Thursday, February 28, 2019

जो मानापमानातें साहे





माऊलीच्या पादुकांचे दर्शन घेऊन आला आहात. आपण त्यामुळे धन्य झाला आहात. आम्हाला या गर्दीमुळे लाभ घेता येणे शक्‍य होत नाही. म्हणून ज्या चरणांनी माऊलीच्या पादुकांचे दर्शन घेतले त्या धन्य चरणांना नमस्कार करून आम्ही माऊलीचे दर्शन घेत आहोत. हे शब्द शेजारी उभा असलेल्या विद्वानाने ऐकले. तेव्हा त्याची विद्वत्ताच गळाली. इतके महान विचार असू शकतात. याचेच त्याला आश्‍चर्य वाटले.

जो मानापमानातें साहे । सुखदुःख जेथ सामाये ।
निंदास्तुती नोहे । दुखंडु जो ।।345।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - मान व अपमान (मनाच्या सारख्या स्थितीनें)सहन करतो. व सुखदुःखें ही ज्याच्या ठिकाणी सारखी मानली जातात व निंदेने आणि स्तुतीने ज्याच्या मनाची स्थिती दोन प्रकारची (दुःखाची व संतोषाची अशी) होत नाही.

वारीमध्ये संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पादुका मुक्कामाच्या ठिकाणी दर्शनासाठी ठेवल्या जातात. पादुकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळते. दर्शन मिळेल का याची शाश्‍वती देता येत नाही. एकदा वारीमध्ये पादुका दर्शनावेळी एक प्रसंग घडला. एक वयस्कर कुटुंब वारीमध्ये पादुकांच्या दर्शनासाठी आले होते. वयस्कर असल्याने इतक्‍या गर्दीत त्यांना जाणे शक्‍य नव्हते. दर्शनाची तीव्र इच्छा मात्र त्यांना होती. मनात माऊलीच्या पादुका आठवूनही दर्शन होऊ शकते. या वयस्कर कुटुंबाने तेच केले. पादुकांचे दर्शन घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या ते पाया पडू लागले. एक विद्वान गृहस्थ माऊलीच्या पादुकांचे दर्शन घेऊन तेथे आला. आपण विद्वान असल्याचा त्याला मोठा गर्व होता. त्या वयस्कर कुटुंबाने या विद्वानासही खाली वाकून नमस्कार केला. त्या विद्वानास वाटले आपल्याला हे लोक ओळखत असावेत. यामुळे त्यांनी इतका मान आपणास दिला असावा. ठीक आहे, ठीक आहे, असे म्हणत त्या विद्वानाने त्यांचा नमस्कार स्वीकारला. त्या विद्वानाच्या मागोमाग एक सामान्य गृहस्थ आला. त्यालाही या वयस्कर कुटुंबाने नमस्कार केला. तेव्हा तो सामान्य गृहस्थ म्हणाला,अहो इतका मान मला कशाकरिता देत आहात? मी एक सामान्य गृहस्थ आहे. तेव्हा ते वयस्कर कुटुंब म्हणाले आपण सर्वसामान्य आहात. असे आपणास वाटत असेल. ठीक आहे. पण आपण माऊलीच्या पादुकांचे दर्शन घेऊन आला आहात. आपण त्यामुळे धन्य झाला आहात. आम्हाला या गर्दीमुळे लाभ घेता येणे शक्‍य होत नाही. म्हणून ज्या चरणांनी माऊलीच्या पादुकांचे दर्शन घेतले त्या धन्य चरणांना नमस्कार करून आम्ही माऊलीचे दर्शन घेत आहोत. हे शब्द शेजारी उभा असलेल्या विद्वानाने ऐकले. तेव्हा त्याची विद्वत्ताच गळाली. इतके महान विचार असू शकतात. याचेच त्याला आश्‍चर्य वाटले. पण काही वेळाने त्या विद्वानाला वारीमध्ये असे अनेक गृहस्थ भेटले. जे मानपमान मानत नाहीत. कोणाची निंदा करत नाहीत. कोणाचे मन दुखावेल असे बोलत नाहीत. दुसऱ्याचे दुःख आपलेच आहे असे मानणारेही येथे त्यांना भेटले. तेव्हा त्या विद्वानाने या वयस्कर गृहस्थांना शोधून नमस्कार केला. तो विद्वान म्हणाला तुम्ही वयस्कर असाल. सर्वसामान्य असाल. पण आपले विचार हे सर्वसामान्य नाहीत. विचारावर विद्वत्ता ठरते. पण तुम्ही केवळ विचार मांडत नाही तर त्याचे आचरणही करता. आपणच खरे विद्वान आहात. अशा चरणांना आपण सदैव नमस्कार करायला हवा.

Wednesday, February 27, 2019

तरि तुम्हां रसिकांजोगें । व्याख्यान शोधावें लागे ।





अनुभूतीतून शिष्याची प्रगती सद्‌गुरू साधत असतात. अनुभवातून अनुभूती येते. अनुभूतीतूनच मग आत्मज्ञान प्रकट होते. आत्मज्ञानाचा बोध होते. आत्मज्ञान प्राप्ती होते. अध्यात्म हे अनुभवण्याचे शास्त्र आहे. अनुभवातून शिकण्याचे शास्त्र आहे. यातूनच प्रगती होत राहाते. सर्व सद्‌गुरूच घडवत असल्याने चिंतेचे कारण नाही. जे घडते ते सर्व तेच घडवतात.

तरि तुम्हां रसिकांजोगें । व्याख्यान शोधावें लागे ।
म्हणूनि मतांगे । बोलों ठेला ।। 333।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - तरी तुम्ही जे रसिक, त्या तुम्हां योग्य व्याख्यान योजावें लागले, म्हणून माझ्याकडून अन्य मतांची चर्चा झाली.

समोरचे श्रोते कसे आहेत त्यानुसार व्याख्यात्याला व्याख्यान करावे लागते. ऐकणाऱ्याला रुचेल, पटेल अशीच मते मांडावी लागतात. ऐकणाऱ्याचा प्रतिसाद मिळत नसेल तर, सांगणाऱ्यालाही स्फुरण चढत नाही. श्रोत्यांनी दाद दिली तरच, वक्तालाही सांगण्यास उत्साह येतो. संत ज्ञानेश्‍वर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यान देत आहेत. गुरूंना जे अभिप्रेत आहे, तेच ते येथे सांगत आहेत. येथे वक्ते ज्ञानेश्‍वर महाराज आहेत तर श्रोते हे निवृत्तिनाथ आहेत. शिष्य गुरूंना सांगत आहे. अध्यात्म ही शिक्षणाची एक वेगळीच पद्धत आहे. इतर शैक्षणिक पद्धतीत शिष्यांना गुरू व्याख्यान देतात. सध्याच्या युगात तर शिकण्यासाठी खासगी शिकविण्याही लावाव्या लागतात. पण येथे शिष्य गुरूंना व्याख्यान देत आहे. अध्यात्मामध्ये स्वतःच स्वतःचा अभ्यास करायचा असतो. पण गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो करावयाचा असतो. स्वतःच स्वतःची प्रगती साधायची असते. अनुभवातून येथे शिकायचे असते. ज्ञानेश्‍वरी हा ग्रंथ अनुभवातूनच उदयास आला आहे. अनुभवातून प्रकट झालेले ते बोल आहेत. यासाठी ज्ञानेश्‍वरी हा अनुभवण्याचा ग्रंथ आहे. सद्‌गुरूंनी शिष्याकडून करवून घेतलेली ती साधना आहे. ग्रंथामध्ये मी केले, मी सांगितले असा अहंभाव कोठेही नाही. हे सर्व सद्‌गुरूंनी करवून घेतले आहे असे सांगितले आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. कर्ता-करविता सर्व सद्‌गुरूच आहेत. यामुळे चिंता करण्याचे काहीच कारण नाही. अध्यात्मावर अनेक पुस्तके लिहिली गेलेली आहेत. पण अनुभूतीतून लिहिलेली पुस्तके फारच थोडी आहेत. जे अनुभवले तेच सांगितले. सद्‌गुरूच सर्व शिष्याकडून करवून घेत असतात. यासाठी असे सर्व ग्रंथ हे सद्‌गुरूंच्या चरणी अर्पण केले जातात. ही विद्या सद्‌गुरूंच्याकडूनच प्राप्त झालेली आहे. सांगत ज्ञानेश्‍वर महाराज असले तरी सांगण्यासाठी जी स्फुर्ती त्यांना मिळालेली आहे ती संत निवृत्तीनाथांकडून मिळालेली आहे. अनुभूतीतून शिष्याची प्रगती सद्‌गुरू साधत असतात. अनुभवातून अनुभूती येते. अनुभूतीतूनच मग आत्मज्ञान प्रकट होते. आत्मज्ञानाचा बोध होते. आत्मज्ञान प्राप्ती होते. अध्यात्म हे अनुभवण्याचे शास्त्र आहे. अनुभवातून शिकण्याचे शास्त्र आहे. यातूनच प्रगती होत राहाते. सर्व सद्‌गुरूच घडवत असल्याने चिंतेचे कारण नाही. जे घडते ते सर्व तेच घडवतात. बिघडले तरी तेच त्यात सुधारणा करतात. सुचविणारे तेच असल्यावर व्याख्यान हे त्यांना अभिप्रेत असेच होणार ना.

Monday, February 25, 2019

अहिंसावादी मन






गवत खाऊन सिंह, वाघ जगलेले कोठेही पुरावे नाहीत. पण इतके खरे आहे की त्यांना भूक लागल्यानंतरच ते हिंस्र होतात. इतरवेळी ते हिंसा करत नाहीत. तसा विचारही त्यांच्या मनात येत नाही. भूक माणसातही हिंसा उत्पन्न करते. पोट भरलेले असेल तर हिंसेचा विचार येत नाही. उलट झोप येते. पण भूक लागलेली असेल तर मन कासावीस होते. पोटात अन्नाचा कण पडल्यानंतरच मनाला शांती मिळते.

पैं मानसींचि जरी । अहिंसेची अवसरी ।
तरी कैंची बाहेरी । वोसंडेल ।।297।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - परंतु, मनांत जर अहिंसा नसेल तर बाहेर कशी येईल?

मनात अहिंसा नसेल तर कृतीत अहिंसा कोठून येणार. हिंस्रप्राण्यांच्या मनातच हिंसा असते. त्यानुसारच त्यांच्या शरीराचाही विकास झालेला असतो. त्यांचे दात सुळेदार असतात. तसे मांस पचविण्याची ताकद त्यांच्या पोटात असते. त्या प्राण्यांनी गवत खाल्ले तर त्यांना ते पचनी पडत नाही. कारण ते पचविण्याची ताकद त्यांच्यात अस्तित्वातच नसते. गवत खाऊन सिंह, वाघ जगलेले कोठेही पुरावे नाहीत. पण इतके खरे आहे की त्यांना भूक लागल्यानंतरच ते हिंस्र होतात. इतरवेळी ते हिंसा करत नाहीत. तसा विचारही त्यांच्या मनात येत नाही. भूक माणसातही हिंसा उत्पन्न करते. पोट भरलेले असेल तर हिंसेचा विचार येत नाही. उलट झोप येते. पण भूक लागलेली असेल तर मन कासावीस होते. पोटात अन्नाचा कण पडल्यानंतरच मनाला शांती मिळते. सर्व सुविधा उपलब्ध असणाऱ्यांची मुले बऱ्याचदा शिक्षणात मागे पडतात. पण गरीब, सर्वसामान्यांची मुले खूप शिकलेली पाहायला मिळतात. त्यांनी मोठी प्रगती केल्याचीही उदाहरणे आहेत. म्हणजे मनाची अवस्थाही परिस्थितीनुसार बदलत असते. परिस्थितीच माणसाला घडवते. पण मनाने दृढ निश्‍चित केला, तर अशक्‍य गोष्टही सहज शक्‍य होते. यासाठी ती गोष्ट मनाला पटली पाहिजे. मनाला भिडली पाहिजे. मनावर ती बिंबली पाहिजेत. मांसाहार करायचा नाही, असे ठरवले तर ते शक्‍य आहे. फक्त तो विचार मनात पक्का झाला पाहिजे. आहारानुसारही माणसाची वृत्ती बदलत असते. पण मनावर नियंत्रण असेल, तर ही हिंस्रवृत्तीही नष्ट होऊ शकते. जगात शांतता नांदण्यासाठी माणसांची मने बदलायला हवीत. माणसांच्या मनात अहिंसेचा विचार बळकट करायला हवा. दुष्टांना मारायचे तर आहे, पण कसे? तर त्याच्या मनातील खलवृत्ती काढून. हिंस्रप्राणीही माणसाळू शकतात. ते मांसाहार जरूर करतील, कारण जगण्यासाठी त्यांना अन्नाची गरज आहे. पण तो आहार त्यांना योग्य वेळी पुरविला जायला हवा. त्यांची योग्य निगा राखली, तर तेही माणसांमध्ये वावरू शकतात. त्यांच्यात ती वृत्ती उत्पन्न करता येऊ शकते. मांसाहार करणाऱ्यांमध्येही अहिंसा उत्पन्न करता येऊ शकते. तसे गुंडामधील गुंड प्रवृत्ती काढून त्यालाही उत्तम पुरुष बनवता येणे शक्‍य आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला हा इतिहास आहे. इतिहासात घडले तसे सध्याच्या युगातही ते शक्‍य आहे. यासाठी प्रत्येकाच्या मनामध्येच अहिंसावृत्ती उत्पन्न करायला हवी. अहिंसावादी मने घडवायला हवीत.

