Saturday, November 30, 2019

गुरू - शिष्य ऐक्‍य


पूर्वी गुरू शिष्याला त्याच्या पदी बसविण्यासाठी उत्सुक असत. त्यातच त्यांना आनंद वाटायचा. तीच खरी त्यांना मिळालेली दक्षिणा असायची. हे त्यागाचे संस्कार आता टिकवायला हवेत. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल ८९९९७३२६८५

पैं दोहीं वोठीं एक बोलणें । दोहीं चरणीं एक चालणें ।
तैसें पुसणें सांगणें । तुझें माझें ।। 454 ।। अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ - जसे दोन ओठ पण बोलणें एक, पाय दोन पण चालणें एक, त्याप्रमाणें, तू विचारणारा व मी सांगणारा, ह्या आपल्या दोघांचा अभिप्राय एकच आहे.

बदलत्या काळानुसार गुरू आणि शिष्य या नात्यातही मोठा बदल होत आहे. पूर्वीचे शिक्षक हे विद्यार्थ्यांना हातात छडी घेऊन शिकवत होते. विद्यार्थीही त्यांचा मार खात असे, पण त्यांनी मार का दिला याचा विचार करून त्याच्या मनामध्येही बदल होत असे. तो सकारात्मक बदल असे. काही विद्यार्थी मोठे झाल्यानंतर त्या शिक्षकांनी असा मार दिला, त्यामुळे ते इतके मोठे होऊ शकले, त्यातून अनेक बोध घेऊ शकले, असे सांगतात. हे अनुभव ऐकताना नव्या पिढीला खूपच आश्‍चर्य वाटते. आता काळ बदलला आहे. तसे गुरू-शिष्याचे नातेही बदललेले आहे. पूर्वीच्या काळातील गुरू हे त्यागी होते. शिष्याला मोठा करण्याची धडपड त्यांच्यात होती. शिष्य मोठा झाला तर त्यांना खरा आनंद मिळत असे. शिष्याच्या प्रगतीतच त्यांना समाधान वाटत असे, इतका जिव्हाळा या नात्यामध्ये होता. असे गुरू नव्या पिढीत पहायला मिळत नाहीत. शिक्षणाचे स्वरूप बदलत आहे तसे गुरू-शिष्य या नातेसंबंधातही मोठा बदल होत आहे. पाश्‍चिमात्य गुरूंमध्ये त्याग, आत्मियता, जिव्हाळा, तळमळ पहायला मिळत नाही. हीच संस्कृती सध्या नव्या पिढीत जोपासली जात आहे. नाती आता पैशाने मोजली जात आहेत. सध्या पदव्याही विकत मिळतात. शिक्षणासाठीचे वाढते शुल्क विचारात घेता त्यानुसारच शिक्षण मिळत आहे. उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी अधिक पैसा मोजावा लागत आहे. त्यानुसार तसे विचारप्रवाहही बदलत आहेत. शिक्षणाच्या या व्यापारामुळे गुरू-शिष्य संबंधालाही व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. पैशाच्या तुलनेत शिक्षण दिले जात आहे. अशा शिक्षण संस्थांत त्याग, पूज्यता, गुरूंचा सन्मान या गोष्टी कशा काय शिल्लक राहतील ? वर्गात किती तास शिकवले यावरच त्यांची पात्रता ठरवली जाते. त्यावरच त्यांना पगार मिळतो. शिष्यांना विशेष मार्गदर्शन करण्याची वृत्ती त्यांच्यात नसते. असली तरी तीही पैशाच्या तुलनेत मोजली जाते. अशा या नव्या पिढीला त्यागी गुरू कसे मिळतील? पूर्वी गुरू शिष्याला त्याच्या पदी बसविण्यासाठी उत्सुक असत. त्यातच त्यांना आनंद वाटायचा. तीच खरी त्यांना मिळालेली दक्षिणा असायची. हे त्यागाचे संस्कार आता टिकवायला हवेत. हे आता नव्या पिढीत दिसत नसले तरी नव्या पिढीत हे होई शकते. तो संस्कार या पिढीत आणला जाऊ शकतो. गुरूच्या पावलावर शिष्याने पाऊल टाकायला हवे. त्यांच्या दोघामध्ये तसे ऐक्य निर्माण व्हायला हवे. अध्यात्मातील ही परंपरा आजही कायम आहे. त्यामुळेच तो विचार आजही टिकून आहे. गुरुच्या संस्काराने शिष्य तयार होतो. तसा तो विचार पुढच्या पिढीत देत राहातो. यामुळे ही परंपरा आज अमर झाली आहे. अमरत्वाला पोहोचली आहे. 


।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

कलियुगांती कोरडी । चहुं युगांची सालें सांडी ।




एक संपले की त्याला दुसरा पर्याय हा शोधावाच लागतो. त्यानुसार प्रगती करत राहावे लागते. नव्या परिस्थितीशी सामना करावा लागतो. असे बदल पूर्वीपासून होत आले आहेत. हे बदल होत राहणारच. बदल हाच निसर्गाचा नियम आहे, पण आत्मज्ञानात बदल होत नाही. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल ८९९९७३२६८५

कलियुगांती कोरडी । चहुं युगांची सालें सांडी ।
तवं कृतयुगाची पेली देव्हडी । पडे पुढती ।। 129 ।। अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ - कलियुगाच्या अखेरीस चार युगांची जीर्ण झालेलीं सालपटें वैगरे गळून पडतात न पडतात इतक्‍यांत कृतयुगाची पहिली अशी मोठी साल उत्पन्न होण्यास लागते.

आताचे युग हे कलियुग आहे, असे म्हटले जाते. एक युग संपले की लगेच दुसऱ्या युगाचे फुटवे फुटू लागतात. युगामागून युगे येत राहतात. आता तंत्रज्ञानाचे युग आहे. नवनवे शोध लागत आहेत. तंत्रज्ञानाचा मोठा प्रसार होत आहे, पण या युगालाही अंत आहे. तंत्रज्ञानाने खनिजाचे साठे शोधले जात आहेत. खनिज तेल आणि अन्य खनिजामुळे झपाट्याने प्रगती होत राहीली. पण हे खनिजाचे साठे संपत आहेत. यासाठी अन्य पर्याय शोधले जात आहेत. तेलाचे साठे संपले तर गाड्या कशा पळणार. विद्युत गाड्यांचाही वापर आता होऊ लागला आहे. सौर ऊर्जेचा पर्याय आपण आता शोधला आहे. नवे पर्यायही शोधले जात आहेत. अणुऊर्जेचाही पर्याय निवडला जात आहे. कारण भावी काळातील विजेचा तुटवडा कसा पूर्ण करणार, यावर सर्व अवलंबून आहे. कोळसा संपला तर पुढे काय? याला उत्तर हवेच. यामुळे एक संपले की त्याला दुसरा पर्याय हा शोधावाच लागतो. त्यानुसार प्रगती करत राहावे लागते. नव्या परिस्थितीशी सामना करावा लागतो. असे बदल पूर्वीपासून होत आले आहेत. हे बदल होत राहणारच. बदल हाच निसर्गाचा नियम आहे, पण आत्मज्ञानात बदल होत नाही. अनेक नवे शोध लागतात. नवे तंत्रज्ञान येते. जुने तंत्रज्ञान मागे पडते, पण आत्मज्ञान पूर्वी होते, आताही आहे आणि यापुढेही ते राहणार आहे. परंपरेनुसार ते पुढे धावत राहणार. युगे येतात जातात. त्यानुसार ज्ञानही बदलत राहते, पण आत्मज्ञान आहे तसेच राहते. त्यात बदल होत नाही. जे सत्य आहे तेच शाश्‍वत आहे. तेच टिकते. यासाठी कायम सत्याची कास धरायला हवी. सत्याला ओळखायला शिकावे. खरे सुख समजून घ्यायला हवे. सत्य हाच खरा धर्म आहे. त्याचा अंगीकार करायला हवा. युगानुयुगे या ज्ञानाची परंपरा चालत आहे. यापुढेही ती चालत राहणार आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Tuesday, November 26, 2019

