Wednesday, July 31, 2019

तैसे प्राणिमात्री सौजन्य । आर्जव तें ।।


अहिंसेचा विचार सतत मनात जागृत ठेवायला हवा. सामंजस्याने अनेक प्रश्‍न सोडवले जाऊ शकतात. यासाठी बोलण्यात, वागण्यात तशी मृदुता यायला हवी. प्रत्येक प्राणिमात्रात आढळणारे हे प्रेम नैसर्गिक आहे. प्राणिमात्रामध्ये असणारे हे प्रेम, हे सौजन्य यालाच आर्जव असे म्हटले आहे.

आता बाळाचां हिती स्तन्य । जैसे नानाभूती चैतन्य ।
तैसे प्राणिमात्री सौजन्य । आर्जव तें ।। 113 ।। अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ - आतां स्तनांतील दूध जसें लहान मुलाचें हित करणारे असते. अथवा भिन्न भिन्न प्राण्यांच्या ठिकाणी जसे चैतन्य सारखें असतें त्याप्रमाणें प्राणिमात्रांशी वागण्याचा जो सर्रास भलेपणा ते आर्जव होय.

ंची मानसिकता ढळत चालली आहे. तो चिडचिडा होताना पाहायला मिळत आहे. सगळीकडे गोंगाटामुळे तो शांतीच्या शोधात जरूर आहे. अशा वेळी त्याला योग्य मार्ग, दिशा सापडणे गरजेचे आहे. अन्यथा तो भरकटेल. त्याच्यातील माणुसकी नष्ट होईल, ही भीती आहे. कारण शेवटी मनुष्य हा माकड कुळातीलच आहे. यामुळे माणसांत माकड कृत्ये जागृत होण्यास फारसा वेळ लागत नाही; पण माणूस आणि माकडात फरक आहे, हेही विसरता कामा नये. माणसाला मन आहे. विचार करण्याची बुद्धी आहे. जगण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. त्यात अडचणी आल्या की, त्याची मानसिकता ढळते. मनासारखे घडत नसेल तर तो निराश होतो. या नैराश्‍येतूनच त्याच्या मनाचा समतोल ढळतो. काहीजण अशा या त्याच्या वृत्तीचा फायदा उठवतात व त्याच्या स्वातंत्र्यावर हल्ला चढवतात. अशाने त्याचा समतोल ढळतो, पण या वृत्तीचा सामना करण्याचे सामर्थ तो त्याच्या मनामध्ये उत्पन्न करू शकतो. कितीही कोणी खिजवण्याचा, चिडवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तो शांतपणे सामोरे जाऊ शकतो. चिडचिडेपणा सोडून देऊन प्रेमाने, मधुर वाणीने तो इतरांवर आपली माया पसरवू शकतो, पण यासाठी मनाची मोठी तयारी करावी लागते. अहिंसेचा विचार सतत मनात जागृत ठेवायला हवा. सामंजस्याने अनेक प्रश्‍न सोडवले जाऊ शकतात. यासाठी बोलण्यात, वागण्यात तशी मृदुता यायला हवी. प्रत्येक प्राणिमात्रात आढळणारे हे प्रेम नैसर्गिक आहे. प्राणिमात्रामध्ये असणारे हे प्रेम, हे सौजन्य यालाच आर्जव असे म्हटले आहे. या प्रेमाने जग जिंकता येते. सध्याच्या धकाधकीच्या युगात अशा विचारांची, प्रेमाची गरज माणसाला अधिक वाटणार आहे. जैन धर्माध्ये क्षमा व मार्दवा पूजाचे आर्जव तत्त्व हे सरळ मार्गाने जीवन जगण्याचा संदेश देते. जणू काही तोच धर्माचा पाया आहे. व्यक्तीने आचारात अहिंसा, विचारात अनेकान्तवाद आणि वाणीत मधुरता आणली पाहिजे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


Saturday, July 27, 2019

समाधिबोधे निजविसी । बुझाऊनी ।।


समाधिस्थ झाले तरी ती लय सुटत नाही. म्हणूनच तर भक्तांना अनुभव येत राहतात. संत, सद्‌गुरूंची समाधी संजीवन आहे, हे यासाठीच तर म्हटले जाते.
- राजेंद्र घोरपडे

सतरावियेचें स्तन्य देसी । अनाहताचा हल्लरू गासी ।
समाधिबोधे निजविसी । बुझाऊनी ।।7।। अध्याय 12 वा

अर्थ - सतरावी जीवनकलारूपी व्योमचक्रांतील चंद्रामृतरूपी दूध देतेस आणि अनाहत ध्वनीचें गाणे गातेंस आणि समाधीच्या बोधाने समजूत घालून स्वरूपीं निजवितेस.

सद्‌गुरू समाधिस्थ झाले तरी ते भक्तांना अनुभव देत राहतात. भक्तांची आध्यात्मिक प्रगती साधण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात. म्हणूनच त्यांची समाधी ही संजीवन असते, असे मानले जाते. संतांच्या अनेक लीला सांगितल्या जातात. अनेक भक्तगण त्यांचे अनुभव नेहमीच सांगत असतात. समाधिस्थ झाल्यानंतरही सद्‌गुरू भक्तांना अनुभव देतात. हे नव्या पिढीला पटणे जरा कठीणच वाटते. ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, असे ही नवी पिढी समजते. असे कधी असणे शक्‍यच नाही, असे त्यांचे मत असते. मग कोणत्याही देवळात गेल्यावर मनाला प्रसन्न वाटते, असे का म्हणता? पूर्वीच्या काळी जे तंटे वर्षानुवर्षे चावडीवर सुटत नसत, ते देवळात झालेल्या एका बैठकीत सुटल्याची अनेक उदाहरणे देता येतील. हे कसे शक्‍य आहे? असा चमत्कार घडलाच कसा? याचे आश्‍चर्यही वाटते. मंदिर, संतांची समाधी स्थळे या पवित्र जागा आहेत. या जागांची वैशिष्ट्ये विचारात घ्यायला हवीत. संतांच्या समाधीच्या जागेतील वातावरणात विशिष्ट लहरींचा वावर असतो. त्या लहरीतून मनाला आनंद, उत्साह प्राप्त होतो. या वातावरणात आल्यानंतर या लहरींची लय, तो नाद आपल्या शरीरात प्रवेश करतो. यामुळेच हे बदल घडतात. साधना म्हणजे तरी काय? सो..हम...सो..हम..ची लयच तर आपणाला पकडायची असते. त्याच्यावरच तर लक्ष केंद्रित करायचे असते ना? ही लय ज्याला सापडली, पकडता आली, तोच खरा आत्मज्ञानी. सद्‌गुरू ही लय भक्ताला पकडायला शिकवतात. त्यांच्या लयीत आपली लय मिसळायला हवी. ती मिसळावी यासाठीच तर सगळे प्रयत्न सुरू असतात. एकदा का तो सूर, तो नाद, ती लय सापडली की मग पुन्हा विसरणे नाही. पुन्हा ती सुटून जाणे शक्‍य नाही. समाधिस्थ झाले तरी ती लय सुटत नाही. म्हणूनच तर भक्तांना अनुभव येत राहतात. संत, सद्‌गुरूंची समाधी संजीवन आहे, हे यासाठीच तर म्हटले जाते. ते भक्ताला त्यांच्या लयीत ओढण्याचा प्रयत्न करतात. भक्ताला आत्मज्ञानी करण्याचा प्रयत्न करतात.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

