Saturday, March 9, 2019

तीर्थ




तीर्थक्षेत्रास इतके महत्त्व का? हे जाणून घ्यायला हवे. मनातील दुष्ट दूर होऊन चांगला विचार-आचार करण्याचा संकल्प येथे केला जातो. तीर्थाच्या पावित्र्याने आपणही पवित्र व्हायचे असते. त्या शुद्धीत मनसोक्त डुंबायचे असते. मनाच्या शुद्धीने प्रसन्न व्हायचे असते. भक्तीने आत्मज्ञानी होण्यासाठीच येथे जायचे असते.

आणि तीर्थे धौतें तटें । तपोवनें चोखटें ।
आवडती कपाटें । वसवूं जया ।। 611 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - आणि तीर्थे, नदी व समुद्र यांचे पवित्र किनारे, तप करण्याच्या शुद्ध जागा आणि गुहा ह्या ठिकाणी ज्यास राहावयास आवडते.

तीर्थ म्हणजे पवित्र पाणी, तीर्थ म्हणजे पवित्र ठिकाण. भगवंताची, सद्‌गुरूंची वस्ती जेथे आहे असे ठिकाण म्हणजे तीर्थ. पण या तीर्थस्थानांची यात्रा का करावी? या वास्तू पवित्र आहेत. तेथे गेल्यानंतर मनाची शुद्धता होते. मनामध्ये शुद्ध विचारांचा प्रवाह सुरू होतो. एखाद्या ऐतिहासिक गडावर गेल्यानंतर त्याचा इतिहास आठवताच अंगावर रोमांच उभे राहते. त्या वास्तूशी निगडित इतिहासाने तेथील वातावरणाची निर्मिती होते. मन त्या वातावरणात मिसळते. अंगामध्ये ते गुण जागृत होतात. त्या पराक्रमांनी मनाला स्फुर्ती चढते. उत्साह वाढतो. धैर्य वाढते. अशा वातावरणात पराक्रमांचा पोवाडा ऐकायला मिळाले तर, अंगातील रक्त उसळते. त्याच्यात नवचैतन्य उत्पन्न होते. फक्त आपण कोणत्या विचारांनी आपण गडावर गेलो आहोत यालाही महत्त्व आहे. देवदर्शनाला जातानाही विचार कोणता आहे, याला महत्त्व आहे. दैनंदिन जीवनापेक्षा थोड्या वेगळ्या वातावरणात गेल्यावर मनाचा थकवा दूर होतो. मनाला विश्रांती मिळते. प्रसन्नता वाटते. हे खरे आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यावर हा बदल घडणार हे नैसर्गिक आहे. मग तीर्थक्षेत्रांचाच हट्ट का? त्याऐवजी गडावर गेले तर चालणार नाही का? काही नास्तिक हा प्रश्‍न जरूर विचारू शकतात? कारण आजकाल बऱ्याचशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी श्रद्धेपेक्षा लूटच सुरू आहे. श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दर्शनाच्या रांगेत पाकीट चोरही वाढले आहेत. वाढत्या महागाईचा हा परिणाम आहे. पण पूर्वीच्या काळीही ही लूट सुरूच होती. सध्याच हे घडते असेही नाही. अशा घटनांनी त्या तीर्थक्षेत्राचे महत्त्व बाधित होत नाही. आपण लुटले जाणार नाही, फसणार नाही, इतरांना लुबाडणार नाही अशी मानसिकता ठेवली तर आपण निश्‍चितच या विचारापासून दूर राहू. देवाचे दर्शन महत्त्वाचे आहे. मग पैसे देऊन झटपट दर्शनाचा का मोह धरावा. देवाच्या इच्छेनुसार दर्शन भेटते, तर मग पैसे देऊन दर्शनाची घाई कशाला? देवाला दर्शन द्यायचे असेल, तर तो जरूर देतो. श्रद्धा ठेवायला हवी. मनाची प्रसन्नता वाढविण्यासाठी आपण हे करत आहोत. हा विचार ठेवायला हवा. सुख, समाधानासाठी आपण तीर्थक्षेत्री जात आहोत. नाहीतर मग गडावर जाऊनही मन प्रसन्न होतेच ना? ऊर्जा मिळतेच ना? तीर्थक्षेत्रास इतके महत्त्व का? हे जाणून घ्यायला हवे. मनातील दुष्ट दूर होऊन चांगला विचार-आचार करण्याचा संकल्प येथे केला जातो. तीर्थाच्या पावित्र्याने आपणही पवित्र व्हायचे असते. त्या शुद्धीत मनसोक्त डुंबायचे असते. मनाच्या शुद्धीने प्रसन्न व्हायचे असते. भक्तीने आत्मज्ञानी होण्यासाठीच येथे जायचे असते.

No comments:

Post a Comment