शुन्यातून विश्वनिर्माण करणारा नवनाथ - यशोगाथा






नवनाथ दत्तात्रय कवडे माझा शालेय मित्र. रुकडी ( ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)  येथे प्राथमिक शाळेपासून ज्युनिअर महाविद्यालयातही तो माझ्या बरोबर होता.  रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय, महाविद्यालयात आमचे शिक्षण झाले. नवनाथ मुळचा आंदोरा ( ता. कळंब, जि. उस्मानाबाद) गावचा. कळंबपासून अवघ्या पाच किलोमीटरवर त्याचे गाव. १९७० चा त्याचा जन्म. पण १९७१ - ७२ च्या दुष्काळामुळे कुटुंबाची अवस्था खूपच बिकट झाली. मुळात गरीबीने  त्रस्त असणाऱ्या कुटूंबात जन्म अन् त्यातच दुष्काळाची झळ त्यामुळे आणखीनच बिकट समस्या त्याच्या कुटूंबासमोर होती. अशा परिस्थितीमुळे नवनाथच्या वडीलांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला ते काम शोधण्यासाठी नागपूरला गेले. नवनाथ व त्याचा लहान भाऊ हे ही त्याच्यासोबत होते. सहा महिने ते नागपूरमध्ये होते. त्याच दरम्यान नवनाथचा लहान भाऊ आजारी पडला. औषधालाही पैसे नव्हते.  त्यामुळे आजारपणातच त्याचा मृत्यू झाला.  या घटनेने व्यथीत झालेल्या नवनाथच्या वडीलांना पुन्हा गावाकडे येण्याचा निर्णय घेतला.

गावात पुन्हा काम शोधायला सुरवात केली. पण मनासारखे काम त्यांना मिळत नव्हते. म्हणावा तसा पैसाही मिळत नव्हता. त्यामुळे ते व्यथीत होते. पुन्हा गावाबाहेर पडून काम शोधण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पूर्वेकडे उन्हाचा ताप जास्त असतो. कष्टाच्या कामात थकवा अधिक येतो. आजारपणही येते. यासाठी त्यांनी पावसाच्या पट्ट्यात म्हणजे पश्चिमेकडे जाण्याचा निर्णय घेतला. गावाबाहेर पडण्यासाठी नवनाथच्या वडीलांनी आईला खूप विनवणी केली. पण एक मुलगा गमावून बसलेली ती माता आता गाव सोडण्यासाठी तयार नव्हती. नवनाथच्या वडीलांचा निर्णय मात्र पक्का होता. एकेदिवशी रात्री ते उठले. कोणालाही न सांगता ते गावाबाहेर पडले. खिशात काही पैसे नव्हते. त्यांच्या हातावर फक्त एक घड्याळ होते. ते द्यायचे अन् योग्य ठिकाण गाठायचे असे त्यांनी ठरवलं होतं. नवनाथचे वडील महामार्गावर आले. कोठे जायचे हेही काही निश्चित नव्हते. कारण कोणी नातेवाईक, पाहूणे पैही नव्हते. ज्यांच्याकडे जाऊन काही काम धंदा करून पैसा कमवता येईल. कोठे तरी जायचे हे निश्चित होते. पण ठिकाण निश्चित नव्हते. रस्त्याला कोणती गाडी प्रथम येईल त्या दिशेला जायचे असे त्यांनी ठरवले होते.  बीड - परळी ते कोल्हापूरकडे जाणारी गाडी प्रथम आली.  या गाडीतून ते कराडला पोहोचले.



कराडमध्ये त्यांनी काही दिवस बिगारी काम केले.  पुणे - बंगळूर महामार्गाचे काम त्याच कालावधीत सुरू होते. १९७४ साल असेल. कराड ते सातारा या रस्त्या दरमानच्या कामासाठी प्रयत्न केला. ओळख काढून त्यांनी काम मिळवले. या रस्त्याचे काम  गडोख कंपनी यांच्याकडे होते. काम करत असताना त्या ठेकेदाराच्या लक्षात आले की या व्यक्तीला काही लिहायला, वाचायला, हिशेब करायला येतो. कारण ७४ - ७५ च्या काळात शिकलेला माणूस मिळणे कठीण होते. त्यामुळे त्या ठेकेदाराने त्यांना हजेरी लिहिणे, कामगार सांभाळणे असे काम दिले. हजेरीतही वाढ केली.  पुढे काम उत्तमप्रकारे जमत असल्याने त्यांना मुकादम केले.  जवळपास १०० लोक त्याच्याहाताखाली कामास होते.  पैसाही चांगला मिळत होता. अवघ्या दोन वर्षात नवनाथच्या वडीलांनी शुन्यातून बरेच काही कमावले. 

पण त्याच दरम्यान १९७५ साली नवनाथची आई वारली. नवनाथ व त्याची छोटी बहीण उघड्यावर पडले. त्याकाळात ना फोन होता. ना संपर्काचे कोणते साधन होते. पटकण निरोप जाईल असे काहीच नव्हते. गावाकडे आपली बायको वारली आहे हा निरोपही त्यांना मिळाला नव्हता. कारण निरोप देणारे असे कोणीच नव्हते. मुळात नवनाथचे वडील आहेत कोठे हेच माहीत नसल्याने निरोप देणार तरी कसा हा मोठा प्रश्न होता. नशीबाने गावाकडच्या एका माणसाशी नवनाथच्या वडीलांची भेट झाली. त्यांनी त्यांना सांगितले की तुमची मंडळी देवाघरी गेली आहे. तुमची मुले उघड्यावर पडली आहेत. त्यांना सांभाळायला कोणीच नाही. वाट्टेल तिथे ती हिंडत आहेत. आजी होती पण ती तरी कसा सांभाळ करणार हाही प्रश्न होता. जवळपास पाच महिन्यांनी हा निरोप त्यांना मिळाला.  मुलांना घेऊन येतो असे सांगून त्यांनी ठेकेदाराकडून सुट्टी घेतली. सात दिवसात परत येण्याचे निश्चित झाले होते. कारण काम जबाबदारीचे असल्याने सुट्टी जास्त दिवस मिळणे कठीण होते.

