Tuesday, March 31, 2020

तुवा होआवें योगयुक्ता ।


मन साधनेत रमवायचा प्रयत्न करायचा आहे. ध्यानावर लक्ष देऊन योगसंपन्न होण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे केले तर आपण जरूर योगसंपन्न होऊ शकू.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
मोबाईल 8237857621

या कारणे पंडूसुता । तुवा होआवें योगयुक्ता ।
येतुलेनि सर्वकाली साम्यता । आपणपां होईल ।। 256 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 8 वा

ओवीचा अर्थ - अर्जुना म्हणून तु योगसंपन्न हो. एवढ्याने स्वतःच्या ठिकाणी सर्वकाळ स्वरुप साम्यता होईल.

साधना आपण करत राहायचे आहे. प्रयत्न सुरु ठेवायचे आहेत. फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत राहायचे आहे. साधनेतून काय मिळते याची इच्छा न ठेवता सो ऽ हम साधना सुरू ठेवायची आहे. साधनेत मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते एकाग्र होईल किंवा होणारही नाही. म्हणून साधना सोडून द्यायची नाही. सो ऽ हम वर मन लक्ष केंद्रीत करायचे आहे. नजर केंद्रीत करायची आहे. लक्ष केंद्रीत करायचे आहे. साधनेत नजर नाकाच्या शेंड्यावर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्‍वासातून सो ऽ हमचा स्वर स्वतःच्या कानांनी ऐकायचा आहे. त्यावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. ध्यानाच्या काळात मनात येणारे सर्व विचार दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. विचार येतच राहणार. ते थांबवता येणार नाहीत. यासाठी जास्तीत जास्त सोऽहमवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. त्यामुळे येणाऱ्या विचारापासून आपण निश्‍चितच दूर जाऊ. विचार दाबायचा प्रयत्न केल्यास ते पुन्हा येणार पण मनच त्या विचारापासून दूर नेले तर मात्र निश्‍चितच ते दूर जातील. यासाठी मन साधनेत रमवायचा प्रयत्न करायचा आहे. ध्यानावर लक्ष देऊन योगसंपन्न होण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे केले तर आपण जरूर योगसंपन्न होऊ शकू. साधनेतून आपल्या स्वरुपाची ओळख करून घ्यायची आहे. मी कोण आहे याचा बोध करून घ्यायचा आहे. आपले खरे स्वरुप जाणून घ्यायचे आहे. याचा बोध, अनुभुती जेव्हा होईल तेव्हा आपले मन सोऽहम स्वरावर निश्‍चितच केंद्रीत होईल. दोन्ही नाकपुड्यातून एकाच वेळी श्‍वास आत घेता येईल व एकाचवेळी तो बाहेर सोडता येईल. ही साम्यावस्था आपणास सहज साध्य होईल. योगामुळे ते आपोआप आपणास घडेल. यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज भासणार नाही. सोऽहमचा बोध होईल. स्वतःच्या स्वरुपाची अनुभुती येईल. आत्मज्ञानाची प्राप्ती होईल. हेच तर या योगातून साधता येईल. ते सहज आहे यासाठी आपण फक्त योगसंपन्न होण्याचा प्रयत्न करायचा आहे. 


।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Monday, March 30, 2020

हिताहित जाणावें । हिताचिलागी ।।

 नदी पार करायची आहे. समोर नाव आहे. नावेत बसून नदी पार करायची की पोहत जायचे हे आपणच ठरवायचे आहे. दोन्ही पैकी सोपे व सुरक्षित कोणते हे आपणच ठरवायचे आहे. नावेत सुरक्षित प्रवास आहे. पोहताना दम लागून बुडण्याची भिती आहे. यासाठी सुरक्षित मार्ग स्वीकारणे कधीही चांगले. 

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
मोबाईल 8237857621

कां जे मार्गामार्ग देखावे । साच लटके वोळखावे ।
हिताहित जाणावें । हिताचिलागी ।। 239 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 8 वा

ओवीचा अर्थ - कारण कीं, आपल्या हिताकरितां योग्य-अयोग्य मार्गा पाहावे, खरे-खोटे ओळखावे आणि आपले हित कशांत आहे व अनहित कशात आहे हे समजून घ्यावे.

