Tuesday, April 30, 2019

पाहण्याचा दृष्टिकोन





प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. दृष्टिकोन बदलता येतो. त्यानुसार त्याच्या व्यक्तीमत्वातही बदल होतात. विचार बदलले की आचारही बदलतो. कृतीमध्ये फरक पडतो. सद्‌गुरू हेच तर सांगतात. देह आणि आत्मा वेगळा आहे. हे ओळखा. हे ज्याने ओळखले त्याच्यामध्ये बदल निश्‍चित होतो. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 9011087406


जरी चंद्रीं जाला कलंकु । तरी चंद्रेंसीं नव्हे एकु ।
आहे दिठी डोळ्यां विवेकु । अपाडु जैसा ।। 273 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - चंद्राच्या ठिकाणी जरी कलंक असलेला दिसतो, तरी तो चंद्राशी एकरूप नाही व दृष्टि आणि डोळा (चर्मगोलक) यांमध्ये जसा अतिशय वेगळेपणा आहे.

कोणाची नजर लागू नये म्हणून काळी टिकली लावण्याची पद्धत होती. ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातही ही पद्धत मानली जायची. ही अंधश्रद्धा आहे. पण हल्ली ही फॅशनही झाली आहे. गालावर काळी टिकली लावली की सौंदर्यात भर पडते. गालावर जर काळा तीळ असेल तर तो सौंदर्य वाढवतो. पूर्वीच्या काळी मात्र सौंदर्याला नजर लागू नये म्हणून ही टिकली लावली जात होती. खरंतर ही टिकली चेहऱ्याचे सौंदर्य वाढवते. नव्या युगात ही फॅशन झाली आहे. कृती तीच आहे फक्त इथे विचार बदलला आहे. या विचारात अंधश्रद्धा नाही. कृतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदलला आहे. तशी ही टिकली चेहऱ्यापासून वेगळीही करता येते. चेहऱ्यावर ती नाही. पण तिच्या असण्याने चेहऱ्याचे सौंदर्य बदलते. चेहरा मुळात आहे तसाच आहे. आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. चंद्रावर काही ठिकाणी उंचवटे आहेत. काही ठिकाणी खोलगट दरी आहे. पण पृथ्वीवरून दिसताना हे भाग चंद्रावर काळे डाग असल्यासारखे दिसतात. पण हा चंद्राला लागलेला डाग आहे का? तर नाही. चंद्र आहे तसाच आहे. डोळ्याला तो तसाच दिसत आहे. पण आपला पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. दृष्टी आणि डोळा यामध्ये फरक आहे. माझ्या एक मित्र होता. त्याच्याकडे एक कार्ड होते. त्या कार्डावरील चित्र प्रत्येक व्यक्तीला वेगळे दिसायचे. तो प्रत्येकाजवळ जायचा आणि ते चित्र कोणते आहे हे ओळखायला सांगायचा. प्रत्येकाला ते चित्र वेगळे दिसायचे. आम्हाला सर्वांना त्यावेळी आश्‍चर्य वाटले हे असे? कोणाला त्या चित्रात सिहांसन दिसले. कोणाला त्यात पक्षी दिसला. कोणाला त्या चित्रात नर्तिका दिसली. कोणाला त्या चित्रात विविध हत्यारे उदाहरणात तलवार, भाला दिसले. असे वेगवेगळे विचार प्रत्येकाने मांडले. चित्र मात्र एकच होते. प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. सिंहासन वाटले ती व्यक्ती राजकीय घराण्याशी संबंधित होती. कोणाला नर्तिका दिसली ती व्यक्ती नृत्य कलेशी निगडित होती. कोणाला तलवार, भाल आदी हत्यारे दिसली त्या व्यक्तीचे वंशज हे शस्त्र कलेशी संबंधित असल्याचे आढळले. हा घडलेला सत्य प्रकार आहे. सांगण्याचा हेतू हाच की प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. दृष्टिकोन बदलता येतो. त्यानुसार त्याच्या व्यक्तीमत्वातही बदल होतात. विचार बदलले की आचारही बदलतो. कृतीमध्ये फरक पडतो. सद्‌गुरू हेच तर सांगतात. देह आणि आत्मा वेगळा आहे. हे ओळखा. हे ज्याने ओळखले त्याच्यामध्ये बदल निश्‍चित होतो. विचारानुसार आचरणही बदलते. हळूहळू त्या व्यक्तीचा आत्मज्ञानाकडे वळतो. सद्‌गुरूंच्याकृपेनी ती आत्मज्ञानी होते.

Sunday, April 28, 2019

कारभारवाडी ठिबकमय (व्हिडिओ)



जैसें मूळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ।।
श्री ज्ञानेश्‍वरीतील पहिल्या अध्यायातील ही ओंवी असे सांगते की झाडांच्या मुळांना पाणी घातले असता अनायासें फांद्या व पाने यांना टवटवी येते. हाच विचार कोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी येथील शेतकऱ्यांनी जोपासत ठिबक सिंचनला एकमुखाने साथ देली. कै. शिवा रामा पाटील सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण गावाने शेतीचे सर्व 102 एकर क्षेत्र ठिबक खाली आणले. पाणी व खत व्यवस्थापनातून या परिसरातील शेतीचे चित्रच पालटले आहे. विशेष म्हणजे या योजनेत एक ते पाच गुठा क्षेत्र असणारे 16 अल्पभूधारक शेतकरीही आता उत्पन्न घेऊ लागले आहेत. पट्टा पद्धत, एक डोळा बेणे, रोप लागवड, काटेकोर पाणी व खत व्यवस्थापन अशा नव्या तंत्राकडे शेतकरी वळल्याने केवळ ५५ लाख लिटर पाण्यामध्ये उसाची उत्पादकताही अधिक वाढली आहे.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 9011087406



रंग लोकसंस्कृतीचे....

रंग लोकसंस्कृतीचे पुस्तक प्रकाशन याप्रसंगी घेतलेला हा व्हिडीओ.

ठिबकमय कारभारवाडी







जैसें मूळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ।।
श्री ज्ञानेश्‍वरीतील पहिल्या अध्यायातील ही ओंवी असे सांगते की झाडांच्या मुळांना पाणी घातले असता अनायासें फांद्या व पाने यांना टवटवी येते. हाच विचार कोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी येथील शेतकऱ्यांनी जोपासत ठिबक सिंचनला एकमुखाने साथ देली. कै. शिवा रामा पाटील सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण गावाने शेतीचे सर्व 102 एकर क्षेत्र ठिबक खाली आणले. पाणी व खत व्यवस्थापनातून या परिसरातील शेतीचे चित्रच पालटले आहे. विशेष म्हणजे या योजनेत एक ते पाच गुठा क्षेत्र असणारे 16 अल्पभूधारक शेतकरीही आता उत्पन्न घेऊ लागले आहेत. पट्टा पद्धत, एक डोळा बेणे, रोप लागवड, काटेकोर पाणी व खत व्यवस्थापन अशा नव्या तंत्राकडे शेतकरी वळल्याने केवळ ५५ लाख लिटर पाण्यामध्ये उसाची उत्पादकताही अधिक वाढली आहे.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 9011087406


बारमाही पाणी उपलब्ध असलेल्या गावांना पाण्याची नेमकी किंमत कळत नसल्याचे दिसून येते. अशा गावांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांचा समावेश होतो. यातीलच कारभारवाडी (ता. करवीर) हे गाव. ऊस उत्पादक गावामध्ये पाटपाण्याचा अतोनात वापर होत राहिल्याने जमिनीचा पोत बिघडला होता. एकरी केवळ २७ ते ३० टन ऊस उत्पादन मिळायचे. न परवडणारी शेती का करायची, तर केवळ पडून राहू नये म्हणून अशी स्थिती.