गावाकडे जाताना त्यांच्या डोक्यात एवढाच विचार होता की मुलांना घ्यायचे. त्यांना एकदोन नवीन ड्रेस घालायचे. आणि कामावर परतायचे. अशा विचारातच नवनाथच्या वडीलांनी गाव गाठले. पण गावाकडे आल्यानंतर चित्र वेगळेच होते. मुलांना कुणीच सांभाळायला नसल्याने त्यांची फारच बिकट परिस्थिती झाली होती.  ना आंघोळ ना दोन वेळचे पोटभर जेवण. अशाने मुलांचे आरोग्य बिघडले होते. माती चिखलामुळे मुलांच्या अंगावर जखमा झाल्या होत्या. डोक्यात, अंगावर खरूज उटले होते.  ही अवस्था पाहून वडीलांना फारच काळजी वाटू लागली. त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी कळंबला नेले तेथे दोनचार दिवस औषधोपचार केले. पण हा आजार काही इतक्यात बरा होणार नव्हता.  दोन दिवस झाले. चार दिवस झाले. असे करत आठवडा उलटला तरी या जखमा काही बऱ्या होत नव्हत्या. यातच महिना उलटला. वडील गावाकडेच होते. त्यामुळे सात दिवसात येणारा माणूस महिना उलटला तरी परतला नसल्याने मालकाने त्यांचा विषयच संपवला.

एक दीड महिन्यानंतर जेव्हा नवनाथ व त्याच्या बहिणीला घेऊन वडील कराडला परतले. तेव्हा येथील चित्र वेगळेच होते. मालक कामावर पुन्हा घ्यायला तयार नव्हता. कामामध्ये विश्वास खूप महत्त्वाचा असतो. मालक आणि कामगार यांच्यातील विश्वास उडाला की संबंध राहात नाहीत. तसेच झाले. मालकाचे काम अतितमध्ये सुरू होते पण त्याने पुन्हा कामावर घेण्यास नकार दिला. शेवटी नवनाथच्या वडीलांनी अतितमध्येच बिगारी काम शोधले. कधी लाकडाच्या वखारीत, मिलमध्ये काम केले. कधी दगडे फोडायचे काम केले. पण एकदोन दिवस झाल्यानंतर काम संपले. अतित तसे छोटेशे गाव तेथे कायम स्वरूपी रोजगार मिळणे कठीणच होते. यासाठी मोठ्या शहराच्या ठिकाणी जाणे नवनाथच्या वडीलांना गरजेचे वाटले. यासाठी त्यांनी  सातारा गाठले.

पुणे बंगळूर महामार्गावर साताऱ्याजवळ एक मदिर होते. त्या मंदिरात त्यांनी दोन मुलांना ठेवले व साताऱ्यात कामाचा शोध सुरू केला. शहरात आल्याने काम मिळाले. पण आई नसल्याने मुलांचा सांभाळ कसा करणार हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. राहात असलेल्या ठिकणच्या लोकांनीही मुलाच्या बाबत तक्रारी केल्या. एका सरकारी नोकरी करणाऱ्या माणसाने नवनाथच्या वडीलांना सांगितले की मुलांना रिमांडहोममध्ये घाला. साताऱ्यात रिमांडहोम होते.  तेथे नवनाथ आणि त्याच्या बहीणीला दाखल करण्यासाठी गेले. पण रिमांड होमच्या प्रमुखांनी मुलांना घेण्यास नकार दिला. कारण तेथे वडील नसलेल्या मुलांना घेण्यात येत होते. तसेच अनाथ व अल्पवयीन गुन्हेगारांना सांभाळले जात होते. वडील असलेल्या मुलांना प्रवेश दिला जात नव्हता. कारण वडील मुलांना रिमांड होममध्ये दाखल करून दुसरे लग्न करून नवा संसार थाटण्याचा धोका असतो. यासाठी त्यांना प्रवेश नाकारला. शेवटी नवनाथच्या वडीलांनी दुसरे लग्न करणार नाही, मुलांना सोडून कोठे जाणार नाही, आठवड्याला मुलांना पाहायला येईन असा बाँड लिहून दिला. त्यानंतर नवनाथ व त्याच्या बहिणीला रिमांड होमममध्ये प्रवेश मिळाला.


काही दिवसानंतर नवनाथला शिक्षणासाठी रूकडी येथील वसतीगृहात पाठवण्यात आले.  तर त्याच्या बहिणीला सांगलीतील हरिपूर जवळील एका वसतीगृहात पाठवले. नवनाथ तिसरीत असताना रूकडीत आला. तिसरी ते बारावी पर्यंत नवनाथ रूकडीत शिकला. तेथे त्याची चांगली जडणघडण झाली. पण बारावीनंतर पुढे काय हा प्रश्नच होता. सरकारी नियमानुसार बारावीपर्यंत मोफत शिक्षण होते. पुढे काय ? कारण नवनाथचे वडील सुद्धा कामगार होते. सातारा एमआयडीसीमध्ये ते काम करत होते. कसेबसे स्वतःचे आयुष्य ते जगत होते. नवनाथला मात्र आता वसतीगृह सोडणे भाग होते. शेवटी नवनाथने एका पत्र्याच्या पेटीत त्याचे साहित्य ठेवले व डोक्यावर पेटी घेऊन वडील राहात असलेले सातारचे ठिकाण गाठले.

नवनाथचे वडील एमआयडीसीत क्रशरवर काम करायचे. नवनाथला आता काम शोधायचे होते. पण काम कुठे शोधायचे हा प्रश्न होता. अखेर वडील नवनाथला म्हणाले, मी क्रशरवर दगडे फोडायचे काम करतो. तेथेच काम सुरू कर. आता नवनाथला या कामाशिवाय पर्याय नव्हता. दिवसा दगडे फोडायचे काम करायचे अन् जेवनही स्वतः शिजवायचे. असा त्यांचा दिनक्रम सुरू होता.  जवळपास चार-पाच महिने हे काम नवनाथने केले.  त्यानंतर थोडे हलके म्हणून सिमेंटच्या पाईप तयार करण्याच्या फॅक्टरीतही त्याने पाच-सहा महिने काम केले. काम करत असताना बाजारही त्यालाच करावा लागायचा तसेच जेवनही त्यालाच करावे लागायचे.

एके दिवशी बाजार करून आल्यानंतर बांधलेल्या पुड्या सोडून त्या डब्यात भरण्याचे काम नवनाथ करत होता. त्यावेळी त्याची नजर पेपरमधील जाहिरातीवर गेली. बारावी पास शिकाऊ मुले पाहिजेत. पगार ४५० रुपये. अशी ती जाहिरात होती. ती जाहिरात पाहून नवनाथने त्या पत्त्यावर जाण्याचा विचार केला. जाहिरात येऊन महिना झाला असावा. काहीही असो पण नवनाथने त्या पत्त्यावर जाण्याचा विचार केला. कामावरून आल्यानंतर नवनाथने तो पत्ता शोधत शोधत त्या कंपनीत गेला. तेथे गेल्यानंतर मालक म्हणाला, अरे जाहीरात कधीची आहे. तु आत्ता आला आहेस काय उपयोग ? आला आहेस ते आहेस पण अर्ज सुद्धा तू सोबत आणला नाहीस. नोकरी मागायला आला आहेस की बागेत फिरायला आला आहेस. अशा प्रकारे त्या मालकांने नवनाथचा समाचार घेतला. हे ऐकूण तेथे कोण थांबणार. नवनाथ हताश होऊन तेथून बाहेर पडत होता. गेटपर्यंत गेला असेल तेवढ्यात मालकाने त्याला पुन्हा हाक मारली. थांब म्हणाले. पुन्हा त्यांनी नवानाथची चौकशी सुरू केली. कुठून आला आहेस. तुझे शिक्षण किती झाले आहे असे विचारले. यावर नवानाथ म्हणाला, देगाव फाट्यावरून आलोय. बारावी पास आहे.

