Sunday, March 31, 2019

पित्त





साधनेने पित्त शांत होते. पित्ताचा सामू समपातळीत ठेवण्यात मदत होते. साधनेत पित्त जळते. त्यातील अनावश्‍यक घटक जळतात. साधनेतून शरीरात उत्तम द्रव्ये उत्पन्न होतात. याचा परिणाम कातडीवर होतो. कातडी उजळते. चेहऱ्यावरील तेज वाढते. पाचकशक्ती सुधारते. मनात शांती उत्पन्न होते. मन उत्साही राहते.
- राजेंद्र घोरपडे, 
श्री अथर्व प्रकाशन, मोबाईल 8999732685, 9011087406

परि हरूनि कफवात । जैं देहीं आटोपे पित्त ।
तैं करी संतप्त । देह जेवीं ।। 196 ।। अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ - परंतु कफ व वात यांस मागें सारून जेंव्हा पित्त देहांत व्यापतें, तेंव्हा तें पित्त देहाला जसें संतप्त करतें

शरीर हे विविध रसायनांनी तयार झाले आहे. शरीरात घडणाऱ्या रासायनिक क्रियेतून अनेक द्रव्ये तयार होतात. आहार आणि मानसिक स्थिती यानुसार पित्ताशयात ही द्रव्ये उत्पन्न होतात. यासाठी आहार कोणता घ्यावा याला महत्त्व प्राप्त होते. एखादा रोग झाला तर तो रोग बरा करण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात येते. रोगावर योग्य ते औषध घ्यावे लागते. पोटात दुखत असेल तर गुडघे दुखीवरील औषध घेऊन चालत नाही. डोके दुखत असेल तर पाठदुखीवरील औषध घेऊन चालत नाही. प्रत्येक औषधाचा गुणधर्म हा ठरलेला आहे. शरीरात रोग प्रतिकारक रस उत्पन्न करण्याचे प्रयत्न ही औषधे करतात. जसे प्रत्येक औषधाचा गुण वेगळा आहे. तसा आपण जे पदार्थ खातो त्याचेही गुण वेगळे आहेत. भातातून मिळणारे घटक वेगळे आहेत. भाकरी, चपातीतून मिळणारे घटक वेगळे आहेत. त्या त्या पदार्थांपासून उत्पन्न होणारे रसही वेगळे आहेत. अंडी, मटणातून मिळणारे घटकही वेगळे आहेत. आहारात आढळणाऱ्या घटकातूनच, त्याच्या जडत्त्वेवरूनच कोणता आहार सात्त्विक आणि कोणता आहार तामस आहे हे ठरविले जाते. आहार शरीरात विविध द्रव्ये उत्पन्न करतो. सात्त्विक आहार सात्त्विक द्रव्ये उत्पन्न करतो. तामस आहार शरीरात तामस द्रव्ये उत्पन्न करतो. ही सर्व रसायने पित्ताशयात उत्पन्न होतात. पित्त खवळते म्हणजे पित्तात तामस द्रव्यांचे प्रमाण अधिक वाढते. हे द्रव्य तयार होण्यासाठी मानसिकताही कारणीभूत असते. मनाची स्थिती कशी आहे यावर पाचक शक्ती अवलंबून असते. त्यानुसार पित्त तयार होते. पित्त हे रासायनिक द्रव्य आहे. त्याचा सामू हा समपातळीत रहायला हवा. रागीट व्यक्तींचा सामू ऍसिडिक असतो. पित्त जास्त ऍसिडिक असूनही चालत नाही. पाचकशक्तीवर याचा परिणाम होतो. त्याने डोके दुखते, छातीत दुखते, उलट्या होतात. यावर उपाय म्हणजे पित्त शांत करावे लागते. साधनेने पित्त शांत होते. पित्ताचा सामू समपातळीत ठेवण्यात मदत होते. साधनेत पित्त जळते. त्यातील अनावश्‍यक घटक जळतात. साधनेतून शरीरात उत्तम द्रव्ये उत्पन्न होतात. याचा परिणाम कातडीवर होतो. कातडी उजळते. चेहऱ्यावरील तेज वाढते. पाचकशक्ती सुधारते. मनात शांती उत्पन्न होते. मन उत्साही राहते. एका साधनेने हे साध्य होते. भक्तीने हे साध्य होते. हळूहळू शरीरात सात्त्विक वृत्तीचे पित्त पसरते. सात्त्विक भाव उत्पन्न होतात. मनात शांती उत्पन्न होते. मन स्थिर होते. आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी आवश्‍यक स्थिती उत्पन्न होते. गुरूकृपने मग आत्मज्ञान होते.

छाया






आपणच आपली छाया ओळखायची असते. आपल्या छायेला आपण भ्यायचे नसते. आपले खरे स्वरूप ओळखायचे असते. छाया वस्तूची पडते. देह ही एक वस्तू आहे. या वस्तूत आत्मा आल्याने त्याला चैतन्य प्राप्त झाले आहे. त्याच्यात जिवंतपणा आला आहे. तो नाही तर हा देह निर्जीव आहे. देह आणि देहाची सावली जशी वेगळी आहे. तसा आत्मा आणि देह हा सुद्धा वेगळा आहे.
-  राजेंद्र घोरपडे, 
श्री अथर्व प्रकाशन, कोल्हापूर 
मोबाईल - 8999732685

पैं आपणपेनि जालिया । छाया गा आपुलिया ।
बिहोनि बिहालिया । आन आहे ।। 133 ।। अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ - अर्जुना, आपल्यापासूनच झालेल्या छायेला भ्याले असतां, ती छाया भ्यालेल्या पुरुषाहून कांही वेगळी आहे काय? तर नाही. म्हणजे त्या छायेचें प्रकाशन आपण केले आहे.

पुरातन मंदीराची रचना करताना त्यामध्ये प्रकाश पोहोचेल अशी व्यवस्था केली जायची. त्याकाळात सूर्य, चंद्राच्या प्रकाशा व्यतिरिक्त तेलाच्या दिव्याचाच प्रकाश होता. मंदीरातील मुर्तीपर्यंत प्रकाश पोहोचेल, अशी रचना केली जायची. किरणोत्सार केव्हा होईल, तो केवढा असेल. संपूर्ण किरणोत्सार कधी असेल याचेही गणित मांडले जायचे. सतत केलेल्या संशोधनातूनच अशा रचनांचा जन्म झाला. छाया कधी कशी पडते यावरून सूर्याच्या उत्तरायण, दक्षिणायन याचा शोध लागला. या नोंदीतूनच दिनदर्शिकेचा उदय झाला. छायेच्या नोंदीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला. चंद्रग्रहण, सूर्यग्रहण याचाही अभ्यास झाला. साधुसंतांनी आत्मज्ञानातून अनेक गूढ गुपिते शोधून काढली. आता अनेक गोष्टींचा उलगडा झाल्यानेच आत्मज्ञानाची गरज आता फारशी भासत नाही. चिकित्सक वृत्तीने झालेल्या संशोधनाचा वापर व्यवहारात होऊ लागला. संशोधनाला पुढे व्यापारी स्वरूप आले. आता तर संशोधन विकले जाते. यावर कोट्यावधी रुपयांची कमाई केली जाते. यातून पेटंट कायदा अस्तित्वात आले. संशोधनावर हक्क सांगण्यात येत आहेत. संशोधनाचा आता असा व्यापार होत आहे. आत्मज्ञानाचा शोध घेणारा हा सुद्धा एक संशोधक आहे. पण येथे ते विकत मिळत नाही. त्याचे पेटंटही कोणी विकत देत नाही. त्याचा व्यापारही होत नाही. व्यापारी विचारसरणीमुळे आता आध्यात्मिक संशोधनाला फटका बसला आहे. अध्यात्म हा व्यापार नव्हे. आत्मज्ञान हे सर्वांसाठी आहे. सर्वांचा त्याच्यावर हक्क आहे. सर्वंचजण ते प्राप्त करू शकतात. संशोधनाच्या प्रसारासाठी शिक्षण संस्थांची निर्मिती झाली. तशी अध्यात्माच्या प्रसारासाठी मठ, मंदीरे अस्तित्वात आली. गुरू-शिष्य परंपरा उदयाला आली. आत्मज्ञान हे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मिळवायचे असते. गुरूंच्याकृपेने याचा लाभ होतो. यातूनच भक्तीमार्गाचा उदय झाला. फक्त संशोधक, चिकित्सकवृत्तीने कार्य करणारा शिष्य असायला हवा. येथे आपणच आपली छाया ओळखायची असते. आपल्या छायेला आपण भ्यायचे नसते. आपले खरे स्वरूप ओळखायचे असते. छाया वस्तूची पडते. देह ही एक वस्तू आहे. या वस्तूत आत्मा आल्याने त्याला चैतन्य प्राप्त झाले आहे. त्याच्यात जिवंतपणा आला आहे. तो नाही तर हा देह निर्जीव आहे. देह आणि देहाची सावली जशी वेगळी आहे. तसा आत्मा आणि देह हा सुद्धा वेगळा आहे. देहाची सावली पडते. आत्म्याला सावली नाही. आत्मा वस्तू नाही. त्याचा जन्मही होत नाही व मृत्यूही होत नाही. तो अमर आहे. देह नाशवंत आहे. अमर आत्म्याला जाणणे हेच आत्मज्ञान. या ज्ञानाची प्राप्ती गुरूकृपेने ज्याला होते तो आत्मज्ञानी होतो. ब्रह्मज्ञानी होतो.

Sunday, March 24, 2019

सोऽहम






साधनेच्या क्रियेत श्‍वसनशक्ती सुधारते. हवेत पसरलेले दूरच्या विविध वासांचे कणही सहजपणे ओळखले जातात. या वासाने साधनेत मनाची स्थिरता ढळू शकते. यासाठी शुद्ध हवा अधिक असावी.

जयजय सर्व विसांवया । सोऽहंभावसुहावया ।
नाना लोक हेलावया । समुद्रा तूं ।। 2 ।। अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ - तुम्ही सर्व जगास विश्रांतीस्थान आहांत. "मी ब्रह्म आहे' अशा भावनेस सेवन करविणारे (तुम्ही आहांत) तुम्ही अनेक लोकरूपी लाटांचे समुद्र आहांत, तुमचा जयजयकार असो.

पूर्वीच्या काळी साधनेसाठी शांत जागेचा शोध घेतला जायचा. अनेक साधुसंत यासाठी गुहेमध्ये राहायचे. जेथे आवाजाच्या कोणत्याही लहरी पोहोचत नाहीत अशा जागेची निवड केली जात असे. उद्देश हाच होता की साधना सुरू असताना एखादा आवाज झाला तर, त्यामुळे साधना भंग होऊ नये. आता काळ बदलला आहे. नव्या पिढीला गुहेमध्ये जाऊन राहाणे शक्‍य होणारे नाही. काही नव्या पिढीतील संतांच्या समाधी मंदीरात ध्यान गुंफा आहेत. अशा ध्यान गुंफात काही ठराविक काळात साधनेच्या सुविधा उपलब्ध आहेत. सध्या सुरक्षेचा विचार करता आता चोवीस तास अशा गुंफा साधनेसाठी खुल्या ठेवणेही शक्‍य नाही. अनेक नको ते प्रकार अशा कक्षांमध्ये घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सध्या नागरिकांवर विश्‍वास ठेवणे कठीण झाले आहे. नव्यापिढीत अशा प्रकारामुळे आध्यात्मिक विचार रुजणे कठीण आहे. त्यातच नव्या पिढीच्या प्रत्येक शंकेचे निरसन करावे लागते. तरच ते विचार पटतात. शंका जरूर असाव्यात. त्यांचे निरसनही योग्य प्रकारे व्हायला हवे. साधना करताना धूप जाळावा, उदबत्ती लावावी, सुगंधी द्रव्ये शिंपडावीत. याची गरज काय? अशा ना-ना शंका नवी पिढी विचारते. तसे साधनेसाठी या गोष्टींची काहीच गरज नाही. हे त्यांचे मत बरोबर आहे. पण हे का केले जात होते. याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. सोऽहम साधना करताना श्‍वास नियंत्रित करायचा आहे. आत जाणारा प्राणवायू शुद्ध असावा यासाठी परिसराची स्वच्छता ही गरजेची आहे. साधनेच्या क्रियेत श्‍वसनशक्ती सुधारते. हवेत पसरलेले दूरच्या विविध वासांचे कणही सहजपणे ओळखले जातात. या वासाने साधनेत मनाची स्थिरता ढळू शकते. यासाठी शुद्ध हवा अधिक असावी. सुवासिकता अधिक असावी जेणेकरून याचा साधनेमध्ये व्यत्यय येऊ शकणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. पूर्वीच्या काळातील उदबत्ती किंवा धूपाची प्रत सध्या बाजारात असणाऱ्या धुपात नाही यामुळे तसे पाहता साधनेसाठी आता या गोष्टी निरुपयोगीही ठरत आहेत. काहींना यामध्ये साधना करताना ठसका लागतो. एकंदरीत काय तर साधना करताना व्यत्यय येणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. मनाची स्थिरता साधण्यासाठी आवश्‍यक त्या उपायांना प्राध्यान्य द्यायला हवे. काहींना आवाजात झोप लागत नाही. पण काही मात्र कितीही मोठा आवाज होत असला तरी त्यांना पडल्या पडल्या झोप लागते. असे का? आवाजाचा मनावर होणारा परिणाम कसा आहे, यावर त्या गोष्टी अवलंबून आहेत. मनाने ठरवले तो आवाज ऐकायचे नाही. तर ते शक्‍य आहे. मन सोऽहमवर स्थिर झाल्यानंतर आपोआप त्यात येणारे व्यत्यय हे दूर होतात. फक्त मनाला त्याची सवय व्हायला हवी. साधनेने हे सहज साधता येते.

डाॅ. यशवंत पाठक यांनी कृषि ज्ञानेश्वरीस दिलेली प्रस्तावना



कृषी विषयक ज्ञानेश्वरीतील ओव्या घेऊन लिहिलेल्या पुस्तकास संत साहित्याचे गाढे अभ्यासक डाॅ. यशवंत पाठक यांची प्रस्तावना लाभली. आता सध्या ज्ञानेश्वरीतील असे विविध पैलू मांडण्याची गरज असल्याचे यावेळी डाॅ. पाठक म्हणाले होते.  पर्यावरण संदर्भातील ज्ञानेश्वरीतील ओव्या शोधून त्यांनी वनराईचे मोहन धारीया यांना दिल्याचेही या निमित्ताने सांगितले. त्यांच्या सहवासामध्ये खूप काही शिकण्यास मिळाले. असा हा गाढा अभ्यासक आपणातून निघून गेल्याने खूप दुःख होत आहे. असा अभ्यासक आणि मार्गदर्शन फार क्वचितच घडतो.  डाॅ. पाठक यांना भावपूर्ण श्रद्धाजली. त्यानिमित्ताने त्यांनी कृषी ज्ञानेश्वरीस दिलेली प्रस्तावना खास आपल्यासाठी....