स्वतःचे हित कशात आहे. विकास कशात आहे. हे स्वतःच ओळखायला हवे. अध्यात्मात सर्व क्रिया या स्वतःच करायच्या आहेत. फक्त त्या माझ्यामुळे झाल्या हा मीपणा तेथे ठेवायचा नाही. स्वावलंबनाच्या मार्गाचा अवलंब आपण करायचा आहे. अध्यात्मात सर्व गोष्टी ह्या स्वतः शोधायच्या आहेत. स्वतः त्याचा अभ्यास करायचा आहे. योग्य काय अयोग्य काय हे स्वतःच ओळखायचे आहे. त्यानुसार स्वतःच योग्य मार्गाची निवड करायची आहे. कशात हित आहे कशात अहित आहे. खरे काय आहे? खोटे काय आहे? हे सर्व स्वतःच जाणून घ्यायचे आहे आणि त्यानुसार आपण आपला मार्ग निवडायचा आहे. समोर एका पेल्यात अमृत ठेवले आहे आणि एकात मद्य आहे. पेला कोणता उचलायचा हे आपण ठरवायचे आहे. अमृत पिऊन अमर व्हायचे की मद्य पिऊन गुंगीत राहायचे हे आपणच ठरवायचे आहे. अमृत पिऊन अमर होता येते. अमृत प्याल तर अमर व्हाल. मद्य प्याल तर गुंगीत राहाल. विकास कशात आहे. हे आपण ओळखायचे आहे. त्यानुसार आपण आपली कृती करायची आहे. चुकीचा मार्ग स्वीकारल तर मार्ग खडतर होईल. योग्य मार्ग स्वीकाराल तर साध्य गाठणे सहज शक्‍य होईल. काय करायचे हे आपणच ठरवायचे आहे. नदी पार करायची आहे. समोर नाव आहे. नावेत बसून नदी पार करायची की पोहत जायचे हे आपणच ठरवायचे आहे. दोन्ही पैकी सोपे व सुरक्षित कोणते हे आपणच ठरवायचे आहे. नावेत सुरक्षित प्रवास आहे. पोहताना दम लागून बुडण्याची भिती आहे. यासाठी सुरक्षित मार्ग स्वीकारणे कधीही चांगले. अध्यात्मातही तसेच आहे. भक्तीचा मार्ग सोपा आहे. योगाचा मार्ग खडतर आहे. भक्तीचा मार्ग स्वीकारायचा की योगाचा हे आपणच ठरवायचे आहे. दोन्हीही मार्ग एकाच ठिकाणी जातात पण सोपा मार्ग निवडणे कधीही चांगले. अध्यात्मिक विकास कशात आहे? त्यासाठी कोणते मार्ग सोपे आहेत? आपणास कोणता आवडतो? कोणता सोपा वाटतो तो मार्ग आपण स्वीकारायचा आहे. येथे प्रवास हा आपणासच करायचा आहे. यासाठी मार्ग निवडताना योग्य तोच निवडावा.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - 
मोबाईल - 8237857621

Saturday, March 28, 2020

तेथ बेंबळ हातु गेला । गांडिवाचा ।।

आपला वेळ फुकट घालवणार आहे. हे लक्षात घेऊन साधना जागरूकतेने करायला हवी. सो ऽ हम मध्ये मन रमवायला हवे. तसा प्रयत्न करायला हवा. तरच त्यातून सुटणारे बाण हे आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतील.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

सर्वांगा कंटाळा आला । अति संतापु उपनला ।
तेथ बेंबळ हातु गेला । गांडिवाचा ।। 197 ।। अध्याय 1 ला

ओवीचा अर्थ - सर्वांगावर काटा उभा राहिला आहे. माझ्या मनाला अतिशय यातना होत आहेत आणि गांडीव धनुष्य धरावयाचा हात लुळा होऊन गेला आहे.