Friday, February 22, 2019

आयुर्वेद


एक गोष्टमात्र निश्‍चित आहे ती म्हणजे हिंस्र जीव कमी होत आहेत. तो विचार असणारे फार काळ अस्तित्वात राहू शकत नाहीत. हा जीवनचक्राचा नियम आहे. हा नियम मानवानेही विचारात घ्यायला हवा. हिंसेच्या विचाराने जगणाऱ्यांचा वंशच शिल्लक राहात नाही. चांगल्याच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी लढणारेच अमर होतात.

आणि आयुर्वेदुही आघवा । याचि मोहोरा पांडवा ।
जे जीवाकारणें करावा । जीवघातु ।। 224 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - आणि सर्व आयुर्वेदही अर्जुना याच धोरणाचा आहे कारण की एका जीवाचे रक्षण करण्याकरिता दुसऱ्या जीवाचा घात करावा असे तो प्रतिपादन करतो.

एकाचा जीव वाचविण्यासाठी दुसऱ्याचा जीव घ्यायचा हा नियम आयुर्वेदातही आहे. काही औषधे ही अशाच पद्धतीने तयार केलेली असतात. मग अशी ही औषधे शाकाहारी कशी म्हणायची? ही अहिंसा कशी म्हणायची? दुसऱ्या जीव घेऊन तिसऱ्याला वाचविणे म्हणजेही हिंसाच आहे,.पण ही हिंसा चांगल्याच्या रक्षणासाठी आहे. एखादाला रोग झाला तर रोगाचा जिवाणू हा विषाणू असतो. तो मारणे हे गरजेचे असते. तो मारल्याने हिंसा होत नाही. दुसऱ्या जिवाणूकडून त्या विषाणूला मारणे ही हिंसा नाही. कारण ही गोष्ट चांगल्याच्या रक्षणासाठी आहे. महाभारतात कृष्ण अर्जुनाला हेच तर सांगत आहेत. धर्माच्या रक्षणासाठी अधर्माला, विषाणूला मारणे हाच तर खरा धर्म आहे. पिकामध्ये तण उगवते. ज्वारीच्या पिकात मक्‍याचे एखादे रोप उगवले तर तेही तणच असते. कारण मुख्यपिक ज्वारी आहे. त्याचे उत्पादन आपण घेत आहोत. यासाठी ज्वारी व्यतिरिक्त त्या शेतामध्ये जे उगवते, ते तणच असते. त्याच्या वाढीने ज्वारीच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. यासाठी त्याचा नायनाट हा करायलाच हवा. पिकावर एखादी कीड पडते. ती कीड बऱ्याचदा नियंत्रणात येत नाही. त्याच्या नियंत्रणासाठी तो कीटक खाणारा दुसरा कीटक त्या शेतात सोडण्यात येतो. एका किटकाकडून दुसऱ्याचे नियंत्रण केले जाते. तसे जीवनचक्रही असेच आहे. लहान प्राणी मोठ्या प्राण्याला खातो आणि जगतो. जगण्यासाठी त्याला दुसऱ्याचा जीव घेणे गरजेचेच असते. नाही खाल्लेतर जगणेही मुश्‍किल होते. यामुळेच आज वाघ, सिंह आदी हिंस्र पशूंची संख्या कमी झाली आहे. कारण त्यांना खाण्यासाठी दुसरे जीवच मिळेनाशे झाले आहेत. कुपोषणामुळे ह्या हिंस्रप्राण्यांचा वंशच नष्ट झाला आहे. यावरून एक गोष्टमात्र निश्‍चित आहे ती म्हणजे हिंस्र जीव कमी होत आहेत. तो विचार असणारे फार काळ अस्तित्वात राहू शकत नाहीत. हा जीवनचक्राचा नियम आहे. हा नियम मानवानेही विचारात घ्यायला हवा. हिंसेच्या विचाराने जगणाऱ्यांचा वंशच शिल्लक राहात नाही. चांगल्याच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी लढणारेच अमर होतात. त्यांनी जरी हिंसा केली तरी ती चांगल्यासाठी आहे. यामध्ये चांगल्याचा विचार आहे. यासाठीच आयुर्वेदातील हिंसा ही हिंसा ठरत नाही. शाकाहारी विचार त्यामध्ये नसला तरी ती चांगल्याच्या रक्षणासाठी असल्याने त्याने धर्म भ्रष्ट होत नाही. काहीजण उपवासाच्या दिवशी औषधे घेत नाहीत. पण ते चुकीचे आहे. धर्म हा कृतीवर ठरतो. चांगल्यासाठी केलेले कोणतेही कर्म हे धर्माला अनुसरूनच असते.

दानपुण्य


दान कोणाला करायचे? दान कधी करायचे? दान का करायचे? याचा सर्वांगीण विचार करायला हवा. तरच दान लाभदायक ठरते. विचार न करता केलेले दान हे दान नसते. जे दान स्वतःच्याच जिवावर उठते ते दान कसे असू शकेल. याचा विचार व्हायला नको का? दान जरूर करावे. पण त्याच्या परिणामांचा विचार करून दान करायला हवे. आपण दान करण्या इतपत योग्य आहोत का? आपली ती पात्रता आहे का? याचाही विचार जरूर करायला हवा.

नाना कृषीवळु आपुलें । पांघुरवी पेरिलें ।
तैसें झांकी निपजले । दानपुण्य ।। 206।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - अथवा शेतकरी पेरलेले बीज जसे माती टाकून झाकतो, त्याप्रमाणे तो आपल्या हातून झालेले दान आणि पुण्य झाकतो.

चांगले उत्पादन येण्यासाठी बीजाची पेरणी योग्य प्रकारे करावी लागते. योग्य खोलीवर, योग्य अंतरावर बीजाची पेरणी झाली तर त्याची वाढ उत्तम होते. पेरणी करताना बीज उघडे पडले नाही ना याची काळजी शेतकरी घेतो. बीज उघडे पडले तर पक्षी हे बीज खाऊ शकतो. बीजाला फुटही योग्य प्रकारे फुटली जात नाही. यामुळे पेरणी वाया जाण्याचा मोठा धोका असतो. यासाठी पेरणीच्यावेळी बीज मातीने झाकले गेले आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. दान किंवा केलेले पुण्य सुद्धा असेच झाकावे असे ज्ञानेश्‍वर माऊली सांगते. आपण दानशूर आहोत असा डंका पिटवायचा हे योग्यच नाही. आपण किती पुण्यवान आहोत हे इतरांना सांगणेही चुकीचेच आहे. यामुळे अहंकार वाढू शकतो. मी पणा येऊ शकतो. यासाठी याची वाच्यता करणे चुकीचेच आहे. पण दानपुण्य झाकायचे म्हणजे नमके काय करायचे? कर्ण दानशूर होता. त्याची समाजात तशी प्रतिमाही उभी राहिली होती. त्याच्याकडे एखाद्याने काही मागीतले आणि ते त्याने दिले नाही असे कधीच घडले नाही. इतका तो शब्दाला मानणारा होता. पण त्याचा हा दाणशूरपणाच त्याच्या मृत्यूचे कारण ठरला. त्याने स्वतःकडील कवचकुंडले दान केली. कवचकुंडले होती तो पर्यंत कर्णाला ठार मारण्याचे सामर्थ्य कोणत्याही योद्धात नव्हते. शब्दाला जागणाऱ्या कर्णाने ती दान केली. कर्णाकडे विरता होती पण त्याचा वापर धर्माच्या रक्षणासाठी नव्हता. धर्माच्या विरुद्ध वापरली गेल्यानेच त्याच्या विरुद्ध कपट केले गेले. यातच त्याचा अंत झाला. यासाठी दान कोणाला करायचे? दान कधी करायचे? दान का करायचे? याचा सर्वांगीण विचार करायला हवा. तरच दान लाभदायक ठरते. विचार न करता केलेले दान हे दान नसते. जे दान स्वतःच्याच जिवावर उठते ते दान कसे असू शकेल. याचा विचार व्हायला नको का? दान जरूर करावे. पण त्याच्या परिणामांचा विचार करून दान करायला हवे. आपण दान करण्या इतपत योग्य आहोत का? आपली ती पात्रता आहे का? याचाही विचार जरूर करायला हवा. आपल्याच घरच्यांचे पोट आपण व्यवस्थित भरू शकत नसेल तर देव देवस्थानांना अन्नदानासाठी मदत देण्याचा अधिकार काय? यासाठी स्वतः दान करण्यायोग्य आपण आहोत का? हे पाहावे. तरीही दान केले तर याची वाच्यता करू नये. अन्यथा ते दान तुमच्यासाठी लाभदायक न ठरता दुःखदायक ठरू शकते. यासाठीच दान झाकावे. दान झाकले तर निश्‍चितच त्यातून सत्कर्माचे झाड उभे राहील.


Thursday, February 21, 2019

अहंकार





अहंकारावर नम्रतेचा उतारा आहे. अहंकार बळावू नये यासाठी अंगात नम्रता वाढवायला हवी. जितकी नम्रता वाढेल तितकी अहंकाराची तीव्रता कमी होत जाते. नम्रता मनात वाढण्यासाठी मनाची मानसिक तयारी करायला हवी. कितीही यश मिळाले तरी त्या यशाने हुरळून जायचे नाही. यशाचा अभिमान जरूर असावा. पण ते यश जमिनीवर कायम स्थिर असायला हवे. यशाने अहंकार बळावणार नाही याची काळजी सातत्याने घ्यायला हवी.

नवल अहंकाराची गोठी । विशेषें न लगे अज्ञानापाठीं ।
सज्ञानाचे झोंबे कंठी । नाना संकटी नाचवी ।। 82 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - अहंकाराची गोष्ट काही विलक्षण आहे. ती अशी की, अहंकार हा अज्ञानी व्यक्तीच्या मागे विशेषेकरून लागत नाही परंतु ज्ञानवान व्यक्तीचे नरडे धरतो आणि त्याला नाना प्रकारच्या संकटांत गोते खावयास लावतो.

अहंकार कसा आहे? तो प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. फक्त तो सुप्तावस्थेत आहे. अमावशेला चंद्र आकाशात असतो, पण तो आपणास दिसत नाही. त्याचे अस्तित्व गुप्त असते. तसे अहंकाराचे सुद्धा अस्तित्व हे गुप्त असते. लहान मुलांमध्ये तारुण्य हे गुप्त असते. न उमललेल्या कळीमध्ये सुवास हा गुप्त असतो. लाकडामध्ये अग्नी गुप्त असतो. तसा प्रकृतीच्या पोटात हा अहंकार गुप्त असतो. अंगात ज्वर असतो पण कुपथ्य झाले की मगच प्रकट होतो. तसेच अहंकाराचे आहे. फक्त त्याला योग्य वातावरण मिळाले की तो जागृत होतो. बीज सुद्धा योग्य वातावरणातच अंकुरतं. मग अहंकार कोणत्या वातावरणात बळावतो याचा विचार करायला हवा. मनुष्य गरीब असतो तेव्हा तो इतरांसमोर नम्रपणे व्यवहार करत असतो. पण त्याला प्रमाणापेक्षा जास्त पैसा मिळाला की मग मात्र त्याच्यात नम्रपणा राहात नाही. म्हणजे नेमके काय होते? त्या व्यक्तीतील हा गुप्त अहंकार जागा होतो. यासाठी यश, घन, कीर्ती मिलाल्यानंतरही माणसाने त्याचे मन स्थिर ठेवायला हवे. कोणतीही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये. या अहंकाराचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. तो विशेषकरून अज्ञानी व्यक्तीच्या मागे लागत नाही. परंतु ज्ञानवान व्यक्तीचे नरडे तो धरतो. ज्ञान आले की माणसाच्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात बदल होतो. त्याचे व्यक्तिमत्त्व सुधारते. पण या सुधारणेला अहंकारामुळे गालबोट लागू नये याची काळजी घ्यायला हवी. ज्ञानाचा गर्व अंगात चढता कामा नये. माझा सारखा ज्ञानी कोणी नाही. हा अहंकार चढण्याची शक्‍यता असते. यशाचे शिखर गाठल्यानंतर ते यश पचविण्याची ताकद त्याच्यात असायला हवी. त्याच्यात तो नम्रपणा कायम असायला हवा. जसे यश मिळत जाईल तसा तो अधिक नम्र व्हायला हवा. जितका तो नम्र राहील तितकी त्याच्या यशाची उंची वाढत राहाते. तितका काळ तो त्या यशाच्या शिखरावर टिकून राहू शकतो. अहंकारावर नम्रतेचा उतारा आहे. अहंकार बळावू नये यासाठी अंगात नम्रता वाढवायला हवी. जितकी नम्रता वाढेल तितकी अहंकाराची तीव्रता कमी होत जाते. नम्रता मनात वाढण्यासाठी मनाची मानसिक तयारी करायला हवी. कितीही यश मिळाले तरी त्या यशाने हुरळून जायचे नाही. यशाचा अभिमान जरूर असावा. पण ते यश जमिनीवर कायम स्थिर असायला हवे. यशाने अहंकार बळावणार नाही याची काळजी सातत्याने घ्यायला हवी. तरच हाती लागलेले यश कायम टिकून राहाते.

Wednesday, February 20, 2019

तैसीं छत्तीसही इयें तत्त्वें




छत्तीस तत्त्वांनी हे शरीर तयार झाले आहे. यापासून आत्मा हा वेगळा आहे. तो वेगळा आहे हे जाणण्यासाठी छत्तीस तत्त्वाचे क्षेत्र जाणणे गरजेचे आहे.

तैसीं छत्तीसही इयें तत्त्वें । मिळती जेणें एकत्वें ।
तेणें समूहपरत्वें । क्षेत्र म्हणिपे ।।155।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - त्याप्रमाणे ही छत्तीस तत्वे ज्या एकत्वानें जमा होतात, त्या समुदायपरत्वाने त्यास क्षेत्र असे म्हटले जाते.

