Friday, November 30, 2018

गुरुसेवा



आघवियांची दैवां । जन्मभूमि हे सेवा ।
जे ब्रह्म करी जीवा । शोच्यातें ।। 369 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - ही गुरुसेवा सर्व भाग्यांची उत्पन्न होण्याची जमीन आहे व जी सेवा शोकग्रस्त जीवाला ब्रह्म करते.

गुरुसेवा ही एक सुपीक जमीन आहे. या जमिनीत कोणतेही पीक उत्तम उत्पन्न देऊ शकते. अशा या सेवेने शोकग्रस्त जीवही ब्रह्मसंपन्न होतो. इतकी ही पवित्र, पावन करणारी, आयुष्य समृद्ध करणारी अशी सेवा आहे. पण गुरुसेवा म्हणजे नेमके काय ? सेवा म्हणजे शोषण नव्हे. सेवा हा मनाचा भाव आहे. मनानेही गुरूंची सेवा करता येते. या सेवेला मानसपूजा असेही म्हटले जाते. मानसपूजा ही सर्वांत श्रेष्ठ सेवा असली, तरी ती एक कठीण पूजा आहे. कारण आपले मन कधीही एकाजागी स्थिर नसते. सतत कोणते ना कोणते तरी विचार मनात घोळत असतात. मनाला स्थिर करणे हे आपल्याच हातात आहे. आपण साधनेला बसलेले असतो. सुरवातीची एक दोन मिनिटे सो ऽ हम वर लक्ष केंद्रित असते. त्यानंतर मात्र आपण सो ऽ हमचा जप करत असतो, पण मन मात्र तेथे नसते. सो ऽ हमचा जप तर अखंड सुरूच असतो. श्‍वास आत घेणे आणि बाहेर सोडणे म्हणजेच सो ऽ हम. ही श्‍वासाची क्रिया थांबतच नाही. ती थांबली की आपले जीवन संपते. मग सो ऽ हम साधना तर अखंड सुरू असते. फक्त आपले लक्ष त्याकडे नसते. त्यावर लक्ष ठेवणे हीच साधना आहे. हीच गुरुसेवा आहे. ही सेवा आपण केव्हाही करू शकतो. केव्हाही आपण आपले मन त्यावर केंद्रित करू शकतो. पण ते स्थिर राहात नाही. ही सेवा करण्याचे भाग्य आपणास लाभले तर आहे, पण आपण ती करत नाही. किंवा आपणाकडून ती घडत नाही. सध्याचे जीवन अधिकच गतीमान झाले आहे. पण या गतीमान जीवनात आपण काय करत आहोत. याचे भानही आपण ठेवत नाही. आवश्‍यक नसलेल्या गोष्टीत आपला वेळ वाया जात आहे. महत्त्वाचे म्हणजे आपला वेळ फुकट जावा यासाठी अनेक साधने आपल्याकडे उपलब्ध होत आहेत. माणसांची मने त्यात गुंतली जावीत यासाठी हे उपाय केले जात आहेत. यातून दुसरे मोठा नफाही कमवत आहेत. आपण मात्र त्यात गुंतलो जात आहोत. मग आपण आपले मन साधनेत का गुंतवत नाही. त्याचा फायदा हा आपणालाच होतो. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. काही वेळेला आपणास हे जमत नाही म्हणूनही या सेवेकडे दुर्लक्ष करतो. सेवेच्या क्षेत्रानेच सध्या जगाला तारले आहे. जगाची भरभराट केली आहे. संपन्नता आणली आहे. गुरुसेवाही अशीच सेवा आहे. या सेवेनेही आपले जीवन संपन्न होऊ शकते. आपण ब्रह्म संपन्न होऊ शकतो. नराचा नारायण करण्याचे सामर्थ या सेवेत आहे. अशी ही सेवा अखंड घडावी यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.


स्थिरबुद्धी



अर्जुना तयाच्या ठायीं । कामक्रोधु सहजें नाहीं ।
आणि भयातें नेणें कहीं । परिपूर्ण तो ।। 295 ।। अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ - अर्जुना, त्याच्या ठिकाणी स्वभावतःच कामक्रोध नसतात आणि त्याला भय हें केव्हांच माहीत नसते असा तो परिपूर्ण होय.

मन चंचल आहे. या चंचल मनाला स्थिर कसे करायचे? क्षणाक्षणाला वेगवेगळे विचार मनात सातत्याने घोळत असतात. लहानपणी नवनव्या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असते. सातत्याने नवनव्या विचारात मन गुंतत असते. यातूनच तर खऱ्या अर्थाने बुद्धीचा विकास होतो. पण वय वाढेल तसे या विचारांना फाटे फुटू लागतात. लहान वयात निरपेक्ष बुद्धीने कर्मे केली जातात. लाभालाभ मनामध्ये नसतो. पण वय वाढेल तसे लोभी, स्वार्थीवृत्ती ही त्याला स्पर्श करु लागते. आपलेपणा येतो. हे माझे, हे माझे हा विचार सुरू होतो. या विचारांवर नियंत्रण मिळावे, यासाठीच संस्काराची जोड द्यावी लागते. अन्यथा हा हव्यास वाढत जाऊन मुलांना वाईट सवयी लागतात. हे घडायचे नसेल, तर बालमनावरच संस्काराची गरज आहे. त्याच्या विचारांना सुसंस्काराची जोड द्यावी लागते. तरच त्याला चांगल्या सवयी लागून त्याची बुद्धी स्थिर राहाते. अध्यात्माचेही असेच आहे. सुरवातीला हे काय शास्त्र आहे याची उत्सुकता असते. यातून याचा अभ्यास होतो. पण हे शास्त्र जाणून घेताना योग्य मार्गदर्शन न झाल्यास व्यक्ती अंधश्रद्धेमध्ये गुरफटण्याची शक्‍यता अधिक असते. तंत्रमंत्राच्या या दुनियेत कर्मकांडाकडेही ओढा वाढण्याची शक्‍यता असते. योगाच्या आहारी जाऊन दुःख ओढवून घेण्याचाही धोका अधिक असतो. यासाठी मन स्थिर ठेवून याचा अभ्यास करायला हवा. तसे आचरण ठेवायला हवे. आत्मज्ञानाच्या हव्यासाने वेगळीच शिकवण दिली जाऊ शकते. वेगळेच मार्ग अवलंबले जाऊ शकतात. यातूनच मग वादविवाद, युद्धे सुरू होतात. धर्म हा शांतता प्रिय आहे. हा विचारही मग मनाला पटत नाही. हिंसेतून धर्माचे रक्षण कधीच होत नाही. भरकटलेली मने मग जगाला अशांत करतात. अभ्यास नसल्याने चुकीच्या मार्ग स्वीकारला गेल्याने हे कृत्य होते. यासाठी स्थिर मनाने, स्थिर बुद्धीने याचा अभ्यास करायला हवा. पण ही स्थिरता येते कशी हे समजून घ्यायला हवे. काम आणि क्रोधाच्या त्यागाने मनाला स्थिर करता येते. कितीही दुःखे आली तरी त्याचे मन विचलित होत नाही. त्याला कशाचीही भीती मनामध्ये नसते. भीतीने तो कधी गांगरून जात नाही. नेहमी सकारात्मक विचार ठेवून त्याची वाटचाल सुरू असते. अपयशाने खचून न जाता यशाची आशा ठेवून त्याची वाटचाल सुरू असते. अपयशातील चुका शोधून तो यशस्वी होण्याचा विचार सातत्याने करत असतो. पण त्याला यश मिळाले तर त्यात तो अडकून राहात नाही. अशी व्यक्ती स्थिरबुद्धीची असते.


Wednesday, November 28, 2018

स्वभाव



अरिमित्रीं तैसा । अर्जुना जया भावो ऐसा ।
सरिसा । होतु जाय ।। 201 ।। अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ - अर्जुना, त्याप्रमाणे शत्रुमित्रांच्या ठिकाणी ज्याचा असा भाव आहे व ज्याच्या मनाची स्थिती मानाच्या व अपमानाच्या वेळी सारखीच राहाते.

