Saturday, May 14, 2011

मौन

मौन गा तुझें राशिनांव । आतां स्तात्री कें बांधों हाव ।
दिससी तेतुली भाव । भजों काई ।।

पाटगावचे मौनी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते. ते नेहमी मौन धारण करून असत. फक्त समर्थ रामदास स्वामी यांच्याशीच ते संभाषण करत. त्यांच्यासमोरच त्यांचे हे मौन व्रत सोडत. अशा या महान गुरूंनी छत्रपती शिवाजी महाराज यांना 1676 मध्ये अनुग्रह दिला. कर्नाटक दौऱ्यांच्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाटगावच्या मौनी महाराज यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना अनुग्रहाचा लाभ झाला. गुरूंचा अनुग्रह होण्यासाठी मोठे भाग्य लागते. छत्रपती शिवाजी महाराज आणि पाटगावचे मौनी महाराज यांच्या भेटीच्या प्रसंगाचे वर्णन बखरीमध्ये आढळते. पण मौनी महाराजांच्या विषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. ते कोणत्या जातीचे, पंथाचे, संप्रदायाचे होते याचीही माहिती नाही. त्यांचे गुरू कोण? याचेही पुरावे उपलब्ध नाहीत. प्रसिद्धीपासून पराडमुख असणारे संतच महान होतात. माहिती उपलब्ध नसणारे, असे अनेक थोर संत महाराष्ट्रात होऊन गेले आहेत. त्यांचा भक्त परिवार आजही मोठा आहे. त्यांच्या महान कार्यानेच, भक्तांना अनुभव देण्याच्या सामर्थामुळेच ते महान झाले आहेत. समाधीस्थ झाले तरीही ते आपल्या भक्तांना अनुभव देत राहतात. भक्तांची प्रगती साधत राहतात. अनुभूतीतून भौतिक, आध्यात्मिक प्रगती साधतात. यासाठीच त्यांची समाधी, मंदीरे ही संजीवन समजली जातात.
सध्याच्या युगात मौन व्रत पाळणारे भेटणेच अशक्‍य आहे. हं, पण संसदेत "मौनी खासदार' म्हणून ओळखणारे अनेकजण आहेत. विशेष म्हणजे हे मौनी खासदार प्रत्येक निवडणूकीत निवडून येतात. 30-40 वर्षेतरी सलग सत्ता त्यांच्याच हातात असते. त्यांच्यावर मौनी खासदार म्हणून टिकाही होते, पण तरीही ते निवडून येतात. लोकमत त्यांच्या बाजूने असते. हे कसे? यावर संशोधन होणे गरजेचे आहे. काय खंरच त्यांना मौनाचा फायदा होतो का? कारण सध्या दंगेखोर नेत्यांपेक्षा असले मौनी नेतेच परवडले असे जनतेला म्हणायचे तर नाही ना?
मौनाचे अनेक फायदे आहेत. पण हे व्रत सर्वसामान्यांना जीवन जगताना पाळता येणे कठीणच आहे. पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. प्रयत्नांनी सर्वकाही साध्य होते. सांसारिक जीवनात या मौन व्रताचा निश्‍चितच फायदा होतो. घरातील वादाच्या प्रसंगी, भांडण तंट्यामध्ये मौन धारण केल्यास हे वाद निवळू शकतात. मौनामुळे सहनशीलता येते. वयोवृद्ध, ज्येष्ठांना घरात उगाचच बडबड करून इतरांना त्रास देण्याची सवय असते. तसे ते मुद्दाम करत नसतात. ही त्यांची सवयच असते. याचा त्रास इतरांना होतो. हे त्यांच्या कधीही लक्षात येत नाही. तसे ही गोष्ट प्रत्येक कुटूंबात आढळतेच. यावरून वाद हे होतच असतात. ही प्रत्येक कुटूंबातील समस्या आहे. वयोवृद्धांच्या अशा वागण्यामुळेच वृद्धाश्रमांची गरज वाढत चालली आहे. शांत बसणे त्यांना कधी जमतच नाही. तारूण्यातही इतका उत्साह त्यांनी कधी दाखवलेला नसतो. पण म्हातारपणी त्यांना कामाचा मोठा उत्साह असतो. अशा गोष्टींचा कुटूंबातील घटकांना त्रास होतो. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तरी अध्यात्मातील या मौनव्रताचा अवलंब करावा. असे त्यांना वाटत नाही. आध्यात्मिक वाचन जरूर करतात. पण मौन व्रताचे पालन ते कधीही करत नाहीत. किंवा करावे असे त्यांना कधी वाटतही नाही. पण त्यांनी या उतार वयात हे व्रत पाळले तर त्यांच्या इतरांना मोठा फायदा होईल यात शंकाच नाही. मनाला आनंदी ठेवण्यासाठी, घरातील शांती कायम ठेवण्यासाठी हे मौन व्रत निश्‍चितच लाभदायक आहे.