पारंपरिक पद्धती बदलल्याशिवाय शेती फायद्यात येणार नसल्याची बाब कृषी अधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट झाली. तत्कालिन करवीर तालुका कृषी अधिकारी डी. बी. पाटील, तालुका कृषी अधिकारी हरिदास हावळे, कृषी सहायक सतीश वर्मा यांनी ठिबक सिंचनाचा पर्याय सुचवला. ठिबक सिंचन केवळ पाणी वाचवण्यासाठी करायचे अशी मानसिकता असलेल्या शेतकऱ्यांना समजवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील अहिरवाडी आणि गोटखिंडी या गावांना भेट देण्यात आली.
हसूर दुमाला येथील शेतकरी संतोष पाटील यांचा ठिबकचा प्रकल्पही पाहिला. त्यांच्याशी बोलण्यानंतर, प्रगती पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना विश्‍वास आला. त्यातून २०१५ मध्ये गावात स्वयंचलित ठिबक सिंचन प्रकल्प उभा राहीला. या प्रकल्पानंतर गावच्या शेतीचे स्वरूपच बदलून गाव अधिक एकसंध झाला आहे. शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात दुप्पटी, तिपटीने वाढ झाली. ते आंतरपीकही घेऊ लागले. यातून पैसा खेळता राहू लागला.  
कारभारवाडी दृष्टिक्षेपात ...
  • गावाचे भौगोलिक क्षेत्र - ६९ हेक्‍टर
  • पिकांखालील क्षेत्र - ६२ हेक्‍टर
  • ठिबक खाली आलेले क्षेत्र - १०२ एकर
  • ठिबक योजनेत सहभागी शेतकरी - १३१
  • एक हेक्‍टरपेक्षा कमी क्षेत्र असणारे शेतकरी - १०६
  • एक ते दोन हेक्‍टर क्षेत्र असणारे शेतकरी - २२
  • दोन हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र असणारे शेतकरी - ३
ठिबक सिंचनापूर्वीची स्थिती :
  • पारंपरिक पद्धतीने ऊस व भाताची लागवड.
  • तीन फुटाची सरी, आंतरपीक म्हणून फार तर मका.
  • पाटपाण्याद्वारे नियोजन. अनिश्चित पाणी दिले जाई.
  • भारनियमनामुळे पाणी नियोजनात अडचणी. वेळी अवेळी पाणी देण्यासाठी शेतावर जावे लागे.
  • एकाच वेळी अधिक पाणी देण्याची मानसिकता. अतिपाणी वापरामुळे जमिनीची प्रत खालावलेली.
  • पाटपाण्यामध्ये १५ ते २० एकरासाठी एक ‘टी’ असायची. यामुळे पाटातील तणांचे बी शेतात येऊन तणांचा प्रादुर्भाव वाढत असे. भांगलणीचा खर्च वाढे.
  • एकरी ऊसउत्पादन केवळ २५ ते ३० टन.
  • गावात एक ते पाच गुंठे क्षेत्र असणारे १६ शेतकरी आहेत. पूर्वी शेतातून फायदा नसल्याने शेतीविषयी अनास्था वाढली होती. गावात एकसंधपणा राहिला नव्हता.
ठिबक झाल्यानंतरची स्थिती
  • ऊस लागवडीसाठी पट्टा पद्धतीचा अवलंब. साडेचार फुटाच्या पट्ट्यामध्ये भाजीपाला पिके, झेंडू, कांदा, हरभरा, भुईमूग अशी पिके घेतली जातात.
  • एक डोळा किंवा रोप पद्धतीने ऊस लागवड. बेण्यात बचत.
  • तणाचा प्रादुर्भाव कमी. परिणामी भांगलणीचा खर्च ८० टक्क्यांनी कमी झाला.  
  •  स्वयंचलित ठिबक सिंचन, खतांचे नियोजन यामुळे उसाचे उत्पादन एकरी २७ टनावरून ५० ते ८० टनावर पोहोचले.
  • एकूण उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनामध्ये वाढ. एकरी ५५ ते ८० टनापर्यंत ऊस उत्पादन मिळत आहे.
  • वेळी अवेळी शेतात पाणी देण्याचे कष्ट वाचले. नफा वाढल्याने शेतकऱ्यांत समाधान दिसत आहे.
आता होतेय बचतच बचत
  •   पाटपाण्यावर लागवड करताना एकरी २४०० ऊस बेणे (म्हणजे ३ टन ऊस) लागत असे. अलीकडे एक डोळा पद्धतीने, रोपांची लागवड केली जात असल्याने केवळ ४०० उसांत एक एकर लागवड होते. प्रतिएकर अंदाजे अडीच टन ऊस बेणे व खर्च वाचतो.
  •   पाटपाणी पद्धतीत उसाला एकरी १ कोटी दहा लाख लिटर पाणी लागे. आता ठिबकनंतर एकरी केवळ ५५ लाख लिटर पाणी पुरेसे होते. ५० टक्के पाणी वाचले.
  •   पाटपाण्यासाठी वार्षिक ७८,३०० युनिट वीज वापरली जाई. आता केवळ ५३ हजार युनिट वीज पुरेशी होते. ३२ टक्के वीजबचत झाली.  
  •   स्वयंचलित ठिबक सिंचन पद्धतीतील दुहेरी गाळण यंत्रणातून तणांचे बी येणे रोखले गेल्याने तणांचे प्रमाण अत्यल्प राहते. भांगलणीचा खर्च कमी झाला.
  •   विद्राव्य खतांच्या वापरामुळे ऊस उत्पादकतेत दुप्पट, तिपटीने वाढ.
  •   प्रत्येक शेतकरी खताचे नियोजन पीकनिहाय वेगवेगळे करतो. त्यासाठी ठिबकद्वारे खते देण्यासाठी बॅटरी पंपाचा वापर केला जातो.
  •   असंतुलित खत व पाणी वापर थांबल्याने जमिनीची कार्यक्षमता वाढली.  
  •   उसाबरोबरच भाजीपाला आंतरपिके घेतली गेल्याने खेळता पैसा उपलब्ध झाला.
  •   १ टन ऊस उत्पादनासाठी पाट पाणी पद्धतीत ४०० टन पाणी लागे, ते आता केवळ १२० टन पाण्यातही चांगले उत्पादन मिळत आहे.
  •   पूर्वी पाटपाणी पद्धतीत एकूण उत्पादनखर्च एकरी ६३९०० रु. होत असे, तो आता सुधारीत लागवड पद्धती व ठिबक सिंचनमुळे ४०८०० रु. पर्यंत कमी झाला आहे.
अल्पभूधारकांना फायदा
गावात तीन शेतकरी सोडले तर सर्व शेतकरी अल्पभूधारक आहेत. एक हेक्टरपेक्षा कमी म्हणजे अगदी दहा ते वीस गुंठ्यांमध्ये ऊस किंवा अन्य पिके घेऊन चरितार्थ कसा चालणार, ही विवंचना होती. मात्र, ठिबक सिंचनमुळे एक ते पाच गुंठे क्षेत्र असणारे १६ शेतकरी चांगले ऊस व भाजीपाला उत्पादन घेत आहेत. ही समाधानाची बाब आहे.
अशी होती ऊस उत्पादनातील वाढ
ऊस उत्पादनातील वाढ    शेतकरी (एकूण १३१ पैकी)
०-२५ टक्के वाढ    ९ शेतकरी
२५-५० टक्के वाढ    १७ शेतकरी
५०- ७५ टक्के वाढ    ७५ शेतकरी
७५- १०० टक्के वाढ    ३० शेतकरी   
सामाजिक माध्यमाचा वापर
१३१ शेतकऱ्यांचा व्हॉट्‌सअप ग्रुप तयार केला असून, त्यावर दररोज पाण्याची वेळ निश्‍चित केलला तक्ता पाठवला जातो. त्यानुसार आपल्या शेतात जाऊन निश्चित झालेल्या वेळी केवळ व्हॉल्व सुरू-बंद करावा लागतो. यात कष्ट आणि वेळ दोन्ही वाचले आहेत. नियमित वेळ माहित असल्याने अन्य कामांकडे लक्ष देणे शक्य होते. शेतीसह शेतकरी अन्य कामे, उद्योग, नोकरी यावर निर्धास्त जाऊ शकतात.  संपूर्ण गाव ठिबक सिंचनखाली आल्यानंतर आता संपूर्ण गाव सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी विभागाच्या वतीने शेतीशाळा घेत गांडूळखत व दशपर्णी अर्क निर्मितीचे प्रात्यक्षिके घेतली. त्यातून गावात ३१ गांडूळ खतनिर्मिती युनिट उभे राहिले.
प्रतिक्रिया...
आमची शेती २० गुंठे असून, पूर्वी केवळ ऊस पिकावर अवलंबून होतो. पाच गुंठ्यामध्ये केवळ पाच टन ऊस उत्पादन येऊन खर्च वजा जाता कसेबसे पाच ते सात हजार रुपये मिळत. ठिबक योजनेमुळे वांगीसह अन्य पिकेही घेत आहे. पाच गुंठ्यात वांग्यापासून दीड टन उत्पादन मिळते. बाजारभावानुसार ३० ते ३५ हजार रुपये मिळतात.
- सरिता बाजीराव पाटील
माझे तीन गुंठे क्षेत्र असून, आता मी त्यातून पाच टनांपर्यंत ऊस उत्पादन घेत आहे. सोबत आंतरपीक म्हणून वर्षभर लागणारा भाजीपाला, कांदा, हरभरा, भुईमूग, मका अशी पिके घेतो.
- जगन्नाथ नारायण कांबळे
तिघा भावडांचे मिळून तीन गुंठे क्षेत्र आहे. ते पडीक असे. ठिबक योजनेमध्ये सामील होऊन तीन गुंठ्यात ऊस व भात घेतो. उसाचे तीन ते पाच टन, तर भाताचे तीन पोती उत्पादन येते. आंतरपीक म्हणून जनावरांसाठी मकाही लावला आहे. खर्च वजा जाता दहा हजारांची बेगमी होत आहे.
- दिलीप बंडू कांबळे
दीड एकर शेतीमध्ये ऊस लागवडीतून एकरी ३० ते ३५ टन उत्पादन व ६५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळे. आता ठिबक झाल्यानंतर ऊस उत्पादन एकरी ६५ टनावर पोचले असून, खर्च वजा जाता एक लाख ४० हजार रुपये मिळतात. आंतरपीक म्हणून कोबी, काकडी, रेड कोबी, ब्रोकोली यांसारख्या परदेशी भाज्या घेत आहे. या भाज्या मुंबई -दादर मार्केटला पाठवतो. यातूनही ६० हजार रुपये उत्पन्न मिळते.
- प्रदीप तुकाराम पाटील
३० गुंठे क्षेत्रामध्ये केवळ ऊस पीक घेत असे. मात्र, ठिबक सिंचन प्रकल्प झाल्यानंतर आम्ही अन्य भाजीपाला, मिरची पिकांकडे वळलो. गेल्या वर्षी मी १६ गुंठे मिरची लागवडीतून आठ टन उत्पादन व खर्च वजा जाता ३० हजार रुपये फायदा झाला. यंदा मी २५ गुंठ्यात मिरची व पाच गुंठ्यात चाऱ्यासाठी मका लागवड केली आहे.
- नितीन राजाराम साळोखे
दहा गुंठ्यांवर पाटपाण्याने झेंडूची लागवड असे. सुमारे पंधरा हजार रु. उत्पादन खर्च होऊन ७०० किलोपर्यंत फुले मिळत. २०१५ मध्ये ठिबक झाल्यापासून तेवढ्याच क्षेत्रात दोन हजार किलोपर्यंत उत्पादन मिळत आहे.
- संदीप इंगवले
दोन एकर उसाचे क्षेत्र आहे. पूर्वी पाटपाण्यावर मिळणारे एकरी ३० टन उत्पादन ठिबक सिंचन योजनेनंतर वाढून ४५ टनांपर्यंत पोचले आहे. उत्पादनखर्च कमी होण्यासोबतच वेळीअवेळी पाणी देण्याचा त्रास कमी झाला. ऊस शेती आता फायदेशीर वाटत आहे.
- प्रकाश विठ्ठल साळोखे
- प्रा. डॉ. नेताजी पाटील,
(चेअरमन, कै. शिवा रामा पाटील सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित, कारभारवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर)

Friday, April 26, 2019

समान नागरी कायदा





ज्याच्यात्याच्या पात्रतेनुसार त्याला येथे लाभ आहे. म्हणूनच येथे अनेक जातीचे संत झाले. उच्चनीच असा भेदभाव येथे नाही. येथे सर्वांसाठी समान नागरी कायदा आहे. असा समान नागरी कायदा या देशात पूर्वापार चालत आला आहे. 
- राजेंद्र घोरपडे, 9011087406



समर्थाचिये पंक्तिभोजनें । तळिल्या वरिल्या एक पक्वान्नें ।
तेवी श्रवणें अर्थे पठणें । मोक्षुचि लाभे ।। 48।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - खऱ्या श्रीमंताच्या पंक्तीला भोजनांत खालच्यावरच्या माणसांना एकच पक्वान्न असतें त्याप्रमाणे या गीतेच्या श्रवणानें अर्थज्ञानाने व आवर्तनाने मोक्षच मिळतो.

एका अशिक्षित खेडूत विठ्ठलाचा भक्त होता. पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्याची त्याची तीव्र इच्छा होती. आळंदीहून वारीमधून तो विठ्ठल दर्शनासाठी निघाला. पालखीसोबत तो चालू लागला. आळंदी सोडली पालखी पुण्याकडे निघाली. लाखो भक्त भाविक वारीमध्ये सहभागी झाले होते. कोणी सज्जन होते. कोणी विद्वान होते. कोणी पंडित होते. कोणी तत्त्ववेत्ते होते. कोणी उद्योगपती होते. कोणी वैद्य होते. कोणी श्रीमंत होते कोणी गरीब होते. कोणी थोर होते. कोणी अशिक्षित होते. असे नाना प्रकारचे नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या मुखात मात्र विठ्ठल नामाचा गजर सुरू होता. ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष सुरू होता. सकल संतांचा गजर केला जात होता. सगळे वातावरण भक्तीमय झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा दर्शनासाठी नागरिक उभे होते. पालखीच्या मार्गावर रांगोळी काढली जात होती. पाण्याची कळशी ओतून महिला पालखीचे स्वागत करत होत्या. सर्व जातीधर्मातील, विविध पंथातील नागरिकांसह परदेशी नागरिकही उपस्थित होते. सर्वांना दर्शनाचा लाभ मिळत होता. देवाच्या दारात सगळे सारखेच असतात. दर्शन घेऊन सगळे समाधानी होत होते. वातावरणातील उत्साह वाढत होता. त्याने मनेही फुलत होती. मनाला आलेली मरगळ दूर होत होती. ठराविक दिवसानंतर बॅटरीत पाणी टाकून ती चार्ज करावी लागते. त्याप्रमाणे मनेही चार्ज होत होती. वर्षभरातील दुःखे माऊलीच्या चरणी अर्पण करून मन हलके केले जाते. आता ही फुल चार्ज झालेली मनाची बॅटरी वर्षभर अशीच राहणार होती. दरवर्षी येथे मनाचे चार्जिंग होते. वारीतील उत्साहात मन प्रसन्न होते. हे पाहून-ऐकून त्या खेडूताचे मनही उत्साहित झाले.
थोडे फुढे गेल्यावर खेडूताला एक विनाधारी वारकरी दिसला. त्या विनेच्या तारेच्या सुरात तो गुंग झाला होता. जयघोषाच्या आवाजातही त्याला तो वीणेचा तार ऐकू येत होता. इतके त्याचे मन त्यात गुंतलेले होते. अशी मनाची एकाग्रता पाहून त्या खेडूताचे मनही असेच एकाग्र झाले. त्या विनाधारी वारकऱ्यासोबत तो खेडूत चालू लागला. पुढे काही अंतर गेल्यावर त्या विनाधारीकडे एका मुलाने विना घेण्यासाठी आग्रह धरला. त्याने लगेच विना देण्याची तयारी दर्शविली. विना घेणाऱ्या त्या मुलाने त्याला वाकून नमस्कार केला आणि विना घेतला. विना दिल्यानंतर त्यानेही त्या विना घेतलेल्या मुलाला वाकून नमस्कार केला. दोघांचे ते स्नेह पाहून तो खेडूत भारावून गेला. येथे लहान-थोर असे काही नाही. सर्व सारखेच असतात. विना घेणारा मुलगा वयाने लहान असला म्हणून काय झाले. पण त्याच्यामध्येही तोच आत्मा आहे. जो माझ्या मध्ये आहे. सर्वांच्या ठायी असणारा आत्मा सारखाच आहे. त्या आत्म्याचा हा सन्मान आहे. अशी समानतेची भावना पाहून खेडूताचे मन भरून आले.
दुपार झाली. पालखी विसावली. भोजनाची लगबग सुरू झाली. छोटे छोटे गट करून प्रत्येकाने भोजनाची झोळी उघडली. खेडूतानेही भोजनाची झोळी उघडली. त्यावर एक वारकरी त्याला म्हणाला, काय भाऊ असे एकटे का बसला आहात. या आमच्या पंगतीत बसा. जरा आमची मीठभाकरही चाखून पहा. कशी चवीला झाली आहे ते सांगा. यावर तो खेडूत लाजला. यावर तो वारकरी म्हणाला, येथे लाजला तो उपाशी राहिला. चार चौघात मिसळायला शिका. आपली दुःखे हलकी होतील. मन हलके करायला शिका म्हणजे मनाची मरगळ दूर होईल. नव्या चारचौघांच्या ओळखीने थोड्या वेगळ्या वातावरणाची माहिती होईल. मन प्रसन्न होईल. यावर तो खेडूत त्या वारकऱ्यांच्या गटात सहभागी झाला. प्रत्येकाच्या झोळीत वेगवेगळ्या भाज्या होत्या. प्रत्येकाने थोडी थोडी प्रत्येकाला दिली. वेगवेगळ्या भाज्यांची चव येथे चाखायला मिळाली. या जेवणाच्या गोडीने तो खेडूत प्रसन्न झाला. चालण्यातून आलेला त्याचा सगळा थकवा दूर झाला. पुढे चालण्यासाठी त्याला उत्साह मिळाला.
वारीमध्ये सहभागी झालेले वाणी, शिंपी, कुंभार, चांभार, ब्राह्मण सर्वच जण एकत्र चालत होते. कोणाच्या डोकीवर तुळशी होती. कोणाच्या हाती विना होती. कोणाच्या हाती ज्ञानेश्‍वरी होती. कोणाच्या हाती तुकाराम गाथा होती. कोणी श्‍वेत वस्त्रात होते. तर कोणी भरजरी वस्त्रात होते. सर्वजण येथे एकत्रितपणे चालत होते. कित्येक वर्षापासून महाराष्ट्रात ही वारीची परंपरा आहे.
मोक्ष मिळविणे हीच सर्वांची मनोकामना आहे. देवाचे दर्शन. तो मज भेटावा हीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे. जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका व्हावी आपला हा आत्मा त्यातून मुक्त व्हावा. हा सर्वांचा नवस आहे. आत्मज्ञानाचा, ब्रह्मज्ञानाचा लाभ व्हावा प्रत्येकाची इच्छा आहे. एकाच गोष्टीसाठी सर्वजण एकत्र आले आहेत. पण मनात भेदभाव नाही. काय मिळेल याची चिंता नाही. पण या वाटेवर तो चालत आहे. दर्शनाच्या ओढीने त्याचे चालणे सुरू आहे. पंढरीत गेल्यानंतर दर्शनासाठी वेगळी रांग नाही. एकच रांग आहे. या रांगेतही सर्व भाविक एकत्र आहेत. सर्वांना देवाचे दर्शन हे सारखेच आहे. कोणी मुख दर्शनाच्या रांगेत उभे राहून दर्शन घेते तर कोणी विठ्ठलाच्या चरणी मस्तक ठेवण्यासाठी सात-सात तास रांगेत उभे राहाते. कोणी दर्शन घेण्यासाठी इतका वेळ नाही म्हणून मनात विठ्ठलाचे सगुण रूप आठवून मनानेच दर्शन घेते. सर्वांना समान दर्शन येथे भगवंताचे आहे. ही समानता पाहून तो खेडूत अधिकच भारावून गेला. महाप्रसादही सर्वांना सारखाच आहे. सर्वांचे ध्येय एक आहे. कोणाची भक्ती कशी आहे. कोणाची मनोकामना कशी आहे. कोण कशासाठी इथे आले आहे. कोणाची दृष्टी वक्र आहे. कोणाची दृष्टी सरळ आहे. या ज्याच्यात्याच्या पात्रतेनुसार त्याला येथे लाभ आहे. म्हणूनच येथे अनेक जातीचे संत झाले. उच्चनीच असा भेदभाव येथे नाही. येथे सर्वांसाठी समान नागरी कायदा आहे. असा समान नागरी कायदा या देशात पूर्वापार चालत आला आहे. तो असाच पुढेही चालू राहणार आहे. यासाठी कोणाच्या सत्तेची येथे गरज नाही. या लोकशाहीत सर्वच सत्ताधीश आहेत. शिष्य गुरू आहे. गुरू शिष्य आहे. असाही येथे भेद नाही. सर्वांसाठी येथे एकच भोजन आहे. जयजय रामकृष्ण हरी...



