Saturday, October 23, 2010

मनाची चंचलता

एहींचि पांचे द्वारी । ज्ञानासिं धांव बाहेरी ।
जैसा कां हिरवे चारी । भांबावे पशु ।।

मनाला नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मन स्थिर राहिले तरच साधना होते. मन नेमके भरकटते कशामुळे ? आपणास जेवताना अनेक पदार्थ समोर ठेवले तर हे खाऊ का ते खाऊ असे होते. मन चलबिचल होते. एकदम सगळे पदार्थ पाहून काही वेळेला खाण्याची इच्छाच राहात नाही. असे आपणास कित्येकदा होते. कुरणातील हिरवागार चारा पाहून जनावरेही भांबावतात. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत. या ज्ञानेंद्रियावर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक आहे. साधनेच्या काळात आपल्यामध्ये सूक्ष्म विचार करण्याची वृत्ती निर्माण होते. अति खोलवर एखाद्या गोष्टीचा विचार होतो. दूरचे आवाच स्पष्ट ऐकू येतात. दूरचे वासही स्पष्ट समजतात. इतकी ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता वाढते. दूरच्या वासाने मन विचलित होऊ नये यासाठी काही जण साधना करण्यापूर्वी उदबत्ती लावतात किंवा काही जण सुगंधी अत्तर फवारतात. सुगंधामुळे मनाला मोहकता येते. मन प्रसन्न राहते. असे अनेक उपाय साधना करताना योजले जातात. हेतू एकच असतो की मन स्थिर राहावे. मन चंचल होऊ नये. पण मन भरकटते म्हणून साधना सोडून देणे योग्य नाही. आवाजामुळे मन विचलित होऊ नये यासाठी मनच स्थिर होणे गरजेचे आहे. ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले असे म्हटले जाते. चंचलता हा मनाचा गुणधर्म आहे. हे विचारात घेऊन मनात विचारच उत्पन्न होणार नाहीत, यासाठी प्रयत्न व्हायला हवा. गुरूमंत्रावर मन स्थिर करायचा प्रयत्न करायला हवा. हळूहळू साधनेने हे शक्‍य होते. फक्त यासाठी प्रयत्नांची गरज आहे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Wednesday, October 20, 2010

आत्मज्ञानाचे फळ

नातरी विधीचिये वाफे । सत्क्रियाबीज आरोपे ।
तरी जन्मशत मापें । सुखचि मविजे ।।

शेतात कोणती पिके घ्यायची हे शेतकऱ्याला आधी ठरवावे लागते. योग्यवेळी योग्य पिके घेतली तरच भरपूर उत्पादन मिळते. बाजारभावानुसारही पिकांचे नियोजन करावे लागते. तरच नफा मिळतो. पुढील काळातील गरजा ओळखून पिकांची निवड करावी लागते. सध्या शेतीचे स्वरूप बदलले आहे. आधुनिक तंत्राने शेती केली जात आहे. अधिक उत्पादनासाठी नव्या सुधारित जातींची निवड केली जात आहे. पण योग्य जमिनीत योग्य तीच पिके घ्यावी लागतात. वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळी पिके घेतली जातात. हे जे ठरले आहेत त्यानुसारच शेती केली तर ती फायदेशीर ठरते. अन्यथा शेतीत मोठा फटका बसू शकतो. मेहनत करूनही ती व्यर्थ जाते. अध्यात्मातही तसेच आहे. येथेही नियमांचे पालन करावे लागते. कोणतीही गोष्ट करायची म्हटले की त्यासाठी असणारे नियम हे पाळावेच लागतात. अन्यथा सर्व व्यर्थ जाते. अध्यात्मात प्रगती साधायची असेल तर गुरूंचा शोध घ्यावा लागतो. गुरू हा आत्मज्ञानी असावा लागतो. या देहाच्या क्षेत्रात आत्मज्ञानाचे पीक घेण्यासाठी आत्मज्ञानी गुरूकडूनच बीजाची (गुरूमंत्राची) पेरणी होणे आवश्‍यक आहे. तरच त्या पिकाला आत्मज्ञानाची फळे येतील. पेरलेल्या गुरूमंत्राला साधनेचे खत पाणी द्यावे लागते. अहंकार, राग, द्वेष आदी तणे उगवणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. तरच आत्मज्ञानाची फळे चाखायला मिळतील.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Saturday, October 16, 2010

क्षेत्र आणि क्षेत्रज्ञु

क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें । जाणणे जें निरूतें ।
ज्ञान ऐसें तयातें । मानूं आम्ही ।।

शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते. म्हणजे देहाला क्षेत्र म्हटले जाते. या देहरूपी क्षेत्राला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणावे. क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जे यथार्थ जाणणे, त्याला ज्ञान असे समजावे. देह आणि आत्मा वेगळा आहे. या देहात आत्मा आला आहे. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाचा देह हा पंचमहाभूतापासून बनला आहे. फक्त प्रत्येकाच्या देहाची रचना वेगवेगळी आहे. कुणाचा देह गोरा आहे तर कुणाचा काळा आहे. कोण दिसायला कुरूप आहे. तर कोण दिसायला अति सुंदर असते. हे सर्व बाह्य रंग आहेत. पण या देहात असणारा आत्मा सर्वांच्या ठिकाणी आहे. तो एक आहे. आत्मा हा अमर आहे. देह नाशवंत आहे. वयोमानानुसार देहाची स्थिती बदलते. पण आत्मा बदलत नाही. जन्माच्यावेळी तो देहात येतो. मृत्यूवेळी तो देहातून मुक्त होतो. आत्माचे हे ज्ञान ज्याला अवगत झाले तो आत्मज्ञानी. नव्या युगात अनेक शोध लागले आहेत. पण अद्याप आत्मा देहात येतो कसा आणि जातो कसा. हे कोणी शोधू शकले नाही. त्याला पकडून ठेवणे कोणाला अद्याप जमले नाही. ते मानवाच्या हातात नाही. ती हाताबाहेरची गोष्ट आहे. याचाच अर्थ येथे देवाचे अस्तित्व आहे. हे देवत्व प्रत्येक सजिवाच्या ठिकाणी आहे. म्हणूनच प्रत्येकजण आत्मज्ञानी होऊ शकतो. आणि प्रत्येकाने आत्मज्ञानी होण्यासाठी प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. यासाठी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करायला हवा. हे शास्त्र जाणून घ्यायला हवे. हे शास्त्र प्रत्येक धर्मात सांगितले आहे. म्हणूनच सर्व धर्म सारखेच आहेत. सर्वांचा हेतू एकच आहे. फक्त प्रत्येक धर्माच्या रीती वेगळ्या आहेत. वाटा वेगळ्या आहेत. तरी शेवटी त्या एकाच ठिकाणी जातात. आत्मज्ञानी होणे हाच सर्वांचा हेतू आहे.



राजेंद्र घोरपडे, पुणे

Thursday, October 14, 2010

श्रीचरण

आत्मरूप गणेशु स्मरण । सकळ विद्यांचे अधिकरण ।
तेचि वंदू श्रीचरण । श्रीगुरुंचे ।।

इमारतीचा पाया भक्कम असेल तर इमारत उभी राहू शकते. अन्यथा कोसळते. मजबूत पायामुळे इमारतीला स्थैर्य प्राप्त होते. अध्यात्माचा पायाही भक्कम असावा लागतो. तरच पुढची प्रगती साधता येते. यासाठी सद्‌गुरू चरणी नतमस्तक होणे गरजेचे आहे. याचाच अर्थ मनातील अहंकार, मीपणा काढून टाकणे असा आहे. अहंकार, क्रोध, लोभ मनात असतील तर अध्यात्माच्या प्रगतीचा पाया खचतो. नुसते सद्‌गुरूंच्या चरणी मस्तक ठेवले म्हणजे झाले असे नाही. तर यामागची भूमिका जाणून घेणे गरजेचे आहे. आत्मज्ञान प्रातीसाठीच्या पायऱ्या चढताना अहंकार, लोभ, मीपणा, क्रोध यांचा त्याग केला तरच पुढे प्रगती साधता येते. अन्यथा पाया कमकुवत झाल्याने प्रगतीचा जीन कोसळतो. अनेक विठ्ठल मंदिरात तसेच आळंदीतील श्री ज्ञानेश्‍वर मंदिरात विना घेऊन नामस्मरण करण्याची प्रथा आहे. हा विना दुसऱ्याकडून घेताना त्याच्या प्रथम पाया पडावे लागते. ही पद्धत आहे. मग एखाद्या लहान मुलाकडूनही विना घेताना त्याच्या पाया पडावे लागते. हा लहान, हा मोठा असा भेदभाव येथे नाही. येथे उच्च नीच हा भावही नाही. गरीब श्रीमंत असाही भेदभाव येथे नाही. यातून समानता येथे नांदावी हा उद्देश आहे. सर्वांना समान हक्क आहे. सद्‌गुरुंच्या ठिकाणी सर्वांना समान संधी आहे. प्रत्येकजण आत्मज्ञानी होऊ शकतो, हा संदेश यातून द्यायचा आहे. पण आत्मज्ञानी होण्यासाठी सद्‌गुरूंचा अनुग्रह होणे आवश्‍यक आहे. सध्या अनेक पुस्तकी पंडित गुरू आहेत. पण ते आत्मज्ञानी असतील, तरच ते खरे गुरू अन्यथा ते केवळ पंडित आहेत. आत्मज्ञान प्राप्तीसाठी आत्मरूपी गुरूंचे स्मरण सतत करायला हवे. सर्व विद्या त्यांच्यात एकवटलेल्या असतात. अशा या सद्‌गुरूंच्या चरणी लीन व्हावे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Wednesday, October 13, 2010