ग्रामीण मुली जेव्हा व्यक्त होतात....


#Love #Attraction #LoveMarriage #RuralGirls
लव मॅरेज याबाबत ग्रामीण मुलींना काय वाटते.  प्रेम प्रकरणे योग्य आहेत का यामुळे ग्रामीण मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते... पालक आणि शिक्षकांना याबाबत काय वाटते
मनातील कुचंबना व्यक्त केल्याशिवाय समाजाला समजणार कशी. ग्रामीण भागातील या मुली तर बोलल्या मुक्तपणे आता आपली वेळ आहे.*



*Please Do Like, Share and Subscribe*

Monday, July 22, 2019

आनंदाचा अखंड झरा


वारीच्या आनंदात डुंबल्याने मनाची सगळी मरगळ दूर होते. सगळ्या चिंता दूर पळतात. हा आनंदाचा अखंड वाहणारा झरा आहे. त्यातील गोड पाणी पिण्याची इच्छा मात्र मनात असावी लागते.
जय जय शुद्धे । उदारे प्रसिद्धे ।
अनव्रत आनंदे । वर्षतिये ।। 1।। अध्याय 12 वा

अर्थ - तूं शुद्ध आहेस, तूं उदार म्हणून प्रसिद्ध आहेस आणि अखंड आनंदाची वृष्टि करणारी आहेस. गुरूकृपा दृष्टिरूपी माते, तुझा जयजयकार असतो.

सद्‌गुरूंचे अंतःकरण शुद्ध आहे. ते उदार आहेत. गुरुकृपेने त्यांच्यातून अखंड आनंदाचा झरा ओसंडून वाहत आहे. अशा या सद्‌गुरूंना माझा नमस्कार. सद्‌गुरूंच्या कृपाशीर्वादाने आत्मज्ञान प्राप्तीसाठीची ओढ वाढत आहे. कारण त्यांच्या सहवासात आल्यानंतर मनातील मरगळ दूर होते. त्यांच्या प्रेमाने, त्यांच्यातून ओसंडून वाहणाऱ्या आनंदाच्या झऱ्याने मनाला एक वेगळीच स्फूर्ती चढते. शरीरात तेज संचारते. आळंदीला संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या भेटीला गेल्यानंतर दर्शनासाठी नेहमीच मोठी रांग असते. तेव्हा इतका वेळ त्या रांगेत आपण उभे राहू शकू का? असा प्रश्‍न कधीच पडत नाही. पाय दुखतील का? याचीही चिंता वाटत नाही. संजीवन समाधीच्या दर्शनाच्या ओढीने हा थकवा दूर होतो. कारण सद्‌गुरूंच्या सहवासात अखंड  आनंदाचा झरा वाहत असतो. हीच तर खरी अनुभूती आहे. मोटारगाडीत इंधन असेल तरच ती धावते. त्यातील इंधन संपणार नाही, मोटारगाडी बंद पडणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. यासाठी ठराविक कालावधीने सतत इंधनाची टाकी भरावी लागते. तसे अनेक भक्तजन या देहाचा गाडा अखंड कार्यरत राहण्यासाठी ठराविक कालावधीने आळंदीला जातात. गाडीला जसे इंधन लागते तसे या भक्तांना सद्‌गुरूंचा सहवास लागतो. त्यांच्या सहवासात या भक्तांच्या देहाच्या गाड्याला इंधन मिळते. आनंदाच्या डोहातून हे इंधन त्यांना मिळते. याने त्यांना नवी स्फूर्ती मिळते. कामाला नवा उत्साह येतो. काम करण्याचा हुरूप वाढतो. यासाठी काही ठराविक कालावधीने ते आळंदीच्या वाऱ्या करतात. हीच त्यांची भक्ती आहे. श्रद्धा आहे. श्री ज्ञानेश्‍वरीच्या नियमित वाचनातून आत्मज्ञानाची ओढ वाढत राहते. मनाला आनंद मिळून साधनेला स्फूर्ती मिळते. पंढरीची वारीही याच साठी केली जाते. वारीच्या आनंदात डुंबल्याने मनाची सगळी मरगळ दूर होते. सगळ्या चिंता दूर पळतात. हा आनंदाचा अखंड वाहणारा झरा आहे. त्यातील गोड पाणी पिण्याची इच्छा मात्र मनात असावी लागते. या गोडीने अध्यात्माची आवड हळूहळू वाढते. श्री ज्ञानेश्‍वरी वाचनाची गोडी लागते. सद्‌गुरूंचे प्रे वाढते. मग द्वैत आपोआपच दूर होते.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Sunday, July 21, 2019

स्वामी स्वरूपानंद संजीवन समाधी पुजा ( छायाचित्रे)



रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथे स्वामी स्वरूपानंद यांच्या समाधीची गुरुपौर्णिमेनिमित्त बांधलेली पुजा.






Thursday, July 18, 2019

तसें माझां साक्षात्कारीं । सरे अहंकाराची वारी ।




सद्‌गुरूंच्या साक्षात्काराने अनेकांचा अहंकार गळून पडतो. साक्षात्कार म्हणजे काय? आत्मज्ञानाची अनुभूती म्हणजे साक्षात्कार.

