही नाही. त्याच्या विस्ताराला मर्यादाही नाही. असाहा हा अमर्याद आहे.

आपण आकाश अमर्याद आहे असे म्हणतो पण हे आकाशच त्याच्यामध्ये सामावलेले आहे. इतका तो मोठा आहे. मग स्वतःला लहान तरी का समजतोस ? ही अमर्याद असणारी व्यापी जाणून घे. त्याची ओळख करून घे. म्हणजे स्वतःतील न्यूनगंड दूर होईल. स्वतःच्या अमर्याद स्वरुपाची ओळख तुला होईल तेव्हाच अध्यात्माची अनुभुती येईल. ही अनुभुती स्वतःच करुन घ्यायची आहे. गुरुंच्या कृपेने या अमर्याद स्वरुपाची ओळख होते. यासाठी गुरुंची कृपा व्हावी लागते. गुरुंच्या कृपेनेच मग आत्मज्ञानाची प्राप्ती होते.   
 
  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

आपणाला आम्ही केलेले निरुपण आवडत असेल तर नियमित वाचण्यासाठी डेलिहंटवर `इये मराठीचिये नगरी` ला फाॅलो करायला विसरू नये. 
 
श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 
राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnynesh

Wednesday, July 22, 2020

म्हणोनि भाग्य जैं सानकुळ । जालिया केले उद्यम सदां सफळ । तैसें श्रुताधीत सकळ । गुरुकृपा साज ।। (एकतरी ओवी अनुभवावी)

पाऊस हा नैसर्गिक स्त्रोत आहे. कृत्रिमरित्या मानवाने समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी मिळवण्याचे प्रयोग केले आहेत. पण त्याला मर्यादा आहेत. म्हणजेच नैसर्गिक स्त्रोत हा गरजेचा आहे. कृत्रिमरित्या पाऊस पाडता येतो. पण त्यासाठीही आकाशात ढग असावे लागतात.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
संपादक, इये मराठीचिये नगरी,
मोबाईल 8999732685
म्हणोनि भाग्य जैं सानकुळ । जालिया केले उद्यम सदां सफळ ।
तैसें श्रुताधीत सकळ । गुरुकृपा साज ।। 168 ।। अध्याय 10 वा
ओवीचा अर्थ - म्हणून ज्या वेळेला दैव अतिशय अनुकूल असते, त्या वेळेला हातांत घेतलेले सर्व उद्योग नेहमी फलद्रूप होतात, त्याप्रमाणें गुरूंची कृपा झाली म्हणजे ऐकलेलें व पढलेलें सर्व ज्ञान आपले काम करतें.
पाऊस हा पिक-पाण्यासाठी आवश्यक आहे. यावरच सर्व अवलंबून आहे. कारण पावसाचे पाणी शुद्ध असते. पाणी हेच जीवन आहे. पूर्वीच्याकाळी वसाहतीसुद्धा बारमाही पाण्याचा स्त्रोत पाहून वसवल्या जात. पाणी नसेल तर आपण जगू शकत नाही. जंगलात जरी भटकंतीला गेला तरी त्याला संध्याकाळपर्यंत पाणी असणारी जागा राहण्यासाठी शोधावी लागते. कारण तो पाण्याशिवाय काहीच करू शकत नाही. म्हणजे आपण पाण्याशिवाय एक दिवसही राहू शकत नाही. पाणी हेच आपले जीवन आहे.
समुद्रात पाणीच पाणी आहे. पण ते आपल्यासाठी उपयुक्त आहे का ?, नाही. म्हणजे आपणास शुद्ध पाण्याची गरज आहे. यासाठी पाऊस चांगला होण्याची गरज आहे. पिकासाठीच नव्हेतर आपल्या दैनंदिन गरजांसाठीही त्याची गरज आहे. शहरातल्या लोकांना पाऊस नको असतो. पण पाणीच नसेल तर शहरात तरी राहणार कसे ?
पाऊस हा नैसर्गिक स्त्रोत आहे. कृत्रिमरित्या मानवाने समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी मिळवण्याचे प्रयोग केले आहेत. पण त्याला मर्यादा आहेत. म्हणजेच नैसर्गिक स्त्रोत हा गरजेचा आहे. कृत्रिमरित्या पाऊस पाडता येतो. पण त्यासाठीही आकाशात ढग असावे लागतात. तशी स्थिती असावी लागते. हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणजे निसर्गापुढे आपले काहीच चालत नाही. निसर्गाचे नियम हे आपणास पाळावेच लागतात. निसर्ग देवतेची कृपा असेल तर जीवनात अनेक गोष्टी सुसह्य होऊन जातात.
सदगुरूंची कृपी ही अशीच नैसर्गिक आहे. ज्याला सदगुरुंची कृपा झाली त्याचे जीवन फलद्रुप होते. पाऊस चांगला झाला. योग्यवेळी झाला. पिकाच्या आवश्यकेनुसार झाला, तर उत्पन्न भरघोस मिळते. यासाठी निसर्गाची कृपा ही गरजेची आहे. समजा पिक चांगले आले आहे. फुलोराही त्याला उत्तम आहे. किटकांचाही प्रादुर्भाव नाही. सर्व काही जोमदार वाढले आहे. पण ऐन काढणीच्यावेळी पावसाने हजेरी लावली. काय होते ? पिकाचे नुकसान होते. म्हणजे निसर्गाची कृपा ही यासाठीच गरजेची आहे.
तसेच अद्यात्मात आहे. सदगुरुंची कृपा ही असावीच लागते. साधना केली. चांगली साधना होते. सर्वकाही उत्तम जमते. पण गुरुकृपा नाही तर मग ज्ञान प्राप्ती कशी होणार ? आत्मज्ञानप्राप्तीसाठी गुरुंची कृपा होणे हे गरजेचे आहे. तरच ती साधना फलद्रुप होते. त्यांच्याच कृपेने आपण केलेला अध्यात्माचा अभ्यास, चिंतन, मनन, श्रवण हे फलद्रुप होते.
ज्ञानेश्वरी ही गुरुंच्या कृपेने आपल्यात उतरते. तिचा बोध त्यांच्या कृपेनेच होतो. गुरुंच्या इच्छेनुसार त्यांच्या आर्शिवादानेच मग ही साधना फलद्रुप होते. यासाठी गुरुंची कृपा व्हावी, हीच माऊलीच्या चरणी विनम्र प्रार्थना. गुरुकृपा होऊन आत्मज्ञानाचे फळ मिळावे. सर्व काही साध्य व्हावे, हीच सद् गुरुंच्या चरणी प्रार्थना.
  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।
आपणाला आम्ही केलेले निरुपण आवडत असेल तर नियमित वाचण्यासाठी डेलिहंटवर `इये मराठीचिये नगरी` ला फाॅलो करायला विसरू नये. 
 