ज्ञानेश्‍वरीतील विशिष्ट ओव्या निवडून कृषि जीवनाचा शोध श्रीयुत राजेंद्र घोरपडे यांनी या पुस्तकात केला आहे. सद्‌गुरू दादा महाराज सांगवडेकर यांची कृपा त्यांच्यावरची आहे. ज्ञानेश्‍वरी हा त्यांच्या अभ्यासाचा ग्रंथ आहे. ज्ञानेश्‍वरीतील ओव्या कशारीतीने लावावयाच्या असतात, याविषयी त्यांना अभ्यासाची ओढ आहे. या संदर्भात त्यांनी अभ्यासही केलेला आहे. ते पत्रकार असल्यामुळे त्यांना वर्तमानातील संदर्भ सहज मिळालेले आहेत. याबाबतीत त्यांनी सेंद्रिय शेतीसाठी अनेक संस्थामध्ये सुरू प्रयोगासही भेटीही दिल्या आहेत.
 

या ओव्यांमधून श्री. घोरपडे यांनी शेती आणि शेतकऱ्यांचे जीवन यांचा विचार केलेला आहे. शेतकऱ्यांचे जीवन ऋृतूंवर अवलंबून आहे. त्याला कधीही रजा घेता येत नाही. प्रत्येक ऋतूत त्याला काम करावे लागते. शेतीतील अडचणींना सामोरे जावे लागते. हे सर्व जरी असले तरी शेतीमधील निष्ठा महत्वाची आहे. शेतात काही पिकले नाही तर शेतकरी उपाशी राहील. त्यामुळे शेती हा मानवी जीवनाचा फार मोठा आधार आहे. शेतीबरोबर गोधनाचे महत्त्व ज्ञानदेवांनी ज्ञानेश्‍वरीत वेळोवेळी वर्णिले आहे. मातीला "आई' इतके जपावे लागते. त्या-त्या पिकाला नेमके पाणी घालावे लागते. जमिनीचा पोत बिघडता कामा नये. याची काळजी घ्यावी लागते. या साऱ्यांच्या मुळाशी ज्ञानदेवांनी एक मूलभूत तत्त्व सांगितले आहे. पिकाला मुळाशी पाणी दिले तर ते सगळ्या अंगांनी वाढते. त्यासाठी ठिबक सिंचन पद्धत उपयोगाची आहे. पक्षी हा पक्व पळाला झोंबतो. त्याचा आश्‍वास घेतो. परंतु, त्याआधी तो खूप विचार करतो. माणसाला फक्त आयते फळ हवे असते. पावसाळा सांभाळण्यासाठी विविध वृक्ष लावावे लागतात. शेती करताना प्राण्यांना आणि सृष्टीला सांभाळून घ्यावे लागते. गवतामुळे जमिनीची धूप कमी होते. गणपतीला दूर्वा वाहण्याच्या निमित्ताने मातीचे संवर्धन करावे. हा विचार महत्त्वाचा आहे.
 

नगरे रचावी. निर्मळ जलाशये निर्माण करावीत. महावने लावावी. यामुळे आरोग्य आणि समाजस्वास्थ उत्तम राहाते. जलाशयाची जपणूक मोलाची आहे. निर्मळ जलाशये हे नगराचे हृद्‌य आहे. पाणी जर जपले तरच उन्हाळा सुसह्य होतो. ज्ञानेश्‍वरांनी वड, पिंपळ, कडुनिंब, औदुंबर, चिंच, आंबा या साऱ्या वृक्षांचे महत्त्व सांगितले आहे. वड हा साधनेचा वृक्ष आहे. पिंपळ हा कर्मयोगाचे भान देणारा वृक्ष आहे. औदुंबर हा भक्तीचा अनुभव देणारा वृक्ष आहे. कडुनिंब हा कर्तव्य तत्परतेचा संदेश देणारा वृक्ष आहे. तर, चिंचेचे झाड प्रेम आणि बंधुतेची सावली देणारा वृक्ष आहे. ज्ञानदेवांना हे सारे वृक्ष योगी वाटतात. हे वृक्ष म्हणजे शेतातील देवळे आहेत. या साऱ्यातून जे वात्सल्य निर्माण होते ते ज्ञानदेवांना अत्यंत प्रिय आहे. वासराला बघितल्यावर गाईला पान्हा फुटतो. हे विलक्षण वात्सल्य ज्ञानदेवांना देवाचे रूप वाटते. याचा ते विशेषत्वाने नेहमी उल्लेख करतात.
 

धान्य निवडावे लागते. भुसा बाजूला काढावा लागतो. सशक्त देशी वाणांचे धान्य निर्माण करणे आणि समाजाला पौष्टिक अन्न देणे ह ज्ञानदेवांना आवडते. शेतीतला भाजीपाला फार काळ टिकत नाही. त्यामुळे भाजीपाल्याची आवक बऱ्यापैकी घ्यावी लागते. उसापासून गूळ, साखर तयार होते. दुधापासून दही, लोणी तयार होते. आंब्यापासून रस, वड्या तयार होतात. कैरीचे लोणचे आणि मुरांबे तयार होतात. हे सगळे पदार्थ तो आळी-पाळीने चवीने खातो. त्यामुळे विविध उद्योगांना वाव मिळतो. पक्ष्यांमुळे शेती सुखरूप राहते. शेतातले किडे पक्षी नाहीसे करतात. लालभडक गाजरे दिसायला सुंदर असतात. पण देशी गाजराची गोडी त्याला नाही. फळे नुसती दिसायला सुंदर असून चालत नाही, त्याची चवही तितकीच सुंदर असावी लागते. काही फळे वरवर सुंदर पण बिनचवीची असतात. त्यात माणसे फसतात. म्हणून आरोग्याला उत्कृष्ट असणारा भाजी- व्यापार आणि फळ व्यापार आपण निर्माण केला पाहिजे. 

वृक्षतोड झाल्याने घरटी नष्ट होतात. पक्षीही नाहीसे होतात. वृक्षतोड झाल्याने घरटी नष्ट होतात. पक्षीही नाहीसे होतात. यासाठी पक्ष्यांना आवडेल असे धान्य त्यांच्या आसपास ठेवले पाहिजे. यामुळे निसर्ग स्वच्छ राहातो. गाई समाधानाने वावरतात. पशुपक्षी समाधानाने वावरतात. त्यासाठी कष्ट करावे लागतात. जे मनापासून कष्ट करतात ते मोठे होतात. कष्टातून आणि अनुभवातून माणूस खूप शिकतो. तोच खरा कर्मयोग असतो. म्हणून माउलींनी कष्टमय जीवनाला महत्त्व दिले आहे. अरण्यात वणवा पेटला की, तो पेटतोच. त्यासाठी एकच उपाय असतो. तो म्हणजे, वणवा लागेल असे काहीही न करणे. अरण्यात वणवा पेटला की, तो पेटतोच. त्यासाठी एकच उपाय असतो. तो म्हणजे वणवा लागेल असे काहीही न करणे. अरण्यात काही प्रमाणात ओलावा ठेवणे. लसूण उग्र असला तरी प्रकृतीला उपकारक असतो. पिकांवरील कीड घालविण्यासाठी लसणाचा उपयोग करतात.
 

ज्ञानेश्‍वरीत शेतीच्या सुबोध दृष्टांतातून जगण्याची परिणामकारकता सूचित केली आहे. मऊ जमीन ओळखण्याची खूण म्हणजे मातीतून सहज अंकुर फुटतो. त्याप्रमाणे मनाला संस्काराचा ओलावा मिळाला की, ते मन सुंदर होते. त्याला चंगलवाद बाधत नाही. त्याला पैशाची किंमत कळते. तो कधीही पैसे उधळत नाही. म्हणून मनाला सुसंस्कारित करण्यासाठी ज्ञानेश्‍वरीचे मनन करणे आवश्‍यक आहे. चांगले बियाणे असेल तरच शेत उत्तम पिकते. म्हणून शेतकरी चांगल्या बियाण्यांच्या शोधात असतो. बीज असे शुद्ध असेल, तर फळ उत्कृष्ट येते. ज्ञानदेवांनी शेतीच्या उदाहरणामधून हे सांगितले आहे.
 

श्रीयुत घोरपडे यांनी यानिमित्ताने आजच्या काळात ज्ञानेश्‍वरीच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष वेधले आहे. यातून दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत. पहिला म्हणजे कष्टपूर्वक केलेले कोणतेही चांगले काम देवपूजा ठरते. दुसरा म्हणजे आपण नेहमी शुद्ध मनाने सत्कर्म केले की, त्यांच्या पाठीशी माउली उभी राहाते. आजही आम्हाला माउली हवी आहे. हे लक्षात आले म्हणजे, या पुस्तकाचे महत्त्व सहज कळते.

- डॉ. यशवंत पाठक

अनुभव ज्ञानेश्वरीस डाॅ. यशवंत पाठक यांची प्रस्तावना..






संत साहित्याचे गाढे अभ्यासक, पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानदेव अध्यासनाचे माजी प्रमुख, ज्येष्ठ लेखक व निरूपणकार प्रा. डाॅ. यशवंत पाठक यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धाजली.  त्यांनी माझ्या (राजेंद्र घोरपडे) अनुभव ज्ञानेश्वरी या पुस्तकास प्रस्तावना दिली होती. ती प्रस्तावना...

विवेकाचे गाव 


आदरणीय सद्‌गुरू दादा महाराज सांगवडेकर यांच्या परिवारातील ज्ञानेश्‍वरीचे अभ्यासक माननीय राजेंद्र घोरपडे यांचे अनुभव ज्ञानेश्‍वरी हे पुस्तक वाचले. घोरपडे हे सकाळ मध्ये उपसंपादक आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांची भ्रमंती आहे. ते ज्ञानेश्‍वरीचे अभ्यासक आहेत. साधक ही आहेत. माननीय रामराया सांगवडेकर यांच्या सहवास त्यांना लाभला आहे. तो मौलिक आहे. आजच्या काळात ज्ञानेश्‍वरी कशी अनुभविता येईल याविषयीचे ललित चिंतन या पुस्तकात आहे. ज्ञानेश्‍वरीतील निवडक ओव्यांच्या आधारे केलेले हे चिंतन, छोटे खानी असले, तरी त्याला मनाने समजून घेण्याचा अवकाश फार मोठा आहे.

हे पुस्तक विवेकाला अनुसरून आहे. गावात विवेक जागा असेल, तर सर्व प्रश्‍न सुटतात. त्यासाठी अहंकार नाहीसा करावा लागतो. श्रमदानातून आणि विनम्रवृत्तीतून एकी निर्माण होते. शरीराचे आणि मनाचे आरोग्य सुधारते. शरीराच्या उगाचच कष्टविण्याचे कारक नाही. गुरुकृपेने असा विवेक प्राप्त होतो. त्यागाची भावना म्हणजे संन्यास होय. देहातील विविध रसायनयुक्त असा देह बनतो. त्याच्यात आत्मचैतन्य येते.  हा विज्ञानाचा भाव नीट अभ्यासला पाहिजे. तरच आत्मज्ञानाचा अनुभव येतो. आत्मज्ञानाच्या विकासासाठी मठ किंवा शिवालय असते. आज मात्र मठांमध्ये तंटे निर्माण झाले आहेत. विविध देवालयातील विश्वस्तांना आपली खुर्ची सांभाळण्याची काळजी लागली आहे. यावर ज्ञानदेवांनी अत्यंत महत्त्वाचा उपाय सुचविला आहे. तो म्हणजे, विवेक शक्ती वाढविणे हा होय. त्यासाठी ध्यानाची आवश्‍यकता आहे. मनाच्या एकाग्रतेतून ध्यानाच्या वाटा दिसू लागतात. त्यावर वाटचाल करणे एकूणच अवघड असते. गुरुसेवेतून अशा वाटा सहज होतात. मनाचा अभ्यास नीट होतो. साध्या-साध्या दैनंदिन जीवनातून या गोष्टी समजून घेता येतात. आजच्या सुसाट जीवनात याची गरज आहे. ते घोरपडे यांनी परिणामकारकपणे सांगितले आहे. मनाला अध्यात्माची गरज आहे. शरीराला आयुर्वेदाची गरज आहे. मनाला गुरुसेवा जरुरीची आहे. शरीराला खिलाडूपणा आवश्‍यक आहे. यासाठी उत्कृष्ट कर्मे ही महत्त्वाची आहेत. नित्यकर्म ही देवपूजा मानायला हवी. त्यासाठी प्रत्येकाला ज्ञानाचा हक्क आहे. हे ज्ञान वारसा हक्काने क्वचित मिळते. ज्ञानातून आत्मज्ञान मिळाले, की मनाला आनंद मिळतो. सुख क्षणिक असते. आनंद चिरंजीव असतो.

ज्ञानेश्‍वरीतील अनुभव विश्‍व समृद्‌ध आहे. ते आजही मनास धैर्य देते. विश्‍व म्हणजे वर्तमानातील जाणिवांचा समूह. जाणीव नेहमी वर्तमानाला पूरक असते. विवेकाला जाणिवेची बैठक लागते. मनाला विचार करण्याची सवय जडते. असे विचार सक्रिय असतात. यातून मानवी निर्णय चांगले ठरतात. सत्याचा आग्रह गरजेचा ठरतो. यातून अहिंसा अनुभवता येते. स्वतःमध्ये गुण असतील तर, अहिंसेला मूल्य प्राप्त होते. तेच देवाचे रूप असते. अध्यात्म ही सेवा आहे. सेवाभाव विश्‍व जिंकू शकतो. गंगेचे पाणी साऱ्यांना स्वच्छ करते. त्याप्रमाणे शुद्ध मन अनेकांना स्वच्छ करते, आपले कर्तव्य-कर्म चोख केले की, माणसाला देवपणाचा अनुभव येतो. घोरपडे यांना समर्थाचिया पंक्तिभोजनें या ओवीत समान नागरी कायदा जाणवला. विठ्ठलाच्या दर्शनाला वेगळी रांग नाही. त्याप्रमाणे आत्मज्ञानात वेगळी रांग नसते. ती एक विशिष्ट दृष्टी असते.