तेची भक्त तेची योगी

पार्था या जगीं । तेचि भक्त तेचि योगी ।
उत्कंठा तयालागी । अखंड मज ।।

सध्या अध्यात्मावर फारशी चर्चा करताना कोणी दिसत नाही. फारसा रस कोणी दाखवतही नाही. पण देवदर्शनासाठी सगळीकडे रांगांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. गणेश उत्सवात गणपती पाहण्यासाठी गर्दी केली जाते. नवरात्र आले की देवीच्या दर्शनासाठी गर्दी होते. इतरही अनेक मंदिरात दर्शनासाठी रांगांच्या रांगा पाहायला मिळतात. पंढरीत तर नेहमीच दर्शनासाठी मोठी रांग असते. आळंदीतही गर्दी होते. दर्शन मिळावे हीच प्रत्येकाची इच्छा असते. कोणी केवळ मुख दर्शन घेऊनच समाधानी होतात. तर कोणी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतात. दर्शन कोठूनही घेतले तरी ते भगवंतापर्यंत पोहोचते. फक्त मनापासून दर्शन करायला हवे. मनातूनही दर्शन घडते. देवाची ओढ असणाऱ्यांना देव स्वप्नातही येऊन दर्शन देतात. फक्त दर्शनाची ओढ असावी लागते. सद्‌गुरूंचे सतत स्मरण करणारे भक्त त्यांना अधिक प्रिय असतात. आत्मज्ञान प्राप्तीची ओढ असणारा भक्तच खरा भक्त, खरा योगी म्हणून ओळखला जातो.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Friday, October 8, 2010

हे विश्‍वची माझे घर

हे विश्‍वची माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर । आपण जाहला ।।

जुन्या पिढीतील लोक व्यापक विचारसरणीचे होते. त्यांच्या विचारावर अध्यात्माचा पगडा होता. त्यामुळे त्यांच्या आचार-विचारात दूरदृष्टीपणा, व्यापकता होती. सध्याच्या पिढीत इतकी व्यापकता दिसून येत नाही. संकुचित विचारसरणी सध्या वाढीस लागली आहे. पण त्यामुळे प्रगतीही संकुचित होत आहे. हे लक्षात घ्यायला हवे. सध्या जागतिकीकरणाचे वारे आहे. याचा लाभ आपण उठवायला हवा. विचार संकुचित न ठेवता त्यामध्ये व्यापकता आणायला हवी. इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आहे. हे विश्‍व महाकाय आहे असे वाटत नाहीये. जुन्या पिढीतील लोकांनी विश्‍वची माझे घर असे समजून विकास घडवला. फक्त स्वतः पुरता विचार त्यांनी केला नाही. संपूर्ण समाजाचा, भागाचा, प्रांताचा विकास करायचा या ध्येयाने त्यांनी काम केले. त्यामुळे कोणी महात्मा झाले, तर कोणी कर्मवीर झाले, तर कोणी शिक्षण महर्षी झाले, तर कोणी सहकार महर्षी झाले. नव्या पिढीने त्यांची ही विचारसरणी आत्मसात करायला हवी. "एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ' असा विचार ठेवून त्यांनी सहकार क्षेत्र उभे केले. ते स्वतः कारखाना उभा करून मोठे कारखानदार होऊ शकत होते. पण त्यांनी स्वतः पुरते कधी पाहिले नाही. इतरांचाही विकास त्यांनी पाहिला. अनेक उद्योग, कारखाने सहकारातून उभे राहिले. पण सध्या या संस्थांमध्ये संकुचित विचारसरणीच्या लोकांचा प्रभाव वाढला आहे. त्यांनी स्वतःचा विकास सुरू केला आहे. यामुळे हे उद्योग अडचणीत आले आहेत. केवळ स्वतःचा फायदा पाहणाऱ्या या लोकांमुळेच सहकाराचा स्वाहाकार झाला आहे. यासाठी ही विचारसरणी बदलायला हवी. सर्वांचा विकास साधणारे विचार जोपासायला हवेत. संत महात्मांच्या विचारांची कास यासाठीच धरायला हवी. जागतिकीकरणात टिकायचे असेल तर हा विचार आत्मसात करायला हवा. विश्‍वची माझे घर समजूनच विकास साधायला हवा.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Wednesday, October 6, 2010