साधनेतील मंत्र हे गांडिव आहे. या मंत्राचा वापर करायला हवा. साधनेला आपण बसलेला असतो पण आपण हे गांडिव उचललेले नसते. साधना सुरू असते. मंत्रोच्चार सुरू असतो. पण मन मात्र कोठेतरी भरकटलेले असते. गांडिव चालवण्याची इच्छा मनात नसेल तर बाण योग्य ठिकाणी लागणार नाही. त्याची जागा चुकणार. त्याचा वार वाया जाणार. यासाठी गांडिव चालविण्याचा दृढ निश्‍चिय हवा. मोहामुळे हा धनुष्य उचलण्याची इच्छा नसते. मंत्र म्हणण्यात आपण आपला वेळ फुकट का घालवत आहोत. त्यावेळात आपण अन्य काही तरी कार्य करू शकलो असतो. असे म्हणून आपण तो वेळ दवडतो. साधना करण्याचे विसरूनच जातो. आपण साधना मुळात करतोच किती वेळ. दहा ते पंधरा मिनटे त्यात वेळ घालवला तर तो वाया कसा जातो? दहा मिनिटे मोलाची आहेत. मग ही दहा मिनिटे साधनेत योग्य प्रकारे घालवली तर वेळ वाया कसा जाईल. पण तसे घडत नाही. दहा मिनिटे आपण साधनेला बसतो. पण या दहा मिनिटात मनात कोणते विचार करतो यावर लक्ष द्यायला हवे. लक्ष दिल्यानंतर असे लक्षात येते की आपण सोऽहम साधना करतच नाही. साधनेला तर बसलेले असतो. पण मनात दररोजच्या घडामोडी सुरू असतात. मनात अनेक विचार घोळत असतात. त्यातच आपली दहा मिनिटे जातात. मग साधना झालीच नाही. वेळ वायाच गेला ना? यासाठी साधनेत मन रमवायला हवे. येणारे विचार थांबवायला हवेत. मनात विविध मोहाचे विचार येतात. अशाने साधना होतच नाही. हे विचार आपली पाठच सोडत नाहीत. साधनेत मंत्राचा गांडिव काही उचललाच जात नाही. उचलला तरी तो योग्य ठिकाणी लागत नाही. तो चुकतो. मनाची एकाग्रता वाढवायला हवी. वेळेचे महत्त्व आपणास पटते ना? मग वेळ वाया का घालवता? साधनेत मनाची एकाग्रता हवी. मन एकाग्र झाले नाही तर वेळ फुकट जाणार. हा नफा - तोटा विचारात घ्यायलाच हवा. तरच लाभ होणार आहे. कोणताही धंदा करताना नफा - तोटा पाहावाच लागतो. तरच तो धंदा यशस्वी होतो. अन्यथा कधी तरी तो व्यवसाय गुंडाळावा लागतो. मनाची एकाग्रता हे आपले धन आहे. ते मिळविण्यासाठी प्रयत्न हे हवेतच. यासाठी मनात येणाऱ्या विचारांचा त्याग हा हवाच. आपला सखा शत्रूपक्षात असेल, तर तो शत्रू आहे. आपण त्याला मारले नाही तर तो आपणावर विजय संपादन करेल. हे लक्षात घ्यायला हवे. मनाला सुटलेला मोह आपणास खाणार आहे. आपला वेळ फुकट घालवणार आहे. हे लक्षात घेऊन साधना जागरूकतेने करायला हवी. सो ऽ हम मध्ये मन रमवायला हवे. तसा प्रयत्न करायला हवा. तरच त्यातून सुटणारे बाण हे आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतील.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - 
मोबाईल - 8237857621

Friday, March 27, 2020

तैसा हृद्‌यामध्ये मी रामु ।


सोऽहमच्या रांगेत उभे राहून दर्शन झाल्यानंतरच आपले खरे स्वरुप आपणास होईल. तेव्हाच आत्मदर्शन होईल. आपण आत्मज्ञानी होऊन जन्ममरणाच्या या फेऱ्यातून मुक्त होऊ. 

- राजेंद्र  कृष्णराव  घोरपडे,
मोबाईल 
8237857621 

तैसा हृद्‌यामध्ये मी रामु । असता सर्वसुखाचा आरामु ।
की भ्रांतासी कामु । विषयावरी ।। 60 ।। श्री ज्ञानेश्‍वरी अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - सर्व सुखाचा बगीचा असा जो मी राम, तो मी (सर्वांच्या) हृद्‌यांत असताना त्या मला न जाणून मूर्ख लोक सुखाकरितां विषयाचीच इच्छा करतात.