या पुस्तकात अनेक चिंतनशील विचार आहेत. यातून ज्ञानेश्‍वरीकडे वेगळ्या दृष्टीने बघता येते. अंतरंग शुद्ध राखणे आणि अंहतेला थारा न देणे या महत्त्वाच्याबाबी आहेत. हे ध्यानात येण्यासाठी हे पुस्तक वाचावे. ते मन शुद्ध करील. आपणही शुद्धीवर येऊ. संवेदनशील मनाला हे पुस्तक आवडावे. सुबोध वाक्‍ये, सुलभ निरूपण, श्रद्धा युक्त मन या लेखातून व्यक्त होते. आजचा वर्तमान निवांत मनाने कसा जगता येईल ते या पुस्तकातून कळते. श्रध्देतून मिळणारी डोळस जाणीव विवेकाचा गाव निर्माण करते. या गावात विशुद्ध मी आनंदाने राहतो. त्याच्याशी बोलायला माऊली येते. तो जगण्यातून नवा होतो. त्याच्या आत्मज्ञानाला बहर येतो. शांतवृत्तीतून तो मनाचा नंदादीप लावतो. देवाशी बोलताना, त्याच्या मनाला भरती येते. निष्काम कर्मातून तो गगनभरारी घेतो. त्याच्या प्रत्येक कृतीला माऊली सोबत करते. तो तृप्त होतो. हा अनुभव या पुस्तकातून श्रीयुत राजेंद्र घोरपडे यांनी दिला. तो त्यांनी आपल्याला प्रसाद म्हणून वाटला. हे भाग्य ज्याला मिळेल, त्याला सारे काही मिळेल. याबद्दल श्रीयुत घोरपडे यांचे अभिनंदन. त्यांना पुढील लेखन प्रवासासाठी शुभेच्छा.

- डॉ. यशवंत पाठक

Saturday, March 23, 2019

सात्त्विकाचा पान्हा






धर्म रक्षणाच्या नावाखाली वेगळेच विचार पसरवून समाजात दुफळी निर्माण केली जात आहे. तोडा, फोडा आणि राज्य करा, हाच उद्योग केला जात आहे. अशा विचारांना आता सात्विकतेचा पान्हा फोडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. दूषित विचारांच्या वातावरणात आत्मज्ञानाचा प्राणवायू सोडणारे वृक्ष लावण्याची गरज आता भासत आहे.
- राजेंद्र घोरपडे, उपसंपादक, ईसकाळ,
श्री अथर्व प्रकाशन, कोल्हापूर,
मोबाईल - 9011087406

खेचराचियाही मना । आणि सात्त्विकाचा पान्हा ।
श्रवणासवें सुमना । समाधी जोडे ।। 1158।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - पिशाच्चादि अज्ञानी योनी आहेत, पण त्यांसही माझे शब्द सत्त्वगुणाचा पान्हा फोडतील आणि शुद्ध अंतःकरणाच्या लोकांना तर, माझे शब्द ऐकल्याबरोबर समाधि लागेल.

ंमंदिरात पहाटे पाच वाजता नियमाने मंत्रपुष्पांजली असायची. सकाळच्या प्रसन्न वातावरणात ही पुष्पांजली मनाला प्रोत्साहित करायची. अभ्यासासाठी उठणारा विद्यार्थी या मंत्रांने उत्साहित होत असे. अनेक मंदीरात सकाळच्या या आरत्यांनी वातावरण प्रसन्न होत असे. काही वर्षापासून मात्र यात बदल झाला आहे. काही ठिकाणी ही पुष्पांजली बंदच झाली आहे. सुरू असली तरी त्यात नियमितता राहिलेली नाही. काही ठिकाणी आरत्या होतात. पण त्यामध्ये प्रसन्नता उत्पन्न करणाऱ्या घटकांचा अभाव दिसत आहे. नेमके हे कशाने झाले? हवेतील वातावरणात बदल झाला आहे. पण प्रदूषणाचा हा परिणाम आहे असे म्हणता येणार नाही. दैनंदिन जीवनात बदल झाला आहे. कामाचा ताण वाढला आहे. याचा परिणाम जरूर आहे. पण कामाचा ताण, थकवा दूर करण्यासाठीच तर मंदीरात जाणे असायचे. नित्य-नियमाने साधना, धार्मिक ग्रंथ वाचले जायचे. मग हा बदल झाला कसा? गेल्या काही वर्षात धार्मिक ग्रंथांत काही वादग्रस्त मुद्दे घेऊन वातावरण तापविण्याचे प्रयत्न झाले. धार्मिक तेढ निर्माण करण्यात आली. धर्म ग्रंथांना चुकीचे ठरविणारे विचार पसरविण्यात आले. सातत्याने हे असे केलेही जात आहे. असे धार्मिक वादविवाद निर्माण करून त्यांना यामागे नेमके काय साधायचे आहे, हे त्यांनाच माहीत. पण हा बदल झाला आहे. शंकराचार्यांचे पीठासन अधिकारीही आता भडकवणारी व्याख्याने देत आहेत. वादग्रस्त विचारांवर चुकीची वक्तव्ये करून नागरिकांची मने पेटवली जात आहेत. वक्तव्य भडकावू केले तर भडका हा उडणारच. काही वेळेला भडका उडला नाही, पेट घेतला नाही तरी त्यामध्ये असणारी ही आग धुमसत राहाते. धुमसणारी ही आग प्रसन्न वातावरण दूषित करत आहे. सध्या हेच तर झाले आहे. नको त्या विचारांनी वातावरण प्रदूषित झाले आहे. मंदीराचे प्रसन्न वातावरण वेगळ्या विचारांनी दूषित झाले आहे. वारकरी संप्रदायामध्येही असेच वातावरण दूषित करण्यात आले आहे. हे प्रकार पूर्वीच्या काळीही घडले जायचे. धर्माच्या वापर राजकारणासाठी केला जायचा. पण त्यावेळी धर्म रक्षण, सात्त्विक विचारांचे रक्षण याला प्राधान्य दिले जायचे. आता मात्र तसे होताना दिसत नाही. धर्म रक्षणाच्या नावाखाली वेगळेच विचार पसरवून समाजात दुफळी निर्माण केली जात आहे. तोडा, फोडा आणि राज्य करा, हाच उद्योग केला जात आहे. अशा विचारांना आता सात्विकतेचा पान्हा फोडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. दूषित विचारांच्या वातावरणात आत्मज्ञानाचा प्राणवायू सोडणारे वृक्ष लावण्याची गरज आता भासत आहे. संतांनी हेच केले. भांडत बसून त्यांनी ऊर्जा वाया घालवली नाही. खेचराच्या मनालाही सात्विकतेचा पान्हा फोडण्याचे सामर्थ याचमुळे त्यांना प्राप्त झाले.

Friday, March 22, 2019

शास्त्ररूपी दुभत्या गायी



पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे काम आपलेच आहे. साधुसंतांनी याबाबत नेहमीच प्रबोधन केले आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे म्हणणारे संत तुकाराम यांनी याचेच तर प्रबोधन केले. शास्त्रामध्येही दुभत्या जनावरांचा सांभाळ करा असाच सल्ला दिला आहे. संत ज्ञानेश्‍वरही हेच सांगतात. ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक स्रोत ही दुभती जनावरे मिळवून देतात.

- राजेंद्र घोरपडे, उपसंपादक, ई सकाळ
श्री अथर्व प्रकाशन, कोल्हापूर 
मोबाईल - 9011087406

 याचिलागीं सुमती । जोडिती शांतिसंपत्ती ।
शास्त्रांचीं दुभतीं । पोसिती घरीं ।।1130।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - चांगल्या बुद्धीचें लोक ह्याचकरितां शांतिरूप संपत्ति मिळवितात व शास्त्ररूपी दुभत्या गायी घरी पोसतात.

देशी गायी कमी दूध देतात. वाढत्या महागाईत भाकड जनावरांना सांभाळणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. साहजिकच देशी गायींची जागा आता संकरित दुधाळ गाईंनी घेतली आहे. पण देशी गायीचे महत्त्व आजही अनन्य साधारण आहे. त्यांचे पालनपोषण करणे हे आज गरजेचे आहे. देशी गायीच्या दुधात, गोमुत्रात अनेक औषधी गुणधर्म आहेत. देशी गायीचे तूपही औषधी आहे. संधीवातासारख्या अनेक असाधारण रोगांवर गोमुत्रातून आयुर्वेदिक औषधे देण्यात येतात. या गायीचे वैशिष्ट म्हणजे ती सकाळी एकदाच गोमुत्र देते. म्हणजे ती इतर वेळी कोणत्याही प्रकारची घाण करत नाही. तिच्या या सवयीमुळे तिचे संगोपन करणेही सोपे आहे. स्वच्छ राहणे व इतरांनाही स्वच्छ करणे हा तिचा गुण आहे. कीडनाशक म्हणूनही तिच्या गोमुत्राचा उपयोग केला जातो. तिचे हे महत्त्व ओळखूनच पूर्वीच्या काळी साधूसंतांनी तिचे संगोपन केले. पण बदलत्या काळात दूध उत्पादनाचा विक्रम ही गाय करू शकत नसल्याने आता ती टाकाऊ झाली आहे. आकडेवारीचे विक्रम गाठण्याच्या नादात दुधाची प्रत खालावत चालली आहे. याचा विचार कोणी करतच नाही. उत्पादनाचा विक्रम करण्यापेक्षा उत्तम प्रतीचे दूध आणि उत्पादने देण्याचा देशी गायीचा गुण जोपासणे गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे उत्पादन वाढणे ही काळाची गरज आहे. पण त्या बरोबर मालाची प्रतही सुधारणे गरजेचे आहे. टिकावू मालाचे उत्पादन आज बाजारात होत नाही. वीसवर्षापूर्वी अनेकांच्या घरात फ्रिज नव्हते. तरीही दूध, फळे, भाजीपाला उत्तम राहायचे. आता फ्रिज असूनही एकादिवसातच हा भाजीपाला सुकून जातो. मग फ्रिजने दिले काय? फक्त थंड ठेवण्याचे कार्य त्याने केले. पण विजेचे बिलही वाढविले आहे. अशी ही महागाई वाढत आहे. बदलत्या काळातील गरज म्हणून आपण याचा स्वीकार करत आहोत. वाढते तापमान विचारात घेऊन हा बदल आपण स्वीकारत आहोत. पण या बदलत्या तापमानास कोण कारणीभूत आहे. आपणच ना? पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे काम आपलेच आहे. साधुसंतांनी याबाबत नेहमीच प्रबोधन केले आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे म्हणणारे संत तुकाराम यांनी याचेच तर प्रबोधन केले. शास्त्रामध्येही दुभत्या जनावरांचा सांभाळ करा असाच सल्ला दिला आहे. संत ज्ञानेश्‍वरही हेच सांगतात. ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक स्रोत ही दुभती जनावरे मिळवून देतात. बैल, भाकड जनावरांच्या बरोबरच आता दुभत्या जनावरांचीही संख्या घटत आहे. याकडे गांभीर्याने पाहाण्याची गरज आहे. नव्या पिढीला आता कष्टाचे काम नको आहे. ग्रामीण भागातील तरुण कमी कष्टाचा रोजगार शोधत आहेत. जनावरे सांभाळणे हे कष्टाचे, कमी पणाचे लक्षण मानले जात आहे. पण आर्थिक स्त्रोत्राचा विचार करून तरी नव्या पिढीने सुधारित तंत्राने दुभती जनावरे सांभाळण्यावर भर द्यायला हवा.

शब्दतत्त्वसारज्ञा


सोऽहम आपणास देह आणि आत्मा वेगळा आहे याची अनुभूती देतो. देहात आत्मा आला आहे. देहात आल्याने तो जन्मला असा भास आपणास होतो. आत्मा देहात आल्याने देहाला चैतन्य आले. देह सजीव झाला. अन्यथा तो निर्जीव आहे.

शब्दतत्त्वसारज्ञा । पैं देखणी तेचि प्रज्ञा ।
जे क्षेत्रा क्षेत्रज्ञा । अपाडु देखे ।। 1128।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - हे शब्दांच्या खऱ्या खऱ्या स्वरूपाचें मर्म जाणणाऱ्या अर्जुना, तीच बुद्धि डोळस कीं, जी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील अंतर पाहते.

शब्दतत्त्वसारज्ञा अशी अर्जुनाची प्रशंसा संत ज्ञानेश्‍वरांनी येथे केली आहे. अर्जुन कसा आहे? याचा उल्लेख संत ज्ञानेश्‍वरांनी अनेक ठिकाणी ज्ञानेश्‍वरीत केला आहे. अर्जुन शब्दातील खरे खुरे स्वरूप जाणणारा असा आहे. मराठी भाषा कशी मोडाल तशी मोडते. एकाच शब्दाचे दोन दोन अर्थ काढता येतात. प्रसंग कसा आहे त्यानुसार त्याचा अर्थ लावला जातो. कोणता अर्थ स्वीकारतो, यावर त्याची विचारसरणी स्पष्ट होते. शब्दाचा अर्थ तो चांगला घेतो की अश्‍लील यावर त्याच्या मनाची पारख करता येते. शब्दाचे खरे स्वरूप जो जाणतो तो शब्दतत्त्वसारज्ञ. कृष्ण अर्जुनाला गीता सांगत असताना संजयाच्या माध्यमातून ती धृतराष्ट्रासही सांगितली जात होती. अर्जुनावर जो परिणाम झाला तो मात्र धृतराष्ट्रावर झाला नाही. शब्द तेच होते पण परिणाम वेगवेगळे झाले. यासाठी शब्द आपण कसे स्वीकारतो यावर बरेच काही अवलंबून आहे. सुन्न करणारी शांतताही मन मात्र अशांत करते. आपणास शांत बसण्यासाठी शांतता हवी असते. पण अति शांतता ही कधीकधी मनाची शांतता भंग करू शकते. शांतताच येथे अशांती निर्माण करते. मन कसा विचार करते, यावर शांततेचे कार्य ठरते. कोणी दंगा घालत असेल तर ध्यानात व्यत्यय येतो. पण हा दंगा आपण स्वीकारलाच नाही तर ध्यान भंग पावणार नाही. मोठ मोठे आवाज होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून आपण ध्यान करू शकतो. मनाला तशी सवय लावावी लागते. ध्यानात फक्त "सोऽहम' चा नादच ऐकायचा असतो. तशी मनाला त्याची सवय लावावी लागते. या स्वरात मग्न व्हायला शिकले पाहिजे. मन चंचल आहे. पण अभ्यासाने या चंचल मनाला स्थिर करता येते. अर्जुन हा नेमबाज होता. अचूक लक्ष्य साध्य करायचा. पण यासाठी मनाची स्थिरता असावी लागते. मन चलबिचल असेल तर नेम चुकू शकतो. चंचल मनाला स्थिर करावे लागते. अर्जुन यासाठी पहाटे उठून साधना करायचा असा उल्लेख पुराणात आढळतो. साधनेने मनाची स्थिरता साधता येते. साधना करतो म्हणजे नेमके काय करतो? सोऽ हम या शब्दाचे स्वर ऐकतो. मनात त्याचे पठण करतो. त्यावर मन केंद्रित करतो. पण या शब्दाचे खरे स्वरूप काय आहे? हे जो ओळखतो तो शब्दतत्त्वसारज्ञ. सोऽहम शब्द काय सांगतो? काय दशिवतो? यामधून काय स्पष्ट होते? सोऽहम आपणास देह आणि आत्मा वेगळा आहे याची अनुभूती देतो. देहात आत्मा आला आहे. देहात आल्याने तो जन्मला असा भास आपणास होतो. आत्मा देहात आल्याने देहाला चैतन्य आले. देह सजीव झाला. अन्यथा तो निर्जीव आहे. मरणानंतर देह जर तसाच पडला तर त्याला किडे लागतात. पक्ष्यांचे तो खाद्य होतो. यासाठी देहात आत्मा असतानाच तो वेगळा आहे याची अनुभूती घ्यायला हवी. जन्माचे सार्थक कशात आहे? आत्मज्ञानी होण्यातच जन्माचे सार्थक आहे. पण यासाठी संसाराचा त्याग करण्याची गरज नाही. संसारात असतानाही फक्त हे आत्मा आणि देह वेगळा आहे हे जाणता येते. अनुभवता येते.

