Wednesday, November 14, 2018

चैतन्यया उपाधिमाजी गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।
तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ।। 126 ।। अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ - या देहादी प्रपंचामध्ये सर्वत्र चैतन्य गुप्त रुपाने आहे. तत्त्व जाणणारे संत ते ओळखून त्याचेच ग्रहण करतात.

तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे. माणसाप्रमाणे काम करणारा संगणक केव्हाच संशोधकांनी शोधला आहे. आता तर त्याही पुढे जाऊन तो माणसाशी संवाद करत आहे. माणसाला तो प्रत्येक कार्यात सल्लामसलत करत आहे. माणसाच्या वेदना तो जाणू लागला आहे. नाडी तपासून रोग निदान करणारे वैद्य आहेत. पण आता संगणकही हे काम करू लागला आहे. शरीर पंचमहाभूतांपासून तयार झाले आहे. संगणकही अशाच पंचमहाभूतापासून तयार झाला आहे. शरीरात जसा आत्मा आला आहे. तसा संगणकात आपण प्रोग्रॅम भरला आहे. माणसाला हे दाखवून देत आहे की देहात जसे चैतन्य घातले आहे. तसे ते इतर निर्जीव वस्तूतही घालून त्याला सजीव करता येते. पण हे चैतन्य हा आत्मा हा या देहापासून वेगळा आहे. तो काढला की, तो देह निर्जीव होतो. संगणकातील प्रोग्रॅम काढला की संगणकही निर्जीव होतो. तसे हे आहे. देहात आलेले हे चैतन्य ओळखायचे आहे. हे चैतन्य जो जाणतो तो संतपदाला पोहोचतो. संत हे चैतन्यच तेवढे स्वीकारतात. एखाद्याचे हृद्‌य खराब झाले असेल तर दुसऱ्याचे हृद्‌यही त्या शरीरात बसविता येते. ठराविक कालावधीत हा बदल करता येऊ शकतो. तंत्रज्ञानाने ते शक्‍य झाले आहे. पण हे करताना ज्याचे हृद्‌य बसविले जाते त्याचा जीव तो वैद्य वाचवू शकतो का? त्याचा कार्यकाल कायम ठेवू शकतो का? तसे तो करू शकत नाही. कारण जीव शरीरात येणे आणि जाणे हे त्याच्या हातात नाही. हा आत्मा सर्वांच्यामध्ये आहे. तो येतो आणि जातो. तो आला म्हणजे प्रकट झाला असे आपण समजतो. तो गेला म्हणजे मृत झाला, असे आपणास वाटते. पण प्रत्यक्षात तो प्रकटही होत नाही आणि मृतही होत नाही. तो नाशवंत आहे. तो अमर आहे. ती जी वस्तू आहे. ते जे चैतन्य आहे. तेच तर आपणास ओळखायचे आहे. त्याच्यावरच तर नियंत्रण मिळवायचे आहे. साधनाही त्याचसाठी करायची आहे. एकदा का आपण त्याला ओळखलं. त्याच्यावर नियंत्रण मिळवले. तर आपण आत्मज्ञानी होतो. ते ज्ञान आपल्या सदैव सोबत असते.आपण त्या संतत्वाला पोहोचतो. जीवनात येऊन हेच मुख्य कार्य करायचे आहे. जीवनाचा अर्थ यामध्ये दडला आहे. जीवनाचे हेच मुख्य कार्य आहे. यासाठी आपला जन्म आहे. तो सार्थकी लावण्यासाठी ही साधना आवश्‍यक आहे. चैतन्य ओळखा आणि जीवन समृद्ध करा.


Tuesday, November 13, 2018

श्रवणद्वारें


देखे हे शब्दाची व्याप्तिं । निंदा आणि स्तुति ।
तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ।। 114 ।। अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ - निंदा आणि स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे. कर्णद्वारानें जसें निंदेच्या किंवा स्तुतीच्या शब्दांचे सेवन होईल तसे क्रोध किंवा लोभ अंतःकरणांत उत्पन्न होईल.