त्यावर मालक म्हणाले इथे राहतोस मग गाव कुठले?
नवनाथ म्हणाला, गाव उस्मानाबाद
शाळेला उस्मानाबादला होतास मग इकडे कशाला आलास
नवनाथ म्हणाला, गाव उस्मानाबाद आहे. पण शाळेला मी रूकडीला होता.
यावर त्या मालकाला थोडी उत्सुकता वाटली. त्यांनी नवनाथला बसायला स्टुल दिले. व म्हणाले तु मुळचा उस्मानाबादचा, शाळा शिकलास कोल्हापूर जिल्ह्यातील रूकडीत आणि आता राहायला साताऱ्यात. नक्की तू आहेस तरी कुठला. यावर त्यांनी उत्सुकतेने नवनाथची सर्व चौकशी केली.  त्यांना सहानभूती वाटली व त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून कामाला येण्यास सांगितले. आणि अशा तऱ्हेने नवनाथची एमआयडीसीतील कामास सुरूवात झाली. मशिन शाॅपमध्ये त्याची कामास सुरूवात झाली.  सुरुवातीला काही किरकोळ कामे त्याने केली. हळुहळु मशीनवर काम करण्याची संधी त्याला मिळाली. दुसऱ्याच्या मार्गदर्शनाने त्याची सुरूवात सुरू झाली. पगारही चांगला मिळू लागला. वर्षभरात मशीनवर नवनाथचा चांगला जम बसला.

पण मशीनवर काम करून जेवनही स्वतः करावे लागत होते. त्यामुळे सर्वजण चेष्टा करत होते. बायकांच्या सारखी काय काम करता. नवनाथच्या वडीलांना काहींनी सुचवले की याचे लग्न करून टाका म्हणजे घरच्या कामाचा त्याचा ताण कमी होईल.  नवनाथने हा विषय चेष्टावर घालवला पण शेजारच्या लोकांनी मनावर घेतले. काहींनी तर गावाकडे मुलगी पाहण्यासाठी निरोपही धाडला. अवघ्या चार दिवसात नवनाथला पाहायला गावाकडची मंडळी आली. पाच भावात एकटीच असणाऱ्या मुलीला साताऱ्यात द्यायचे हा त्या मंडळींचा विचार होता. नवनाथ सांगेल ती गोष्ट त्यांनी मान्य केली. काही दिवसात नवनाथचे लग्नही झाले. अवघ्या २१ व्या वर्षी नवनाथचे लग्न झाले. लग्न झाल्याने खर्च वाढला. जबाबदारी वाढली. त्यावेळी नवनाथला ८०० रुपये पगार होता. ओव्हरटाईम करून एक हजार रुपये मिळायचे पण त्यात काही भागत नव्हते. पगार वाढावा अशी अपेक्षा होती. पण मालक काही वाढवून द्यायला तयार नव्हता. अखेर दुसरीकडे नोकरी शोधण्याशिवाय नवनाथला पर्याय नव्हता.

एक जाहिरात वाचली. तिकडे दोन हजार रूपये पगार देणार होते. तेथे प्रयत्न केला. गेअर तयार करण्याचा तो कारखाना होता. तेथे काही दिवस काम केल्यानंतर नवनाथच्या असे लक्षात आले की हे मशीन स्वतः खरेदी करून काम सुरू केले तर चांगले पैसे आपणास मिळू शकतील. नवनाथने ठरवले काहीही करायचे पण मशीन खरेदी करायचे. यासाठी त्याने पैशांची जमवाजमव सुरू केली. सासुरवाडीच्या लोकांनी १५ हजार रुपये दिले. नवीन सायकल होती,ती नवनाथने विकली.  घरामध्ये टीव्ही होता तो विकला.तरीही रक्कम अपुरी पडली म्हणून लग्नात दिलेली सोन्याची अंगठी विकली.असे करून नवनाथने २५ हजार रुपये मशिन खरेदी साठी जमा करून मशीन विकत घेतले. त्या बरोबर गरजेचे  सर्व किरकोळ साहित्य विकत घेतले.

अवघे २५ हजार रुपये भांडवल घालून नवनाथने १९९३ मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला. एका भाड्याच्या शेडमध्ये त्याने या व्यवसायाला सुरूवात केली. पहिल्या महिन्यातच नवनाथला असे लक्षात आले की आपणास जेवढा पगार मिळत होता त्यापेक्षा जास्त पैसा यातून मिळतो. प्रथम तो स्वतःच काम करत होता. काम शोधण्यापासून ते त्याची पुर्तता करण्यापर्यंत सर्वच काम तो करत होता. खर्च वजा जाता बऱ्यापैकी पैसा त्याच्या हातात राहात होता. पैसा जास्त मिळतो म्हटल्यानंतर त्याला कामाला उत्साह आला. रात्रनदिवस काम तो करत होता.



नवनाथ म्हणतो, ज्याला काम करण्याची इच्छा आहे त्याला कशाचीही कमतरता भासत नाही. काम शोधणाऱ्याला धंद्यात मंदी आहे अशी स्थिती कधी येतच नाही. फक्त राबण्याची तयारी पाहिजे. डोक्यात सतत त्याचा ध्यास असायला हवा. मला हे करायचे आहे. मला हे वाढवायचे आहे. मी निर्माण केलेले विश्व टिकवायचे आहे. त्याला भरभराटीला आणायचे आहे. हा पक्का निर्धार असेल तर मंदीतही काम भरपूर मिळू शकते. १९९६ आणि २००८ च्या मंदीची मोठी लाट होती. पण कामाचा सतत ध्यास ठेवल्याने मला मंदीही कधी जाणवलीच नाही. स्वतः कामगार असल्याने दुसऱ्या कामगारांना सुद्धा कशी वागणूक द्यायची ही जाणीव मला होती. स्वतः सोळा सोळा तास काम केल्याने मोठा अनुभव होता. 

नवनाथने १९९८ ला या कामातून दुसरे मशीन खरेदी केले. यासाठी दोन कामगार त्याने ठेवले. त्यामुळे त्याला कामातून थोडी उसंत मिळत होती. या फावल्यावेळात त्याने कामे शोधण्याचा प्रयत्न केला. यातूनही पैशाची अधिक बचत होऊ लागली. हळूहळू त्याने कामगार वाढवले.  दुसरे मशीन घ्यायला नवनाथला पाचवर्षे लागली पण तिसरे मशीन नवनाथने अवघ्या सहा महिन्यात घेतले. पण जागेची कमतरता भासू लागली. यासाठी त्याने मोठी जागा शोधली.

पण मशीन वाढवण्यासाठी आता संधी नव्हती. २००३ मध्ये सहा मशीनवर काम सुरु होते. कामाच्या दोनदोन शिफ्ट सुरु झाल्या होत्या. मग तेव्हा स्वतःची जागा हवी यासाठी प्रयत्न सुरू केला. अखेर २००५ साली नवनाथने स्वतःची जागा खरेदी केली. एप्रिल २००६ मध्ये आठ हजार स्केअर फुटचा प्लाॅटमध्ये बारा मशीनसह काम सुरू केले.  यातून काम वाढेल तसे जुनी देशी बनावटीची मशीन बदलून गरजेनुसार इम्पोर्टेड मशीन खरेदी केले. असे करत आता तो छान उद्योजक झाला आहे. कवडे इंजिनिअरिंग वर्क्स  या नावाने त्याचा हा उद्योग साताऱ्यामध्ये नावारुपाला आला आहे. अवघा १२ वी शिकलेला हा तरूण केवळ जिद्द आणि स्मार्ट वर्कच्या जोरावर आज मोठा उद्योजक झाला आहे.