श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 
राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे  
 
 



Monday, July 20, 2020

जे जे भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत । ( एकतरी ओवी अनुभवावी)

 
जया अंगी मोठेपणं त्यास यातना कठीण अशी सुद्धा म्हण प्रचलित आहे. जो पडतो तो सुधारतो. ज्याला अधिक त्रास दिला जातो. तोच स्वतःची प्रगती करतो.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685
जे जे भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत ।
हा भक्तियोगु निश्चित । जाण माझा ।। 118 ।। अध्याय 10 वा
ओवीचा अर्थ - जो जो प्राणी दिसेल, तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असे समजावे. हा माझा भक्तियोग आहे, असे निश्चित समज.
सकारात्मक विचार करा, जीवनात काही चांगले घडो वा काही वाईट घडो. आपला पाहण्याचा दृष्टिकोन मात्र त्याकडे सकारात्मक असायला हवा. नकारात्मक विचाराने आपल्या मनाला कमजोरी येते. आपण अस्वस्थ होऊन जातो. एखादे वाईट घडले तरी ते भगवंताच्या इच्छेने घडले असे म्हणून त्याकडे एक आव्हान म्हणून जगायला शिकले पाहीजे. असे केल्यास आपण आपली प्रगती निश्चित करू शकू. कितीही वाईट घटना घडली तरी त्याच्यापासून आपले मन विचलित होता कामा नये. आपण आपल्या मनाला तशी सवय लावून घ्यायला हवी. यातूनच आपण आपला विकास निश्चित करू शकू. जीवनात जास्तीत जास्त वाईट घटनाच घडत असतात. चांगले फारच कमी घडते. म्हणून आपण वाईट घटनांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून त्यावर मात करायची असते.
निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हटले जाते. कारण खरी प्रगती टीका करणाऱ्यांच्यामुळे होत असते. देशामध्ये सबळ विरोधी पक्ष असेल तर सत्ताधारी पक्षाबरोबरच देशाची प्रगतीही सहज होत जाते. टीका करणाऱ्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. टीका करणाऱ्यांना टीका करण्याची सवयच असते. त्यांच्या तोंडाशी लागून, भांडून उत्तर न देता स्वतःमध्ये तशी सुधारणा करून टीकेला उत्तर द्यावे.
जया अंगी मोठेपणं त्यास यातना कठीण अशी सुद्धा म्हण प्रचलित आहे. जो पडतो तो सुधारतो. ज्याला अधिक त्रास दिला जातो. तोच स्वतःची प्रगती करतो. मुलांना सर्व काही सुविधा उपलब्ध असतील तर तो प्रगती करेलच असे नाही. पण कठीण परिस्थितीतून अभ्यास करून मोठे झालेल्यांचीच अधिक उदाहरणे आपणास पाहायला मिळतील.  कठीण प्रसंगाला तोंड देण्याची त्याची तयारी असते. तोच खरा यशस्वी होतो. हे सामर्थ कठीण प्रसंगांना हसत हसत सामोरे जाणाऱ्यांमध्येच असते.
जीवनात अनेक व्यक्ती भेटतात. प्रत्येक व्यक्ती सारखी नसते. पण तिच्यात आपण भगवंत पाहीला पाहीजे. जे जे प्राणी भेटतील, जी जी भुते भेटतील, ती सर्व भगवंताची रुपे आहेत असे माणून त्याच्याशी व्यवहार करायला शिकले पाहीजे. त्यांच्या दुष्ट रुपाला न घाबरता. ते देवाचेच रुप आहे असे समजून त्यास सामोरे जाल तर प्रगती निश्चितच कराल. यासाठीच सकारात्मक विचारांनी यावर सहज मात करता येते. हाच भक्तियोग आहे  असे समजायला हवे.
प्रत्येक प्राणी मात्राच्या ठिकाणी परमात्मा आहे. तो आपल्यामध्येही आहे. देवामध्येही तोच आहे. हे जाणून व्यवहार करायला शिकायला हवे. म्हणजे आपले मन कधीच कमजोर होणार नाही. त्याच्यातील आत्मभाव ओळखून आपण आपला कार्यभाग साधायला हवा. वेळ वाईट आली तरी विचार वाईट होऊ देऊ नये. विचारात चांगूलपणा ठेवून सकारात्मक विचारांनी त्याकडे पाहायला हवे. आलेला प्रसंग हा झेलायला शिकले पाहीजे. तशी मनाची तयारी करायला हवी. तसा मनाचा समतोल राखायला हवा. साधनेसाठी हा समतोलपणा गरजेचा आहे. तरच आपण आध्यात्मिक प्रगती सहज साध्य करू शकू. साधनेत सकारात्मक विचारांनी प्रगती होते हे विचारात घेऊन साधनेत मन गुंतवायला हवे.


सिंधुदुर्गातील युवकांनी तयार केली आहे पर्यावरणपुरक राखी, पण कशापासून?


