Monday, September 10, 2018

संग्राम

  तवं संग्रामीं सज्ज जाहले । सकल कौरव देखिले ।
लीला धनुष्य उचलिलें । पंडुकुमरें ।। 168 ।। अध्याय 1 ला

ओवीचा अर्थ - तेव्हां युद्धाला तयार झालेले सर्व कौरव अर्जुनाला दिसले. मग पांडूपुत्र अर्जुनाने लीलेनेच धनुष्य उचलून घेतले.

साधना हे एक युद्ध आहे. पण हे युद्ध कोणाशी? स्वतःतील दुर्गुणां विरुद्ध हे युद्ध आहे. सगुणांचे दुर्गुणाविरुद्ध युद्ध आहे. दुर्गुण कमी केले नाहीत, तर सगुणांचा पराभव होईल. यासाठी वेळीच सावध व्हायला हवे. युद्धाच्या आरंभी आपले शत्रू कोण आहेत यावर एक नजर टाकायला हवी. त्यांना ओळखायला हवे. त्यांना समजून घ्यायला हवे. त्यांचा पराभव कसा करता येईल याचेही नियोजन प्रारंभीच करायला हवे. साधनेत व्यत्यय आणणारा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू क्रोध हा आहे. या बरोबरच मोह, माया, मत्सर, द्वेष हे सुद्धा शत्रू आहेत. साधनेत मन शांत असायला हवे. चिडचिड, क्रोध यासाठीच दूर करायला हवे. दिवसभरात आलेल्या रागाचाही परिणाम संध्याकाळच्या साधनेवर होतो. यासाठी हा क्रोध आपण विसरण्याचा प्रयत्न करायला हवा. रागाने शरीरात विविध रस तयार होतात. या रसाचा परिणाम शरीरावर होतो. उतारवयात क्रोधाला यासाठीच आवर घालायला हवा. चाळिशीनंतर वागण्यात समजूतदारपणा यायलाच हवा. प्रौढत्व यायला हवेच. तरच आरोग्य उत्तम राहाते. आयुष्य वाढते. क्रोधामुळे शरीरात विविध रस उत्पन्न होतात. या रसायनांमुळे शरीराचा तोल ढळतो. बऱ्याचदा उतारवयात तोल जाण्याचा आजार पाहायला मिळतो. तो मुख्यतः क्रोधामुळे होतो. क्रोधीत न होणे हा या आजारावरील उत्तम औषध आहे. वयाच्या चाळिशीनंतर उत्पन्न होणारे अनेक आजार हे मानसिकतेशी निगडित आहेत. यासाठी मन आनंदी राहावे, यावर विशेष भर द्यायला हवा. मन आनंदी असेल तरच साधना उत्तम होते. मन साधनेच्या आनंदात रममान करायला हवे. साधनेच्या युद्धात क्रोधावर जिंकण्यासाठी मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. राग का येतो? चिडचिड का होते? मनामध्ये येणारे विचार यास कारणीभूत आहेत. यासाठी मनात येणारे विचार हेच मुळात राग मुक्त असावेत. राग आलाच तर त्याचा त्याग करण्याचा प्रयत्न करायला हवा. राग आवरायला शिकावे. रागमुक्त जीवन, रागमुक्त मन घडवायला हवे. तशी जीवनशैली निर्माण करायला हवी. बोलण्यात, वागण्यात तसा बदल घडवायला हवा. राग आलाच तरी तो पचवता यायला हवा. राग व्यक्त होता कामा नये. असे वागणे हवे. प्रेमाने त्यावर मात करायला हवी. वागण्यातून प्रेम व्यक्त व्हायला हवे. क्रोधाला प्रेमाने जिंकायला हवे. तरच मनाने साधना साध्य होईल. शरीरात उत्पन्न होणारी रसायने ही प्रेम स्वरूप असतील. ही रसायनेच खऱ्या स्वरूपाचे दर्शन घडवतील. सद्‌गुरू स्वरूपाचे दर्शन होण्यासाठी क्रोधाला मनातील प्रेमाच्या झऱ्यात बुडवायला हवे. क्रोधाचा पराभव केला तर आपला साधनेतील विजय निश्‍चितच होतो.