तसें माझां साक्षात्कारीं । सरे अहंकाराची वारी ।
अहंकार लोपीं अवधारी । द्वैत जाय ।। 694 ।। अध्याय 11 वा

अर्थ - त्या प्रमाणे माझें प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर अहंकाराची येरझार संपते आणि अहंकाराचा नाश झाल्यावर द्वैत जातें, हे लक्षांत ठेव.

अहंकाराने अनेक मोठमोठ्या व्यक्तींना पराभव पत्कारावा लागला आहे. कोणाला विद्वत्तेचा अहंकार असतो. कोणाला पैशाचा अहंकार असतो. कोणाला सत्तेचा अहंकार असतो. अहंकाराने अनेकांना दुःख पोहोचते, पण अहंकारी व्यक्तींना याची साधी कल्पनाही येत नाही. पैशाचा अहंकार खूपच वाईट. मुळात पैसा हे द्रव्य नाशवंत आहे. आज आहे उद्या नाही. अहंकाराने अंध झालेल्या व्यक्तींना याची जाणीव नसते. पैसा आहे तोपर्यंत अशा व्यक्तींना मानसन्मान मिळतो. मानसन्मान पैशाने विकत घेता येतो, याचाही अहंकार अनेकांना असतो. आजकाल पुरस्कारही पैशाने विकत मिळत आहेत, पण अशा विकल्या जाणाऱ्या पुरस्कारांना फारसे समाजात कोणी मान देत नाही, याची जाणीव त्यांना नसते. पैसा संपला की सर्व संपते. सर्व मानसन्मान मग गळून पडतात. तेव्हा त्यांना भगवंताची आठवण होते. काहींना माझ्यासारखा दुसरा कोणी ज्ञानी या जगात नाही, असा अहंकार असतो, पण खऱ्या ज्ञानाची त्यांना ओळखच नसते. असे विद्वान जेव्हा एखाद्या आत्मज्ञानीच्या सहवासात येतात तेव्हा त्यांचा अहंकार सरतो. आपल्यापेक्षा कोणी तरी ज्ञानी आहे. आपल्या मनातले ओळखणारा मनकवडा कोणी तरी आहे, याची जाणीव त्यांना होते तेव्हा असे विद्वान आत्मज्ञानी संतांच्या चरणी लीन होतात. असे लीन झालेले विद्वान, अहंकाराचा लोप पावलेले विद्वान अभ्यासाने मग आत्मज्ञानी होतात. सद्‌गुरूंच्या साक्षात्काराने अनेकांचा अहंकार गळून पडतो. साक्षात्कार म्हणजे काय? आत्मज्ञानाची अनुभूती म्हणजे साक्षात्कार. मनुष्य अनुभवातूनच शिकत आला आहे. नोकरीमध्येही अनुभवाला प्राधान्य दिले जाते. किती वर्षांचा अनुभव तुम्हाला आहे, असे प्रथम विचारले जाते. त्यानुसार तुमची पात्रता ठरवली जाते. आत्मज्ञानाचे अनुभव सद्‌गुरू सतत देत राहतात. यातून ते साधकाची आध्यात्मिक प्रगती साधतात. हळूहळू साधकातील अहंकार, मीपणा लोप पावतो व साधकही आत्मज्ञानी होतो.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।



Monday, July 15, 2019

तरि विश्‍वात्मक रूपडे । जे दाविलें आम्ही तुजपुढें ।




विश्‍वरूपाचे दर्शन कसे घडू शकेल, असा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे; पण भक्ती जर खरी असेल, तर हे अज्ञान दूर व्हायला वेळ लागणार नाही. मी म्हणजे आत्मा आहे, याची अनुभूती यायला वेळ लागणार नाही. तो चराचरांत सामावला आहे. तो सर्वत्र आहे. अविनाशी आहे, याची अनुभूती हेच विश्‍वरूप दर्शन आहे. 

- राजेंद्र घोरपडे
तरि विश्‍वात्मक रूपडे । जे दाविलें आम्ही तुजपुढें ।
तें शंभुही परि न जोडे । तपें करितां ।। 767 ।। अध्याय 11 वा

अर्थ - तरी आम्ही तुझ्यापुढे जे विश्‍वरूप दाखविलें ते शंकरालासुद्धा अनेक तपें केली तरी प्राप्त होत नाही.

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विश्‍वरूप दर्शन घडविले. अनेक तपे करूनही शंकरालाही हे विश्‍वरूप प्राप्त होत नाही. यातून असे स्पष्ट होते की, विश्‍वाचे आर्त जाणण्यासाठी योगमार्गापेक्षा भक्तिमार्ग हा सहज व सोपा मार्ग आहे. यामध्ये कोणतेही कष्ट पडत नाहीत. अगदी सहजपणे हे साध्य होते. संसाराचा त्याग करावा लागत नाही. सध्याच्या बदलत्या युगातही हा मार्ग उपयोगी आहे. बदलत्या परिस्थितीनुसार आता जीवन धकाधकीचे झाले आहे. प्रदूषणात वाढ झाली आहे. चंगळवादी संस्कृतीचे साम्राज्य प्रस्थापित झाले आहे. अशा काळात अध्यात्माच्या या गोष्टी मनाला पटणे अशक्‍य वाटते. याची आवड असणाऱ्यांची, ओढ असणाऱ्यांची संख्याही कमी होत चालली आहे. लोकांध्ये धार्मिक वृत्ती जरूर आहे, पण सध्या अंधश्रद्धा आणि अज्ञानाने लोक भरकटलेले आहे. अध्यात्माची वाट चुकलेले आहेत. भक्ती म्हणजे काय, हेच ते विसरले आहेत. चंगळवादाने ते अधिकच अज्ञानी होत चालले आहेत. अध्यात्माच्या मूळ उद्देशा पासून ते दूर चालले आहेत. सध्याचे सणवार, उत्सव यामध्ये केवळ औपचारिकताच उरली आहे. त्यामध्ये अध्यात्माचे अधिष्ठानच नसते. अशा या परिस्थितीत विश्‍वरूपाचे दर्शन कसे घडू शकेल, असा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे; पण भक्ती जर खरी असेल, तर हे अज्ञान दूर व्हायला वेळ लागणार नाही. मी म्हणजे आत्मा आहे, याची अनुभूती यायला वेळ लागणार नाही. तो चराचरांत सामावला आहे. तो सर्वत्र आहे. अविनाशी आहे, याची अनुभूती हेच विश्‍वरूप दर्शन आहे. केवळ भक्तीने हे विश्‍वरूप दर्शन सहज शक्‍य आहे. यासाठी अज्ञानाच्या अंधारात भक्तीचा उजेड पडणे गरजेचे आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Thursday, July 11, 2019

अमृताचा समुद्र





साधनेत प्रगती होत राहिली तर साधना करताना शरीर जड होते. दगडासारखे होते, पण अशा गोष्टींची भीती बाळगू नये. साधनेचा हा अमृताचा सागर आहे. यात बुडण्याची भीती कशी? इथे तर धैर्याने डुंबायला हवे.