नारळाच्या करट्यांपासून राखी 
मालवणमधील स.का. पाटील महाविद्यालयातील भुगोलचे प्राध्यापक हसन खान यांच्या कल्पनेतून साकारली आहे पर्यावरणपुरक नारळाच्या करटीपासून राखी.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, संपादक, इये मराठीचिये नगरी 

छोट्या गोष्टी देखील मोठा परीणाम घडवतात, फक्त सातत्य हवे. हे निसर्गानेच आपणास शिकविले आहे. निसर्ग शिकवण ही जीवनदृष्टी बदलून प्रवास करण्यास शिकवते. आज असाच एक वेगळा प्रयत्न प्रा. हसन खान व त्यांचे विद्यार्थी सिद्धेश शर्मा आणि अजय आळवे यांनी साकारला आहे. त्यांनी चक्क  नारळाच्या करट्यांपासून राख्या तयार केलेल्या आहेत. 

या उत्सवात काही ठिकाणी वृक्षप्रेमी झाडांना राख्या बांधून  वन संरक्षणाची शपथ घेतात. पण या राख्या प्लास्टिक व तत्सम घटकांच्या असतात. साहजिकच यात पर्यावरणाचं रक्षण होत नाही यासाठी या युवकांनी याला पर्याय म्हणून नारळाच्या करटीचा वापर करून राख्या तयार केल्या. या राख्या वेगवेगळ्या आकाराच्या असून त्यावर समुद्र, वारली पेंटिंग, जैवविविधता , मालवणी संदेश याद्वारे निसर्ग व संस्कृतीची झलक दाखण्याचा प्रयत्न  या युवकांनी केला आहे. 

नारळाच्या करटीपासून तयार केलेल्या काही राख्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बिया जोडण्यात आल्या आहेत. राखी उत्सव झाल्यावर राखी मातीत घातल्यास त्यातून रोप येईल. असाही एक प्रयत्न आम्ही केला आहे.
- प्रा. हसन खान, स. का. पाटील महाविद्यालय, मालवण

या राख्यांची किंमत २५ रुपये असून आम्ही आशा व्यक्त करतो की, न फेडता येणारे निसर्ग ऋण कमी करण्यासाठी आम्ही केलेल्या छोट्या प्रयत्नाला आपली साथ लाभेल.
- अजय आळवे,

आणखी  फोटो पाहण्यासाठी http://dhunt.in/aktLF यावर क्लिक करा

 

Sunday, July 19, 2020

तरी मीचि एक सर्वा । या जगा जन्म पांडवा । आणि मजचिपासून आघवा । निर्वाहो याचा ।। (एकतरी ओवी अनुभवावी)

मृत्यूनंतर श्वास थांबतो. तेव्हा आपण म्हणतो तो अनंतात विलिन झाला. म्हणजे ती शक्ती अनंतात विलीन होते. याचा अर्थ सर्वांठायी असणारी ती शक्ती एकच आहे. फक्त ती वेगवेगळ्या रुपात जन्माला आली आहे.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685
तरी मीचि एक सर्वा । या जगा जन्म पांडवा ।
आणि मजचिपासून आघवा । निर्वाहो याचा ।। 112 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 10 वा
ओवीचा अर्थ - तरी अर्जुना, सर्व जगाला मीच जन्म देणारा आहे आणि या सर्वांची स्थिती माझ्यापासूनच आहे.
जगाची उत्पत्ती कशी झाली यावर अनेक प्रयोग आजही केले जातात. पण त्याचे उत्तर अद्यापही सापडलेले नाही. गाॅड पार्टिकलचा प्रयोग या संदर्भात सर्वानाच ज्ञात आहे. स्फोटातून विश्व निर्माण झाले, असे मानले जाते. पण स्फोट म्हणजे सुद्धा एक शक्तीच आहे.
सूर्याच्या ठिकाणी अगणिक स्फोट घडतात. त्या शक्तीपासूनच विश्वाची निर्मिती झाली असे मानले जाते. म्हणजे निर्मिती ही एका शक्तितून झाली, हे निश्चित. ही शक्ती म्हणजे दैवीशक्ती. हे अनेकांना मान्य नाही. देव न माननारे यावर विश्वास ठेवत नाहीत. गाॅड पार्टिकलला देव का म्हटले गेले असाही सवाल ते उपस्थित करतात. देव मानने आणि न मानने हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण अवकाशाच्या पोकळीचा अंत अद्याप विज्ञानालाही लावला आलेला नाही.
सूर्य आहे. सूर्य मालिका आहे. यात ग्रह आहेत. हे सर्व सूर्याभोवती फिरत आहेत. पण या अवकाशाच्या पोकळीत हे सर्व आहे ज्या पोकळीला शेवट नाही. शेवट एक महाशुन्यच आहे. असे मानावे लागते. ही सृष्टी कशी निर्माण झाली ?. कोणी निर्माण केली ? हे आपण कोणीच सांगू शकत नाही. पण सृष्टीत असणाऱ्या प्रत्येकात एक शक्ती आहे. जी शक्ती केवळ सूर्याभोवती फिरत आहे. ही शक्ती सूर्यातून प्रकट झाली अन् ती सूर्याभोवतीच फिरत आहे. हे फिरणे अनंत कालापासून सुरू आहे. ती जन्मते कशी अन् मृतही कशी होते.?
मानवाचा जन्म म्हणजे तरी काय ? आत्मा देहात येतो म्हणजे जन्म आणि तो देहातून जातो म्हणजे मृत्यू. म्हणजे आत्मा आला अन् गेला. शेवटी आत्मा अमरच आहे. त्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. देहात अडकला तेव्हा जन्म आणि देहातून गेला म्हणजे मृत्यू. प्रत्येक सजीवाची हीच अवस्था आहे. म्हणजे प्रत्येकात तो आहे. प्रत्येकात ती शक्ती आहे. कधी वाऱ्याच्या रुपात येते. कधी वीजेच्या रुपात येते. कधी अन्य रुपात येते. वारा येतो. आपणास तो जाणवतो. तसा श्वास शरीरात जातो आणि श्वास शरीरातून बाहेर येतो. मृत्यूनंतर श्वास थांबतो. तेव्हा आपण म्हणतो तो अनंतात विलिन झाला. म्हणजे ती शक्ती अनंतात विलीन होते. याचा अर्थ सर्वांठायी असणारी ती शक्ती एकच आहे. फक्त ती वेगवेगळ्या रुपात जन्माला आली आहे. या शक्तीला जाणणे. तिचा अनुभव घेणे. तिचा बोध घेणे. म्हणजेच त्या शक्तीची अनुभूती होणे. हेच अध्यात्म आहे. श्वास आत येतो सोच्या रुपात अन् बाहेर पडतो हमच्या रुपात. हेच सोहम. या सोहमचा बोध घेणे. त्याची अनुभूती जेव्हा येते तेव्हा या जीवाला आत्मज्ञानाची प्राप्ती होते.
  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

आपणाला आम्ही केलेले निरुपण आवडत असेल तर नियमित वाचण्यासाठी डेलिहंटवर `इये मराठीचिये नगरी` ला फाॅलो करायला विसरू नये. 
 
