Monday, March 11, 2019

यशवंतराव चव्हाण




12 मार्च आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त भावना पाटोळे यांनी लिहिलेल्या त्यांच्यावरील पुस्तकाचा परिचय थोडक्यात....

भावना पाटोळे यांनी पारंपारिक मांडणी पलीकडे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या बहुविध पैलूंना अधोरेखित करत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला परिश्रमपूर्वक नव्याने समजून घेण्याच्या ध्यासातून हे चरित्र निर्माण केले आहे.  

आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण आणि त्यातील लोकत्तर नेत्यांचे योगदान यातील त्या तज्ञ असल्याने या पुस्तकात त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या चरित्रातील अनेक पैलू उलघडून सांगितले आहेत. पहिल्या प्रकरणात यशवंतराव चव्हाण यांची जडणघडण कशी झाली हे सांगितले आहे. छोटी छोटी उदाहरणे देऊन यशवंतरावांच्यावर आईने कसे संस्कार केले  हे खूप सुंदररित्या सांगितले आहे. सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळींचा यशवंतरावांवर कसा प्रभाव पडला त्यांचा शैक्षणिक प्रवास, त्यांचा राष्ट्रीय चळवळीतील सहभाग, गांधीवाद समाजवाद, रॉय वाद मार्क्स वाद यांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव हे सांगितले आहे. यातून यशवंतरावांची वैचारिकता बहुपदरी होती हे सांगायलाही लेखिका विसरली नाही. 

राजकीय नेतृत्व उभारणी व विकास यावर आधारित दुसरे प्रकरण आहे. यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचे दलिता संबंधीचे धोरण, औद्योगिकीकरण, कृषी विषयक सुधारणा, सामाजिक आर्थिक विकास, सहकारी चळवळ याचा आढावा घेतला आहे.

श्री शिवछत्रपतींना मुजरा करून यशवंतरावांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीची घोषणा केली. नव्या राज्याकडे पाहण्याचा यशवंतराव चव्हाण यांचा दृष्टिकोन कसा होता? महाराष्ट्राचे नेतृत्व त्यांनी कसे केले? कृषी औद्योगिक विकासावर आधारित नवी अर्थरचना, महाराष्ट्रातील दलित व पुढारलेल्या समाजातील मानसिक दुरावा दूर करून सामाजिक एकतेची नवी वाटचाल, शतकानुशतके एकमेकापासून वेगळे असलेल्या विभागांना एकात्मतेचा अनुभव असे कार्यक्रम यशवंतरावांनी कसे राबवले हे राबवताना त्यांना आलेल्या अडचणी व त्यावर मात करण्यासाठी राबवलेली नवी धोरणे यावर संयुक्त महाराष्ट्राचे नेतृत्व - स्वप्न व साध्य या तिसऱ्या प्रकरणात लेखकांने प्रकाश टाकला आहे.

यशवंतराव चव्हाण यांची राजधानी दिल्लीतील वाटचाल व तेथील राजकीय प्रवास यावर स्वतंत्र दोन प्रकरणे या पुस्तकात देण्यात आली आहेत. आधुनिक महाराष्ट्राच्या जडण घडणीतील सांस्कृतिक क्षेत्रातील विकासाचे स्थान लक्षात घेतानाच येथील सूक्ष्म घडामोडीकडे ही डोळसपणे पाहणारे यशवंतराव त्यांचे व्यक्तिमत्व होते. ग्रंथाचा व्यासंग जपणे, साहित्यिकांना प्रोत्साहन देणे, कलावंताच्या कलेला दाद देणे या सर्वातूनच त्यांचे समृद्ध व्यक्तिमत्त्व झळकले. महाराष्ट्र भूमीच्या सांस्कृतिक उन्नतीकरिता त्यांनी अथक परिश्रम केले. असे त्यांचे सांस्कृतिक वैभव, मुले व विचारधन यावर या पुस्तकात स्वतंत्र प्रकरण देण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण यांचा संक्षिप्त कालपट ही या पुस्तकात मांडण्यात आला आहे. एकंदरीत यशवंतराव चव्हाण यांचे कार्य, कौशल्ये, व्यक्तिमत्व, विचार यांची अभ्यासपूर्ण मांडणी या पुस्तकात करण्यात आली आहे. 

पुस्तकाचे नाव - यशवंतराव चव्हाण
लेखिका - भावना पाटोळे
प्रकाशक - नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया
पृष्ठे - 221, किंमत - 225 रुपये


No comments:

Post a Comment