Saturday, October 8, 2016

गुणवत्तापूर्ण बिस्किटे हीच ठरली ओळख...

हेर्ले (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील पद्मश्री सचिन तेरदाळे यांनी डिसेंबर २०१४ मध्ये सुरवातीला छोट्या प्रमाण घरगुती स्तरावर बिस्किटे तयार करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. वर्षभरात या व्यवसायाने चांगली गती घेतली. आज त्यांनी स्वतःचे बिस्कीट विक्रीचे दुकान सुरू केले आहे. 

राजेंद्र घोरपडे 

घरातील दैनंदिन काम संपल्यानंतर उर्वरित वेळेत घरगुती स्तरावर लहानसा प्रक्रिया उद्योग सुरू करावा, असे महिलांना वाटते. हेर्ले (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील पद्मश्री तेरदाळे यांचीही अशीच इच्छा होती. पद्मश्री यांच्या काकांचा एरंडोली(जि. सांगली) या गावी घरगुती बिस्किटे तयार करण्याचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय पाहिल्यानंतर पद्मश्री यांनाही बिस्किटेनिर्मिती करण्याचे ठरवले. डिसेंबर २०१४ मध्ये त्यांनी एक किलो क्षमतेचा ओव्हन खरेदी करून गावामध्येच बिस्किटे तयार करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरवातीला गावातील लोकांकडून बिस्किटे तयार करण्याबाबतची मागणी असायची. एका किलोसाठी पन्नास रुपये या मजुरी दराने त्या बिस्किटे करून देतात. बिस्किटासाठी लागणारे सर्व साहित्य ग्राहकांकडून घेऊन त्यांना लागेल, त्या पद्धतीची बिस्किटे त्या तयार करून देतात. एक किलो बिस्किटे तयार करण्यासाठी डिझेल, वीज आणि बेकिंगचे साहित्य असा सरासरी २० रुपये इतका खर्च येतो. व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांना गावातील नागरिकांच्याकडून दररोज चार ते पाच किलो बिस्किटांची मागणी मिळू लागली. यातून खर्च वजा जाता त्यांना रोजचे १०० ते १५० रुपये मिळायचे. गावातील मागणीच्या व्यतिरिक्त पद्मश्री यांनी स्वतःही बिस्किटे तयार करून छोट्या प्रमाणात विक्री सुरू केली. गहू, नाचणी बिस्किटे, नारळ, गव्हाची नानकटाई, नमकिन बिस्किटे, कमी साखरेची बिस्किटे, नाचणी आणि गहू मिश्रीत बिस्किटे अशी विविध प्रकारची उत्पादने त्यांनी विकण्यास सुरवात केली.

‘स्वयंसिद्धा’ने दिली दिशा 
कोल्हापुरातील ‘स्वयंसिद्धा’ या संस्थेतून पद्मश्री तेरदाळे यांना बिस्किटे निर्मिती व्यवसायाबाबत पूरक मार्गदर्शन मिळाले. या संस्थेतर्फे दर बुधवारी कोल्हापुरात महिला व बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूच्या विक्रीसाठी दुपारी बारा ते तीन या वेळेत बाजार भरविण्यात येतो. तेथे पद्मश्री यांनी बिस्किटांची विक्री सुरू केली. या बाजारानंतर महिलांना संस्थेतर्फे विविध विषयांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येते. वाणीमुक्ती कार्यशाळेतून कसे बोलायचे, व्यवसाय कसा करायचा, विक्रीसाठी कशाची आवश्‍यकता आहे, याची माहिती महिलांना देण्यात येते. यातून पद्मश्री यांना प्रेरणा मिळाली. स्वयंसिद्धा संस्था अनेक ठिकाणी महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन भरविते. या माध्यमातूनही पद्मश्री यांनी बिस्किटांची विक्री वाढविली.