प्रत्येक मानवामध्ये हृद्‌य आहे. सर्वांचे हृद्‌य हे सारखेच आहे. त्याची रचना सारखी आहे. या हृद्‌ययाची धडधड सुरु आहे तोपर्यंत आपण हा देह जीवंत आहे असे आपण म्हणतो. आत्मा हृद्‌यातून निघून जातो तेव्हा त्या हृद्‌याची धडधड थांबते. श्‍वास सुद्धा थांबतो. म्हणजे आपण तो देह मृत झाला असे म्हणतो. या पंचमहाभुताच्या देहात आत्मा आहे तो पर्यंत आपण तो देह जीवंत समजतो. तो असतो तो पर्यंत सर्व शरीरातील क्रिया सुरु असतात. आत्मा देहातून गेल्यानंतर सर्व क्रिया थांबतात. हा आत्मा प्रत्येकांच्या हृद्‌यात आहे. तो आत्मा सर्वांच्याठायी सारखाच आहे. हे जाणण्यासाठी हा मानव जन्म आहे. कुठे शोधीशी रामेश्‍वर अन्‌ कुठे शोधीशी काशी, हृद्‌यातील भगवंत राहीला हृद्‌यातून उपाशी...हे मंगेश पाडगावकर व यशवंत देव लिखित हे गीत याचीच आठवण करून देते की देव शोधण्यासाठी काशी, रामेश्‍वरला जाण्याची गरज नाही. तो तुमच्या हृद्‌यातच आहे. आत्मा हाच भगवंत आहे. आत्मा हाच देव आहे. देव दगडात शोधण्यापेक्षा स्वतःच्या ठायी असणाऱ्या या देवाची ओळख आपण करून घ्यायला हवी. ही ओळख जो पर्यंत आपणास होत नाही तोपर्यंत रामेश्‍वरला जा किंवा काशीला जा सर्व तिर्थक्षेत्राची वारी करा ही सर्व व्यर्थ आहे. सर्व तिर्थक्षेत्रांच्याठायी असणारा भगवंत हा स्वतःच्या देहातच आहे. याची प्रथम आपण ओळख करुन घ्यायची आहे. तेव्हाच खरे देवदर्शन घडेल. अन्यथा सर्व भटकंती ही व्यर्थ आहे. या देवाचे दर्शन घडण्यासाठी सो ऽ हम्‌च्या रांगेत उभे राहण्याची गरज आहे. ही रांग आपण धरण्यास चुकलो किंवा ही सोडली तर आत्मदर्शन होणार नाही. यासाठी सोऽहमच्या रांगेत उभे राहून दर्शन झाल्यानंतरच आपले खरे स्वरुप आपणास होईल. तेव्हाच आत्मदर्शन होईल. आपण आत्मज्ञानी होऊन जन्ममरणाच्या या फेऱ्यातून मुक्त होऊ. ही ओळख करुन घेण्यासाठीच हा जन्म आहे.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - 
मोबाईल - 8237857621

Thursday, March 26, 2020

तवं संग्रामीं सज्ज जाहले । सकल कौरव देखिले ।


प्रेमाने त्यावर मात करायला हवी. वागण्यातून प्रेम व्यक्त व्हायला हवे. क्रोधाला प्रेमाने जिंकायला हवे. तरच मनाने साधना साध्य होईल. शरीरात उत्पन्न होणारी रसायने ही प्रेम स्वरूप असतील. ही रसायनेच खऱ्या स्वरूपाचे दर्शन घडवतील.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685
तवं संग्रामीं सज्ज जाहले । सकल कौरव देखिले ।
लीला धनुष्य उचलिलें । पंडुकुमरें ।। 168 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 1 ला

ओवीचा अर्थ - तेव्हां युद्धाला तयार झालेले सर्व कौरव अर्जुनाला दिसले. मग पांडूपुत्र अर्जुनाने लीलेनेच धनुष्य उचलून घेतले.