साधनेसाठी मनाची शांती गरजेची आहे. ती मिळवायची कशी? त्यासाठी आपले आचरण कसे असायला हवे? नेमके आपण काय करायला हवे? याबाबत अनेक उदाहरणे देऊन संत ज्ञानेश्‍वरांनी मार्गदर्शन केले आहे. आपल्या स्वभावात कसा व कोणता बदल करायला हवा याचाही विचार त्यांनी सांगितला आहे. दिवा प्रकाश देताना आपला परका हा भेदभाव मानत नाही. तो सर्वांना सारखाच प्रकाश देतो. उसाची गोडी चरक्‍यात घालून रस काढणाऱ्यासाठी व लागवड करणाऱ्या शेतकऱ्यासाठी जशी सारखीच असते. तसा आपला स्वभावही सर्वांच्या ठिकाणी सारखाच असावा. हा शत्रू हा मित्र असा भेदभाव नसावा. शत्रूच्या मनातील शत्रुत्व दूर करण्यासाठी आपला प्रयत्न असायला हवा. हा बदल आपण करू शकलो तर आपण आपल्या मनाची स्थिरता सहज हस्तगत करू शकू. मान मिळाला म्हणून हरखून जायचे नाही. किंवा अपमान झाला म्हणून दुःख करत बसायचे नाही. जे काही घडले त्याचा मनावर कोणताही परिणाम होऊ द्यायचा नाही. मान आणि अपमानाच्या दोन्ही प्रसंगात आपल्या मनाचा तोल ढळता कामा नये. असे केले तरच मनाची स्थिरता आपण टिकवू शकू. तसे वागण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. सध्या बदलत्या युगात असे वागणे अशक्‍य वाटते. मित्रापेक्षा शत्रूच अधिक आहेत. या जगामध्ये अशा स्वभावाचा फायदा घेणारेच अनेकजण आहेत. फसवणारे ठग आता जागोजागी पाहायला मिळतात. अशा या ठगांच्या जगात वावरताना आपली फसवणूक होणार. पण आपण फसायचे नाही तर स्वभाव धर्माशी लढायचे हाच विचार घेऊन, तसे आचरण ठेवून प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. खंभीर मनाने परिस्थितीशी सामना करायचा. अशा आचरणाने आपली सहनशीलता वाढून अनेक गोष्टीवर आपण मात करू शकू. अशा आपल्या व्यवहाराने आपल्या आसपासचे मित्रांमध्येही फरक पडू शकतो. आपल्या अशा वागण्याने त्यांच्यातही बदल घडू शकतो. त्यामुळे आपणास होणारा त्रास कमी होऊ शकतो. अन्याय सहन करण्याची ताकद आपल्यात असेल तर अन्याय करणाराही थकून जाऊ शकतो. मानसाचा स्वभाव बदलण्यासाठी स्वतःमध्ये तसा बदल करावा लागतो. हा बदल करता आला तर आपण मनावर विजय मिळवू शकू. ज्याला मन स्थिरता साधता आली त्याला आत्मज्ञानाची वाट सुकर झाली. यासाठी आपला स्वभाव हा बदलायला हवा. आपण बदललो की समोरचाही आपोआप बदलतो. मग वातावरणही आपोआप बदलते.

Tuesday, November 27, 2018

अभ्यासयोगु



अगा अभ्यासयोगु म्हणिजे । तो हा एकु जाणिजे ।
येणें कांही न निपजे । ऐसें नाहीं ।। 110 ।। अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ - अरे, अभ्यासयोग जो म्हणतात, तो हाच एक आहे, असे समज. याच्या योगाने कोणतीही गोष्ट प्राप्त होणार नाही, असे नाही.

वाघ, सिंह हे हिंस्र प्राणी आहेत. त्यांच्याजवळ जाणेही धोकादायक असते. पण त्यांचा अभ्यास करून त्यांच्यावर नियंत्रण मिळवता येते. त्यांनाही आपल्या ताब्यात ठेवता येते. अभ्यासाने प्राणीही माणसाळू होऊ शकतात. सापालाही गारुडी ताब्यात ठेवतात. पुंगीच्या तालावर नाचवतात. इतका मोठा बदल हिंस्र प्राण्यांमध्ये होऊ शकतो. मग अध्यात्माचा अभ्यास केला तर आत्मज्ञानी का होता येणार नाही? नकारात्मक विचार केला तर प्रगती होणारच नाही. सकारात्मक विचार नेहमी करायला हवेत. फक्त अभ्यास योग्य पद्धतीने करायला हवा. तरच यात यश मिळू शकेल. आपणास हे का जमत नाही. यावर विचार करायला हवा. प्रश्‍नांची उत्तरे शोधायची सवय लावायला हवी. इतकी मोठी मजल आपणास मारता येणे शक्‍य नाही असा नकारात्मक विचार करून आपण कधीच प्रगती करू शकणार नाही. अभ्यास केला तर परीक्षेत यश निश्‍चित मिळते. अभ्यास न करता यशाची मोठी स्वप्ने पाहणे म्हणजे नैराश्‍य ओढवून घेण्यासारखे आहे. हे जमणार नाही. यापेक्षा हे मला का करता येणार नाही असा विचार करायला हवा. स्पर्धा ही नेहमीच असते. पण येथे स्पर्धा स्वतःशीच आहे. स्वतःची स्पर्धा स्वतःशी केल्यास अपयश कधीच येत नाही. साधनेचा अभ्यास केल्यास आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. साधनेत हळूहळू प्रगती होत राहाते. एकदम काहीच घडत नाही. उन्हाळा सुरू झाला की नदी आटते. झऱ्याचे पाणी आटते पण ही क्रिया पटकन होत नाही. जसा उन्हाचा ताण वाढेल, तसे हळूहळू पाणी कमी होत जाते. तसे यशही एकदम हस्तगत होत नाही. हळूहळू अभ्यासाचा जोर जसा वाढेल तसे यश टप्प्यात येते. साधना म्हणजे काय? सोऽहम म्हणजे काय? हे जाणून घ्यायला हवे. सोऽहम हा स्वर आहे. तो स्वर कसा ऐकता येतो याचा अभ्यास करायला हवा. आपला स्वर आपणच ऐकायला शिकले पाहिजे. ही क्रिया सुरवातीला अवघड वाटते. पण हळूहळू त्याची सवय होते. अभ्यासाने यावर यश मिळवता येते. स्वर कसा ऐकायचा? येणारे अडथळे कसे दूर करायचे? हळूहळू त्यावर कसे नियंत्रण साधायचे याचा अभ्यास केल्यास उत्तरे आपोआप मिळत जातात. विष कसे पचवायचे याचा अभ्यास केला तर विष सुद्धा पचवता येणे शक्‍य आहे. मग सोऽहम चा आपला स्वर आपणच कसा ऐकायचा याचा अभ्यास करून तो ऐकायला हवा. त्यात रममाण व्हायला हवे. तरच आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग सुकर होईल.


Monday, November 26, 2018

मनाच्या कानीं ऐकावें



परी तें मनाच्या कानीं ऐकावें । बोल बुद्धीच्या डोळां देखावें ।
हे सांटोवाटीं घ्यावें । चित्ताचिया ।। 494 ।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - बोल मनाच्या कानानें ऐकले पाहिजे. माझें शब्द बुद्धीच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजेत. हे माझे शब्द चित्त देऊन त्याच्या मोबदला घेतला पाहिजेत

साधना म्हणजे काय? जप जपायचा म्हणजे काय? त्याने काय होते ? साधना कशी करायची? हजारो माळा जप केला तरी फळ मिळत नाही. जपामध्ये दिवस रात्र स्वतःला गुंतवले पण तरीही काहीही लाभले नाही. मग जप का करायचा? जप करणे म्हणजे वेळ फुकट घालवण्याचा प्रकार आहे. हे व असे अनेक प्रश्‍न साधकांना पडतात. अशाची उत्तरे मिळत नाहीत. पण आपण श्रद्धेपोटी साधना करत राहातो. जप जपत राहातो. देवधर्म करत राहातो. तीन-चार तास रांगेत राहून देव दर्शनाचा लाभ मिळावा अशी आशा करत राहातो. गाभाऱ्यात जाऊन देव दर्शन मिळावे, अशी आशा धरतो. यावर आंदोलनेही करतो. पण तरीही आपणास देव भेटल्याचे समाधान मिळत नाही. अशी अवस्था आपली होते. नुसते तोंडात जप म्हणायचे आणि मन मात्र इतरत्र गुंतवायचे म्हणजे साधना नाही. मनातील विचार थांबायला हवेत. जपावर ध्यान केंद्रित व्हायला हवे. लाभ मिळेल की नाही याचा विचार येथे करायचा नसतो. लोभाने मनाचे समाधान ढळते. हे लक्षात घ्यायला हवे. भक्तीमध्ये जे मिळेल त्यावर तृप्त व्हायचे असते, समाधानी व्हायचे असते. तरच भक्तीची गोडी वाढते. देवाचे दर्शन झाले नाही. शिखराचे दर्शन तरी घेऊन समाधानी व्हायचे असते. आपल्याकडे तशी परंपरा आहे. गर्दीमुळे देवळात जाता आले नाही तर शिखराचे दर्शन घेऊन घरी गेले तरी समाधान मिळते. साधनेत तृप्त व्हायला शिकायला हवे. जे मिळाले त्यात समाधान मानायला हवे. तृप्त मन, समाधानी मनच आपला आध्यात्मिक विकास साधू शकते. साधनेत अनेक प्रश्‍न पडतात. त्याची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत तर साधनेतून मन उठते. पुन्हा साधना करण्याची इच्छाही होत नाही. असे होत असेल तर नेमके कोठे चुकते याचा अभ्यास करायला हवा. साधना कशी करायची, हे समजून घ्यायला हवे. सद्‌गुरुंनी दिलेल्या मंत्राचा जप म्हणजे साधना. पण हा जप कसा करायचा, हे समजून घ्यायला हवे. सो ऽ हम्‌चे स्वर मनाच्या कानांनी ऐकायला हवेत. म्हणजे मन त्यात रमवायला हवे. सो ऽ हम्‌चे बोल बुद्धीच्या डोळ्याने पाहायला हवेत. अशी साधना करायला हवी. सद्‌गुरुंनी दिलेल्या मंत्राचा चित्त देऊन आस्वाद घ्यायला हवा. असा जप केला तर साधनेचे फळ निश्‍चितच मिळेल. साधना सफल होईल. आत्मज्ञानाची दारे उघडली जातील.