महिलांना रोजगाराची संधी ः 
पद्मश्री सध्या दररोज ३० किलो गव्हापासून सुमारे ६० किलो बिस्किटांची निर्मिती करतात. त्या स्वतः दररोज बिस्किटे निर्मिती करतात, त्याच बरोबरीने त्यांनी गावातील सात महिलांना रोजगाराची संधी दिली आहे. कधी बिस्किटांच्या निर्मितीचे काम जास्त असते, कधी कमी असते. सहकारी महिलांना त्या तासाला १२ रुपये इतकी हजेरी देतात. दिवसाला पाच ते आठ तासांचे काम या महिलांना मिळते.

कार्यशाळेत मार्गदर्शन ः 
स्वयंसिद्धा संस्थेमार्फत सांगोला (जि. सोलापूर) येथे आयोजित कार्यशाळेत पद्मश्री तेरदाळे यांनी बिस्किटेनिर्मिती व्यवसायाबद्दल महिलांना मार्गदर्शन केले. तेथे त्यांनी बिस्किटांची विक्रीही केली. त्यांच्या उच्च प्रतिच्या बिस्किटांचे कौतुक तर झालेच या व्यतिरिक्त त्यांना येथून दरमहा सहा किलो बिस्किटांची कायमची मागणी मिळाली.

कुटुंबाचे मिळाले सहकार्य ः 
पद्मश्री यांचे पती सचिन हे बिस्किटांच्या विक्री व्यवस्थेसाठी मदत करतात. बिस्किटे निर्मितीसाठी महिन्याला २०० किलो गहू, २५ किलो घरगुती साजूक तूप, ४० किलो लोणी आणि ७० लिटर डिझेल लागते. लोणी हे नृसिंहवाडी, कवठेपिरण आदी गावांतील शेतकऱ्यांकडून खरेदी केले जाते. पद्मश्री यांच्या सासू चंपाबाई या दळण, कांडपापासून ते मालाच्या खरेदी-विक्रीसह कामगारांच्यावर देखरेख ठेवतात. छोट्या गावात हिमतीने घरगुती बिस्किटे निर्मितीचा उद्योग सुरू केल्याबद्दल स्वयंसिद्धा संस्थेने पद्मश्री यांना सौ. मंदा देवेंद्र आचार्य पुरस्कार देऊन गौरविले आहे.

गुणवत्तेमुळे व्यवसायवृद्धी ः 
तेरदाळे यांनी बिस्किटाचे उत्पादन करताना अधिक नफ्यापेक्षा गुणवत्ता हाच निकष ठेवला. बिस्किटे निर्मितीसाठी चांगल्या दर्जाचे घटक त्या वापरतात. विशेषतः लोणी, तूप, दूध हे घरगुतीच वापरले जाते. चांगल्या गुणवत्तेमुळे दरमहा बिस्किटांची मागणी वाढत आहे.

मोठ्या क्षमतेच्या यंत्रांची खरेदी ः 
तेरदाळे यांना वाढत्या बिस्किटांच्या मागणीमुळे एक किलो क्षमतेचा ओव्हन वापरावर मर्यादा आल्या. पीठ मळण्यासाठी मोठ्या यंत्राची गरज वाटू लागले. लहान यंत्रामुळे काम वेळेत होण्यास अडचणी येत होत्या. हे टाळण्यासाठी पद्मश्री यांनी पीठ मळण्यासाठी एक लाख रुपये किमतीचे मिक्‍सिंग मशिन आणि तीन लाख रुपये किमतीचे चार किलो क्षमतेचा ओव्हन खरेदी केला.

बिस्किट विक्रीसाठी शॉपी ः 
तेरदाळे यांनी बिस्कीट विक्रीसाठी कोल्हापुरातील राजारामपूरीमध्ये शॉपी सुरू केली. येथे दररोज बिस्किटांच्या विक्रीतून सरासरी तीन हजार रुपये मिळतात. या व्यतिरिक्त बाहुबली, कुंथगिरी, सोलापूर, पुणे येथेही विक्रीसाठी बिस्किटे त्या पाठवितात.