Thursday, April 25, 2019

सोऽहमचे प्रसारक सद्गुरू रामचंद्र महाराज तिकोटेकर



(श्री सद्गुरू रामचंद्र महाराज तिकोटेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विश्वपंढरी येथील मानवता मंदिरात बांधण्यात आलेली पूजा)

सोऽहम साधनेचा प्रसार पूर्व व उत्तर महाराष्ट्र मध्ये आधीपासूनच फोफावला होता. पश्चिम व दक्षिण महाराष्ट्र सोऽहम साधना वाढण्याचा काल खऱ्या अर्थाने रामचंद्र महाराज तिकोटेकर यांच्यापासून सुरू झाला. पुणे शेजारी केळवड हे त्यांचे जन्मगाव. चिंचणीतील गाढे अभ्यासाक आत्माराम दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे वेदाध्ययन झाले भजन, कीर्तनाचाही छंद लागला. वडिलांच्या निधनानंतर रामचंद्रांना सद्गुरूंची ओढ लागली त्या ओढीतूनच ते गाणगापूरला पायी चालत गेले. श्री दत्तगुरुंचे दर्शन घेऊन दोन महिने तेथे राहून दत्तात्रयाची आराधना केली. दत्तगुरूंनी प्रसन्न होऊन स्वप्नामध्ये येऊन महादेव तुला भेटेल असे सांगून चिंचणीत परत जाण्यास सांगितले. पूजेसाठी बागेतील फुले आणण्यासाठी जाताना वाटेत अनपेक्षितपणे महादेवनाथांचे दर्शन झाले. तथापि सद्गुरु प्राप्तीचा क्षण अजून यायचा होता. परंपरा रक्षण, परंपरा वेदाध्ययन, परंपरा तसेच गुरु-शिष्य परंपरा याची जाणीव रामचंद्राच्या ठिकाणी झाल्यानंतर महादेवनाथांनी सोऽहम दीक्षा दिली. रामचंद्र महाराजांनी १८६५ मध्ये कोल्हापुरात अनुग्रह देण्यास सुरुवात केल्यानंतर परंपरेची एक शाखाच येथे वाढू लागली. यामध्ये स्वामी स्वरूपानंद यांचे परात्पगुरु श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर, प्रकांडपंडित श्रीपतीनाथ गोवर्धन आणि वेदांती खंडोकृष्ण तथा बाबा गर्दे यासारख्या शिष्यांचा समावेश होतो. अशा या शिष्यांकडून रामचंद्र महाराजांनी सिद्ध चरित्र हा ग्रंथ लिहून घेतला अत्यंत निगर्वी, शांत वृत्तीने राहणारे, स्वानंद स्वरूपात रममान असणारे रामचंद्र महाराज चैत्र वद्य षष्ठी शके १८१४ इसवी सन १८९२ रोजी श्रीक्षेत्र विजापूर येथे समाधिस्थ झाले.

Wednesday, April 24, 2019

गंगेचे पाणी






गंगेचे पाणी तेच आहे. फक्त त्या पाण्याचा वापर कशासाठी करायचा हे आपण ठरवायचे आहे. ते पाणी प्रदूषित होणार नाही याचा काळजी आपण घ्यायला हवी. नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आता मोहिम राबविण्याची गरज भासत आहे.

आता गंगेचें एक पाणी । परी नेंलें आनानीं वाहणीं ।
एक मळी एक आणीं । शुद्धत्व जैसें ।।196 ।। अध्याय 17 वा

ओवीचा अर्थ - आतां गंगेचे एकच पाणी, परंतु तें निरनिराळ्या मार्गांनी नेले असतां तें एका मार्गाने अमंगलता प्राप्त करून देतें व एका मार्गाने पवित्रत्व उत्पन्न करणारे होते.

रामु प्रगतशील शेतकरी होता. गावात त्याच्या सल्ल्यानुसार अनेकजण शेती करायचे. त्याने अनेकांचा फायदा झाला. अनेकांना त्याने परदेशी वाऱ्याही करवून आणल्या. परदेशातील शेतीची ओळख आपल्या शेतकऱ्यांना व्हावी, हा त्या मागचा त्याचा उद्देश होता. रामुचा मोठा मुलगा हुशार होता. काही शेतकऱ्यांच्या सोबत तो ही इस्राईल दौऱ्यावर गेला होता. त्याला शेतीची आवड होती. परदेशातील तंत्रज्ञान पाहून तो अवाकच झाला. इतक्‍या कमी पाण्यात तेथे आपल्या पेक्षा तिप्पट चौपट उत्पादन घेतले जाते. कोणताही कीड, रोग यावर नियंत्रण करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान आपल्याकडे नाही. वाट्टेत तशा फवारण्या केल्या जातात. याचा परिणाम पिकावर होत आहे. पण तेथे सर्व योग्य पद्धतीने आवश्‍यकतेनुसारच वापरले जाते. आरोग्याचा प्रश्‍नही उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी लागते. अन्यथा आपला माल बाजारपेठेत विक्रीसही घेतला जात नाही. सगळा माल नष्ट करावा लागतो. उलट कायदेशीर कारवाईही आपल्यावर होते. इतके हे प्रगत तंत्र पाहून रामुच्या मोठ्या मुलाचे डोळे उघडले. त्याने वडिलांना अशा पद्धतीने शेती करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असा विचार मांडला. पण चांगले करायला लागले की कोणाची तरी नजर लागतेच. रामुच्या लहान मुलाला हा विचार पटला नाही. तू परदेशात जाऊन आलास म्हणून काय झाले. आपल्या शेतात ते तंत्रज्ञान चालणार नाही. तेथील शेती वेगळी आहे. आपली शेती वेगळी आहे. यावरून दोन्ही भावात भांडण सुरू झाले. रामूची ही दोन्ही मुले शेतीचे तुकडे करायला लागले. मोठा मुलगा समजुतदार होता. रामुलाही शेती वेगळी करण्यातच फायदा वाटला. वाटण्या अखेर झाल्या. लहान मुलाने चांगली नदी काठची कसदार जमीन मागितली. मोठ्याच्या वाटणीला माळरानची जमीन आली. शेवटी भांडणावर पडदा पडला. दोघेही वेगवेगळ्या मार्गाने शेती करू लागले. लहान भावाच्या वाट्याला कसदार जमीन आली होती. नदीकाठीची जमीन असल्याने पाण्याची कमतरता नव्हती. सर्व बागायती जमीन होती. पेरालं ते तेथे उगवत होते. फक्त राबणारे हात त्या जमिनीली हवे होते. लहान भाऊ मोठ्या ईर्ष्येने शेती करायला लागला. ऊस शेतीत वडील विक्रमी उत्पादक होते. त्यांचा आदर्श त्याच्या पाठीमागे होता. पण दोघा भावांच्या वाटण्याने नाराज असलेले वडील फारसे आता शेतीमध्ये लक्ष घालत नव्हते. लहान भाऊ शिकलेला होता. पदवीधर असल्याचा त्याला अभिमान होता. हातात खुरपे घेणे त्याला लाजिरवाणे वाटायचे. पदवीचा मान राखायला हवा. शिकलेलो आहोत आपण. आडाण्यासारखे शेतात राबणे त्याला पसंत नव्हते. तो शेताकडे जातच नसे. सर्व व्यवहार तो घरी बसूनच करत असे. शेतावर फेरफटका मारण्याचीही त्याला लाज वाटे. व्यवस्थापन शाखेची पदवी घेतल्याने नुसते व्यवस्थापन करून शेती करण्यातच त्याला अभिमान वाटे. आज काय इतके मजूर होते. इतक्‍या मजूरांकडून इतके काम होते. सर्व काम पूर्ण झाल्यानंतर पगार काढायचा इतकाच त्याचा उद्योग होता. शेतात काय चालते याकडे तो कधीही पाहात नसे. शेतात कोणती कामे चालतात याचीही माहिती तो घेत नसे.
मोठ्या मुलाच्या वाट्याला जमीन जास्त आली असली तरी ही सर्व जमीन पडीक होती. या जमिनीत पीक पिकविणे हे एक मोठे आव्हानच होते. पण तो डगमगला नाही. त्याने इस्राईलचे तंत्रज्ञान या शेतात राबवायचे ठरविले. त्यानुसार त्याने नियोजनही केले. पाण्याची सोय प्रथम करणेआवश्‍यक होते. या माळरानावर जुनी पडकी विहीर होती. यात फारसे पाणी नसायचे पण उन्हाळ्यापर्यंत पाणी टिकून राहायचे. ही विहीर त्याने दुरुस्त केली. शासनाच्या विविध योजनांतून त्याने ग्रीन हाऊससाठी अनुदान मिळवले, काही बॅंकांकडून कर्जही केले. हे तसे धाडसाचेच काम होते. नुसती शेती पाहून ते तंत्रज्ञान राबविणे तितके जिकिरीचे होते. पण त्याने जिद्द सोडली नाही. सर्व तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. आपल्या देशातील परिस्थितीचाही त्याने आढावा घेतला. आपण आपल्या देशात हे तंत्रज्ञान राबविताना कोणते बदल करायला हवेत याचाही त्याने अभ्यास केला. सुरवातीच्या टप्प्यात त्याने कमी क्षेत्रावर हा प्रयोग केला. यात त्याला चांगलाच नफा मिळाला. त्यानंतर त्याने सर्व माळरानावर हा प्रयोग राबविला. कमी पाण्याच्या वापरावर, कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मोठ्या भावाने कमावले. त्याचा नावलौकिक सर्वत्र झाला. प्रगतशील शेतकऱ्याचा प्रगतशील शेतकरी मुलगा म्हणून त्याची ओळख झाली. त्याची शेती पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक शेतकरी येत. नामवंत, तज्ज्ञही त्याचा सल्ला घेण्यासाठी त्याच्या मागे धावत.
एकदा असेच चार चौघेजण रामुच्या मोठ्या मुलाकडे बसले होते. यावेळी एकजण म्हणाला, आम्हाला जरा जार गोष्टी सांगता तशा लहान भावाला सुद्धा जरा सांगत जावा. यावर रामुच्या मोठया मुलाने आश्‍चर्य व्यक्त केले. त्याला काहीच माहित नव्हते. वाटण्या झाल्यानंतर याने गावातले घर सोडून माळरानावरच संसार थाटला होता. गावातल्या घरात काय घडामोडी घडल्या याची कल्पना नव्हती. पण उत्सुकतेने लहान भावाचे कसे बरे चालले आहे का? याची चौकशी केली. तेव्हा त्याला समजले की हा भाऊ शेताकडे कधी जातच नाही. पिकाला पाणी किती दिले जाते, खते कोणती दिली जातात, ती प्रमाणात दिली जातात का? याकडेही त्याचे कधी लक्षच नव्हते. फक्त कारखान्याला ऊस गेल्यावर बिले गोळा करायला मात्र तो जायचा. अशा या शेतीने दोन-तीन वर्षातच जमिनीला मिठ फुटले. जमिन क्षारपड झाली. दरवर्षी पेक्षा उत्पादन दुपटीने तिपटीने घटले. आता जमिन पड पडण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. अशी कशी दुरवस्था झाली. हे समजनेही कठीण होते. ज्या शेताने गावात विक्रमी उत्पादन दिले ते शेत अवघ्या दोन-तीन वर्षातच पड पडते म्हणजे काय? असा कारभार कसा झाला. मोठ्या भावाला वाटले आपण जगाला सल्ले देत राहिलो. जगानेही आपले सल्ले ऐकले आणि आज तीही मंडळी विक्रमी उत्पादन घेत आहेत. कमी पाण्यात, कमी खर्चात, कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन कोट्याधिश होत आहेत. पण आपल्या घरात अशी अवस्था का व्हावी. हा विचारही मनाला न पटणारा होता. वडिलांनी इतरांना विक्रमी उत्पादन कसे घ्यायचे, याचे सल्ले दिले त्यांच्या मुलांना आता दुसऱ्याचा सल्ला ऐकण्याची वेळ येते, म्हणजे नेमके कोणाचे चुकते. असा प्रकार नेमका घडतोच कसा?
या भावाने तातडीने गावातील घर गाठले. वडील गावातील घरातच राहात होते. त्याने सर्व चौकशी केली. अंधपणे शेती केल्याने ही अवस्था झाली. फुशारकी मारत कधी शेती होत नाही. जास्त शिकला म्हणजे खुरपे हातात धरायचे नाही हा काय नियम झाला का? बर खुरपे राहू दे. शेतावर दररोज नुसता फेरफटका मारला जरी असता तरी शेतात काय घडते याचे ज्ञान झाले असते. शेताच्या बांधावर तरी जायला पाहिजे होते. हे ही साधे ज्याला जमत नाही त्याने शेतीचा नाद सोडावा. शेती अशा माणसाचे काम नाही. घरात बसून शेती होत नाही. आता संगणकाचे युग आले आहे. एक भाऊ संगणकाने मोजून मापून खते, पाणी, फवारण्या करतो तर दुसरा घरात बसून केवळ बिले भागवून उत्पन्न घ्यायला कारखाना गाठतो. लहान भावाला त्याची चूक कळली होती. पण आता काय करणार? मोठ्या भावाने त्याला धीर दिला. माळावरच्या घरात महिनाभरासाठी नेले. तेथे कशापद्धतीने शेती केली जाते याचे ज्ञान शिकवले. संगणकावर मोजून मापून पाणी देण्याची पद्धत पाहून लहान भाऊ अवाकच झाला. असे आपण हे जरी केले असते तरी शेताची जमीन शाबूत ठेवता आली असती. झालेल्या चुका आता त्याला दुरुस्त करायच्या होत्या. जमिनीला मीठ फुटले तर त्यावरही उपाय आहेत. ते उपाय त्याने योजले. आता तोही मोठ्या भावाप्रमाणे विक्रमी उत्पादन घेत आहे. सांगण्याचे तात्पर्य एकच की गंगेचे पाणी तेच आहे. फक्त त्या पाण्याचा वापर कशासाठी करायचा हे आपण ठरवायचे आहे. ते पाणी प्रदूषित होणार नाही याचा काळजी आपण घ्यायला हवी. नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आता मोहिम राबविण्याची गरज भासत आहे. नदीच्या शुद्ध पाण्यात मळीची घाण मिसळायची का? गटारीचे पाणी सोडायचे का? याचा विचार आपण करायला नको का? घाण पाणी नदीत मिसळले तर तो प्रवाह प्रदूषित होणार आणि ज्यांनी विचार करून हे प्रदूषण रोखले त्यांची शुद्धता कायम राहणार.

