Sunday, June 30, 2019

भक्ती





नुसती ज्ञानेश्‍वरीची पारायणे करणे ही सुद्धा एक भक्तीच आहे. सतत सद्‌गुरूंचे नामस्मरण करणे ही सुद्धा भक्ती आहे. अनेक वारकरी पंढरीची वारी करतात हा सुद्धा भक्तीचाच एक प्रकार आहे.

तरि झडझडोनी वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग ।
जिया पावसी अव्यंग । निजधाम माझे ।।516।। अध्याय 9 वा

अर्थ - तरी या मृत्यूलोकाच्या राहाटीतून झटकन मोकळा हो आणि या भक्तीच्या मार्गाला लाग की त्या भक्तीच्या योगानें माझें निर्दोष स्वरूप पाहशील.

आत्मज्ञान प्राप्तीचा साधा सोपा मार्ग म्हणजे भक्ती. मनापासून केलेली भक्ती निश्‍चितच फळाला येते. योगाचा मार्ग हा कष्टदायक आहे. त्यासाठी काही जण संसाराचाही त्याग करतात. वणवण भटकतात. तरीही मनःशांती होत नाही. मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी बारा-बारा वर्षे तपश्‍चर्या करावी लागते. बरेच कष्ट पडतात. शरीराला त्रास होतो. एवढे करूनही आत्मज्ञान मिळेलच, याची खात्री नाही. अनेक साधू शांतीच्या शोधात हिमालयात जाऊन साधना करतात, पण सध्या खऱ्या आत्मज्ञानाच्या शोधात फिरणाऱ्या साधूंची संख्या कमी झाली आहे. संधिसाधूच अधिक आहेत. काही साधूंना आत्मज्ञान प्राप्ती झाली तरीही त्यांचा उपयोग समाजासाठी करणारे फारच कमी आहेत. खडतर तपश्‍चर्या करून आत्मज्ञान प्राप्तीपेक्षा भक्तीचा मार्ग हा सोपा आहे. सद्‌गुरूंच्या भक्तीत मन रमवणे सहज शक्‍य आहे. यासाठी संसाराचा त्याग करावा लागत नाही. संसारात राहूनही मुक्ती मिळवता येते. भक्तीचे अनेक प्रकार आहेत. नुसती ज्ञानेश्‍वरीची पारायणे करणे ही सुद्धा एक भक्तीच आहे. सतत सद्‌गुरूंचे नामस्मरण करणे ही सुद्धा भक्ती आहे. अनेक वारकरी पंढरीची वारी करतात हा सुद्धा भक्तीचाच एक प्रकार आहे. भजन, कीतर्न हे सुद्धा भक्तीचेच मार्ग आहेत. भजन, कीर्तन, निरूपण, पारायण हे ऐकणे याला श्रवण भक्ती म्हणतात. यात सद्‌गुरूंचे स्मरण होते. नुसत्या श्रवणाने सुद्धा येथे मोक्ष सिद्धी होऊ शकते. यासाठी संत सहवासात जाणे गरजेचे आहे. चांगल्या विचारांची, गोष्टीची, उपक्रमांची सवय लावून घेणे गरजेचे आहे. यातून मन आनंदी राहते. चांगल्या गोष्टींची सवय लागायला थोडा वेळ लागतो. मनाला ते लवकर रुचत नाही, पण साधासोपा भक्तीचा मार्ग अवलंबणेच या बदलत्या युगात सोईस्कर आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Saturday, June 29, 2019

कोल्हापूरातील 14 महिलांच्या प्रेरणादायक कथा



उद्योजकता किंवा स्वयंरोजगार ही काही सोपी गोष्ट नाही. यासाठी मोठ्या त्यागाची गरज लागते. जोखींमही घ्यावी लागते, प्रचंड मेहनतही करावी लागते. उद्योजक म्हणून अस्तित्व निर्माण करणे हे खूपच मोठे कार्य आहे. घरगुती जबाबदाऱ्या पार पाडत या महिलांनी मिळवलेले यश निश्चितच प्रेरणादायी आहे.

कोल्हापूरातील 14 महिलांच्या प्रेरणादायक कथा डाॅ. अपर्णा पाटील यांनी  लहान स्वप्ने आणि उंच भरारी या पुस्तकात मांडल्या आहेत. महिलांनी खडतर प्रसंगात न खचता आलेल्या अडचणीवर मात करत स्वतःच्या पायावर कसे उभे राहायचे हे या  पुस्तकातून शिकण्यासारखे आहे. प्रतिकुल परिस्थितीत स्वतः कसा उद्योग उभा केला, या महिला कशा उद्योजक झाल्या यावर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. या महिलांच्या गुणांचा अभ्यासही या पुस्तकात करण्यात आला आहे.  या फक्त उद्योग आणि उद्योजकांच्या कथाच नाही तर धैर्य आणि धाडसाने मिळवलेल्या असमान्य यशाच्या कथा आहेत. कठीण परिस्थितीमध्ये अशक्य कामगिरी शक्य केल्याच्या कथा आहेत. 