नेहमी चांगल्याच्या संगतीत असावे हा संस्कार आपणावर लहानपणापासून केला जातो. आपली मुले बिघडू नयेत. हा त्या मागचा उद्देश असतो. वाईट सवयी पटकन आत्मसात केल्या जातात. पण चांगल्या गोष्टी लवकर आत्मसात होत नाहीत. चांगल्या संगतीत राहिले की चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. चांगले विचार मनात उत्पन्न होतात. चांगल्या कृती हातून घडतात. त्या विचारांची मग मनाला सवय होते. मन भरकटत नाही. एखाद्याला तंबाखू खाण्याचे व्यसन असेल. तर तो नेहमी तंबाखू खाणाऱ्यांशी संगत करतो. त्यांचा सहवासात, मैत्रीत त्याच व्यक्ती असतात. त्यांची बैठकही एकत्र असते. या बैठकीत एखादा तंबाखू न खाणारा गेला तर त्यालाही तंबाखू खाण्याची सवय लागू शकते. बहुंताशी असेच घडते. आपल्या आसपासच्या विचारांचा आपल्यावर सातत्याने प्रभाव होत असतो. नव्यापिढीस सहसा हा विचार पटताना दिसत नाही. सातत्याने नवे शोध लागत आहेत. बाजारात सातत्याने नवनवीन उपकरणे, गेम्स येत आहेत. संगणकाच्या युगात, मोबाईलच्या जगात आज मनाला खिळवून ठेवणारी अनेक साधणे उपलब्ध आहेत. मन अशा गोष्टीतच गढून गेले आहे. मनमोकळे करायला दोन दिवस परगावी फिरायला गेले, तरी प्रवासात ही साधनेच हातात असतात. इतकी त्याची सवय आपणास झाली आहे. निसर्गातील सौंदर्य पाहून मन प्रसन्न करण्याचे भानही त्यांना नसते. मनाला प्रसन्न करणारे खेळही आता या इलेक्‍ट्रॉनिकच्या जगात उपलब्ध आहेत. इतके खेळ आले आहेत की, ते नुसते पाहायचे म्हटले तरी तितका वेळ पुरेसा होत नाही. तास-न-तास त्यात वाया घालवत आहोत, याचे भानही या नव्यापिढीला नसते. पण त्यातून मिळणाऱ्या आनंदावर ही पिढी प्रगती करत आहे. विकास करत आहे. पण हा विकास कधीही, कोणत्याहीक्षणी जीवन संपवू शकतो. याचे भान त्यांनी ठेवायला हवे. या नव्या उपकरणांचा योग्य वापर करण्याची सद्‌बुद्धी जागरूक असायला हवी. काही छुल्लक कारणावरून आत्महत्या, खून, मारामाऱ्या हे याचमुळे पडत आहेत. कारण संयम हा प्रकारच नव्या पिढीत कमी होताना दिसत आहे. यासाठी आपण नव्या पिढीच्या हातात काय देत आहोत. त्यांच्यावर कोणते संस्कार व्हायला हवेत, याचे भान ठेवायला हवे. कानाला चांगले ऐकण्याची सवय यासाठी लावायला हवी. आध्यात्मिक प्रगतीसाठीही हाच नियम आहे. कानाला सोऽहमचा नाद ऐकण्याची सवय हवी. हा स्वर आपल्या मनावर अनेक चांगले संस्कार करतो. मनाची स्थिरता ठेवतो. सातत्याने हा स्वर ऐकला तर मनाचा संयम वाढतो. एकाग्रता वाढवतो. सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी याची गरज आहे.


Sunday, November 11, 2018

मनशुद्धीमनशुद्धीचां मार्गी । जैं विजयी व्हावें वेगी ।
तै कर्म सबळालागी । आळसु न कीजे ।। 139 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - मनाची शुद्धता होण्याच्या मार्गात आपण लवकरच विजयी व्हावें असें वाटत असेल, तर चित्त शुद्ध करण्याच्या कामीं समर्थ असणारें जे कर्म, तें आचरण करण्याच्या कामीं आळस करू नये.