दूरदृष्टी

व्यापक आणि उदास । जैसें कां आकाश ।
तैसें जयाचें मानस । सर्वत्र गा ।।

जुन्या पिढीतील लोकांमध्ये दूरदृष्टी अधिक होती. सध्याच्या पिढीत तितकीशी दूरदृष्टी दिसून येत नाही. पूर्वी लोकांवर अध्यात्माचा, भारतीय संस्कृतीचा मोठा पगडा होता. या संस्कृतीतच मुळात दूरदृष्टीचा विचार मांडला गेला आहे. अमेरिकेला दूरदृष्टी अधिक आहे असे म्हटले जाते. त्यामुळे ते आज प्रगत आहेत. असेही सांगितले जाते. पण प्रत्यक्षात तेथे सुरू असलेल्या मंदीच्या बातम्या वाचल्यानंतर असे वाटते की, त्यांनी शोध लावले, तंत्रज्ञान विकसित केले पण त्याच्या वापरात दूरदृष्टीचा अभाव होता असे मानावेच लागेल. कदाचित मी म्हटलेले चूकही असेल, पण सध्या तेथे मंदी आहे हे खरे आहे. म्हणजे त्यांच्या नियोजनात दूरदृष्टीचा अभाव आहे हे निश्‍चित. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत दूरदृष्टी असणारे अनेक थोर नेते होते, यामुळे आपला देश स्वतंत्र झाला. दूरदृष्टी असणाऱ्या त्यांच्या कार्यामुळे, त्यांच्या योगदानामुळे विकासाला मोठी चालना मिळाली. देशाचा विकास हेच त्यांचे ध्येय होते. संतांप्रमाणेच या लोकप्रतिनिधीमध्ये त्यागीवृत्ती होती. स्वातंत्र्यासाठी त्यांनी त्याग केला. पण आताच्या काळातील तरुणांत, लोकप्रतिनिधीमध्ये अशी त्यागीवृत्ती नाही. जुन्या पिढीतील लोकप्रतिनिधीप्रमाणे त्यागीवृत्ती असणारे, दूरदृष्टी असणारे लोकप्रतिनिधी आता क्वचितच पाहायला मिळतात. आणि असले तरी सध्याच्या राजकारणात त्यांचा निभाव लागणे तसे कठीणच वाटते. मुळात ते सध्याच्या राजकारणात उतरण्यास नापसंती दर्शवितात. हे ही तितकेच खरे आहे. इतका काळ बदलला आहे. पण देशाच्या विकासासाठी आणि सार्वभौमत्वासाठी नव्यापिढीत दूरदृष्टी असणे गरजेचे आहे. अध्यात्मातून दूरदृष्टीचा विचार करण्याची प्रेरणा मिळते. व्यापक विचार करण्याची वृत्ती उत्पन्न होते. यासाठी आध्यात्मिक विचारांची कास नव्या पिढीने धरायला हवी. संतांनाह
ी दूरदृष्टी असणारे भक्त अधिक प्रिय असतात. निरपेक्ष, शुद्ध, तत्त्वार्थी देखणा, उदासीन, संसारदुःख विरहित, निरहंकारी असा भक्त सद्‌गुरुंना अधिक जवळचा वाटतो. असा भक्त आध्यात्मिक प्रगती साधतो. भौतिक विकासातही अशा व्यक्ती पुढे असतात. त्यांच्या दूरदृष्टीचा फायदा अनेकांना होतो. सध्याच्या राजकारणात अशा व्यक्तींची गरज आहे. तरच देशाचे भवितव्य उज्ज्वल राहील.