कोल्हापुरातील ग्रामीण आणि निमशहरी भागातील या सर्व स्त्रिया आहेत. स्त्रियांनी केलेले व्यक्तिगत धाडस, जोखीमीचे काम आणि उद्योजक होण्याचा दृढनिश्चय हा यातील प्रत्येक कथेत पाहायला मिळतो. हे यातील वेगळेपण आहे. स्वतःला काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असेल किंवा कठीण आर्थिक परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी या महिला पुढे आल्या. काहींना या कामात कौटुंबिक पाठींबा मिळाला तर काहींनी कुटुंबाचा विरोध असूनही त्या पुढे गेल्या आहेत. 

अलका पवार यांनी दागिने तयार करण्याची आवड होती. ही आवड त्यांना त्याच्या कठीण प्रसंगात कशी उपयोगी पडली आणि त्यांनी यामध्येच कसा उद्योग उभा केला याबद्दलचे अनुभव कथन पहिल्या प्रकरणात केले आहे.  महिला आणि स्वयंपाक हे समिकरणच आहे,  पण चवदार खाद्य पदार्थ त्यांना करता आले तर त्यांची स्तुती निश्चित होते. यातूनच मग वैशाली सुतार आणि मुनीरा मुजावर यांनी कसा उद्योग उभा केला याचा अनुभव दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणात दिला आहे. सीमा घोरपडे आणि सारिका घोरपडे यांनी धाडसाने बेकरी उद्योग कसा उभा केला यावर चौथ्या प्रकरणात प्रकाश टाकला आहे. एक दिवस आपल्याकडे बहुउद्देशीय दुकान असेल हे स्वप्न साधना सावंत यांनी पाहिले आणि त्याची स्वप्नपूर्तीही त्यांनी केली. यावर पाचवे प्रकरण आहे. महिलांना पेंटीग क्षेत्रात आणणाऱ्या  एशियन पेंट्सच्या जाहीरातून राधिका बहिरशेठ यांनी प्रेरणा घेतली व होडा शो रुम व सर्व्हिसिंग सेंटरमध्ये फक्त महिला कर्मचारी असव्यात असे स्वप्न पाहीले. महिलांही पुरषांप्रमाणे कामे करू शकतात. हे त्यांनी दाखवून देण्यासाठी परिश्रम घेऊन स्वतःचे स्वप्न सत्यात उतरवले.  आज त्यांच्या होंडा शोरूममधील सर्व तांत्रिक काम आणि व्यवस्थापनही महिला करतात. पुरूषांची मक्तेदारी असणारे क्षेत्र मोडीत काढण्यासाठी राधिका यांनी मांडलेली कल्पना आणि केलेला दृढनिश्चय ही कथा वाचनिय आणि प्रेरणादायी निश्चितच आहे. 

उद्योजकता किंवा स्वयंरोजगार ही काही सोपी गोष्ट नाही. यासाठी मोठ्या त्यागाची गरज लागते. जोखींमही घ्यावी लागते, प्रचंड मेहनतही करावी लागते. उद्योजक म्हणून अस्तित्व निर्माण करणे हे खूपच मोठे कार्य आहे. घरगुती जबाबदाऱ्या पार पाडत या महिलांनी मिळवलेले यश निश्चितच प्रेरणादायी आहे. खानावळ चालवणाऱ्या कविता सौदलगेकर, स्वेटर उद्योग उभारणाऱ्या मालती बेडेकर, बिस्किट तयार करणाऱ्या पद्मश्री तारदाळे, मशरूम शेती करणाऱ्या माधुरी पोतदार, माती भांडी, आकर्षक वस्तू तयार करणाऱ्या सुमन बारामतीकर, पल्पची पॅक्टरी उभारणाऱ्या मीनल भोसले, बांबूपासून विविध वस्तू तयार करणाऱ्या नाझनिन मकानदार यांच्या कथा मनाला उद्योजक होण्याची प्रेरणा निश्चितच देतात. या पुस्तकातील यशोगाथा स्त्रियांच्या धैर्याची साक्ष देतात. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत कशी मात करायची याची प्रेरणा देतात. ज्या महिला स्वतःचा उद्योग उभारू इच्छितात त्यांना हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरणारे आहे. या कथातून त्यांना निश्चितच प्रेरणा मिळू शकेल. 

डाॅ अपर्णा पाटील यांचे मुळ पुस्तक इंग्रजीमध्ये आहे. इंग्रजीप्रमाणे मराठीमध्ये अनुवादीत पुस्तकही सोप्या आणि सर्वसामान्यांना समजेल अशा शब्दात आहे. 

पुस्तक प्रकाशन सोहळ्यात यशवंतराव थोरात यांनी केलेले मार्गदर्शन, पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहावा.