साधनेत मन रमण्यासाठी, आत्मज्ञान प्राप्तीसाठी अंगी ऊर्जा असावी लागते. पण ही ऊर्जा येते कशी? ऊर्जा उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही. ऊर्जा ही एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाते. हा ऊर्जेचा नियम आहे. याचा अर्थ ऊर्जा ही आपल्या शरीरातच असते. शरीरातील या ऊर्जेचा वापर आपण योग्य पद्धतीने करायला हवा. ही ऊर्जा योग्य कामासाठी उपयोगात आणायला हवी. यासाठी उपलब्ध ऊर्जेचे संवर्धन हे गरजेचे आहे. संवर्धनासाठी मनशुद्धी हवी. मनात चांगले विचार, आचार असतील तरच ऊर्जेचे संवर्धन होते. मनशुद्धीचे विविध मार्ग आहेत. समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेले मनाचे श्‍लोक जरी आठवले, तरी मन शुद्ध होते. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. भक्ती हा मनशुद्धीचा उत्तम मार्ग आहे. भगवंताची भक्ती, सद्‌गुरुंची भक्ती यातून मनाचे पावित्र्य वाढते. पण येथे तर भक्तीतच मन लागत नाही. मग मन शुद्ध कसे होणार? साधनेतच मन रमत नाही. हे मन रमण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मन स्थिर होण्यासाठी शरीरात शांती उत्पन्न होईल, असा आचार ठेवायला हवा. तसा विचार करायला हवा. राग आला तर तो गिळायचा नाही, तो विसरायचा. गिळालेला राग पुन्हा वर येऊ शकतो. पण विसरलेला राग पुन्हा येण्याची शक्‍यता फारच कमी असते. दुसऱ्याचा द्वेष करण्याआधी स्वतःमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण स्वतः मोठे होण्याचा प्रयत्न करायला हवा. द्वेषामध्ये ऊर्जा खर्च करण्याऐवजी आपण चांगले काही तरी करून मोठे कार्य करण्यात ऊर्जा वापरायला हवी. मनशुद्धीसाठी मनाला असे वळण लावायला हवे. मन बदलले तर सर्व काही बदलू शकते. ऊर्जेच्या संवर्धनाचा विचार मनात जोपासायला हवा. अशी व्यर्थ जाणारी ऊर्जा आत्मज्ञान प्राप्तीसाठी वापरायला हवी. सध्या टिव्हीमुळे मनोरंजन होते. पण हे मनोरंजन आपल्या जीवनात, आचरणात बदल घडवते. याकडे लक्ष द्यायला हवे. लैंगिक विचार आपली ऊर्जा मोठ्या प्रमाणात नष्ट करत आहेत. कामाची हाव आपली शक्ती व्यर्थ घालवत आहे. शरीरात असणारी ही ऊर्जा साठवणे म्हणजेच ब्रह्मचर्य पाळणे होय. यासाठी ब्रह्मचर्याचा विचार हा उपयोगात आणायला हवा. संसारात राहूनही ब्रह्मचर्य पाळता येते. मुले कोणाला नको आहेत? सर्वांनाच हवी आहेत. पण गरजे पुरतेच याकामी उर्जा खर्ची घालायला हवी. त्याचा वापर करायला हवा. इतर वेळी तो विचार मनात आणून ऊर्जा नष्ट करू नये. ही ऊर्जा साठवायला हवी. काही संतांच्या मते ही ऊर्जा अगदी सहजपणे आत्मज्ञान प्राप्ती करून देऊ शकते. ही ऊर्जा ज्याने साठवली तो सहज आत्मज्ञानी होऊ शकतो. सहजसमाधी साध्य तो करू शकतो. यासाठी ब्रह्मचर्य हवे. ब्रह्मचर्याने मनाची शुद्धी होते. यासाठीच ब्रह्मचर्य पाळण्यात आळस करू नये.