राजेंद्र घोरपडे, पुणे

Tuesday, October 5, 2010

फलत्याग

कर्म जेथ दुरावे । तेथ फलत्यागु संभवे ।
त्यागास्तव आंगवे । शांति सगळी ।।

फळाची आशा न ठेवता कर्म करायला हवे. सध्याच्या बदलत्या जीवनपद्धती आणि संस्कृतीमध्ये हे विचार पटणे जरा कठीणच वाटते. कारण सध्याच्या काळात कोणतेही काम हे फळाची अपेक्षा ठेवूनच केले जाते. पगारवाढ मिळावी. पदोन्नती व्हावी. वरचे पद मिळावे. ही अपेक्षा ठेवूनच आपण काम करत असतो. देशातील कामाच्या अनुभवावर परदेशात मोठी नोकरीची संधी उपलब्ध व्हावी अशा अनेक फळांची अपेक्षा असते. यासाठीच आपण कर्म करत असतो. अधिक नफा मिळावा या हेतूने व्यापारी काम करत असतो. सध्याच्या काळात तरी सर्वत्र हेच सुरू आहे. फळाच्या आशेनेच प्रगती होत असल्याचे अनेकजण मानतात. यामुळे नव्यापिढीला फलत्याग हा विचार रुजणे जरा कठीण वाटते. पण फळाचा त्याग करूनच कर्म करायला हवे. तसे पाहता ही त्यागी वृत्ती प्रत्येकामध्ये असते. ज्यांच्यामध्ये ही त्यागी वृत्ती नसते, तो कर्मातून योग्य लाभ मिळाला नाहीतर निराश होतो. यातून तो भरकटतो. आत्महत्या अशा निराशेतूनच होत आहेत. पगारवाढ नाही, योग्य पैसा मिळत नाही, उत्पन्नात घट झाली, मोठा तोटा झाला, पदोन्नती मिळाली नाही. अशा कारणाने निराशा येते. मुळात यासाठीच तर फळाची अपेक्षा ठेवू नये. यश मिळाले नाही तरी प्रयत्न सोडू नयेत. याचाच अर्थ फळाची आशा न ठेवता कर्म करत राहायचे. जगात अनेक संधी आहेत. पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी प्रयत्नांची गरज आहे. यासाठी आपल्या इच्छा, आकांक्षा मर्यादित ठेवाव्यात. यातून नैराश्‍य येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. यासाठी तर फलत्याग हा सोपा मार्ग आहे. फलत्यागातूनच शांती, समाधान मिळते. आध्यात्मिक साधना करतानाही फळाची आशा ठेवू नये. साधना करत राहावे. यातूनच पूर्ण शांती, पूर्ण ब्रह्मस्थिती हस्तगत करता येते.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Sunday, October 3, 2010

श्रेष्ठ भक्त

यापरी जे भक्त । आपणपें मज देत ।
तेचि मी योगयुक्त । परम मानी ।।

संतांकडे अनेकजण जात असतात. प्रत्येकाचा भक्तीचा, श्रद्धेचा मार्ग वेगळा असतो. कोण स्वतःच्या घरगुती अडचणी सोडविण्यासाठी संतांकडे जात असतो. तर कोण विविध कामे मिळावीत या आशेने जात असतो. सद्‌गुरुंच्या दर्शनाने आपले कष्ट दूर होतात. समस्या सुटतात असा त्यांचा समज असतो. सद्‌गुरुंचे उपदेश ते घेत असतात. यामुळे त्यांची प्रगती होते. साहजिकच भक्ती दृढ होते. विश्‍वास वाढतो. सद्‌गुरू केवळ आध्यात्मिक प्रगतीतच भक्ताला मदत करतात असे नाही, तर भक्ताची भौतिक प्रगतीही ते साधत असतात. भक्तांच्या सांसारिक समस्या ही ते समजावून घेत असतात. त्या कशा दूर करायचा याबाबत मागदर्शनही करीत असतात. पण सद्‌गुरूंचा हेतू हा भक्ताची भक्‍ती दृढ व्हावी हा असतो. आध्यात्मिक प्रगतीसाठी भौतिक प्रगतीही आवश्‍यक आहे. संसार आणि परमार्थ एकाच वेळी करत असताना भक्ताची भौतिक प्रगती असेल, तरच त्याचे मन अध्यात्मात रमेल हे सद्‌गुरुंना माहीत असते. पण अनेक भक्तांचा तसेच व्यक्तींचा याबाबत गैरसमज असतो. अनेक व्यक्ती या भौतिक सुखासाठीच सद्‌गुरुंचा वापर करून घेतात. अशा वेळी त्यांच्यातील अहंकार जागृत झाला तर मात्र भक्ती संपते. यासाठी सद्‌गुरू भक्ताला भौतिक प्रगतीसाठी मदत का करतात हे जाणून घेणे गरजेचे आहे. सद्‌गुरुंचा श्रेष्ठ भक्त कसे होता येते याचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. सद्‌गुरू श्रेष्ठ भक्त कोणास समजतात हे समजून घ्यायलाच हवे. सद्‌गुरुंच्या ठिकाणी मन ठेवून, नित्ययुक्त होऊन, अतिशय श्रद्धेने युक्त असे जे भक्त सद्‌गुरूंची उपासना करतात ते सर्वांत उत्कृष्ट योगी आहेत, असे सद्‌गुरू समजतात. जे भक्त सद्‌गुरूंना आपला आत्मभाव देतात. त्यांनाच सद्‌गुरू श्रेष्ठ भक्त मानतात. यासाठी सद्‌गुरूंच्याकडे आत्मज्ञानी होण्यासाठी जावे. भौतिक प्रगतीसाठी सद्‌गुरुंचा वापर करणे योग्य नाही. आध्यात्मिक प्रगतीसाठीच सद्‌
गुरू आहेत.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Friday, October 1, 2010

