Tuesday, October 30, 2018

योगायोग


ना तरी जांभया पसरे मुख । तेथें अवचटें पडे पीयूख ।
तैसा संग्रामु हा देख । पातला असे ।। 195 ।।

आळस आला म्हणून तोंड उघडले पण त्याचवेळी तोंडात अमृत पडले. किती हा योगायोग? हा योग जुळून यावा लागतो. तो सहजपणे आला आहे. आत्मज्ञानासाठीची ही लढाईही अशीच योगायोगाने आली आहे. सद्‌गुरू भेटीसाठी धावा करावा लागतो. भगवंताची आठवण सदैव राहावी यासाठी सतत दुःखे मागणारेही भक्त येथे आहेत. पण आपणास सद्‌गुरु सहजपणे भेटले आहेत. भक्तीच्या या वाटेवर आपण कसे आलो याचा अभ्यास आपण करायला हवा. कशी याची गोडी लागली? कसे आपण यात रमलो? कसे यातून आपले जीवन सुकर झाले? दुःखाच्या क्षणातही या मार्गावरील काटे कधी पायाला टोचले नाहीत. कधीही आपले मन खचले नाही. ताठपणे उभे राहण्याचे सामर्थ्य या मार्गाने दिले. मनाला मोहात टाकणाऱ्या अनेक घटना घडत राहिल्या, पण त्यातून आपण कसे सावरत गेलो. हे कसे घडले? मनोधैर्य देणारी ही शक्ती आहे तरी कशी? हे जाणू घेण्याचा हा योग आहे. हा केवळ योगायोग आहे. जगात नवेनवे शोध दररोज लागत आहेत. शोधाचा वेग वाढतच चालला आहे. जग आता आपणास जवळ वाटत आहे. सातासमुद्रापारची माहितीही आता क्षणात घर बसल्या सहजपणे उपलब्ध होऊ शकते. जगही आपणास आता लहान वाटू लागले आहे. त्यामुळे आता इतर ग्रहावर मानव डोकावू लागला आहे. सूर्य मालेतील विविध गृह-तारेही त्याने शोधले आहेत. दररोज नवा शोध समोर येतो आहे. पण याला काही मर्यादा आहेत. हे जेव्हा तो जाणतो तेव्हा तो स्वतःचा शोध घेण्यामागे लागतो. मी कोण आहे? हे शोधण्याची त्याला आठवण होते. तो पर्यंत तो सर्वत्र भटकत राहातो. तिन्ही लोकांमध्येही त्याला रस वाटत नाही. तो जेव्हा कंटाळतो, तेव्हा आळसाच्याक्षणीही त्याला संजीवनी अगदी सहजपणे मिळते. त्याने तो तृप्त होतो. भीती पोटी कोणताही भक्त आत्मज्ञानाच्या वाटेवर येत नाही. दुःख झाले म्हणून तो येथे येत नाही. या वाटेवर येण्याचे ते एक निमित्त असते. अनायासे तो या मार्गावर येतो. मन बळकट करणारा हा मार्ग आहे. मनाला धीर देणारा हा मार्ग आहे. पण या मार्गावर आपण सहजपणे आलो आहोत. जीवनाची ही वाट सहजपणे आपणास पार करायची आहे. जीवनाच्या या प्रवासात विविध उद्योग आपण करत असतो. यात प्रत्येकवेळी आपणास नफा होईल असे नाही. कितीही मोठा उद्योजक असला तरी नुकसानीचे चटके त्याला सोसावेच लागतात. म्हणून खचायचे नसते. नुकसान का झाले, यावर उपाय योजायचे असतात. बळकट मनाने त्याला सामोरे जायचे असते. भरपूर मिळाले म्हणूनही हर्ष करायचा नसतो. सुख-दुःखात मनाला स्थिर ठेवायचे असते. आत्मज्ञानाच्या या लढाईत स्थिरतेला अधिक महत्त्व आहे. तरच ही लढाई जिंकता येते. अनायासे आपण ही लढाई लढत आहोत. तेव्हा मनाची स्थिरता ही कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.


Tuesday, October 23, 2018

नाशवंत शरीर



आणि शरीरजात आघवें । हें नाशवंत स्वभावें ।
म्हणोनि तुवा झुंजावें । पंडुकुमरा ।। 136।। अध्याय 2 रा


ओवीचा अर्थ - आणि शरीर म्हणून जेवढें आहे, तेवढें सगळें स्वभावतः नाशवंत आहे. म्हणून अर्जुना तूं लढावेंस, हे योग्य आहे.