Friday, September 7, 2018

संशय



म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर ।
हा विनाशाची वागुर । प्राणियांसी ।।

संशयामुळे मनाची स्थिरता विचलित होते. घरात शांती नांदायची असेल. दोघांचा संसार चागला चालावा असे वाटत असेल तर संशयास थारा देता कामा नये. काही नसले तरी मनात संशयाची पाल चुकचुकतेच. पण याकडे दुर्लक्ष करून त्यावर मात करता येते. घरातच आपण अनेक गोष्टीवर संशय व्यक्त करतो. याचा आपल्या जीवनावरही परिणाम होतो. खिशातले पैसे कमी झाले असे वाटले की लगेच, जोडीदाराने खिशातील पैसे हळूच काढून घेतले आहेत का? असा अनेकदा संशय व्यक्त केला जातो. त्यातून चिडचिड होते. दोघांमध्ये कडाक्‍याचे भांडणही होते. नंतर आठवते की पैसे वेगळ्याच गोष्टीवर खर्च केले होते. मग काय माफीनामा. पण मन तेही करायला तयार होत नाही. चूक मान्य करण्यात आपणास लाज वाटते. कमीपणा वाटतो. पण अशाने नाते संबंध ताणत जातात. याचा विचारला करायला नको का? काही वेळेला तर अशाने घटस्फोटापर्यंत प्रकरणे जातात. संशयामुळे इतकी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. संशयच व्यक्त केला नाही तर, हा प्रसंग उद्‌भवणारही नाही. पोलिसांची वृत्ती ही संशयी असते. प्रत्येक गोष्टीकडे ते याच दृष्टीने पाहतात. एखाद्याने चोरी केलेली नसली, तरी त्याला संशयाने पकडून बेधम मारहाण करून त्याला चोरी केली असल्याचा जबाबही नोंदवितात. संशयामुळे अशा चुका अनेकदा घडतात. खून न केलेल्या व्यक्तीसही तुरुंगवास भोगावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. संशयाने शिक्षा कधी दिली जाऊ नये. नंतर पश्‍चात्ताप करावा लागतो. गुन्हा न करणारी व्यक्तीही नंतर मोठा गुन्हा करू शकते. संशयावर मात करायची असेल तर, सत्य जाणून घ्यायला हवे. सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा. पैसे जोडीदाराने घेतल्याचा संशय घेण्याऐवजी आपण कोठे खर्च केलेत का? कोठे ठेवले होते? कोठे पडले का? याचा विचार प्रथम करायला हवा. पण तसे होत नाही. संशय घेऊन आपण स्वतःच स्वतःला त्रास करून घेतो. यामुळे आपले मानसिक संतुलन ढासळते. याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. मानसिक विचारांमुळे आपल्या शरीरात विविध रसायने उत्पन्न होत असतात. पीत्त म्हणजे हे रसायनच आहे. रागामुळे पीत्त उसळते. यासाठी मानसिक संतुलन ठेवणे खूप गरजेचे आहे. शांत मनामुळे शरीरास आवश्‍यक रसायनांचीच निर्मिती होते. साधनेमुळे मनातील राग नियंत्रित करता येतो. साहजिकच जहाल, शरीराला मारक ठरणाऱ्या अशा रसायनांची निर्मिती यामुळे कमी होते. याचा परिणाम शरीरावर निश्‍चितच दिसून येतो. शांत माणसांना आजारही कमी होतात. यासाठीच संशयाने मनास पिडा देणे योग्य नाही.

