Saturday, March 16, 2019

ज्योतिष



ज्योतिष शास्त्राबाबतही नेमके हेच घडले. या शास्त्राचा काही स्वार्थी व्यक्तींकडून दुरुपयोग केला गेला. अशाने हे शास्त्र थोतांड वाटू लागले. यामध्ये आता जादूटोणा, कर्मकांडे शिरली आहेत. नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा उठविणारे या समाजात अनेकजण आहेत. यावर कायदा करून हा प्रश्‍न सुटणार नाही, हेही तितकेच खरे आहे. प्रबोधनाचा हा मार्ग आहे. संतांनी याबाबत जनजागृती केली.

कर्मकांड तरी जाणें । मुखोद्‌त पुराणें ।
ज्योतिषी तो म्हणे । तैसेचि होय ।। 828।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - तो कर्मकांड जाणतो. पुराणे त्याला तोंडपाठ आहेत आणि जो ज्योतिषशास्त्रात इतका निष्णात आहे की, तो भविष्य करील तसेच घडते.

आत्मज्ञानी संतांना शिष्याची कुंडली तोंडपाठ असते. अंतर्ज्ञानाने त्यांना याचे ज्ञान असते. ज्योतिषी अंतर्ज्ञानी असतोच असे नाही. त्यामुळे पुस्तकी, पंडिती ज्ञानावर त्याचे भाष्य असते. पंचागाच्या आधारे तो कुंडली तयार करतो. ज्योतिष हे एक शास्त्र आहे. पण हे शास्त्र पुर्वीच्याकाळी विकसित कसे झाले. ग्रहांचा शोध, पृथ्वी गोल आहे याचा शोध तर अलीकडच्या काळात लागला आहे. मग त्याकाळात हे ग्रह कसे काय माहित होते? आत्मज्ञानी संतांनी त्यांच्या अंतर्ज्ञानाने हे सर्व शोध लावले. त्यातूनच हे शास्त्र विकसित झाले. हाताची पाचही बोटे सारखे नसतात. तसे समाजामध्ये सर्वजण सारखे नसतात. काही चांगले तर काही वाईट विचारांचे असतात. काही दुष्टवृत्तीचे असतात. अशा व्यक्तींच्या विचारातून मग या शास्त्राचा दुरुपयोग झाला. तसे सर्वच शास्त्राचा गैरफायदा उठविणाऱ्या व्यक्ती प्रत्येक समाजामध्ये असतात. अणूचा उपयोग ऊर्जेसाठी करता येतो. पण त्यापासून अणूबॉंम्बही तयार केला जातो. काही विध्वंसक व्यक्ती याचा गैरफायदा उठवितात. दहशतवाद माजविण्यासाठी स्फोट घडवितात. शास्त्राचा उपयोग चांगल्यासाठी केला तर समाजात अनेक सुधारणा होऊ शकतील. समाजात सुख, शांती नांदेल. गैरफायदा उठविण्याचा विचार केला तर समाजात अशांतता पसरेल. ज्योतिष शास्त्राबाबतही नेमके हेच घडले. या शास्त्राचा काही स्वार्थी व्यक्तींकडून दुरुपयोग केला गेला. अशाने हे शास्त्र थोतांड वाटू लागले. यामध्ये आता जादूटोणा, कर्मकांडे शिरली आहेत. नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा उठविणारे या समाजात अनेकजण आहेत. यावर कायदा करून हा प्रश्‍न सुटणार नाही, हेही तितकेच खरे आहे. प्रबोधनाचा हा मार्ग आहे. संतांनी याबाबत जनजागृती केली. कायद्याने शिक्षा केली जाऊ शकते. यावर धाक बसविला जाईल, पण मुळ समस्या सुटणार नाही. जादूटोणा, कर्मकांडे याबाबत प्रबोधन केल्यास या मार्गाकडे कोणी वळणार नाही. मुळात जनता अशा गोष्टी वळलीच नाही, तर गुन्हे घडणारच नाहीत. समाजात कायद्याचा धाक निर्माण करण्याऐवजी गुन्हे घडणार नाहीत यावर अधिक भर द्यायला हवा. तरच समाजात सुखशांती नांदेल. गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन घाव घालायला हवा. तरच हे प्रश्‍न सुटणार आहेत. संतांनी हेच केले. समाज जागृत केला. सध्या ही जागृतीची प्रक्रियाच दूषित झाली आहे. यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. प्रबोधन सुद्धा योग्य प्रकारे व्हायला हवे. यासाठी आत्मज्ञानाची बीजे येथे रूजवायला हवीत. म्हणजे सर्व अंधश्रद्धा आपोआप नष्ट होतील. आत्मज्ञानाचा प्रसार हाच यावरचा उपाय आहे.

No comments:

Post a Comment