Sunday, November 25, 2018

दृढ निश्‍चय



इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरवसेनि ब्रह्मत्वा येती ।
हे सांगतियाचि रीती । कळले मज ।। 330 ।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - ब्रह्मप्राप्तीच्या उपायाचा दृढनिश्‍चयाने जे अभ्यास करतात, ते खात्रीनें ब्रह्मत्वास प्राप्त होतात, हे आपल्या सांगण्याच्याच रीतीवरून मला समजले.

यशस्वी होण्यासाठी झोकून देऊन कार्य करण्याची वृत्ती हवी. त्या गोष्टीचा, त्या कार्याचा ध्यास लागायला हवा. त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटावर, अडथळ्यांवर मात करण्याची वृत्ती अंगात असायला हवी. तशी मनाची तयारी असायला हवी. इतक्‍या दृढ निश्‍चयाने ते कार्य करायला हवे, तरच त्यात यश निश्‍चित मिळते. स्पर्धा परीक्षा असो किंवा खेळाचे मैदान असो. मन लावून अभ्यास केला, तर परीक्षेची भीती राहात नाही. कोणताही प्रश्‍न विचारला जाऊ दे. त्याचे उत्तर देण्याची मनाची तयारी व्हायला हवी. खेळामध्ये कोणताही डाव प्रतिस्पर्ध्याने टाकला, तरी त्यावर मात करण्याची जिद्द असायला हवी. ही जिद्द, ही मनाची तयारी अभ्यासाने येते. त्यासाठी दृढ निश्‍चयाने अभ्यास करायला हवा. अध्यात्मातही तेच आहे. अध्यात्माचा अभ्यास करायला हवा. ते ज्ञान काय आहे, हे जाणून घेण्याची जिज्ञासूवृत्ती आपल्याकडे असायला हवी. ज्ञान समजून घेण्याचा समजूतदारपणा आपल्या अंगी असायला हवा. भक्ती कशी करायची? आत्मज्ञान कसे प्राप्त होते? त्यासाठी काय करावे लागते? साधना कशी करायची ? साधनेसाठी काय आवश्‍यक आहे ? सद्‌गुरू कोणास म्हणावे ? ते कसे असावेत ? गुरू करणे म्हणजे काय ? या सर्व गोष्टींचा अभ्यास करायला हवा. त्याची उत्तरे शोधायला हवीत. या सर्व प्रश्‍नांची उत्तरे सांगणारा ज्ञानेश्‍वरी हा ग्रंथ अभ्यासायला हवा. त्यात सांगितलेल्या ओव्यांचा अभ्यास करायला हवा. त्या जाणून घेऊन त्याची अनुभूती घ्यायला हवी. त्या ज्ञानाच्या ओढीने स्वतःला त्यात झोकून द्यायला हवे. अभ्यास केला तर नापास होण्याची भीती नसते. प्रश्‍न कसाही आडवा, तिडवा विचारला जाऊ दे. तो सोडविण्याची मनाची तयारी असेल तर उत्तर सापडायला वेळ लागत नाही. उत्तर मिळणार नाही याची भीती राहात नाही. अध्यात्माचा अभ्यास असेल, तर त्यात घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत कधीच नापास होण्याची भीती नसते. आत्मज्ञानी होऊ असा दृढ विश्‍वास त्या भक्तामध्ये निर्माण होतो. साक्षात सद्‌गुरूच मार्गदर्शन करत असल्यानंतर नापास कसे होऊ? हा आधार असतो. अभ्यास करताना येणाऱ्या अनुभवांच्या जोरावर अध्यात्माची प्रगती साधायची असते. हळूहळू प्रगती होत राहाते. होणाऱ्या चुका लक्षात येऊन त्या दुरुस्त केल्या जातात. अशा दृढनिश्‍चयाने भक्तीचा अभ्यास केला, तर निश्‍चितच आत्मज्ञान प्राप्त होते.


Saturday, November 24, 2018

आसन



म्हणोनि तैसें तें जाणावें । मन राहतें पाहावें ।
राहेल तेथ रचावें । आसन ऐसें ।। 181 ।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - म्हणून तें स्थान, तसें आहे की नाही हे समजून घ्यावे आपलें मन तेथे स्थिर राहाते की नाही ते पाहावे आणि राहात असेल तर तेथे असे आसन लावावे.

साधनेच्या जागेस महत्त्व आहे. साधना कोठे करायची? ते ठिकाण कसे असावे ? यावर विचार होण्याची गरज आहे. धकाधकीच्या जीवनात अशी जागा लाभेलच याची शाश्‍वती नाही. मंदिरात इतकी गर्दी असते की तेथे साधनेसाठी जागाच नसते. काही मंदिरे ओस पडलेली असतात पण ती बऱ्याचदा बंदच असतात. असा विरोधाभास पाहायला मिळतो. साधनेसाठी योग्य जागा न मिळाल्याने साधना होत नाही. वाढत्या लोकसंख्येच्या काळात हा प्रश्‍न गंभीर होत आहे. घरातही आज निवांत बसावे असे ठिकाण नाही. दोन-तीन खोल्यांच्या घरात राहताना हॉलमध्ये टी. व्ही. असतो तो सतत सुरू असतो. आपली इच्छा नसली तरीही घरातल्यांच्या इच्छेमुळे तो सुरू असतो. अशावेळी घरातच शांत जागा शोधूनही मिळत नाही. शयनकक्षामध्ये साधनेला बसले की झोपच येते. कारण ते ठिकाण झोपायचे असते. अशा या बदलत्या जीवनशैलीत साधना कशी करायची? हा सर्वांनाच भेडसावणारा प्रश्‍न आहे. अशाने आपण ब्रह्मसंपन्न कसे होणार? पण साधना करायची इच्छा मनात असेल तर साधनेसाठी ठिकाणाची गरजच भासत नाही. मनापासून साधना करताना शयनकक्षातही उत्तमप्रकारे साधना होऊ शकते. मनातील झोपेचा विचार झटकून टाकून दहा मिनिटे साधना करायचे म्हटले तर त्यात अशक्‍य असे काहीच नाही. फक्त साधनेचा विचार, साधनेची मानसिकता असायला हवी. मन स्थिर होते असे प्रत्येक ठिकाण हे साधनेसाठी योग्यच आहे. यासाठी प्रथम मनाची तयारी करायला हवी. मन दृढ करायला हवे. मनाला साधनेची गोडी लागावी यासाठी मन त्यात गुंतवायला शिकले पाहिजे. मन सोऽहम्‌च्या नादात गुंतले की मग बाहेरचे आवाज आपोआप बंद होतात. मनाची स्थिरता साधली जाते. असा अवस्थेत आपल्या शेजारी कितीही गोंगाट असला तरी मनाचे संतुलन ढळत नाही. अशा या अवस्थेसाठी अभ्यासाची गरज आहे. ही अवस्था आणताना कोणत्या अडचणी येतात त्या दूर साधण्यासाठी प्रयत्नांची गरज असते. मनाला प्रेमाची सवय यासाठी लावावी लागते. प्रेमाने घरातल्यांची मने जिंकता यायला हवीत. साधनेत व्यत्यय आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने जिंकायला हवे. तरच हे शक्‍य होणारे आहे. तसा बदल आपण आपल्या व्यक्तीमत्त्वामध्ये करायला हवा. प्रथम या गोष्टी जमत नाहीत. पण हळूहळू हे शक्‍य होत जाते. मनातील चिडचिडा स्वभाव नाहीसा झाला तरच साधनेत मन रमते. यासाठी मनाला प्रथम योग्य सवयी लावायला हव्यात. याचा अभ्यास करायला हवा. स्वतःच्या मनाला सवय लावताना स्वतःच्या होणाऱ्या चुका विचारात घ्यायला हव्यात. त्यावर मात करायला हवी. तरच साधनेसाठी आवश्‍यक बैठक आपणास साधता येईल.


Friday, November 23, 2018

मार्गाची ओळख



हा मार्गु जैं देखिजे । तैं तहान भूक विसरिजे ।
रात्रिदिवसु नेणिजे । वाट इये ।। 157 ।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - या मार्गाची ओळख झाली असता, तहानभुकेची आठवण राहात नाही, या रस्त्यावर रात्र व दिवस याची कल्पना येत नाही.

