Saturday, March 2, 2019

कैं तो स्वामी भेटेल




आपण देवाला भेटायला जात असलो, तरी तोच आपणाला बोलावत असतो. तोच आपली वाट पाहात बसलेला असतो. सद्‌गुरूही चांगल्या भक्तांची वाट पाहात असतात. चांगल्या भक्तांना ते हाका देत असतात. त्याच्यामध्ये ओढ हे तेच उत्पन्न करत असतात. ते द्यायला बसलेले असतात फक्त आपले मन आपण त्यात गुंतवायला हवे.

म्हणे कैं हें बिरडे फिटेल । कैं तो स्वामी भेटेल ।
युगाहिहूनि वडिल । निमिष मानीं ।। 378 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - तो म्हणतो, या गुरू आशारुपी दाव्याची गाठ केव्हा सुटेल व केव्हां तो स्वामी भेटेल? तो (गुरूच्या वियोगांत जाणाऱ्या) निमिषाला युगाहून मोठे मानतो.

देवाला भेटण्याची मनात इच्छा असेल तर देव निश्‍चितच भेटतो. तो तर तुमची वाटच पाहात बसलेला असतो. दर्शनाच्या लांबच्या लांब रांगा असल्या तरी दर्शन घडतानाचा अनुभव काही वेगळाच असतो. ढकलाढकलीत देवाकडे पाहात आपण कसे पुढे सरकतो हे समजतही नाही. ढकलून बाहेर काढल्यावर आपण भानावर येतो. ढकलणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर आपण राग काढतो. देवाचे नखशिखांत दर्शन घेत असताना दोन मिनिटे तेथे थांबण्यासही दिले जात नाही. काही क्षणच देवासमोर आपण उभे असतो. पण तो प्रसंग आपल्या मनात कायम राहातो. तो अनुभव आपण वारंवार इतरांना सांगत असतो. त्यावेळी झालेली नजरा नजरा आपल्या सदैव मनात असते. अडचणीच्या प्रसंगी तो क्षण आपणास तत्काळ आठवतो. पुन्हा भेटायला येतो, माझे एवढे काम कर अशी विनवणीही आपण देवाला करतो. काम झाले की पुन्हा भेटणे आहेच. पण दर्शनाचा प्रसंग आपल्या नित्य स्मरणात राहातो. काही क्षणांची ती भेट आपल्या नित्य स्मरणात असते. वारंवार भेट घडावी असे वाटत असते. कदाचित याचमुळे कामात अडथळे येत असावेत. वारंवार त्याचे स्मरण व्हावे, ती ओढ कायम राहावी, यासाठीच अडचणी येत असाव्यात. दुःखाच्या, अडचणीच्या प्रसंगीच देवाची आठवण होते. पण सुखाच्या क्षणात स्मरण होत नाही. भक्तांच्या वाटेवर यामुळेच काटे असावेत. जीवनात अडचणी आल्यातरी डगमगता कामा नये. त्यांना धैर्याने सामोरे जायला हवे. हे धैर्य देवाच्या दर्शनातून येते. त्याच्या स्मरणातून येते. मागणे एकच असावे देवा तुझे नित्य स्मरण राहावे. स्मरण गेले की मग अडचणींचा महापूर येतो. नित्य स्मरण असेल तर अडचणी नसतात. सुखातही स्मरण ठेवले, तर सुख द्विगुणित होते. देवाच्या दारात नित्य सुखाचा झरा ओसंडून वाहत आहे. त्या झऱ्यात डुंबायला शिकले पाहिजे. तो कधीही आटत नाही. देव भेटावा. त्याचे दर्शन घडावे. अशी आपली इच्छा असते. पण ती इच्छाही उत्पन्न तोच करत असतो. तोच बोलावत असतो. त्याच्याच इच्छेने दर्शन घडत असते. भक्ताला त्रास होऊ नये याची काळजी तोच करत असतो. आपण देवाला भेटायला जात असलो, तरी तोच आपणाला बोलावत असतो. तोच आपली वाट पाहात बसलेला असतो. सद्‌गुरूही चांगल्या भक्तांची वाट पाहात असतात. चांगल्या भक्तांना ते हाका देत असतात. त्याच्यामध्ये ओढ हे तेच उत्पन्न करत असतात. ते द्यायला बसलेले असतात फक्त आपले मन आपण त्यात गुंतवायला हवे.



No comments:

Post a Comment