Wednesday, September 5, 2018

गुरू शिष्य



जे गुरुशिष्यांची गोठी । पदपिंडाची गांठी ।
तेथ स्थिर राहोनि नुठी । कवणें काळीं ।।

नाथ परंपरेमध्ये ज्ञान हे गुरूकडून शिष्यास दिले जाते. यामुळे गुरूशिष्याच्या या नात्यास महत्त्व आहे. सद्‌गुरू हे आत्मज्ञानी असतात. त्याचा उपदेश हा उपयुक्त असतो. त्यांच्या उपदेशामुळेच गुरू-शिष्यांचे नाते दृढ होते. एक उद्योगपती सद्‌गुरूंच्यांकडे उपदेशासाठी आला. त्याची आई आजारी होती. तिला झटका आला होता. ती कोमात होती. तिला शुद्धीवर आणण्याचे सर्वप्रयत्न सुरू होते. पण ती शुद्धीवर येत नव्हती. नेमके कारण डॉक्‍टरांनाही समजत नव्हते. या समस्येने त्रस्त उद्योगपती अखेर सद्‌गुरूंच्या चरणी आला. त्याने सद्‌गुरूंना याबाबत विचारले. सद्‌गुरूंनी त्याला आईचे दात मोजण्यास सांगितले. ते सर्व व्यवस्थित आहेत का? याबद्दल पाहाण्यास सांगितले. सद्‌गुरू आत्मज्ञानी होते. त्यांनी नेमके कारण ओळखले होते. उद्योगपती लगेच दवाखान्यात गेला आणि त्याने डॉक्‍टरांना हा प्रकार सांगितला. डॉक्‍टर हसले आणि त्यांनी या उद्योगपतींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. उद्योगपतीने मग स्वतःच आईचे सर्व दात आहेत का पाहिले. तर खरच त्यातील दोन दात नव्हते. त्याने लगेच त्या डॉक्‍टरांना याबाबत कल्पना दिली. त्यानुसार डॉक्‍टरांनी आईची तपासणी केली. त्यात तिच्या पोटात दोन दात असल्याचे आढळले. ते काढण्यात आले आणि चमत्कार काय तर काही वेळातच त्या उद्योगपतीची आई शुद्धीवर आली. खरेतर त्या दातांच्या विष्यामुळेच ती शुद्धीवर येत नव्हती. सद्‌गुरूंना आत्मज्ञानाने दातामुळे समस्या असल्याचे समजले. डॉक्‍टरांना मात्र ते लक्षात आले नाही. आता येथे डॉक्‍टर श्रेष्ठ की सद्‌गुरू श्रेष्ठ. दोघेही ज्ञानी आहेत, पण आत्मज्ञानी संत सर्वज्ञानी असतात. त्यांना ती दृष्टी असते. यासाठी ते श्रेष्ठ असतात. यासाठीच आत्मज्ञानी संतांच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करू नये. विश्‍वास नसला तर कमीत कमी काय सांगितले आहे ते खरे आहे की खोटे आहे हे तपासायला तरी काहीच हरकत नाही. यामुळे आपला काही तोटा तर होत नाही. सद्‌गुरूचा हा उपदेश उद्योगपतींनी ऐकला. त्याची पडताळणी केली. त्यांनी स्वतः तपासणी केली म्हणूनच त्यांची आई शुद्धीवर आली. विज्ञानाने प्रगती जरूर केली आहे. पण ते ज्ञान योग्य प्रकारे वापरायला हवे. ते वापरण्याचे कौशल्य हवे. ते कौशल्य नसेल, तर सर्व व्यर्थ आहे. काही गोष्टी विज्ञानानेही समजत नाहीत. सुटत नाहीत. त्या आत्मज्ञानाने समजतात. त्या गोष्टी सोडविण्यासाठी यावर विश्‍वास ठेवायला हवा

Sunday, September 2, 2018

आत्मबोध


तें ज्ञान ह्रद्‌यीं प्रतिष्ठे । आणि शांतीचा अंकुर फिटे ।
विस्तार बहु प्रकटे । आत्मबोधाचा ।।