Tuesday, April 23, 2019

पसायदान





देव म्हणाले तू अवधान राखलेस म्हणून तुला हा ठेवा मिळाला. त्यामुळेच तू या सेवेसाठी पात्र झालास. अशीच तुझी ही सेवा अखंड राहू दे. यावर भक्तही म्हणाला देवा ही सेवा तुम्हीच तर करून घेता. आता तुम्हीच ही सेवा अखंड माझ्याकडून करवून घ्या. असा आर्शिवाद आता मला द्या. हाच प्रसाद आता मला द्या.


म्हणोनि निज अवधान । मज वोळगे पसायदान ।
दीजो जी समर्थु होईन । ज्ञानदेवो म्हणे ।। 473 ।। अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ - म्हणून महाराज, माझ्या व्याख्यानरूपी सेवेबद्दल मला आपलें अवधानरूपी प्रसादाचें दान द्यावें, म्हणजे मी समर्थ होईन, असे ज्ञानेश्‍वरमहाराज श्रोते संतमंडळीस म्हणतात.

तिरुपती बालाजीचा भक्त होता. भजन, कीर्तन, प्रवचन करणे हाच त्याचा उद्योग. विविध देवस्थानांच्या ठिकाणी तो ही सेवा देत असे. यातूनच मिळणाऱ्या पैशातूनच त्याचा चरितार्थ चालायचा. वर्षातून न चुकता एकदा तरी तो भेट देत असे. तिरुमला हे देवस्थान उंच डोंगरावर आहे. तिरुपती शहर या देवस्थानच्या पायथ्याशी वसले आहे. तिरुमलाला हा भक्त तिरुपतीतून दरवर्षी पायी चालत जायचा. नऊ किलोमीटर उंचीचा हा खडा डोंगर पायी चढायचा. पायी वारीचा आनंद काही औरच असतो. काही पायऱ्या चढायच्या दमायला लागल्यावर बसायचे. उंचावरून तिरुपती शहराचे दिसणारे सौंदर्य मनमोहक असते. शहरातील धावपळ, मोठे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ सहज दिसते. या जीवनापासून विरंगुळा म्हणून हा प्रवास निश्‍चितच मनाला उभारी देतो. तिरुमलाचा हा डोंगर खडा आहे. अगदी अर्धा किलोमीटर चालल्यावर धापा लागतात. तरीही हा खडा डोंगर हा भक्त आनंदाने चढायचा. बालाजीच्या प्रेरणेने दर्शनाच्या ओढीने चढताना वेगळी स्फुर्ती यायची. बालाजीचे सर्वांग सुंदर मुख पाहण्याची त्याची ओढ त्याला सहजच वर उचलून घेत असे. घामाच्या धारा आल्यातरी वाऱ्याची एक झुळूक त्याच्या अंगातील सर्व शीण काढून घेत असे. पहिले चार टप्पे खड्या पायऱ्यांचे अतिशय अवघड असेच आहेत. हे चढण्याचे ज्याच्याच सामर्थ आहे तो शक्तीमान, बलवान आहे. म्हणून हे टप्पे झाल्यानंतर स्वतः मारुतराय त्याच्या स्वागतासाठी उभे असतात. भगवान मारुतीची ती महाकाय मुर्ती हीच स्फुर्ती देण्यासाठी तिथे उभी आहे. तू इथे पर्यंत पायी आलास, तू आता बलशाली झाला आहेस. महाकाय बलवान असल्यानेच मी आता स्वतः तुला दर्शन देण्यासाठी उभा आहे. अशी प्रेरणा ही मुर्ती देत असावी. चपळ हरणांचे, महाकाय शिंगांच्या काळविटाचेही उद्यान याच मार्गावर आहे. हरणासारखे चपळ व्हा. अशी प्रेरणा, स्फुर्ती ही हरणे भक्तांना देत राहातात. चालणाऱ्याच्या पायांना यामुळे तशी चपळताही येते. पशू पक्षांची उद्यानेही पदपथावर आहेत. त्याचा चिवचिवाट मन टवटवीत करतो. ते मधुर स्वर ऐकल्यानंतर मनाची सगळी मरगळ दूर होते. इतके ते पक्षी गोड आहेत. सुंदर रंगीबेरंगी पक्षी, महाकाय वृक्ष, महाकाय कडे हे चढणाऱ्याला एक स्फूर्तीच देत राहतात. जीवनाची अशीच महाकाय आव्हाणे झेलण्याचे सामर्थ्यही याचमुळे पायी येणाऱ्या भक्तांना येत असावे. काही भाविक तर या मार्गावरील पायऱ्या ह्या गुडघ्याने चढतात. तरुणांचे ठीक आहे. पण वयस्कर व्यक्तीही उत्साहाने या पायऱ्या चढतात. त्यांचा तो उत्साह पाहून नवख्या तरुणांनाही स्फूर्ती मिळते. या वाटेवरच पुढे नृसिंहस्वामीचे मंदीर आहे. थकलेल्या भक्तांना येथे महाप्रसाद दिला जातो. चालून चालून थोडी भूक लागते. दमायला होते. येथे एका महाकाय वडाच्या वृक्षाखाली या प्रसादाचे वाटप चालते. हा प्रसाद घेतल्यानंतर शेवटचा एक अवघड टप्पा पूर्ण करण्यास यामुळे प्रेरणा मिळते. पायी दर्शनासाठी येणाऱ्या भक्‍तांना सर्वप्रथम बालाजी दर्शनाचा मान यामुळेच दिला असावा. बालाजीचे सर्वांग सुंदर साजिरे रूप पाहिल्यानंतर पायी चालून आल्याचा शीण सारा दूर होतो. हा बालाजीचा भक्त नेहमी पायी चालत यायचा. दर्शन घेऊन तृप्त व्हायचा. मंदीरात हुंडी आहे तेथे अनेक भक्त दान टाकतात. कोणी पैसे दान देतात. कोणी सोने, चांदी, दागिने, जडजवाहिरे दान देतात. देवाला दान देणाऱ्यांची येथे रीघच लागलेली असते. दान देण्यासाठीही येथे रांग आहे. झोळीमध्ये येथे दान स्वीकारले जाते. देवाच्या दर्शनाने तृप्त झालेला हा भक्त दान देण्यासाठी हुंडीजवळ गेला. तो मनात म्हणाला इतका श्रीमंत देव, त्याच्या चरणी साक्षात लक्ष्मी लोळण घेत आहे. तेथे केरातही लक्ष्मीच असते. इतक्‍या श्रीमंत देवाला आपण पैसे देऊन आपण देवाची चेष्टाच करत आहोत. तो लाजला. अरेरे देवाला पैशाची गरजच नाही. जिथे लक्ष्मी ओसंडून वाहते आहे. तेथे आपण टाकलेल्या नाण्यांचे ते काय मोल. त्या नाण्याने देव मला पावणार कसा? देवाला आपण वेगळे काही तरी देऊ. देव आपल्यावर प्रसन्न व्हायला हवा. असे काही तरी आपण दान देऊ? तसे तिरुमला येथे केस दानाची पद्धत आहे. पण कल्याण कट्ट्‌यावर केसदान स्वीकारले जाते. हुंडीत दान काय टाकायचे? दान हुंडीत स्वीकारले जाते. आता या श्रीमंत देवाला पैसा दान देण्याऐवजी आपण त्यानेच दिलेले ज्ञान दान देऊन टाकू. शेवटी ज्ञान हे देवाच्या चरणी अपर्ण करायचे असतेच ना. त्याने निर्णय घेतला. आपण येवढी प्रवचने, भजने, कीर्तने लिहिली आहेत ती त्या झोळीत टाकायची आणि ती सर्व त्याने देवाला अर्पण केली. देवाने ती स्वीकारली. देव प्रसन्न झाला. हा आपला वेगळा भक्त आहे. आवडीचा भक्त आहे. देव म्हणाला माग तुला काय पाहिजे ते माग. भक्त म्हणाला मी काय मागणार? जे काय मिळते ते तुम्हीच तर देता. पैसा, आकडा सर्व तुमच्या मुळेच तर मला मिळतो. जे दान दिले आहे. ते ज्ञान तर तुम्हीच दिले आहे. हे दान आता तुम्ही स्वीकारले आहे. यापुढेही ही सेवा अशीच सुरू राहू दे. हे दान करण्याची संधी मला वारंवार लाभू दे. ही ज्ञानाची स्फुर्ती आता आत्मज्ञानात परावर्तित होऊ दे. ब्रह्मज्ञानाने आता सेवा करण्याची संधी मला मिळू दे. हीच आता तुमच्या चरणी प्रार्थना आहे. जे ज्ञान तुम्ही देता तेच ज्ञान तुमच्या चरणी अर्पण केले आहे. मी एक साधा भक्त आहे. आता मागणे एकच मला ब्रह्मज्ञानाची सेवा करण्याची संधी द्यावी. असे म्हणताच देव अधिकच प्रसन्न झाले. त्यांनी त्या भक्ताला प्रसाद दिला पुढच्या वेळी तू माझ्या भेटीला येशील तेव्हा तू ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी होऊन येशील. आता तुझी ती सेवा आम्ही यापुढे स्वीकारू. भक्त आनंदी झाला. पुढच्यावर्षी बालाजी चरणी तो भक्त ब्रह्मज्ञानी होऊनच गेला. पण त्याची भजन, कीर्तन, प्रवचनाची सेवा अशीच अखंड सुरू राहिली. देव म्हणाले तू अवधान राखलेस म्हणून तुला हा ठेवा मिळाला. त्यामुळेच तू या सेवेसाठी पात्र झालास. अशीच तुझी ही सेवा अखंड राहू दे. यावर भक्तही म्हणाला देवा ही सेवा तुम्हीच तर करून घेता. आता तुम्हीच ही सेवा अखंड माझ्याकडून करवून घ्या. असा आर्शिवाद आता मला द्या. हाच प्रसाद आता मला द्या.