Wednesday, November 7, 2018

स्वरुपना तरी मठीं आकाश जैसें । मठाकृती अवतरलें असे ।
तो भंगलिया आपैसे । स्वरुपचि ।। 142 ।। अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ - ज्या प्रमाणे आकाश हें मठात मठाच्या आकाराचें झालेले दिसते पण तो मठ मोडल्यावर तें आकाश सहजच आपल्या मूळ रूपाने राहाते.

स्वतःचे रुप कसे आहे. कोण काळा असतो. कोण गोरा असतो. कोणी सावळे असते. हे बाह्यरुप आहे. बाह्यरुपात कोणी सुंदर असते तर कोण दिसायला कुरुप असते. पण हे रुप आहे ते देहाचे आहे. हा आकार अनुवंशीक रचनेनुसार ठरतो. विज्ञानाने आता सुंदर मुलांचीही निर्मिती केली जात आहे. अनुवंशीक रचनेत योग्य ते बदल करून आकार बदलता येऊ शकतो. रंग बदलला जाऊ शकतो. धान्याच्याही अशाच पद्धतीने जाती विकसित केल्या जात आहेत. उत्पादन वाढीचे जनुक घालून त्यांचे उत्पादन वाढविले जात आहे. विविध कीड रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता उत्पन्न केली जात आहे. पण या नव्या जाती फारश्‍या टिकावू नसतात. सुरवातीच्या दोन तीन पिढ्यांमध्ये या जाती उत्तम उत्पादन देतात. त्यानंतर मात्र त्यांची गुणवत्ता राहात नाही. यावरुन मानवांमध्ये केले जात असलेल्या बदलावरही असाच परिणाम दिसणार, हे निश्‍चित आहे. पण तरीही असे प्रयोग केले जात आहेत. भावी काळात नऊ महिने गर्भाशयात जीव वाढविण्याचे प्रकारही बंद होतील. असे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. पण याचे दुःष्परिणामही विचारात घ्यायला हवेत. सध्या दुःष्परिणामांचा विचारच केला जात नसल्याने अनेक गंभीर समस्या उभ्या राहण्याची शक्‍यता आहे. केवळ सध्यस्थितीचाच विचार केला जात आहे. सध्या फायदा मिळतो ना. मग पुढचा विचारच होत नाही. अशा दुरदृष्टीच्या अभावानेच सर्वत्र गंभीर समस्या उभ्या राहात आहेत. तापमानवाढ असो किंवा पर्यावरणाचा ह्यास असो किंवा सध्या विकसित होत असलेले नवे तंत्रज्ञान असो. केवळ त्यामध्ये वरवरचा व सध्यस्थितीचाच विचार दिसून येत आहे. बाह्यरंगालावरच सर्व भुलले जात आहेत. अंतरंगात डोकावण्याचा कोणी विचारच करत नाही. अशामुळेच खरे स्वरुप प्रकट होत नाही. खरे स्वरुप हे अंतरंगात सामावलेले आहे. पाण्याने भरलेल्या मठात आकाश दिसते. आपण सध्या मठातील आकाशच पाहात आहोत. पण हे आकाश खरे नाही. हा मठ फुटल्यानंतरच खरे त्याचे स्वरुप स्पष्ट होते. मठ म्हणजे देह आहे. आपण देहालाच खरे स्वरुप समजू लागलो आहोत. बाह्यरुपालाच खरे स्वरुप समजत आहोत. पण हे खरे स्वरुप नाही. मानवाचे खरे स्वरुप हे आत्मा आहे. या देहाच्या अंतरंगामध्ये असणारा आत्मा हेच मानवाचे खरे स्वरुप आहे. पण त्याकडे पाहण्यास आपणास वेळच नाही. मठ जसा फुटल्यावर आकाशाचे खरे रुप समजते, तसे हा देह संपल्यानंतरच आपणास त्याची प्रचिती येते. देहात आहे तोपर्यंत त्याची माहिती घेण्याची आपण तस्तीही घेत नाही. त्यामुळे आपले खरे स्वरुप आपणास समजत नाही.