पुस्तकाचे नाव -  लहान स्वप्ने आणि उंच भरारी
लेखिका - डाॅ. अपर्णा पाटील 
मराठी अनुवाद - राजेंद्र घोरपडे, सारिका लोंढे
प्रकाशक - ग्रंथ पब्लिकेशन्स,  राजारामपुरी पाचवी गल्ली, कोल्हापूर मोबाईल - 9922295522
किंमत - 150 रुपये
पृष्ठे - 140

Friday, June 28, 2019

विषयांचे सुख



सध्याचे उत्सव हे चंगळवादी संस्कृतीची परंपरा जोपासत आहेत. यातून शेवटी काय साधले जाते. उत्सव कशासाठी असतो, त्याचे महत्त्व काय हे जाणून घेणे गरजेचे आहे.
- राजेंद्र घोरपडे

तेविं विषयांचे जे सुख । ते केवळ परमदुःख ।
परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ।। 499 ।। अध्याय 9 वा

अर्थ - त्याप्रमाणें विषयांमध्ये जें सुख आहे, ते निव्वळ कडेलोटीचें दुःखच आहे. परंतु काय करावें? लोक मुर्ख आहेत. विषयांचे सेवन केल्यावाचूंन त्यांचे चालतच नाही.

हे माझे, हे माझे असे करत मनुष्य सतत विषयांच्या, वासनेच्या मागे धावत असतो. भोगाकडे त्यांचा कल अधिक असतो. त्या शिवाय त्याला तृप्त झाल्यासारखे वाटत नाही; पण हे सुख क्षणिक असते. ते त्याच्या कधीही लक्षात येत नाही. तेवढ्यापुरतीच ही तृप्ती असते. या क्षणिक सुखाच्या मागे मूर्खासारखे तो सतत धावत असतो. स्पर्धेच्या युगात स्पर्धा कशाची करायची, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. सुख मिळते म्हणून धामडधिंगा घालायचा, हा चंगळवाद आहे. पाश्‍चिमात्यांचे अनुकरण करत आपल्याकडे सध्या वाट्टेल त्या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. याचा परिणाम येथील पारंपरिक उत्सवावरही झाला आहे. सण, उत्सव हे आज मनोरंजनाचे अड्डे झाले आहेत. आध्यात्मिकपणा त्यामध्ये राहिलाच नाही. चित्रपट संगीताच्या तालावर नाचगाणी म्हणजे गणेशाची आराधना नव्हे. यातही स्पर्धा सुरू असते. नव्या पिढीमध्ये देखावे, कला प्रकट करण्याचे साधन म्हणजे उत्सव, असाच अर्थ रुजला आहे. गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने दहीहंडीचा पारंपरिक उत्सव साजरा केला जातो, पण सध्या या उत्सवात स्पर्धाच अधिक वाढली आहे. दहीहंडीला आता राजकीय पाठबळाबरोबरच कॉर्पोरेट कवचही मिळाले आहे. हा कार्यक्रम आता बाळगोपाळांचा, व्यायामशाळांच्या उत्साहाचा, भावभक्तीचा राहिला नाही. हंडी फोडण्यासाठी किती मोठा थर उभा केला, याची स्पर्धा यात आता लागलेली आहे. यंदा नऊ थराची हंडी होती. या झटपटात यंदा अनेकदा गोविंदा जखमी झाले. यातील काही जण गंभीर अवस्थेत आहेत. अशा या उत्सवाच्या स्पर्धेतून शेवटी दुःखच पदरात पडत आहे. दहा थरांचा विक्रम यंदाही मोडता आला नाही, हे दुःख आहेच. उत्साहासाठी उत्सव असावा. मनाला त्यातून समाधान मिळावे. पुन्हा नव्या जोमाने उभे राहण्याची ऊर्मी त्यातून मिळायला हवी, पण सध्याचे उत्सव हे चंगळवादी संस्कृतीची परंपरा जोपासत आहेत. यातून शेवटी काय साधले जाते. उत्सव कशासाठी असतो, त्याचे महत्त्व काय हे जाणून घेणे गरजेचे आहे. धार्मिक उत्सवात सध्या भावभक्तीचा उल्लेखही होत नाही. मग खऱ्या ज्ञानाच्या, सुखाच्या प्राप्ती यातून कशी होणार? यातून केवळ परमदुःखच हाती लागणार.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


Sunday, June 23, 2019

अमरत्वाचे सिंहासन

अहिंसेचा मार्ग स्वीकारून मनाची शांती टिकविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सत्य काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवा. सत्याचा आग्रह धरायला हवा. सद्‌गुरू शिष्याला सत्य काय आहे, याची अनुभूती देतात. शिष्याचे अज्ञान दूर करून त्याला त्यांच्या पदी बसवितात. अमरत्वाचे हे सिंहासन ते देतात.
- राजेंद्र घोरपडे


जेथ अमरत्व हेंचि सिंहासन । ऐरावतासारिखें वाहन ।
राजधानी भुवन । अमरावती ।। 320 ।। अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - ज्या स्वर्गात न मरणें हेंच सिंहासन आहे, ऐरावत हत्तीसारखें वाहन आहे व अमरावतीनगर ही राजधानी आहे.