हां गा समुद्र अमृताचा भरला । आणि अवसांत वरपडा जाहला ।
कोणीही आथि वोसंडिला । बुडिजेल म्हणोनि ।। 624 ।। अध्याय 11 वा

अर्थ - अरे अर्जुना, प्रत्यक्ष अमृताचा समुद्र भरलेला असता आणि अकस्मात कोणी तेथें प्राप्त झाला, मग आपण यांत बुडून मरून जाऊं. म्हणून कोणी तरी त्याचा त्याग केला आहे काय?

साधना करताना अनेक अडचणी येत असतात. कधी वेळच मिळत नाही, तर कधी वेळ मिळाला तर मनात इच्छाच होत नाही. मनात घोळणाऱ्या अनेक विचारांनी साधनेला बसण्याचे सामर्थ्यच होत नाही. अशा परिस्थितीत साधना कशी होणार? अशा बेचैन अवस्थेत प्रत्येक साधक असतो. साधनेसाठी बेचैन असणे हे देखील चांगले आहे. या ना त्या कारणाने सद्‌गुरूचे स्मरण तरी राहते, पण साधना सोडून देणे हे योग्य नाही. मनाच्या स्थैर्यासाठी प्रयत्न करणे, साधनेसाठी वेळ काढणे गरजेचे आहे. साधनेचे अनेक फायदे आपणास माहीत असूनही या धकाधकीच्या जीवनामुळे याकडे आपण दुर्लक्ष करतो. तसे सध्या कामाच्या व्यस्ततेत साधनेसाठी वेळे देणे हे एक मोठे आव्हानच आहे, पण हे आव्हान आपणास स्वीकारावेच लागेल. साधनेचे हे अमृत प्यायलाच हवे. अमृताच्या या महासागरात आपण डुंबायलाच हवे. साधनेच्या सुरवातीच्या काळात पायात मुंग्या येतात. शरीर जड होते, पण या गोष्टींची भीती बाळगू नये. अहो, अमृताच्या समुद्रात उडी घेतल्यावर मरणाला कशाला भ्यायचे? उलट साधनेच्या प्रगतीतील या पायऱ्या आहेत, असे समजून उत्साहाने साधना वाढवायला हवी. मुंग्या हळूहळू कमी होतील. साधनेच्या काळात शरीरात अनेक हालचाली होतात. पित्त जळते, पण याचा फायदा होतो. पित्त जळाल्याने आपली भूक वाढते. चेहऱ्यावरील तेज वाढते. साधनेत हळूहळू प्रगती होत राहते. शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती सुधारते. हे फायदे विचारात घ्यायला हवेत व साधनेच्या काळात वाटणारी मनातील भीती दूर करायला हवी. साधनेत प्रगती होत राहिली तर साधना करताना शरीर जड होते. दगडासारखे होते, पण अशा गोष्टींची भीती बाळगू नये. साधनेचा हा अमृताचा सागर आहे. यात बुडण्याची भीती कशी? इथे तर धैर्याने डुंबायला हवे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

कैसें अनुग्रहाचे करणे







 
संजीवन समाधीची आराधना करायला हवी. सद्‌गुरू परंपरेचा मार्ग ते निश्‍चितच दाखवतील. खऱ्या सद्‌गुरूंची भेटही ते करवून देतील, पण ही आशा सोडता कामा नये. अनुग्रह हा आत्मज्ञानी संताचाच घ्यायला हवा.

कैसें अनुग्रहांचे करणें । पार्थाचे पाहणें आणि न पाहणे ।
तयाहीसकट नारायणें । व्यापुनि घातले ।। 230।। अध्याय 11 वा

अर्थ - प्रभुच्या कृपेची करणी कशी अद्‌भुत आहे पाहा अर्जुनाचे पाहणे आणि न पाहणे हे सर्वच भगवंतानी व्यापून टाकले.

आध्यात्मिक प्रगती साधायची असेल तर गुरुकृपा हवीच. यासाठी गुरूंचा अनुग्रह होणे आवश्‍यक आहे. भक्ताची योग्य प्रगती पाहूनच सद्‌गुरू भक्तास अनुग्रह देतात. अनुग्रह देतात म्हणजे नेके काय करतात? हा प्रत्येक भक्ताचा उत्सुकतेचा विषय असतो. सद्‌गुरू भक्ताची भक्ती पाहतात. आत्मज्ञानी असल्याने भक्ताच्या आवडीनिवडी ते ओळखतात. त्यांची भक्तीची ओढ पाहून योग्य गुरुमंत्र ते देतात. यालाच अनुग्रह झाला, असे म्हटले जाते. नुसता अनुग्रह मिळून उपयोग नाही. गुरुकृपाही हवीच. गुरुमंत्राच्या नियमित जपाने, साधनेने आध्यात्मिक प्रगतीची वाट सुकर होते. गुरूविन कोण दाखवील वाट असे हे यासाठीच म्हटले गेले आहे ते यासाठीच. गुरूंच्या कृपेने हे सहज साध्य होते. यासाठी वणवण भटकावे लागत नाही. अनुग्रह ही आत्मज्ञान प्राप्तीसाठीची पहिली पायरी आहे. सद्‌गुरूंच्या कृपेने भक्त या पायऱ्या सहज पार करतो. शेवटी या नराचा नारायण होतो; पण सध्याच्या युगात आत्मज्ञानी गुरू आहेत कोठे? नुसती भगवी वस्त्रे घातली, कपाळाला टिळा लावला म्हणजे संत झाले, असे म्हणता येत नाही. संत हा बाह्यरूपावरून ओळखायचा नसतो, तर तो अंतरंगात डोकावणारा असायला हवा. मनकवडा असायला हवा. असे संतच योग्य मार्ग दाखवू शकतात. अशा संतांचे मार्गदर्शन, अनुग्रह घ्यायचा असतो, पण आजकाल असे संत विरळ झाले आहेत. नव्या पिढीला यामुळे योग्य मार्गदर्शन मिळेनासे झाले आहे. म्हणून साधना सोडायची नाही. कारण संत हे अमर आहेत. त्यांची समाधीही अमर आहे. संजीवन आहे. ते भक्तांना मार्ग दाखवत राहतात. अशा संजीवन समाधीची आराधना करायला हवी. सद्‌गुरू परंपरेचा मार्ग ते निश्‍चितच दाखवतील. खऱ्या सद्‌गुरूंची भेटही ते करवून देतील, पण ही आशा सोडता कामा नये. अनुग्रह हा आत्मज्ञानी संताचाच घ्यायला हवा. असे संतच योग्य मार्गदर्शन देऊ शकतात. शिष्याला आत्मज्ञानी करू शकतात.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Wednesday, July 10, 2019