पूर्वीच्याकाळी दळणवळणाची फारशी साधने उपलब्ध नव्हती. एका गावातून दुसऱ्या गावात पायीच जावे लागे. दूरच्या गावास जायचे असेल तर रस्ता माहित असणे गरजेचे असायचे. रस्ता चुकला तर तो शोधणेही कठीण जात होते. विशेषतः वनांच्या परिसरातून जाताना वाटाड्या सोबत घेतला जायचा. म्हणजेच मार्ग दाखवणारे कोणी तरी असावे लागते. सद्‌गुरू हे असेच वाटाड्या आहेत. ते एकदा मार्ग दाखवतात. एकदा आपणास या मार्गाची ओळख झाली की हा मार्ग आपणच चालायचा असतो. सध्याच्या काळात मार्ग शोधणे खूपच सोपे झाले आहे. तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे आपण जंगलात कोणत्या ठिकाणी आहोत याचीही माहिती उपलब्ध होऊ शकते. त्या जंगलातून बाहेर पडण्यासाठी मार्गही दाखवला जातो. इतके सोपे झाले आहे. पण मार्ग दाखवणारे मोबाईल ऍप जवळ असणे गरजेचे आहे. मोबाईल ऍप हा आपला वाटाड्या आहे. सद्‌गुरूही या मोबाईल ऍपसारखे आपल्या सदैव सोबत असतात. सदैव आपणास मार्गदर्शन करत असतात. आपणाला रस्त्याची ओळख करून देतात. एकदा रस्त्याची ओळख झाली, की पुढचा रस्ता हा आपला आपणास चालायचा आहे. आपणही काही आपले कौशल्य दाखवण्याची गरज आहे. मार्ग सापडल्यानंतर मात्र आपली अवस्था खूप बदलते. मार्गाची ओळख झाल्यानंतर पाच तासात कापले जाणारे अंतर तीन तासात का कापले जाऊ नये यासाठी प्रयत्न केला जातो. एरवी सहा तास लागत असतील, तर रस्त्याची ओळख झाल्यानंतर त्यापेक्षा कमी कालावधीत हा मार्ग पूर्ण केला जातो. कारण त्या रस्त्यातील खाच खळग्यांची आपणाला माहिती असते. कोठे थांबायचे, कोठे वळण घ्यायचे याची पारख आपणास झालेली असते. त्यामुळे तहान भूक विसरून आपण आपले ध्येय गाठण्यासाठी धडपडत असतो. रात्र असो की दिवस आपण चालतच राहातो. या मार्गावर आता ध्येयाचीच फक्त आठवण होत असते. इतके आपण त्यात गुरफटूण जातो. अध्यात्मातही असेच आहे. आध्यात्मिक प्रवासात सद्‌गुरू मार्ग दाखवतात. त्यांनी दाखवलेल्या मार्गाची आपणास पारख झाल्यानंतर आपलीही अवस्था अशीच होते. त्यात येणारे अडथळे आपणास माहित झाल्यानंतर ते कसे चुकवायचे याचाही सराव आपणास होतो. त्यातून सहज मार्ग निघत जाऊन समोर फक्त ध्येय दिसत राहाते. ध्येय गाठणे इतकेच आपणास माहित असते. सोऽहम्‌च्या नादात आपण गुंग होऊन जातो. मनात, रक्तात, शरीरात फक्त सोऽहम्‌च्याच लहरी उमटत असतात. या लहरीच्या आनंदात आपण वावरत असतो. बाकीच्या गोष्टींचे ध्यानही आपणास राहात नाही. इतके आपण त्यात गर्क होऊन जातो. यातूनच मग आत्मज्ञानाच्या लहरी सहजरित्या उत्पन्न होतात.


Wednesday, November 21, 2018

व्यसन


आवडी आणि लाजवी । व्यसन आणि शिणवी ।
पिसें आणि न भुलवी । तरी तेंचि काई ।। 124 ।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - प्रेम आहे ते लाज उत्पन्न करते, तर ते प्रेम कसले? तसेच व्यसन आहे आणि त्याने जर शीण होत असेल तर ते व्यसन कसले?

व्यसन हे वाईटच अशीच आपली मानसिकता आहे. मात्र चांगल्या गोष्टीचे व्यसन असू शकते. कोणत्याही व्यसनाला मर्यादा आहे. गोड खायची आवड आहे. म्हणून आपण अख्खे भांडे भरून केलेले गुलाबजामून संपवू शकत नाही. गोड खाण्यालाही एक मर्यादा असते. ठराविक मर्यादेपर्यंतच त्याची गोडी वाटते, त्यानंतर ते नकोसे वाटते. तसेच व्यसनाचे आहे. कोणतेही व्यसन जोपर्यंत आनंद देते तोपर्यंत चांगले असते. आनंद देते तोपर्यंतच व्यसन करावे. त्याचे दुष्परिणाम जाणवू लागेल की ते व्यसन सोडून देणेच योग्य असते. प्रेम करायचे आणि सांगायला लाजायचे हे कसले प्रेम ? प्रेम हे व्यक्त करता यायला हवे, तरच त्याचा आनंद मिळू शकेल. अन्यथा त्यातून दुःख ही होऊ शकते. जीवन हे आनंद उपभोगण्यासाठी आहे. दुःखी होऊन कण्हत बसणे म्हणजे आयुष्य वाया घालवण्यासारखे आहे. म्हणजेच कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते. मर्यादा ओलांडली की अतिरेक होतो. त्यातून हाती सुख न लागता दुःखच पदरी पडते. साधना का करायची? साधना कशासाठी करायची? जबरदस्तीने साधना होत नाही. साधनेत मन रमायला हवे. त्यातून आनंद मिळायला हवा. तरच ती साधना योग्य असते. त्यातूनच सिद्धी मिळते. अन्यथा साधनेतूनही दुःखच पदरी पडते. म्हणूनच धर्माची सक्ती कधीही करू नये. धर्म हा ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग आहे. अध्यात्म हे आवडीने करायचे असते. अध्यात्म सक्तीने शिकवता येत नाही. आवड असेल तरच ते स्वीकारले जाऊ शकते. अध्यात्म आवडीने करावे. आवड नसेल तर ते करू नये. देवाच्या देवळात जायचे का? देव दर्शन घ्यायचे का? हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्‍न आहे. कोणी देवळात जाण्यासाठी सक्ती करू नये. देव मानणे आणि न मानणे हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. साधना करूनही बऱ्याचदा दुःखच होते. अशी साधना काय कामाची ? ज्यातून दुःख मिळत असेल ती गोष्ट कितीही चांगली असेल, तर ती वाईटच वाटते. देव कधी कधी आपणास वाईटच वाटतो. त्याचा तिटकारा येतो. म्हणजे या सर्व गोष्टी या मानसिक आहेत. मनाला आनंद देण्यासाठी, सुखी करण्यासाठी साधना करायला हवी. दुःख मिळत असेल तर साधना कधीही करू नये. साधनेचा कंटाळा आला असेल, तर त्याची सक्ती करू नये. आज साधना होणार नाही. उद्याही करावीशी वाटणार नाही. अशावेळी साधना करू नये. त्यातून दुःख मिळत असेल, तर ती कधीही करू नये. आपल्या मनाला आवडेल, पटेल तेव्हाच ध्यान धारणा, साधना करावी. अशी साधनाच आनंद देते. साधनेचे व्यसन असावे, पण त्यातून दुःख मिळणार असेल तर ते व्यसन वाईट असते. सुखाने मर्यादा ओलांडली की पदरी दुःखच पडते. यासाठी कोणतीही गोष्ट मर्यादेत असावी.

गीतेचे अमरत्व


तेथ हरु म्हणे नेणिजे । देवी जैसें कां स्वरूप तुझें ।
तैसें हें नित्य नूतन देखिजे । गीतातत्त्व ।। 71 ।। अध्याय 1 ला

ओवीचा अर्थ - शंकर म्हणाले, हे देवी, ज्याप्रमाणें तुझ्या स्वरूपाचा थांग लागत नाही, त्याच प्रमाणे गीतातत्त्वाचा विचार करावयास जावें, तेव्हां ते रोज नवीनच आहे असे दिसते.

बाजारात एखादी वस्तू घ्यायला गेल्यावर प्रथम ती किती प्रगत आहे. हे आपण प्रथम पाहतो. कारण काळाच्या ओघात त्या वस्तूचे महत्त्व कमी झालेले पाहायला मिळते. शास्त्रातही बदल होत चालला आहे. नवनवे शास्त्रही उदयास येत आहे. शेती मातीत केली जाते. पण आता माती शिवायही शेतीतील भरघोस उत्पादने घेतली जाऊ लागली आहेत. पावसावर अवलंबून असणारी शेती आता पाऊस नसणाऱ्या वाळवंटातही केली जाऊ लागली आहे. बदलते तंत्रज्ञान नित्य नूतन येत आहे. बोलता बोलता लोक कोणत्या दशकात वावरत आहात याची विचारपूसही करू लागले आहेत. कारण दहा वर्षापूर्वी जे होते ते आता दिसत नाही. त्यापेक्षाही प्रगत तंत्र उपलब्ध होत आहे. त्यानुसार जगावे लागत आहे. अन्यथा आपण काळाच्या ओघात मागे पडू अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रगत तंत्रज्ञान आत्मसात नाही केले, तर आपले जगणेही मुश्‍किल होईल अशी आजची स्थिती आहे. यापुढेही ती राहील कारण हे तंत्रज्ञान बदल हे पूर्वीपासूनच चालत आले आहे. रोपांना पाणी देण्याची पद्धत बदलली पण रोपांना पाणी तर द्यावे लागते त्याशिवाय रोपाची वाढच होत नाही. मग ते रोप मातीत लावले काय किंवा कॉकपीटमध्ये लावले काय? त्याची वाढ होण्यासाठी, ते जगण्यासाठी पाणी ही मुख्य गरज आहे. त्या पाण्यात काही बदल झाला नाही. कारण पाणी हेच जीवन आहे. तेच अमृत आहे. ते नसेल तर सजीवाचे अस्तित्वच नष्ट होईल. म्हणूनच चंद्रावर, मंगळावर प्रथम पाणी आहे का? याचा शोध घेतला जात आहे. पाणी असेल तरच जीवसृष्टी आहे. जिवाचे अस्तित्व जसे पाण्याशिवाय नाही. तसे माणसाचे जीवन हे गीतातत्त्वाशिवाय नाही. युगे बदलतील पण हे तत्त्व अमर आहे. हजारो वर्षापूर्वी भगवंतांनी ही गीता सांगितली. बाराव्या शतकात ज्ञानेश्‍वरांनी त्यावर टीका केली. ती ज्ञानेश्‍वरीच्या रूपात आजही वाचली जाते. 700 श्‍लोंकांच्या गीतेचे तत्त्वज्ञान सर्व सामान्यांना समजावे यासाठी ज्ञानेश्‍वरांनी ते उघड करून सांगितले. तत्त्वज्ञान तेच आहे. फक्त काळाच्या ओघात भाषेत बदल झाला आहे. गीता संस्कृतमध्ये आहे. आज संस्कृत जाणणारे खूपच कमी लोक आहेत. ज्ञानेश्‍वरी प्राकृत मराठीमध्ये आहे. आज ही मराठी फारशी वापरात नाही. काळाच्या ओघात भाषा बदलली पण तत्त्वज्ञान तेच आहे. ते नव्या रूपात नव्या ढंगात काळानुसार येत आहे. गीतेचे हे तत्त्वज्ञान समजून घ्यायला हवे. त्यासाठी ती आत्मसात करायला हवी. ज्ञानेश्‍वरी बाराव्या शतकात होती तशीच ती आजही आहे. दरवेळी तिचे पारायण केले जाते. पण दरवेळेचा त्यातून येणारा अनुभव हा नित्य नूतन आहे. म्हणूनच ती अमरत्वाला पोहोचली आहे.