मऱ्हाठियेचां नगरीं

मऱ्हाठियेचां नगरीं

मऱ्हाठियेचां नगरीं । ब्रह्मविद्येचा सुकाळु करी ।
घेणे देणे सुखचिवरी । हों देई या जगा ।।

सध्या मराठी भाषा वापराचा आग्रह धरला जात आहे. कदाचित अशा व्यक्तींना मराठी भाषा लुप्त पावते की काय याची भीती वाटत असावी. जागतिकीकरणामुळे अनेक प्रांतातील लोक महाराष्ट्रात आले, तसे महाराष्ट्रातील लोकही परप्रांतात गेले. पण हे प्रमाण इतरांच्या तुलनेत कमी आहे. कारण मराठी माणसाला घर सुटत नाही. महाराष्ट्राबाहेर जाऊन काम करण्याची त्याच्या मनाची तयारी नाही. यामुळे मराठी माणसाचे स्थलांतराचे प्रमाण इतरांच्या तुलनेत कमी आहे. महाराष्ट्रात सध्या परप्रांतीयांची संख्या वाढत आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये लोक मराठी ऐवजी हिंदीच अधिक बोलतात. मुंबईतही अशीच परिस्थिती आहे. परप्रांतीयांच्या खिचडीने हिंदीचा वापर वाढत आहे. मराठी हळूहळू मागे पडत आहे. कदाचित यामुळे मराठी लुप्त होईल की काय अशी चिंता व्यक्त केली जात असावी. पण खरे पाहता कोणत्याही भाषेचा प्रभाव आणि वापर हा त्यामध्ये निर्माण होणाऱ्या साहित्यावर अवलंबून असतो. चांगल्या साहित्याच्या निर्मितीने साहजिकच प्रभाव वाढतो. भाषेची लोकप्रियताही वाढते. वापरही वाढतो. मराठी मागे पडत आहे कारण यामध्ये तशा तोडीच्या साहित्याची निर्मिती केली जात नाही, हे परखड सत्य आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या ज्ञानेश्‍वरी ग्रथांने मराठी भाषेला अमरत्व दिले आहे. या प्रांतात त्यांनी ब्रह्मविद्येचा सुकाळ केला आहे. ही परंपराही अखंड सुरू आहे. यावर साहित्य निर्मितीही होत आहे आणि यापुढेही साहित्य निर्मिती होत राहील. त्यामुळे मराठी लुप्त पावण्याची भीती बाळगणे व्यर्थ आहे. भाषेचा वापर कमी झाल्याचे पाहून भीतीने इतरांना त्रास देणे ही मराठी संस्कृती निश्‍चितच नाही. याचे राजकारण करणे हे यापेक्षाही वाईट. मराठी भाषा लुप्त होईल अशी चिंता करणाऱ्यांनी लोकांची वाचनाची आवड वाढेल अशा उत्तम दर्जाच्या साहित्याची निर्
मिती करावी. अमरत्व प्राप्त झालेली भाषा लुप्त होईल ही चिंता करणे व्यर्थ आहे. मराठी भाषा अमर आहे. मनाला चिरंतन स्फूर्ती देणारी भाषा आहे. हे या भाषेचे वैशिष्ठ जपायला हवे.

राजेंद्र घोरपडे, पुणे