राजेंद्र घोरपडे 9011087406

Monday, May 9, 2011

नास्तिकवाद

तरी माशालागीं भुलला । ब्राह्मण पाणबुडां रिघाला ।
कीं तेथही पावला । नास्तिकवादु ।।

नास्तिक मग तो कोणत्याही जातीतील असो, शेवटी तो नास्तिकच असतो. पापीच असतो. एखाद्या नास्तिकाने धनाच्या, संपत्तीच्या मोहाने परजातीचा स्वीकार केला, तरी त्या जातीतील लोक त्याचा स्वीकार करतीलच असे नाही. कारण जात बदलल्याने त्याचे नास्तिकपण धुतले जात नाही. त्याने केलेली पापे धुतली जात नाहीत. सध्या जागतिकरणाच्या काळात जातीय व्यवस्थेला फारसे महत्त्व राहीलेले नाही. जातपात आता मानली जात नाही. तसे एकादृष्टीने हे चांगलेच आहे. कारण सध्याच्या युगात जातीय व्यवस्थेला उच्च-नीच या भेदभावांनी घेरलेले होते. यामुळे जातीय व्यवस्थेचा मुळ उद्देशच नष्ट झाला होता. आपल्या देशात समाजात एकोपा नांदावा, सुख शांती नांदीवी या उद्देशाने जातीय व्यवस्थेची रचना करण्यात आली. यामध्ये उच्चनीच असा भेदभाव कधीही नव्हता. पण काळाच्या ओघात काही स्वार्थी राजकीय मंडळींनी स्वतःच्या स्वार्थासाठी हा भेदभाव निर्माण केला. पैशाच्या लोभाने लालसेने, स्वार्थी वृत्तीमुळे हा वाद, हा भेदभाव निर्माण केला. जातीय व्यवस्थाही मुळात सर्वांना समान हक्क देणारी आहे. सर्वांना त्यामध्ये समान वागणूक दिली जात होती. शांतता नांदावी हा मुख्य उद्देश त्यामध्ये होता. पण स्वार्थांमुळे हा मुख्य उद्देशच नष्ट केला गेला. मुळ रचनेत भेदभाव नाही. शांतीसाठी उभारलेल्या गोष्टीमध्ये अशांती कशी असेल. स्वार्थीमंडळींनी ही अशांती घुसडली आहे. पण आता काळ खुपच पुढे गेला आहे. सध्याच्या काळात वाद निर्माण करणारे हेच आहेत आणि वाट मिटवणारेही हेच आहेत. यामुळेच सत्तेत वारंवार बदल होत आहेत. एकादे नाटक फार काळ टिकत नाही. त्याचाही कालावधी असतो. स्थिर सरकार ही कल्पनाही आता मागे पडली आहे. देशात स्थिर सरकार नांदावे असे वाटत असेल तर, स्वार्थी राजकर्त्यांची ही फळी मोडून काढायला हवी. पण याविरुद्ध आवाज कोण उठवणार? माणसांना सुधारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी माणसे सुधारतील याची शाश्‍वती देता येत नाही. तसे त्याचा परिणाम काही ठराविक लोकांवर जरूर होतो. काहीजण सुधारतात ही. सर्वच बदलतात असे होत नाही. मग नेमके याविरूद्ध लढणार कसे. नास्तिकांना अस्तिक करणे अवघड आहे. पण त्यांच्यातील नास्तिकता न स्वीकारने, हे तर आपल्याच हातात आहे. यावर एकमत व्हायला हवे. आपोआप बदल होईल.