श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 
राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे  
 
 

Saturday, July 18, 2020

कोरोना विषाणूला ९९ टक्क्यांहून अधिक निष्क्रिय करण्याची यामध्ये आहे क्षमता



शिवाजी विद्यापीठाचे कोरोनाबाबत महत्त्वपूर्ण संशोधन

 ‘व्हायरस कवच’ फॅब्रिक स्प्रेची निर्मिती
 

संपूर्ण जगाला ग्रासलेल्या ‘कोविड-१९’ अर्थात कोरोना या विषाणूला निष्क्रिय करू शकणारे महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक संशोधन येथील शिवाजी विद्यापीठाच्या नॅनोफॅब्रिक्स सेंटरच्या संशोधकांनी केले आहे. येथे संशोधित करण्यात आलेल्या ‘व्हायरस कवच’ या फॅब्रिक स्प्रे (कपड्यांवर मारावयाचा फवारा) तंत्रज्ञानामुळे कोरोना व्हायरससह अन्य अनेक घातक विषाणूंना निष्क्रिय करणे शक्य होणार आहे. ही माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आज येथे दिली.

विद्यापीठात आज सकाळी नॅनोसायन्स व तंत्रज्ञान स्कूलचे डॉ.पी.एस. पाटील, डॉ. किरणकुमार शर्मा या संशोधकांसह या उत्पादनाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पुणे येथील इकोसायन्स इनोव्हेशन प्रा.लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत म्हेतर, संचालक अजय म्हेतर यांनी कुलगुरू डॉ. करमळकर व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांना भेटून या अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन व उत्पादनाबद्दल माहिती दिली. ‘व्हायरस कवच’ तंत्रज्ञानाच्या प्रभावाने कोविड-१९ विषाणू ९९.९९ टक्क्यांपेक्षाही अधिक निष्क्रिय झाल्याचे आंतरराष्ट्रीय चाचण्यांमध्ये आढळल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर ऑफ नॅनोफॅब्रिक्सचे प्रा. किरणकुमार शर्मा यांनी प्रा. पी.एस. पाटील आणि डॉ. किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भातील संशोधन केले आहे.

काय आहे संशोधन?
‘व्हायरस कवच फॅब्रिक स्प्रे तंत्रज्ञान’ हे वापरावयास अत्यंत सुलभ व सोपे आहे. हा स्प्रे फक्त आपल्या कपड्यांवर फवारायचा आहे. वाळल्यानंतर पुढे तो कपडे धुवून टाकेपर्यंत आपल्याभोवती संरक्षक कवचाप्रमाणे ते काम करते. कपडे धुतल्यानंतर पुन्हा त्यावर हे फवारले की झाले. यामध्ये केवळ सेंद्रिय कार्बोक्झिलिक अॅसिडची संयुगे आहेत, जी अजिबात विषारी नाहीत, तर पर्यावरणपूरक आहेत, असा दाखला अमेरिकेतील पर्यावरण सुरक्षा एजन्सी- ‘USEPA’ ने दिला आहे. त्याला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यताही दिलेली आहे.

काय आढळले चाचण्यांत?
‘व्हायरस कवच’ या उत्पादनाच्या देशासह जगातील आघाडीच्या प्रयोगशाळांत चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विविध घातक विषाणूंना निष्क्रिय करण्याच्या त्याच्या गुणधर्मावर शिक्कामोर्तब झाले आहे. याचे अँटिमायक्रोबायल गुणधर्म तपासण्यासाठी व्हायरस कवच फवारलेल्या कपड्याच्या पृष्ठभागावर ग्राम-पॉझिटिव्ह प्रकारांतील (स्टॅफिलोकोकस ऑरेयस) आणि ग्राम-निगेटिव्ह प्रकारांतील (इशेरिषिया कोलाय) जीवाणूंचा सुमारे १५ मिनिटे संपर्क आला असता ती ९९.९९ टक्क्यांहूनही अधिक निष्क्रिय झाल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे या स्प्रेच्या अँटिव्हायरल गुणधर्मांची तपासणी अमेरिकेतील बायोसेफ्टी लेव्हल-४ प्रयोगशाळेत करण्यात आली. या ठिकाणी ‘व्हायरस कवच’ फवारलेल्या कपड्यांवर सार्स-कोव्ह-२ हा ‘कोविड-१९’ साथीला जबाबदार असलेला विषाणू सुद्धा ९९.९९ टक्क्यांहून अधिक निष्क्रिय झाल्याचे आढळून आले.

कशी होणार उपलब्धता?
‘व्हायरस कवच फॅब्रिक स्प्रे’ हा लवकरच सर्व महत्त्वाच्या औषध दुकानांमधून सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. याची किंमत २५० मि.ली. बाटलीसाठी रु. २७० तर ५०० मि.ली. साठी रु. ४९५ इतकी असणार आहे. सध्या पुण्यातील ‘इकोसायन्स’च्या प्रकल्पाची सुमारे ५००० बाटल्या प्रतिदिन इतकी उत्पादन क्षमता आहे. 