Sunday, November 4, 2018

अवधानतरी अवधान एकवेळें दीजें । मग सर्वसुखासि पात्र होईजे ।
हे प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ।। 1 ।। अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - श्री ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात, अहो श्रोते हो, तर तुम्ही एक वेळ (माझ्या बोलण्याकडे) लक्ष द्या म्हणजे मग सर्व सुखाला प्राप्त व्हाल हें माझें उघड प्रतिज्ञेचें बोलणें ऐका.

साधना करायला हवी. गुरूंनी दिलेला मंत्र जपायला हवा. पण प्रत्यक्षात आपण ते करतो का? हा प्रश्‍न स्वतःच स्वतःच्या मनाला विचारावा. बऱ्याचदा याचे उत्तर नाही असेच येते. आपण साधनेला बसतो पण मन साधनेत नसते. साधना म्हणजे अवघड काम. हे आपणाला शक्‍य नाही. अध्यात्माचा मार्ग म्हणजे खडतर तपश्‍चर्या. असे काहीतरी नको ते विचार आपल्या मनात सातत्याने घोळत असतात. कारण आपणाला एक मिनिटही शांत बसून राहाता येत नाही. आता तर मोबाईल, इंटरनेट, टीव्ही यांनी तर आपल्या विचारांना अधिकच प्रोत्साहन दिले आहे. जरासा जरी फोनचा आवाज झाला तर कोणाचा मेसेज आहे हे पाहण्याकडे आपण पटकन धावतो. झोपेत असतानाही मेसेच आला तरी जागे होऊन तो पाहतो. इतके आपले जीवन त्याच्या आहारी गेले आहे. साधनेकडे मात्र पाहायला आपणाला वेळही नाही. साधना काय आहे? हेच आपण विसरलो आहोत. यामुळेच साधना आपणास अवघड वाटू लागली आहे. पण प्रत्यक्षात तर साधना अहोरात्र सुरू असते. सोऽ हम चा जप सुरूच असतो. कारण प्रत्येक श्‍वास हा सो ऽ हमचा स्वर आहे. श्‍वास हाच सोऽहम मंत्र आहे. त्याच्यात काहीच खंड पडत नाही. सतत तो सुरू असतो. साधना तर सुरू असते. मग आपणाला काय करायचे आहे? हेच तर जाणून घ्यायला हवे. प्रत्येक श्‍वासात सोऽहम, सोऽहम, सोऽहम असा हा स्वर, नाद सुरू असतो. तो स्वर, नाद आपण पकडायचा आहे. त्यावर नियंत्रण मिळवायचे आहे. तो स्वर आपण आपल्या कानांनी ऐकायचा आहे. त्या स्वरामध्येच आपण डुंबून जायचे आहे. हीच तर साधना आहे. पण असे होत नाही. मनात हजार विचार घोळत असतात. आज हे करायचे आहे. आज असे झाले पाहिजे. तसे झाले पाहिजे. भूत, भविष्यांने आपला वर्तमानही त्याच विचारात गुंतलेला असतो. आपण साधनेला बसलेले असतो. श्‍वास, जप मात्र सुरू असतो. कृतीत साधना असते. पण मनात साधना नसते. मनातील विचारात साधना आणायला हवी. विचारात आली की आपोआपच आचरणात येईल. यासाठी अवधान द्यायला हवे. सतत सुरू असलेल्या त्या स्वरावर लक्ष केंद्रित करायला हवे. तो स्वर शरीराने म्हणजे कानाने, मनाने, अंतःकरणाने ऐकायला हवा. तरच खरी साधना होते. अन्यथा साधना तर सुरूच असते. पण त्याला साधना म्हणत नाहीत. यासाठीच अवधानाला महत्त्व आहे. हे अवधान ढळता कामा नये. हे अवधान प्रत्येक शिष्याने जपायला हवे. हे ज्याला जमले. त्या शिष्याला सर्वसुखे प्राप्त होतात. आत्मज्ञानाचे सुख त्याला प्राप्त होते. ती अनुभूती त्याला येते. त्याच्या शरीरात, मनात, आचारात, विचारात तसा फरक दिसू लागतो. त्यांचे जीवन अमरत्वाला पोहोचते. यासाठी फक्त अवधान असायला हवे.