Wednesday, March 20, 2019

अंगारकणीं



मनुष्याला येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी त्याने वारंवार संशोधन करून नवनवे तंत्रज्ञान आत्मसात केले. पण मानव जसजसा प्रगत होऊ लागला तसा त्याच्या विचारात, आचारातही फरक पडत गेला. अनेक प्रश्‍नावर त्याने उत्तरे जरूर शोधली. पण या विकासाने त्याच्या भौतिक प्रगतीचा वेग वाढला.

अंगारकणीं बहुवसीं । उष्णता समान जैसी ।
तैसी नाना जीवराशीं । परेशु असे ।।1062।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - निखाऱ्याच्या अनेक ठिणग्यांतून उष्णता जशी एकसारखी असते, त्याप्रमाणें अनेक जीवराशीतून एक परमात्मा आहे.

पूर्वीच्याकाळी घरात पेटता विस्तव ठेवला जायचा. आगपेटी त्यावेळी नव्हत्या. दगडावर दगड घासून विस्तव पेटवला जायचा. त्यामुळे पेटत्या अग्नीची गरज भासायची. यासाठीच पेटता विस्तवर घरात किंवा मंदिरात ठेवला जायचा. देवघरात नेहमीच हा अग्नी असायचा. आता काळ बदलला आहे. चुलीची गरज आता संपली आहे. गॅसच्या शेगडीने आता त्याची जागा घेतली आहे. लायटरची एक ठिणगीही आता गॅसची शेगडी प्रज्वलित करू शकते. आगपेटीचा शोध लागल्यानंतर मुख्यतः या देवघरातील धुनीची गरज संपली. विस्तवाच्या एका ठिणगीसाठी सतत लाकडे पेटत ठेवायची गरज होती. पण आगपेटी शोधाने याची गरज संपली. मनुष्याला येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी त्याने वारंवार संशोधन करून नवनवे तंत्रज्ञान आत्मसात केले. पण मानव जसजसा प्रगत होऊ लागला तसा त्याच्या विचारात, आचारातही फरक पडत गेला. अनेक प्रश्‍नावर त्याने उत्तरे जरूर शोधली. पण या विकासाने त्याच्या भौतिक प्रगतीचा वेग वाढला. सातत्याने तो वाढतच चालला आहे. पूर्वी वर्षे, महिनोनमहिने भेटीगाठी होत नसत. बरीच वर्षे एखाद्याची टक लावून वाट पाहावी लागायची. प्रगती होत गेली तसा या कालावधीतही फरक पडला. महिन्याचा कालावधी दिवसांवर आला. नंतर काही तासांवर आला. पुढे काही मिनीटावर आला. आता तर तो सेकंदावर आला आहे. भेटला नाहीस ठीक आहे. पण फोनच्या माध्यमातून सेकंदात संपर्क होऊ लागला आहे. या बदलत्या परिस्थितीत विचारही तितकाच वेगाने बदलतो आहे. विस्तवाचा एक कण सगळे जंगल भस्मसात करू शकतो. पण तोच विस्तव आपणाला चूल पेटवण्यासाठीही लागतो. गॅस पेटविण्यासाठी लायटर लागतोच ना? ठिणगीचा उपयोग कसा करायचा हे आपल्या हातात आहे. काय पेटवायचे हे आपण ठरवायला हवे. विध्वंसक कृत्य करायचे की विधायक काम करायचे हे आपण विचारात घ्यायला हवे. शब्द ही सुद्धा एक ठिणगीच आहे. यासाठी याचा वापर करताना विचार करायला हवा. शब्दाने लोकांची मने भडकवताही येतात आणि लोकांची मने आनंदीही करता येतात. यासाठी वाढत्या वेगाच्या या विचाराला योग्य दिशा देण्याची गरज आहे. विस्तव विध्वंसक जरी असला तरी त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी असणारी उष्णता ही समान असते. समाजामध्ये सर्व प्रकारच्या व्यक्ती आहेत. काही चांगले आहेत काही वाईट विचाराचे आहेत. पण या सर्वांच्या ठिकाणी असणारा आत्मा मात्र एकच आहे. तो सारखाच आहे. याचा आत्मा मोठा याचा आत्मा लहान, याचा उच्च याचा नीच असा भेदभाव येथे नाही. त्याचे तेज हे सर्वांठायी सारखेच आहे. हे जाणण्यातून सर्वाठायी समभाव उत्पन्न होतो. साम्यावस्था प्राप्त होते. ही आत्मज्ञान प्राप्तीची एक पायरी आहे.

Tuesday, March 19, 2019

अनुभवातून गाठू विवेकाचे गाव


ज्ञानेश्वरीतील ओव्यावर आधारित असणारे अनुभव ज्ञानेश्वरी ह्या पुस्तकाचा परिचय

ज्ञानेश्वरी हा मराठीचा मानबिंदू मानला जातो. संस्कृतातील गीता सर्वसामान्यांच्या भाषेत आणताना संत ज्ञानेश्वरांचे कवित्व येथे फुलले आहे. त्यामुळेच ज्ञानेश्वरीबाबत एक तरी ओवी अनुभवावी असे म्हटले जाते अनेक वेळा अध्यात्म आपल्या दैनंदिन आयुष्याशी जोडले जाण्याऐवजी संन्यास किंवा संसारातून निवृत्तीशीच प्राधान्याने जोडले जाते. त्यामुळे एका प्रतिभाशाली काव्याला आपण मुकत असतो. सामान्य आयुष्यामध्ये येत असलेल्या अनुभवांशी या तत्त्वज्ञानाची सांगड घालण्याचा प्रयत्न लेखकाने अत्यंत सोप्या भाषेत केला आहे. साडे सातशे वर्षांपूर्वीच्या ज्ञानेश्वरांच्या भाषेचा गोडवा सर्वसामान्यांच्याही अनुभवात उतरवण्यास मदत होणार आहे. अभ्यासातून, सरावातून कधीकधी शब्द पाठ होतात. ते रोज मंत्राप्रमाणे पुटपुटले ही जातात, मात्र ते शब्द आपल्या कार्यात सततच्या विचारात घोळत राहिल्यास ध्यानसाधना सोपी होते. येथे केवळ मार्क मिळवायचे नाहीत, त्यामुळे कसे पोहायचे हेच शब्दापेक्षा तुम्हाला पोहुनच दाखवावे लागते त्यामुळे अनुभवाचे महत्त्व मोठे आहे
- ज्ञानेश्वरांचे विवेकाचे गाव आजच्या खेड्याशी जोडताना निर्मलग्राम, आदर्शगाव यासारख्या योजनातून पर्यावरण समृद्ध गावाकडे वाटचाल करणारे गाव लेखकाला आठवते
- जे जया वाटा सूर्य जाये । तेऊते तेजाचे विश्व होये । या ओवीशी लेखक जोडला जातो तो गॉड पार्टिकल सारख्या अत्याधुनिक संशोधनाच्या विचारातून.
- संशयाचे निराकरण, व्रत आणि नियमांचेही विश्लेषण करत गुरू-शिष्यांच्या संवादातून उलगडलेले गीतेचे तत्वज्ञान सामान्यांच्या भाषेत आणणाऱ्या ज्ञानेश्वरांशी लेखक आपल्याला जोडत जातो. हे तादात्म्य सामान्य वाचकही अनेक वेळा अनुभवू शकतो, यात शंका नाही
- ज्ञानेश्वरीचे अनेक वेळा पारायण करणारे आणि शब्दाला शब्द जोडत ज्ञानेश्वरीचा अर्थ लावणारे दोहोंसाठी हे पुस्तक अमूल्य ठेवा ठरणार आहे
- मात्र ज्ञानेश्वरीचे प्रवचन असे या पुस्तकाचे स्वरूप नाही हे लक्षात ठेवावे ज्ञानेश्वरीचे वाचन करताना लेखकाला जे स्फुरले, भावले काही अनुभवास आली ते वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न असल्याचा प्रांजळ विचार या पुस्तकामागे आहे. त्यामुळे अनेकदा ओवी आणि त्यातील अनुभव यात संदर्भ सोडून अनेक विचार डोकावतात.

पुस्तक - अनुभव ज्ञानेश्‍वरी
लेखक - राजेंद्र घोरपडे
प्रकाशक - श्री अथर्व प्रकाशन

राजा पराधीनु जाहला



राजाने संन्यास घेतला तरी त्यांच्या संन्यस्थातील वंशजांना आम्ही राजाचे वंशज आहोत अशी स्वतःची ओळख करून द्यावी लागत नाही. ते त्यांच्या कर्तृत्वातून आणि त्यांच्या पराक्रमातून त्यांची ही ओळख जनतेत आपोआप होते. आता नावापुढे छत्रपती लावणारे राजे आहेत.

राजा पराधीनु जाहला । कां सिंहु रोगें रुंधला ।
तैसा पुरुष प्रकृती आला । स्वतेजा मुके ।।1011।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - राजा शत्रूच्या आधीन झाला असतां, जसा निस्तेज होतो, अथवा सिंह रोगानें व्यापला म्हणजे जसा निस्तेज होतो, तसा पुरूष हा प्रकृतीच्या आधीन झाला की स्वतःच्या तेजाला मुकतो.

राजेशाही आज अस्तित्वात नाही. संस्थाने खालसा झाली आहेत. पण राजाचे वंशज आहेत. राजाची ओळख आता नावापुरतीच आहे. नावाच्या समोर छत्रपती लावले किंवा नावाच्या मागे राजे लावले तर तो राजा ठरत नाही. छत्रपती हा मान आहे. विधिवत त्याचा राज्याभिषेक केला जातो व त्यानंतर त्याला हा मान देण्यात येतो. स्वतः तसा पराक्रम, जनसेवा सिद्ध करावी लागते. चार भटजी गोळा करून त्यांना पैसे देऊन राज्याभिषेक केला जाऊ शकतो. पण तो राजा जनतेमध्ये फार काळ चर्चिला जात नाही. राजाजवळ संपत्ती आहे तोपर्यंत त्याची स्तुती करणारे भाट, शाहीर असतात. संपत्ती संपली की स्तुतीही संपते. मौज मजा, रंगरलीया करणारे अनेक राजे असतात. सत्तेचा उपभोग ते घेतात. पण जनतेच्या मनात घर करून ते राहू शकत नाहीत. जनता त्यांचा उत्स्फुर्तपणे जयजयकार करत नाही. सध्याच्या राजे महाराजांना पराक्रमी राजाचे आम्ही वंशज आहोत असे सांगावे लागते. जनतेला अशी ओळख करून द्यावी लागते. आम्हीच खरे वंशज अशी सांगण्याची वेळ या युवराजांच्यावर आली आहे. खरे युवराज असतात त्यांना स्वतःची ओळख सांगावी लागत नाही. आपोआप जनतेत त्यांची छाप पडते. राजाला आपण राजे आहोत असे सांगावे लागते ते कसले राजे. शत्रू समोर शरणागती पत्करलेल्या राज्यांपेक्षाही सध्याचे हे राजे वाईट अवस्थेत आहेत. असे म्हटले तर चूक होणार नाही. राजाने संन्यास घेतला तरी त्यांच्या संन्यस्थातील वंशजांना आम्ही राजाचे वंशज आहोत अशी स्वतःची ओळख करून द्यावी लागत नाही. ते त्यांच्या कर्तृत्वातून आणि त्यांच्या पराक्रमातून त्यांची ही ओळख जनतेत आपोआप होते. आता नावापुढे छत्रपती लावणारे राजे आहेत. आता लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सत्तेत आहेत. सुरवातीच्या काळात चांगल्या लोकप्रतिनिधींची निवड होत होती. पण आता मतांची गणिते मांडून कोणीही सत्तेत येत आहे. गुंड-मवालीही आता सत्तेत बसले आहेत. त्यांच्या सत्तेतील सहभागामुळे जनतेच्या विकासापेक्षा लुटीलाच अधिक प्राधान्य मिळत आहे. चंगळखोर राजाचे राज्य फार काळ टिकत नाही. अशा राजाच्या विरोधात जनता उठाव करते. पण आता सत्तेवर येणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात जनता उठाव करण्यास असमर्थ झालेली दिसत आहे. उठाव करणाऱ्यांचाच उठाव केला जात आहे. मध्यमवर्गातील जनता आता अशा राजकारणापासून दूर राहू इच्छित आहे. नेमका याचाच फायदा सध्याचे लोकप्रतिनिधी घेत आहेत. गरजू, गरिबांना पैशाचे आमिश दाखवून सत्तेवर येणारे हे प्रतिनिधी चंगळखोर राज्यांपेक्षाही भयाण आहेत. या अशा सत्ताधिशांच्या विरोधात आता उठावाची गरज आहे.

Monday, March 18, 2019

श्वासोश्वास


श्‍वास आत घेणे आणि बाहेर सोडणे ही नैसर्गिक क्रिया आहे. फक्त या क्रियेवर लक्ष केंद्रित करायचे आहे. मन यावर एकाग्र करायचे आहे. यात श्‍वास कोंडण्याचा, दाबायचा, जबरदस्ती करायची अशी कोणतीही क्रिया नाही. सहज सुरू असणारी क्रिया फक्त लक्षात घ्यायची आहे

जे वायूचा श्वासोश्वासु । जे गगनाचा अवकाशु ।
हें असो आघवाचि आभासु । आभासे जेणें ।।933।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - जें ब्रह्म वायूचा श्‍वासोच्छ्वास आहे व ज्या ब्रह्मरूपी पोकळींत आकाश राहिलें आहें हे राहूं दे हा सर्व जगद्रुपी भास ज्याच्या योगाने भासतो.