दुधसागर (व्हायरल व्हिडिओ)


कर्नाटकातील दुधसागर धबधबा याचे सौंदर्य नेहमीच सर्वांना आकर्षित करते. पावसाळ्यात या भागात भ्रमंती करणे येथील निसर्गाचा आनंद घेणे ही नेहमीच सुखकारक असे आहे. शहरातील धकाधकीच्या जीवनामध्ये येणारा थकवा हे आल्हादायक वातावरण पाहून  निश्चितच नाहिसा होतो. मनाला मोहून टाकणारा हा परिसर नेहमीच पर्यटकांना खुणावत आला आहे. दूध साखरचा हा व्हायरल व्हिडिओ. 


कृषी तंत्रज्ञान आलं दारी..... जेंव्हा कृषी अधिकारी येती बांधावरी …

वरुणराजाच्या कृपेने शाहुवाडी तालुक्याला आणि एकूणच कोल्हापूर जिल्ह्याला दिलासा मिळाला आणि बळीराजाच्या कामाला वेग आला....शिवारात शेतकरी बांधवांची लगबग सुरु झाली..... अन भात रोप लावणीला चांगलीच गती आली.....अन अशातच शिवारात बळीराजाच्या मदतीला कृषि विभागाची फौज धावून आली......


स्थळ आंबार्डे तालुका शाहुवाडी जि. कोल्हापूर येथील प्रगतशील शेतकरी श्री. सुर्यकांत पांडुरंग पाटील (आप्पा पाटील) यांच्या शेतावर कोकण कृषि विद्यापिठाचे सुधारित ‘चारसूत्री भात लागवड’ प्रात्यक्षिकाचे आयोजन तालुका कृषि अधिकारी, शाहुवाडी यांचेकडून करण्यात आले. चारसूत्री पद्धतीचे महत्व शेतकऱ्यांना पटवून उत्पादनात भरघोस वाढ होण्यासाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी मा. श्री स्वप्नील पाटील यांचेकडून करण्यात आले.  यामध्ये हिरवळीचे खत म्हणून  गिरीपुष्पाचा वापर, रोप लागणीतील अंतर २५ सेमी × १५ सेमी राखण्याच्या उद्देश्याने लाईन दोरीवर रोप लागण तसेच युरिया ब्रिकेटचा वापर करण्यात आला. या वेळी स्वतः कृषी अधिकाऱ्यांनी पावसाची तमा न बाळगता  गुडघाभर चिखलात उतरून  चार सुत्री पद्धतीने रोप लावण करून दाखवली.  त्याच बरोबर ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अंतर्गत कृषि यांत्रिकीकरणातून शेतकऱ्यांना दिलेला पॉवर टीलर कृषी अधिकारी श्री अतुल जाधव यांनी स्वतः चालवत चिखलणीसाठी  होणारा वापर पाहून योजना सार्थकी लागल्याचे समाधान व्यक्त केले.

या प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी श्री जयसिंग देसाई यांनी विविध योजनांची महिती दिली. श्री संदीप शेळक़े यांनी भातावरील किड व रोग व्यवस्थापन बद्दल मार्गदर्शन केले तर श्री गिरीगोसावी यांनी भात पिकातील तण नियंत्रनासाठी उपाय सांगितले.

चार सूत्री भात लागवड करताना ‘लर्निंग बाय डूईंग’ या विस्तार शिक्षणाच्या तत्वाचा अनुभव शेतकऱ्यांना आला. चार सूत्री भात लागवड तंत्रज्ञानाबद्दल  माहिती मिळाल्याने व शंकांचे  समाधान झाल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी कृषि विभागाचे आभार मानले. यावेळी प्रमुख मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी मा. श्री. स्वप्नील पाटील, मंडळ कृषी अधिकारी श्री. जयसिंग देसाई, श्री. अतुल जाधव, श्री. संदीप शेळके व श्री. नामदेव गिरीगोसावी यांनी केले. तसेच सर्व  शेतकऱ्यांनी  सुधारित चारसूत्री पद्धतीने भाताची लागवड  करण्याचे आवाहन केले.

भविष्यात अशा प्रकारचे शेताच्या बांधावर येवून प्रात्यक्षिकांद्वारे अनमोल मार्गदर्शन मिळावे ही अपेक्षा व्यक्त करत प्रगतीशील शेतकरी श्री. सुर्यकांत पाटील यांनी आभार मानत प्रात्यक्षिकाचा समारोप केला.

(शब्दांकन – प्रा. डॉ. सौ. आर. एस. शेळके )

Tuesday, July 9, 2019

योगियांचे समाधिधन


सद्‌गुरू समाधिस्थ झाले. तरीही ते आपल्या परमभक्तांना अनुभव देत असतात. भक्ताला आत्मज्ञानी करण्यासाठी त्याला विविध अनुभूतीतून प्रेरित करीत असतात. समाधी सुखाचा लाभ प्रत्येक भक्ताने घ्यावा, अशी त्यांची इच्छा असते. हेच तर खरे योगियांचे समाधिधन आहे.
- राजेंद्र घोरपडे

हा योगियांचे समाधिधन । कीं होऊनी ठेलें पार्था अधीन ।
यालागीं विस्मयो माझें मन । करीतसे राया ।। 174।। अध्याय 11 वा

अर्थ - योगी ज्यांचे सुख समाधींतच भोगतात, असा हा योग्यांच्या समाधीत भोगण्याचें ऐश्‍वर्य असून, तो अर्जुनाच्या अगदीं आधीन झाला आहे. याकरितां राजा धृतराष्ट्रा, माझें मन आश्‍चर्य करतें.

