Thursday, March 14, 2019

स्मरण




मोह किती असावा याचे भान ठेवायला हवे. आवडीचे पदार्थ जेवणात असतील, तर ते खाताना भान राहात नाही. मोहामुळे भान हरवते. आपण खातच राहातो. खातच राहातो. जेवणाच्या ताटावरून उठताना लक्षात येते की जेवण जास्त झाले आहे. किती खायचे याला मर्यादा आहेत. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा नसतो. सदैव भानावर राहाण्यासाठी मोहावर आवर घालायला हवा.

बेडूक सापाचां तोंडी । जातसे सबुडबुडी ।
तो मक्षिकाचिया कोडीं । स्मरेना कांही ।। 730।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - बेडूक सापाच्या तोंडात सगळा गिळला जात असतांनाही माशांचे समुदाय तो गिळतो पण आपण मरतो, ही आठवण त्याला नसते.

बेडकाला माशी खाण्याचा मोह आवरता येत नाही. सापाच्या तोंडात बेडूक सापडला, तरी त्याचा हा मोह काही सुटत नाही. समोर मृत्यू आहे, याचे सुद्धा भान त्याला नसते. स्वतः सापाच्या तोंडातून सुटण्यापेक्षा तो माशी खाण्यासाठीच धडपडतो. माणसाची सुद्धा अशीच अवस्था असते. त्यालाही मोह आवरता येत नाही. मोहाने तो चुका करतच राहातो. आपल्या चुका दुसऱ्याच्या निदर्शनास आल्या आहेत, याचे भानच त्याला नसते. स्मृतीभ्रंश उतार वयात होतो. आयुष्य किती राहिले आहे, याचे भानच या वयात नसते. पण संपत्ती जमा करण्याचा काहींना मोह सुटत नाही. या वयात मुलांच्या प्रगतीचा विचार करण्याऐवजी अनेकजण त्यांना दोष देऊन संपत्तीत त्यांना वाटा देण्यासही तयार नसतात. मुलांना त्यांचा वाटा देऊन त्यांना सुखी करावे, आनंदी करावे असा विचार त्यांना सुचतच नाही. मुलांच्या आनंदात आनंद पाहणे त्यांना समजतच नाही. स्वतः कमावलेली संपत्ती स्वतःच्या मुलांना देण्याचा मोह होत नाही. इतका संपत्तीचा त्यांना मोह असतो. मोहाने स्मरण होत नाही. मोहाचा प्रभाव वाढला तर हा परिणाम होतो. यासाठी कोणत्याही गोष्टीचा अतिमोह टाळावा. मोहात अडकलो जाणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. एकदा एक चोर चोरी करायला गेला. त्याला अमाप संपत्ती दिसली. तो या संपत्तीच्या मोहात पडला. पण तितकी संपत्ती वाहून नेण्यासाठी त्याच्याकडे बळ नव्हते. पण या संपत्तीचा मोह त्याला आवरता आला नाही. त्याने ती सर्व संपत्ती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यात त्याचा वेळ गेला. त्याला चोरी करून लगेच जाण्याचे स्मरणच झाले नाही. त्याची चोरी पकडली गेली. आवश्‍यकतेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्याने तो अडचणीत सापडला. मोह किती असावा याचे भान ठेवायला हवे. आवडीचे पदार्थ जेवणात असतील, तर ते खाताना भान राहात नाही. मोहामुळे भान हरवते. आपण खातच राहातो. खातच राहातो. जेवणाच्या ताटावरून उठताना लक्षात येते की जेवण जास्त झाले आहे. किती खायचे याला मर्यादा आहेत. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा नसतो. सदैव भानावर राहाण्यासाठी मोहावर आवर घालायला हवा. हेच यातून शिकायचे आहे. लक्ष विचलित होऊ नये यासाठी मोह नियंत्रणात ठेवावा. अति मोहाने स्मृतिभ्रंश होतो.
      

No comments:

Post a Comment