राजेंद्र घोरपडे 9011087406

Friday, May 6, 2011

झोत : बफर स्टॉक खुला करावा

झोत
.......................
बफर स्टॉक खुला करावा

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत खतांचा कार्यक्षम वापर वाढविण्यासाठी प्रत्येक गावात खत वापर, जमीन आरोग्यपत्रिका या संबंधीची माहिती देण्यात येणार आहे. याचा फायदा राज्यातील 12.94 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचे महाराष्ट्र दिनाच्या आयोजित कार्यक्रमात राज्यपालांनी सांगितले. नुकतीच खते आणि बियाणेसंदर्भातील राज्याचे खरीप नियोजन जाहीर करण्यात आले. यामध्ये यंदा खते आणि बियाण्यांचा मुबलक साठा असल्याचे सांगण्यात आले. राज्यातील मंत्री खताबाबत कृषी अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असेही जाहीर करतात. हंगाम सुरू होण्याआधी ही स्थिती सर्वत्र असते; पण हंगाम सुरू झाल्यानंतर या सर्व घोषणा हवेत विरतात. खते मात्र शेतकऱ्यांना मिळत नाहीत. ही आजपर्यंतची स्थिती आहे. ही स्थिती कशामुळे उद्‌भवली याचा विचार करण्याची गरज आहे. पूर्वी खतांचा पुरवठा हा सहकारी सोसायट्यांमार्फत होत होता. आता या संस्था बंद अवस्थेत आहेत. यामुळे खरे तर खतांचे नियोजन कोलमडले आहे. सोसायट्यांप्रमाणे कृषी सेवा केंद्रे खतांचे नियोजन करू शकत नाहीत. सेवा केंद्रात लिंकिंगचीही सक्ती केली जाते. याचा विचार व्हायला हवा. सोसायट्यांप्रमाणे आता शासनाने अशी यंत्रणा उभी करायला हवी. साखर कारखाने, संस्था पातळीवर खतांचा पुरवठा केल्यास खतांचे नियोजन योग्य प्रकारे होऊ शकेल. खतांचा उपलब्ध साठा आणि आवश्‍यक साठा शासनाला मिळू शकेल. यंदा खरिपासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मागणीपेक्षा खतांचा पुरवठा जास्त आहे, तरीही खते वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी आहे. यंदा युरिया, डी.ए.पी, 10:26:26 या खतांची टंचाई भासण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. कृषी विभागाने शासकीय आदेशानुसार 19 हजार टन खतांचा बफर स्टॉक करण्याचे नियोजन केले आहे, त्यापैकी पाच हजार 600 टनांचा बफर स्टॉक आताच करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात फेब्रुवारीपासूनच खतांची मागणी असते. उसाचे क्षेत्र जास्त असल्याने या कालावधीत शेतकऱ्यांना खते लागतात. शासनाने खरिपाच्या उत्तरार्धात खतांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून या कालावधीतही बफर स्टॉक करण्याची सक्ती केली आहे. यामुळे सध्या खतांची टंचाई असूनही शासकीय आदेशानुसार विक्रीसाठी कमी प्रमाणात खते उपलब्ध असतानाही त्यातून बफर स्टॉक केला जात आहे. त्यामुळे ज्या वेळी सप्टेंबर, ऑक्‍टोबरच्या दरम्यान मागणी कमी असते, त्या वेळीच बफर स्टॉक करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. यंदाही कृषी विभागाने खते व बियाणे भेसळीबाबत भरारी पथकाची स्थापना केली आहे. जिल्हास्तरावरील भरारी पथकात जिल्ह्यातील प्रमुख कृषी अधिकारी व तंत्रज्ञ, तर तालुकास्तरावरील पथकांत तालुक्‍यातील अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आहे. या पथकांचा फायदा शेतकऱ्यांनी करून घेण्याची गरज आहे. फसवणूक केली जात असलेल्या दुकानांची माहिती भरारी पथकांना देऊन योग्य ते सहकार्य वेळीच केल्यास खतांच्या साठेबाजीवर मात करता येणे शक्‍य होईल.