श्‍वास म्हणजे प्राण. प्राण असणारा वायू प्राणवायू. ऑक्‍सिजन हा प्राणवायू आहे. श्वासोश्वास म्हणजे आत ओढला जाणारा आणि बाहेर टाकला जाणार वायू. हे दोन्हीही वायू वेगवेगळे आहेत. आत ऑक्‍सिजन घेतला जाते. बाहेर कार्बनडायऑक्‍साईड वायू सोडला जातो. यासाठी हवेत जास्तीत जास्त ऑक्‍सिजन असायला हवा. नसेल तर आपण गुरमुरून जाऊ. हवेतील ऑक्‍सिजन नाहीसा झाला, तर सर्व जीवसृष्टीच नष्ट होईल. हा प्राणवायू ज्याच्यामध्ये सामावला आहे ते ब्रह्म आहे. या ब्रह्मामध्ये सर्व आकाश सामावलेले आहे. हा सर्व आभास आहे. पण हा आभासही त्याच्यामुळेच आहे. अनेकजण देवाचे अस्तित्व मानत नाहीत. ठीक आहे. पण जे घडते आहे. त्याच्यामागे कोणती शक्ती आहे. ती शक्ती तरी मान्य करावीच लागेल ना? या शक्तीसच आपण देवत्व मानत आहोत ना? या प्राणासच तर देव मानत आहोत. सोऽहम म्हणजे काय? सो म्हणजे श्‍वास आत घेणे आणि हम म्हणजे श्‍वास बाहेर सोडणे. हा प्राणवायू आत घेणे आणि सोडणे. याच्यावरच तर साधनेत नियंत्रण ठेवायचे असते ना? सद्‌गुरू हाच तर मंत्र देतात. हेच तर शिकवतात. त्यांच्या मार्गदर्शनाने हे सर्व आत्मसात करायचे असते. अनुग्रह देताना हेच तर सांगितले जाते. या साध्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात. साधना मात्र आपण करायची असते. त्यावर नियंत्रण कसे ठेवायचे, हे आपल्याच हातात आहे. फक्त सद्‌गुरूंच्या कृपेने प्रगती होते. मनाची तयारी होते. मनाला धीर मिळतो. आधार वाटतो. त्यांच्या पाठीशी आधार मिळाल्यावर मनात भीती राहात नाही. एक हटयोगी होता. त्याने श्‍वासावर नियंत्रण मिळविण्यासाठी साधना सुरू केली. गुरूंचे मार्गदर्शन न घेतात. त्याचा हा प्रयत्न सुरू होता. तो श्‍वास कोंडून ठेवायचा. यातच त्याचा मृत्यू झाला. श्‍वास आत घेणे आणि बाहेर सोडणे ही नैसर्गिक क्रिया आहे. फक्त या क्रियेवर लक्ष केंद्रित करायचे आहे. मन यावर एकाग्र करायचे आहे. यात श्‍वास कोंडण्याचा, दाबायचा, जबरदस्ती करायची अशी कोणतीही क्रिया नाही. सहज सुरू असणारी क्रिया फक्त लक्षात घ्यायची आहे. सद्‌गुरूंच्या कृपेने हे शक्‍य होते. प्राण हाच आत्मा आहे. त्याचे अस्तित्व जाणायचे आहे. मी ब्रह्म आहे याचा बोध घ्यायचे आहे. ज्याला हा बोध झाला, तो ब्रह्मज्ञानी होतो. त्याला अमरत्व प्राप्त होते. जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होते.

Saturday, March 16, 2019

ज्योतिष



ज्योतिष शास्त्राबाबतही नेमके हेच घडले. या शास्त्राचा काही स्वार्थी व्यक्तींकडून दुरुपयोग केला गेला. अशाने हे शास्त्र थोतांड वाटू लागले. यामध्ये आता जादूटोणा, कर्मकांडे शिरली आहेत. नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा उठविणारे या समाजात अनेकजण आहेत. यावर कायदा करून हा प्रश्‍न सुटणार नाही, हेही तितकेच खरे आहे. प्रबोधनाचा हा मार्ग आहे. संतांनी याबाबत जनजागृती केली.

कर्मकांड तरी जाणें । मुखोद्‌त पुराणें ।
ज्योतिषी तो म्हणे । तैसेचि होय ।। 828।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - तो कर्मकांड जाणतो. पुराणे त्याला तोंडपाठ आहेत आणि जो ज्योतिषशास्त्रात इतका निष्णात आहे की, तो भविष्य करील तसेच घडते.

आत्मज्ञानी संतांना शिष्याची कुंडली तोंडपाठ असते. अंतर्ज्ञानाने त्यांना याचे ज्ञान असते. ज्योतिषी अंतर्ज्ञानी असतोच असे नाही. त्यामुळे पुस्तकी, पंडिती ज्ञानावर त्याचे भाष्य असते. पंचागाच्या आधारे तो कुंडली तयार करतो. ज्योतिष हे एक शास्त्र आहे. पण हे शास्त्र पुर्वीच्याकाळी विकसित कसे झाले. ग्रहांचा शोध, पृथ्वी गोल आहे याचा शोध तर अलीकडच्या काळात लागला आहे. मग त्याकाळात हे ग्रह कसे काय माहित होते? आत्मज्ञानी संतांनी त्यांच्या अंतर्ज्ञानाने हे सर्व शोध लावले. त्यातूनच हे शास्त्र विकसित झाले. हाताची पाचही बोटे सारखे नसतात. तसे समाजामध्ये सर्वजण सारखे नसतात. काही चांगले तर काही वाईट विचारांचे असतात. काही दुष्टवृत्तीचे असतात. अशा व्यक्तींच्या विचारातून मग या शास्त्राचा दुरुपयोग झाला. तसे सर्वच शास्त्राचा गैरफायदा उठविणाऱ्या व्यक्ती प्रत्येक समाजामध्ये असतात. अणूचा उपयोग ऊर्जेसाठी करता येतो. पण त्यापासून अणूबॉंम्बही तयार केला जातो. काही विध्वंसक व्यक्ती याचा गैरफायदा उठवितात. दहशतवाद माजविण्यासाठी स्फोट घडवितात. शास्त्राचा उपयोग चांगल्यासाठी केला तर समाजात अनेक सुधारणा होऊ शकतील. समाजात सुख, शांती नांदेल. गैरफायदा उठविण्याचा विचार केला तर समाजात अशांतता पसरेल. ज्योतिष शास्त्राबाबतही नेमके हेच घडले. या शास्त्राचा काही स्वार्थी व्यक्तींकडून दुरुपयोग केला गेला. अशाने हे शास्त्र थोतांड वाटू लागले. यामध्ये आता जादूटोणा, कर्मकांडे शिरली आहेत. नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा उठविणारे या समाजात अनेकजण आहेत. यावर कायदा करून हा प्रश्‍न सुटणार नाही, हेही तितकेच खरे आहे. प्रबोधनाचा हा मार्ग आहे. संतांनी याबाबत जनजागृती केली. कायद्याने शिक्षा केली जाऊ शकते. यावर धाक बसविला जाईल, पण मुळ समस्या सुटणार नाही. जादूटोणा, कर्मकांडे याबाबत प्रबोधन केल्यास या मार्गाकडे कोणी वळणार नाही. मुळात जनता अशा गोष्टी वळलीच नाही, तर गुन्हे घडणारच नाहीत. समाजात कायद्याचा धाक निर्माण करण्याऐवजी गुन्हे घडणार नाहीत यावर अधिक भर द्यायला हवा. तरच समाजात सुखशांती नांदेल. गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन घाव घालायला हवा. तरच हे प्रश्‍न सुटणार आहेत. संतांनी हेच केले. समाज जागृत केला. सध्या ही जागृतीची प्रक्रियाच दूषित झाली आहे. यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. प्रबोधन सुद्धा योग्य प्रकारे व्हायला हवे. यासाठी आत्मज्ञानाची बीजे येथे रूजवायला हवीत. म्हणजे सर्व अंधश्रद्धा आपोआप नष्ट होतील. आत्मज्ञानाचा प्रसार हाच यावरचा उपाय आहे.

Friday, March 15, 2019

ब्रह्म तेंचि कर्म



कर्म न करता फळाची आशा धरणे म्हणजे स्वप्न पाहण्याचा प्रकार आहे. अशी स्वप्ने ही कधीही पूर्ण होत नाहीत. स्वप्नातून बाहेर पडून सत्याची कास धरली पाहिजे, तरच जीवनात यशस्वी होता येईल.

म्हणौनि ब्रह्म तेंचि कर्म । ऐसें बोधा आलें जया सम ।
तया कर्तव्य तें नैष्कर्म्य । धनुर्धरा ।। 121 ।। अध्याय 4 था

अर्थ - म्हणून कर्म ब्रह्मच आहे, असे साम्य ज्याच्या प्रचितीला आले, त्याने कर्तव्यकर्म जरी केले तरी अर्जुना, तें नैष्कर्मच होय.

प्रपंच म्हटला की कर्तव्यकर्मे आली. घर चालवायचे म्हटले की पैसा हा कमवावा लागणार. संसार करावा लागतो. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपणास खरेदी करावे लागते. खरेदीसाठी पैसा हा लागणारच. पैसा हा काहीतरी कर्म केल्याशिवाय येणेच शक्‍य नाही. देवाचे भजन करून कायमस्वरूपी पैसा तर मिळणे शक्‍य नाही. एक दिवस दान देतील, दोन दिवस दान देतील. रोज रोज कोण पैसे दान देणार. पुर्वीच्याकाळी भिक्षा मागून देवधर्म केला जायचा. लोक श्रद्धेपोटी भिक्षा द्यायचे. तसे आजही देतात. पण रोज रोज कोण भिक्षा देणार. बदलत्या काळात गरज वाढल्या आहेत. तसा एकमेकातील विश्‍वासही कमी झाला आहे. देवधर्म करतो म्हणून कोणी फुकटचे पोसेल असे सध्याच्या जगात तरी शक्‍य वाटत नाही. पूर्वीच्या काळीही अशीच स्थिती होती, पण त्याचे प्रमाण कमी होते. म्हणजे कर्म केल्याशिवाय जीवन जगता येणे कठीण आहे. जमीन आहे, तर ती कसली पाहिजे. पीक घेतले पाहिजे काही ना काही उत्पन्न त्यातून मिळवले पाहिजे. म्हणजे कष्ट हे करावेच लागतात. कर्म हे करावेच लागते. कर्म न करता फळाची आशा धरणे म्हणजे स्वप्न पाहण्याचा प्रकार आहे. अशी स्वप्ने ही कधीही पूर्ण होत नाहीत. स्वप्नातून बाहेर पडून सत्याची कास धरली पाहिजे, तरच जीवनात यशस्वी होता येईल. आत्मज्ञान प्राप्तीसाठीही कर्म करावेच लागते. पण येथे ब्रह्म हेच कर्म आहे. सोऽहमची अखंड साधना हेच कर्म आहे. संसारात राहूनही हे कर्म करता येते. फक्त मनाची स्थिती बदलायला हवी. हे मी केले, हे माझ्यामुळे झाले असे न म्हणता समर्पनाची भावना ठेवून कर्म करायला हवे. हे भगवंतामुळे झाले. हे भगवंतामुळे घडते. चांगले घडले तरीही भगवंतामुळेच घडते. वाईट घडले तरीही भगवंतामुळे घडते. चांगले घडले म्हणून आनंदाने हरखून जायचे नाही व वाईट घडले म्हणून दुःखही करत बसायचे नाही. चांगले व वाईट असा भेदभाव न करता मनाची स्थिरता राखून कर्म करत राहायचे. हर्ष-शोक या दोन्ही ठिकाणी मनाची साम्यावस्था ठेवायला हवी. म्हणजे याचा शरीराला त्रास होणार नाही. वाईट गोष्टीचा शरीरावर पटकन परिणाम घडतो. दुःखामध्ये माणूस खचून जातो. काहीजण तर दुःखाला कंटाळून आत्महत्या करतात. इतकी त्यांची मानसिक स्थिती ढासळलेली असते. तर आनंदामध्ये स्वतःचे भान राहात नाही. आपल्यामुळे कोणाला दुःख झाले याचीही कल्पना यावेळी येत नाही. यासाठी मनाची स्थिरता ही जीवनात महत्त्वाची आहे. कोणत्याही कर्मामध्ये साम्यावस्था ही महत्त्वाची आहे. कर्म करूनही तो नैष्कर्मी होतो. कारण त्याच्या मनाची तयारी झाली आहे. त्यामध्ये मीपणा नाही. त्यामुळे सुखही नाही, अन्‌ दुःखही नाही. काही कमवल्याचा आनंदही नाही व काही गमवल्याचे दुःखही नाही. अशी मनाची स्थिरता ठेवायला हवी. ब्रह्म हेच कर्म म्हणून कर्म करत राहायला हवे. अशी अवस्था जेव्हा प्राप्त होईल तेव्हा आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग सुकर होईल. ब्रह्मसंपन्नता येईल.

मानला तर देव नाहीतर दगड..




जे घडते ते सर्व देवाच्या इच्छेने घडते. मग ते चांगले असो वा वाईट. हे सर्व देवाला अभिप्रेत असते तेच घडते. पण चांगले घडवायचे का वाईट घडवायचे. चांगले वागायचे की वाईट वागायचे हे सर्व आपल्याच हातात आहे ना ! चांगले वागाल तर चांगले फळ निश्‍चितच मिळेल.

आणि भजिन्नलियासवें । तो विषो जरी न पवे ।
तरी सांडी म्हणे आघवे । टवाळ हें ।। 810।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - आणि मला भजल्याबरोबर तो इच्छित विषय जर मिळाला नाही तर तो हे भजन टाकतो व सर्व खोटे आहे असे तो म्हणतो.

