Wednesday, March 6, 2019

समाधीचे शेजेपासीं


आत-बाहेर केवळ गुरूंच्या मंत्राचाच जप सुरू असावा. यात रममान व्हायला शिकले पाहिजे. हळूहळू मनाचा हा दृढ निश्‍चय होतो. अंतःकरणात फक्त त्याचाच जप सुरू असतो. मन त्यावरच नियंत्रित होते. अशा अवस्थेला पोहोचल्यानंतर आत्मज्ञानाचा लाभ होतो. मग ही अवस्था मांडी घालून ध्यानाला बसल्यानंतरही होते किंवा काम करताना मनात सतत त्याचाच जप करणाऱ्यांना सुद्धा प्राप्त होते.

समाधीचे शेजेपासीं । बांधोनि घाली ध्यानेंसीं ।
चित्त चैतन्यसमरसीं । आंतु रते ।। 509 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - समाधीरूपी शय्येजवळ ध्यानाला बांधून टाकतो (म्हणजे समाधी लागेपर्यंत ध्यान दृढ करतो) व चित्त आणि चैतन्य यांच्या समरसतेने अंतर्मुखतेने रममाण होतो.

आत्मज्ञान मिळावे अशी तीव्र इच्छा आहे. मग ते कसे मिळते याचा अभ्यास करायला नको का? त्याच्या प्राप्तीचे मार्ग जाणून घ्यायला नकोत का? शाळेतच गेला नाही तर लिहायला, वाचायला कसे येणार? शाळेत शिकविणाऱ्यांना गुरुजींकडून हे ज्ञान जाणून घ्यायला नको का? शाळेत जसे ज्ञान गुरुजी देतात तसे आत्मज्ञानासाठीही गुरूची आवश्‍यकता असते. शाळेत, महाविद्यालयात, विद्यापीठात ज्ञान देणारे शिक्षक हे त्यांच्या पात्रतेनुसार त्या त्या पदावर काम करत असतात. शाळेतले गुरुजी विद्यापीठातील विद्‌यार्थ्यांना कसे शिकवू शकतील. ज्याची त्याची पात्रता ठरलेली असते. तसे आत्मज्ञान देणारे गुरू कसे असावेत, हे सुद्धा निश्‍चित आहे. त्यांची सुद्धा पात्रता असते. जो आत्मज्ञान देणार आहे तो गुरू प्रथम आत्मज्ञानी असायला हवा. तरच तो इतरांना आत्मज्ञान सांगू शकेल. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण असा गुरू काय कामाचा. अनुभवातून, अनुभूतीतून हे शास्त्र अभ्यासावे लागते. यासाठी शिकविणारा आत्मज्ञानी असायलाच हवा. येथे शिष्यांना आत्मज्ञानी गुरू मंत्र देतात. शिष्याची भक्ती, आवड पाहून त्यानुसार प्रत्येकाला वेगवेगळे मंत्र दिले जातात. ध्यान कसे करायचे हे सद्‌गुरू शिकवितात. गुरू मंत्रावर ध्यान असावे. त्यावर मन केंद्रित करावे. नजर नाकाच्या शेंड्यावर ठेवावी. श्‍वासावर नियंत्रण मिळवावे. तो स्वर मनाने स्पष्ट ऐकावा. चित्त त्यात मग्न झालेले असावे. समाधी अवस्था प्राप्त होईपर्यंत ध्यान दृढ करावे. आत-बाहेर केवळ गुरूंच्या मंत्राचाच जप सुरू असावा. यात रममान व्हायला शिकले पाहिजे. हळूहळू मनाचा हा दृढ निश्‍चय होतो. अंतःकरणात फक्त त्याचाच जप सुरू असतो. मन त्यावरच नियंत्रित होते. अशा अवस्थेला पोहोचल्यानंतर आत्मज्ञानाचा लाभ होतो. मग ही अवस्था मांडी घालून ध्यानाला बसल्यानंतरही होते किंवा काम करताना मनात सतत त्याचाच जप करणाऱ्यांना सुद्धा प्राप्त होते. कामातही त्याचेच ध्यान असते. सर्व घटना घडतात त्या त्याच्याच मुळे घडतात असा त्याचा दृढ निश्‍चय असतो. वाईट घडले तरी ते त्याच्याच मुळे व चांगले घडले तरीही ते त्याच्याच मुळे घडते. अशा विचारांनी मनाला सुख-दुःख होत नाही. मन विचलित होत नाही. गुरूंच्या मंत्रामध्ये तो रममान होतो. अशा अवस्थेत त्याला ज्ञानाचा लाभ होतो. गुरूच्या मंत्रातून ओसंडणाऱ्या ज्ञानात तो मनसोक्त डुंबतो. तोच समाधी अवस्थेत जातो. त्यालाच आत्मज्ञानाचा लाभ होतो.


No comments:

Post a Comment