Monday, May 2, 2011

खरा धर्म

पैं वासरूवाचा भोंकसा । गाईपुढे ठेवू जैसा ।
उगाणा घेती क्षीररसा । बुद्धिवंत ।।

हुशारमंडळी ही एखादे आमिष दाखवून आपला कार्यभाग साधण्यात पटाईत असतात. युद्धात शत्रूची चाल जाणून घेण्यासाठी हेरांना आमिषे देऊन बातम्या काढून घेतल्या जातात. सुरक्षा अधिकाऱ्यांनाही लाच देऊन फितूर केले जाते. पण हे कार्य सर्वांनाच साधता येते असे नाही. ही एक कला आहे. बोलण्याची ही पद्धत अवगत करून घ्यावी लागते. तसे अशी कामे करणारी माणसे ही वेगळ्याच पद्धतीची असतात. सर्वांनाच हे जमत नाही. काही माणसे ही सरळ मार्गी असतात. काही माणसे वाकड्या चालीची असतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. सरळमार्गाने सर्वच गोष्टी साध्य करता येतात असे नाही. जीवनात काही गोष्टी साध्य करण्यासाठी वाकडे मार्ग सुद्धा स्वीकारावे लागतातच. लोण्याच्या गोळ्यातून लोणी काढताना बोट सरळ ठेऊन चालत नाही. ते वाकडे करावेच लागते. सरळ बोट ठेऊन लोणी काढण्याचा प्रयत्न असफलच होणार. बोट वाकडे केले तरच लोणी मिळू शकेल. यासाठीच वाकड्या वाटांचा वापर योग्य कामासाठी करायला हवा. तसे सर्वच वाकडे मार्ग योग्य असतात असे नाही. पण एखादे चांगले काम यशस्वी करण्यासाठी वाकड्या वाटेचा अवलंब केला तर, तो अधर्म होत नाही. खरे तर प्राप्त परिस्थिती जे आवश्‍यक कर्म केले जाते यालाच धर्म असे म्हटले जाते. चांगल्या गोष्टीसाठी एखादे वाईट कर्म करावे लागले तर तो अधर्म होत नाही. माणसाने परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करायला हवेत. हाच त्याचा धर्म आहे. एकदा एक शाकाहारी मनुष्य जंगलात वाट चुकला. त्याला रस्ता सापडेना. तो भटकत राहीला. खायला काहीही मिळाले नाही. शेवटी त्याला एक झोपडी दिसले. एक म्हातारी त्यामध्ये राहात होती. भूकने व्याकूळ झालेला हा शाकाहारी मनुष्य या म्हातारीच्या झोपडीत गेला आणि त्यांने ह्या म्हातारीकडे भोजनासाठी याचना केली. ही म्हातारी कोंबड्या पाळत होती व कोंबड्यांची अंडी खाऊन ती जीवन जगत होती. त्या मनुष्याला अंडी देण्याशिवाय तिच्याकडे काहीच नव्हते. अशा परिस्थितीत त्यांने त्याचे शाकाहारी व्रत तोडणे आवश्‍यक आहे. यामुळे त्याचा धर्म भ्रष्ट होत नाही. प्राप्त परिस्थितीत त्याने भोजन करणे हे महत्त्वाचे आहे. ते शाकाहारी आहे की मांसाहारी हे महत्त्वाचे नाही. स्वतःचे जीवन संपविण्याऐवजी त्यांने अंडी खाऊन स्वतःचे प्राण वाचविणे हाच त्याचा खरा धर्म आहे. प्राण्यांना हा धर्म समजतो, पण मनुष्यास समजत नाही. गाईजवळ मेलेले वासरू जरी नेऊन सोडले तरी तिच्यासाठी तिचा पान्हा फुडतो. तिला त्या वासरूची काळजी वाटते. त्याला पाजविणे, त्याची भूक शमविणे यातच त्या गाईला आनंद वाटतो. मनुष्य मात्र काही विचित्र नियमात अडकून स्वतःचा त्रागा करत बसतो. हे योग्य नाही. खरा धर्म माणसाने ओळखायला हवा. अहिंसेचा खरा धर्म ओळखायला हवा.

राजेंद्र घोरपडे 9011087406