- राजेंद्र घोरपडे, मोबाईल ८९९९७३२६८५

Thursday, November 21, 2019

होय अदृष्ट आपैतें । तैं वाळुची रत्ने परते ।


दैवाची कृपा झाली, तर नराचा नारायण होतो. जीर्णावस्थेत काबाडकष्ट करणारा महान राजाही होऊ शकतो. यासाठी दैवाची कृपा व्हायला हवी.

होय अदृष्ट आपैतें । तैं वाळुची रत्ने परते ।
उजू आयुष्य तै मारितें । लोभु करी ।। 22 ।। अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ - दैव जर अनुकूल झाले, तर वाळूची रत्नें होतात, अथवा जर आयुष्य अनुकूल असलें तर जीव घ्यावयास आलेलाहि प्रेम करतो.

दैव जर अनुकूल झाले, तर वाळूची रत्ने होतात. अथवा जर आयुष्य अनुकूल असेल, तर जीव घ्यावयास आलेलाही प्रेम करतो इतके सामर्थ या दैवात आहे; पण दैवाचा हा खेळ कोणाला कळला? आत्मज्ञानाने दैवाचा खेळ समजतो; पण आयुष्यात घडणार आहे, ते कोणी टाळू शकत नाही. नशिबात एखादी घटना घडणार असेल, तर ती घडतेच. अनेक नवे शोध लागले. नवनव्या तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली, पण त्सुनामीसारखी एखादी लाट क्षणात सारे उद्‌ध्वस्त करते. हा दैवाचा भाग आहे. दैवाची कृपा झाली, तर नराचा नारायण होतो. जीर्णावस्थेत काबाडकष्ट करणारा महान राजाही होऊ शकतो. यासाठी दैवाची कृपा व्हायला हवी. मरा मरा म्हणून जप करणारा, वाल्ह्याचा महान वाल्मीकी ऋषी झाला. कृपा कशी होईल, हे सांगता येत नाही. एखाद्या चोवीस तास जप करणाऱ्या व्यक्तीलाही काहीच भेटत नाही, असेही घडते. नुसती जपायची माळ ओढून चालत नाही. तो भाव मनात प्रकट व्हायला लागतो. यासाठी सद्‌गुरूंची कृपा व्हायला हवी. मग माळा जपायची गरज भासत नाही. आपोआप साधना होते नाही तर ती करवून घेतली जाते. दैवाच्या कृपेनेच हे विचार मनात प्रकटतात. दैवाच्या कृपेनेच, सद्‌गुरूंच्या आशीर्वादानेच तर हे लिखाण माझ्याकडून करवून घेतले जात आहे. प्रत्यक्षात लिहीत मी आहे, पण हे लिहून घेणारा कोणी तरी दुसरा आहे. हे काम तो माझ्याकडून करवून घेत आहे. ते विचार तो माझ्या मनात भरत आहे. तेच इथे उमटत आहेत. त्याचे अस्तित्व माझ्यात कोठे तरी आहे. यामुळेच हे लिखाण माझ्याकडून होत आहे. यामुळे मी केले, मी लिहिले, हा अहंकार आता माझ्यामध्ये उरलेला नाही. मीपणाचा गर्व नाही. हा अहंकार आता नाही. मनात येणारे विचारही त्याच्यामुळेच प्रकट होत आहेत. त्याला आता मला पकडायचे आहे. तो सोहम्‌ चा नाद मला पकडायचा आहे. ती लय मला धरायची आहे. त्याच्यातच आता मला माझे मन रमवायचे आहे. कारण तोच ह्या सर्व विचारलहरींचा निर्माता आहे. त्याच्यातूनच हे सर्व प्रकट होत आहे. त्याच्या विचारलहरीतूनच हे विचार प्रकट होत आहेत. ते दैव मला पकडायचे आहे. दैवाला मला अनुकूल करून घ्यायचे आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।। 

Saturday, November 16, 2019

मोहाचा महारोग


पूर्वी स्वातंत्र्य मिळविण्याच्या उद्देशाने लूट केली जात होती. हा पैसा चांगल्या कामासाठी वापरला गेला. त्यात अनेक हुतात्मे झाले, अमर झाले. उद्देश चांगला होता. सर्वाना हा उद्देश मान्य होता. देशहिताचा हेतू होता. यातून समाधान मिळणार होते, पण स्वातंत्र्यानंतर ही लूट कायम राहिली; मात्र ती स्वतःच्याच देशातील जनतेची असल्याने ही लूट ही चोरी ठरत आहे. हा लुटीचा रोग बळावल्यास पुन्हा नव्या स्वातंत्र्यासाठी उठाव होईल, हे निश्‍चित.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल ८९९९७३२६८५

तरी कृपाळु तो तुष्टो । यया विवेकु हा घोंटो ।
मोहाचा फिटो । महारोगु ।। 412 ।। अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ - तरी तो कृपाळू (श्रीकृष्णपरमात्मा) संतुष्ट होवो आणि यास (धृतराष्ट्रास ) हा आत्मनात्मविचार सेवन करण्याचे सामर्थ्य देवो. आणि याचा मोहरूपी महारोग नाहीसा होवो.

पूर्वी प्लेग, देवी यांसारखे महारोग होते. या साथीच्या रोगांत अनेक माणसे मृत होत असत. काही वर्षांपूर्वी स्वाइन फ्लू या रोगाने थैमान घातले होते. तो झपाट्याने पसरतो. त्यात जगभरात हजारो लोक मृत्युमुखी पडले. असाच माणसास मोहाचाही रोग होतो. हा रोग लागला तर लवकर सुटत नाही. या मोहाच्या जाळ्यात जर माणूस अडकला, तर त्याचे आयुष्यही वाया जाऊ शकते. अनेक जणांना संपत्ती जमा करण्याचा मोह लागला आहे. पैसा इतका जमा केला आहे की, तो इथे ठेवायलाही जागा नाही. देशात पैसे ठेवायला सुरक्षित जागा नाही म्हणून आता पैसे परदेशात, स्विस बॅंकेत ठेवले जात आहेत. हा सगळा काळा पैसा आहे. मोहाने जमा केलेली ही माया आहे, पण मोहाचे हे जाळे त्यांना कोणत्याही क्षणी संपवू शकते, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. जाळ्यात अडकल्यानंतर जाणीव होऊन काय उपयोग? भ्रष्टाचारही या अशा मोहानेच वाढत चालला आहे. एवढी संपत्ती मिळवूनही करायचे तरी काय, हा प्रश्‍न या मोहसम्राटांना का पडत नाही? समाधान नष्ट करणारी ही संपत्ती नेमकी जमवितात तरी कशासाठी? या संपत्तीने अनेकांचा तळतळाट मागे लागलेला असतो. लुटीचा हा रोग वाढतच चालला आहे. यामुळे देशात लुटारूच वाढले आहेत. पूर्वी स्वातंत्र्य मिळविण्याच्या उद्देशाने लूट केली जात होती. हा पैसा चांगल्या कामासाठी वापरला गेला. त्यात अनेक हुतात्मे झाले, अमर झाले. उद्देश चांगला होता. सर्वाना हा उद्देश मान्य होता. देशहिताचा हेतू होता. यातून समाधान मिळणार होते, पण स्वातंत्र्यानंतर ही लूट कायम राहिली; मात्र ती स्वतःच्याच देशातील जनतेची असल्याने ही लूट ही चोरी ठरत आहे. हा लुटीचा रोग बळावल्यास पुन्हा नव्या स्वातंत्र्यासाठी उठाव होईल, हे निश्‍चित. लूट करणाऱ्यांचे आयुष्य हे कधीच सुखी समाधानी राहिलेले नाही, हा इतिहास आहे. हे वास्तव आहे. हे जाणणारे या वाटेला कधीच जाणार नाहीत, हेही खरे आहे, पण मोहाचा हा रोग बळावला आहे. यासाठी मोहावर आवर हा घालायलाच हवा. मोहामुळे मोठ मोठी साम्राज्येही उद्‌ध्वस्त झाली आहेत. हा महारोग नियंत्रणात येऊ शकतो. यासाठी विवेकाचा काढा प्यायला हवा. विवेकानेच हा रोग बरा होऊ शकतो.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।। 