साधना हे एक युद्ध आहे. पण हे युद्ध कोणाशी? स्वतःतील दुर्गुणां विरुद्ध हे युद्ध आहे. सगुणांचे दुर्गुणाविरुद्ध युद्ध आहे. दुर्गुण कमी केले नाहीत, तर सगुणांचा पराभव होईल. यासाठी वेळीच सावध व्हायला हवे. युद्धाच्या आरंभी आपले शत्रू कोण आहेत यावर एक नजर टाकायला हवी. त्यांना ओळखायला हवे. त्यांना समजून घ्यायला हवे. त्यांचा पराभव कसा करता येईल, याचेही नियोजन प्रारंभीच करायला हवे. साधनेत व्यत्यय आणणारा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू क्रोध हा आहे. या बरोबरच मोह, माया, मत्सर, द्वेष हे सुद्धा शत्रू आहेत. साधनेत मन शांत असायला हवे. चिडचिड, क्रोध यासाठीच दूर करायला हवे. दिवसभरात आलेल्या रागाचाही परिणाम संध्याकाळच्या साधनेवर होतो. यासाठी हा क्रोध आपण विसरण्याचा प्रयत्न करायला हवा. रागाने शरीरात विविध रस तयार होतात. या रसाचा परिणाम शरीरावर होतो. उतारवयात क्रोधाला यासाठीच आवर घालायला हवा. चाळिशीनंतर वागण्यात समजूतदारपणा यायलाच हवा. प्रौढत्व यायला हवेच. तरच आरोग्य उत्तम राहाते. आयुष्य वाढते. क्रोधामुळे शरीरात विविध रस उत्पन्न होतात. या रसायनांमुळे शरीराचा तोल ढळतो. बऱ्याचदा उतारवयात तोल जाण्याचा आजार पाहायला मिळतो. तो मुख्यतः क्रोधामुळे होतो. क्रोधीत न होणे हा या आजारावरील उत्तम औषध आहे. वयाच्या चाळिशीनंतर उत्पन्न होणारे अनेक आजार हे मानसिकतेशी निगडित आहेत. यासाठी मन आनंदी राहावे, यावर विशेष भर द्यायला हवा. मन आनंदी असेल तरच साधना उत्तम होते. मन साधनेच्या आनंदात रममान करायला हवे. साधनेच्या युद्धात क्रोधावर जिंकण्यासाठी मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. राग का येतो? चिडचिड का होते? मनामध्ये येणारे विचार यास कारणीभूत आहेत. यासाठी मनात येणारे विचार हेच मुळात राग मुक्त असावेत. राग आलाच तर त्याचा त्याग करण्याचा प्रयत्न करायला हवा. राग आवरायला शिकावे. रागमुक्त जीवन, रागमुक्त मन घडवायला हवे. तशी जीवनशैली निर्माण करायला हवी. बोलण्यात, वागण्यात तसा बदल घडवायला हवा. राग आलाच तरी तो पचवता यायला हवा. राग व्यक्त होता कामा नये. असे वागणे हवे. प्रेमाने त्यावर मात करायला हवी. वागण्यातून प्रेम व्यक्त व्हायला हवे. क्रोधाला प्रेमाने जिंकायला हवे. तरच मनाने साधना साध्य होईल. शरीरात उत्पन्न होणारी रसायने ही प्रेम स्वरूप असतील. ही रसायनेच खऱ्या स्वरूपाचे दर्शन घडवतील. सद्‌गुरू स्वरूपाचे दर्शन होण्यासाठी क्रोधाला मनातील प्रेमाच्या झऱ्यात बुडवायला हवे. क्रोधाचा पराभव केला तर आपला साधनेतील विजय निश्‍चितच होतो.


Monday, March 23, 2020

अनावश्यक फिरताना आढळल्यास सक्त कारवाई - कोल्हापूर जिल्हाधिकारी


कोल्हापूर : जिल्ह्यात जमाव बंदी आदेश लागू आहे. जमाव बंदीचे उल्लंघन करुन अनावश्यक फिरताना आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला. 

काल रविवारी जनता कर्फ्यूत योगदान दिल्याबद्दल सर्व जनतेचे आभार मानून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, आज दुचाकी तसेच चारचाकी मधून काही नागरिक शहरातून अनावश्य फिरत आहेत. त्याच बरोबर गल्ल्या, उद्याने याठिकाणी गटा-गटाने विनाकारण बसून चर्चा करत आहेत. जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळून अद्यापही इतर दुकाने काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी आजूनही बंद केली नाहीत. सर्व कोल्हापूरकरांनी अनावश्यक रस्त्यावर फिरु, नये गटा-गटाने चर्चा करत बसू नये, जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता इतर दुकाने त्वरित बंद करावीत अन्यथा सक्त कारवाई करण्याच्या सूचना पोलीसांना दिल्या आहेत. 

