Tuesday, March 19, 2019

अनुभवातून गाठू विवेकाचे गाव


ज्ञानेश्वरीतील ओव्यावर आधारित असणारे अनुभव ज्ञानेश्वरी ह्या पुस्तकाचा परिचय

ज्ञानेश्वरी हा मराठीचा मानबिंदू मानला जातो. संस्कृतातील गीता सर्वसामान्यांच्या भाषेत आणताना संत ज्ञानेश्वरांचे कवित्व येथे फुलले आहे. त्यामुळेच ज्ञानेश्वरीबाबत एक तरी ओवी अनुभवावी असे म्हटले जाते अनेक वेळा अध्यात्म आपल्या दैनंदिन आयुष्याशी जोडले जाण्याऐवजी संन्यास किंवा संसारातून निवृत्तीशीच प्राधान्याने जोडले जाते. त्यामुळे एका प्रतिभाशाली काव्याला आपण मुकत असतो. सामान्य आयुष्यामध्ये येत असलेल्या अनुभवांशी या तत्त्वज्ञानाची सांगड घालण्याचा प्रयत्न लेखकाने अत्यंत सोप्या भाषेत केला आहे. साडे सातशे वर्षांपूर्वीच्या ज्ञानेश्वरांच्या भाषेचा गोडवा सर्वसामान्यांच्याही अनुभवात उतरवण्यास मदत होणार आहे. अभ्यासातून, सरावातून कधीकधी शब्द पाठ होतात. ते रोज मंत्राप्रमाणे पुटपुटले ही जातात, मात्र ते शब्द आपल्या कार्यात सततच्या विचारात घोळत राहिल्यास ध्यानसाधना सोपी होते. येथे केवळ मार्क मिळवायचे नाहीत, त्यामुळे कसे पोहायचे हेच शब्दापेक्षा तुम्हाला पोहुनच दाखवावे लागते त्यामुळे अनुभवाचे महत्त्व मोठे आहे
- ज्ञानेश्वरांचे विवेकाचे गाव आजच्या खेड्याशी जोडताना निर्मलग्राम, आदर्शगाव यासारख्या योजनातून पर्यावरण समृद्ध गावाकडे वाटचाल करणारे गाव लेखकाला आठवते
- जे जया वाटा सूर्य जाये । तेऊते तेजाचे विश्व होये । या ओवीशी लेखक जोडला जातो तो गॉड पार्टिकल सारख्या अत्याधुनिक संशोधनाच्या विचारातून.
- संशयाचे निराकरण, व्रत आणि नियमांचेही विश्लेषण करत गुरू-शिष्यांच्या संवादातून उलगडलेले गीतेचे तत्वज्ञान सामान्यांच्या भाषेत आणणाऱ्या ज्ञानेश्वरांशी लेखक आपल्याला जोडत जातो. हे तादात्म्य सामान्य वाचकही अनेक वेळा अनुभवू शकतो, यात शंका नाही
- ज्ञानेश्वरीचे अनेक वेळा पारायण करणारे आणि शब्दाला शब्द जोडत ज्ञानेश्वरीचा अर्थ लावणारे दोहोंसाठी हे पुस्तक अमूल्य ठेवा ठरणार आहे
- मात्र ज्ञानेश्वरीचे प्रवचन असे या पुस्तकाचे स्वरूप नाही हे लक्षात ठेवावे ज्ञानेश्वरीचे वाचन करताना लेखकाला जे स्फुरले, भावले काही अनुभवास आली ते वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न असल्याचा प्रांजळ विचार या पुस्तकामागे आहे. त्यामुळे अनेकदा ओवी आणि त्यातील अनुभव यात संदर्भ सोडून अनेक विचार डोकावतात.

पुस्तक - अनुभव ज्ञानेश्‍वरी
लेखक - राजेंद्र घोरपडे
प्रकाशक - श्री अथर्व प्रकाशन

No comments:

Post a Comment