विद्यापीठाच्या नॅनोसायन्स व तंत्रज्ञान विभागाचे मोलाचे संशोधन
शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स व तंत्रज्ञान विभागामध्ये गतवर्षी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या (रुसा) अंतर्गत प्राप्त निधीमधून ‘सेंटर फॉर नॅनो-फॅब्रिक्स’ सुरू करण्यात आले. नॅनो तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिक कपड्यांच्या निर्मितीसाठीचे संशोधन या ठिकाणी व्हावे, अशी अपेक्षा त्यामागे आहे. केंद्राने पहिल्याच दणक्यात साऱ्या जगाची डोकेदुखी असणाऱ्या कोविड-१९ या विषाणूला निष्क्रिय करणाऱ्या संयुगाची निर्मिती करून प्रभावी कामगिरी करून दाखविली आहे. ‘व्हायरस कवच’ संयुगाच्या संशोधनाने भारत सरकारच्या निती आयोगातर्फे घेण्यात आलेल्या अटल इनोव्हेशन मिशन (AIM) या स्पर्धेत पहिल्या पाच अभिनव संशोधनांत स्थान मिळविले होते. या संशोधनाला मूर्त स्वरुप देऊन समाजापर्यंत आणण्यासाठी इकोसायन्स इनोव्हेशन प्रा.लि. ने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रचिती देणारे संशोधन: कुलगुरू डॉ. करमळकर

कोविड-१९ साथीला आटोक्यात आणण्याबरोबरच या कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठीचे संशोधन साऱ्या जगभरात सुरू आहे. प्रत्येक समाजघटक आपापल्या परीने त्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतात आणि महाराष्ट्रात तर या विषाणूने कहर मांडला आहे. या पार्श्वभूमीवर, शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स विभागाच्या संशोधकांनी ‘व्हायरस कवच’ या संयुगाची निर्मिती करून आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रचिती दिली आहे. त्यांची कामगिरी अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी काढले. 

कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, सार्स-कोव्ह-२ हा विषाणू एखाद्या पृष्ठभागावर सात सात दिवस राहू शकतो. इतका दीर्घकाळ टिकून राहण्याचा चिवटपणा असल्यामुळे त्याच्या स्पर्शातून संसर्गाची शक्यताही अधिक असते. यामध्ये आपल्या शरीरावरील कपड्यांचा वाटाही मोठा असू शकतो. आज कोरोना विषाणूच्या सामाजिक संसर्गाची साखळी तोडणे हेच आपल्यासमोरील प्रमुख आव्हान आहे. अशा वेळी व्हायरस कवच तंत्रज्ञानामुळे ती साखळी तोडण्याचे एक सक्षम अस्त्र आपल्या हाती आले आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठातील डॉ. किरणकुमार शर्मा यांच्यासह इकोसायन्स इनोव्हेशनमधील सर्व तंत्रज्ञ अभिनंदनास पात्र आहेत.

Friday, July 17, 2020

प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे । पिके तरी बाहो नुबगिजे । पिकाशी निवाडु देखिजे । अधिकाधिक ।। (एकतरी ओवी अनुभवावी)

 
वेगवेगळ्या फवारण्या करून तणांचा बंदोबस्त केला जात आहे. प्रयत्न वेगळे असले तरी तत्त्वज्ञान मात्र तेच आहे. फक्त काही पद्धतीबदल झाला आहे. अध्यात्मातही तसेच आहे. अध्यात्मिक विकासामध्ये येणारे अडथळे हे दूर हटवावे लागतील.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे 8999732685

प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे । पिके तरी बाहो नुबगिजे ।
पिकाशी निवाडु देखिजे । अधिकाधिक ।। 55 ।। अध्याय 10 वा

ओवीचा अर्थ - प्रत्येक वर्षाला शेताची पेरणी करावी आणि जर तें पिकले तर त्याची मशागत करण्याचा कंटाळा करू नये, कारण त्यामुळे पिकाची निष्पत्ती अधिकाधिक झालेली दिसते.

सध्या पावसाळा सुरु आहे. खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. पिक तरारून उगवलेही आहे. पाऊस समाधानकारक आहे. चिंता कशाची नाही. पण उत्पन्नवाढीसाठी योग्य ती पिकाची निगा राखण्याची गरज असते. बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली.  त्याकाळात भारतात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. शेतीवरच सर्व अवलंबून होते. सर्व जनता शेतीशी संबंधित होती. त्यामुळे शेतीतील उदाहरणे देऊन एखादे तत्त्वज्ञान सांगितले तर ते जनतेला पटकण समजेल लोकांना ती ग्रहण करणे आत्मसात करणे सहज शक्य होईल. हे ओळखून संत ज्ञानेश्वरांनी शेतीतील अनेक उदाहरणातून अध्यात्म समजावून सांगितले. यातून शेतीचे प्रबोधनही झाले.

नुसती पेरणी करायची आणि थेट कापणीला जायचे. अशी शेती कधी केली जात नाही. पेरणीनंतर आलेले पिक चांगले वाढावे यासाठी प्रयत्न करावे लागतात. मेहनत घ्यावी लागते. योग्य काळजी घ्यावी लागते. पिकाच्या वाढीस अडथळा ठरणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला हटवावी लागते. तरच ते पिक जोमात वाढते. यासाठी पिकाची अंतरमशागतही तितकीच महत्त्वाची आहे. पिकात वाढलेल्या तणांचा बंदोबस्त करण्याची गरज असते. तरच पिकाची जोमदार वाढ होऊन उत्पन्न वाढीस मदत होते. उत्पन्न वाढीचा विचार त्या काळातही केला जात होता.