Monday, April 22, 2019

परान्न


अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. गरजूंना अन्न द्यावे त्यातून समाधान मिळते. आशीर्वाद मिळतात. पण त्याच्या गैरफायदा घेणे निश्‍चितच भूषणावह नाही. एका दिवसांच्या परान्नाने आपण काही त्याचे देणे लागत नाही

तैसा माजे स्त्रिया धनें । विद्या स्तुती बहुतें मानें ।
एके दिवसींचेनि परान्नें । अल्पकु जैसा ।। 227 ।। अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ - एक दिवसाच्या परान्नानें जसा दरिद्री पुरूष उन्मत्त होतो, तसा जो स्त्रिया, धन, विद्या, स्तुति व बहुमान यांनी मस्त होतो.

निवडणुका हा खेड्यात उत्सुकतेचा विषय असतो. गावात गट-तट हे असतातच. गल्ली, गल्ली, घरे-घरे गटातटात विभागलेली असतात. हा या गटाचा तो त्या गटाचा असा स्पष्ट भेद असतो. इतकेच काय तर दुसऱ्या गटातील एखादी व्यक्ती तिरडीला उपस्थित राहिली तर त्याची चर्चा होते. कितीही जवळचा असला तरी गटातटांनी एकमेकांत भिंती उभ्या केल्या जातात. इतकी राजकीय परिस्थिती सध्या बिघडलेली आहे. जेवणावळीत दुसऱ्या गटातील माणूस दिसला तर हा इथे कसा? त्याच्याकडे आश्‍चर्याने पाहिले जाते. फोडाफोडी जेवणावळीतच समजते. लग्न समारंभाच्या पंगतीत ही फुटाफुट स्पष्ट दिसते. पूर्वीच्या काळीही जेवणावळी असायच्या पण त्यांचा उद्देश हा वेगळा होता. सभा-समारंभाचा उत्साह यामुळे भंग होत नव्हता. पण आता तसे होत नाही. राजर्षी शाहुंच्या काळातही जेवणावळी असायच्या पण त्याचा उद्देश समाजात एकोपा राहावा हा होता. समाजात निर्माण झालेले गैरसमज, भेदभाव दूर व्हावेत, समाजातील सर्वांनी एकत्र यावे. ही उद्दिष्टे त्यामागे होती. त्याचा परिणामही झाला. समाजातील अनेकांचे प्रश्‍न या जेवनावळीच्या निमित्ताने सोडवले जायचे. काहींना यामुळे आधार मिळायचा. समाधान मिळायचे. जमिनदार, भटभडजी मंडळींचा मात्र याला तीव्र विरोध होता. अशाने समाज बाटला जाईल असा त्यांचा समज होता. चार लोक एकत्र आले तर उद्या त्यांच्या विरोधात आवाज उठविला जाईल अशी भीती त्यांना होती. यासाठी त्यांनी समाजात भेद, दुफळी निर्माण केली होती. फोडा आणि राज्य करा ही त्यांची नीती होती. या जेवणावळींनी याला पायबंद बसला होता. यासाठी त्यांनी अशा जेवणावळींना विरोध केला. दुसऱ्याचे जेवण जेवल्याने आपण बाटतो. त्याचे पाईक होतो. असा समज त्यांनी पसरविला. आत्ताचे राज्यकर्त्येही नेमके याच भावनेचा फायदा घेत आहेत. निवडणुका जवळ आल्या की त्यांच्या जेवणावळी सुरू होतात. या जेवणावळींनीच ते निवडणूक जिंकतात. निवडून आलेला नेता निवडणुकांनंतर दिलेल्या जेवणावळी मात्र वसूल करतो. असे हे अन्नदानाचे राजकारण केले जाते. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. गरजूंना अन्न द्यावे त्यातून समाधान मिळते. आशीर्वाद मिळतात. पण त्याच्या गैरफायदा घेणे निश्‍चितच भूषणावह नाही. एका दिवसांच्या परान्नाने आपण काही त्याचे देणे लागत नाही. कोणी गैरफायदा घेत असेल तर अन्न खाऊनही त्याला विरोध केला जाऊ शकतो. इतका हक्क आपणास घटनेने दिला आहे.

Thursday, April 18, 2019

सत्यवादाचे तप





शक्ती प्रत्येक मानवाच्या ठिकाणी आहे. हेच सत्य आहे. फक्त हे सत्य त्याला पटवून द्यायचे आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुझ्यामध्येच ते सत्य दडले आहे. ते सत्य जागृत करण्याचे तप आता तुला करायचे आहे. चला उठा जागे व्हा, सत्यवादाचे हे तप स्वतः स्वीकारा. याला फळ निश्‍चित येईल.
- राजेंद्र घोरपडे मोबाईल 9011087406

जिया सत्यवादाचें तप । वाचां केले बहुत कल्प ।
तया फळाचें हें महाद्वीप । पातली प्रभु ।। 32 ।। अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ - महाराज, माझ्या वाचेने सत्य बोलण्याचे तप पुष्कळ कल्पांपर्यंत केले, त्या तपाच्या फळाचे हे गीताव्याख्यानरूपी मोठे बेट तिला (माझ्या वाचेला) प्राप्त झाले.

सत्याचा आग्रह तो सत्याग्रह. स्वातंत्र्यपूर्व काळातील आंदोलनेही सत्यावर आधारित असायची. सत्य मेव जयते. सत्याचा नेहमी विजय होतो. यामुळेच ही आंदोलने इतिहासात अजरामर झाली. या आंदोलनांनीच अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधीच्या विचाराने लाखो लोक या आंदोलनात सहभागी झाले. काहींनी देशासाठी प्राणही दिले. अनेकांच्या त्यागामुळेच देश स्वतंत्र झाला. पण आज या स्वातंत्र्यातही पारतंत्र्य असल्याचा भास होतो आहे. इंग्रज गेले आणि स्वकीय इंग्रजासारखे अत्याचार करू लागले. सहकारी संस्था भ्रष्टाचाराने देशोधडीला लागल्या आहेत. सरकारी कार्यालयात पैसे चारल्याशिवाय काम होत नाही. काम लवकर व्हावे सुरळीत व्हावे यासाठी सुशिक्षित मंडळीही पैसे देऊन काम करवून घेत आहेत. भ्रष्टाचार हा आता शिष्टाचार झाला आहे. अशा या नव्या युगात आता पुन्हा एकदा सत्याग्रहाचा झेंडा फडकविण्याची गरज भासत आहे. पण हा झेंडा कोण फडकवणार? कारण फडकवणाऱ्यांच्यावरच जनतेला विश्‍वास राहिलेला नाही. आंदोलने होतात पण ती स्वतःच्या संस्था चालाव्यात यासाठी होत आहेत. राज्यकर्त्यांनीच उभे केलेले सत्याग्रही येथे आंदोलने करत आहेत. सत्याग्रही व्यक्तींचा बोलविता धनी वेगळाच आहे. काही सत्याग्रही तर आता पुन्हा राजकीय पक्ष स्थापन करत आहेत. त्यांनीही आता सत्याग्रह सोडून सत्तेचा आग्रह धरला आहे. इतिहासातही अशी पाने कित्येकदा लिहिली गेली आहेत. पण त्या प्रत्येकवेळी कोणी ना कोणी तरी वाली जन्माला आला आहे. कोणी तरी सम्राट झाला आहे. सत्याचा त्याचा लढा यशस्वी झाला आहे. अशा नैसर्गिक शक्तीमान जन्मन्याची गरज आता प्रत्येकाला वाटत आहे. पण खरे तर ही शक्ती प्रत्येक मानवाच्या ठिकाणी आहे. हेच सत्य आहे. फक्त हे सत्य त्याला पटवून द्यायचे आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुझ्यामध्येच ते सत्य दडले आहे. ते सत्य जागृत करण्याचे तप आता तुला करायचे आहे. चला उठा जागे व्हा, सत्यवादाचे हे तप स्वतः स्वीकारा. याला फळ निश्‍चित येईल. आत्मज्ञानाच्या तलवारीने ही समस्त सृष्टी ब्रह्मज्ञानी करण्यासाठी तयार व्हा. याची सुरवात स्वतःपासूनच करा. स्वतः आत्मज्ञानी व्हा. इतरांनाही आत्मज्ञानी करा.

Monday, April 15, 2019

जिहीं ध्यानाचां डोळां पाहिलासी


ध्यानानंतर शरीराला जडत्व प्राप्त होते. शरीर थंडावते. म्हणजे त्या व्यक्तीच्या चालण्यात बोलण्यात फरक जाणवतो. इतर वेळी ती व्यक्ती चिडखोर असेल तर त्याचा चिडखोरपणा जाऊन त्याच्यामध्ये मृदुता, प्रेमभाव निर्माण झाल्याचे आढळते. त्याच्या बोलण्यातून प्रेम ओसंडून वाहू लागते. त्याच्या शरीरामध्ये एक वेगळे चैतन्य निर्माण होते.
- राजेंद्र घोरपडे, 9011087406


जिहीं ध्यानाचां डोळां पाहिलासी । वेदादि वाचां वानिलासी ।
जें उपसाहिलें तयांसी । तें आम्हांही करी ।। 29 ।। अध्याय 16

ओवीचा अर्थ - ज्यांनी तुला ध्यानाच्या डोळ्यांनी पाहिलें व ज्या वेदादिकांच्या वाचेकडून तूं वर्णन केला गेला आहेस,त्यांचे अपराध जसे सहन केलेस तसे आमचेही करा.

ध्यानयोगी कसा असतो याचे वर्णन दिव्यामृतधारा या ग्रंथात परमपूज्य बाबा महाराज आर्वीकर यांनी केले आहे. ते म्हणतात, ध्यानयोगी हा हठयोगाचाच मार्ग आहे. तथापि सुषुम्नामार्गे येणाऱ्या योग्याप्रमाणे दैवी सामर्थ्यलाभ होत नाही तर दैवी अवस्थानुभव उच्च भूमिकांचे ज्ञान हठयोगाप्रमाणे होत असते. हा जग व शरीर यांकडे ज्ञानयोग्याप्रमाणें दुर्लक्ष करीत नाही. तो जग विनाशी आहे असे मानत नसून ते महत्तत्त्वांत लीन होणारें आहे असे मानतो. देह सोडावा लागणार आहे. हे जरी जाणत असला तरी देहाचा-मनाचा- मुलभूत संबंध चित्तद्रव्यांशी आहे, असे तो जाणतो. देहाचा मनावर व मनाचा देहावर सतत परिणाम होते असे तो मानतो. म्हणून देहाची हेंडसाळ करणे त्याला पसंत नसते. तथापि हठयोगी जसा शरीरशास्त्रवेत्ता व नियंत्रक असू शकतो तसा ध्यानयोगी कधींच असूं शकत नाही. बाबा महाराजांनी केलेल्या या विवेचनावरून ध्यानामध्ये कोणत्या क्रिया शरीरात घडतात. याचा अभ्यास केल्यास देहावर मनाचा परिणाम सातत्याने होतो हे स्पष्ट होते. ध्यानानंतर शरीराला जडत्व प्राप्त होते. शरीर थंडावते. म्हणजे त्या व्यक्तीच्या चालण्यात बोलण्यात फरक जाणवतो. इतर वेळी ती व्यक्ती चिडखोर असेल तर त्याचा चिडखोरपणा जाऊन त्याच्यामध्ये मृदुता, प्रेमभाव निर्माण झाल्याचे आढळते. त्याच्या बोलण्यातून प्रेम ओसंडून वाहू लागते. त्याच्या शरीरामध्ये एक वेगळे चैतन्य निर्माण होते. धान्याने त्वचा तेजस्वी होते. ध्यानामध्ये पित्त जळाल्यानंतर या पित्तातून निर्माण होणारे विविध रसाने त्वचेला तेज येते. उतारवयातही त्वचा तेजस्वी दिसते. धान्याने मनाला येणारी शांती ध्यानयोग्याच्या शरीरावर परिणाम करते. याला शास्त्राचाही आधार आहे. शास्त्रानेही याला मान्यता दिली आहे. ध्यानकाळात शरीरात उत्पन्न होणारी विविध रसायने शरीरावर परिणाम करतात. ध्यानयोगी शरीराचा व मनाचा कसा संबंध आहे हे जाणतो. मन प्रसन्न असेल तर शरीर स्वास्थही चांगले राहाते. ध्यानाने मन प्रसन्न होते. याचा परिणाम शरीरावर होतो व स्वास्थ सुधारते. स्वास्थ राखण्यासाठी तरी ध्यानाची गरज आहे. पण ध्यान योग्य प्रकारे करायला हवे. चुकीच्या प्रकारे ध्यान केल्यास मनाला शांती मिळणार नाही. यामुळे शरीरस्वास्थ अधिकच बिघडण्याचा धोका असतो. यासाठी ध्यान योग्य प्रकारे करावे. यासाठी माऊलीच्या चरणी हीच प्रार्थना आहे की आमचे सर्व अपराध, चुका पोटात घेऊन आम्हाला माफ कर आणि आमच्याकडून योग्य प्रकारे साधना करून घे. आम्हाला आत्मज्ञानी कर.