क्षेत्र म्हणजे शरीर. शरीर आणि आत्मा वेगळे आहेत. हे जाणून घेण्यासाठी प्रथम शरीर काय आहे याची माहिती करून घ्यायला हवी. हे शरीर छत्तीस तत्त्वांनी तयार होते. आता ही छत्तीस तत्त्वे कोणती? पाच महाभुते (पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश), अहंकार, बुद्धी, अव्यक्त (मूलप्रकृती), दहा इंद्रिये व अकरावे इंद्रिय मन, कान, डोळे, त्वचा, नाक, जिव्हा ही पाच ज्ञानेंद्रिये तर जीभ, हात, पाय, उपस्थ आणि गुद हे पाच इंद्रियांचे प्रकार, तसेच इच्छा, द्वेष, सुख, दुःख, चेतना, धैर्य आणि संघात अशी ही छत्तीस तत्त्वे आहेत. या सर्वांची ओळख करून घ्यायला हवी. हे मी केले. ते माझ्यामुळे झाले. हे मी कमावले. हा मी पणा म्हणजे अहंकार. सगळे जग जिंकता येते पण, हा अहंकार गेल्याशिवाय स्वतःच्या आत्म्यावर विजय मिळवता येत नाही. मीपणा हा अहंकार आहे. बुद्धी हे तेज तत्त्वाचे उत्पत्तिस्थान आहे. सत्त्व गुणांची वाढती अवस्था म्हणजे बुद्धी आहे. आत्मा आणि जीव यांच्या जागेत बुद्धी राहते. बुद्धीमुळे सुख-दुःखाची जाणीव होते. पाप-पुण्य, शुद्ध-अशुद्ध याची निवड ही बुद्धीमुळे होते. जीवरुप प्रकृतीला येथे अव्यक्त म्हटले आहे. बीज असेल तरच त्याचे झाड होईल. या देहाचे जे सुक्ष्मरुप बीजाच्या रूपाने अस्तित्वात असते तेच येथे अव्यक्त आहे. वस्त्र आहे पण वस्त्राचे मुळरुप तंतू आहे. तसे शरीराचे मुळरुप हे अव्यक्त आहे. शरीरात पाच कर्मेंद्रिये आहेत. जीभ, हात, पाय, उपस्थ आणि गुद हे जे पाच इंद्रियाचे प्रकार आहेत तीच कर्मेंद्रिये आहेत. शरीरामध्ये क्रियाशक्ती म्हणून जी प्राणांची स्त्री आहे, तिचे शरीराच्या आंत येणे व बाहेर जाणें या पाच द्वारांनी होते. आता मन कशाप्रकारचे आहे ते जाणून घेऊया. इंद्रिये आणि बुद्धी यांच्यामधील जागेत रजोगुणांच्या आश्रयाने मन चंचलपणाने राहाते. आकाशातील निळा रंग हा प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. तो आपल्या डोळ्यांना होणारा भास आहे. किंवा मृगजळ जसे लाटांप्रमाणे दिसतात. तसे मनाचाही भास हा खोटा असतो. वास्तविक पाहता मन ही एक मुर्तिमंत कल्पनाच आहे. मनाच्या संगतीमुळेच ब्रह्माला जीवदशा प्राप्त झाली आहे. मन हे प्रवृत्तीचे मुळ आहे, कामाचे बळ आहे तर अहंकाराला ते अखंड चेतवत असते. इच्छा- आकांक्षा या त्याच्यापासूनच उत्पन्न होतात. अशा या पस्तीस तत्त्वांचा जिवाभावाचे असणारा हा समुदाय आहे. हा समुदाय छत्तीसावे तत्त्व संघात या नावाने ओळखले जातो. या छत्तीस तत्त्वांनी हे शरीर तयार झाले आहे. यापासून आत्मा हा वेगळा आहे. तो वेगळा आहे हे जाणण्यासाठी छत्तीस तत्त्वाचे क्षेत्र जाणणे गरजेचे आहे.



Tuesday, February 19, 2019

देईल गुरुसेवा


पैशामुळे गुरूचे महत्त्वच राहिलेले नाही. मग सेवेचा धर्म या पिढीला समजणार कसा? कारण पैसा असेल तर तेथे शिक्षणाची सेवा सहज उपलब्ध होते. पण जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी आत्मज्ञानी गुरूंची गरज आहे. ते ज्ञान पैशाने विकत घेता येत नाही. येथे सेवा हाच धर्म आहे.

देईल गुरुसेवा । इया बुद्धी पांडवा ।
जन्माचा सांडोवा । टाकित जे ।। 167।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - अर्जुना, गुरूसेवेने ते ज्ञान मिळेल, या बुद्धीने त्या सेवेवरून आपला जन्म ओवाळून टाकतात.

पूर्वीच्या काळी गुरुकुले असायची. तेथे शिक्षण दिले जात होते. उच्चशिक्षितांनाच शिक्षणाचा अधिकार होता. वेद पठणाचा अधिकार तर फक्त ब्राह्मणानाच होता. विशिष्ट जातीपुरते हे शिक्षण मर्यादीत असलेल्या या परंपरे विरोधात इतिहासात अनेकदा आवाज उठविला गेला. ही परंपरा बाराव्या शतकात संत ज्ञानेश्‍वरांनी मोडली. सर्वांसाठी त्यांनी ज्ञानेश्‍वरीच्या माध्यमातून आध्यात्मिक अभ्यासाचा पाया रचला. सर्व जाती धर्मासाठी त्यांनी हा मार्ग खुला केला. यामुळेच वारकरी संप्रदायामध्ये ब्राह्मणेतर समाजातील शिंपी, माळी, कुंभार, कुणबी आदी संत झाले. अगदी अलीकडच्या काळात म्हणजे राजर्षी शाहुंच्या कार्यकालातही ब्राह्मण समाजाचेच वर्चस्व होते. वेद पठण फक्त याच समाजापुरते मर्यादीत होते. यासाठी राजर्षी शाहुंनी बहुजन समाजासाठी वेद पठणाची शाळा सुरू केली. पाटगावच्या मौनी महाराजांच्या मठाअंतर्गत क्षात्र जगतगुरूपिठाची स्थापना केली. आता हा सर्व समाज याचा अभ्यास करू शकतो. पण सध्या शिक्षण पद्धती बदलली आहे. केवळ पोटापाण्यासाठी, कामधंदा मिळविण्यासाठी शिक्षण दिले जात आहे. याची आज गरजही आहे. बदलत्या परिस्थितीत हा बदल स्वीकारला नाहीतर आज जगात जगणेही कठीण होणार आहे. हे जरी खरे असले तरी जीवन कशासाठी आहे हे समजून तरी घ्यायला हवे. पण याचा विचारही सध्याच्या पिढीमध्ये केला जाताना दिसत नाही. यामुळेच कदाचित आत्मज्ञानी गुरूंचे महत्त्व कमी झालेले असेल. तसे गुरूही आजकाल फारच कमी पाहायला मिळतात. शैक्षणिक ज्ञान देणारे गुरू सेवा म्हणून काम करताना दिसत नाहीत. आर्थिक जगामध्ये आज सर्वांची तुलना ही पैशाने केली जात आहे. पैसा असेल तर वाट्टेल ते शिक्षण आज उपलब्ध होऊ शकते. यासाठी गुरूचीही गरज लागत नाही. पैशामुळे गुरूचे महत्त्वच राहिलेले नाही. मग सेवेचा धर्म या पिढीला समजणार कसा? कारण पैसा असेल तर तेथे शिक्षणाची सेवा सहज उपलब्ध होते. पण जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी आत्मज्ञानी गुरूंची गरज आहे. ते ज्ञान पैशाने विकत घेता येत नाही. येथे सेवा हाच धर्म आहे. आत्मज्ञानी गुरूच हा मार्ग दाखवू शकतात. समजावून सांगू शकतात. यासाठी अशा गुरूंची सेवा कशी करायची हे समजून  घ्यायला हवे. आत्मज्ञानी गुरू समाधीस्थ झाले तरी ते त्यांच्या भक्तांना मार्गदर्शन करतात. अनुभव देतात. यासाठी भक्तीसेवेचा अभ्यास करायला हवा. हे ज्ञान देणारे गुरू केवळ पान, फुल, फळ यांचाच स्वीकार करतात. तेही भक्ताने शुद्ध अंतकरणाने दिले तरच अन्यथा याचीही गरज त्यांना वाटत नाही.

गुरुसेवा



पैशामुळे गुरूचे महत्त्वच राहिलेले नाही. मग सेवेचा धर्म या पिढीला समजणार कसा? कारण पैसा असेल तर तेथे शिक्षणाची सेवा सहज उपलब्ध होते. पण जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी आत्मज्ञानी गुरूंची गरज आहे. ते ज्ञान पैशाने विकत घेता येत नाही. येथे सेवा हाच धर्म आहे.

देईल गुरुसेवा । इया बुद्धी पांडवा ।
जन्माचा सांडोवा । टाकित जे ।। 167।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - अर्जुना, गुरूसेवेने ते ज्ञान मिळेल, या बुद्धीने त्या सेवेवरून आपला जन्म ओवाळून टाकतात.

पूर्वीच्या काळी गुरुकुले असायची. तेथे शिक्षण दिले जात होते. उच्चशिक्षितांनाच शिक्षणाचा अधिकार होता. वेद पठणाचा अधिकार तर फक्त ब्राह्मणानाच होता. विशिष्ट जातीपुरते हे शिक्षण मर्यादीत असलेल्या या परंपरे विरोधात इतिहासात अनेकदा आवाज उठविला गेला. ही परंपरा बाराव्या शतकात संत ज्ञानेश्‍वरांनी मोडली. सर्वांसाठी त्यांनी ज्ञानेश्‍वरीच्या माध्यमातून आध्यात्मिक अभ्यासाचा पाया रचला. सर्व जाती धर्मासाठी त्यांनी हा मार्ग खुला केला. यामुळेच वारकरी संप्रदायामध्ये ब्राह्मणेतर समाजातील शिंपी, माळी, कुंभार, कुणबी आदी संत झाले. अगदी अलीकडच्या काळात म्हणजे राजर्षी शाहुंच्या कार्यकालातही ब्राह्मण समाजाचेच वर्चस्व होते. वेद पठण फक्त याच समाजापुरते मर्यादीत होते. यासाठी राजर्षी शाहुंनी बहुजन समाजासाठी वेद पठणाची शाळा सुरू केली. पाटगावच्या मौनी महाराजांच्या मठाअंतर्गत क्षात्र जगतगुरूपिठाची स्थापना केली. आता हा सर्व समाज याचा अभ्यास करू शकतो. पण सध्या शिक्षण पद्धती बदलली आहे. केवळ पोटापाण्यासाठी, कामधंदा मिळविण्यासाठी शिक्षण दिले जात आहे. याची आज गरजही आहे. बदलत्या परिस्थितीत हा बदल स्वीकारला नाहीतर आज जगात जगणेही कठीण होणार आहे. हे जरी खरे असले तरी जीवन कशासाठी आहे हे समजून तरी घ्यायला हवे. पण याचा विचारही सध्याच्या पिढीमध्ये केला जाताना दिसत नाही. यामुळेच कदाचित आत्मज्ञानी गुरूंचे महत्त्व कमी झालेले असेल. तसे गुरूही आजकाल फारच कमी पाहायला मिळतात. शैक्षणिक ज्ञान देणारे गुरू सेवा म्हणून काम करताना दिसत नाहीत. आर्थिक जगामध्ये आज सर्वांची तुलना ही पैशाने केली जात आहे. पैसा असेल तर वाट्टेल ते शिक्षण आज उपलब्ध होऊ शकते. यासाठी गुरूचीही गरज लागत नाही. पैशामुळे गुरूचे महत्त्वच राहिलेले नाही. मग सेवेचा धर्म या पिढीला समजणार कसा? कारण पैसा असेल तर तेथे शिक्षणाची सेवा सहज उपलब्ध होते. पण जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी आत्मज्ञानी गुरूंची गरज आहे. ते ज्ञान पैशाने विकत घेता येत नाही. येथे सेवा हाच धर्म आहे. आत्मज्ञानी गुरूच हा मार्ग दाखवू शकतात. समजावून सांगू शकतात. यासाठी अशा गुरूंची सेवा कशी करायची हे समजून घ्यायला हवे. आत्मज्ञानी गुरू समाधीस्थ झाले तरी ते त्यांच्या भक्तांना मार्गदर्शन करतात. अनुभव देतात. यासाठी भक्तीसेवेचा अभ्यास करायला हवा. हे ज्ञान देणारे गुरू केवळ पान, फुल, फळ यांचाच स्वीकार करतात. तेही भक्ताने शुद्ध अंतकरणाने दिले तरच अन्यथा याचीही गरज त्यांना वाटत नाही.

Monday, February 18, 2019

श्रीगुरुचे पाय


सद्‌गुरू ही एक व्यक्तीच आहे. व्यक्ती ही शेवटी पायांनीच चालत येणार. यासाठीच त्यांचे चरण घरी पडावेत. त्यांच्या चरणस्पर्शाने ही भूमी पावन व्हावी. संपन्न व्हावी. असा विचार यामध्ये आहे. यासाठीच त्यांच्या पाद्यपुजेला महत्त्व आहे. सद्‌गुरू हृद्‌ययात यावेत. त्यांची चरणकमले हृद्‌ययात उमटावीत. त्यांचा सोऽहम भाव हृद्‌यात प्रकटावा. आत्मज्ञानाचा लाभ व्हावा. येवढे थोर भाग्य आपणास प्राप्त व्हावे, अशी प्रार्थना ही याचसाठी आहे.