Friday, November 2, 2018

स्थितप्रज्ञुतो कामु सर्वथा जाये । जयातें आत्मतोषीं मन राहे ।
तोचि स्थितप्रज्ञु होये । पुरुष जाणें ।। 293 ।। अध्याय दुसरा

ओवीचा अर्थ - तो काम ज्याचा सर्वथैव गेलेला असतो व ज्याचे मन (निरंतर) आत्मसुखांत (निमग्न) राहाते, तोच पुरूष स्थितप्रज्ञ होय असे समज.

आत्महत्या कशामुळे घडतात? मानसाचे मन इतके कमजोर कशामुळे होते? मानसाची मानसिकता इतकी का ढळते? जीवन संपविण्याचा विचार येतोच कसा? मन इतके भरकटते. इतके मन दुबळे आहे का? मानसिक समाधान नसल्यानेच आत्महत्या होतात. मन नियंत्रणात ठेवल्यास ही समस्या दूर होऊ शकते. आत्महत्या हा मानसिक आजार आहे. यावर उपाय एकच स्थितप्रज्ञु होण्याचा प्रयत्न करणे. त्यादृष्टीने विचार सुरू केला तरी हा आजार बरा होऊ शकतो. पण स्थितप्रज्ञ व्हायचे म्हणजे नेमके काय? मनातील सर्व इच्छा टाकून द्यायच्या. इच्छा ठेवून कोणतेही कर्म करायचे नाही. स्वतःचे मन स्वरूपाच्या ठिकाणी ठेवून संतुष्ट व्हायचे. हे ज्या पुरुषाला जमते त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. परीक्षेत मनासारखे यश मिळाले नाही. प्रयत्न करुणही अपयश आले. प्रयत्न कमी पडले. अशाने मनात निराशा येते. अशावेळी अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असा विचार करून मार्गस्थ व्हावे. एकदा अपयश येईल. दोनदा येईल. तिसऱ्यांदा तरी मनासारखे यश मिळेल ना? प्रयत्न सोडायचे नाहीत. मनाची स्थिरता ढळू न देता प्रयत्न करत राहायचे. आजकाल कोणी मैत्रीस नकार दिला म्हणूनही आत्महत्या करतो. फेसबूकवर मैत्रीस नकार मिळाला म्हणून आत्महत्या. नव्या जमान्यात संवादाची माध्यमे बदलली आहेत. तशी मैत्रीची समीकरणेही बदलली आहेत. कोणाला काय आवडेल हे सांगता येणे कठीण आहे. अशा संवादातून नैराश्‍य निर्माण होत आहे. पण ही निराशा जीवन संपविण्यापर्यंत असू शकते हे न पटणारे आहे. संवादाच्या माध्यमांचा हा दुष्परिणाम आहे. सुसंवाद व्हावेत यासाठी प्रयत्नांची गरज आहे. सुविचारांची बैठक उभी राहायला हवी. सुसंस्कृत पिढी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नांची गरज आहे. पण असे करणाऱ्यांच्या समोर आता अडथळे उभे केले जात आहेत. चांगले विचार वाईट कसे आहेत. हेच पटवून देण्याचे काम केले जात आहे. अशाने समाजाची मानसिकता ढळत आहे. मने दुबळे करण्याचे काम केले जात आहे. दुःखाच्या जखमांवर मीठ चोळण्याचे प्रकारही होत आहेत. पण अशा प्रकारांनी मन विचलित होऊ नये. याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. आपल्या कर्मावर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. हातून सत्कर्मे घडावी. सदाचार घडावा असा प्रयत्न सुरू ठेवायला हवा. अशाने चांगल्यांची संगत वाढते. पाय ओढणारे अनेक असतात. पण त्यांच्या प्रयत्नांना बळी पडायचे नाही. असा विचार करून वाटचाल करायला हवी. वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना खंबीरपणे सामोरे जायला हवे. मनातील कमजोरपणा टाकून द्यायला हवा. यासाठीच स्थितप्रज्ञ होण्याचा प्रयत्न करायला हवा. स्वः चा विकास हेच आपले ध्येय असायला हवे.