Saturday, April 13, 2019

गीता





मोहाने ग्रस्त समाजास गीता हाच एक आधार आहे. गीतेच्या तत्त्वज्ञानात मोह घालविण्याचे सामर्थ्य आहे. यासाठी गीता समजावून घ्यायला हवी. ज्ञानेश्‍वरीतील एखादी ओवी तरी अनुभवायला हवी. 
- राजेंद्र घोरपडे, 
श्री अथर्व प्रकाशन, कोल्हापूर 9011087406

तैसी गीता हे जाणितलिया । काय विस्मयो मोह जावया ।
परी आत्मज्ञानें आपणपयां । मिळिजे येथ ।।584।। अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ - त्याप्रमाणें ही गीता जाणली असतां, मोह नाहीसा होतो यांत आश्‍चर्य काय आहे?, मोह तर जाईलच पण या गीतेच्या योगानें आत्मज्ञान होऊन आत्मस्वरूपी मिळता येते.

भगवतगीता किंवा ज्ञानेश्‍वरी का वाचायची? त्यातील तत्त्वज्ञान जाणून घेण्याची गरज का आहे? हे तत्त्वज्ञान आपणास काय सांगते? काय देते? असे प्रश्‍न नव्या पिढीला पडणे स्वाभाविक आहे. कारण हे तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी प्रथम त्या मार्गावर जावे लागते. तशी मनाची मानसिक तयारी असावी लागते. हे तत्त्वज्ञान अनुभवातून शिकावे लागते. सद्‌गुरूंच्या मार्गदर्शनाखाली हे तत्त्वज्ञान आत्मसात होते. सध्याच्या वेगवान जगात अनेक वर्षांच्या तपश्‍चर्येचे महत्त्व सांगणे मुर्खपणाचेच ठरणारे आहे. झटपट निकाल मागणारी मंडळी या मार्गावर येणार तरी कशी हा मुळात मोठा प्रश्‍न आहे. नियोजन बद्ध, साचेबद्ध विचारसरणीमुळे अनेकांच्या जीवनात पैसा अमाप आला आहे. या पैशाने त्यांचे आयुष्य सुखकारक झाले आहे. आज इतके कमविले, उद्या तितके मिळतील नाही मिळाले तरी दुसऱ्या कामातून पैसा कसा मिळवता येतो. याचे गणित तयार असते. कधी कमी कधी जास्त असा हा प्रवास फारशी मनाला निराशा देत नाही. पण एकदा का यामध्ये निराशा शिरली की मग आत्महत्याचा मार्ग स्वीकारणारेही वाढत आहेत. अशा बदलत्या जीवनपद्धतीत थेट टोकाची भूमिका घेण्याचे प्रकारही वाढत आहेत. झटपट जीवनपद्धती जितकी चांगली आहे तितकीच ती धोकादायकही आहे. अशाने नैराश्‍येतून आत्महत्या या प्रकारात वाढ होत आहे. अध्यात्मात झटपट समाधान मिळत नसल्याने हा मार्ग स्वीकारण्यातही त्यांची मानसिकता नसते. असे मार्ग स्वीकारणे म्हणजे लाचारी पत्करणे अशी मानसिकताही झाली आहे. त्यातच आजकाल भोंदू साधूंचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या समस्यांचा फायदा उठवत त्यांना फसविणारेही अनेक भोंदू असल्याने विश्‍वास कोणावर ठेवावा हा सुद्धा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आत्मज्ञानी म्हणणारी मंडळीही गैरप्रकार करताना दिसत आहेत. राजकीय पाठबळाच्या जोरावर त्यांचे अनेक गैर उद्योग सुरू आहेत. अशा परिस्थितीत गीतेचे तत्त्वज्ञान नव्या पिढीला किती आवश्‍यक वाटणार, हा अभ्यासाचाच विषय होणार आहे. तरीही व्यक्तीची इच्छा-आकांक्षा याकडे ओढतेच. मोहाने ग्रस्त समाजास गीता हाच एक आधार आहे. गीतेच्या तत्त्वज्ञानात मोह घालविण्याचे सामर्थ्य आहे. यासाठी गीता समजावून घ्यायला हवी. ज्ञानेश्‍वरीतील एखादी ओवी तरी अनुभवायला हवी. यासाठीच या ग्रंथांची पारायणे करायची असतात. यातून आत्मज्ञानाचा सहज लाभ होऊ शकतो. त्याच्या प्राप्तीचा हा सोपा मार्ग आहे.

Friday, April 12, 2019

कृषी पर्यटन - उत्पन्नाचा नवा स्त्रोत






बदलत्या जीवन शैलीमध्ये पर्यटनाचे महत्त्व वाढत आहे. सध्याच्या धावपळ, धकाधकीच्या जीवनशैलीत निवांतपणा गरजेचा झाला आहे. आठवड्याची सुट्टी शहरापासून दूर निवांत ठिकाणी घालविण्यावर भर दिला जात आहे. यातूनच ग्रामीण भागातील पर्यटनास महत्त्व प्राप्त झाले आहे. चैन म्हणून नव्हेतर गरज म्हणून आता पर्यटन केले जात आहे. यासाठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत व शेतीपूरक व्यवसाय म्हणून आता कृषी पर्यटनाकडे पाहिले जाते. गेल्या वीस वर्षांत महाराष्ट्रात कृषी पर्यटन केंद्रांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः पुणे, ठाणे, कोकण, नागपूर, सातारा या भागात कृषी पर्यटन व्यवसाय वाढीस लागला आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. ऑस्ट्रेलियासारख्या विकसित देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया कृषी पर्यटन आहे. त्यामुळे कृषी पर्यटनाचे महत्त्व विचारात घेऊन देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे शक्‍य आहे.

- राजेंद्र घोरपडे
श्री अथर्व प्रकाशन, कोल्हापूर
मोबाईल 8999732685, 9011087406

रोमन कालकंखात कल्पनेचा उदय
कृषी पर्यटनाचा प्रारंभ हा मुख्यतः रोमन कालखंडात झाल्याचे आढळते. निवृत्त सैनिकांना उपजीविकेचे साधन म्हणून कसण्यासाठी शेती दिली जात असे. हे सैनिक शेतीसह ग्रामीण भागात व्यापारासाठी येणाऱ्या लोकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करत असत. कालांतराने याकडे व्यवसाय म्हणून पाहीले जाऊ लागले. शहरातील लोक थकवा दूर करण्यासाठी ग्रामीण भागात येऊ लागले. यातूनच कृषी पर्यटन ही संकल्पना उदयास आली. शहरी लोक असे पर्यटन करणे पसंत करू लागले.

2005 नंतर महाराष्ट्रात कृषी पर्यटन विकास

शेतीचा काही भाग जाणीवपूर्वक पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करणे म्हणजे कृषी पर्यटन. भारतात सर्वप्रथम 1970च्या दरम्यान बारामती येथे कृषितज्ज्ञ अप्पासाहेब पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी कृषी पर्यटन विकास महामंडळाची स्थापना केली. पण राज्यात 2005 नंतर खऱ्या अर्थाने कृषी पर्यटनास चालना मिळाली. इंटरनेट आणि आयटीचा विकास झपाट्याने झाल्यानंतर आठवड्याची सुट्टी घालवण्यासाठी शहरातील नोकरदार लोक ग्रामीण भागात येऊ लागले. 2005 मध्ये फक्त दोनच कृषी पर्यटन केंद्रे होती. पण जसा शहरात औद्योगिक विकास झाला तसा ग्रामीण भागाकडे पर्यटन म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन वाढू लागला.
 

कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून महाराष्ट्राचा विकास हे उद्दिष्ट समोर ठेवून 2008 मध्ये महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाची (मार्ट) स्थापना करण्यात आली. त्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात कृषी पर्यटन ही नवी संकल्पना उदयाला आली. 2010 मध्ये राज्यात 80 कृषी पर्यटन केंद्रे कार्यरत होती. पडिक जमिनीचा विकास व उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून याकडे पाहीले गेले. ग्रामीण निसर्ग सौंदर्य व संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने पर्यटनास चालना देण्यात आली. त्यामुळे 2013 मध्ये राज्यात 125 केंद्रे सुरु झाली. आता 2019 मध्ये ही संख्या 300 च्यावर गेली आहे. 

मार्टने भौगोलिक विचार करून कृषी पर्यटनाचे राज्यात सहा विभाग केले आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागात पर्यटन केंद्रांना भेडसावणाऱ्या समस्या ह्या वेगळ्या आहेत. कृषी पर्यटन विकास महामंडळाच्या पाहणीनुसार 2014 मध्ये 4 लाख, 2015 मध्ये 5.3 लाख, 2016 मध्ये 7 लाख पर्यटकांनी कृषी पर्यटन केंद्रांना भेटी दिल्या आहेत. यातून 358 लाख रुपये उत्पन्न शेतकरी कुटुंबांना मिळाले.

महाष्ट्रातील कृषी पर्यटनाचे सहा विभाग असे -
कोकण विभाग - मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पुणे विभाग - पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर
नाशिक विभाग - नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदूरबार, जळगांव
औरंगाबाद विभाग - औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड
अमरावती विभाग - अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ
नागपूर विभाग - नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली.

कृषी पर्यटनातील आव्हाने आणि समस्या -

1. कृषी पर्यटनासाठीचे शासनाचे धोरण अध्यापही कागदावरच आहे. कृषी पर्यटन केंद्र अशी स्वतःत्र शासन मान्यता नसल्याने या व्यवसायाच्या वाढीत अनेक अडथळे येतात.

2. कृषी पर्यटनासाठी वीज, पाणी, रस्ता, वाहतुकीची सोय या मुख्य गरजा आहेत. शासनाने या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दुष्काळी पट्ट्यात पाण्याची कमतरता असल्याने तर कोकणातील अनेक दुर्गम भागात रस्ते, वाहतुकीची साधने नसल्याने पर्यटनाची केंद्रे उभारणे अशक्‍य झाले आहे; पण जेथे केंद्रे उभारणे शक्‍य आहे तेथे या प्राथमिक गरजा उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे.

3. कृषी पर्यटन हे शेतीचा जोडधंदा म्हणून याकडे पाहिले जात नाही. अन्य व्यावसायिक धंद्याप्रमाणे यास नियम व अटी लावल्या जातात. हेच व्यवसाय वाढीस अडसर ठरत आहे. उदाहरणार्थ विजेचे बिल व्यावसायिक नियमाप्रमाणे आकारले जाते. मार्च ते मे व ऑक्‍टोंबर ते डिसेंबर असाच पर्यटन हंगाम असल्याने वर्षभर व्यावसायिक दराने वीजबिल भरावे लागते. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत वार्षिक उत्पन्न मिळत नाही.

4. परदेशी पर्यटकांना ग्रामीण भागात राहण्याची हौस असते. ग्रामीण संस्कृती पाहण्यासाठी असे पर्यटक कृषी पर्यटन केंद्रात येतात. पण ते आल्यानंतर संबंधित मालकास पी फॉर्म सादर करावा लागतो. ते आल्याची माहिती सरकारी दप्तरी द्यावी लागते. या माहितीचा हा फार्म भरण्यात ग्रामीण भागात अनेक अडचणी येतात. या फॉर्ममधील जाचक ठरणाऱ्या अटी दूर करण्याची गरज आहे.

5. कृषी पर्यटनासाठी कर्ज देण्यास बॅंकाचा नकार असतो. उत्पन्नाचे ठोस साधन नसल्याने बॅंका तयार होत नाहीत. कर्ज पुरवठ्यात अनेक जाचक अटींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. सवलती व अनुदानाचा लाभ व्हावा यासाठी जाचक अटी दूर कराव्यात.

6. अमरावती विभागात फक्त दिवसा पर्यटक येतात. रात्री राहण्यासाठी पर्यटक येत नाहीत. त्यामुळे येथे पर्यटनास मर्यादा आहेत. त्यामुळे या विभागात पर्यटन केंद्रांची संख्याही खूपच कमी पाहायला मिळते.