Tuesday, November 20, 2018

समुद्र सर्वांत पवित्र तीर्थ



कां तीर्थें जियें त्रिभुवनीं । तियें घडती समुद्रावगाहनें ।
ना तरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ।। 26 ।। अध्याय 1 ला

ओवीचा अर्थ - समुद्रस्नानाने त्रैलोक्‍यात जेवढीं तीर्थे आहेत तेवढीं घडतात किंवा अमृतरसाच्या सेवनानें सर्व रसांचे सेवन घडते.

अध्यात्मात प्रगती करण्याचे अनेक मार्ग आहेत. साधनेचेही अनेक प्रकार आहेत. पण प्रत्येकालाच सध्या घाई झाली आहे. अवघड मार्गाने जाण्यात तर कोणालाच रस नाही. सोपा मार्ग प्रत्येकालाच हवा असतो. ज्ञानेश्‍वरीत साधनेचे सर्व सोपे मार्ग सांगितले आहेत. आध्यात्मिक शांतीसाठी अनेक भाविक धार्मिक पर्यटनाला जातात. अनेक तीर्थात डुबकी मारतात. गंगा स्नान करतात. हे तीर्थ पवित्र त्यापेक्षा ते तीर्थ अधिक पवित्र. असा भेदभावही करतात. सर्व शुद्धीसाठी तीर्थाना महत्त्व आहे. याचा अर्थ पूर्वीच्याकाळी स्वच्छतेला अधिक महत्त्व होते. घराचा परिसरही स्वच्छ ठेवण्यावर अधिक भर दिला जात होता. अध्यात्मातही स्वच्छतेला अधिक महत्त्व आहे. स्वच्छ वस्त्रे घालावीत. अंघोळ करून साधना करावी. एकंदरीत साधना व्यवस्थित व्हावी, मन साधनेत रमावे यासाठी स्वच्छतेला महत्त्व आहे. तीर्थात स्नान हे शुद्धीसाठी करायचे आहे. पण सध्या तीर्थातील पाणीच अशुद्ध असते की त्या पाण्यात डुबकी मारण्याची इच्छाही होत नाही. सर्व प्रथम तीर्थात होणारे प्रदूषण रोखण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे. श्रद्धा म्हणून आता अनेकजण या तीर्थात डुबकी मारतात. जीवनात सर्वच तीर्थांना जाता येईल का हे सांगता येणार नाही. सर्वच तीर्थांचा लाभ घेता येईल का? हे ही सांगता येणे कठीण आहे. हे तीर्थ घडले. पण हे तीर्थ घडले नाही. ही मनात रुखरुख राहाते. अशाने साधनेवर याचा परिणाम होतो. यासाठी संत ज्ञानेश्‍वरांनी त्रैलोक्‍यातील सर्व तीर्थ घडविण्याचा सोपा मार्ग सांगितला आहे. समुद्रात डुबकी मारा सर्व तीर्थांचे स्नान घडेल. जगभर भटकंती करण्याची काहीच गरज भासणार नाही किंवा एखादे तीर्थ घडले नाही म्हणून नाराज होण्याचेही काही कारण नाही. समुद्र हे असे तीर्थ आहे. ज्यामध्ये सर्व तीर्थे सामावली आहेत. सर्व तीर्थांचे मुळच समुद्र आहे. यासाठी हे सर्वांत पवित्र असे हे तीर्थ आहे. शास्त्राचा विचार करता समुद्राच्या पाण्याची वाफ होते. त्या वाफेला थंड हवा लागल्यानंतर पाऊस पडतो. नदीतून हे पाणी पुन्हा समुद्रालाच मिळते. तीर्थामध्ये असणारे पाणी हे समुद्रातीलच आहे. सर्व तीर्थे ही समुद्रातच सामावलेली आहेत. समुद्रातील पाण्याने अनेक व्याधीही दूर होतात. त्याच्या खारटपणामुळे रोगही जातात. तीर्थातून शरीराची शुद्धी होते. समुद्राच्या पाण्यातूनही शुद्धी होते. शरीराच्या शुद्धते बरोबरच मनाची शुद्धताही साधनेत महत्त्वाची आहे. शुद्ध मनाने, शुद्ध अंतःकरणाने केलेली साधना निश्‍चितच आध्यात्मिक प्रगती साधते.

Monday, November 19, 2018

तूंचि सदा रक्षिता



तूं गुरू बंधू पिता । तूं आमची इष्ट देवता ।
तूंचि सदा रक्षिता । आपदीं आमुतें ।। 59 ।। अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ - तूं आमचा गुरू, बंधु, पिता. तूं आमची इष्ट देवता. संकटसमयी नेहमीं तूंच आमचें रक्षण करणारा आहेस.

साधना करताना अनेक अडथळे येत असतात. पण या अडथळ्यातून सद्‌गुरूच मार्ग दाखवतात. इतकेच काय सद्‌गुरूच साधनेची आठवण करून देतात. प्रत्यक्षात साधनाही सद्‌गुरूच करून घेत असतात. आपण काहीच करत नसतो. आपण फक्त निमित्त मात्र असतो. सद्‌गुरुंच्या समाधीच्या सानिध्यात ही अनुभूती जरूर येते. यासाठीच त्यांची समाधी ही संजीवन आहे, असे म्हटले जाते. सद्‌गुरुंची नेहमीच शिष्यावर कृपा असते. लहान भावाप्रमाणे ते शिष्यावर प्रेम करत असतात. पित्याप्रमाणे ते शिष्याचा सांभाळ करत असतात. फक्त आपली पाहण्याची दृष्टी तशी हवी. आपण त्या नजरेने पाहातच नाही. अर्जुनाच्या रथाचे सारथी कोण होते? स्वतः भगवान कृष्ण होते. शिष्य हा अर्जुनासारखाच असतो. शिष्याच्या रथाचे सारथी हे सद्‌गुरूच असतात. फक्त शिष्याला त्याची अनुभूती यायला हवी. संसाराचा असो की आध्यात्मिक साधनेचा गाडा असो, दोन्हीही सद्‌गुरूच हाकत असतात. मग हा रथ चिखलात रुतो, किंवा भरधाव वेगाने धावत असो. या रथाची दोरी सद्‌गुरुंच्याच हातात असते. त्यामुळे सर्व चिंता बाजूला ठेवून साधना करायला हवी. मनातील सर्व विचार दूर सारून साधनेला बसायला हवे. भीती मनात ठेवून साधना होत नाही. सद्‌गुरू नित्य आपल्या पाठीशी आहेत. हा भाव मनात ठेवूनच साधना करायला हवी. म्हणजे साधनेत येणारे सर्व अडथळे दूर होऊ शकतात. शस्त्र जवळ असेल, तर शत्रूचे भय वाटत नाही. हे शस्त्र भवानी माता देते. यासाठी देवीची आराधना आपण करत असतो. सद्‌गुरू हे देवीसमान आहेत. देवी प्रमाणे साधनेतील सर्व शस्त्रे ते पुरवत असतात. साधनेच्या काळात वासना अधिक बळावतात. या काळात मनावर नियंत्रण ठेवावे लागते. भोगाची इच्छा अधिक तीव्र होत असते. या इच्छेवर ज्याने विजय मिळवला, तोच आत्मज्ञानी होण्यासाठी समर्थ होतो. भोग, वासना दूर सारण्यासाठी सद्‌गुरू सो ऽ हम चे शस्त्र सांगतात. सो ऽ हमवर मन नियंत्रित करण्यास सांगतात. मनावर नियंत्रण ठेवणे, हे शिष्यांचे कर्तव्य आहे. ज्याने मन जिंकले, त्याने जग जिंकले. विश्‍वाचे आर्त त्यालाच समजते. त्यालाच उकलते. या वासना, मोहातून सद्‌गुरूच रक्षण करत असतात. यासाठी सद्‌गुरुंचे ध्यान करायला हवे. सद्‌गुरुंनी दिलेल्या सो ऽ हम मंत्राने सर्व व्याधी दूर होतात. सर्व दुःखे दूर पळतात. सर्व वासना, मोह यांचा नाश होतो. मग आत्मज्ञानाचा दिप उजळतो.