Tuesday, October 30, 2018

योगायोग


ना तरी जांभया पसरे मुख । तेथें अवचटें पडे पीयूख ।
तैसा संग्रामु हा देख । पातला असे ।। 195 ।।

आळस आला म्हणून तोंड उघडले पण त्याचवेळी तोंडात अमृत पडले. किती हा योगायोग? हा योग जुळून यावा लागतो. तो सहजपणे आला आहे. आत्मज्ञानासाठीची ही लढाईही अशीच योगायोगाने आली आहे. सद्‌गुरू भेटीसाठी धावा करावा लागतो. भगवंताची आठवण सदैव राहावी यासाठी सतत दुःखे मागणारेही भक्त येथे आहेत. पण आपणास सद्‌गुरु सहजपणे भेटले आहेत. भक्तीच्या या वाटेवर आपण कसे आलो याचा अभ्यास आपण करायला हवा. कशी याची गोडी लागली? कसे आपण यात रमलो? कसे यातून आपले जीवन सुकर झाले? दुःखाच्या क्षणातही या मार्गावरील काटे कधी पायाला टोचले नाहीत. कधीही आपले मन खचले नाही. ताठपणे उभे राहण्याचे सामर्थ्य या मार्गाने दिले. मनाला मोहात टाकणाऱ्या अनेक घटना घडत राहिल्या, पण त्यातून आपण कसे सावरत गेलो. हे कसे घडले? मनोधैर्य देणारी ही शक्ती आहे तरी कशी? हे जाणू घेण्याचा हा योग आहे. हा केवळ योगायोग आहे. जगात नवेनवे शोध दररोज लागत आहेत. शोधाचा वेग वाढतच चालला आहे. जग आता आपणास जवळ वाटत आहे. सातासमुद्रापारची माहितीही आता क्षणात घर बसल्या सहजपणे उपलब्ध होऊ शकते. जगही आपणास आता लहान वाटू लागले आहे. त्यामुळे आता इतर ग्रहावर मानव डोकावू लागला आहे. सूर्य मालेतील विविध गृह-तारेही त्याने शोधले आहेत. दररोज नवा शोध समोर येतो आहे. पण याला काही मर्यादा आहेत. हे जेव्हा तो जाणतो तेव्हा तो स्वतःचा शोध घेण्यामागे लागतो. मी कोण आहे? हे शोधण्याची त्याला आठवण होते. तो पर्यंत तो सर्वत्र भटकत राहातो. तिन्ही लोकांमध्येही त्याला रस वाटत नाही. तो जेव्हा कंटाळतो, तेव्हा आळसाच्याक्षणीही त्याला संजीवनी अगदी सहजपणे मिळते. त्याने तो तृप्त होतो. भीती पोटी कोणताही भक्त आत्मज्ञानाच्या वाटेवर येत नाही. दुःख झाले म्हणून तो येथे येत नाही. या वाटेवर येण्याचे ते एक निमित्त असते. अनायासे तो या मार्गावर येतो. मन बळकट करणारा हा मार्ग आहे. मनाला धीर देणारा हा मार्ग आहे. पण या मार्गावर आपण सहजपणे आलो आहोत. जीवनाची ही वाट सहजपणे आपणास पार करायची आहे. जीवनाच्या या प्रवासात विविध उद्योग आपण करत असतो. यात प्रत्येकवेळी आपणास नफा होईल असे नाही. कितीही मोठा उद्योजक असला तरी नुकसानीचे चटके त्याला सोसावेच लागतात. म्हणून खचायचे नसते. नुकसान का झाले, यावर उपाय योजायचे असतात. बळकट मनाने त्याला सामोरे जायचे असते. भरपूर मिळाले म्हणूनही हर्ष करायचा नसतो. सुख-दुःखात मनाला स्थिर ठेवायचे असते. आत्मज्ञानाच्या या लढाईत स्थिरतेला अधिक महत्त्व आहे. तरच ही लढाई जिंकता येते. अनायासे आपण ही लढाई लढत आहोत. तेव्हा मनाची स्थिरता ही कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.