Thursday, November 14, 2019

स्वस्वरूप


सत्यच सुंदर आहे. सत्यच ईश्‍वर आहे, हे जाणून घ्यायला हवे. मी आत्मा आहे, याचा बोध घ्यायला हवा. मळणीनंतर जसे धान्य स्वतंत्र होते तसा आत्मा या देहापासून वेगळा करावा. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल ८९९९७३२६८५

आतां ते तवं तेणें सांडिलें । आहे स्वस्वरूपेंसीचि मांडिलें ।
सस्यांतीं निवडिलें । बीज जैसें ।। 352 ।। अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणें मळणी झाल्यावर दाणे हे कोंड्यापासून वेगळे काढावे त्याप्रमाणे आता त्यानें ते देहतादात्म्य टाकले व तो आपल्या आत्मस्वरूपाने स्थिर राहिला आहे.

स्वतःच स्वतःचे रूप पाहायचे. स्वतःचे बाह्यरूप पाहण्यासाठी आरसा लागतो. आपल्या चेहऱ्यावर एखादा डाग लागला असेल तर तो त्यात दिसतो. चेहऱ्याचे सौंदर्य कसे आहे, हे आपण त्यात न्याहाळतो. एकंदरीत चांगले कसे दिसता येईल, याचा प्रयत्न आपण त्यातून करत असतो. केस विस्कटलेले असतील तर ते आपण व्यवस्थित करतो. नीटनेटके राहण्याचा प्रयत्न करतो. बाह्य रूपात आपण चांगले राहण्याचा नेहमीच प्रयत्न करतो मग अंतरंगात का करत नाही? मन स्वच्छ ठेवण्याचा का प्रयत्न करत नाही? स्वतःचे अंतःकरणही असेच स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. नुसती बाह्यरूपात स्वच्छता नको, तर अंतरंगही साफ असायला हवे. अंतर्बाह्य साफ असेल तर समस्याच उरणार नाहीत. स्वतःच स्वतःमध्ये पाहायला हवे. मी कोण आहे? याचा विचार करायला हवा. मी म्हणजे अमुक नावाचा आहे. तमुक गावाचा आहे, पण हे बाह्यरूप झाले. अंतःकरणात मी कोण आहे? याचा विचार व्हायला हवा. मी एक आत्मा आहे, याचा बोध व्हायला हवा. अंतरंगात डोकावण्यास सुरवात केल्यावर हळूहळू आपल्या चुका आपणालाच कळू लागतात. त्या सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. यातून सात्त्विक वृत्तीत वाढ होते. याचा परिणाम आपल्या वागण्यावर होतो. आपल्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात फरक पडतो. काही दुखावले गेलेलेही आपल्या जवळ येऊ लागतात. संतांना अनेकांनी तुच्छ लेखले गेले आहे. त्यांचे हाल केले गेले आहे. हे फक्त भारतीय संस्कृतीतच नाही. जगातील इतर देशांतही असेच घडले आहे. येशूचाही असाच छळ झाला आहे. हे सर्व धर्मात असेच आहे, पण असत्याचा जेव्हा जेव्हा हाहाकार माजतो तेव्हा तेव्हा सत्याचा जन्म होतो आणि सत्याचा विजय होतो. सत्यच शाश्‍वत आहे. सत्यच सुंदर आहे. सत्यच ईश्‍वर आहे, हे जाणून घ्यायला हवे. मी आत्मा आहे, याचा बोध घ्यायला हवा. मळणीनंतर जसे धान्य स्वतंत्र होते तसा आत्मा या देहापासून वेगळा करावा. मग पुन्हा मिसळणे नाही. देहाची मळणी करायला हवी. आत्मा वेगळा झाल्यानंतर पुन्हा त्यात तो मिसळला जात नाही. मग तो आत्मस्वरूपी स्थिर होतो. 

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।। 

शिवाजी विद्यापीठात मोरांचे नंदनवन
https://www.facebook.com/RajendraKGhorpade/videos/1019887741738306/?eid=ARBoIKaUL4LHUO5u32BI79NGg0ZWTCAJxasRrGf6yWnr4_kJECyUIDjfowDhFgMrTbVsDSxlP1CYtm3z

ब्रह्मायु होईजे । मग निजेलियाचि असिजे ।
http://dhunt.in/7tbnN?s=a&ss=pd


Saturday, November 9, 2019

तैसें हें नित्य नूतन देखिजे । गीतातत्व ।।


ज्ञानेश्वरीची पारायणे केली जातात. प्रत्येक पारायणावेळी येणारी अनुभुती ही नित्य नुतच अशीच आहे. म्हणूनच त्या ग्रंथाची पारायणे सुरू आहेत आणि यापुढेही ती सुरूच राहतील. भाषेत बदल होईल पण त्यातील विचार मात्र तोच राहील. तो विचार नित्य नव्या रूपात पाहायला मिळेल. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल ८९९९७३२६८५

तेथ हरु म्हणे नेणिजे । देवी जैसें कां स्वरूप तुझें । 
तैसें हें नित्य नूतन देखिजे । गीतातत्व ।। ७१ ।। अध्याय १ ला