श्रीगुरुचे पाय । जैं हृद्‌य गिंवसूनि ठाय ।
तें येवढें भाग्य होय । उन्मेषासी ।। 5 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - जेंव्हा हृदय श्रीगुरूंचे पाय धरून राहातें तेव्हां ज्ञानाला एवढें दैव प्राप्त होतें.

अध्यात्मात गुरुंच्या चरण सेवेला महत्त्व आहे. पण पायांनाच का महत्त्व? असा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे. सद्‌गुरू दिसायला सुंदर नाहीत का? त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या आहेत का? असे काहीही नाही, मग चरणांनाच महत्त्व का? वडीलधाऱ्यांना नमस्कार करताना चरणांना स्पर्श करावा. वाकून नमस्कार करावा. अशी रीत, असे संस्कार भारतीय संस्कृतीत आहेत. वीणा वाजविणाऱ्या व्यक्तीकडून वीणा घेताना त्याला नम्रपणे वाकून नमस्कार करून त्याच्याकडून वीणा घ्यावयाचा असतो. मग वीणा घेतलेली व्यक्ती लहान जरी असली तरीही ही पद्धत आहे. पण चरणच का? काहींना तर वाकून नमस्कार करण्यात कमीपणा वाटतो. दुसऱ्या समोर वाकणे म्हणजे त्याची लाचारी पत्करणे असे वाटते. हा त्या व्यक्तींचा अहंकार असतो. मी पणा असतो. मुळात वाकून नमस्कार करणे म्हणजे दुसऱ्यासमोर नम्रता प्रकट करणे असे असते. दुसऱ्याला नम्रपणे वागायला शिकवणे असते. स्वतः नम्रपणे वागाल, तर दुसराही नम्रपणे तुमच्याशी व्यवहार करेल. समोरची व्यक्ती उद्धटपणे वागत असेल, तर त्याच्यामध्येही ही नम्रता यावी. यासाठी आपण आपला संस्कार सोडता कामा नये. दुसरा दगड मारला, म्हणून आपण दगड मारणे ही माकडाची वृत्ती आहे. माणसाची नाही. याचे भान आपण ठेवायला हवे. भारतीय संस्कृती नम्र होण्यास शिकवते. चरण पकडल्याने कमीपणा प्रकट होतो असा भाव, असा विचार येथे कदापी नाही. सद्‌गुरूंना वाकून नमस्कार केल्यानंतर सद्‌गुरूही मनातून तुम्हाला वाकून नमस्कार करतात. हे आपण नित्य स्मरणात ठेवावे. व्यक्तीतील अहंकार, मीपणा घालवणारी ही संस्कृती आहे. थोर व्यक्तींचे चरण स्वतःच्या घराला लागावेत, अशी प्रत्येकाचीच मनोकामना असते. थोरांच्या चरणांनी, थोरांच्या येण्याने घरातील आनंद द्विगुणित होतो. अनेक समस्या सुटतात. त्यांच्या येण्यासाठीच आपण घरात काही कार्यक्रमांचे आयोजन करतो. सद्‌गुरू ही एक व्यक्तीच आहे. व्यक्ती ही शेवटी पायांनीच चालत येणार. यासाठीच त्यांचे चरण घरी पडावेत. त्यांच्या चरणस्पर्शाने ही भूमी पावन व्हावी. संपन्न व्हावी. असा विचार यामध्ये आहे. यासाठीच त्यांच्या पाद्यपुजेला महत्त्व आहे. सद्‌गुरू हृद्‌ययात यावेत. त्यांची चरणकमले हृद्‌ययात उमटावीत. त्यांचा सोऽहम भाव हृद्‌यात प्रकटावा. आत्मज्ञानाचा लाभ व्हावा. येवढे थोर भाग्य आपणास प्राप्त व्हावे, अशी प्रार्थना ही याचसाठी आहे. याचसाठी चरणसेवक होऊन नम्रपणे सद्‌गुरूंची सेवा करावी. यामुळे अहंकार, मीपणा जाऊन आत्मज्ञानाचा ठेवा प्राप्त होईल.

Sunday, February 17, 2019

तयाचें आम्हां व्यसन


मनाला चांगल्या गोष्टींची सवय लावावी लागते. वाईट गोष्टींची सवय केव्हा लागली याची कल्पनाही येत नाही. पण चांगल्या गोष्टी लागण्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतात. तसे वातावरण निर्माण करावे लागते. सर्वसंपन्नता असणाऱ्यांनाही अनेक वाईट व्यसने असतात. चांगल्या संस्कारित वातावरणात वाढलेलेही अनेकजण व्यसनाच्या आहारी गेल्याची उदाहरणे आहेत. यासाठी मनाला चांगल्या गोष्टींची सवय हा एकमेव त्यावरील उपाय आहे.

तयाचें आम्हां व्यसन । तो आमुचें निधिनिधान ।
किंबहुना समाधान । तो मिळे तैं ।। 188 ।। अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ - त्या भक्ताचा आम्हाला छंद असतो. तो भक्त आमच्या स्वतःच्या ध्यानाचा विषय असतो. फार काय सांगावे त्याची जेव्हा आम्हांस भेट होते तेव्हांच आम्हाला समाधान वाटते.

व्यसन हे वाईट गोष्टींचेच असते असे नाही. काही चांगल्या गोष्टींचेही व्यसन असू शकते. कोणाला कलेचे व्यसन असते, कोणाला सतत गाणी ऐकण्याचे, टीव्ही पाहण्याचे व्यसन असते. कोणाला तंबाखू, मद्य, गुटखा, सिगारेट, अमली पदार्थांचे सेवन आदीचे व्यसन असू शकते. व्यसनी मनुष्यास आवश्‍यक गोष्ट मिळाली नाही, तर त्यांचे मन अस्थिर होते. जीव कासावीस होतो. तो पदार्थच त्याची तहान-भूक होते. त्या पदार्थाच्या सेवनाशिवाय त्याला चैन पडत नाही. कोणत्याही कामात त्याला रस वाटत नाही. अशावेळी त्याच्याजवळ अमृत जरी आणून ठेवले तरी त्याने त्याची तृप्ती होत नाही. मनाला केवळ आणि केवळ तोच पदार्थच तृप्त करू शकतो. अशी अवस्था त्याची असते. व्यसन हे लवकर सुटतही नाही. वाईट गोष्टींच्या व्यसनाचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. तंबाखू खाणे आरोग्यास धोकादायक आहे. त्याचा शरीरावर वाईट परिणाम होते. या गोष्टी माहीत असूनही तंबाखू खाणे काही सुटत नाही. मद्याचेही असेच आहे. दारूच्या व्यसनाने अनेकांचे संसार उधवस्थ झाले. अनेक घराणी नष्ट झाली. वाईट व्यसनाने शरीराची चिरफाड होऊनही ही व्यसने सोडण्यास त्या व्यक्ती तयार नसतात. मरण समोर दिसत असले, तरी व्यसन काही सुटत नाही. इतकी घातक व्यसने सोडण्यासाठी मनाची तयारीच करावी लागते. मनात आणले तर हे व्यसन एका क्षणात सुटू शकते. व्यसन सुटण्यासाठी मनपरिवर्तन हाच एकमेव उपाय आहे. वाईट व्यसन सुटण्यासाठी मनाला चांगल्या गोष्टींची सवय लावायला हवी. चांगल्या गोष्टीत मन रमवायला हवे. चांगल्या गोष्टींचे व्यसन लावून घ्यायला हवे. मनात वाईटाचा विचारच येणार नाही, असा बदल घडवायला हवा. चांगल्या गोष्टींचे व्यसन लागण्यासाठी मनावर तसे संस्कार करावे लागतात. मनाला चांगल्या गोष्टींची सवय लावावी लागते. वाईट गोष्टींची सवय केव्हा लागली याची कल्पनाही येत नाही. पण चांगल्या गोष्टी लागण्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतात. तसे वातावरण निर्माण करावे लागते. सर्वसंपन्नता असणाऱ्यांनाही अनेक वाईट व्यसने असतात. चांगल्या संस्कारित वातावरणात वाढलेलेही अनेकजण व्यसनाच्या आहारी गेल्याची उदाहरणे आहेत. यासाठी मनाला चांगल्या गोष्टींची सवय हा एकमेव त्यावरील उपाय आहे. आत्मज्ञानप्राप्तीचे व्यसन भक्ताला असायला हवे. त्याच्या प्राप्तीसाठी जीव कासावीस व्हायला हवा. त्यासाठी मन सद्‌गुरूंच्या अनुभूतीत रमायला हवे.


Friday, February 15, 2019

प्रपंच




पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात व उन्हाळ्यात नदीचा प्रवाह हळूहळू कमी होऊ लागतो. उन्हाळ्यात नदी आटते. तिचा प्रवाह खंड पावतो. तसा आध्यात्मिक वाटचाल सुरू झाली की प्रपंच्यातील अडीअडचणी हळूहळू कमी होतात. भेडसावणारे प्रश्‍न सुटतात. मनाची शांती साधण्यासाठी, मन स्थिर होण्यासाठी शिष्याचे प्रापंचिक प्रश्‍न सुटणे, अडीअडचणी दूर होणे गरजेचेच असते.

जैसा शरत्कालू रिगे । आणि सरिता वोहटूं लागे ।
तैसें चित्त काढेल वेगें । प्रपंचौनी ।।107 ।। अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणे शरद ऋृतूचा प्रवेश आला असता नद्यांचे पाणी कमी होऊ लागते, त्याप्रमाणे तुझ्या चित्ताचा माझ्या स्वरूपाचा जसजसा प्रवेश होईल तसतसें तुझें चित्त प्रपंचातून वेगाने निघेल.

प्रपंचात एकदा अडकले की त्यातून बाहेर निघणे कठीण असते. हळूहळू त्यात मनुष्य अधिकच गुरफटत जातो. लग्न झाले की, मुलांच्यात गुरफटतो. प्रापंचिक जबाबदाऱ्या वाढत जातात. आई वडिलांची जबाबदारी असते. मुलांची, पत्नीची जबाबदारी असते. यातून परमार्थ करण्यासाठी वेळच मिळत नाही. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर साठीमध्ये मग परमार्थाकडे ओढ लागते. काही उद्योग नाही म्हणून, मग आध्यात्मिक ग्रंथांचे पारायण सुरू होते. मनाला शांत ठेवण्यासाठी तो एक उत्तम मार्ग आहेच आणि उतारवयात आरोग्याच्या तक्रारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तर हा मार्ग स्वीकारणे कधीही चांगलेच आहे. ऐन तारुण्यात परमार्थाच्या मार्गावर दिसला तर, मात्र त्याला नावे ठेवण्यात येतात. लाचार व्यक्ती म्हणून हिनवलेही जाते. परमार्थ हा लाचारीचा मार्ग नाही. गुरूंना प्रश्‍न विचारायचे नाहीत, तर मग कोणाला विचारायचे. त्यांना प्रश्‍न विचारले तर, लाचारी पत्करली असे कसे. गुरू हे तज्ज्ञ असतात. शैक्षणिक अभ्यासात गुरू असतातच ना? त्यांच्याकडून ज्ञान घेणे ही लाचारी होत नाही. मग आध्यात्मिक गुरूकडून ज्ञान घेणे, म्हणजे लाचारी पत्करणे हे कसे? व्यक्तिगत जीवनात अनेक अडचणी असतात. अशा प्रसंगात अनेकांची मदत होत असते. आध्यात्मिक गुरू हे सुद्धा मित्रासारखेच असतात. त्यांची मदत घेणे यात कमीपणा कसला. प्रपंच हा होत असतो. अध्यात्माच्या वाटेवर गेल्यावर प्रपंच्यातल्या अडीअडचणी कमी होत जातात. पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात व उन्हाळ्यात नदीचा प्रवाह हळूहळू कमी होऊ लागतो. उन्हाळ्यात नदी आटते. तिचा प्रवाह खंड पावतो. तसा आध्यात्मिक वाटचाल सुरू झाली की प्रपंच्यातील अडीअडचणी हळूहळू कमी होतात. भेडसावणारे प्रश्‍न सुटतात. मनाची शांती साधण्यासाठी, मन स्थिर होण्यासाठी शिष्याचे प्रापंचिक प्रश्‍न सुटणे, अडीअडचणी दूर होणे गरजेचेच असते. गुरूंचा हा प्रयत्न असतो. गुरूंना हेच हवे असते. शिष्याचे प्रश्‍न सुटले तरच तो आध्यात्मिक शांतीकडे वळेल. जीवनातील सगळे प्रश्‍न एकदम संपत नाहीत. हळूहळू हे प्रश्‍न मार्गी लागतात. उन्हाळ्यात झाडाची पाने गळतात. तसे जीवनातून हे प्रश्‍न गळतात. कडक उन्हातही झाडाला फुलोरा येतो. तसे अध्यात्माच्या जीवनातही बहर येतो.

महाप्रसाद


संत परंपराही ही सुद्धा एक शिक्षण पद्धतीच आहे. येथे अध्यात्म शिकवले जाते. त्याचा अभ्यास घेतला जातो. शिक्षणाच्या या पद्धतीत विद्यार्थी घडविण्याचीही रीत थोडी वेगळीच आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराज त्यांचे गुरू संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या समोर ज्ञानेश्‍वरी सांगत आहेत. येथे वक्ता शिष्य आहे आणि श्रोता गुरू आहे. शिष्य गुरूला सांगत आहे. पण येथे मीपणाची भावना नाही. समर्पणाची भावना आहे.
 

तेथ जी जी महाप्रसादु । म्हणोनि साविया जाला स्वानंदु ।
आतां निरोपीन प्रबंधु । अवधान दीजे ।।19।। अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ - गुरू बोलले तेव्हा ज्ञानेश्‍वर महाराजांना आनंद झाला व ते म्हणाले, महाराज आपण जी मला आज्ञा केली, ती मी आपला महाप्रसाद समजतो, तर आतां आपल्या आज्ञेप्रमाणे मी कथा सांगेन आपण लक्ष देण्याची कृपा करावी.