देवाचा प्रसाद मिळाला तर देव चांगला, अन्यथा देव वाईट. सद्‌गुरूंच्या दर्शनाने काम झाले, तर सद्‌गुरू चांगले. अन्यथा सद्‌गुरूंची ताकद, प्रभाव आता कमी झाली आहे. पूर्वीसारखे त्यांच्याकडे शक्ती नाही. अशी टवाळी पिटायची. देव दर्शन करून यायचे. ते केल्यानंतर लगेच काम झाले तर देवाचा प्रभाव म्हणायचे. अन्यथा देवामध्ये आता काय राम राहिला नाही, असे म्हणायचे. माणसाचा स्वभाव असाच आहे. काम झाले तर जय हो, काम नाही झाले तर नावे ठेवायची. जे घडते ते सर्व देवाच्या इच्छेने घडते. मग ते चांगले असो वा वाईट. हे सर्व देवाला अभिप्रेत असते तेच घडते. पण चांगले घडवायचे का वाईट घडवायचे. चांगले वागायचे की वाईट वागायचे हे सर्व आपल्याच हातात आहे ना ! चांगले वागाल तर चांगले फळ निश्‍चितच मिळेल. झाड येरंडाचे लावल्यावर त्याला येरंडाचीच फळे येणार. त्याला आंबे लागणार नाहीत. जे पेराल तेच उगवते. यासाठी पेरणी कशाची करायची, हे ठरवायला हवे. चांगले पेरला तर निश्‍चितच चांगले उगवणार. कोकणामध्ये तुळस या गावी कृष्ण म्हणून वरवंटा पुजला जातो. मानला तर देव, नाही तर तो दगड. या गावात ही प्रथा कशी पडली. याचा इतिहास रंचक आहे. दरवर्षी गोकुळाष्टमीला तेथे कृष्णाचा पाळणा बांधला जात असे. त्यामध्ये कृष्णाची मुर्ती पुजली जायची. दरवर्षी प्रमाणे कृष्णाची मुर्ती खरेदी करण्यासाठी या गावातील परब कुटुंबीय गेले. पण दुपारी जोराचा पाऊस सुरू झाला. यामुळे गावात परतण्यास अडचणी आल्या. पूर ओसरलाच नाही. गावातील मंडळींनी त्यांची वाट पाहिली. अखेर शेवटी पाळण्यात वरवंटा ठेवला आणि पाळणा म्हटला. तेव्हापासून येथे वरवंटा पुजण्याची प्रथा आहे. मानला तर दगडात देव आहे. मानलेच नाही तर त्या दगडाला देवपण येणार नाही. देवाचा प्रभाव कधी कमी होत नाही. चुकत आपणच असतो. त्या दुरुस्त नाही केल्या तर, चुका वाढतच जाणार. गाडी खराब झाली आहे, याकडे दुर्लक्ष केले तर गाडी अधिकच खराब होत जाणार. अपघात झाल्यावर मग आपले डोळे उघडणार. त्यावेळी देवाला दोष देऊन काय कामाचे. गाडी खराब होती म्हणून अपघात घडला. काही वेळेला वेळ खराब असते. पण खराब प्रसंग ओढवू नये यासाठी आपणच जागरूक राहायचे असते. चांगल्या संगतीत राहिल्यावर विचार सुद्धा चांगलेच सुचणार. वाईटांच्या संगतीत वाईट विचाराचा प्रभाव अधिक असतो. यासाठी देवाला नावे ठेवण्यात काहीच अर्थ नाही. भक्ती मनात उत्पन्न व्हावी लागते.



Thursday, March 14, 2019

स्मरण




मोह किती असावा याचे भान ठेवायला हवे. आवडीचे पदार्थ जेवणात असतील, तर ते खाताना भान राहात नाही. मोहामुळे भान हरवते. आपण खातच राहातो. खातच राहातो. जेवणाच्या ताटावरून उठताना लक्षात येते की जेवण जास्त झाले आहे. किती खायचे याला मर्यादा आहेत. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा नसतो. सदैव भानावर राहाण्यासाठी मोहावर आवर घालायला हवा.

बेडूक सापाचां तोंडी । जातसे सबुडबुडी ।
तो मक्षिकाचिया कोडीं । स्मरेना कांही ।। 730।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - बेडूक सापाच्या तोंडात सगळा गिळला जात असतांनाही माशांचे समुदाय तो गिळतो पण आपण मरतो, ही आठवण त्याला नसते.

बेडकाला माशी खाण्याचा मोह आवरता येत नाही. सापाच्या तोंडात बेडूक सापडला, तरी त्याचा हा मोह काही सुटत नाही. समोर मृत्यू आहे, याचे सुद्धा भान त्याला नसते. स्वतः सापाच्या तोंडातून सुटण्यापेक्षा तो माशी खाण्यासाठीच धडपडतो. माणसाची सुद्धा अशीच अवस्था असते. त्यालाही मोह आवरता येत नाही. मोहाने तो चुका करतच राहातो. आपल्या चुका दुसऱ्याच्या निदर्शनास आल्या आहेत, याचे भानच त्याला नसते. स्मृतीभ्रंश उतार वयात होतो. आयुष्य किती राहिले आहे, याचे भानच या वयात नसते. पण संपत्ती जमा करण्याचा काहींना मोह सुटत नाही. या वयात मुलांच्या प्रगतीचा विचार करण्याऐवजी अनेकजण त्यांना दोष देऊन संपत्तीत त्यांना वाटा देण्यासही तयार नसतात. मुलांना त्यांचा वाटा देऊन त्यांना सुखी करावे, आनंदी करावे असा विचार त्यांना सुचतच नाही. मुलांच्या आनंदात आनंद पाहणे त्यांना समजतच नाही. स्वतः कमावलेली संपत्ती स्वतःच्या मुलांना देण्याचा मोह होत नाही. इतका संपत्तीचा त्यांना मोह असतो. मोहाने स्मरण होत नाही. मोहाचा प्रभाव वाढला तर हा परिणाम होतो. यासाठी कोणत्याही गोष्टीचा अतिमोह टाळावा. मोहात अडकलो जाणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. एकदा एक चोर चोरी करायला गेला. त्याला अमाप संपत्ती दिसली. तो या संपत्तीच्या मोहात पडला. पण तितकी संपत्ती वाहून नेण्यासाठी त्याच्याकडे बळ नव्हते. पण या संपत्तीचा मोह त्याला आवरता आला नाही. त्याने ती सर्व संपत्ती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यात त्याचा वेळ गेला. त्याला चोरी करून लगेच जाण्याचे स्मरणच झाले नाही. त्याची चोरी पकडली गेली. आवश्‍यकतेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्याने तो अडचणीत सापडला. मोह किती असावा याचे भान ठेवायला हवे. आवडीचे पदार्थ जेवणात असतील, तर ते खाताना भान राहात नाही. मोहामुळे भान हरवते. आपण खातच राहातो. खातच राहातो. जेवणाच्या ताटावरून उठताना लक्षात येते की जेवण जास्त झाले आहे. किती खायचे याला मर्यादा आहेत. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा नसतो. सदैव भानावर राहाण्यासाठी मोहावर आवर घालायला हवा. हेच यातून शिकायचे आहे. लक्ष विचलित होऊ नये यासाठी मोह नियंत्रणात ठेवावा. अति मोहाने स्मृतिभ्रंश होतो.
      

Monday, March 11, 2019

यशवंतराव चव्हाण




12 मार्च आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त भावना पाटोळे यांनी लिहिलेल्या त्यांच्यावरील पुस्तकाचा परिचय थोडक्यात....

भावना पाटोळे यांनी पारंपारिक मांडणी पलीकडे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या बहुविध पैलूंना अधोरेखित करत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला परिश्रमपूर्वक नव्याने समजून घेण्याच्या ध्यासातून हे चरित्र निर्माण केले आहे.  

आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण आणि त्यातील लोकत्तर नेत्यांचे योगदान यातील त्या तज्ञ असल्याने या पुस्तकात त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या चरित्रातील अनेक पैलू उलघडून सांगितले आहेत. पहिल्या प्रकरणात यशवंतराव चव्हाण यांची जडणघडण कशी झाली हे सांगितले आहे. छोटी छोटी उदाहरणे देऊन यशवंतरावांच्यावर आईने कसे संस्कार केले  हे खूप सुंदररित्या सांगितले आहे. सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळींचा यशवंतरावांवर कसा प्रभाव पडला त्यांचा शैक्षणिक प्रवास, त्यांचा राष्ट्रीय चळवळीतील सहभाग, गांधीवाद समाजवाद, रॉय वाद मार्क्स वाद यांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव हे सांगितले आहे. यातून यशवंतरावांची वैचारिकता बहुपदरी होती हे सांगायलाही लेखिका विसरली नाही. 

राजकीय नेतृत्व उभारणी व विकास यावर आधारित दुसरे प्रकरण आहे. यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचे दलिता संबंधीचे धोरण, औद्योगिकीकरण, कृषी विषयक सुधारणा, सामाजिक आर्थिक विकास, सहकारी चळवळ याचा आढावा घेतला आहे.

श्री शिवछत्रपतींना मुजरा करून यशवंतरावांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीची घोषणा केली. नव्या राज्याकडे पाहण्याचा यशवंतराव चव्हाण यांचा दृष्टिकोन कसा होता? महाराष्ट्राचे नेतृत्व त्यांनी कसे केले? कृषी औद्योगिक विकासावर आधारित नवी अर्थरचना, महाराष्ट्रातील दलित व पुढारलेल्या समाजातील मानसिक दुरावा दूर करून सामाजिक एकतेची नवी वाटचाल, शतकानुशतके एकमेकापासून वेगळे असलेल्या विभागांना एकात्मतेचा अनुभव असे कार्यक्रम यशवंतरावांनी कसे राबवले हे राबवताना त्यांना आलेल्या अडचणी व त्यावर मात करण्यासाठी राबवलेली नवी धोरणे यावर संयुक्त महाराष्ट्राचे नेतृत्व - स्वप्न व साध्य या तिसऱ्या प्रकरणात लेखकांने प्रकाश टाकला आहे.

यशवंतराव चव्हाण यांची राजधानी दिल्लीतील वाटचाल व तेथील राजकीय प्रवास यावर स्वतंत्र दोन प्रकरणे या पुस्तकात देण्यात आली आहेत. आधुनिक महाराष्ट्राच्या जडण घडणीतील सांस्कृतिक क्षेत्रातील विकासाचे स्थान लक्षात घेतानाच येथील सूक्ष्म घडामोडीकडे ही डोळसपणे पाहणारे यशवंतराव त्यांचे व्यक्तिमत्व होते. ग्रंथाचा व्यासंग जपणे, साहित्यिकांना प्रोत्साहन देणे, कलावंताच्या कलेला दाद देणे या सर्वातूनच त्यांचे समृद्ध व्यक्तिमत्त्व झळकले. महाराष्ट्र भूमीच्या सांस्कृतिक उन्नतीकरिता त्यांनी अथक परिश्रम केले. असे त्यांचे सांस्कृतिक वैभव, मुले व विचारधन यावर या पुस्तकात स्वतंत्र प्रकरण देण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण यांचा संक्षिप्त कालपट ही या पुस्तकात मांडण्यात आला आहे. एकंदरीत यशवंतराव चव्हाण यांचे कार्य, कौशल्ये, व्यक्तिमत्व, विचार यांची अभ्यासपूर्ण मांडणी या पुस्तकात करण्यात आली आहे. 

पुस्तकाचे नाव - यशवंतराव चव्हाण
लेखिका - भावना पाटोळे
प्रकाशक - नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया
पृष्ठे - 221, किंमत - 225 रुपये


Sunday, March 10, 2019

कां मातलिया सरडा



नैसर्गिकता नष्ट करून कृत्रिमतेचा अवलंब करत आहोत. पण कृत्रिमपणा हा क्षणिक आहे. त्याला मर्यादा आहे. याचे भान आपणास नाही. इंधन आहे तोपर्यंत गाडी चालणार आहे. इंधन संपले की गाडी बंद पडणार. याचे भान आपणास नाही. त्यावेळी दुसरे काही तरी शोधले जाईल, असा विश्‍वासही आहे. हे नाही तर ते. असे बदलते जीवन आपण जगत आहोत.

कां मातलिया सरडा । पुढती बुड पुढती शेंडा ।
हिंडणवारा कोरडा । तैसा जया ।। 689।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - माजलेला सरडा जसा झाडाच्या बुडापासून तो शेंड्यापर्यंत व पुन्हा शेंड्यापासून बुडापर्यंत रिकाम्या खेपा करतो, त्याप्रमाणे ज्यांचें भटकणे निरर्थक असते.

माजलेला सरडा झाडावर नुसत्या उड्या मारत असतो. माजलेला हत्ती दिसेल त्या वस्तूंची आदळआपट करतो. सोंडेने झाडे तोडतो. सर्वत्र नुकसान करत हिंडतो. माजलेला बैल मालकाही शिंगाने मारत सुटतो. माजलेल्या गायी-म्हशी लाथा मारतात. माज ही अंगात चढलेली मस्ती आहे, गुर्मी आहे. माणसांमध्येही हीच लक्षणे दिसतात. अज्ञानपणाचे हे लक्षण आहे. यातून नुकसानच अधिक होते. पण ही रग, मस्ती, माज चढतो कशाने? इतका गर्व येतो कशाने? सर्वसंपन्न माणसांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. हा अंगभूत गुण आहे. कोणाला विद्वत्तेचा माज असतो, तर कोणाला संपत्तीचा, श्रीमंतीचा माज असतो. माझ्यासारखा मीच हा अहंकार असतो. धन हे क्षणभंगुर आहे. आज आहे उद्या नाही. आज श्रीमंती आहे उद्या नाही. श्रीमंतीने माणसांनी झाडे तोडली. घरे बांधली. वसाहती वाढवल्या. साध्या छपराच्या घरांचे सिमेंटाच्या घरात रूपांतर झाले. छपराच्या घरात गारवा होता. सिमेंटच्या घरात आज उकाडा जाणवत आहे. तेथे गारवा उत्पन्न करण्यासाठी कृत्रिम थंडावा निर्माण करावा लागतो. छपराच्या घरात मात्र नैसर्गिक गारवा होता. थंडावा होता. अज्ञानाने निसर्गावर आपण अन्याय करत आहोत. नैसर्गिकता नष्ट करून कृत्रिमतेचा अवलंब करत आहोत. पण कृत्रिमपणा हा क्षणिक आहे. त्याला मर्यादा आहे. याचे भान आपणास नाही. इंधन आहे तोपर्यंत गाडी चालणार आहे. इंधन संपले की गाडी बंद पडणार. याचे भान आपणास नाही. त्यावेळी दुसरे काही तरी शोधले जाईल, असा विश्‍वासही आहे. हे नाही तर ते. असे बदलते जीवन आपण जगत आहोत. सध्या असे जगणे ही काळाची गरज झाली आहे. असा विश्‍वासही बळावला आहे. पण आता पुन्हा कृत्रिम रासायनिक शेतीकडून नैसर्गिक, सेंद्रिय शेतीकडे आपण वळत आहोत. त्याची गरज भासत आहे, हेही विसरता कामा नये. केलेल्या चुका आता लक्षात येऊ लागल्या आहेत. उत्पन्नवाढीचा माज आपणास चढला होता. काळाची गरज असे म्हणून आपण त्या स्वीकारत आहोत. पण पुन्हा काळाची गरज म्हणून नैसर्गिक शेतीचाही स्वीकार करावा लागतो आहे. याचा विचार करायला हवा. जीवन जगताना भान ठेवले असते, तर ही वेळ आली नसती. पण निसर्ग चक्राचा नियम आहे. कृत्रिमता ही क्षणिक आहे. नैसर्गिक हे कायम आहे. शाश्‍वत आहे. त्याचा स्वीकार करायला हवा. माज हा सुद्धा नैसर्गिक आहे. पण अज्ञानातून उत्पन्न झालेल्या माजावर आवर घालायला हवी. म्हणजे जीवनात चुका होणार नाहीत.