ओवीचा अर्थ - त्यावर शंकर म्हणाले, हे देवी ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा थांग लागत नाही, त्याप्रमाणे गीतातत्वाचा विचार करावयास जावे तेंव्हा ते रोज नवीनच आहे असे दिसते.                                                                                                                                                                                                                                         
गीतेमध्ये मांडण्यात आलेला विचार हा वैश्विक आहे. मानवी जीवनाचा अर्थ त्यामध्ये सामावलेला आहे. यामुळेच कोणत्याही युगात मानवासाठी हा उपयोगी ठरणारा असा विचार आहे. युगानुयुगे मार्गदर्शक ठरणारा असा हा विचार आहे. कित्येक वर्षे लोटली तरी तो विचार आजही प्रेरणादायी, मार्गदर्शक आहे. कारण तो नित्य नुतन आहे. प्रत्येकवेळी त्यातून येणारा बोध, येणारी अनुभूती ही नित्य नुतन अशीच आहे.  यामुळेच तिला अमरत्व प्राप्त झाले आहे. श्री ज्ञानेश्वरी ही गीतेवर आधारित आहे. गीतेतील सातशे श्लोकावर ज्ञानेश्वर माऊलीने केलेले भाष्य आहे. निरूपण आहे. सर्वसामान्य माणसाला गीतेचा अर्थ समजावा यासाठी केलेली ही निर्मिती आहे. गीतेतील अमरत्वाचा विचारही श्री ज्ञानेश्वरीमध्ये उतरला आहे. यामुळे ज्ञानेश्वरीलाही अमरत्व प्राप्त झाले आहे. गीतेप्रमाणे ज्ञानेश्वरी येणारा विचार, अनुभूती, बोध हा नित्य नुतनच आहे. ज्ञानेश्वरीची पारायणे केली जातात. प्रत्येक पारायणावेळी येणारी अनुभुती ही नित्य नुतच अशीच आहे. म्हणूनच त्या ग्रंथाची पारायणे सुरू आहेत आणि यापुढेही ती सुरूच राहतील. भाषेत बदल होईल पण त्यातील विचार मात्र तोच राहील. तो विचार नित्य नव्या रूपात पाहायला मिळेल. नऊ हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी तीच आहे. पण त्यातून येणारा बोध, अनुभूती ही नित्य नुतन असल्याने ज्ञानेश्वरीही आवडीने वाचली जाते. पारायणावेळी येणारी ओवी प्रत्येकवेळी तीच आहे. पण त्यातून येणारी अनुभूती दरवेळी वेगळी आहे. दररोज येणारे वृत्तपत्र तेच आहे. मात्र रोज त्यामध्ये येणाऱ्या बातम्या वेगवेगळ्या आहेत. दररोज त्यामध्ये नवेपणा आणावा लागतो तरच ते खपले जाते. अन्यथा ते बंद पडू शकते. दरवर्षी येणारे दिपावली, दसरा, होळी असे सण तेच असतात. पण या प्रत्येक सणाला वृत्तपत्रात येणारी बातमी, लेख नव्या रूपात द्यावा लागतो. त्यामध्ये नवेपण आणावे लागते. तरच वाचक तो अंक घेईल. दरवर्षी तोच तोच पणा आला तर अंक वाचला कसा जाणार. यासाठी त्यात वेगळेपण हे आणावे लागते. हे वेगळेपण कृत्रिम आहे. पण ज्ञानेश्वरी पारायणाच्या सणात येणारा नवा विचार हा नैसर्गिक आहे. येथे वेगळेपण हे ओघाने येत असते. ते नवेपण आणावे लागत नाही. आपोआप विचार प्रकट होतात.  नैसर्गिकपणा असल्यानेच ते मनाला भावते. मन त्यामध्ये रमते.  सद्गुरूंच्या आशिर्वादाने हे नवेपण येत असते. सद्गुरू हे शिष्याला दरवेळी असे नित्य नुतन अनुभव देत असतात. या नवेपणामुळेच शिष्याला प्रेरणा मिळते. स्फुरण चढते. यातूनच त्यांचा अध्यात्मिक विकास होतो. अशा या गीतातत्वामुळेच त्यालाही त्या अमर तत्वाचा बोध होतो व अमरत्व प्राप्त होते.

Monday, November 4, 2019

सात्त्विक राजा


सात्त्विक वृत्तीचे राजेच आज अमर आहेत. त्यांचेच नाव होते. सर्वांना समान न्याय देणारा राजाच स्वतःचे साम्राज्य उभे करू शकतो. त्यांचे साम्राज्य टिकून राहते. 
- राजेंद्र घोरपडे

नगरेची रचावीं । जलाशयें निर्मावीं ।
लावावीं । नानाविधें ।। 233 ।। अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ - शहरेच वसवावीत, जलाशय वैगरे पाण्याचे साठे बांधावेत, नाना प्रकारचे मोठे बगीचे लावावेत.

प्रत्येक मनुष्यात सत्त्व, रज, तम हे गुण असतात. त्याचे प्रमाण कमीअधिक असते. सात्त्विक वृत्तीत वाढ झाल्यास मनुष्याला देवत्व प्राप्त होते. शहरेच वसवावीत. जलाशये वगैरे पाण्याचे मोठे साठे बांधावेत. नाना प्रकारचे मोठे बगीचे लावावेत, हे रजोगुणाचे लक्षण आहे. धरणांचे प्रकल्प उभारताना अनेक समस्या उभ्या राहतात. याचे वाद अनेक वर्षे चालतात. यात कोणाला न्याय मिळतो, कोणाला न्याय मिळतही नाही. ज्यांनी पाण्यासाठी घरे सोडली त्यांनाच पाणी मिळत नाही, ही आजची स्थिती आहे. धरणे ही व्हायला हवीत, हेही खरे आहे; पण ती बांधताना विस्थापितांनाही त्यामध्ये योग्य न्याय द्यायला हवा, पण तसे होत नाही. धरणाचा फायदा हा प्रत्येकाला झाला पाहिजे, असे नियोजन करायला हवे. असे नियोजन असेल तर धरणाला विरोध होणार नाही. धरणाचा फायदा प्रत्येकाला समान मिळाला पाहिजे. पाण्याचे समान वाटप झाले तर वाद होणार नाहीत, पण तसे घडत नाही. प्रत्येकाचा स्वार्थ त्यामध्ये अडवा येतो. प्रत्येक जण स्वतःला अधिक कसा फायदा होईल, हेच त्यामध्ये पाहतो. अशाने वाद वाढतच जातात. सात्त्विक वृत्तीने कोणी काम करण्यास तयारच नाही. स्वतःचा व्यक्तिगत फायदा पाहणाऱ्या राजकीय वृत्तीमुळेच देशाचे मोठे नुकसान होत आहे. अनेक सामाजिक प्रश्‍न यामुळे उपस्थित होत आहेत. अन्यायामुळेच नक्षलवाद वाढत आहे. अन्यायाचा विस्फोट अशा प्रकारे होणे, हे एक दुर्दैव आहे. देशांतर्गत सुरक्षा अशाने धोक्‍यात येऊ शकते. सर्वांना सम न्याय मिळाला पाहिजे. सध्या यासाठी लढा देऊन काहीही मिळत नाही असे दिसते, यामुळे हे घडत आहे. समन्याय देण्याची वृत्तीच सरकारमध्ये नाही. मग असे प्रश्‍न उत्पन्न होणारच. असे लढे उभे राहणारच. यासाठी सरकारनेच प्रकल्पांचे नियोजन करताना समन्याय ठेवावा. यामुळे देशात वाढणारा नक्षलवाद निश्‍चितच कमी होईल. यासाठी राज्यकारभारातच सात्त्विक वृत्ती वाढीस लागायला हवी. सात्त्विक वृत्तीचे राजेच आज अमर आहेत. त्यांचेच नाव होते. सर्वांना समान न्याय देणारा राजाच स्वतःचे साम्राज्य उभे करू शकतो. त्यांचे साम्राज्य टिकून राहते.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।। 

Saturday, November 2, 2019

ब्रह्मायु होईजे । मग निजेलियाचि असिजे ।


पूर्वीच्या काळी अनेक राजांचे सत्ता भोगण्यातच आयुष्य जायचे. जनतेच्या प्रश्‍नांची त्यांना जाणही नव्हती. ऐशआरामात जीवन व्यथित करणारे हे राजे परकीय आक्रमणास सहज बळी पडत. अशा या कारभारामुळेच आपला देश कित्येक वर्षे पारतंत्र्यात होता. हा इतिहास विसरता कामा नये. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

ब्रह्मायु होईजे । मग निजेलियाचि असिजे । 
हें वांचूनि दुजें । व्यसन नाहीं ।। 187 ।। अध्याय 14 वा 

ओवीचा अर्थ - ब्रह्मदेवाचें आयुष्य मिळावें आणि मग निजूनच राहावें, यावाचूंन त्याला दुसरा नादच नाही. 