पुणे विद्यापीठात स्वायत्त शिक्षण पद्धती आहे. येथे प्रत्येक शिक्षकाची विद्यार्थी घडविण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. काही शिक्षक तर तोंडी परिक्षेच्यावेळी स्वतः प्रश्‍न विचारत नाहीत. ते विद्यार्थ्यांनाच प्रश्‍न विचारा असे सांगतात. यामध्ये नेमके काय होते. शिक्षकांना प्रश्‍न विचारायचे म्हणजे स्वतःलाच तो विषय प्रथम समजलेला असायला हवा. म्हणजे समजून घेण्यासाठी त्याचा अभ्यास हा करायला हवा. त्यातून जे समजत नाही, त्याचा प्रश्‍न तयार होतो. मग आपण तो प्रश्‍न त्या प्राध्यापकांना विचारतो. येथे काय होते? जो प्रश्‍न विचारला त्यातून त्या विद्यार्थ्याला हा विषय किती समजला? या विषयाचे त्याला किती आकलन झाले? या गोष्टी स्पष्ट होतात. विद्यार्थी यामध्ये किती पुढे आहे किती मागे आहे हे समजते. संशोधक तयार करण्यासाठी ही पद्धती अतिशय उत्तम आहे. संत परंपराही ही सुद्धा एक शिक्षण पद्धतीच आहे. येथे अध्यात्म शिकवले जाते. त्याचा अभ्यास घेतला जातो. शिक्षणाच्या या पद्धतीत विद्यार्थी घडविण्याचीही रीत थोडी वेगळीच आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराज त्यांचे गुरू संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या समोर ज्ञानेश्‍वरी सांगत आहेत. येथे वक्ता शिष्य आहे आणि श्रोता गुरू आहे. शिष्य गुरूला सांगत आहे. पण येथे मीपणाची भावना नाही. समर्पणाची भावना आहे. जे काही सुचले ते गुरूंच्यामुळे सुचले. जे काही तोंडात आले ते गुरूंचेच बोल होते. त्यांचेच शिक्षण होते हा भाव आहे. मीच गुरूला शिकवतो असा भाव नाही. असा गर्व नाही. माझेच गुरू ऐकतात, असे विचारही येथे नाहीत. कारण गुरूंच्याच आज्ञेने शिष्य वक्तव्य करत आहे. गुरूंची आज्ञा हा शिष्यासाठी येथे महाप्रसाद आहे. सध्या मंदीरात, मठामध्ये महाप्रसाद असतो. तो घेण्यासाठी मोठी गर्दी होते. उद्योगपती, मोठे व्यापारी, काही गैरधंदा करणारेही हा महाप्रसाद वाटतात. अन्नदान हे श्रेष्ठदान आहे. यात शंकाच नाही. वाढती महागाई, अन्न सुरक्षितता, कुपोषण आदी प्रश्‍नांचा विचार केला असता याला महत्त्व हे आहेच. पण अध्यात्म शिक्षणाच्या या पद्धतीत महाप्रसाद हा गुरू आज्ञेचा आहे. तो गुरूंनी दिलेला आहे. गुरूंच्या आज्ञेवरूनच अन्नदान होते. म्हणून तो महाप्रसाद आहे. शिष्याच्या मनात दानाची भावना ही गुरूच उत्पन्न करतात. शिष्य घडविण्याचे कार्य येथे केले जाते. शिष्य आत्मज्ञानी व्हावा हाच भाव येथे आहे. शिष्याने आत्मज्ञानाचा शोध घ्यावा तो संशोधक व्हावा. अशी ही शिक्षण पद्धती निश्‍चितच आजच्या नव्या पिढीला नवा विचार देणारी आहे.

Thursday, February 14, 2019

विश्‍वात्मक रूपडे


 ब्रह्मापासून सृष्टीची उत्पत्ती झाल्याचे भगवंतांनी अर्जुनाला दाखवले. तू ब्रह्म आहेस याची प्रचिती भगवंतांनी अर्जुनाला दिली, इतकेच नव्हे तर भगवंत आणि अर्जुन हे वेगळे नसून एकच आहेत. त्यांच्या ठिकाणी असणारा आत्मा हा एकच आहे. याची अनुभूती त्यांनी करून दिली. मी ब्रह्म आहे. हे समजणे, हे ज्ञान नित्य असणे म्हणजेच ब्रह्मज्ञानी होणे. 

तरि विश्‍वात्मक रूपडें । जें दाविलें आम्ही तुजपुढें ।
तें शंभुही परि न जोडे । तपें करितां ।। 676।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ - अर्जुना, योगी हे अष्टांग योगासारख्या संकटांना तोंड देऊन शिणतात परंतू त्या विश्‍वरुपाच्या दर्शनाचा प्रसंग त्यांना येत नाही.

सृष्टीची निर्मिती ब्रह्माने केली असे मानले जाते. ब्रह्म म्हणजे आत्मा. हा आत्मा देहात आल्याने त्याला जन्म मरणाचा फेरा सुरू झाला आहे. अनेकदा अपघातात, बॉम्ब स्फोटात किंवा आगीमध्ये एखाद्याचा मृत्यू झाला, तर हा देह कोणाचा आहे हे ओळखता येत नाही. तो शोधण्यासाठी गुणसूत्रे तपासावी लागतात. त्याला आपण इंग्रजीत डीएनए चाचणी म्हणतो. गुणसुत्रानुसार देहाची ओळख पटते. गुणसुत्रापासूनच देहाची निर्मिती होते. प्रत्येकामध्ये ही गुणसूत्रे वेगवेगळी असतात. अनुवंशिकतेमध्ये काही गुणसूत्रे समान राहतात. त्यामुळे बापाचा आणि मुलाचा चेहरा साधारण दिसायला एक सारखा दिसतो. एकाच घराण्यातील सर्वांचा आवाज हा एकसारखा असतो. असे अनेक गुण एकसारखे असल्याचे पाहायला मिळतात. पण सर्वच गुण एकसारखे राहतात असे नाही. काही गुण आईच्या सुत्रातूनही येत असतात. म्हणजे प्रत्येक देहात वेगवेगळे गुण असतात. पण या देहात असणारा आत्मा मात्र एकच आहे. हा आत्मा या देहात येतो तेव्हा त्याचा जन्म होतो. सूर्यापासून सृष्टी जन्मली. मग या विश्‍वाचे रूप काय आहे? सूर्य हेच तर या सर्वांचे मुळ आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हेच तर रूप दाखवत आहेत. धगधगता सूर्य, तळपणारा सूर्य हा नकोसा वाटतो. उन्हाळा नकोसा वाटतो. वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी आपण वातानुकूलित खोलीत राहाणे पसंत करतो. सूर्याची दाहकता ही नकोशी वाटते. थंडावा सर्वांनाच हवा हवासा वाटतो. विश्‍वरूपात हीच दाहकता भगवंताने अर्जुनाला दाखवली. मुळ रूप दाखवले. सूर्याचे मुळ रूप दाखवले. या आगीपासूनच सर्व आत्मे तयार झाले आहेत. त्यामुळे हे या आगीत ते दिसत आहेत. सर्वांच्या ठायी असणारा हा जीवात्मा सूर्यापासूनच उत्पन्न झाला आहे. हे जे रूप आहे ते योगी पुरुषांना अनेक वर्षे साधना करूनही उमजत नाही. दिसत नाही. समजत नाही. हा योग भगवंताच्या भक्तीमुळे अर्जुनाला पाहायला मिळाला. ब्रह्मापासून सृष्टीची उत्पत्ती झाल्याचे भगवंतांनी अर्जुनाला दाखवले. तू ब्रह्म आहेस याची प्रचिती भगवंतांनी अर्जुनाला दिली, इतकेच नव्हे तर भगवंत आणि अर्जुन हे वेगळे नसून एकच आहेत. त्यांच्या ठिकाणी असणारा आत्मा हा एकच आहे. याची अनुभूती त्यांनी करून दिली. मी ब्रह्म आहे. हे समजणे, हे ज्ञान नित्य असणे म्हणजेच ब्रह्मज्ञानी होणे. आत्मज्ञानी होणे. हे ज्याला समजले त्याला सृष्टीतील सर्व गोष्टी ज्ञात होतात. सर्वांचे ज्ञान त्याला अवगत होते.

Tuesday, February 12, 2019

धैर्य

 


देवा तुझां ये दर्शनी । जें वैकल्य उपजलें आहे अंतःकरणीं ।
तें सांवरावयालागीं गंवसणी । धैर्याची करितसें ।।371।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ - देवा, तुझ्या या दर्शनानें अंतःकरणामध्ये जो विस्कळितपणा उत्पन्न झाला आहे. तो विस्कळितपणा सावरण्याकरितां मी धैर्याची गवसणी करीत आहे.

देवाच्या दर्शनासाठी आजकाल लांबच्या लांब रांगा असतात. तिरुपती येथे तर दर्शनासाठी आगाऊ नोंदणी करावी लागते. पंढरपुरातही विठ्ठलाच्या दर्शनासाठी सहा-सहा तास रांगेत उभे राहावे लागते. शिर्डीमध्ये साई मंदीरात, कोल्हापुरात महालक्ष्मी मंदीरातही दर्शनासाठी अशाच रांगा लागतात. देवाकडे दर्शनासाठी अंगात धैर्य दे अशी याचना करावी लागते. देवाला पाहण्याचेही सामर्थ आपणाकडे नाही. ते सामर्थही त्याच्याकडून मागून घ्यावे लागते. या शरीरामध्ये शिरलेला मी पणा, अहंकार प्रथम घालवावा लागतो, तरच दर्शन भेटते. साधनेमध्येही देवाचे दर्शन घडावे. तो भेटावा असे वाटत असेल तर प्रथम देवाला पाहण्याचे सामर्थ आपणास मागावे लागते. साधना करताना कुंडलिनी जागृतीच्या प्रक्रियेवेळी अंगात हे सामर्थ असावे लागते. साधनेत अंग गरम होते. पाठ शेकली जाते. शरीर दगडासारखे कठीण होते. अंग ताठ होते. पाय जड होतात. हात उचलण्याचा प्रयत्न करूनही हात उचलला जात नाही. पायात मुंग्या येतात. कपाळावर चक्रे फिरू लागतात. मस्तकातही हीच अवस्था होते. अशा अवस्थेत श्‍वास कोंडतो की काय असे वाटू लागते. पण श्‍वासावर नियंत्रण ठेवून, त्याच्यावरच मन, दृष्टी केंद्रित करायचे असते. मनात भीती उत्पन्न होते. पण देवाचे दर्शन होताना. आत्मज्ञानाची प्राप्ती होताना हे भय कसले. दर्शनाचे, आत्मज्ञानाचा ठेवा जपण्याचे सामर्थ सद्‌गुरूंकडून घ्यावे लागते. भक्तीची सुरवात होण्याआधी मन सद्‌गुरूंच्याचरणी दृढ व्हावे. मनामध्ये सामर्थ्य, धैर्य उत्पन्न व्हावे. मनाची पूर्ण तयारी व्हावी. यासाठीच दर्शन हे कठीण व भीतीदायक केले आहे. भक्तांमध्ये सामर्थ्य नसेल तर ते ज्ञान, दर्शन देऊन काय उपयोग? असे भगवंताला वाटते. भक्ताला त्या पातळीवर, स्थितीत आणणे गरजेचे आहे. तरच भक्त त्याचा योग्य वापर करू शकेल. यासाठी भक्तात ते धैर्य उत्पन्न करावे लागते. सद्‌गुरूंच्याकडे यासाठीच धैर्याची याचना करावी.


Monday, February 11, 2019

विश्वरूप





उदाहरणे आग आटोक्‍यात आणण्याची द्यायची आणि कृती मात्र आग लावण्याची करायची हा आजच्या विचारवंतांचा धंदा झाला आहे. धर्माचा विचार हा विश्‍वशांतीचा आहे. यासाठीच त्यांची धडफड आहे. हेच धर्माचे विश्‍वरूप आहे.

आतां यावरी एकादशीं । कथा आहे दोन्ही रसीं ।
जेथ पार्था विश्‍वरूपेसीं । होईल भेटी ।। 1 ।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ - आतां यानंतर अकराव्या अध्यायामध्ये दोन (शांत व अद्‌भुत) रसांनी भरलेली कथा आहे. या अध्यायात अर्जुनाला विश्‍वरुपाचे दर्शन होणार आहे.