आत्मज्ञान प्राप्तीची एक पायरी आत्मबोधाची आहे. पण हा आत्मबोध कसा होतो? यासाठी काय करावे लागते? हे जाणून घेणे गरजेचे आहे. मी आत्मा आहे. हे ज्ञान जेव्हा होते. याची अनुभूती जेव्हा येते. तेव्हा या ज्ञानाची प्रतिष्ठापना ह्रद्‌यात होते. सोह्‌मचा जप जेव्हा ह्रद्‌यात प्रकट होतो. श्‍वासावर जेव्हा आपले नियंत्रण राहाते. तेव्हा मन स्थिर होते. या स्थितीमध्ये मनात शांतीचा अंकुर फुटतो. यातूनच आत्मबोध वाढतो. हा अंकुर जसजसा वाढेल तसा आत्मबोध वाढतो. याचे वृक्षात रूपांतर होते. त्याला मग आत्मज्ञानाची फळे येतात. यासाठी साधना ही महत्त्वाची आहे. सद्‌गुरूंनी सांगितलेली सोह्‌म साधना नित्य करणे आवश्‍यक आहे. साधनेत मन रमवायला हवे. पण नेमके हेच होत नाही. धकाधकीच्या जीवनात तर आता हे अशक्‍यच वाटत आहे. गुरूकृपेशिवाय हे शक्‍य नाही. मुळात ही साधनाच सद्‌गुरू करवून घेत असतात. यासाठी त्यांच्याकडे ही विनवणी आपणच करायला हवी. तर मग आपोआपच ते ही साधन करवून घेतील. फक्त आपण सवड काढायला हवी. धावपळीच्या जीवनात सवडच मिळत नाही. खरंतर आता या धावपळीत गप्प बसणे म्हणजे स्वतःचे अस्तित्व संपविण्याचा प्रकार झाला आहे. यामुळे मनाला गप्प बसण्याचा, निवांतपणाचा विचारच डोकावत नाही. थांबला तो संपला. अशी अवस्था झाली आहे. यामुळे साधना करण्याकडे लोकांचा ओढा कमीच होत चालला आहे. साधना करणे म्हणजे फुकट वेळ घालविणे अशी समजूत आता होऊ घातली आहे. पण प्रत्यक्षात निवांतपणा, विश्रांतीही जीवनाला आवश्‍यक असते. प्रवास करताना काही ठिकाणी थांबे हे घ्यावेच लागतात. तरच प्रवास सुखकर होतो. नाहीतर अंगदुखी, अंग अवघडणे हे प्रकार सुरू होतात. जीवनाच्या प्रवासाचेही असेच आहे. त्यामध्येही काही थांबे घ्यायला हवेत. सततच्या कामात विरंगुळा हा हवाच. यासाठी पर्यटन आपण करतोच. पण दिवसभराच्या कामातही विरंगुळा हवा. थांबा हवाच. यासाठी दहा पंधरा मिनीटे साधना करायला हवीच. साधनेचे फायदे विचारात घेऊन तरी साधना करायला हवी. मनाला त्यामुळे थोडी विश्रांती मिळते. मन ताजेतवाने होते. धकाधकीच्या जीवनात याची मुळात गरज आहे. जीवनात यशाचे शिखर सर करण्यासाठी आत्मबोधाचे हे ज्ञान उपयुक्त ठरणारे आहे. धकाधकीच्या जीवनात व्यायाम नसल्याने अनेक आजार उत्पन्न होत आहेत. यासाठी मनाचा हा व्यायाम तरी नियमित करायला हवा. यामुळे मन ताजेतवाने होऊन नवनव्या कल्पनांना चालना मिळू शकेल. यासाठी तरी साधना करायला हवी. हीच वाट आत्मज्ञानाकडे निश्‍चितच नेईल.