नाशवंत असतात म्हणून फळांची विक्री वेळेवर करावी लागते. तरच पैसा मिळतो. तसेच ती नासकी होण्या अगोदरच खावी लागतात. तरच त्याची गोडी मिळते. अन्यथा ती फेकून द्यावी लागतात. शरीराचेही असेच आहे. हा देह नाशवंत आहे. तो नष्ट होण्याअगोदरच या देहाचे कार्य समजून घ्यायला हवे. हा जन्म कशासाठी आहे, हे जाणून घ्यायला हवे. या जन्माचा अर्थ समजून घ्यायला हवा. आपण कोण आहोत? आपली ओळख काय? आपले कार्य काय? हे सर्व प्रश्‍न जाणून घेण्याची इच्छा मनात उत्पन्न व्हायला हवी. तरच आपणास जीवनाचा खरा अर्थ समजू शकेल. जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा लागतो. पण आता या मुख्य गरजा मिळविण्यासाठीच अनेक गोष्टींची गरज लागत आहे. पाणी, वीज तर अत्यावश्‍यक गरज झाली आहे. काही वर्षांनी जगात पाण्यासाठी युद्ध होईल अशी भाकिते वर्तविली जात आहेत. इतकी परिस्थिती बिकट होणार आहे. अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण तेही वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडणार आहे. निवाराचा प्रश्‍न तर आजच गंभीर झाला आहे. अशाने हा देह जगणेही मुश्‍किल होणार आहे. यासाठी मानवाने प्रथम हा देह कशासाठी मिळाला आहे, याचा विचार करून जगायला शिकण्याची गरज आहे. युद्धाने प्रश्‍न सुटत नाहीत. कोणाला ठार मारून, हत्या करून विचार मारता येत नाही. हे प्रश्‍न सोडवायचे असतील तर शांत विचारांची गरज आहे. मने भडकवून प्रश्‍न वाढतच जाणार आहेत. यासाठी शांत मनाने विचार करून प्रश्‍न सोडवायला हवेत. देहाचा जन्म कशासाठी? या प्रश्‍नातच सर्व प्रश्‍नांची उत्तरे दडली आहेत. देह नाशवंत आहे यासाठीच ही लढाई लढायची आहे. ही लढाई स्वतःच स्वतःशी लढायची आहे. आत्मा आणि देह हे वेगळे आहेत हे ओळखायचे आहे. त्यानुसार कृती करायची आहे. हा आत्मा देहात आला आहे. हे जाणून त्यातून मुक्त व्हायचे आहे. आत्मज्ञानी व्हायचे आहे. यासाठीच हा आपला जन्म आहे. मी आत्मा आहे. ही आपली ओळख आहे. तो आत्मा चराचरात आहे. प्रत्येक सजिवात आहे. हे जाणण्यासाठी करावे लागणारे कार्य आपणास या जन्मात करायचे आहे. तरच जन्म सार्थकी लागेल. हीच साधना आपणास करायची आहे. श्‍वासावर नियंत्रण मिळवायचे आहे. सदैव आत्मभाव मनात साठवायचा आहे. या आत्मभावात रममान व्यायचे आहे. आत्मज्ञानातूनच जगाला आत्मज्ञानी करायचे आहे. हेच आले कार्य आहे. नाशवंत देहातील आत्मा असा अमर करायचा आहे. हीच संजिवन समाधी साधायची आहे.

Friday, October 19, 2018

सेवा


जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंटा ।
तो स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ।।

सेवा म्हणून काम करण्याची प्रथा आता लोप पावत आहे. यावरून मानसाचा स्वभाव किती बदलत चालला आहे हे समजते. आर्थिक गणितांमुळे माणूस बदलतो आहे. समिकरणे बदलत चालली आहेत. जीवन जगणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उद्या पोट कसे भरायचे याची काळजी त्यांना लागून राहिली आहे. अशा या संकटांतच शेतकरी नुकसानीमुळे आत्महत्या करू लागले आहेत. नुकसान पटविण्याची ताकद आता त्याच्यामध्ये राहिलेली नाही. या बदलत्या काळात सेवाधर्म महत्त्वाचा ठरणार आहे. सेवेमुळे मनुष्यास आधार भेटतो. सेवेमुळे मनुष्य सुखावतो. सेवेमुळे मनुष्यचा बोजा हलका होतो. संकटात सापडलेल्या, खचलेल्या मनांना सेवेने दिलासा मिळतो. यासाठी माणसांमध्ये सेवाभाव उत्पन्न करण्याची गरज आहे. एकमेकांमध्ये हा भाव उत्पन्न झाल्यास खचलेली मने दुभंगणार नाहीत. त्यांच्या हातून गैरकृत्य होणार नाही. सेवेचा गैरफायदा घेणारेही असतात. पण सेवा हा धर्म माणणाऱ्या व्यक्तींनी निःस्वार्थी भावाने सेवा केल्यास गैरफायदा घेणाऱ्यांचीही मने बदलू शकतात. त्यांच्यामध्येही हा सेवाभाव उत्पन्न करण्याचे सामर्थ यामध्ये आहे. याचा विचार करून ही सेवा करायला हवी. प्रत्येक मानवामध्ये भगवंत आहे असे समजून सेवा करायला हवी असे अध्यात्म सांगते. दुसऱ्याला सुख देण्याने स्वतःला सुख मिळते. दुसऱ्याचे दुःख पुसायला शिकले पाहिजे. यामध्ये सेवा हा भाव असायला हवा. जेथे सेवा आहे तेथे प्रेम आहे. जिव्हाळा आहे. आपुलकी आहे. सेवेचे भाव संपतो तेव्हा तेथे व्यापार होतो. व्यापारात मी तू हा भाव येतो. त्याचे मोजमाप होते. उचनिच हा भाव येतो. तेथे आपुलकी, प्रेम, जिव्हाळा राहात नाही. दुःख नांदते. अशाने मनाला उभारी मिळत नाही. मन खचते. यासाठी सेवा हा भाव जोपासून व्यवहार करायला हवेत. त्याचा व्यापार होता कामा नये. ही काळजी घ्यायला हवी. अध्यात्मातही सेवा हा भाव ठेवूनच सेवा करायला हवी. अन्यथा तोही व्यापार होतो.