सद्‌गुरू कृपेनंतर नराचा नारायण होतो. अज्ञानाच्या अंधकारातून तो बाहेर पडतो. आत्मज्ञानाच्या सिंहासनावर तो विराजमान होतो. त्याला अमरत्व प्राप्त होते. मुळात तो अमरच असतो, पण अज्ञानामुळे तो भरकटतो. सध्या देशात नवनवीन तंत्रज्ञानाने बराच विकास झाला आहे. तसेच त्यात प्रगतीही होत आहे. आपला देश आता महासत्तेकडे वाटचाल करत आहे, असे सांगितले जाते; पण दुसरीकडे दारिद्य्ररेषेखालील लोकांची संख्याही वाढत आहे, असेही स्पष्ट केले जाते. मग नेमके आपण आहोत कोठे? जनतेला अज्ञानात ठेवून सत्ता भोगणे, हे सध्याच्या राज्यकर्त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अशाने नेका कोणता विकास साधला, हेही एक गूढच आहे. जनतेचे अज्ञान दूर करून जो राज्यकर्ता प्रगती साधतो, तोच खरा समाजसेवक असतो. त्याचे नाव अमर होते. स्वातंत्र्यपूर्व काळात असे राज्यकर्ते होते म्हणूनच आपण स्वतंत्र झालो. स्वार्थ त्यांच्यामध्ये नव्हता. निःस्वार्थी वृत्तीने त्यांनी देशासाठी स्वतःचा त्याग केला. देशाचे स्वातंत्र, देशातील जनतेला स्वातंत्र हेच त्यांचे ध्येय होते. यासाठी त्यांनी स्वतःच्या प्राणाचीही पर्वा केली नाही. सत्तेसाठी खुर्चीसाठी त्यांनी कधीही राजकारण केले नाही. दुसऱ्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी इतरांना दुखावलेही नाही. त्यांच्या मनात अहिंसा नांदत होती. अहिंसेच्या मार्गाने ते लढले. सत्याचा आग्रह मात्र त्यांनी सोडला नाही. म्हणूनच ते महात्मा झाले. अमर झाले. अमरत्वाच्या सिंहासनावर ते विराजमान झाले. अशा राज्यकर्त्यांची सध्या देशाला गरज आहे. जनतेला ज्ञानी करणारे राज्यकर्ते हवेत. अध्यात्मातही तसेच आहे. स्वार्थ सोडायला हवा. त्यागाचा मार्ग अवलंबला पाहिजे. अहिंसेचा मार्ग स्वीकारून मनाची शांती टिकविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सत्य काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवा. सत्याचा आग्रह धरायला हवा. सद्‌गुरू शिष्याला सत्य काय आहे, याची अनुभूती देतात. शिष्याचे अज्ञान दूर करून त्याला त्यांच्या पदी बसवितात. अमरत्वाचे हे सिंहासन ते देतात. तेच खरे सद्‌गुरू असतात. त्यांची परंपरा पुढे चालते. आदिनाथापासून सुरू झालेली संत परंपरा आजही तशीच पुढे सुरू आहे. ती अमर आहे.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

तरि स्वप्नौनी जागृती येता...



पहाटेच्या वेळी पडलेली स्वप्ने ही खरी होतात. कोण जाणे! स्वप्न चांगले असेल तर ते खरे मानायला काहीच हरकत नाही. कदाचित त्यामुळेही ते स्वप्न सत्यात उतरेल. काही भीतीदायक स्वप्ने पडतात, पण ते स्वप्न असते. त्यामुळे जागे झाल्यावर त्यातील भीती नसते.
- राजेंद्र घोरपडे

तरि स्वप्नौनी जागृती येता । काय पाय दुखती पंडुसुता ।
का स्वप्नामांजी असता । प्रवासु होय ।। 112 ।। अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - तर अर्जुना, स्वप्नातून जागृतींत येतांना त्यांचे पाय दुखतात काय? अथवा स्वप्नामध्यें असतांना प्रवास होतो काय?