सध्या बदलत्या काळानुसार शेतीमध्ये बदल करण्यात आले आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे उत्पन्न वाढीसाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्याबरोबरच शेतीमध्ये सध्या काम करणाऱ्या मजूरांची कमतरता भासत आहे. साहजिकच यावर यांत्रिकीकरणाचे उपाय योजले जात आहेत. वेगवेगळ्या फवारण्या करून तणांचा बंदोबस्त केला जात आहे. प्रयत्न वेगळे असले तरी तत्त्वज्ञान मात्र तेच आहे. फक्त काही पद्धतीबदल झाला आहे. अध्यात्मातही तसेच आहे. अध्यात्मिक विकासामध्ये येणारे अडथळे हे दूर हटवावे लागतील. तणांचा जसा बंदोबस्त करावा लागतो. तसा साधनेस अडथळा ठरणाऱ्या विचारांचाही बंदोबस्त करावा लागतो. राग, लोभ, मत्सर, अहंकार आदी दोष दूर करून आध्यात्मिक प्रगती साधायची असते. सदगुरु फक्त मंत्रबीज देतात. त्याची पेरणी देहामध्ये आपण करून त्या मंत्राची वाढ योग्य प्रकारे कशी होईल याचा प्रयत्न करावा लागतो. तणांचा बंदोबस्त कसा केला तसा दुष्टविचार, अहंकारी आदी दोषयुक्त तणे काढल्याशिवाय या मंत्रबीजाची वाढ जोमाने होणार नाही. तो मंत्र भरघोस उत्पन्न द्यावा यासाठी त्या मंत्रांच्या वाढीतील अडथळे दूर करायला हवेत. तरच आपणास अपेक्षित आत्मज्ञानाचे फळ प्राप्त होईल.   
  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

आपणाला आम्ही केलेले निरुपण आवडत असेल तर नियमित वाचण्यासाठी डेलिहंटवर `इये मराठीचिये नगरी` ला फाॅलो करायला विसरू नये. 
 
श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 
राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे  
 





अवचितयावरी सर्वस्व सांडिजे । चोख तरी तोचि भांडारी कीजे । तैसा तूं आतां माझे । निजधाम कीं ।। (एकतरी ओवी अनुभवावी)

 
अध्यात्मात संतसुद्धा शिष्यामध्ये हाच भाव पाहतात. संतांकडे दररोज हजारो माणसे भेट देतात. हाताची पाचही बोटे सारखी नसतात. तशी सर्वच माणसे ही सारखी नसतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685
अवचितयावरी सर्वस्व सांडिजे । चोख तरी तोचि भांडारी कीजे ।
तैसा तूं आतां माझे । निजधाम कीं ।। 52 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 10 वा
ओवीचा अर्थ - एखाद्या अकस्मात आलेल्या मनुष्यावर आपलें सर्वस्व सोंपवावें व तो प्रामाणिक आहे असें आढळून आलें, तर त्यालाच खजिनदार करावा, त्याप्रमाणें आम्ही तुला सांगितलेलें तूं लक्षपूर्वक ऐकतोस, अशी आमची खात्री झाल्यामुळें तूं आता आमचें राहण्याचे ठिकाण झाला आहेस.
जीवनात अनेक माणसे आपल्याला भेटत असतात. आपल्या आयुष्यात येत असतात. प्रत्येक माणूस हा विश्वासहार्य असेलच असे नाही. अचानक जीवनात आलेल्या माणसावर पटकण आपण विश्वास ठेवणे तितके शक्य नसते. आपण कोणावर विश्वास ठेवतो ? अनेकजण आपणास आमिषे दाखवतात व फसवतात. आपण त्यांच्या त्या दुष्टचक्रात सापडतो यात आपलेच नुकसान होते. पण अशी फसवणारी माणसे नेहमीच भेटतात असे नाही. मुळात अशी फसवणारी माणसे आपण आपल्या आयुष्यातून दूर ठेवायला हवीत. आपण फसलो म्हणजे आपण हरलो असे कधीच होत नाही किंवा तो जिंकला असेही होत नाही. फसवणूकीमध्ये हार-जीत नसतेचमुळी.
ठेच एकदा लागल्यानंतर माणूस शहाणा होतो. पण त्यातून शहाणपण येते. पुन्हा त्या मार्गावर तो सावधपणे चालतो. ज्या दगडामुळे ठेच लागला तो दिसताक्षणी योग्य ती खबरदारी घेतो. वाटेत येणारा तो अडथळा तो दूर करतो. जीवनात वागतानाही असेच करावे लागते. फसवणूक करणाऱ्या माणसांपासून दूर राहणेच कधीही उत्तम. एकदा फसल्यानंतर पुन्हा फसणार नाही याची काळजी घेणे हे उत्तम.
काही अनोखळी माणसे सुद्धा. किंवा कधी ज्यांचा आपल्याशी संपर्क आला नाही अशी माणसेही आपणास अनपेक्षीतपणे मदत करतात. निरपेक्ष भावनेने मदत करतात. त्यातून त्यांना काही मिळो न मिळो फक्त समाधानासाठी ते मदत करत असतात. अशी प्रेमळ माणसे जीवनात आली तर आपण त्यांच्यावर निश्चितच विश्वास टाकतो. आपले सर्वस्व आपण त्यांना सोपवतो. अशा व्यक्तीला आपण खजिनदार जरूर करावे कारण तो तुमची योग्यप्रकारे काळजी घेऊ शकतो. त्या पदासाठी तो योग्य असतो.
अध्यात्मात संतसुद्धा शिष्यामध्ये हाच भाव पाहतात. संतांकडे दररोज हजारो माणसे भेट देतात. हाताची पाचही बोटे सारखी नसतात. तशी सर्वच माणसे ही सारखी नसतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. प्रत्येकाचे वागणे वेगळे असते. या माणसांची पारख ही करावीच लागते. सदगुरु शिष्याची निवड करताना अशी पारख करतात. त्याची परिक्षा घेतात. तो परिक्षेत पास झाला तरच त्या पदासाठी तो योग्य ठरतो. शिष्यामधील गुण जाणून घेऊनच मग त्याला दिक्षा दिली जाते. अनुग्रह देताना शिष्याची आवड, निवड, त्याची भक्ती, आराधना, उद्देश, अवधान आदी सर्व गोष्टींची परिक्षा सदगुरु घेतात.
अवधान हे अध्यात्मामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे. जो अवधान देतो तो निश्चितच त्या पदास पोहोचतो. सदगुरु शिष्याच्या गुणांची खात्री करतात अन् मगच त्याला त्यांच्या हृदयात स्थान देतात. यासाठी शिष्याने योग्य ती काळजी घेऊन अभ्यास करायला हवा. साधना करायला हवी. तरच आत्मज्ञानाचा ठेवा त्याला मिळू शकेल.