Saturday, March 9, 2019

तीर्थ




तीर्थक्षेत्रास इतके महत्त्व का? हे जाणून घ्यायला हवे. मनातील दुष्ट दूर होऊन चांगला विचार-आचार करण्याचा संकल्प येथे केला जातो. तीर्थाच्या पावित्र्याने आपणही पवित्र व्हायचे असते. त्या शुद्धीत मनसोक्त डुंबायचे असते. मनाच्या शुद्धीने प्रसन्न व्हायचे असते. भक्तीने आत्मज्ञानी होण्यासाठीच येथे जायचे असते.

आणि तीर्थे धौतें तटें । तपोवनें चोखटें ।
आवडती कपाटें । वसवूं जया ।। 611 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - आणि तीर्थे, नदी व समुद्र यांचे पवित्र किनारे, तप करण्याच्या शुद्ध जागा आणि गुहा ह्या ठिकाणी ज्यास राहावयास आवडते.

तीर्थ म्हणजे पवित्र पाणी, तीर्थ म्हणजे पवित्र ठिकाण. भगवंताची, सद्‌गुरूंची वस्ती जेथे आहे असे ठिकाण म्हणजे तीर्थ. पण या तीर्थस्थानांची यात्रा का करावी? या वास्तू पवित्र आहेत. तेथे गेल्यानंतर मनाची शुद्धता होते. मनामध्ये शुद्ध विचारांचा प्रवाह सुरू होतो. एखाद्या ऐतिहासिक गडावर गेल्यानंतर त्याचा इतिहास आठवताच अंगावर रोमांच उभे राहते. त्या वास्तूशी निगडित इतिहासाने तेथील वातावरणाची निर्मिती होते. मन त्या वातावरणात मिसळते. अंगामध्ये ते गुण जागृत होतात. त्या पराक्रमांनी मनाला स्फुर्ती चढते. उत्साह वाढतो. धैर्य वाढते. अशा वातावरणात पराक्रमांचा पोवाडा ऐकायला मिळाले तर, अंगातील रक्त उसळते. त्याच्यात नवचैतन्य उत्पन्न होते. फक्त आपण कोणत्या विचारांनी आपण गडावर गेलो आहोत यालाही महत्त्व आहे. देवदर्शनाला जातानाही विचार कोणता आहे, याला महत्त्व आहे. दैनंदिन जीवनापेक्षा थोड्या वेगळ्या वातावरणात गेल्यावर मनाचा थकवा दूर होतो. मनाला विश्रांती मिळते. प्रसन्नता वाटते. हे खरे आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यावर हा बदल घडणार हे नैसर्गिक आहे. मग तीर्थक्षेत्रांचाच हट्ट का? त्याऐवजी गडावर गेले तर चालणार नाही का? काही नास्तिक हा प्रश्‍न जरूर विचारू शकतात? कारण आजकाल बऱ्याचशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी श्रद्धेपेक्षा लूटच सुरू आहे. श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दर्शनाच्या रांगेत पाकीट चोरही वाढले आहेत. वाढत्या महागाईचा हा परिणाम आहे. पण पूर्वीच्या काळीही ही लूट सुरूच होती. सध्याच हे घडते असेही नाही. अशा घटनांनी त्या तीर्थक्षेत्राचे महत्त्व बाधित होत नाही. आपण लुटले जाणार नाही, फसणार नाही, इतरांना लुबाडणार नाही अशी मानसिकता ठेवली तर आपण निश्‍चितच या विचारापासून दूर राहू. देवाचे दर्शन महत्त्वाचे आहे. मग पैसे देऊन झटपट दर्शनाचा का मोह धरावा. देवाच्या इच्छेनुसार दर्शन भेटते, तर मग पैसे देऊन दर्शनाची घाई कशाला? देवाला दर्शन द्यायचे असेल, तर तो जरूर देतो. श्रद्धा ठेवायला हवी. मनाची प्रसन्नता वाढविण्यासाठी आपण हे करत आहोत. हा विचार ठेवायला हवा. सुख, समाधानासाठी आपण तीर्थक्षेत्री जात आहोत. नाहीतर मग गडावर जाऊनही मन प्रसन्न होतेच ना? ऊर्जा मिळतेच ना? तीर्थक्षेत्रास इतके महत्त्व का? हे जाणून घ्यायला हवे. मनातील दुष्ट दूर होऊन चांगला विचार-आचार करण्याचा संकल्प येथे केला जातो. तीर्थाच्या पावित्र्याने आपणही पवित्र व्हायचे असते. त्या शुद्धीत मनसोक्त डुंबायचे असते. मनाच्या शुद्धीने प्रसन्न व्हायचे असते. भक्तीने आत्मज्ञानी होण्यासाठीच येथे जायचे असते.

Friday, March 8, 2019

ऐसी वार्धक्‍याची सूचणी ।





ज्ञानेश्‍वरी हा ग्रंथ जीवन कसे जगायचे हे शिकवतो. जीवनाच्या विविध टप्प्यावर येणाऱ्या समस्यांचे वर्णन यामध्ये केले आहे. यावर उपायही सुचविले आहेत. काळ बदलला, नवे शोध लागले तरी जीवन जगताना भेडसावणारे प्रश्‍न मात्र तेच असतात. ते बदलत नाहीत.

ऐसी वार्धक्‍याची सूचणी । आपणिया तरूणपणीं ।
देखे मग मनीं । विटे जो गा ।।575।। अध्याय 13 वा


ओवीचा अर्थ - असा (पुढे येणाऱ्या) म्हातारपणाचा इशारा जो आपल्या ठिकाणीं तरूणपणीं विचारानें पाहतो आणि मग जो त्याविषयी मनांत विटतो.

नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर पगार बंद होतो. उत्पन्नाचा स्रोत खुंटला की, मग समस्या सुरू होतात. वय झालेले असते. अशा कालात काय करायचे हा प्रश्‍न असतो. काहीवेळेला तर स्वतःची मुलेही जवळ करत नाहीत. मग अशा कठीण प्रसंगात करायचे काय? काहीजण वृद्धाश्रमाचा पर्याय निवडतात. पण वार्धक्‍याच्या काळाचे प्रयोजन जर तारुण्यातच केले, तर ही समस्या पुढे भेडसावणार नाही. तरुणपणीच यासाठी काळजी घ्यायला हवी. निवृत्तीनंतरही उत्पन्नाचा स्रोत कायम राहील, असे प्रयोजन करायला हवे. याचा विचार तारुण्यातच करायला हवा. वृद्धावस्थेतही चांगले जीवन जगावे असे वाटत असेल तर दूरदृष्टी ठेवून नियोजन करायला हवे. पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी पावसाळ्यातच पाण्याचा साठा कसा करता येईल याचे नियोजन करावे लागते. तहान लागल्यावर विहीर खणता येत नाही. यासाठी आधीच नियोजन असावे लागते. समस्यांचा महापूर येण्याअगोदरच या समस्याच राहणार नाही याचे नियोजन करायला हवे. पुढे भेडसावणाऱ्या प्रश्‍नांचा विचार करायला हवा. जीवनामध्ये याचा विचारच होत नसल्यानेच आत्महत्या, खून, मारामाऱ्या यांचे प्रमाण वाढताना आढळत आहे. जीवन कोणत्याही पातळीवर आनंदी राहील, याचा सर्वांगीण विचार करायला हवा. जीवनात नियोजनाला अधिक महत्त्व आहे. सध्या नियोजन, दूरदृष्टी यांचा विचारच होत नाही. धार्मिक ग्रंथ हे जीवन कसे जगायचे हे शिकवतात. त्यातील चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करायला शिकले पाहिजे. तसे केले तर आपलेच जीवन सुखी, आनंदी होईल. ज्ञानेश्‍वरी हा ग्रंथ जीवन कसे जगायचे हे शिकवतो. जीवनाच्या विविध टप्प्यावर येणाऱ्या समस्यांचे वर्णन यामध्ये केले आहे. यावर उपायही सुचविले आहेत. काळ बदलला, नवे शोध लागले तरी जीवन जगताना भेडसावणारे प्रश्‍न मात्र तेच असतात. ते बदलत नाहीत. जन्म आहे तेथे मृत्यू आहेच. तारुण्यानंतर वार्धक्‍य हे आहेच. कितीही आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले तरी जन्म-मृत्यू, तारुण्य-वार्धक्‍य हे काही बदलता येत नाही. वार्धक्‍यातही सुंदर दिसण्यासाठी क्रीम तयार केली जाऊ शकेल. पण त्यालाही मर्यादा आहेत. वार्धक्‍य सुंदर करायचे असेल सुखी करायचे असेल तर त्याचा विचार तारुण्यातच व्हायला हवा.

Wednesday, March 6, 2019

समाधीचे शेजेपासीं


आत-बाहेर केवळ गुरूंच्या मंत्राचाच जप सुरू असावा. यात रममान व्हायला शिकले पाहिजे. हळूहळू मनाचा हा दृढ निश्‍चय होतो. अंतःकरणात फक्त त्याचाच जप सुरू असतो. मन त्यावरच नियंत्रित होते. अशा अवस्थेला पोहोचल्यानंतर आत्मज्ञानाचा लाभ होतो. मग ही अवस्था मांडी घालून ध्यानाला बसल्यानंतरही होते किंवा काम करताना मनात सतत त्याचाच जप करणाऱ्यांना सुद्धा प्राप्त होते.

समाधीचे शेजेपासीं । बांधोनि घाली ध्यानेंसीं ।
चित्त चैतन्यसमरसीं । आंतु रते ।। 509 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - समाधीरूपी शय्येजवळ ध्यानाला बांधून टाकतो (म्हणजे समाधी लागेपर्यंत ध्यान दृढ करतो) व चित्त आणि चैतन्य यांच्या समरसतेने अंतर्मुखतेने रममाण होतो.

आत्मज्ञान मिळावे अशी तीव्र इच्छा आहे. मग ते कसे मिळते याचा अभ्यास करायला नको का? त्याच्या प्राप्तीचे मार्ग जाणून घ्यायला नकोत का? शाळेतच गेला नाही तर लिहायला, वाचायला कसे येणार? शाळेत शिकविणाऱ्यांना गुरुजींकडून हे ज्ञान जाणून घ्यायला नको का? शाळेत जसे ज्ञान गुरुजी देतात तसे आत्मज्ञानासाठीही गुरूची आवश्‍यकता असते. शाळेत, महाविद्यालयात, विद्यापीठात ज्ञान देणारे शिक्षक हे त्यांच्या पात्रतेनुसार त्या त्या पदावर काम करत असतात. शाळेतले गुरुजी विद्यापीठातील विद्‌यार्थ्यांना कसे शिकवू शकतील. ज्याची त्याची पात्रता ठरलेली असते. तसे आत्मज्ञान देणारे गुरू कसे असावेत, हे सुद्धा निश्‍चित आहे. त्यांची सुद्धा पात्रता असते. जो आत्मज्ञान देणार आहे तो गुरू प्रथम आत्मज्ञानी असायला हवा. तरच तो इतरांना आत्मज्ञान सांगू शकेल. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण असा गुरू काय कामाचा. अनुभवातून, अनुभूतीतून हे शास्त्र अभ्यासावे लागते. यासाठी शिकविणारा आत्मज्ञानी असायलाच हवा. येथे शिष्यांना आत्मज्ञानी गुरू मंत्र देतात. शिष्याची भक्ती, आवड पाहून त्यानुसार प्रत्येकाला वेगवेगळे मंत्र दिले जातात. ध्यान कसे करायचे हे सद्‌गुरू शिकवितात. गुरू मंत्रावर ध्यान असावे. त्यावर मन केंद्रित करावे. नजर नाकाच्या शेंड्यावर ठेवावी. श्‍वासावर नियंत्रण मिळवावे. तो स्वर मनाने स्पष्ट ऐकावा. चित्त त्यात मग्न झालेले असावे. समाधी अवस्था प्राप्त होईपर्यंत ध्यान दृढ करावे. आत-बाहेर केवळ गुरूंच्या मंत्राचाच जप सुरू असावा. यात रममान व्हायला शिकले पाहिजे. हळूहळू मनाचा हा दृढ निश्‍चय होतो. अंतःकरणात फक्त त्याचाच जप सुरू असतो. मन त्यावरच नियंत्रित होते. अशा अवस्थेला पोहोचल्यानंतर आत्मज्ञानाचा लाभ होतो. मग ही अवस्था मांडी घालून ध्यानाला बसल्यानंतरही होते किंवा काम करताना मनात सतत त्याचाच जप करणाऱ्यांना सुद्धा प्राप्त होते. कामातही त्याचेच ध्यान असते. सर्व घटना घडतात त्या त्याच्याच मुळे घडतात असा त्याचा दृढ निश्‍चय असतो. वाईट घडले तरी ते त्याच्याच मुळे व चांगले घडले तरीही ते त्याच्याच मुळे घडते. अशा विचारांनी मनाला सुख-दुःख होत नाही. मन विचलित होत नाही. गुरूंच्या मंत्रामध्ये तो रममान होतो. अशा अवस्थेत त्याला ज्ञानाचा लाभ होतो. गुरूच्या मंत्रातून ओसंडणाऱ्या ज्ञानात तो मनसोक्त डुंबतो. तोच समाधी अवस्थेत जातो. त्यालाच आत्मज्ञानाचा लाभ होतो.


Saturday, March 2, 2019

कैं तो स्वामी भेटेल




आपण देवाला भेटायला जात असलो, तरी तोच आपणाला बोलावत असतो. तोच आपली वाट पाहात बसलेला असतो. सद्‌गुरूही चांगल्या भक्तांची वाट पाहात असतात. चांगल्या भक्तांना ते हाका देत असतात. त्याच्यामध्ये ओढ हे तेच उत्पन्न करत असतात. ते द्यायला बसलेले असतात फक्त आपले मन आपण त्यात गुंतवायला हवे.

म्हणे कैं हें बिरडे फिटेल । कैं तो स्वामी भेटेल ।
युगाहिहूनि वडिल । निमिष मानीं ।। 378 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - तो म्हणतो, या गुरू आशारुपी दाव्याची गाठ केव्हा सुटेल व केव्हां तो स्वामी भेटेल? तो (गुरूच्या वियोगांत जाणाऱ्या) निमिषाला युगाहून मोठे मानतो.