रणभूमीवर मनाने खचलेल्या, युद्ध न करण्याच्या मनःस्थितीत असलेल्या अर्जुनाला भगवान कृष्ण युद्ध करण्यासाठी प्रेरित करत आहेत. अर्जुनाची मनःस्थिती सुधारण्यासाठी भगवंतांना स्वतःचे विश्‍वरूप दाखवावे लागले. हे सर्व प्रसंग पाहण्याचे भाग्य भगवंताच्या कृपेने संजयाला मिळाले आणि याचे सर्व वर्णन संजय अंध धृतराष्ट्राला सांगत आहे; पण धृतराष्ट्रावर याचा काहीही परिणाम झाला नाही. यामुळे कौरव कुळाचा सर्वनाश झाला. यासाठी नुसती सद्‌गुरूंची कृपा असून चालत नाही, तर योग्य दृष्टी असावी लागते. भगवंत अर्जुनासाठी विश्‍वरूपमय झाले. यासाठी अर्जुनासारखी भक्ती असावी लागते. दुष्ट-दुर्जनांचा नाश करण्यासाठी भगवंताचा अवतार आहे, पण हे कृत्य ते आपल्या परमभक्ताकडून करवून घेऊ इच्छित आहेत. यासाठी केवळ निमित्तमात्र होण्याचे आवाहन भगवंत अर्जुनास करत आहेत. माऊली दृष्ट-दुर्जनांच्या मनातील दुष्टपणा काढून प्रोची शिकवण देऊ इच्छित आहेत. यासाठी अर्जुनासारखे परमभक्त होण्याचे आवाहन ती करत आहे. जगात सुखशांती, समृद्धी नांदावी यासाठी आत्मज्ञानी सद्‌गुरू नेहमीच प्रयत्नशील असतात. हाच तर त्यांचा धर्म आहे. हीच तर खरी भारतीय संस्कृती आहे. सद्‌गुरू आत्मज्ञानाचा ठेवा कसा मिळवायचा, हे सांगत आहेत. तो मिळविण्यासाठीच युद्ध करण्याची प्रेरणा ते देत आहेत. अपयशाने दुःखी कष्टी होऊन, मनाने खचल्यानंतर अनेक जण अध्यात्माकडे वळतात. तसा ते योग्य मार्ग स्वीकारतात, यात शंकाच नाही, पण धृतराष्ट्रासारखी दृष्टी नसावी. अर्जुनासारखी वेध घेणारी नजर असावी. खऱ्या जीवनाचा अर्थ समजून घेण्याचे सामर्थ असावे. तरच ते या अपयशातून योग्य मार्गावर येतील. सद्‌गुरू योगीरूपाने त्यांना योग्य वाटेवर आणतात. अर्जुनासारखा भक्त भेटला तर ते त्याला आपल्या पदावर बसविण्यासाठी धडपडतात. भक्ताने मात्र यासाठी निमित्तमात्र व्हायचे असते. सद्‌गुरू समाधिस्थ झाले. तरीही ते आपल्या परमभक्तांना अनुभव देत असतात. भक्ताला आत्मज्ञानी करण्यासाठी त्याला विविध अनुभूतीतून प्रेरित करीत असतात. समाधी सुखाचा लाभ प्रत्येक भक्ताने घ्यावा, अशी त्यांची इच्छा असते. हेच तर खरे योगियांचे समाधिधन आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Sunday, July 7, 2019

आध्यात्मिक चमत्कारांचा अभ्यास होण्याची गरज



भक्तिमार्गातून मिळणारा आनंद, चेहऱ्यावर येणारे तेज हे या रसायनांचेच परिणाम आहेत. साधनेने चेहरा तजेलदार होतो. हा शरीरात तयार होणाऱ्या रसायनांचाच परिणाम आहे. यामुळेच शरीर निरोगी राहते. अशा या आध्यात्मिक चमत्कारांचा अभ्यास होण्याची गरज आहे.

जो प्रल्हादाचिया बोला । विषाहीसकट आपण जाहला ।
तो सद्‌गुरू असे जोडला । किरीटीसी ।।334।। अध्याय 10 वा

अर्थ - प्रल्हादानें माझा नारायण सर्व पदार्थांत व्पाप्त आहे असे हिरण्यकश्‍यपूस सांगितल्याकारणानें तो विषाहीसकट सर्व पदार्थ आपण झाला, असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनाला सद्‌गुरू लाभला होता.

सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे. अशा काळात प्रल्हादाच्या गोष्टी मनाला पटणे अशक्‍य वाटते. या दंतकथा आहेत. ती अतिशोक्ती वाटते, पण शास्त्रावर आधारित लिखाण करणाऱ्या संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी हे मग लिहिले कसे, हा प्रश्‍न पडतो.तसे दंतकथा आणि वास्तव यामध्ये बराच फरक आहे. इतिहासावर आधारित लिहिल्या गेलेल्या, दंतकथेतून सांगितल्या जाणाऱ्या रंजक कथानकामुळेच आज खरा इतिहास शोधणे कठीण जात आहे. ते रंजक कथानकच आपण खरे समजत असल्यानेच गैरसमज वाढत आहेत. यासाठी या कथांचा खोलवर जाऊन विचार करण्याची गरज आहे. त्यानंतर आपल्या असे लक्षात येईल, की त्या काळातील तंत्रज्ञानही उच्च होते. कारण त्या काळातील अनेक चमत्कारिक शोधांचा, वैशिष्ट्यपूर्ण बांधकामांचा उलगडा सध्या नव्या तंत्रज्ञानाच्या युगातही होऊ शकला नाही. एकाच दगडात मंदिराचा कळस बांधला कसा गेला असेल? हा दगड नेका इतक्‍या उंचीवर कसा नेला गेला असेल? असे प्रश्‍न काही पौराणिक मंदिरे पाहताना आपणास सहजच पडतात. कारण त्या काळात आताच्या सारख्या क्रेन नव्हत्या. मग हे शक्‍य कसे झाले? याचाच अर्थ, त्या काळातही प्रगत तंत्रज्ञान होते, पण काळाच्या ओघात ते लुप्त झाले. प्रल्हादावर विषाचा परिणाम झाला नाही. हे कसे शक्‍य आहे? उपचारही केले गेले नाहीत. मग तो इतके भयंकर विष पचवू कसा शकला, हा प्रश्‍न सहजच आपल्या मनात डोकावतो; पण साधनेने हे शक्‍य आहे. साधनेच्या काळात आपल्या शरीरातील पित्त जळते. यातून अनेक उत्साहवर्धक द्रव्यांची निर्मिती होते. साधनेच्या काळात पित्ताशयात अनेक रसायने तयार होतात. त्यांचा शोध सध्याच्या काळातही लावता आलेला नाही, हे परखड सत्य आहे. साधनेत शरीरात तयार होणाऱ्या द्रव्यातून रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. विष पचविण्याची ताकतही या द्रव्यात असते. भक्तिमार्गातून मिळणारा आनंद, चेहऱ्यावर येणारे तेज हे या रसायनांचेच परिणाम आहेत. साधनेने चेहरा तजेलदार होतो. हा शरीरात तयार होणाऱ्या रसायनांचाच परिणाम आहे. यामुळेच शरीर निरोगी राहते. अशा या आध्यात्मिक चमत्कारांचा अभ्यास होण्याची गरज आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।



Friday, July 5, 2019

जया सद्‌गुरू तारू पुढे ।


कधी स्वप्नात येऊन सद्‌गुरू दृष्टांत देतात. या स्वप्नानेही मनाला धीर मिळतो. मनातील विचारांना चालना मिळते. हे विचार सद्‌गुरूच आपल्या मनात उत्पन्न करत असतात, असा भाव असायला हवा, पण हे होत नाही. यामुळेच अनुभूती मनाला भावत नाही.

जया सद्‌गुरू तारू पुढे । जे अनुभवाचिये कासे गाढे ।
जया आत्मनिवेदन तरांडे । आकळिले ।। 98 ।। अध्याय 7 वा

अर्थ - ज्यास सद्‌गुरू हा पुढें तारणारा (नावाडी) आहे. ज्या साधकांनी आत्मनुभवरूपी कासोटा घट्ट बांधला आहे व ज्यांना आत्मनिवेदनरूपी ताफा प्राप्त झाला आहे.

सद्‌गुरूंनी गुरुमंत्र दिल्यानंतर साधना ही आपणासच करायची असते, पण प्रत्यक्षात ही साधना सद्‌गुरूच आपल्याकडून करवून घेत असतात. गुरुमंत्राच्या उपदेशानंतर अनेक अनुभूती सद्‌गुरू देतात. त्यामुळे साधनेत येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होतात. प्रत्येक गोष्टींत सद्‌गुरूंचा सहवास असल्याची अनुभूती येते. हे आपण करत नसून सद्‌गुरूच आपल्याकडून करवून घेत आहेत, अशी अनुभूती येते; पण मोहमायेमुळे आपण अंध झालेले असतो. हे आपल्या लक्षात येत नाही. यासाठी अवधानाचा वाफसा असणे आवश्‍यक आहे. तरच गुरुमंत्राची व त्यानंतर होत असलेल्या उपदेशाची पेरणी वाया जाणार नाही. हे बीज वाया जाणार नाही ना? अध्यात्मात प्रगती होईल ना? अशा अनेक शंका येत राहतात. काळजी वाटते, पण अशी काळजी करणे व्यर्थ आहे. कारण कर्तेकरविते हे सद्‌गुरूच आहेत, हे अनुभवाने आपल्या लक्षात येते. आपल्या डोळ्यांवरची ही झापड सद्‌गुरू दूर करतात आणि आपणास दृष्टी देतात. जीवनात येणाऱ्या अनेक कठीण प्रसंगात सद्‌गुरूंची साथ असते. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे सांगणारे स्वामी सदैव साथ देत असतात. फक्त आपली त्याकडे पाहण्याची दृष्टी कशी आहे, यावर ही अनुभूती अवलंबून आहे. सद्‌गुरूंचा हा उपदेशच मनाला मोठा धीर देतो. त्यांच्या या नुसत्या शब्दानेच मोठा आधार मिळतो. कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे धाडस अंगात उत्पन्न होते. कामांध्ये आधार मिळतो. या आधारावरच समोरच्या समस्या आपोआपच सुटतात. प्रश्‍न मार्गी लागतात. कधी स्वप्नात येऊन सद्‌गुरू दृष्टांत देतात. या स्वप्नानेही मनाला धीर मिळतो. मनातील विचारांना चालना मिळते. हे विचार सद्‌गुरूच आपल्या मनात उत्पन्न करत असतात, असा भाव असायला हवा, पण हे होत नाही. यामुळेच अनुभूती मनाला भावत नाही. सद्‌गुरू सदैव आपल्या सहवासात असतात. फक्त त्यांचे अस्तित्व आपणास जाणवले पाहिजे. यासाठी अवधान हे महत्त्वाचे आहे. तरच अनुभूती येते. अनुभूतीतूनच आध्यात्मिक प्रगती होत राहते.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


Wednesday, July 3, 2019

जेथ जेथ संपत्ति आणि दया ।





धर्म कोणता आहे? तर दया हा धर्म आहे. माणुसकी हा धर्म आहे. हा धर्म स्वीकारायला हवा. या धर्माचे पालन करायला हवे. हीच आपली भारतीय संस्कृती आहे. हाच आपल्या संस्कृतीचा धर्म आहे.
- राजेंद्र घोरपडे

जेथ जेथ संपत्ति आणि दया । दोन्ही वसती आलिया ठाया ।
ते ते जाण धनंजया । विभूती माझी ।। 307 ।। अध्याय 10

अर्थ - अर्जुना, ज्या ज्या पुरूषाच्या ठिकाणी ऐश्‍वर्य आणि दया ही दोन्ही राहावयास आलेली असतील, तो तो पुरूष माझी विभूति आहे, असे समज.