7. शेतीमधील अनेक उद्योग हे हंगामी आहेत. पर्यटकांना असे उद्योग आकर्षित करतात. कोकणात आबा प्रक्रिया, पश्‍चिम महाराष्ट्रात गुऱ्हाळघरे याचे आकर्षण पर्यटकांना असते; पण यातही अनेक अडचणी आहेत. उदाहणार्थ गुऱ्हाळ हे केवळ चार ते पाचच महिने असते. त्यातच अवेळी पाऊस पडला तर आठवडा - आठवडा गुऱ्हाळ बंद ठेवावे लागते. अशा कालावधीत काही पर्यटक आले तर त्यांना निराश होऊन परतावे लागते. अशा हंगामी व्यवसायामुळे कायमस्वरूपी पर्यटनाची जोड देण्यात मर्यादा आहेत.

8. पर्यटन केंद्रांवर काही चुकांमुळे छोटे मोठे अपघात घडू शकतात. पर्यटकांना मधमाशा, किडे, साप, विंचू, कुत्रा आदी चावण्याचा धोका असतो. पाळीव प्राणी माणसाळलेले असतात असे नाही. त्यांच्यापासूनही धोका असतो. केंद्र गावापासून दूर व जंगल परिसरात असल्यास वन्यप्राण्यांपासून धोका होऊ शकतो. वाळलेले गवत, चारा, गंज्या केंद्राच्या परिसरात असते. काही पर्यटकांना सिगारेट ओढण्याचा नाद असतो. अशातून आग लागण्याचे, वणवा पेटण्याचे प्रकारही घडू शकतात. पर्यटक शहरी असतात त्यामुळे त्यांना या गोष्टींचा धोका लक्षात येत नाही. बऱ्याचदा केंद्रावर हुल्लडबाजीसाठी, दंगामस्तीसाठीच पर्यटक येत असतात. शेतात फिरत असताना मधमाशांच्या पोळ्यांना दगड मारणे असे प्रकारही घडू शकतात. यातून मोठी दुर्घटना घडण्याचा धोका अधिक असतो.

9. पर्यटक शहरी असल्याने त्यांना खेड्यातील बऱ्याच गोष्टींचा अंदाज नसतो. तलाव, विहीर, नदी दिसली की त्यामध्ये पोहण्यासाठी उतरणे. उत्साहाच्या भरात नकळत अनेक चुका पर्यटकांकडून घडत असतात. झाडावर चढणे असे प्रकारही पर्यटकांकडून घडतात. झाडावर चढण्याचा सराव नसतो तसेच मजबूत फांद्याही भाराने मोडण्याचे प्रकार घडतात यामुळे पडून छोटे मोठे अपघात होऊ शकतात. पोहण्यासाठी उतरल्यानंतर दुर्घटना घडण्याचा धोकाही असतो. उत्साहाच्या भरात पर्यटकांकडून घडणाऱ्या अशा घटना, पर्यटकांच्या या विविध सवयीवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी येतात.

10. दुर्घटना घडल्यास तातडीने वैद्यकीय सेवा देणे अडचणीचे असते. ग्रामीण भागात दवाखाने, उपचार पद्धती तातडीने उपलब्ध होऊ शकत नाही. दळणवळणाचाही अभाव असतो. वाहनांची सुविधाही नसते.

11. बऱ्याचदा मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. इतकी गुंतवणूक करून व्यवसाय झालाच नाही तर याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. त्यातच महसूलच्याही जाचक अटींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.

कृषी पर्यटनातील संधी -

1. गावामधील एक पर्यटन केंद्र कमीत कमी 40 लोकांना रोजगार मिळवून देते. ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीचे साधन म्हणून याकडे पाहायला हवे.

2. व्यावसायिक वीज बिलापासून दूर राहण्यासाठी सौरऊर्जेचा पर्याय निवडता येणे शक्‍य आहे. पावसाळ्यातही चार्ज होणारे सोलर युनीट आता उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे वीज वापराचा अवाढव्य खर्च वाचविणे शक्‍य आहे.

3. शेतीमध्ये एखादी संकल्पना राबविली असेल तर पर्यटक ती पाहण्यासाठी जरूर केंद्रास भेट देतात. त्या संकल्पनेतून, त्या प्रयोगातूनच आपल्या पर्यटन केंद्राची ओळख पर्यटकांना व्हायला हवी. एका एकरात 100 पिके हा प्रयोग कणेरी येथील सिद्धगिरी मठाने केला आहे. पारंपरिक बियाणे वापरून सेंद्रिय उत्पादन यामध्ये घेतले आहे. हा प्रयोग शेतकरी पर्यटन केंद्रावर करू शकतात. या प्रयोगातून पर्यटकाच्या आवडीनिवडीनुसार ताज्या भाजीपाल्याची भाजी, उसाचा रस, कंदमुळे, विविध कडधान्याची भाजी आपण देऊ शकू. विशेष म्हणजे या प्रयोगात सेंद्रिय उत्पादन घेतले जाते. तसेच पारंपारिक बियाण्याचा वापर केला जातो. यामुळे पर्यटनासह पारंपारिक बियाण्यांचे संवर्धन ही होऊ शकते. या सर्व पिकांची ओळखही पर्यटकांना करून देता येणे शक्‍य आहे. ताज्या भाजीपाल्याचा आस्वाद घेता आल्याने शहरी पर्यटकही निश्‍चितच आकर्षित होऊ शकतात.

4. शेतीमधील कोणताही एखादा विषय निवडून तो विषय वैशिष्ट्यपूर्णरित्या विकसित करायचा. त्याचे प्रदर्शन, मांडणी योग्य प्रकारे करायची यातूनही कृषी पर्यटनास चांगले उत्पन्न मिळू शकते. उदाहरणार्थ शेतामध्ये आपण वाडा बांधला किंवा आहे ते घर विकसित केले. त्याच्या आजुबाजुला केळी, आंबा, हळद अशी बागायती विकसित करायची. तसेच त्यावरील प्रक्रिया उद्योगही सुरू करायचा व या उद्योगाचे प्रशिक्षण येणाऱ्या पर्यटकांसाठी उपलब्ध करून द्यायचे.

5. कृषी पर्यटन केंद्राच्या परिसरातील पाहण्यासारखी ठिकाणे मंदीरे, डोंगर, पठारे यांची सैर पर्यटकांना घडवायची. ग्रामीण भागात पक्षी निरीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देता येऊ शकते. पक्षी पर्यटन केंद्रात यावेत यासाठी पक्षांना खाद्य व पाणी साठे व घरटी याची सुविधा करायची. पक्षी संवर्धनासाठी योग्य उपाययोजना करून आपल्या परिसरात आढळणाऱ्या पक्ष्यांची माहिती सांगणारे फलक उभारून पर्यटकांना त्यांच्या सहवास घडवायचा.

6. नक्षत्र गार्डन ही संकल्पनाही राबविता येणे शक्‍य आहे. 27 नक्षत्रे आणि देवता व त्यांचे वृक्ष अशी कल्पना मांडून उद्यान विकास प्रकल्प उभा करायचा. आवडत्या नक्षत्राच्या ठिकाणी, देवतेच्या ठिकाणी, वृक्षाच्या छायेत साधना, ध्यान-धारणा करण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध करून देता येऊ शकते. तसेच बोटॅनिकल गार्डनमध्ये दुर्मिळ वृक्षाचे संवर्धन करून त्यांची तोंड ओळख पर्यटकांना करून देता येऊ शकते. अशा गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात.

7. ग्रामीण संस्कृतीचा अनुभव पर्यटकांना घेता यावा असे उपक्रम, साधने उपलब्ध करून देता येऊ शकतात. उदाहरणार्थ या, राहा, स्वतःचे जेवण ग्रामीण पद्धतीने स्वतः करा. जात्यावर पीठ दळा, त्या पीठाच्या भाकरी चुलीवर करा. पाटा-वरवंट्याने मिरच्या वाटा व त्याचा खर्डा तयार करा, झुणका भाकरीचा आस्वाद घ्या. आमराईत, द्राक्षबागेत, फळबागेत स्वतःच्या हाताने फळे तोडा. त्याचा आस्वाद घ्या, गोठ्यामध्ये जनावरांना चारा घाला, जनावरांच्या अंगावर हात फिरवा, दुध काढा, ताजे दुध प्या, मक्‍याच्या शेतात जा आणि मका आणून तो भाजून खा. अशा सोयी पर्यटकांना देता येऊ शकतात.

8. उन्हाळ्यात उकाडा असह्य होतो. अशा वेळी दुपारच्या वेळी शेतातील डेरेदार वृक्षाच्या सावलीत विसावा घेण्याचा आनंद पर्यटकांना देता येऊ शकतो. या झाडाखाली बांबू हाऊस किंवा गवताची झोपडी बांधून त्यामध्ये राहण्याचा आनंदही पर्यटकांना उपलब्ध करून देता येणे शक्‍य आहे. शहरातील उकाड्यात झोप लागत नाही पण दुपारच्यावेळी डेरेदार वृक्षाच्या सावलीत पडल्या पडल्या झोप लागते. असे निसर्गाचे अनुभव पर्यटकांना देऊन निसर्गाबद्दल त्यांची ओढ, जिव्हाळा वाढविणे शक्‍य आहे.

9. पारंपरिक खेळ, मल्लखांब, साहसी खेळ, विटी दांडू, लेझीम, धनगरी नृत्य, आदिवासी नृत्य, लोकगीते, भजन, घोड सवारी, बैलगाडी सवारी, तलावात बोटींग, फिशिंग, आपपासच्या जगंलात, डोंगरमाथ्यावर पर्यटन, सूर्योदय पॉईंट, सूर्यास्त पॉईंट, चांदणे भोजन, निसर्गाच्या सानिध्यात सहवास अशा विविध सोयी पर्यटन वाढीसाठी करणे शक्‍य आहे.

10. आपआपल्या भागातील ग्रामीण जीवन व जेवणाचा आस्वाद पर्यटकांसाठी आनंददायी ठरू शकतो. जेवणाच्या स्वादावरही पर्यटक आकर्षित होऊ शकतात.

11. वर्षा पर्यटनाचीही जोड कृषी पर्यटनास देता येऊ शकते. कोकण तसेच पश्‍चिम घाटात चिखल पेरणी, धबधब्यात आंघोळ, डोंगरमाथ्यावर पर्यटन असे पर्याय पर्यटकांना उपलब्ध करून देता येऊ शकतात.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे शक्‍य -

1. मराठवाडा, विदर्भात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हुरडा पार्टी तर पुणे व नाशिक विभागात वांग्याच्या भरीत पार्टी होऊ शकते. कोकणात पावट्याच्या, भुईमुगाच्या शेंगाचा लोटा लावणे पद्धत आहे. या खाद्यपदार्थाची पार्टी जानेवारी ते मार्च दरम्यान होऊ शकते. कोकणात मार्चनंतर आंबा, फणस रानमेव्याचा हंगाम येतो या काळात आमरस पार्टी, रानमेवा पार्टी असे उपक्रम राबविणे शक्‍य आहे. विदर्भात संत्रा रस पार्टीचे आयोजनही शक्‍य आहे.

2. तसेच काही सण-उत्सव विचारात घेऊन त्या काळात खाद्य महोत्सव घेणे शक्‍य आहे. उदाहरणार्थ कोजागिरी पौर्णिमेला दूध पार्टी, होळीच्या वेळी पुरणपोळी पार्टी आदी, तसेच केळीचे उत्पादक शिकरण पार्टी, आंबा बागायतदार आमरस पार्टी आदी करू शकतात.

3. कृषी पर्यटन केंद्रांत टोमॅटो, स्वीटकॉर्नचे घेऊन त्याचे विविध पदार्थ पर्यटकांसाठी उपलब्ध केले जाऊ शकतात. टोमॅटो सुप, स्वीटकॉर्न सूप असे पदार्थही पर्यटकांना उपलब्ध करून देता येऊ शकतात. विशेष म्हणजे हे पदार्थ शेतातच पिकवलेले असल्याने ताजे व त्वरित शिजवल्याने ते चविष्टही असतात. अशी विविध पिकांची उत्पादने घेऊन त्यांचे विविध पदार्थ पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिल्यास आपल्या केंद्राची ओळख त्या पदार्थावरून होऊ शकते.

शेतीतील उत्पन्नास आलेली मर्यादा विचारात घेता शेतीपूरक व्यवसायांना चालणा देणे आता गरजेचे झाले आहे. नैसर्गिक डोंगर, दऱ्या खोऱ्यात वसलेली गावे, गड-किल्ल्यांचा परिसर, निसर्ग रम्य पठारे, वनसंपदा, सागरी किनारा, धार्मिक स्थळातील कलाकुसर अशी विविध संपन्नता लाभली आहे. यासाठीच महाराष्ट्रात कृषी पर्यटन वाढीसाठी भरपूर संधी आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या 11.24 कोटी आहे. त्यातले 45.2 टक्के लोक हे शहरांत राहतात. यातील 73 टक्के जनता ही ग्रामीण भागात पर्यटनास जाऊ इच्छिते. यामुळे कृषी पर्यटन व्यवसायास वाढीस भरपूर वाव आहे. अगदी थोड्या जागेत कमीत कमी गुंतवणुकीत शेतकरी पर्यटन उद्योग सुरू करू शकतो. कृषी पर्यटनामुळे कृषी आणि सेवा ही दोन क्षेत्रे एकमेकाशी जोडली जाऊ शकतात. शेतमाल उत्पादनांना बाजारपेठही मिळू शकते. यातून रोजगार, ग्रामीण विकास, संस्कृती संवर्धन होऊ शकेल. शहरातील पैसा ग्रामीण भागात येऊ लागल्याने विकासाचा समतोलही राखला जाईल.