सरकारी तसेच खासगी संस्थांमध्ये महत्त्वाच्या पदावरील अनेक माणसे केवळ नाममात्र कारभारी असतात. त्यांना अनेक अधिकार असूनही ते त्याचा वापर करत नाहीत. सरकारी कार्यालयात ही परिस्थिती पहायला मिळते. नुसती हजेरी मांडून पगार तेवढा घ्यायला जातात. ही तामस वृत्ती दुसऱ्यांना सुद्धा त्रासदायक ठरते आहे. त्यांच्या अशा वागण्याने त्यांच्या सान्निध्यातील इतरांनाही ही सवय लागते. वरिष्ठच झोपलेले असतील, तर कार्यालयातील शिपायापासून सर्वजण आळशी असलेले पाहायला मिळतात. एखाद्या अधिकाऱ्याने पद मिळाले तर त्याचा वापर योग्य कामासाठी, सत्कर्मासाठी करायला हवा. अशी वृत्ती त्याच्यात असायला हवी. उच्च पदावरील तामसी वृत्तीच्या अधिकाऱ्यामुळे सरकारी कार्यालयांची परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. याचा नाहक त्रास जनतेला सोसावा लागत आहे. राज्यकर्तेही अशा अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. अशा अधिकाऱ्यांशी संगनमत करून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्यातच राज्यकर्ते अधिक रस घेतात. अशा या कारभारामुळे जनता त्रस्त आहे. किरकोळ कामासाठीही जनतेला वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते आहे. काही अधिकारी याला अपवाद असतात, पण असे कार्यक्षम अधिकारी फार काळ सेवेत टिकत नाहीत, असाही अनुभव आहे. कारण तामसाच्या सान्निध्यात आपणही तामस होऊ का? अशी भीती त्यांना वाटते. असे हे तामसी वृत्तीचे झोपी गेलेले अधिकारी सात्त्विक होणार तरी कधी? विकासाच्या, महासत्तेच्या चर्चा करताना अशा सरकारी कारभारामुळे बाधा पोहोचते आहे, याकडे हे सरकार तरी लक्ष देते का? झोपलेल्या सरकारला जाग येईल तरी कधी? नुसत्या शासकीय फायली इकडून तिकडे करून आयता पगार लाटण्यातच यांचे कामकाज चालते. कागदावरच महासत्तेच्या गप्पा मारण्यात सर्व जण पटाईत आहेत. प्रत्यक्ष परिस्थिती खूप गंभीर आहे. तमोगुणाचे साम्राज्य पसरलेले आहे. पूर्वीच्या काळी अनेक राजांचे सत्ता भोगण्यातच आयुष्य जायचे. जनतेच्या प्रश्‍नांची त्यांना जाणही नव्हती. ऐशआरामात जीवन व्यथित करणारे हे राजे परकीय आक्रमणास सहज बळी पडत. अशा या कारभारामुळेच आपला देश कित्येक वर्षे पारतंत्र्यात होता. हा इतिहास विसरता कामा नये. अध्यात्मातही असे असतो. ब्रह्मसंपन्न होतात पण कार्य काही करत नाहीत. तर काही ब्रह्म संपन्न होण्याचे स्वप्न पाहातात. पण काहीच न करता केवळ स्वप्नच पाहातात. अध्यात्मात कर्माला महत्त्व आहे. साधनेचे कर्म हे नियमित व्हायलाच हवे. यासाठी अंगी सात्विक वृत्ती वाढायला हवी. ऐशआरामात जीवन जगणारे त्यातच गुंग राहीले तर त्यांची अध्यात्मात प्रगती कशी होईल.  

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।। 

Friday, November 1, 2019

लोभी वृत्ती


लोभी वृत्तीविरुद्ध उठाव करायला शिकले पाहिजे. सर्वप्रथम स्वतःपासून याची सुरवात करायला हवी. लालसा सोडली तर मनाची शांती टिकते.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

जैसी मीनाचां तोंडीं । पडेना जंव उंडीं ।
तंव गळ आसुडी । जळपारधी ।। 147।। अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणें माशाच्या तोंडात आमिष पडल्यावर लगेच, धीवर गळास हिसका देतो.

लोभी आणि स्वार्थी असतो. अशा या त्याच्या स्वभावामुळेच तो अनेक संकटांत सापडतो. जगात वावरताना लोभ, माया, स्वार्थ बाजूला ठेवायला हवा. ताक सुद्धा फुंकून पिण्याची सवय हवी. लोभाच्या लालसेने आपण स्वतःच स्वतःसमोर अनेक संकटे उभी करत असतो. अनेक शेतकरी अधिक उत्पन्नाच्या लालसेपोटी पिकांना प्रमाणापेक्षा अधिक खते टाकतात. ठराविक मर्यादेपर्यंत पिके खतांचे शोषण करू शकतात. कोणत्या पिकास किती प्रमाणात खते द्यायला हवीत, त्याची आवश्‍यकता किती आहे, हे संशोधकांनी शोधले आहे. त्या प्रमाणातच खतांचा पुरवठा करणे योग्य असते. अधिक उत्पन्नाच्या लालसेने खतांची मात्रा वाढवून शेतकरी स्वतःच स्वतःचे नुकसान करून घेतो. यासाठी कोणतीही गोष्ट ठराविक एखाद्या मर्यादेपर्यंत उत्तम प्रतिसाद देते. हाव असावी, पण त्याला ठराविक मर्यादा असावी लागते. खाद्याच्या आमिषाने मासा जळपारध्याच्या जाळ्यात सापडतो. सध्या समाजात अशा अनेक जळपारध्यांचा सुळसुळाट झालाय. व्यापाऱ्यांच्याही वृत्तीत मोठा बदल झाला आहे. यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर प्रथम सत्तेत असणाऱ्या राज्यकर्त्यांनी लोभ सोडायला हवा. लुटारू वृत्ती सोडायला हवी. जसा राजा तशी प्रजा, असे म्हटले जाते. भ्रष्ट राज्यकर्त्यांच्या सान्निध्यात भ्रष्ट लोकांचा वावरच अधिक असतो. अशा वृत्तीमुळे भ्रष्ट कारभारात वाढ होत आहे. सर्वसामान्य जनता यामुळे बदलत चालली आहे. ही जनता कधी तरी या विरोधात उठाव करणार, हे निश्‍चित. जाळ्यात सापडलेल्या अनेक माशांनी उठाव केला, तर जलपारध्याने टाकलेले जाळे सुद्धा कोलमडू शकते. त्यातून मासे बाहेर पडू शकतात. यासाठी एकत्रित उठाव व्हायला हवा. या लोभी वृत्तीविरुद्ध उठाव करायला शिकले पाहिजे. सर्वप्रथम स्वतःपासून याची सुरवात करायला हवी. लालसा सोडली तर मनाची शांती टिकते, असे लक्षात येईल.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।