Monday, January 30, 2012

चाणक्‍य उदयाची गरज

ह्रद्‌या ह्रद्‌य एक जालें । ये ह्रद्‌यींचे तें ह्रद्‌यीं घातले ।
द्वैत न मोडितां केले । आपणा ऐसे अर्जुना ।।

पुर्वीच्या काळी गुरू - शिष्य यांचे नाते कसे होते हे या ओवीतून स्पष्ट होते. आपला शिष्य आपल्यापेक्षा कसा श्रेष्ठ होईल यावर गुरूंचा भर असायचा. त्यांना घडविण्यासाठी वेळप्रसंगी ते मोठा त्यागही करायला मागेपुढे पाहात नसत. शिष्याची प्रगती हेच त्यांचे एकमेव ध्येय असे. या कार्यातच त्यांना समाधान वाटत असे. पूर्वीची शिक्षणपद्धती ही त्यागाची होती. ध्येयाची होती. यामुळेच या संस्कृतीत अनेक थोर विचारवंत घडले. थोर महात्मे हे या मार्गदर्शनामुळेच घडले. शिक्षण पद्धतीतील हा विचार सध्याच्या पिढीतील शिक्षण पद्धतीत दिसत नाही. शिष्याच्या प्रगती हे ध्येय ठेवणारे शिक्षक फारच कमी पाहायला मिळतात. अशानेच शिक्षण क्षेत्राची पिछेहाट होत आहे. त्यागाची भावना हा विचार तर केव्हाच मागे पडला आहे. शिक्षणाच्या नावावर व्यवसाय उभारला जात आहे. या क्षेत्रास बाजारी स्वरूप प्राप्त झाले आहे. पैशाला महत्त्व प्राप्त झाले आहे. विचारापेक्षा, गुणवत्तेपेक्षा पैसा श्रेष्ठ झाला आहे. धनाने पदव्या विकतही मिळत आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पदव्या विकण्याचा व्यवहार करणारेच सत्तेत आघाडीवर आहेत. अशा या शिक्षणपद्धतीतून थोर विचारवंत कसे निर्माण होणार? पैशाने तोलला जाणारा शिष्य शेवटी पैशाचाच विचार मांडणार. तोच व्यवहार करणार. सत्ता अशांच्याच हातात असल्याने यात बदल करू पाहणाऱ्यांचे हात कापले जात आहेत. विचारवंतांनी दुसरे मार्ग स्वीकारले आहेत. पर्यायी मार्गाने जाऊन स्वतःचा बचाव ते करत आहेत. अशा परिस्थितीनेच शोषण व्यवस्था उदयाला आली आहे. हे मोडायला हवे असे सर्वसामान्यांना वाटत आहे. पण तसे घडत नाही. हा धुमसता विचार कधीतरी फुटणार यात शंकाच नाही. पण या ज्वालामुखीच्या उद्रेकाला एका विचारावंताची गरज आहे. चाणक्‍यांसारख्या गुरूची आवश्‍यकता वाटत आहे. गुरू शिष्याचे नाते समजणारा विचारवंत तयार व्हायला हवा. अशा गुरूचा उदय झाला तरच या शोषण व्यवस्थेतून देश मुक्त होण्याची धुरस आशा दिसू लागेल. या चाणक्‍याच्या उदयाचीच सध्यातरी प्रतिक्षा करावी लागेल.


राजेंद्र घोरपडे, 9011087406

Sunday, January 29, 2012

सद्‌गुरूंचा प्रसाद

मग अभिन्ना इया सेवा । चित्ता मियांचि भरेल जेव्हा ।
माझा प्रसादु जाण तेव्हां । संपूर्ण जाहला ।।

प्रत्येकाला प्रसादाची अपेक्षा असतेच. देवदर्शन केल्यानंतर प्रसाद मिळावा, ही अपेक्षा असतेच. सद्‌गुरूंचे दर्शन घेतल्यानंतर मनात त्यांनी पेढा द्यावा हा विचार येतोच. त्यात गैर असे काहीच नाही. सद्‌गुरू तर प्रसाद वाटण्यासाठीच असतात. भक्त तृप्त व्हावा अशीच त्यांची इच्छा असते. भक्तांच्या तृप्तीतच त्यांना समाधान वाटत असते. भक्त तृप्त झाला. समाधानी झाला. तरच भक्ताचे मन साधनेत रमेल. त्याची अध्यात्मिक प्रगती होईल. साधनेत मन गुंतण्यासाठी तृप्ती यावी लागतेच. अमाप पैसा मिळाला म्हणजे मन समाधानी होते असे नाही. द्रव्यातून समाधान लाभते असेही नाही. मुळात या वस्तूंची लालसा कधीही सुटत नाही. या वस्तू कितीही मिळाल्यातरी त्यातून समाधान मिळत नाही. कितीही पगार वाढला तरी तो कमीच वाटतो. पैसा कितीही मिळाला, तरी तो पुरतच नाही. मग अशातून मनास समाधान, तृप्ती येतच नाही. संपत्तीची समृद्धता आली, तरी मनास समाधान वाटेल असे नाही. अनेक श्रीमंत लोकांना रात्री झोपताना गोळ्या खाव्या लागतात. तेव्हाच झोप लागते. मग पैसा कसले समाधान देतो. सुख देतो. थोडा विचार केला, तर असे लक्षात येईल की प्रेमाची एक थाप जरी पाठीवर पडली तर त्यातून मनाला निश्‍चितच समाधान मिळते. आईचा हात पाठीवरून फिरल्यानंतर बाळाला लगेचच झोप लागते. प्रेमामध्ये इतके सामर्थ्य आहे. सद्‌गुरुंना नमन केल्यानंतर त्यांनी डोक्‍यावर हात ठेवला, तर शरीरातील सर्व व्याधी दुर होतात. इतका आधार वाटतो. दुःखाचा डोंगर जरी कोसळला असला तरी तो दूर होतो. इतके सामर्थ्य त्यांच्या आशिर्वादात आहे. प्रेमाचा आधार हा सर्वात मोठा आहे. प्रेमाने प्रगती होते. यासाठी इतरांवर प्रेम करत राहावे. असे केल्यास स्वतःलाही समाधान मिळते व इतरांनाही समाधानी केल्याचा आनंद मिळतो. सद्‌गुरूंचा हाच तर सर्वात मोठा प्रसाद आहे. त्यांच्या सहवासात प्रेम ओसंडून वाहात आहे. त्यात डुंबायला शिकले पाहीजे. त्यांच्या प्रेमाचा सहवास लाभावा. हा त्यांचा प्रसाद मिळावा. याची इच्छा असावी.

राजेंद्र घोरपडे, 9011087406