Sunday, November 18, 2018

स्मरण-विस्मरण



तैं शरीरभाव नासती । इंद्रिये विषय विसरती ।
जैं सोऽहंभावप्रतिति । प्रगट होय ।। 309 ।। अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ ः ज्यावेळी हे ब्रह्म मी आहे असा अनुभव येतो त्या वेळी शरीराचे काम क्रोधादी विकार नष्ट होतात आणि इंद्रिये आपले विषय विसरतात

सोऽहमचा बोध केव्हा होतो ? आपणास त्याची अनुभूती केव्हा येते ? तो येण्यासाठी काय करावे ? हे प्रश्‍न सर्वच साधकांना पडतात. या प्रश्‍नांच्या उत्तराची उत्सुकता सर्वांनाच असते. सोऽहम ही सहज साधना आहे. सद्‌गुरुंच्या कृपेने याचा बोध येतो. पण यासाठी साधकांचेही काही कर्तव्य आहे. सोऽहम च्या साधनेत मन रमावे यासाठी त्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. पण हेच तर शक्‍य होत नाही. मग काय करावे? स्मरण-विस्मरण काय आहे याचा अभ्यास करावा. मी स्वतःला विसरलो. तरच मी कोण आहे याचे स्मरण होईल. हा साधा सोपा विचार आहे. पण मी अहंकारी स्वतःला कसा विसरणार? मनात येणारे विविध विचार कसे रोखणार? साधनेच्या काळात तर भोगाचा अधिकच विचार येतो. मनाला शांत करत असतानाच एखादा आनंदाचा क्षण आठवतो. मग त्या आनंदातच साधना सुुरू असते. सोऽहमचा नाद सुरू असतो पण मनात वेगळ्याच आनंदाचा विचार असतो. धकाधकीच्या या जीवनात मनात येणारे विचार रोखणे हे महाकठीण काम आहे. शांत बसले की शेजारच्या खोलीत सुरू असणारा टी.व्ही.चा आवाज स्पष्ट ऐकू येतो. त्या आवाजाने मन भरकटते. एकांत, शांत जागा आता पाहायलाच मिळत नाही. मंदिरातही दर्शनाची गर्दी असते. मग साधना करायची कोठे? शांत निवांतपणे बसायला जागा नाही. अशी आजची अवस्था झाली आहे. टी. व्ही. पाहण्यातच वेळ जात आहे. एक मालिका झाली की दुसरी मालिका. अशा मालिकांचा कंटाळाच येत नाही. अशातच मन रमत आहे. अशा मनाला सोऽहमची गोडी कशी लागणार. कामाचा वाढता व्याप विचारात घेता सोऽहम कडे लक्ष द्यायलाही वेळ नाही. या सर्व गोष्टींचे विस्मरण झाल्याशिवाय सोऽहमचे स्मरण होणे अशक्‍यच आहे. या सर्व गोष्टी मनातून त्यागने हाच खरा संन्यास आहे. संसारात राहूनही हे करता येणे शक्‍य आहे. हेच प्रथम समजून घ्यायला हवे. याचाच बोध प्रथम यायला हवा. संसार सुरूच असतो. त्याचा त्याग करायचा म्हणजे त्यात अडकून राहायचे नाही. नित्यकर्म करतच राहायचे. पण ते मी केले असा अहंकार ठेवायचा नाही. त्यातील मीपणाचा त्याग करायचा. असे केले तरच मनात येणारे विचार कमी होतील. बाहेरच्या आवाजावर नियंत्रणही आपोआपच घडेल. बाहेरचे आवाज सुरू असतानाच त्यावर लक्ष न देता सोऽहमवर लक्ष केंद्रित करायचे. आपोआपच बाहेरच्या आवाजापासून तुम्ही अलिप्त व्हाल. हा सर्व स्मरण-विस्मरणाचा खेळ आहे. तो खेळ समजून घेऊन खेळायला शिकायचे आहे. बाहेरच्या आवाजाचे विस्मरण जेव्हा होईल तेव्हा सोऽहमचे स्मरण आपोआपच होईल. बाहेरचे विचार थांबले की आतल्या आत्म्याचा आवाज आपोआप ऐकू येऊ लागेल. सोऽहम चा बोध आपोआपच प्रगट होईल.

Wednesday, November 14, 2018

चैतन्य



या उपाधिमाजी गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।
तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ।। 126 ।। अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ - या देहादी प्रपंचामध्ये सर्वत्र चैतन्य गुप्त रुपाने आहे. तत्त्व जाणणारे संत ते ओळखून त्याचेच ग्रहण करतात.

तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे. माणसाप्रमाणे काम करणारा संगणक केव्हाच संशोधकांनी शोधला आहे. आता तर त्याही पुढे जाऊन तो माणसाशी संवाद करत आहे. माणसाला तो प्रत्येक कार्यात सल्लामसलत करत आहे. माणसाच्या वेदना तो जाणू लागला आहे. नाडी तपासून रोग निदान करणारे वैद्य आहेत. पण आता संगणकही हे काम करू लागला आहे. शरीर पंचमहाभूतांपासून तयार झाले आहे. संगणकही अशाच पंचमहाभूतापासून तयार झाला आहे. शरीरात जसा आत्मा आला आहे. तसा संगणकात आपण प्रोग्रॅम भरला आहे. माणसाला हे दाखवून देत आहे की देहात जसे चैतन्य घातले आहे. तसे ते इतर निर्जीव वस्तूतही घालून त्याला सजीव करता येते. पण हे चैतन्य हा आत्मा हा या देहापासून वेगळा आहे. तो काढला की, तो देह निर्जीव होतो. संगणकातील प्रोग्रॅम काढला की संगणकही निर्जीव होतो. तसे हे आहे. देहात आलेले हे चैतन्य ओळखायचे आहे. हे चैतन्य जो जाणतो तो संतपदाला पोहोचतो. संत हे चैतन्यच तेवढे स्वीकारतात. एखाद्याचे हृद्‌य खराब झाले असेल तर दुसऱ्याचे हृद्‌यही त्या शरीरात बसविता येते. ठराविक कालावधीत हा बदल करता येऊ शकतो. तंत्रज्ञानाने ते शक्‍य झाले आहे. पण हे करताना ज्याचे हृद्‌य बसविले जाते त्याचा जीव तो वैद्य वाचवू शकतो का? त्याचा कार्यकाल कायम ठेवू शकतो का? तसे तो करू शकत नाही. कारण जीव शरीरात येणे आणि जाणे हे त्याच्या हातात नाही. हा आत्मा सर्वांच्यामध्ये आहे. तो येतो आणि जातो. तो आला म्हणजे प्रकट झाला असे आपण समजतो. तो गेला म्हणजे मृत झाला, असे आपणास वाटते. पण प्रत्यक्षात तो प्रकटही होत नाही आणि मृतही होत नाही. तो नाशवंत आहे. तो अमर आहे. ती जी वस्तू आहे. ते जे चैतन्य आहे. तेच तर आपणास ओळखायचे आहे. त्याच्यावरच तर नियंत्रण मिळवायचे आहे. साधनाही त्याचसाठी करायची आहे. एकदा का आपण त्याला ओळखलं. त्याच्यावर नियंत्रण मिळवले. तर आपण आत्मज्ञानी होतो. ते ज्ञान आपल्या सदैव सोबत असते.आपण त्या संतत्वाला पोहोचतो. जीवनात येऊन हेच मुख्य कार्य करायचे आहे. जीवनाचा अर्थ यामध्ये दडला आहे. जीवनाचे हेच मुख्य कार्य आहे. यासाठी आपला जन्म आहे. तो सार्थकी लावण्यासाठी ही साधना आवश्‍यक आहे. चैतन्य ओळखा आणि जीवन समृद्ध करा.


Tuesday, November 13, 2018

श्रवणद्वारें


देखे हे शब्दाची व्याप्तिं । निंदा आणि स्तुति ।
तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ।। 114 ।। अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ - निंदा आणि स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे. कर्णद्वारानें जसें निंदेच्या किंवा स्तुतीच्या शब्दांचे सेवन होईल तसे क्रोध किंवा लोभ अंतःकरणांत उत्पन्न होईल.