प्रत्येक व्यक्ती काही ना काही स्वप्ने उराशी बाळगत असतो. स्वप्ने असावीत. त्यातूनच नवनव्या आशा उत्पन्न होतात. विचार सुरू राहतात. प्रगती होत राहते. काही ना काही तरी करण्याची धडपड सुरू राहते. यातूनच विकासाचे खरे मार्ग सापडतात. स्वप्न भंगले तरी निराशा येत नाही. कारण ते शेवटी स्वप्न असते. सत्य परिस्थिती नसते. स्वप्न हे नेहमी चांगल्या गोष्टीचे असावे. विकासाची स्वप्ने दाखवून राजकर्त्ये मतदारांची फसवणूक करतात. उसाला यंदा चांगला दर देऊ, अशी स्वप्ने दाखवतात. धान्याला चांगला दर देऊ, असेही सांगतात; पण करत काहीच नाहीत. राज्यकर्त्यांची आश्‍वासने ही आता नुसती स्वप्नेच राहिली आहेत. ती सत्यात कधी उतरतच नाहीत, पण त्यामुळे जग काही विकसित व्हायचे राहिले आहे का? नाही ना? आपण आपला विकास करण्याचे त्यामुळे थांबले आहोत का? नाही ना? कोण कोणासाठी येथे थांबत नाही. थांबला तो संपला. स्वप्ने दाखविणाऱ्याचे काहीच नुकसान होत नाही. तो स्वतःच्या स्वार्थासाठी स्वप्ने दाखवत असतो. स्वप्न पाहणाऱ्याचे मात्र यात नुकसान होते. यासाठी स्वप्नात राहणे गैर आहे. याचे तोटेही आहेत. स्वप्नातून बाहेर पडणे गरजेचे आहे. जागृती ही महत्त्वाची आहे. वास्तवात राहायला शिकले पाहिजे. वास्तववादी व्हायला हवे. तरच विकास होतो. सत्य काय आहे? त्या सत्याचा स्वीकार हा करायला हवा. सत्य आत्मसात करायला हवे. यासाठीच स्वप्नातून भानावर येणे गरजेचे आहे. रात्री झोपेत सुद्धा आपणास काही स्वप्ने पडतात. ती चांगली असतात, असे नाही. असे म्हणतात की, पहाटेच्या वेळी पडलेली स्वप्ने ही खरी होतात. कोण जाणे! स्वप्न चांगले असेल तर ते खरे मानायला काहीच हरकत नाही. कदाचित त्यामुळेही ते स्वप्न सत्यात उतरेल. काही भीतीदायक स्वप्ने पडतात, पण ते स्वप्न असते. त्यामुळे जागे झाल्यावर त्यातील भीती नसते. अज्ञानाने आपण देहाच्या सुखामागे धावत आहोत. हे मानवाला पडलेले स्वप्न आहे. या स्वप्नातून बाहेर पडण्याची गरज आहे. आत्मज्ञानाची जागृती होणे गरजेचे आहे. डोळ्यांवरची अज्ञानाची झापडे दूर होण्याची गरज आहे.
 

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Thursday, June 20, 2019

शेळीपालन करण्याची इच्छा आहे मग हे वाचाच...







कोणताही व्यवसाय करताना त्यात अडचणी, समस्या असतातच. यातून व्यवसायाचे नुकसानही होते. हाच अनुभव लेखकालाही आला. चुकीच्या पद्धतीचा अवलंब केल्याने शेळीपालन करत असताना मोठे नुकसान सोसावे लागले. यातून सावध होत लेखकाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेत शेळीपालन व्यवसाय सावरला. त्यांना आलेल्या अडीअडचणी नवा व्यवसाय सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांना येऊ शकतात हे विचारात घेऊन लेखकाने हे पुस्तक लिहिले आहे.
 

शेळीपालन म्हणजे नेमके काय? येथपासून ते त्याचे व्यवस्थापन, प्रथमोपचार, लसीकरण, शेळ्यांची घ्यायची निगा, चारा नियोजन अशा तांत्रिक माहितीसह विक्री व्यवस्थापन, उपलब्ध संधी या सर्व गोष्टींची माहिती पुस्तकातील ३२ प्रकरणात दिलेली आहे. कुर्बानीसाठी लागणारे बोकड कसे तयार करायचे यावर स्वतंत्र प्रकरण आहे. कुर्बानीचा बोकड कसा असावा, त्याची निगा कशी राखायची, कुर्बानीच्या बोकडाची विक्री व्यवस्था याची मुद्देसूद मांडणी लेखकाने केली आहे. महाराष्ट्रात शेळी व मेंढी खरेदी विक्री होणारी ठिकाणे आणि त्या गावांचा आठवडे बाजार याचीही माहिती दिली आहे. व्यवसाय करताना नोंदी कशा ठेवाव्यात यावर स्वतंत्र प्रकरण या पुस्तकात आहे. शेडमधील नोंदीसाठी स्वतंत्र वही कशी ठेवायची, यात कोणत्या नोंदी घ्यायच्या, त्या कशा टिपायच्या याची माहिती पुस्तकातून मिळते.
 

शेळीपालनाच्या व्यवसायात संधी कशा आहेत हे उदाहरणे देऊन त्यांनी स्पष्ट केले आहे. गावात व्यवसाय सुरू करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात, कसा विचार करावा, कसे नियोजन करावे हे सांगताना त्यांनी उत्तम उदाहणे दिली आहेत. यशस्वी शेळीपालनासाठी कोणते घटक आवश्‍यक आहेत या सर्व विषयांची मुद्देसूद मांडणी पुस्तकात आहे.
 

शेळीपालनासंबंधी असणारे गैरसमज दूर करण्याचाही प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने केला आहे. शेळीपालन करताना तांत्रिक माहितीबरोबरच कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी हे सांगितले आहे. शेळीपालन व्यवसायात कोणत्या गोष्टींमुळे अपयश येते, त्याची प्रमुख कारणे आणि त्यावर कसे उपाय योजावेत याची स्पष्ट मांडणी स्वतंत्र प्रकरणातून केली आहे.
 