सद्‌गुरू भक्तांना विविध अनुभव देत असतात. भक्तीमार्गाची ओढ लागावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. सद्‌गुरूंची खरी ओळख झाल्याशिवाय भक्तांमध्ये भक्ती उत्पन्न होत नाही. बाराव्या अध्याय हा भक्तियोग आहे. यापूर्वी अकरावा अध्यायात भगवंत विश्‍वरूप दर्शन देतात. समाजातील प्रत्येकजण हा धार्मिक असतोच असे नाही. देवाला सर्वजण माणतात असेही नाही. काहीजण तर देवाला निवृत्त करा, असा विचार मांडतात. देव मानने न मानने हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. ज्याला त्या शक्तीचा अनुभव आला तो देवाला, सद्‌गुरूंना मानतो. ज्याला हा अनुभव नाही, तो मानत नाही. देव आहे, देवाचे अस्तित्व आहे. हा संस्कार बाल वयात केला जातो. देवाला नमस्कार करा, असे सांगितले जाते. पूज्य व्यक्तींचा आदर करा, असेही सांगितले जाते. हे संस्कार आहेत. असे संस्कार गरजेचे आहेत. या संस्कारातून व्यक्तींमध्ये काही आदर्श निर्माण होतात. आजकाल आई-वडिलांचे खून करायलाही मुले मागे पुढे पाहात नाहीत. तेथे त्यांची सेवा करणे हा संस्कार तर, केव्हाच विसरला गेला आहे. चांगला समाज घडावा, चांगल्या संस्काराची पिढी घडावी असे वाटत असेल तर तसे संस्कार बालमनावर व्हायला हवेत. धर्म हा चांगले संस्कार शिकवतो. तो कोणाच्या मनात भीती उत्पन्न करत नाही. देवाचे अस्तित्व माणणारे भित्रे असतात असे नाही. कोणाच्यातरी अधिकाराखाली ते वावरतात असे कदापीही नाही. एक ज्येष्ठ समाजवादी विचारवंत त्यांच्या भाषणात म्हणाले, एका ठिकाणी आग लागली होती. प्रत्येकजण आग आटोक्‍यात आणण्यासाठी धडपडत होता. त्यात एक चिमणी सुद्धा तिच्या चोचीतून पाणी आणून आग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न करत होती. त्या चिमणीचा प्रयत्न पाहून एक जण म्हणाला, तुझा पाण्याच्या एका थेंबाने आग आटोक्‍यात येणार नाही. त्यावेळी ती चिमणी म्हणाली, मी आग लावली नाही हे सांगण्यासाठी माझा हा प्रयत्न सुरू आहे. आम्ही आग लावणारे नाही. या उदाहरणानंतर पुढे भाषणात हे विचारवंत म्हणाले, आज काल देशमुख, चित्पावन, मराठा, वैश्‍य संमेलन होत आहेत. जातीची बीजे ही संमेलने पेरत आहेत. यावर या विचारवंतांनी कडाडून टीका केली. पण खरे पाहीले तर प्रत्यक्षात हे समाज एकत्र आले आहेत ते त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी, प्रश्‍न सोडविण्यासाठी. हे प्रश्‍न सुटले नाहीत तर सामाजिक शांती, एकोपा नष्ट होईल. याचा या विचारवंतांना विसर पडला असावा. उदाहरणे आग आटोक्‍यात आणण्याची द्यायची आणि कृती मात्र आग लावण्याची करायची हा आजच्या विचारवंतांचा धंदा झाला आहे. धर्माचा विचार हा विश्‍वशांतीचा आहे. यासाठीच त्यांची धडफड आहे. हेच धर्माचे विश्‍वरूप आहे.

Saturday, February 9, 2019

छंद






सत्संगाचा छंद असावा, संगत असावी. संगतीतूनच अनेक संस्कार घडत असतात. मुलांना सुद्धा असे छंद असावेत यासाठी प्रयत्न हे करायला हवेत. छंदातून मुलांवर चांगले संस्कार घडतात. त्याच्या मनाला अभ्यासाची गोडी लागत असते.

गायत्रीछंद जें म्हणिजे । तें सकळां छंदांमाजि माझे ।
स्वरूप हें जाणिजे । निभ्रांत तुवां ।। 282।। अध्याय 10 वा

ओवीचा अर्थ - ज्यास गायत्री छंद असे म्हणतात. तो सर्व छंदामध्ये माझें स्वरूप आहे, असे तूं निःसंशय समज.

प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी छंद असतो. कोणाला गाण्याचा असतो? कोणाला वस्तूंचा संग्रह करण्याचा असतो? कोणाला सतत वाचन करण्याचा छंद असतो? कोणाला चित्रकलेचा छंद असतो? छंद ही आपली आवड असते. यामध्ये त्या आवडीच्या गोष्टीसाठी त्याग करण्याची भावना असते. समर्पणाची भावना असते. निःस्वार्थी भावनेने केलेले ते कार्य असते. त्यात नफा-तोटा याचा विचार नसतो. यामुळे छंद हा भक्तीचाच एक प्रकार आहे. भगवंताची भक्ती हा सुद्धा एक छंदच आहे. आपण यामध्ये किती वेळ घालवला याची मोजदाद करत बसत नाही. यातून आपणाला काय मिळाले, याचाही हिशोब करत नाही? यामध्ये समर्पणाची, त्यागाची भावना असते. नामस्मरण, गुरूंनी दिलेल्या मंत्राची साधना, ध्यान या नित्य नेमाने करावयाच्या गोष्टी आहेत. साधनेत मन रमावे यासाठी ज्ञानेश्‍वरीचे पारायण आवश्‍यक आहे. पारायणे करण्याचा अनेकांना छंद असतो. वाणीने भगवंताची केलेली ती सेवाच आहे. गायत्रीछंद हा वाणीचे रक्षण करणारा छंद आहे. या छंदाचे तीन चरण असतात. म्हणून तिला त्रिपदा गायत्री असे म्हटले आहे. प्रत्येक चरणात आठ अक्षरे असतात. म्हणून तिला अष्टाक्षरा गायत्री म्हटले आहे. कधी कधी गायत्रीच्या उच्चारापूर्वी प्रणवाचा उच्चार होतो म्हणून तिला नवाक्षरा असेही म्हणतात. सात छंदामध्ये हा पहिला छंद आहे. हा छंद हा भगवंताचे स्वरूप आहे. यामुळेच कीर्तन, भजन, प्रवचन ही वाणीने केलेली भगवंताची सेवाच आहे. भगवंत प्राप्तीचा, आत्मज्ञान प्राप्तीचा तो सुद्धा एक मार्ग आहे. या छंदातच भगवंत आहेत. जे काही भाव कीर्तन, भजन, प्रवचनात उमटतात ते भगवंताचे स्वरूप असतात. भगवंत, सद्‌गुरू ते कार्य करवून घेत असतात. या कार्यातून भक्तामध्ये सद्‌गुरू भाव प्रकट व्हावा. भक्त आत्मज्ञानी व्हावा, हाच सद्‌गुरूंचा उद्देश असतो. यासाठी हा छंद मनाला लागावा. छंदामुळे मनाला प्रसन्नता वाटते. मन आनंदी होते. यासाठी सत्संगाचा छंद असावा, संगत असावी. संगतीतूनच अनेक संस्कार घडत असतात. मुलांना सुद्धा असे छंद असावेत यासाठी प्रयत्न हे करायला हवेत. छंदातून मुलांवर चांगले संस्कार घडतात. त्याच्या मनाला अभ्यासाची गोडी लागत असते. खेळाच्या छंदातून त्याचे आरोग्यही सुधारते. यासाठीच प्रत्येकाला कोणता तरी छंद जरूर असावा.

Friday, February 8, 2019

सर्व शक्तीमान सूर्य


गंगा नदी बारमाही वाहते. पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे नदीला पूर येतो तर उन्हाळ्यात हिमालयात वितळणाऱ्या बर्फामुळे पाणी असते. ही नदी कोरडी कधीच पडत नाही. आत्मज्ञान सुद्धा असेच आत्मज्ञानी व्यक्तीतून अखंड वाहत आहे. या ज्ञानाचा आस्वाद घ्यायला प्रत्येकाने शिकले पाहिजे. त्यात डुंबायला शिकले पाहिजे

हां गा सूर्य काय शिळा । अग्नि म्हणों येत आहे वोविंळा ।
कां नित्य वाहातया गंगाजळा । पारसेपण असे ।। 202।। अध्याय 10

ओवीचा अर्थ - अहो, रोज उगवणाऱ्या सूर्याला शिळा म्हणतां येईल काय? अग्नीला ओंवळा म्हणतां येईल काय? अथवा नेहमीं वाहणाऱ्या गंगेच्या पाण्याला पारोसेपणा येतो काय?

ज्ञानेश्‍वरीमध्ये सांगितलेली अनेक उदाहरणे ही विज्ञानावर आधारित आहेत. गेल्या दोन शतकात लागलेले शोध हे बाराव्या शतकात लिहिलेल्या ज्ञानेश्‍वरीतील उदाहरणात आहेत. असे अनेकदा स्पष्ट होते. पृथ्वी गोल आहे आणि सूर्या भोवती ती फिरत आहे. हा शोध विज्ञानाने गेल्या दोन-तीन शतकात लागला असला, तरी ज्ञानेश्‍वरीतील अनेक उदाहरणावरून हा शोध त्याकाळातही ज्ञात होता असे दिसते. विज्ञानाने ते आत्ता स्पष्ट झाले आहे एवढेच. सूर्याचा उदयही होत नाही आणि अस्तही होत नाही. तो अखंड तेजाने तळपत आहे. पृथ्वीच्या फिरण्याने त्याचा उदय, अस्त आपणास झाला असे वाटते. प्रत्यक्षात तो अखंड आहे. यामुळे कालचा सूर्य वेगळा, आजचा सूर्य वेगळा असे होत नाही. दररोज उगवणारा, दररोज दिसणारा सूर्य हा सारखाच आहे. आजचा सूर्य ताजा, कालचा सूर्य शिळा असे कधीही होत नाही. जीवनचक्र हे अखंड सुरू आहे. या सूर्यापासूनच सृष्टीची उत्पत्ती झाली आहे. सर्व शक्ती त्याच्यातच एकवटली आहे. या सर्व शक्ती सूर्याच्याच वंशज आहेत. आत्मा ही सुद्धा एक शक्ती आहे. त्याचीही उत्पत्ती या सूर्यापासूनच झाली आहे. सर्वांच्या ठायी असणारा आत्मा हा एकच आहे. ही एकच शक्ती आहे. या शक्तीचा उदय होत नाही किंवा अस्तही होत नाही. तो जन्मतही नाही आणि त्याला मरणही नाही. तो अमर आहे. देहात आल्यामुळे तो जन्म-मरणाच्या फेऱ्यात अडकला आहे. याचेच ज्ञान प्रत्येकाला होण्याची गरज आहे. याची जाणीव सातत्याने होणे गरजेचे आहे. ज्याच्याजवळ हे ज्ञान नित्य आहे, तो आत्मज्ञानी आहे. त्याला सर्व शक्तींचे ज्ञान होते. तो अंर्तज्ञानी असतो. भूत, वर्तमान, भविष्य या तिन्हींचेही त्याला ज्ञान असते. हे ज्ञान तो इतरांनाही देऊ इच्छित असतो. गंगा नदी बारमाही वाहते. पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे नदीला पूर येतो तर उन्हाळ्यात हिमालयात वितळणाऱ्या बर्फामुळे पाणी असते. ही नदी कोरडी कधीच पडत नाही. आत्मज्ञान सुद्धा असेच आत्मज्ञानी व्यक्तीतून अखंड वाहत आहे. या ज्ञानाचा आस्वाद घ्यायला प्रत्येकाने शिकले पाहिजे. त्यात डुंबायला शिकले पाहिजे. सूर्यापासून जशी अखंड किरणे निघत असतात तसे आत्मज्ञानी व्यक्तीमधून या ज्ञानाचा अखंड झरा सुरू असतो. सूर्याच्या प्रकाशात अनेक विषाणूंचा नाश होतो. पेरणीच्या आधी जमीन यासाठीच शेकूण घेतली जाते. जमिनीतील विषाणू सूर्याच्या दाहकतेने नष्ट होतात. तसे आत्मज्ञानी व्यक्तींच्या कोपाने दुष्ट-दुर्जनांचा नाश होतो.


Thursday, February 7, 2019

भगवंताचे रूप





प्रेमाने सर्व गोष्टी त्याला समजावून सांगायला हव्यात. शिकवायला हव्यात. अहिंसेचा मार्ग त्याला शिकवायला हवा. यासाठी प्रथम स्वतःमध्ये हे गुण असायला हवेत. तरच ते आपण त्याच्यामध्ये उतरवू शकू.


आंता भय आणि निर्भयता । अहिंसा आणि समता ।
हें मम रूपची पंडुसुता । ओळख तूं ।। 85 ।। अध्याय 10 वा


ओवीचा अर्थ - आता अर्जुना, भय आणि निर्भयपणा, अहिंसा आणि समबुद्धि ही माझीच रुपे आहेत हे तूं जाण.