Thursday, April 11, 2019

मृगजळ





आत्मा आणि देह वेगळा आहे. तरीही आपण ते एकच आहे असे समजतो. अनुभवही आला तरीही आपण जागृत होत नाही. पण वारंवार याबाबत सतर्कता राहावी यासाठी ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीमध्ये ही गोष्ट वेगळ्यावेगळ्या पद्धतीने सांगितली आहे.
- राजेंद्र घोरपडे, 8999732685, 9011087406


कां रश्‍मी हन मृगजळा । पासूनि बहुवें अर्जुना ।
जागणें जैसे आना । बोधाचेंचि ।।530 ।। अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ - अथवा अर्जुना, सूर्यकिरणें व मृगजळ यांहून सूर्यमंडळ जसें फारच फार वेगळें आहे. त्याप्रमाणे हा उत्तम पुरूष मागील दोन पुरूषांहून फारच फार निराळा आहे.

उन्हाळ्यात वाळलेले गवत दुरून पाहिले असता तेथे पाण्यासारखे दिसते. प्रत्यक्षात हा भास असतो. तेथे पाणी नसते. रस्त्यावरही बऱ्याचदा पाणी पडले आहे असे वाटते पण, उन्हाच्या किरणांनी तसा भास आपणास होत असतो. प्रत्यक्षात जे नाही त्याच्या मागे धावणे हा मुर्खपणा आहे. आपल्या नजरेला भास होतो. आपण मात्र या गोष्टी खऱ्या आहेत असेच जाणून चालतो. प्रत्यक्ष जीवनातही आपण अशा गोष्टींना फसतो. आपण समजत एक असतो आणि असते मात्र दुसरेच. असे कित्येकदा घडते. मृगजळाच्या आशेने आपण त्याच्यामागे धावत राहातो. ते आत्ता सापडेल मग सापडेल पण ते काही हाती येत नाही. धावून धावून आपणाला मात्र थकवा निश्‍चित येतो. जीवन जगताना अशी अवस्था होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी. जागरूक रहायला हवे. जीवनात अशी मृगजळ दाखवणारी माणसे पावलोपावली असतात. येथे पैसा गुंतवा दाम दुप्पट करून देऊ. असे सांगून पैसा गोळा करणारी अनेक मंडळी फसवतात. आपण मात्र दुप्पट पैसा देतील या आशेने अशा गोष्टींच्या आहारी जातो. सर्वसामान्यच नव्हे तर गर्भश्रीमंतही यात फसतात. चार पैसे कमवायला शिका म्हणजे तुम्हाला पैशाचे मोल समजते. असा सल्ला आपणाला आईवडिलांकडून बऱ्याचदा ऐकायला मिळतो. पैसा कमवत नाही तो पर्यंत तरी हे बोल ऐकावेच लागतात. पण आईवडील सांगत असलेल्या ह्या गोष्टी किती सत्य आहेत हे आपणास आपण स्वतः पैसे कमवायला लागल्यानंतर लक्षात येतात. हाच संस्कार आपण आपल्या मुलांवर करतो. जीवनात अनुभव आल्यानंतरच जागरूकता येते. अनुभव आल्याशिवाय शहाणपण येत नाही हे यासाठीच म्हटले जात असावे. ठेच लागल्याशिवाय सुधारणा होत नाही हेही तितकेच खरे आहे. एकदा ठेच लागल्यानंतर दुसऱ्यांदा अशी चूक होणार नाही याची काळजी आपण घ्यायला शिकले पाहिजे. अन्यथा आपण आयुष्यभर अशाच ठेचा खात राहणार. सुधारणा कधीच होणार नाही. एकदा सांगितले आत्मा आणि देह वेगळा आहे. तरीही आपण ते एकच आहे असे समजतो. अनुभवही आला तरीही आपण जागृत होत नाही. पण वारंवार याबाबत सतर्कता राहावी यासाठी ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीमध्ये ही गोष्ट वेगळ्यावेगळ्या पद्धतीने सांगितली आहे. शिष्य जागा व्हावा, शहाणा व्हावा. या त्यामागचा उद्देश आहे. अनुभवातूनच शिकायचे आहे. मृगजळ आहे हे एकदा समजले की पुन्हा डोळ्याला तसा भास होणार नाही. यासाठी जागरूक राहायला हवे. अनुभवातूनच अनुभूती येते. अनुभूतीतुनच आत्मज्ञान प्राप्ती होते.

Tuesday, April 9, 2019

वैराग्य



संसारात काय अनित्यता आहे. हे जाणणे. ओळखणे व त्यानुसार आपल्या जीवनात बदल करणे हा संन्यास आहे. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
मोबाईल - 8999732685

तैसी संसारा या समस्ता । जाणिजे जैं अनित्यता ।
तैं वैराग्य दडवितां । पाठीं लागे ।। 39 ।। अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ - त्याप्रमाणें या सर्व संसाराला अनित्यता आहे, असें ज्या वेळेला कळेल, त्यावेळी वैराग्याला घालवून दिलें तरी, तें वैराग्य आपण होऊन साधकाच्या पाठीमागें लागेल.

मासे जसे पाण्याबाहेर काढल्यानंतर जिवंत राहण्यासाठी तडफडतात. तसे मनुष्य जगण्यासाठी तडफडत आहे. हे सर्वसामान्यांचे जीवन पाहून सम्राट अशोकाच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले. साम्राज्याचा त्याग त्याने केला. मिळालेले ऐश्‍वर्य त्यागने ही तितकी सोपी गोष्ट नाही. आरामात जीवन जगताना असे वैराग्य उत्पन्न होणे तितकी सहज घटना नाही. पुढे हा सम्राट गौतम बुद्ध झाला. मुंबईतील लोकलची गर्दी पाहून रेल्वे स्थानकावरूनच एखाद्या खेडूताने गावचा रस्ता पकडला. त्यात आश्‍चर्य करण्यासारखे काही नाही. मुंबई, पुणे अशा शहरातील जीवन हे असे धावपळीचे आहे. गावाकडे कष्टाचे जीवन असले तरी अशी धावपळ नसते. त्यात एक शांती असते. समाधान असते. शेतात राबल्यानंतर दुपारची भाकरी खाऊन झाडाखाली निवांत पडले असता गाढ झोप लागते. शहरात असे होत नाही. पण शहराला सोडणे हा त्याग म्हणता येणार नाही? ही तेथील जीवनाची दगदग पाहून केलेली पळवाट आहे. हा संन्यास ही होत नाही. हे वैराग्य तर निश्‍चितच नव्हे. कामावरून आले तरी घरात शांतता नसते. एकतर सतत टीव्ही सुरू असतो. आपल्या घरात सुरू नसला तरी शेजाऱ्यांचा आवाज आपणास त्रास देत असतो. शांत पडावे म्हटले, तरी पडता येत नाही. तरीही आपण ते जीवन जगतो. त्याचा आनंद उपभोगत असतो. पूर्वीच्या काळीही नगरातील जीवन हे असेच धावपळीचे होते. जगण्यासाठी धडपड होती. संसार म्हटले की चिंता ह्या आल्याच. मुलांची चिंता, आई-वडिलांची चिंता, स्वतःची चिंता. काही ना काही चिंतेचा विषय जरूर असतोच. कोणी आजारी असेल तर त्याची चिंता. स्वतः आजारी असलो, तर स्वतःची चिंता. मन सतत अशाने विचलित होत राहाते. काहींना हा विचार इतका मनाला लागतो की ते या संसाराचा त्याग करतात. खरंतर घरच्या कटकटीतून बाहेर पडावे यासाठी संसाराचा त्याग म्हणजे पळवाट आहे. संसारात काय अनित्यता आहे. हे जाणणे. ओळखणे व त्यानुसार आपल्या जीवनात बदल करणे हा संन्यास आहे. संसाराचा त्याग करून हिमालयात गेला तरी दररोजच्या जेवणाची चिंता असतेच. यासाठी कष्ट हे करावेच लागतात. हिमालयात गेला तर फक्त वातावरण बदलते इतकाच काय तो बदल होतो. मग घरदार सोडण्याचा फायदा काय? हिमालयात जाऊन जे करणार ते घरात राहूनही करू शकतोच ना? संसारात राहूनही सन्यस्थ जीवन जगता येते. त्यासाठी हिमालयात जाण्याची गरज नाही. संसार होत असतो तो करावा लागत नाही. परमार्थ मात्र करावा लागतो. दैनंदिन कामकाज हे प्रत्येकालाच करावे लागते. राजा असला तरी त्याला त्याचे काम करावेच लागते. रंकात राहात असणारा नागरिकालाही काम हे करावे लागते. ते टाळता येणे शक्‍य नाही. ही दैनंदिन गरज आहे. अमाप संपत्ती असली तरी ती सांभाळण्याचे काम तरी त्याला करावेच लागते ना? हे काम आपोआप होत असते. संसारातील अनित्यता जो ओळखतो तो काही न करता परमार्थाच्या वाटेवर येतो.

मोहरूपी महारोग





मनाला चांगल्या विचारांची सवय लावायला हवी. मन सतत समाधानी राहावे अशी सवय लावायला हवी. मन समाधानी असेल तर मोह होत नाही. जे मिळते ते त्यांच्या कृपेने मिळते, त्यांच्या आर्शिवादाने मिळते. अशी समर्पनाची भावना अध्यात्मात यासाठीच निर्माण केली गेली आहे. मन समाधानी राहावे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

तरी कृपाळू तो तुष्टो । यया विवेकु हा घोंटो ।
फिटो । महारोगु ।। 412।। अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ - तरी तो कृपाळू श्रीकृष्णपरमात्मा संतुष्ट होवो आणि या धृतराष्ट्रास हा आत्मानात्मविचार सेवन करण्याचे सामर्थ्य देवो. आणि याचा मोहरूपी महारोग नाहीसा होवो.

ैसमाधान नसल्यास मोह वाढतो. एखाद्या गोष्टीने मन तृप्त व्हायला हवे. संतुष्ट व्हायला हवे. अमुक इतका पगार वाढला. आणखी वाढ हवी होती. मिळाली नाही. त्यात समाधान झाले नाही, तर पैसा कमविण्याचे इतर मार्ग शोधण्याकडे कल वाढतो. मनाप्रमाणे पैसा मिळत नाही तोपर्यंत चैन पडत नाही. पैसा हा कमवायलाच हवा. पगारवाढ ही प्रत्येक कर्मचाऱ्याचा आवडता विषय आहे. पगार वाढत नाही म्हणून पैसा कमविण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब योग्य नाही. पैसा चांगल्या मार्गाने पैसा कमविला जात असेल तर ठीक आहे. पण एकदा का गैरमार्गाने पैसा कमविण्याचा मोह लागला तर तो स्वतःचे आयुष्यही संपवू शकतो. चांगल्या गोष्टीची सवय लागायला वेळ लागते. पण वाईट गोष्टीची सवय लगेच लागते. हा सर्वांत मोठा धोका आहे. वाईटाच्या संगतीत चांगलाही बिघडतो. तो तंबाखू खातो. आपणही जरा खाऊन पाहावी. एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा ती खाण्याचा मोह होतो. नंतर ती पुढे सवयच लागते. धृतराष्टाला दुर्योधनाला महासत्ता बनविण्याचा मोह होता. इतरांपेक्षा तो श्रेष्ठ ठरावा यासाठी तो इतरांवर छलकपट करायचा. इतर अनेकजण त्याच्या मुलापेक्षा श्रेष्ठ आहेत हे ध्रुतराष्टाच्या मनाला कधी पटलेच नाही. मोहाने तो इतका आंधळा झाला होता. मोह असावा पण आंधळे होण्यापर्यंत मोह नसावा. तंबाखूने कर्करोग झाला तरीही तंबाखू खाण्याचा मोह सुटत नाही. त्यात समोर मृत्यू असूनही मोहाने तो त्याला दिसत नाही. इतके अंधत्व येते. मोह हा असा महाभयंकर रोग आहे. रोग झाला तर तो बरा करण्यासाठी औषध घ्यावे लागते. असाध्यरोग झाला तरी तो बरा होण्यासाठी औषध घेतले जाते. मोहाच्या महारोगावर औषध आहे. विवेकाने वागणे, सात्त्विक वृत्ती वाढविणे हे मोहाच्या रोगावर औषध आहे. मनात विवेक जागा राहावा यासाठी प्रयत्न करायला हवेत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावायला हवी. मन सतत समाधानी राहावे अशी सवय लावायला हवी. मन समाधानी असेल तर मोह होत नाही. जे मिळते ते त्यांच्या कृपेने मिळते, त्यांच्या आर्शिवादाने मिळते. अशी समर्पनाची भावना अध्यात्मात यासाठीच निर्माण केली गेली आहे. मन समाधानी राहावे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. अशा विचारांनी मोहापासून मन दूर जाते. मनाला मोहच होत नाही. मोहाच्या महारोगावर हे जालीम औषध आहे.