Tuesday, July 14, 2020

वीर शिवा काशिद यांच्या पराक्रमास मानाचा मुजरा




🚩"वीर शिवा काशीद "🚩
12 जुलै 1660 शिवा काशीद यांचा स्मृतिदिन
 

मराठ्यांच्या इतिहासातील एक तेजस्वी पान जौहरला गुंगारा देण्यासाठी शिवछत्रपतींचे  हुबेहुब सोंग घेऊन जौहरच्या छावणीत बिनधोक जाणारे व सोंग उघडकीस आल्यावर हसत हसत मरणाला  कवटाळणारे मर्द! साडे तीनशे वर्षांपेक्षा अधिक काळ लोटून गेला आहे , शिवा काशीद यांच्या आत्मबलिदानाला .तरीही जनमाणसांच्या मनात अजूनही एक प्रश्न रूंजी घालत आहे कोण होते हे शिवा काशीद ?
- डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर  
     ( इतिहास अभ्यासक पुणे )

शिवा काशीद हे मूळचे पन्हाळ्याच्या पूर्वेस असलेल्या नेबापूर या गावचे रहिवासी.जन्म पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला. दुसऱ्याच्या अंत:करणातील  गुपित बाहेर काढण्यात अत्यंत चलाख व निष्णात अशी ही माणस असल्यामुळे शिवरायांनी यांस आपल्या पदरी ठेवून घेतले होते. शिवा काशीद बराचसे शिवरायांसारखे दिसत होते . मजबूत बांधा ,सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूच्या गोटातून माहिती काढण्यात ते अत्यंत  पटाईत होते 

 2 मार्च 1660 रोजी आदिलशहाने अफजलखानाच्या वधानंतर सिद्दीजोहरला विजापूरहून स्वराज्यावर आक्रमणास धाडले तर, दुसरीकडे मुघल सैन्य औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्तेखान याच्या नेतृत्वाखाली पुण्यातील लाल महालात तळ  ठोकून होते. स्वराज्यावर दुहेरी संकट आले होते. त्यावेळी शिवराय पन्हाळा किल्ल्यावर होते. 35 हजार पायदळ ,वीस हजार  घोडदळ अशा प्रचंड सैन्यानिशी जौहरने पन्हाळगडाला वेढा दिला.महाराज गडावर अडकून पडले होते.              
पावसाळ्याचे दिवस होते. पन्हाळा किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे महाराजांसाठी धोक्याचे होते. वेढ्यातून बाहेर पडण्याची छत्रपती  शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली. हा वेढा फोडून विशाळगडाकडे जाण्याचे ठरवले . विशाळगडाकडे कूच करणार त्या दिवशी शिवा काशिद यांना शिवरायांचा पोशाख चढविला. शिवा काशीद हे हुबेहुब शिवरायांसारखे दिसू लागले. खरे शिवराय कोण हेच कळणे थोडे अवघड झाले. दिनांक .12 जुलै 1660 रोजी पौर्णिमेची रात्र, रात्री दहाचा सुमार होता .छत्रपती शिवराय पन्हाळगडावरून निघाले. पालखीत बसले. पालखी मावळ्यांनी उचलली. फुलाजीप्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे सोबत 600 निवडक मावळेही निघाले, आणि सोबत आणखी एका पालखीत शिवाकाशीद निघाले.
मुसळधार पाऊस अखंड चालू होता. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. रस्ता दाखवायला पुढे हेर चालत होते. छत्रपती शिवाजीमहाराज उद्याच शरण  येणार आहेत !मग कशाला या वादळी पावसापाण्यात मोर्चावर ऊभे राहा ? करा उबदार आराम ! अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चे वाले ढिले पडले होते .झाडाझुडपातून आणि खाचखळग्यातून महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेने धावत होती .पाऊस पडत होता, आभाळ गडगड होते , विजा लखलखत होत्या, पालखी धावतच होती. नजरा धास्तीने भिरभिरत होत्या. पालखी बेमालूमपणे वेढा भेदून गेली .वेढ्या पासून पालखी पुष्कळच दूर गेली. एवढ्यात घात झाला! जौहरच्या हेरांनी पालखी ओळखली. आता? ठरल्याप्रमाणे हेरलेली पालखी घेऊन 15 -20 लोक मुख्य रस्त्याने धावू लागले आणि महाराजांची पालखी आडमार्गाने तोपर्यंत विशाळगडाकडे मार्गस्थ झाली.

शत्रुचा पाठलाग अटळ होता .अन् खरोखरच जौहरची फौज सिद्दी मसाऊदच्या बरोबर पाठलागावर निघाली .थोड्याच वेळात त्यांनी पालखीला गराडा घातला.त्यांनी मावळ्यांना विचारले,आत कोण आहे? उत्तर मिळाले की पालखीत  छत्रपती शिवाजी राजे आहेत.पालखी सकट महाराज कैद झाले अन् सिद्दीच्या छावणीत दाखल झाले .सिध्दी समोर सर्वांना उभे केले, पण जाणकारांनी ओळखले! काहीतरी गडबड आहे. चौकशी झाली आणि कळले  की हे तर शिवा न्हावी आहेत. सिद्धीने त्यांना विचारले की त्यास मरणाचे भय वाटत नाही का? उत्तर आले . छत्रपती शिवाजीराजें साठी हजार वेळा मरावयास तयार आहे.   छत्रपती शिवाजीराजे कोणासही सापडणार नाहीत. हे ऐकून रागाने सिद्दीने शिवा काशीद यांचे शीर कलम करण्याचा आदेश फर्मावला.
             