देवाला भेटण्याची मनात इच्छा असेल तर देव निश्‍चितच भेटतो. तो तर तुमची वाटच पाहात बसलेला असतो. दर्शनाच्या लांबच्या लांब रांगा असल्या तरी दर्शन घडतानाचा अनुभव काही वेगळाच असतो. ढकलाढकलीत देवाकडे पाहात आपण कसे पुढे सरकतो हे समजतही नाही. ढकलून बाहेर काढल्यावर आपण भानावर येतो. ढकलणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर आपण राग काढतो. देवाचे नखशिखांत दर्शन घेत असताना दोन मिनिटे तेथे थांबण्यासही दिले जात नाही. काही क्षणच देवासमोर आपण उभे असतो. पण तो प्रसंग आपल्या मनात कायम राहातो. तो अनुभव आपण वारंवार इतरांना सांगत असतो. त्यावेळी झालेली नजरा नजरा आपल्या सदैव मनात असते. अडचणीच्या प्रसंगी तो क्षण आपणास तत्काळ आठवतो. पुन्हा भेटायला येतो, माझे एवढे काम कर अशी विनवणीही आपण देवाला करतो. काम झाले की पुन्हा भेटणे आहेच. पण दर्शनाचा प्रसंग आपल्या नित्य स्मरणात राहातो. काही क्षणांची ती भेट आपल्या नित्य स्मरणात असते. वारंवार भेट घडावी असे वाटत असते. कदाचित याचमुळे कामात अडथळे येत असावेत. वारंवार त्याचे स्मरण व्हावे, ती ओढ कायम राहावी, यासाठीच अडचणी येत असाव्यात. दुःखाच्या, अडचणीच्या प्रसंगीच देवाची आठवण होते. पण सुखाच्या क्षणात स्मरण होत नाही. भक्तांच्या वाटेवर यामुळेच काटे असावेत. जीवनात अडचणी आल्यातरी डगमगता कामा नये. त्यांना धैर्याने सामोरे जायला हवे. हे धैर्य देवाच्या दर्शनातून येते. त्याच्या स्मरणातून येते. मागणे एकच असावे देवा तुझे नित्य स्मरण राहावे. स्मरण गेले की मग अडचणींचा महापूर येतो. नित्य स्मरण असेल तर अडचणी नसतात. सुखातही स्मरण ठेवले, तर सुख द्विगुणित होते. देवाच्या दारात नित्य सुखाचा झरा ओसंडून वाहत आहे. त्या झऱ्यात डुंबायला शिकले पाहिजे. तो कधीही आटत नाही. देव भेटावा. त्याचे दर्शन घडावे. अशी आपली इच्छा असते. पण ती इच्छाही उत्पन्न तोच करत असतो. तोच बोलावत असतो. त्याच्याच इच्छेने दर्शन घडत असते. भक्ताला त्रास होऊ नये याची काळजी तोच करत असतो. आपण देवाला भेटायला जात असलो, तरी तोच आपणाला बोलावत असतो. तोच आपली वाट पाहात बसलेला असतो. सद्‌गुरूही चांगल्या भक्तांची वाट पाहात असतात. चांगल्या भक्तांना ते हाका देत असतात. त्याच्यामध्ये ओढ हे तेच उत्पन्न करत असतात. ते द्यायला बसलेले असतात फक्त आपले मन आपण त्यात गुंतवायला हवे.



शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार कशा ?




राज्यात गेल्या वीस वर्षांत शेतीचे प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, शेतमालाच्या दराचा प्रश्नही प्रामुख्याने चर्चेत राहातो आहे. शेतीच्या या प्रश्नांकडे सरकारने केवळ तात्पुर्त्या उपाययोजना केलेल्या पाहायला मिळतात. सरकार कोणतेही असो त्यांनी फक्त यावर चर्चा केली व तात्पुर्ते पर्याय शोधून उपाय योजना केली. त्यामुळे या प्रश्नांची तीव्रता ही काही काळापूरती कमी झाली, पण हे प्रश्न कायमस्वरूपी सुटावेत असा कोणताही उपाय यामध्ये केलेला दिसत नाही.

महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास बदललेल्या शेती पद्धतीकडे फारसे लक्ष दिले गेलेले नाही असेच म्हणावे लागेल. नव्वदच्या दशकात जागतिकीकरणास जसा प्रारंभ झाला तसा देशातील बाजारपेठेसह सर्वच क्षेत्रावर याचा परिणाम दिसू लागला. या बदलाचा शेतीवरही परिणाम झाला. पण होणारे बदल लक्षात घेऊन शेतीमध्ये दुरदृष्टी ठेऊन बदल केले गेले नाहीत. याचाच परिणाम सध्या शेतीवर दिसून येत आहे. जागतिकीकरणानंतर देशात शेतीवर असणारा बोझा कमी करण्याचाच प्रयत्न केला गेला. प्रत्यक्ष शेतीत वाढत चाललेल्या समस्यांकडे दुर्लक्ष केले गेले. नवे तंत्रज्ञान जरूर आले. टीव्हीतर आधीच आला होता, पण नंतर मोबाईल, इंटरनेट आले आणि त्यांनी तर सगळे जीवनच बदलून टाकले. शेतीमध्येही नवे तंत्रज्ञान आले. पण  यामुळे शेतीचे चित्र बदलताना समस्याही वाढल्या. माणसाच्या गरजाच बदलल्या. जीवन अधिक वेगवान झाले. माणसाच्या जीवनशैलीत झालेला हा बदल त्याच्या दैनंदिन आहारावरही झाला. ज्वारी, बाजरीच्या भाकरीची जागा गव्हाच्या चपातीने घेतली. अन् महाराष्ट्राच्या शेतीत साहजिकच ज्वारी, बाजरीचे क्षेत्र घटू लागले. या बरोबरच तृणधान्याचेही क्षेत्र घटले. गव्हाचे क्षेत्र मात्र त्या प्रमाणात वाढले नाही. पण ज्वारी, बाजरीची जागा उसाने घेतली.

महाराष्ट्रात १९६०-६१ मध्ये ज्वारीचे क्षेत्र ६२८४ हजार हेक्टर तर १९९०-९१ मध्ये ६३०० हजार हेक्टर होते. याचा अर्थ स्वातंत्र्यानंतर १९९०-९१ पर्यंत ज्वारीचे क्षेत्र वाढले नाही पण ते स्थिर राहीले. त्यानंतर मात्र ज्वारीच्या क्षेत्रात घसरण सुरु झाली. २०००-०१ मध्ये ५०९४ हजार हेक्टरपर्यंत तर २०१०-११ मध्ये ४०६० हजार हेक्टरपर्यंत खाली घसरले. अद्यापही ज्वारीच्या क्षेत्रात घटच होताना पाहायला मिळत आहे. २०१६-१७ मध्ये हे क्षेत्र ३६१६ हजार हेक्टर असल्याची नोंद आहे.

बाजरीच्या बाबतही अशीच स्थिती पाहायला मिळते. महाराष्ट्रात १९६०-६१ मध्ये बाजरीचे क्षेत्र १६३५ हजार हेक्टर तर १९९०-९१ मध्ये १९४० हजार हेक्टर होते. याचा अर्थ स्वातंत्र्यानंतर ९० च्या दशकापर्यंत बाजरीचे क्षेत्र वाढत राहीले. त्यानंतर मात्र  बाजरीचे क्षेत्रात घसरण सुरु झाली. २०००-०१ मध्ये १८०० हजार हेक्टरपर्यंत तर २०१०-११ मध्ये १०३५ हजार हेक्टरपर्यंत खाली घसरले. २०१६-१७ मध्ये तर हे क्षेत्र ८३७ हजार हेक्टरपर्यंत खाली घसरल्याचे पाहायला मिळते. ज्वारी, बाजरीची जागा आहारात गव्हाने घेतली पण राज्यात गव्हाचे क्षेत्र त्याप्रमाणात वाढल्याचे दिसत नाही. १९६०-६१ मध्ये गव्हाचे क्षेत्र ९०७ हजार हेक्टर तर १९९०-९१ मध्ये ८६७ हजार हेक्टर होते. २०११-१२ मध्ये ते १३०७ हजार हेक्टर तर २०१६-१७ मध्ये १२७२ हजार हेक्टर क्षेत्र राहीले. मग ज्वारी आणि बाजरीची जाग घेतली कोणी? हा प्रश्न साहजिकच पडणे शक्य आहे.
 

ज्वारी, बाजरीच्या शेतात आता ऊस दिसत आहे. १९६०-६१ मध्ये अवघ्या १५५ हजार हेक्टरवर पिकवला जाणारा ऊस १९९०-९१ मध्ये ५३६ हजार हेक्टर तर २०१०-११ मध्ये ६८७ हजार हेक्टर पर्यंत वाढला. ही वाढ आत्ताही वाढतानाच पाहायला मिळत आहे. २०१६-१७ मध्ये १०४१ हजार हेक्टरवर उसाची लागवड झाल्याची नोंद आहे. याचा अर्थ दहा पटीने उसाचे क्षेत्र वाढले. साहजिकच त्या प्रमाणात राज्यात साखर कारखानेही वाढले. कोल्हापूर जिल्ह्यात ९० च्या दशकात दहा-बारा असणारे साखर कारखाने आता २२ च्यावर गेले आहेत. यंदाच्या हंगामात १५ सहकारी तर सात खासगी असे २२ साखर कारखान्यात उसाचे गाळप करण्यात आले. राज्यात साखर कारखान्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे आता ऊस क्षेत्रात घट होणे हे निश्चितच लाभदायक असूच शकत नाही. तरीही नितीन गडकरी यांच्यासारखे तज्ज्ञ मंत्री शेतकऱ्यांनी ऊस घेऊ नये असा सल्ला देताना दिसत आहेत. उसाच्या दराचे आंदोलन तर नेहमीचेच झाले आहे. मुळात ऊसाला मिळणारा हमी भाव व कीड रोगाचे कमी प्रमाण लक्षात घेऊन शेतकऱ्यांचा ऊसाकडे ओढा वाढला. पण आता त्यामध्येही दराचा प्रश्न नित्याचा होताना पाहायला मिळत आहे.

उसाचे क्षेत्र वाढल्याने सिंचन क्षेत्र वाढले. तसे पाण्याचीही समस्या भेडसावत आहे. दरवर्षी दुष्काळ हा नित्याचा होताना पाहायला मिळत आहे. दुष्काळी भागात वाढलेले साखर कारखाने हे नियोजन शुन्य कारभाराचे लक्षण आहे. जानेवारीपासूनच काही भागात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. ग्रामीण भागात पाण्याचे नियोजन कोलमडलेले आहे. पण आता आपण  ऊस लागवडही बंद करू शकत नाही. याचा फटका राज्याच्या आर्थिक स्थितीवरही बसू शकतो. ज्वारी, बाजरी गेली अन् जानेवारीनंतर चारा टंचाईचीही समस्या भासू लागली आहे. पूर्वीच्याकाळी ज्वारीचा कडबा जनावरांना खायला घातला जात होता. हिवाळ्यात हिरव्या गवताबरोबर कडबाही दिला जायचा पण आता गवतही नाही ज्वारीचा कडबाही नाही. मग चाऱ्याची समस्या भेडसावणारचा ना ? सरकारपुढे ही समस्याही जानेवारीनंतर भेडसावू लागते. पशुधनात यातूनच घट झाली आहे. याचमुळे शेणखतही मिळणे कठीण झाले आहे. असे एकावर एक प्रश्न शेतीमध्ये वाढत चाललेले पाहायला मिळतात.

चारा टंचाईवर चारा छावण्या हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. ती तात्पुरती केलेली उपाययोजना आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी टँकर ही सुद्धा तात्पुरर्ती उपाययोजनाच आहे. सरकार कोणताही उपाय कायमस्वरूपी योजनाता दिसत नाही. तात्पुर्ती मलमपट्टी करून जखम भरायची इतकेच केले जाते. पण या जखमा दरवर्षी भेडसावत आहेत. याचा विचार सरकारने करायला नको का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावरही अशीच मलमपट्टी केली जाते. केवळ पैसे दिले म्हणजे समस्या सुटली असे होत नाही. मतांची पोतडी भरण्यासाठी पैसे वाटप हा आता राजकिय धंदाच झाला आहे. अशा या कारभारामुळे शेतीच्या समस्या केव्हाच सुटणार नाहीत.

कोकणी लोक नेहमी म्हणतात कोकणात एकातरी शेतकऱ्याची आत्महत्या झाल्याचे उदाहरण द्या. इथे का झाल्या नाहीत आत्महत्या. कारण वर पाहीलेली आकडेवारी ही पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील आहे. ज्वारी कोकणात पिकवलीच जात नाही. मग तेथे भात पिकवला जातो. भाताचे 1960-61 मध्ये 1300 हजार हेक्टर क्षेत्र होत. 1990-91 मध्ये ते 1597 हजार हेक्टर झाले. 2011-12 मध्ये ते 1516 हजार हेक्टर होते तर 2016-17 मध्ये 1532 हजार हेक्टर राहीले. याचा अर्थ भाताच्या लागवड क्षेत्र हे तुलनेत कमी झालेले नाही. पण 90 च्या दशकानंतर ते स्थिरही राहीले आहे. खऱ्या समस्या ह्या 90 च्या दशकानंतर भडसावू लागल्या आहेत. तेथे कोकणात मात्र काहीच बदल झाला नाही. आहे ते त्यांनी टिकवून ठेवले आहे. मग तेथे कशा आत्महत्या होतील. कोकण रेल्वे आली. इतरही बदल झाले पण त्यांनी स्वतःची शेती टिकवून ठेवण्यावरच भर दिला. आहे त्यात समाधान मानत त्यांनी विकास साधला. अशा या गोष्टीचा परिणाम त्यांच्या मानसिक स्थितीवर राहील्याने तेथे साहजिकच आत्महत्या होऊ शकल्या नाहीत. कोकणी माणसाचा हाच आदर्श उर्वरित महाराष्ट्राने घ्यायला हवा. अद्यापही वेळ गेलेले नाही. पण शेतीचे नियोजन करताना सर्व गोष्टींचा विचार करून शेती करायला हवी तरच शेती टिकू शकेल.

चारा टंचाई भेडसावते मग उसाच्या शेतात ज्वारीचे आंतरपिक का घेतले जाऊ शकत नाही. त्यामुळे कडबाही उपलब्ध होऊ शकेल. ज्वारीची भाकरीही मिळू शकेल. असे काही उपाय योजून किंवा सरकारनेही अशा उपाय योजना सुचवून भेडसावणाऱ्या समस्यावर तोडगा काढायला हवा. पण  ते होत नाही कारण आपणास आता सरकारवर अवलंबून राहायची सवय लागली आहे. निवडणूका आल्या की सरकार पैशाच्या थैल्या देते अन् शेतकरीही त्यावर खूष होऊन सरकारला मते देतो. अशा या कारभाराने समस्या मात्र जशाच्या तशाच राहात आहेत. आता हा बदल केव्हा होणार कि आपण असेच राहणार. अशाने शेती प्रधान देश मात्र आपला राहणार नाही हे मात्र निश्चित. देशातील शेती टिकवायची असेल तर सरकारने प्रथम आपले विचार व कृती बदलायला हवी. केवळ मतांचे विचार डोक्यात ठेऊन विकासाची भाषा करणे आता चालणारे नाही. शेतकऱ्यांनीही याचा विचार जरूर करायला हवा, असे वाटते.