नेहमी चांगल्याच्या संगतीत असावे हा संस्कार आपणावर लहानपणापासून केला जातो. आपली मुले बिघडू नयेत. हा त्या मागचा उद्देश असतो. वाईट सवयी पटकन आत्मसात केल्या जातात. पण चांगल्या गोष्टी लवकर आत्मसात होत नाहीत. चांगल्या संगतीत राहिले की चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. चांगले विचार मनात उत्पन्न होतात. चांगल्या कृती हातून घडतात. त्या विचारांची मग मनाला सवय होते. मन भरकटत नाही. एखाद्याला तंबाखू खाण्याचे व्यसन असेल. तर तो नेहमी तंबाखू खाणाऱ्यांशी संगत करतो. त्यांचा सहवासात, मैत्रीत त्याच व्यक्ती असतात. त्यांची बैठकही एकत्र असते. या बैठकीत एखादा तंबाखू न खाणारा गेला तर त्यालाही तंबाखू खाण्याची सवय लागू शकते. बहुंताशी असेच घडते. आपल्या आसपासच्या विचारांचा आपल्यावर सातत्याने प्रभाव होत असतो. नव्यापिढीस सहसा हा विचार पटताना दिसत नाही. सातत्याने नवे शोध लागत आहेत. बाजारात सातत्याने नवनवीन उपकरणे, गेम्स येत आहेत. संगणकाच्या युगात, मोबाईलच्या जगात आज मनाला खिळवून ठेवणारी अनेक साधणे उपलब्ध आहेत. मन अशा गोष्टीतच गढून गेले आहे. मनमोकळे करायला दोन दिवस परगावी फिरायला गेले, तरी प्रवासात ही साधनेच हातात असतात. इतकी त्याची सवय आपणास झाली आहे. निसर्गातील सौंदर्य पाहून मन प्रसन्न करण्याचे भानही त्यांना नसते. मनाला प्रसन्न करणारे खेळही आता या इलेक्‍ट्रॉनिकच्या जगात उपलब्ध आहेत. इतके खेळ आले आहेत की, ते नुसते पाहायचे म्हटले तरी तितका वेळ पुरेसा होत नाही. तास-न-तास त्यात वाया घालवत आहोत, याचे भानही या नव्यापिढीला नसते. पण त्यातून मिळणाऱ्या आनंदावर ही पिढी प्रगती करत आहे. विकास करत आहे. पण हा विकास कधीही, कोणत्याहीक्षणी जीवन संपवू शकतो. याचे भान त्यांनी ठेवायला हवे. या नव्या उपकरणांचा योग्य वापर करण्याची सद्‌बुद्धी जागरूक असायला हवी. काही छुल्लक कारणावरून आत्महत्या, खून, मारामाऱ्या हे याचमुळे पडत आहेत. कारण संयम हा प्रकारच नव्या पिढीत कमी होताना दिसत आहे. यासाठी आपण नव्या पिढीच्या हातात काय देत आहोत. त्यांच्यावर कोणते संस्कार व्हायला हवेत, याचे भान ठेवायला हवे. कानाला चांगले ऐकण्याची सवय यासाठी लावायला हवी. आध्यात्मिक प्रगतीसाठीही हाच नियम आहे. कानाला सोऽहमचा नाद ऐकण्याची सवय हवी. हा स्वर आपल्या मनावर अनेक चांगले संस्कार करतो. मनाची स्थिरता ठेवतो. सातत्याने हा स्वर ऐकला तर मनाचा संयम वाढतो. एकाग्रता वाढवतो. सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी याची गरज आहे.


Sunday, November 11, 2018

मनशुद्धी



मनशुद्धीचां मार्गी । जैं विजयी व्हावें वेगी ।
तै कर्म सबळालागी । आळसु न कीजे ।। 139 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - मनाची शुद्धता होण्याच्या मार्गात आपण लवकरच विजयी व्हावें असें वाटत असेल, तर चित्त शुद्ध करण्याच्या कामीं समर्थ असणारें जे कर्म, तें आचरण करण्याच्या कामीं आळस करू नये.

साधनेत मन रमण्यासाठी, आत्मज्ञान प्राप्तीसाठी अंगी ऊर्जा असावी लागते. पण ही ऊर्जा येते कशी? ऊर्जा उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही. ऊर्जा ही एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाते. हा ऊर्जेचा नियम आहे. याचा अर्थ ऊर्जा ही आपल्या शरीरातच असते. शरीरातील या ऊर्जेचा वापर आपण योग्य पद्धतीने करायला हवा. ही ऊर्जा योग्य कामासाठी उपयोगात आणायला हवी. यासाठी उपलब्ध ऊर्जेचे संवर्धन हे गरजेचे आहे. संवर्धनासाठी मनशुद्धी हवी. मनात चांगले विचार, आचार असतील तरच ऊर्जेचे संवर्धन होते. मनशुद्धीचे विविध मार्ग आहेत. समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेले मनाचे श्‍लोक जरी आठवले, तरी मन शुद्ध होते. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. भक्ती हा मनशुद्धीचा उत्तम मार्ग आहे. भगवंताची भक्ती, सद्‌गुरुंची भक्ती यातून मनाचे पावित्र्य वाढते. पण येथे तर भक्तीतच मन लागत नाही. मग मन शुद्ध कसे होणार? साधनेतच मन रमत नाही. हे मन रमण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मन स्थिर होण्यासाठी शरीरात शांती उत्पन्न होईल, असा आचार ठेवायला हवा. तसा विचार करायला हवा. राग आला तर तो गिळायचा नाही, तो विसरायचा. गिळालेला राग पुन्हा वर येऊ शकतो. पण विसरलेला राग पुन्हा येण्याची शक्‍यता फारच कमी असते. दुसऱ्याचा द्वेष करण्याआधी स्वतःमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण स्वतः मोठे होण्याचा प्रयत्न करायला हवा. द्वेषामध्ये ऊर्जा खर्च करण्याऐवजी आपण चांगले काही तरी करून मोठे कार्य करण्यात ऊर्जा वापरायला हवी. मनशुद्धीसाठी मनाला असे वळण लावायला हवे. मन बदलले तर सर्व काही बदलू शकते. ऊर्जेच्या संवर्धनाचा विचार मनात जोपासायला हवा. अशी व्यर्थ जाणारी ऊर्जा आत्मज्ञान प्राप्तीसाठी वापरायला हवी. सध्या टिव्हीमुळे मनोरंजन होते. पण हे मनोरंजन आपल्या जीवनात, आचरणात बदल घडवते. याकडे लक्ष द्यायला हवे. लैंगिक विचार आपली ऊर्जा मोठ्या प्रमाणात नष्ट करत आहेत. कामाची हाव आपली शक्ती व्यर्थ घालवत आहे. शरीरात असणारी ही ऊर्जा साठवणे म्हणजेच ब्रह्मचर्य पाळणे होय. यासाठी ब्रह्मचर्याचा विचार हा उपयोगात आणायला हवा. संसारात राहूनही ब्रह्मचर्य पाळता येते. मुले कोणाला नको आहेत? सर्वांनाच हवी आहेत. पण गरजे पुरतेच याकामी उर्जा खर्ची घालायला हवी. त्याचा वापर करायला हवा. इतर वेळी तो विचार मनात आणून ऊर्जा नष्ट करू नये. ही ऊर्जा साठवायला हवी. काही संतांच्या मते ही ऊर्जा अगदी सहजपणे आत्मज्ञान प्राप्ती करून देऊ शकते. ही ऊर्जा ज्याने साठवली तो सहज आत्मज्ञानी होऊ शकतो. सहजसमाधी साध्य तो करू शकतो. यासाठी ब्रह्मचर्य हवे. ब्रह्मचर्याने मनाची शुद्धी होते. यासाठीच ब्रह्मचर्य पाळण्यात आळस करू नये.

Wednesday, November 7, 2018

स्वरुप



ना तरी मठीं आकाश जैसें । मठाकृती अवतरलें असे ।
तो भंगलिया आपैसे । स्वरुपचि ।। 142 ।। अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ - ज्या प्रमाणे आकाश हें मठात मठाच्या आकाराचें झालेले दिसते पण तो मठ मोडल्यावर तें आकाश सहजच आपल्या मूळ रूपाने राहाते.

स्वतःचे रुप कसे आहे. कोण काळा असतो. कोण गोरा असतो. कोणी सावळे असते. हे बाह्यरुप आहे. बाह्यरुपात कोणी सुंदर असते तर कोण दिसायला कुरुप असते. पण हे रुप आहे ते देहाचे आहे. हा आकार अनुवंशीक रचनेनुसार ठरतो. विज्ञानाने आता सुंदर मुलांचीही निर्मिती केली जात आहे. अनुवंशीक रचनेत योग्य ते बदल करून आकार बदलता येऊ शकतो. रंग बदलला जाऊ शकतो. धान्याच्याही अशाच पद्धतीने जाती विकसित केल्या जात आहेत. उत्पादन वाढीचे जनुक घालून त्यांचे उत्पादन वाढविले जात आहे. विविध कीड रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता उत्पन्न केली जात आहे. पण या नव्या जाती फारश्‍या टिकावू नसतात. सुरवातीच्या दोन तीन पिढ्यांमध्ये या जाती उत्तम उत्पादन देतात. त्यानंतर मात्र त्यांची गुणवत्ता राहात नाही. यावरुन मानवांमध्ये केले जात असलेल्या बदलावरही असाच परिणाम दिसणार, हे निश्‍चित आहे. पण तरीही असे प्रयोग केले जात आहेत. भावी काळात नऊ महिने गर्भाशयात जीव वाढविण्याचे प्रकारही बंद होतील. असे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. पण याचे दुःष्परिणामही विचारात घ्यायला हवेत. सध्या दुःष्परिणामांचा विचारच केला जात नसल्याने अनेक गंभीर समस्या उभ्या राहण्याची शक्‍यता आहे. केवळ सध्यस्थितीचाच विचार केला जात आहे. सध्या फायदा मिळतो ना. मग पुढचा विचारच होत नाही. अशा दुरदृष्टीच्या अभावानेच सर्वत्र गंभीर समस्या उभ्या राहात आहेत. तापमानवाढ असो किंवा पर्यावरणाचा ह्यास असो किंवा सध्या विकसित होत असलेले नवे तंत्रज्ञान असो. केवळ त्यामध्ये वरवरचा व सध्यस्थितीचाच विचार दिसून येत आहे. बाह्यरंगालावरच सर्व भुलले जात आहेत. अंतरंगात डोकावण्याचा कोणी विचारच करत नाही. अशामुळेच खरे स्वरुप प्रकट होत नाही. खरे स्वरुप हे अंतरंगात सामावलेले आहे. पाण्याने भरलेल्या मठात आकाश दिसते. आपण सध्या मठातील आकाशच पाहात आहोत. पण हे आकाश खरे नाही. हा मठ फुटल्यानंतरच खरे त्याचे स्वरुप स्पष्ट होते. मठ म्हणजे देह आहे. आपण देहालाच खरे स्वरुप समजू लागलो आहोत. बाह्यरुपालाच खरे स्वरुप समजत आहोत. पण हे खरे स्वरुप नाही. मानवाचे खरे स्वरुप हे आत्मा आहे. या देहाच्या अंतरंगामध्ये असणारा आत्मा हेच मानवाचे खरे स्वरुप आहे. पण त्याकडे पाहण्यास आपणास वेळच नाही. मठ जसा फुटल्यावर आकाशाचे खरे रुप समजते, तसे हा देह संपल्यानंतरच आपणास त्याची प्रचिती येते. देहात आहे तोपर्यंत त्याची माहिती घेण्याची आपण तस्तीही घेत नाही. त्यामुळे आपले खरे स्वरुप आपणास समजत नाही.