शेळीपालन व्यवसायातील जोखीम आणि विमा कवच याचीही माहिती मिळते. शेळी विक्री तसेच वाहतुकीदरम्यान कोणती काळजी घ्यावी याची माहिती पुस्तकातून मिळते. मुद्देसूद मांडणी आणि सोपी भाषा असल्याने पुस्तक वाचण्यास सोपे जाते. समस्या लक्षात येण्यास आणि त्या सोडविण्यासाठी दिलेले उपाय याची माहिती वाचकांना निश्‍चितच उपयुक्त ठरणारी आहे.

     पुस्तकाचे नाव - आत्मविश्‍वासाने करा आधुनिक शेळीपालन
     लेखक - अमित शिवाजी जाधव, मोबाईल - 9619864649,9833685299
     प्रकाशक - ज्ञानदीप ॲकॅडमी, पुणे
     पृष्ठे - २२४
     किंमत - १९० रुपये

Wednesday, June 19, 2019

आता मुलांनी होम सायन्समध्ये जावे - यशवंत थोरात ( व्हिडिओ)






कोल्हापूर - आमच्यावेळी मुली होमसायन्सला जात असत. काही करता आले नाही तरी लग्नानंतर जेवण तरी उत्तम बनवता यावे असा त्यामागचा उद्देश होता. आता मात्र सर्वत्र मुलींनाच यश मिळत आहे. सर्वत्र मुलीच पुढे दिसत आहेत. ग्रामीण भागातील मुली मुलांच्या पुढे आहेत. इंजिनिअरिंग, मॅथेमेटिस्कमध्ये मुलीच चांगले यश मिळवत आहेत. मुले आज मागे पडत आहेत. यासाठी मी मुलांना आता सांगु इच्छितो की आता त्यांनी होम सायन्समध्ये जावे, असे मत डाॅ यशवंत थोरात यांनी व्यक्त केले.





डाॅ. अपर्णा पाटील यांच्या लहान स्वप्न आणि उंच भरारी पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी श्री. थोरात बोलत होते. श्री. थोरात म्हणाले, येणाऱ्या दहा पंधरा वर्षात देशात सामाजिक क्रांती होईल. ही क्रांती जातीच्या भेदभावावर होणार नाही. ही क्रांती आर्थिक नसेल. ही क्रांती होणार आहे शहर आणि खेड्यातील वाढत्या दरीवर. माझा  विश्वास आहे की ग्रामीण भागात आज शिक्षण चांगले नाही. निकष कोणते लावतात यावर ते अवलंबून आहे. पण शहरातील शाळांच्या तुलनेत ग्रामीण भागातील शिक्षण चांगले नाही. खेड्यातील मुलांना शहरातील मुलांच्या प्रमाणे अपेक्षा ठेवत आहेत. त्यांच्या महत्त्वकांक्षा तेवढ्याच आहेत. आणि जर याला आम्ही ग्रामीण मुलांना हे देऊ शकलो नाही तर एक मोठी समस्या निर्माण होणार आहे.

Tuesday, June 18, 2019

होऊनी ठाके आघवा । मोक्षाचाचि ।।



लोखंडापासून सोने वेगळे केल्यानंतर पुन्हा त्याचे लोखंडात रूपांतरण करता येत नाही किंवा उसापासून साखर तयार केल्यानंतर पुन्हा त्यापासून ऊस तयार होत नाही. तसे देह आणि आत्मा हा वेगळा आहे, याची अनुभूती आल्यानंतर पुन्हा त्या देहात आत्मा अडकणार नाही
- राजेंद्र घोरपडे

तैसा संसारु तया गांवा । गेला साता पांडवा ।
होऊनी ठाके आघवा । मोक्षाचाचि ।। 198 ।। अध्याय 8 वा

ओवीचा अर्थ - अर्जुना, त्याप्रमाणें ज्या परमात्मस्वरूपीं मुक्कामाला हा ( दुःखरूप देहबुद्धयादिसंघातरूपी) संसार पोंचला असतां, तो संसार सर्व बाजूंनी मोक्षच ( दुःखशून्य व सुखरूप असा) होऊन राहातो.