शिवा काशीद यांचे धाडस प्राणांची आहुती आपण कदापि विसरू शकणार नाही.माणसाच्या आयुष्यात अखेरचे मोल असते, ते त्याच्या स्वतःच्या प्राणांचे ,पण आपल्या राजाच्या जिवीतापुढे आपले प्राण कवडीमोल समजून त्या प्राणांची आपल्या राजावर उधळण करणारा शिवा काशीद  खरोखरीच धन्य होता.स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन शिवा काशीदने ज्या प्रखर राष्ट्रनिष्ठेचा व स्वामीनिष्ठेचा आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. त्याला हिंदुस्तानाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातही तोड नाही. कारण शिवा काशिद यांसारख्या मावळ्यांच्या बलिदानामुळे स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवराय साकार करु शकले.स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर शिवा काशीद यांच्या कुटुंबियांना महाराजांनी भेट देऊन पत्नी पारूबाई व पुत्र यशवंत यांचे सांत्वन केले .नेबापूर येथे  पन्हाळगडाला लागूनच शिवा काशीदांचे स्मारक  ऊभारून त्यांचे स्मरण इतिहासात जागते ठेवले. आहे ."
          अशा या वीर शिवा काशीद यांना तमाम मराठी जनांचा मानाचा मुजरा"
                       जय जिजाऊ जय शिवराय 

               लेखन✒️
 डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर  
     ( इतिहास अभ्यासक पुणे )
            संदर्भ: 
        डाॅ. सचिन पोवार
        शिवछत्रपतींचे शिलेदार

Monday, July 13, 2020

कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ५५ टक्क्यांवर कायम


मुंबई. दि. १३ :  राज्यात आज ४१८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४४ हजार ५०७ झाली आहे. दरम्यान, आज ( ता. 13) कोरोनाच्या ६४२९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात आज १९३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले १९३ मृत्यू हे मुंबई मनपा-४७, ठाणे-५, ठाणे मनपा-२३, नवी मुंबई मनपा-७, कल्याण-डोंबिवली मनपा-१८, उल्हासनगर मनपा-२, भिवंडी-निजामपूर मनपा-४, वसई-विरार मनपा-६, पनवेल मनपा-५, नाशिक-१, नाशिक मनपा-९, अहमदनगर-१, अहमदनगर मनपा-१, धुळे मनपा-२, जळगाव-७, जळगाव मनपा-१, पुणे-५, पुणे मनपा-२०, पिंपरी-चिंचवड मनपा-५, सोलापूर-१,सोलापूर मनपा-६, सांगली-१, सांगली मिरज कुपवाड मनपा-२,औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-२, लातूर-२, उस्मानाबाद-३, अकोला-२,अमरावती-१, वाशिम-१, नागपूर मनपा-१, भंडारा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील           

मुंबई: बाधित रुग्ण- (९४,१४६), बरे झालेले रुग्ण- (६५,६२२), मृत्यू- (५३३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२८९), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,९००)

ठाणे: बाधित रुग्ण- (६३,७७८), बरे झालेले रुग्ण- (२७,६४२), मृत्यू- (१६४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४,४३०)

पालघर: बाधित रुग्ण- (१०,०७८), बरे झालेले रुग्ण- (४९६७), मृत्यू- (१९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९१७)

रायगड: बाधित रुग्ण- (८८६५), बरे झालेले रुग्ण- (४१७४), मृत्यू- (१६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५२५)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (८८४), बरे झालेले रुग्ण- (६१०), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४४)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२६२), बरे झालेले रुग्ण- (२१७), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०)

पुणे: बाधित रुग्ण- (४०,१८०), बरे झालेले रुग्ण- (१६,८५७), मृत्यू- (११२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,१९६)

सातारा:  बाधित रुग्ण- (१७८०), बरे झालेले रुग्ण- (१०२८), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८३)

सांगली: बाधित रुग्ण- (६२२), बरे झालेले रुग्ण- (३५०), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५४)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१२२०), बरे झालेले रुग्ण- (८२२), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७८)

सोलापूर: बाधित रुग्ण- (४३१३), बरे झालेले रुग्ण- (२१६१), मृत्यू- (३५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८००)

नाशिक: बाधित रुग्ण- (७३१६), बरे झालेले रुग्ण- (४२०९), मृत्यू- (३००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८०७)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (८९४), बरे झालेले रुग्ण- (५५६), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१६)

जळगाव: बाधित रुग्ण- (६०३०), बरे झालेले रुग्ण- (३५०८), मृत्यू- (३५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१६९)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (२७९), बरे झालेले रुग्ण- (१४९), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९)

धुळे: बाधित रुग्ण- (१५२३), बरे झालेले रुग्ण- (८६०), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८३)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (८४३२), बरे झालेले रुग्ण- (४३०४), मृत्यू- (३४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७८७)

जालना: बाधित रुग्ण- (१०८३), बरे झालेले रुग्ण- (५७१), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६५)

बीड: बाधित रुग्ण- (२३५), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (११२)

लातूर: बाधित रुग्ण- (७१९), बरे झालेले रुग्ण- (३३६), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४८)

परभणी: बाधित रुग्ण- (२१४), बरे झालेले रुग्ण- (१०३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०६)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३४२), बरे झालेले रुग्ण- (२७९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१)

नांदेड: बाधित रुग्ण- (६०६), बरे झालेले रुग्ण (२५२), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३०)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३९५), बरे झालेले रुग्ण- (२४६), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३२)

अमरावती: बाधित रुग्ण- (८५८), बरे झालेले रुग्ण- (६४०), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८१)

अकोला: बाधित रुग्ण- (१८७६), बरे झालेले रुग्ण- (१४९८), मृत्यू- (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८३)

वाशिम: बाधित रुग्ण- (१९५), बरे झालेले रुग्ण- (१०६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (४११), बरे झालेले रुग्ण- (२१६), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७९)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (४४८), बरे झालेले रुग्ण- (२९१), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४३)

नागपूर: बाधित रुग्ण- (२०३४), बरे झालेले रुग्ण- (१३८७), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२५)

वर्धा: बाधित रुग्ण- (३४), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८)

भंडारा: बाधित रुग्ण- (१६२), बरे झालेले रुग्ण- (८९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२१६), बरे झालेले रुग्ण- (१५६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१७७), बरे झालेले रुग्ण- (९८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (११५), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (२०२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७१)

एकूण: बाधित रुग्ण-(२,६०,९२४), बरे झालेले रुग्ण-(१,४४,५०७), मृत्यू- (१०,४८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९८),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,०५,६३७)