Sunday, November 4, 2018

अवधान



तरी अवधान एकवेळें दीजें । मग सर्वसुखासि पात्र होईजे ।
हे प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ।। 1 ।। अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - श्री ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात, अहो श्रोते हो, तर तुम्ही एक वेळ (माझ्या बोलण्याकडे) लक्ष द्या म्हणजे मग सर्व सुखाला प्राप्त व्हाल हें माझें उघड प्रतिज्ञेचें बोलणें ऐका.

साधना करायला हवी. गुरूंनी दिलेला मंत्र जपायला हवा. पण प्रत्यक्षात आपण ते करतो का? हा प्रश्‍न स्वतःच स्वतःच्या मनाला विचारावा. बऱ्याचदा याचे उत्तर नाही असेच येते. आपण साधनेला बसतो पण मन साधनेत नसते. साधना म्हणजे अवघड काम. हे आपणाला शक्‍य नाही. अध्यात्माचा मार्ग म्हणजे खडतर तपश्‍चर्या. असे काहीतरी नको ते विचार आपल्या मनात सातत्याने घोळत असतात. कारण आपणाला एक मिनिटही शांत बसून राहाता येत नाही. आता तर मोबाईल, इंटरनेट, टीव्ही यांनी तर आपल्या विचारांना अधिकच प्रोत्साहन दिले आहे. जरासा जरी फोनचा आवाज झाला तर कोणाचा मेसेज आहे हे पाहण्याकडे आपण पटकन धावतो. झोपेत असतानाही मेसेच आला तरी जागे होऊन तो पाहतो. इतके आपले जीवन त्याच्या आहारी गेले आहे. साधनेकडे मात्र पाहायला आपणाला वेळही नाही. साधना काय आहे? हेच आपण विसरलो आहोत. यामुळेच साधना आपणास अवघड वाटू लागली आहे. पण प्रत्यक्षात तर साधना अहोरात्र सुरू असते. सोऽ हम चा जप सुरूच असतो. कारण प्रत्येक श्‍वास हा सो ऽ हमचा स्वर आहे. श्‍वास हाच सोऽहम मंत्र आहे. त्याच्यात काहीच खंड पडत नाही. सतत तो सुरू असतो. साधना तर सुरू असते. मग आपणाला काय करायचे आहे? हेच तर जाणून घ्यायला हवे. प्रत्येक श्‍वासात सोऽहम, सोऽहम, सोऽहम असा हा स्वर, नाद सुरू असतो. तो स्वर, नाद आपण पकडायचा आहे. त्यावर नियंत्रण मिळवायचे आहे. तो स्वर आपण आपल्या कानांनी ऐकायचा आहे. त्या स्वरामध्येच आपण डुंबून जायचे आहे. हीच तर साधना आहे. पण असे होत नाही. मनात हजार विचार घोळत असतात. आज हे करायचे आहे. आज असे झाले पाहिजे. तसे झाले पाहिजे. भूत, भविष्यांने आपला वर्तमानही त्याच विचारात गुंतलेला असतो. आपण साधनेला बसलेले असतो. श्‍वास, जप मात्र सुरू असतो. कृतीत साधना असते. पण मनात साधना नसते. मनातील विचारात साधना आणायला हवी. विचारात आली की आपोआपच आचरणात येईल. यासाठी अवधान द्यायला हवे. सतत सुरू असलेल्या त्या स्वरावर लक्ष केंद्रित करायला हवे. तो स्वर शरीराने म्हणजे कानाने, मनाने, अंतःकरणाने ऐकायला हवा. तरच खरी साधना होते. अन्यथा साधना तर सुरूच असते. पण त्याला साधना म्हणत नाहीत. यासाठीच अवधानाला महत्त्व आहे. हे अवधान ढळता कामा नये. हे अवधान प्रत्येक शिष्याने जपायला हवे. हे ज्याला जमले. त्या शिष्याला सर्वसुखे प्राप्त होतात. आत्मज्ञानाचे सुख त्याला प्राप्त होते. ती अनुभूती त्याला येते. त्याच्या शरीरात, मनात, आचारात, विचारात तसा फरक दिसू लागतो. त्यांचे जीवन अमरत्वाला पोहोचते. यासाठी फक्त अवधान असायला हवे.

Friday, November 2, 2018

स्थितप्रज्ञु



तो कामु सर्वथा जाये । जयातें आत्मतोषीं मन राहे ।
तोचि स्थितप्रज्ञु होये । पुरुष जाणें ।। 293 ।। अध्याय दुसरा

ओवीचा अर्थ - तो काम ज्याचा सर्वथैव गेलेला असतो व ज्याचे मन (निरंतर) आत्मसुखांत (निमग्न) राहाते, तोच पुरूष स्थितप्रज्ञ होय असे समज.

आत्महत्या कशामुळे घडतात? मानसाचे मन इतके कमजोर कशामुळे होते? मानसाची मानसिकता इतकी का ढळते? जीवन संपविण्याचा विचार येतोच कसा? मन इतके भरकटते. इतके मन दुबळे आहे का? मानसिक समाधान नसल्यानेच आत्महत्या होतात. मन नियंत्रणात ठेवल्यास ही समस्या दूर होऊ शकते. आत्महत्या हा मानसिक आजार आहे. यावर उपाय एकच स्थितप्रज्ञु होण्याचा प्रयत्न करणे. त्यादृष्टीने विचार सुरू केला तरी हा आजार बरा होऊ शकतो. पण स्थितप्रज्ञ व्हायचे म्हणजे नेमके काय? मनातील सर्व इच्छा टाकून द्यायच्या. इच्छा ठेवून कोणतेही कर्म करायचे नाही. स्वतःचे मन स्वरूपाच्या ठिकाणी ठेवून संतुष्ट व्हायचे. हे ज्या पुरुषाला जमते त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. परीक्षेत मनासारखे यश मिळाले नाही. प्रयत्न करुणही अपयश आले. प्रयत्न कमी पडले. अशाने मनात निराशा येते. अशावेळी अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असा विचार करून मार्गस्थ व्हावे. एकदा अपयश येईल. दोनदा येईल. तिसऱ्यांदा तरी मनासारखे यश मिळेल ना? प्रयत्न सोडायचे नाहीत. मनाची स्थिरता ढळू न देता प्रयत्न करत राहायचे. आजकाल कोणी मैत्रीस नकार दिला म्हणूनही आत्महत्या करतो. फेसबूकवर मैत्रीस नकार मिळाला म्हणून आत्महत्या. नव्या जमान्यात संवादाची माध्यमे बदलली आहेत. तशी मैत्रीची समीकरणेही बदलली आहेत. कोणाला काय आवडेल हे सांगता येणे कठीण आहे. अशा संवादातून नैराश्‍य निर्माण होत आहे. पण ही निराशा जीवन संपविण्यापर्यंत असू शकते हे न पटणारे आहे. संवादाच्या माध्यमांचा हा दुष्परिणाम आहे. सुसंवाद व्हावेत यासाठी प्रयत्नांची गरज आहे. सुविचारांची बैठक उभी राहायला हवी. सुसंस्कृत पिढी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नांची गरज आहे. पण असे करणाऱ्यांच्या समोर आता अडथळे उभे केले जात आहेत. चांगले विचार वाईट कसे आहेत. हेच पटवून देण्याचे काम केले जात आहे. अशाने समाजाची मानसिकता ढळत आहे. मने दुबळे करण्याचे काम केले जात आहे. दुःखाच्या जखमांवर मीठ चोळण्याचे प्रकारही होत आहेत. पण अशा प्रकारांनी मन विचलित होऊ नये. याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. आपल्या कर्मावर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. हातून सत्कर्मे घडावी. सदाचार घडावा असा प्रयत्न सुरू ठेवायला हवा. अशाने चांगल्यांची संगत वाढते. पाय ओढणारे अनेक असतात. पण त्यांच्या प्रयत्नांना बळी पडायचे नाही. असा विचार करून वाटचाल करायला हवी. वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना खंबीरपणे सामोरे जायला हवे. मनातील कमजोरपणा टाकून द्यायला हवा. यासाठीच स्थितप्रज्ञ होण्याचा प्रयत्न करायला हवा. स्वः चा विकास हेच आपले ध्येय असायला हवे.