जन्माला आलो म्हटल्यानंतर जगण्यासाठी आवश्‍यक गोष्टी या कराव्याच लागतात. अन्न, वस्त्र, निवारा यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. मग तो सर्वसामान्य असो की मोठा असो किंवा साधुसंत असो. त्याला या गोष्टींची गरज भासतेच; पण माणसाला जगण्यासाठी याची किती आवश्‍यकता आहे, याचा विचारही प्रत्येकाने करायला हवा. सध्या लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे आगामी काळात अन्नधान्याची टंचाई निर्माण होणार, हे निश्‍चित आहे. वस्त्राच्या बाबतीतही हीच स्थिती निर्माण होणार आहे आणि निवाराही मिळणे कठीण होणार आहे. सध्या लोक शहराकडे धाव घेत आहेत, पण काही कालावधीनंतर हेच लोक शहरातील धकाधकीला कंटाळून खेड्याकडे वळतील. गावातील शांतता त्यांना आकर्षित करेल. त्यांना जर शांत गावांची ओढ लागली, तर पुन्हा धकाधकीच्या शहरात ते येणारही नाहीत. शहराचा ते सहजच त्याग करतील. परमार्थासाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी काही जण संसाराचा त्याग करतात. संसार हा होत असतो. परमार्थ मात्र करावा लागतो. जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत सर्व गोष्टी स्वतःहून आपल्याकडून करवून घेतल्या जात असतात. त्या करताना त्यात कंटाळा करून चालत नाही, पण परमार्थ हा करावा लागतो. माऊली येथे आयता मोक्ष सांगत आहेत. संसार न त्यागताही मोक्ष कसा मिळवायचा, हे सांगत आहेत. लोखंडापासून सोने वेगळे केल्यानंतर पुन्हा त्याचे लोखंडात रूपांतरण करता येत नाही किंवा उसापासून साखर तयार केल्यानंतर पुन्हा त्यापासून ऊस तयार होत नाही. तसे देह आणि आत्मा हा वेगळा आहे, याची अनुभूती आल्यानंतर पुन्हा त्या देहात आत्मा अडकणार नाही. आत्मा हा अमर आहे. देहाचा मृत्यू होतो. आत्माचा नाही. तो आत्मा आता पुन्हा देहात अडकणार नाही, ही अनुभूती आल्यानंतर तो जन्म-मरणाच्या फेऱ्यातून कायमचा मुक्त होईल. यासाठी मनातील विचार महत्त्वाचे आहेत. मनात कोणते विचार चालतात, हे महत्त्वाचे आहे. ते शांत कसे करता येतील, याचाही विचार मनात डोकावायला हवा. यासाठी मी कोण आहे? याचा विचार करायला हवा. यातूनच सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळतात.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


Sunday, June 9, 2019

मनाची स्थिरता



अध्यात्माचे विज्ञानही अभ्यासायला हवे. ते जाणून घ्यायला हवे. मगच हे थोतांड आहे की नाही, यावर भाष्य करायला हवे. विज्ञानाच्या प्रयोगानंतरच त्यावर विश्‍वास ठेवता. मग अध्यात्माचा हा प्रयोग करून पहायला नको का? यासाठी मन हे मार्गी लावायला हवे.
- राजेंद्र घोरपडे




तूं मन बुद्धी सांचेसी । जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी ।
तरी मातेची गा पावसी । हे माझी भाक ।। 79 ।। अध्याय 8 वा

ओवीचा अर्थ - तूं मनबुद्धि ही खरोखर माझ्या स्वरूपांत अर्पण करशील, तर मग माझ्याशीं एकरूपच होशील, हे माझें प्रतिज्ञापूर्वक सांगणे आहे.

अध्यात्माचा अभ्यास हा करायलाच हवा. साधनेतील प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करायला हवा. चक्रांचे कार्य काय आहे, ते कसे कार्य करतात? साधनेच्या काळात आपल्या शरीरात कोणत्या क्रिया घडतात? आपणास कोणते बोध होतात? कोणती अनुभूती येते? हे जाणून घ्यायलाच हवे. साधनेत अवधानाला महत्त्व आहे. नुसतेच शांत बसून राहणे म्हणजे साधना नव्हे. सद्‌गुरूंनी दिलेल्या मंत्राचे नामस्मरण करायला हवे. ते करताना अवधान आवश्‍यक आहे. मन भरकटते, पण स्थिर करणे आवश्‍यक आहे. साधनेच्या सुरवातीच्या काळात हे शक्‍य होत नाही, पण हळूहळू अभ्यासाने ते शक्‍य होते. मनातील विचार दूर होतात. साधनेत येणारे अडथळे हळूहळू दूर होतात. सद्‌गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राच्या जागी मन स्थिर होते. मनाला स्थिर ठेवणे कोणास जमले? साधना सुरू असताना विचार येतच राहतात; पण याचा तोटा काही नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. या विचारांच्या जागी स्थिर होते. यातून एखाद्या समस्येवर उत्तर मिळते. चिंतन, मनन, नामस्मरणातूनच अनेक समस्या सुटतात. योग्य मार्ग सापडतात. साधनेचे हे फायदे आहेत. यासाठी सुरवातीच्या काळात साधनेत मन रमले नाही तरी हळूहळू त्याची गोडी लागते. मनाला स्थिरता येते. विचार संपतात. मग आत्मज्ञानाच्या पायऱ्या सहज चढल्या जातात. यासाठीच साधनेत कोणत्या क्रिया घडतात, यामागचे शास्त्रही समजून घ्यायला हवे. भारतीय संस्कृती ही विज्ञानावर आधारलेली आहे. अध्यात्म हेही एक शास्त्र आहे. याचा सखोल अभ्यास करण्याचाही प्रयत्न साधकांनी करायला हवा. नवी पिढी विज्ञानाची चर्चा करते. विज्ञानाच्या या पंडितांनी अध्यात्माचे विज्ञानही अभ्यासायला हवे. ते जाणून घ्यायला हवे. मगच हे थोतांड आहे की नाही, यावर भाष्य करायला हवे. विज्ञानाच्या प्रयोगानंतरच त्यावर विश्‍वास ठेवता. मग अध्यात्माचा हा प्रयोग करून पहायला नको का? यासाठी मन हे मार्गी लावायला हवे. प्रत्येक वेळी प्रयोगात एकच परिणाम मिळत नाही. यामध्ये फरक असतो. यातून एकच निष्कर्ष काढण्यात येतो. आकड्यामध्ये फरक असला तरी निष्कर्ष निश्‍चित करण्यात येते. अध्यात्मामध्येही तेच आहे. निष्कर्ष निश्‍चित आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Wednesday, June 5, 2019