लहान मुलांना अनेक गोष्टी समजत नाहीत. त्याच्या हातून चुका घडत असतात. पण हळूहळू त्याला समजायला लागते. जसा जसा तो मोठा होईल तसे सर्व गोष्टींचे ज्ञान त्याला अवगत होते. मुळात भीती ही त्याला नसते. पण त्याने वाईट गोष्टी करू नयेत, यासाठी आपण त्याला भीती दाखवतो. त्याला न आवडणाऱ्या गोष्टीवर ते चिडत असते. नाक मुरडत असते. आवडीचा पदार्थ, वस्तू हवी असेल तर ते हट्ट करते. त्या गोष्टीसाठी ते रडते. मागून मिळत नसेल तर ते हिसकावून घेण्याचाही प्रयत्न करते. त्याच्या या कृतीला अनेकदा रागावून, ओरडून गप्प बसवावे लागते. भीती नसणाऱ्या त्याच्या मनात भीती उत्पन्न करावी लागते. अशा गोष्टींचा त्याच्या बालमनावर परिणाम होतो. कधीकधी त्याची ही भीती कायमस्वरूपी राहू शकते. काहीमुले शाळेच्या दारात गेल्यानंतर रडायला लागतात. त्याच्या बालमनात भीती उत्पन्न होते. ही त्यांची भीती घालवावी लागते. त्याला निर्भय करण्यासाठी, त्याला शाळेत जाण्याची सवय लावावी लागते. एकदा त्याला शाळेत जाण्याची सवय लागली की तो मग रडत नाही. आनंदाने शाळेत जाऊ लागतो. त्याला चांगल्या गोष्टींची सवय लागावी, यासाठी आपले प्रयत्न सुरू असतात. त्याला मारून, भीती घालून, शिक्षा करून त्याच्यात सुधारणा होते पण वारंवार असे केल्याने त्याचा वाईट परिणामही होऊ शकतो. यासाठी त्याला प्रेमाने, अहिसेंने सर्व गोष्टी शिकविण्याची गरज आहे. आग्रह जरूर धरावा पण तो प्रमाने, अहिंसेने करावा. याची शिकवण त्याला द्यायला हवी. हव्या त्या गोष्टी त्याने प्रमाने मागाव्यात. कोणताही दंगाधोपा न करता त्याने त्याचा आग्रह धरावा. अशी सवय लागण्यासाठी प्रथम आपण त्याच्यावर प्रेम करायला हवे. प्रेमाने सर्व गोष्टी त्याला समजावून सांगायला हव्यात. शिकवायला हव्यात. अहिंसेचा मार्ग त्याला शिकवायला हवा. यासाठी प्रथम स्वतःमध्ये हे गुण असायला हवेत. तरच ते आपण त्याच्यामध्ये उतरवू शकू. घरात दोन मुले असतील तर त्यांच्यात भेदभाव करून चालत नाही. एकाला फळ दिले तर दुसऱ्यालाही ते हवे असते. दोघांच्यात समानता ठेवावी लागते. अन्यथा एकावर अन्याय होऊ शकतो. असा अन्याय सातत्याने होत राहिल्यास बालमनावर वाईट परिणामही होऊ शकतात. अशी मुले मोठी झाल्यावर वाईट संगतीत जाऊ शकतात. यासाठी व्यवहारात समानता हवी. मुले ही देवाघरची फुले आहेत. ती भगवंताची रूपे आहेत. असे समजूनच त्यांच्याशी तेवढ्याच आत्मियतेने, प्रेमाने व्यवहार करायला हवा. यामुळे मुलांवर उत्तम संस्कार होऊ शकतील.



Wednesday, February 6, 2019

व्यवहाराचा नियम


अध्यात्मात योग्य शिष्यांचीच प्रगती होताना दिसते. निरुपयोगी शिष्य आपोआपच या मार्गातून बाहेर पडतात. यासाठी अवधान हे महत्त्वाचे आहे. सद्‌गुरू शिष्याचे अवधान पाहूनच त्याला मार्गदर्शन करत असतात.

घटीं थोडेसें उदक घालिजे । तेणें न गळे तरी वरिता भरिजे ।
तैसा परिसौनि पाहिलासि तंव परिसविजे । ऐसेंचि होतसे ।। 51 ।। अध्याय 10 वा

ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणे घगरीत थोडेसे पाणी घालावे व ते गळाले नाही तर आणखी जास्त भरावे त्याप्रमाणे तू ऐकावे असेच वाटू लागले.

सद्‌गुरू शिष्याचे अवधान पाहतात. वेळोवेळी ते शिष्याला उपदेश करत असतात. त्याचे पालन शिष्य करतो का नाही याचे निरीक्षण ते करतात. त्या उपदेशांनी त्याच्यामध्ये कोणता फरक पडला याचाही विचार ते करतात. मातीचे नवीन मडके आणल्यानंतर त्या मडक्‍यात प्रथम थोडे पाणी घालून पाहावे लागते. ते मडके गळके आहे का? याची चाचपणी करावी लागतेच. मडके गळके असेल तर, त्यात पाणी साठवणूक होणार नाही. ते मडके निरुपयोगी ठरेल. शिष्याचे मडके गळके तर नाही ना? सद्‌गुरूही हेच पाहतात. शिष्याला केलेल्या उपदेशाचा उपयोग होत नसेल तर त्याला आणखी उपदेश करण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामध्ये काहीच फरक पडणार नसेल तर त्यावर वेळ तरी का खर्च करायचा? मोठ्या कंपन्यामध्ये एका कामगारांवर वर्षाला किती खर्च केला जातो. याचा ताळेबंद मांडला जाते. त्यानुसार तो त्या कामास पात्र आहे की नाही हे ठरविले जाते. खर्चाच्या प्रमाणात तो काम देत नसेल तर तो कामगार कंपनीसाठी निरुपयोगी ठरतो. त्याला काढून टाकण्याशिवाय कंपनीला दुसरा पर्याय नसतो. अशा कामगारांना पोसून कंपनीची प्रगती कशी होणार? शेवटी उत्पन्नावरच कंपनीची प्रगती ठरत असते. उत्पन्न कसे वाढवता येईल हा मुख्य उद्देश असतो. निरुपयोगी कामगारांना काढून त्यांच्या जागी त्यांच्यापेक्षा कमी पगाराची व उत्तम काम देणारी माणसे निवडण्यावर कोणत्याही कंपनीचा भर असतो. हा व्यवहाराचा नियम आहे. अध्यात्मात योग्य शिष्यांचीच त्यामुळे प्रगती होताना दिसते. निरुपयोगी शिष्य आपोआपच या मार्गातून बाहेर पडतात. यासाठी अवधान हे महत्त्वाचे आहे. सद्‌गुरू शिष्याचे अवधान पाहूनच त्याला मार्गदर्शन करत असतात. कंपनीमध्येही कामगारांवर लक्ष ठेवणारा स्वतंत्र विभाग असतो. कामगाराचे कामांमध्ये लक्ष नसेल तर, कंपनी त्याला निरुपयोगी ठरवते. सद्‌गुरूही शिष्यावर लक्ष ठेवतात. प्रगती करणाऱ्या शिष्यांना प्रोत्साहन देतात. दुर्लक्ष करणाऱ्यांना मात्र वगळले जाते. यासाठी आपणही व्यवहाराचे हे नियम पाळून आपली प्रगती साधायला हवी. जीवनाचे हे नियम अध्यात्म असो व दैनंदिन व्यवहार असो सर्वाठिकाणी सारखेच आहेत. त्याचे पालन हे व्हायलाच हवे.


Tuesday, February 5, 2019

लवणकण


नाथ संप्रदायामध्ये सर्व जातीधर्माचे संत झाले. व्यक्ती कोणत्या जातीची आहे. यापेक्षा त्याची भक्ती किती आहे? त्याचा भाव कोणता आहे? यानुसार येथे ज्ञानदान होते. हे ज्ञान मिळवण्याची त्याची ओढ किती आहे? हेच पाहिले जाते. येथे सर्वांना ज्ञानाचा हक्क आहे.


जातिव्यक्ती पडे बिंदुले । जेव्हा भाव होती मज मीनले ।
जैसे लवणकण घातले । समुद्रामाजीं ।। 461 ।। अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - जैसे समुद्रामध्ये मिठाचे कण घातले असता ते समुद्ररुप होऊन, त्यांचा कणपणा नाहीसा होतो त्याप्रमांणे जेंव्हा सर्व वृत्ति मद्रुप होतात, तेंव्हा त्या जाति व व्यक्ति यांच्या नांवाने शून्य पडतें.

चव खारट आहे. पण जेवणात मीठ नसेल, तर जेवणाला चवच येत नाही. तुरट, आंबट पदार्थावर मीठ टाकले, तर त्याची गोडी वाढते. स्वतःचा अंगभूत गुणधर्म खारट आहे, पण तो इतरांची गोडी वाढवतो. अनेक मोठ्या व्यक्तींच्या यशामागे एखादा सर्वसामान्य नोकर मागदर्शक असतो मोठमोठे उद्योगपतीही अशा सर्वसामान्य व्यक्तीच्या सल्ल्याने महत्त्वाचे निर्णय घेत असतात. मग येथे महान कोण? कधीकधी एखादी न शिकलेली आजी सुद्धा महान तज्ज्ञांची मार्गदर्शक असते. तिने सांगितलेले सल्ले ही व्यक्ती जीवनात कधीही विसरत नाही. मग येथे हुशार कोण? प्रयोगशाळेत काम करणाऱ्या सहाय्यकाने मोठे शोध लावल्याची उदाहरणेही आहेत. मग येथे शास्त्रज्ञ कोण? शाळेचा गंधही नसणारा कीर्तनकार उच्च पदवीधारकांना ज्ञानेश्‍वरीवर उत्तम निरूपण देताना पाहायला मिळतो. मग येथे वक्ता कोण? चौथी शिकलेली व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री होऊन उत्तम प्रशासन करू शकतो. देशाच्या विकासासाठी आवश्‍यक असणारे अनेक महत्त्वाची धोरणे तो ठरवतो. देशाचा, राज्याचा विकासासाठी मोठ मोठे उद्योग उभारू शकतो. मग येथे प्रशासक कोण? सांगण्याचा हेतू इतकाच की, बाह्यरुपावरून त्या व्यक्तीचे सामर्थ कधी दिसत नसते. अंतरंगात त्यांचे कार्य काय आहे. यावर त्या व्यक्तीचे सामर्थ ठरते. तो कोणत्या जातीचा आहे? तो किती श्रीमंत आहे? या सर्व गोष्टी आत्मज्ञानी व्यक्तीच्या समोर गौण आहेत. त्यांना येथे काहीच महत्त्व नाही. यामुळेच तर चोखामेळा, गोरा कुंभार, सावतामाळी, बाळूमामा, नामदेव अशा अनेक जातीतील व्यक्ती येथे महान संत झाले. त्यांनी केलेले कार्य आजही मार्गदर्शक आहे. वारकरी संप्रदायाची पताका त्यांच्या कार्यामुळेच आजही ताठमानेने फडफडत आहे. यासाठी आत्मज्ञानी कोणत्या जातीचा आहे. याला महत्त्व नाही. येथे अंतरंगातील भावाला महत्त्व आहे. त्याच्याजवळ असणाऱ्या ज्ञानाला महत्त्व आहे. त्याच्या भक्तीला महत्त्व आहे. नाथ संप्रदायामध्ये सर्व जातीधर्माचे संत झाले. व्यक्ती कोणत्या जातीची आहे. यापेक्षा त्याची भक्ती किती आहे? त्याचा भाव कोणता आहे? यानुसार येथे ज्ञानदान होते. हे ज्ञान मिळवण्याची त्याची ओढ किती आहे? हेच पाहिले जाते. येथे सर्वांना ज्ञानाचा हक्क आहे. पण पैशाने आज हे ज्ञान तोलले जात आहे. आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी या पैशाचीही गरज नाही. मीठ पाण्यात विरघळल्यानंतर ते जसे पाणीरुप होते. तसे नराचा नारायण झाल्यानंतर तो नारायण स्वरूप होतो. जसे मीठ खारट आहे. पण ते पाणी रुप होते. तसे नर कोणत्याही जातीचा असो तो नारायण झाल्यावर नारायणच स्वरूपच होतो. त्याची जात येथे शुन्य ठरते.


Monday, February 4, 2019

म्यां हालविल्या


ही शक्ती म्हणजे प्राण आहे. जीव आहे. तो देहात कसा आला आणि कसा गेला हे विज्ञान सिद्ध करू शकत नाही. तो देहात आणण्याचे सामर्थ्यही विज्ञान करू शकत नाही. ही शक्ती सर्वांना मान्य करावीच लागेल.

म्यां बोलविल्या वेदु बोले । म्यां चालविल्या सूर्यु चाले ।
म्यां हालविल्या प्राणु हाले । जो जगातें चाळितां ।। 283।। अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - मी बोलविल्याने वेद बोलतो, मी चालविल्याने सूर्य चालतो, मी हालविल्याने जगाचा प्रवर्तक प्राण आपले काम करू शकतो.

विज्ञानाचे विचार जिथे संपतात, तेथून अध्यात्माला सुरवात होते. अवकाशाच्या पोकळीला अंत नाही. विज्ञानही हा अंत शोधू शकलेले नाही. येथे विज्ञानाची मर्यादा संपते. तेथून या विश्‍वाच्या पलीकडे काय आहे हे जाणून घेण्यासाठी अध्यात्म शास्त्राचा विचार सुरू होतो. पूर्वीच्या काळात मृत्यूला सुद्धा रोखण्याचे सामर्थ मनुष्यामध्ये होते असे सांगितले जाते. आपण या घटनांना सध्या दंतकथा म्हणून सोडून देतो. संत ज्ञानेश्‍वरांनी रेड्यामुखी वेद वदविले ही सुद्धा आपण दंतकथा समजतो. पण बारकाईने विचार केला तर यातही तथ्य आहे. संगीताच्या तालावर गायीचे दूध देण्याची क्षमता वाढते, काही पिकांचे उत्पादन वाढते. हे सिद्ध झाले आहे. ज्ञानेश्‍वरीचे सामुदायिक पारायण सुरू असलेल्या ठिकाणी वातावरणात फरक जाणवतो. तेथे गेल्यानंतर विचार बदलतात. वृत्तीमध्ये फरक पडतो. ते शब्द फक्त कानी पडल्यानंतर हा फरक जाणवतो. मग प्राण्यांचे हंबरणे का बदलणार नाही? तितके सामर्थ्य त्या काळातील योगी पुरषांमध्ये निश्‍चितच असू शकेल. विज्ञानाने हा चमत्कारही सिद्ध करता येऊ शकेल. पावसाची दिशा बदलण्याचे सामर्थ्यही योगी पुरूषांमध्ये होते, असे सांगितले जाते पण सध्या सिद्धता असेल तरच त्यावर भाष्य करणे योग्य आहे. शक्‍यतेच्या गोष्टी सध्या पटत नाहीत. त्याला अंधश्रद्धाही म्हटले जाते. सध्या हे आपण सिद्ध करू शकत नाही त्यामुळे या दंतकथा समजल्या जातात. रेड्या ऐवजी रेडे नावाची व्यक्ती असेल असेही सांगितले जाते. पूर्वीच्याकाळी वेद पठणाचा अधिकार फक्त काही समाजासच होता त्यामुळे रेडे नावाच्या व्यक्तीने वेद म्हटले तर ते आश्‍चर्य होऊ शकते. पण यामुळे मुळ विचाराला बगल दिली जाते. ही अद्‌भुत शक्ती, सामर्थ्य याला बगल मिळते. पण ही शक्ती म्हणजे प्राण आहे. जीव आहे. तो देहात कसा आला आणि कसा गेला हे विज्ञान सिद्ध करू शकत नाही. तो देहात आणण्याचे सामर्थ्यही विज्ञान करू शकत नाही. ही शक्ती सर्वांना मान्य करावीच लागेल. कारण हा प्राण प्रत्येक सजिवात आहे. तोच सर्वत्र व्यापलेला आहे. सर्वांचा ठायी असणारा प्राण हा एकच आहे. सर्वत्र जाणवणारी शक्ती ही तीच आहे. या शक्तीच्यामुळेच जगातील व्यवहार सुरू आहेत. अगदी सूर्यही या शक्तीमुळेच अस्तित्वात आहे. तेथे असणारी शक्तीही तीच आहे. हे जग त्यामुळेच अस्तित्वात आहे. या शक्तीचे अस्तित्व हे स्वीकारायलाच हवे. भले त्याला देवत्व मानले नाही तरी चालेल पण ती शक्ती मान्य करायलाच हवी.