परदेशातूनही मागणी 
ऑस्ट्रेलिया, अमेरिका येथे जाणाऱ्या कोल्हापुरातील व्यक्तींकडून वर्षातून तीन ते चार वेळा बिस्किटांची मागणी होते. साजूक तुपातील एक किलो बिस्किटे विक्रीचा दर २५० रुपये आहे, तर परदेशात बिस्किटे पाठविण्याचा कुरिअरचा खर्च ८१० रुपये प्रति किलो इतका आहे. मात्र गुणवत्ता आणि चव यामुळे परदेशातूनही मागणी असल्याचे पद्मश्री सांगतात.

संपर्क ः पद्मश्री तेरदाळे ः ८४२१४८२८४४

Monday, October 3, 2016

व्यक्तीमत्व विकास....

व्यक्तीमत्व वागण्यातून दिसते. तुम्ही किती उद्धट आहात हे आपल्या कृतीतून दिसून येते. त्यासाठी दुसऱ्याने सांगण्याची गरज नाही.
काही दिवसापूर्वी मी असाच एक व्हिडिओ पाहीला. त्यामध्ये अमेरिका व प्रान्सच्या विचारसरणीत कसा फरक आहे. ते दाखवले होते. हे बोलके चित्र खूप काही सांगून जाते. यातून बरेच काही घेण्यासारखे आहे. अमेरिकेत जादा झालेला शेतमाल समुद्रात फेकून दिला जातो. इतकेच नव्हेतर स्टोअर किंवा माँलमध्ये विक्री न झालेले माल भंगारात काढण्यात येतो. तोही कचऱ्यात टाकून दिला जातो. तेथे श्रीमंती आहे. मालाची किंमत नाही. पण यातून अमेरिकेची विचारसरणी कशी आहे याचाही प्रत्यय आपणास येतो. त्याच्या विचारात माणूसकी नाही. याचेही दर्शन होते. पण या ऊलट फ्रान्समध्ये मात्र जास्त झालेला शेतमाल गरजूंना वाटला जातो. स्टोअर किंवा माँलमध्ये जास्त दिवस न विकलेला मालही गरजूंना मोफत वाटला जातो. यातून त्या देशात श्रीमंती कमी आहे असे वाटते. तेथे काही गरजू आहेत. असेही दिसते पण त्याच बरोबर त्यांच्या विचारात माणूसकी आहे. वस्तू टाकावू झाली तरी तिचा योग्य वापर करता येऊ शकतो. एखाद्या गरजूचे पोट त्यातून भरु शकते हा विचार आहे.
हा फरक आहे या दोन देशातला. भारताने यावर जरूर विचार करावा. कोणाशी कसे वागायचे कोणा कडून काय घ्यायला हवे याचाही विचार करायला हवा. परराष्ट्र धोरण ठरविताना हा विचार जरुर विचारात घ्यायला हवा. कदाचित हा एखाद्या देशाबाबत केलेला अपप्रचारही असेल पण यातून शिकण्यासारखे निश्चितच आहे. हे ही विचारात घ्यायला हवे. या दोन्ही देशांशी आपण व्यवहार करताना हा विचार जरुर विचारात ठेवायला हवा.
आपणाकडेही शेतकरी मालाला भाव नाही म्हणून शेतमाल फेकून देतो. त्याने तसे न करता गरजू व्यक्तींना तो वाटला तर त्याला पुण्य मिळेल. मालाला दर मिळाला नाही म्हणून नुकसान झाले खरे पण एखाद्या गरजूचे पोट तरी भरले हे पुण्य पदरात पडले. असा विचार करून जर त्याने व्यवहार केला तर तो नुकसानीने हताश, निराश न होता पुण्याच्या शिदोरीने तो आत्महत्येच्या विचारापासून दूर जाऊ शकतो. हे ही विचारात घ्यायला हरकत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी असा माणसिक आधार त्याला द्यायला हवा. पुण्याचा विचार माणसामध्ये सद्विचार आणतो. सद्संगतीने धैर्य येते. दुष्ट विचारांना आळा बसतो. चुकीच्या मार्गाचा स्वीकार होत नाही. यासाठी नेहमी पुण्य कसे पदरता पाडता येईल याचा विचार करायला हवा. यातून आपले जीवन समृद्ध करायला शिकले पाहिजे.