अनेक व्यक्ती पैशाच्या मागे धावत असतात. पैसा त्यांना अति प्रिय असतो. तसा ते अमाप पैसाही कमावतात, पण त्यांच्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात सर्वत्र पैसाच दिसतो. या पैशाच्या गर्वाने ते सर्वसामान्य जनतेचा द्वेष करतात. दानाची वृत्ती त्यांच्यात नसते. असली तरी विकत घेतल्याची ते भाषा करतात, इतकी मग्रुरी त्यांच्यात असते. अहो, इतकेच काय, पण स्वतःच्या घरच्यांच्यासाठीही पैसा खर्च करण्यासाठी ते नाही होय, नाही होय करतात. पैसा काय फुकट येतो काय? पैसा काय झाडाला लागतो काय? अशी त्यांची बोलणी ऐकून घ्यावी लागतात. पैशाने माणसे विकत घेता येतात, पण प्रे, आशीर्वाद, कृपा विकत घेता येत नाही. यासाठी अंगात दानशूरपणा असावा लागतो. अंगात दयाभाव असावा लागतो. पैशाने अंगात आलेल्या र्गुीने तो इतका अंध झालेला असतो की, घरात भेटायला आलेल्या व्यक्तीचा आदर करणेही तो विसरतो; पण पैशाची ही र्गुी योग्य नाही. कारण पैसा हे द्रव्य आहे. ते नाशवंत आहे. आज आहे उद्या नाही, पण घरात लक्ष्मीशिवाय शांती नाही, हेही तितकेच खरे आहे. लक्ष्मी घरात सुखशांती, समाधान घेऊन येते; पण ते टिकवून ठेवणे, आपल्या हातात आहे. आपल्याजवळच्या पैशाने गरजूंना मदत केली तर ते आपल्या कठीण प्रसंगात निश्‍चितच मदतीला धावतील, यात शंकाच नाही. यासाठी दयावान व्हायला शिकले पाहिजे. धर्म कोणता आहे? तर दया हा धर्म आहे. माणुसकी हा धर्म आहे. हा धर्म स्वीकारायला हवा. या धर्माचे पालन करायला हवे. हीच आपली भारतीय संस्कृती आहे. हाच आपल्या संस्कृतीचा धर्म आहे. जगा व जगू द्या असा आपला धर्म सांगतो. हे सांगण्यामागचा उद्देश समाजात शांती नांदावी हा आहे, पण आजकाल धर्माची व्याख्याच बदलली आहे. धर्म म्हणजे अनेक बंधणे, असा अर्थ काढला जात आहे; पण ही बंधणे काय आहेत, हे तरी जाणून घ्यायला नको का? नियम कोणते आहेत, हे अभ्यासायला हवे. जगातील कोणताही धर्म हेच नियम सांगतो. कारण सर्व धर्मांचा मार्ग हा एकच आहे- भगवंतांची प्राप्ती. त्यामुळेच सब का मालिक एक असे म्हटले गेले असावे. दया हा धर्म आहे. तेथे भगवंताची वस्ती निश्‍चितच आहे.
 

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


Monday, July 1, 2019

जे जे भेटे भूत । तें ते मानिजे भगवंत ।


फळ नासके जरी लागले तरी आपण त्यातील चांगला भाग कापून खातोच. चांगल्या भागाला निश्‍चितच मागणी आहे. माणसाच्या जीवनाचेही तसेच आहे. जो चांगला आहे त्यालाच आज अधिक मागणी आहे.
- राजेंद्र घोरपडे
जे जे भेटे भूत । तें ते मानिजे भगवंत ।
हा भक्तियोगु निश्‍चित । जाण माझा ।। 118 ।। अध्याय 10 वा

अर्थ - जो जो प्राणी दिसेल, तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असे समजावें. हा माझा भक्तियोग आहे असे निश्‍चित समज.

व्यक्ती तितक्‍या प्रकृती. दोन जुळे भाऊ असले तरी त्यांच्यात सुद्धा बराच फरक असतो. प्रत्येक पिकाच्या अनेक जाती आहेत, पण त्या प्रत्येक जातीची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. पिकात उपजलेले धान्य किंवा एकाच झाडाला लागलेली फळे एकसारखी नसतात. प्रत्येक फळाच्या चवीत थोडाफार तरी फरक असतोच. काही नासके असतात. काही कडवट असतात, तर काही अति गोड असतात. काहींना तर चवच नसते; पण प्रत्येक शेतकरी चांगली फळे लागतील, याचाच प्रयत्न करत असतो. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे साहजिकच अन्नधान्याची, फळांची मागणी वाढतीच राहणार आहे. यासाठी उत्पादनात वाढ कशी होईल, यासाठी शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच बरोबर धान्याची प्रत कशी सुधारेल, त्याची गोडी, त्याचा आकार आदीचाही प्रयत्न केला जात आहे. नुसते दिसायला चांगले असून चालत नाही. ज्याला गोडी चांगली आहे त्यालाच बाजारात अधिक मागणी असते. त्यालाच चांगला भाव मिळतो. फळ नासके जरी लागले तरी आपण त्यातील चांगला भाग कापून खातोच. चांगल्या भागाला निश्‍चितच मागणी आहे. माणसाच्या जीवनाचेही तसेच आहे. जो चांगला आहे त्यालाच आज अधिक मागणी आहे. सध्याचा काळ बदलला आहे, असे म्हटले जाते. माणूसही बदलला आहे. माणसाची मने बदललेली आहेत, असे सांगितले जाते. सत्याचा पुरस्कार करणाऱ्याला आज जगात फारशी किंमत नाही, असेही सांगितले जाते; पण खरे पाहता चांगल्या गोष्टीलाच टिकाऊपणा असतो. तो एकदा डावलला जाईल, दोनदा डावलला जाईल, पण तिसऱ्यांदा त्याचीच गरज वाटू लागेल. एखादा दुष्ट-दुर्जन जरी आपणास भेटला तरी त्याच्यात काही ना काही तरी चांगल्या गोष्टी निश्‍चितच असतात. त्याच्या चांगल्या गोष्टी घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. सत्‌ार्गाचा, चांगल्या गोष्टींचा ध्यास सतत करायला हवा. कारण जो चांगला आहे, सत्याचा पुरस्कार करणारा आहे, तोच या जीवनात अमर होतो.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।