Sunday, February 3, 2019

नानाविधा व्यक्ती


इंद्रियातील हाव माणसाचे विचार बदलते. संत वाटणारे शिक्षकही कधी कधी नर्तकीच्या प्रेमात भुललेले दिसतात. मनावर नियंत्रण नसेल तर काहीही घडू शकते. उतारवयात स्मृती भ्रंशाचा आजारही होतो. मन नियंत्रणात ठेवले तर, असे आजारही होत नाहीत. यासाठी इंद्रियांवर विजय संपादन करायला हवा.

तेविं नानाविधा व्यक्ती । आनानें नामें आनानी वृत्ती ।
ऐसें जाणती भेदलां भूतीं । अभेदा मातें ।।252।। अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - नाना प्रकारच्या व्यक्ति, त्यांची भिन्न भिन्न नांवे व त्यांचे भिन्न भिन्न स्वभाव, याप्रमाणें भेद असलेल्या प्राण्यांत अभिन्न जो मी त्या मला ते जाणतात.

हाताची पाचही बोटे सारखी नसतात. तसे एकाच घरातील सर्व व्यक्ती स्वभावाने सारख्या नसतात. व्यक्ती तितक्‍या प्रकृती. कोण पुरोगामी विचारांचा असतो. तर कोण हिंदुत्ववादी असतो. तर कोणाला राजकारणच आवडत नाही. तर कोणाला फक्त समाजकार्य आवडते. सर्वांचे गुण वेगवेगळे असतात. एकाच कुटुंबात हे सर्व पाहायला मिळते. कोणाला चित्रपट पाहायला आवडतात. तर कोणाला खेळ पाहायला आवडतात. टीव्ही पाहतानाही हा फरक जाणवतो. यातून वादही होतात. सर्वांची आवड एकसारखी असू शकत नाही. एकाच घरात चोरही असतो व पोलिसही असतो. रक्षक-भक्षक दोन्हीही असतात. कोण कसे वागेल याचा काही नेम नाही. कसे वागायचे हे प्रत्येकाच्या हातात आहे. इंद्रियातील हाव माणसाचे विचार बदलते. संत वाटणारे शिक्षकही कधी कधी नर्तकीच्या प्रेमात भुललेले दिसतात. मनावर नियंत्रण नसेल तर काहीही घडू शकते. उतारवयात स्मृती भ्रंशाचा आजारही होतो. मन नियंत्रणात ठेवले तर, असे आजारही होत नाहीत. यासाठी इंद्रियांवर विजय संपादन करायला हवा. मनाशी युद्ध करायला शिकायला हवे. जो यामध्ये यशस्वी झाला, तोच खरा जितेंद्रिय ठरतो. मनाला सुटलेली हाव नियंत्रणात ठेवायला शिकले पाहिजे. आजकाल बलात्काराचे गुन्हे वाढत आहेत. खुनाच्या घटनेतही वाढ झाली आहे. क्षुल्लक कारणावरूनही गोळीबाराच्या घटना घडत आहेत. कोणाचा तरी जीव जातो आहे याचे भानही ठेवले जात नाही. इतके मन भडकलेले आहे. या घटना रोखायच्या असतील तर माणसांची मने नियंत्रणात ठेवण्याचे उपाय योजायला हवेत. त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करायला हवा. गुन्हेगार हा जन्मजात गुन्हेगार नसतो. त्याला परिस्थिती गुन्हेगार बनवते. ही परिस्थिती उद्भवणार नाही. याची काळजी घ्यायला हवी. मनाला प्रसन्न ठेवणारे वातावरण निर्माण करायला हवे. टीव्हीवर मनोरंजन कोणत्या पद्धतीचे आहे यालाही महत्त्व आहे. अश्‍लील चित्रपटातून मनाला आनंद मिळतो. पण त्यातून मनाच्या भावना भडकतात. याचा विचार व्हायला हवा. अशातून गुन्हे घडत आहेत. पुढच्या पिढीस बदलत्या तंत्रज्ञानामुळे मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे. अध्यात्माची कास त्यांनी यासाठीच धरायला हवी. हाच एकमेव उपाय त्यांना यातून तारणार आहे.


Friday, February 1, 2019

भक्ती सेवा



अनाथांना नाथ करणारी परंपरा आहे. यामध्ये अनेक नाथ झाले. त्यांना संजीवन समाधीचा लाभ झाला. ते आजही भक्तांना अनुभव देत आहेत. अनुभवातूनच ते भक्तांची प्रगती साधत आहेत. भक्ती सेवेचा हा मेळावा महाराष्ट्रात सर्वत्र पाहायला मिळतो. 

ऐसें मीच होऊनि पांडवा । करिती माझी सेवा ।
परि नवलावो तो सांगावा । असे आईक ।। 196 ।। अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - अर्जुना, याप्रमाणें मीच होऊन ते माझी सेवा करतात, पण त्यांचा सेवा करण्याचा प्रकार आश्‍चर्यकारक आहे तो सांगतो तो ऐक.

अध्यात्म ही सेवा आहे. दीनदुबळ्यांची सेवा, दुःखी, पीडितांची सेवा, अन्यायाने ग्रस्त व्यक्तींची सेवा, आई-वडिलांची सेवा, वयोवृद्धांची सेवा. हा सर्व ईश्‍वर सेवेचाच एक भाग आहे. अशा सेवेतून मनावरील ताण दूर होतो. अध्यात्मात या सर्व सेवेस महत्त्व आहे. मंत्र, जप, साधना ही सुद्धा सेवा आहे. ही सेवा नित्य नेमाने करायला हवी. भगवंत प्राप्तीचा तो मार्ग आहे. दैनंदिन धकाधकीच्या जीवनात ही सेवा करण्यास वेळ मिळत नाही. म्हणून काही व्यक्ती तीन दिवसांची, आठवड्याची सुटी घेऊन मठामध्ये ही सेवा करतात. संतांचे पुण्यतिथी उत्सव हे यासाठीच आहेत. या सेवेतून आनंद मिळतो. मन प्रसन्न होते. वर्षातून एकदा जरी ही सेवा केली. तर वर्षभर तो उत्साह भक्तांमध्ये राहातो. अशा उत्साहातून भक्तांमध्ये सेवाभाव जागृत व्हावा. हळूहळू भक्त भक्तीमार्गाला लागावा. त्याची अध्यात्मिक प्रगती व्हावी. भक्तामध्ये सद्‌गुरूभाव प्रकट व्हावा. हाच उद्देश सद्‌गुरूंचा असतो. भक्त आत्मज्ञानी व्हावा. यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. या भक्ती सेवेतून मग भक्त आत्मज्ञानी होतो. आत्मज्ञानी झाल्यानंतरही त्याची सेवा अखंड सुरू असते. आत्मज्ञानी होऊनही आत्मज्ञानी गुरूंची सेवा सुरू असते. तसेच इतरांनाही आत्मज्ञानी करण्याचे कार्य सुरू असते. ही एक आत्मज्ञानाची शाळाच आहे. या शाळेत आत्मज्ञान प्राप्ती ही पदवी मिळवायची असते. पदवी मिळाल्यानंतर इतरांनाही ही पदवी प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्न करायचे असतात. प्रत्येक भक्तास ही पदवी मिळावी यासाठी सद्‌गुरूंचे प्रयत्न असतात. त्यापद्धतीने त्यांचे कार्य सुरू असते. पण सर्वच भक्त ही पदवी मिळवतात असे नाही. हा लाभ एखाद्या भक्तालाच होतो. पण इतरांना लाभ झाला नाही म्हणजे सर्व व्यर्थ आहे, असे म्हणणे योग्य नाही. या सेवेचे अनेक लाभ आहेत. मनशांती, मोक्ष, आरोग्य, दुःखातून मुक्ती असे अनेक अगणित लाभ या सेवेने प्राप्त होतात. आत्मज्ञान प्राप्ती हा सर्वोच्च लाभ आहे. या लाभानंतर सेवा संपते असे होत नाही. सेवा ही अखंड सुरूच असते. ही सेवेची परंपरा आहे. आदिनाथापासून ही सेवा अखंड सुरू आहे. अनादिकालापासून या सेवेत कधीही खंड पडलेला नाही. ही अनाथांना नाथ करणारी परंपरा आहे. यामध्ये अनेक नाथ झाले. त्यांना संजीवन समाधीचा लाभ झाला. ते आजही भक्तांना अनुभव देत आहेत. अनुभवातूनच ते भक्तांची प्रगती साधत आहेत. भक्ती सेवेचा हा मेळावा महाराष्ट्रात सर्वत्र पाहायला मिळतो.






माऊली




अहो तान्हयाची लागे झटे । तरी अधिकची पान्हा फुटे ।
रोषें प्रेम दुणवटे । पढियंतयाचेनि ।। 18 ।। अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - अहो, गाईच्या सडाला तिच्या वासरानें ढुसणी दिली तर त्या योगानें तिला जास्तच पान्हा फुटतो. कारण आवडत्याच्या रागानें प्रेम दुप्पट होत असते.

माऊली म्हणजे आई. मुलांना आईची जास्त सवय असते. झोपत सुद्धा मुले आईचा स्पर्श लगेच ओळखतात. वडिलांनी प्रेमाने अंगावरून हात फिरवला तरी ते ओळखते की हा आईचा हात नाही. लगेच ते जागे होते व हात फिरवण्यास नकार देते. असे प्रसंग अनेकदा घडतात. आईचा हळुवार हात अंगावरून गेल्यानंतर लहान मुलांना लगेच झोप लागते. इतके प्रेम आईच्या स्पर्शात असते. आईने मार दिला, बदडले तरीही रडत रडत ते मुल आईच्याच कुशीत जाते. इतरांनी त्याला प्रेमाने जवळ करण्याचा प्रयत्न केला तरीही ते आईलाच लगडते. आईच्या प्रेमाची ही जादू आहे. इतरांनी कितीही प्रयत्न केले, तरी तिच्या प्रेमाची ही जादू त्यांना आणता येत नाही. जन्म देणारी माताच फक्त मुलांना लळा लावू शकते असे नाही. जन्माने जरी आई नसली तरी ती प्रेमाने त्याला आपलेसे करून घेऊ शकते. यशोदा जन्माने कृष्णाची आई नव्हती, पण तरीही कृष्ण- यशोदाच्या प्रेमाचे गोडवे गायिले जातात. प्रेमाने जीवांमध्ये मोठा फरक पडतो. हिंस्रप्राणीही प्रेमाने माणसाळतात. प्राण्यातला हिंस्रपणा जर प्रेमाने जात असेल तर मग माणसातला हिंस्रपणा, गुन्हेगारीवृत्ती का नष्ट होऊ शकणार नाही. यासाठी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला हवा. पण तसा प्रेमळ स्वभाव प्रथम स्वतःमध्ये उत्पन्न व्हायला हवा. यासाठी स्वतःपासूनच आपण याची सुरवात करायला हवी. प्रेमाची भूकही समजते. मुलाला भूक लागली आहे, हे आईला लगेच समजते. मुलाला बोलता येत नाही. ते सांगत नाही. तरीही त्यांच्या हालचालीवरून आईला त्याला काय हवे आहे हे ओळखते. प्रेमाने या गोष्टी ज्ञात होतात. सद्‌गुरूही आपल्या आईसारखे असतात. प्रमाने ते सर्व गोष्टी शिकवत असतात. शिष्यामध्ये प्रगती घडवत असतात. शब्दामध्ये बदल घडविण्याचे सामर्थ आहे. पण ते शब्द प्रेमळ असतील तर चांगला बदल घडतो. ते शब्द कडवट असतील तर दुसऱ्यांचे मन दुखावले जाऊ शकते. हा बदल अयोग्य आहे. यासाठी शब्दांचा वापर हा जपून करायला हवा. त्याचे सामर्थ हे ओळखायला हवे. त्याला प्रेमाची गोडी लावायला हवी. सद्‌गुरूंचे प्रेमळ शब्द मनाला उभारी देतात. खचलेल्या मनाला सामर्थ देतात. मंत्र हा सुद्धा एक शब्द आहे. तो प्रेमाने जपला, तर मन सुद्धा प्रेमाने भरते. या प्रेमातूनच आध्यात्मिक विकास होतो. गुरूंचे प्रेम हे आईसारखे असते. म्हणूनच संत ज्ञानेश्‍वरांना माऊली म्हटले जाते. या माऊलीच्या ओसंडून वाहणाऱ्या प्रेमात डुंबायला हवे.