अध्यात्म म्हणजे काय?






संसाराचा त्याग करायलाच हवा, अशी काही सक्ती नाही. संसारात राहूनही मनाची स्थिरता साधता येते. हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. कोणता मार्ग अवलंबायचा, हा व्यक्तिगत प्रश्‍न आहे. यामध्ये बदलही करण्याचा त्याला अधिकार आहे. मनाच्या स्थिरतेसाठीचे हे मार्ग तयार केले आहेत. मन स्थिर असेल तरच अनुभूती येईल. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 9011087406

ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती ।
तया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ।। 19।। अध्याय 8 वा

ओवीचा अर्थ - अर्जुना, याप्रमाणे आपल्या स्थितीने असणाऱ्या ब्रह्माचे जे अखंडत्व त्या अखंडत्वास अध्यात्म हे नाव आहे.

भगवंतास धनुर्धर अर्जुनाने प्रश्‍न केला, ब्रह्म म्हणजे काय? कर्म कशाला म्हणतात? अध्यात्म म्हणजे काय? तसे पाहता हे प्रश्‍न सर्वच भक्तांना पडतात. प्रत्येक भक्ताला या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घेण्याची उत्सुकता असते. हे प्रश्‍न प्रत्येकाला पडायलाच हवेत. त्याच्या उत्तराच्या शोधात तरी आध्यात्मिक ग्रंथांचे पारायण होईल. उत्तरे शोधण्यासाठी आपोआपच वाचन वाढेल, नंतर त्याची सवय लागेल. हळूहळू या प्रश्‍नांची उकल होते. अनुभूतीतून प्रश्‍नांची उत्तरे मिळत राहतात. यातून मनाला वाफसा येतो. अशा वेळी सद्‌गुरू गुरुमंत्राची पेरणी करतात. सद्‌गुरूंचा नित्य सहवास अंतःकरणात राहतो. अगदी सहजपणे आपणाकडून साधना घडते. कष्ट पडत नाहीत. त्रास होत नाही. सतत नामस्मरणात आपण गढून जातो. दैनंदिन घडामोडीतही नित्य सद्‌गुरूंच्या सहवासाची जाणीव होते. त्याची अनुभूती येते. मनाला स्थिरता येते. यालाच अध्यात्म असे म्हणतात. यासाठी अवधान असावे लागते. तरच आध्यात्मिक प्रगती होत राहते. साधनेच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात. हळूहळू प्रगती होत राहते. अनुभूती येत राहते. देह आणि आत्मा वेगळा आहे. या देहात हा आत्मा अडकला आहे. मी म्हणजे आत्मा आहे. तो सर्वांध्ये आहे, याची अनुभूती येते. हेच तर अध्यात्म आहे. हा सर्व मनाचा व्यवहार आहे. सर्व काही मनात असते. मनाची स्थिरता यासाठी महत्त्वाची आहे. मन स्थिर राहण्यासाठी विविध उपाय योजले जातात. कोण यासाठी ब्रह्मचर्य स्वीकारतो. लग्न न करण्याचा निर्णय घेतो. कोण संसारापासून अलिप्त राहून जंगलात, वनात तपश्‍चर्येचा मार्ग स्वीकारतो. यातूनच मनात त्यागी वृत्ती उत्पन्न होते. मनाला वैराग्य येते. संसाराचा त्याग करायलाच हवा, अशी काही सक्ती नाही. संसारात राहूनही मनाची स्थिरता साधता येते. हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. कोणता मार्ग अवलंबायचा, हा व्यक्तिगत प्रश्‍न आहे. यामध्ये बदलही करण्याचा त्याला अधिकार आहे. मनाच्या स्थिरतेसाठीचे हे मार्ग तयार केले आहेत. मन स्थिर असेल तरच अनुभूती येईल. संसारात राहूनही सद्‌गुरूंचा नित्य सहवास अनुभवता येतो.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।