अनावश्यकरित्या वाहन चालवत असेल तर अशांवर उद्यापासून बंदी घालण्याचा विचार प्रशासन करीत आहे. याची दखल नगरिकांनी घ्यावी. ग्रामीण भागात परदेश प्रवास करुन तसेच पुणे, मुंबई येथून आलेली आहेत, अशा व्यक्तींनी घरामध्येच स्वत:चे अलगीकरण करावे. अशा व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन, त्यांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात 14 दिवस ठेवले जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले...
1.कोरोना प्रतिबंधासाठी गावपातळीवर यंत्रणा राबविणार.
‌2. सरपंचांच्या अध्यक्षतेखालील समितीला अधिकार
3. गावातील व्यक्तीला बाहेर जाण्यासाठी आणि बाहेरुन गावात कोणाला प्रवेश द्यायचा याचे अधिकार सरंपचांच्या अध्यक्षतेखालील ग्रामस्तरीय समितीला देण्यात येणार.
4. पुणे, मुंबई आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन केले आहे. या व्यक्ती खरोखर घरीच राहतात की, बाहेर फिरतात का, फिरत असतील तर त्यांना अटकाव करणे याचे नियंत्रण तसेच या सर्वांचे अधिकार या ग्रामस्तरीय समितीला देण्यात येणार.
5. गाव हे एक घटक धरुन आपल्या गावातील सर्व नियोजन करायचे आहे. या नियोजनात अत्यावश्यक सेवा सुरु ठेवायच्या आहे. धान्य, खाद्य पदार्थ, भाजीपाला, दूध, वैद्यकीय सुविधा, टेलीफोन, इंटरनेट आदी सुविधा सुरु राहतील.
6. ज्या कारखान्याच्या ठिकाणी ऊसतोड सुरु आहे, तो कारखाना तात्काळ बंद करता येणार नाही. अशा कारखान्याच्या मर्यादित ती सुरु राहील. त्या शिवाय इतर सर्व खासगी, शासकीय, व्यापारी आणि औद्योगिक आस्थापना बंद ठेवाव्या लागतील.
7. जमाव बंदीमध्ये पाच पेक्षा अधिक लोक एकत्र जाणार नाहीत अथवा येणार नाहीत. बाहेरुन कोणतीही वाहन जिल्ह्यात येणार नाही अथवा बाहेर जाणार नाही, हे 31 मार्चपर्यंत नियंत्रित राहील.

शशिसूर्यी जो प्रकाशु । तो मीचि जाण ।।


वेदांमध्ये ॐकार आहे तोही त्याचे रुप आहे. ही त्याची रुपे आपण अनुभवायची आहेत. या अनुभवातून आपल्यातील मीपण नष्ट होऊन आत्मज्ञानाचा मार्ग सुकर होतो. तपस्वींच्या ठिकाणी असणारे तप आहे ते सुद्धा त्याचेच रुप आहे. यातूनच आता आपले अस्तित्व हे निमित्तमात्र आहे याचा बोध होईल.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

म्हणौनि उदकी रसु । कां पवनीं जो स्पर्शु ।
शशिसूर्यी जो प्रकाशु । तो मीचि जाण ।। 33 ।। अध्याय 7 वा

ओवीचा अर्थ - म्हणून पाण्यामध्यें रस किंवा वाऱ्यामध्यें स्पर्श अथवा चंद्रसूर्यांमध्ये जें तेज आहे तें मीच आहे, असें समज.

मानवाच्या शरीरात तो आत्म्याच्या स्वरुपात आहे. पण सृष्टीमध्येही त्याचे अस्तित्व आहे. अन्य सजिव वस्तुमध्येही तो आहे. सर्व प्राणीमात्रांमध्ये जो जीवंतपणा आहे, तो त्याच्यामुळेच आहे. शाश्‍वत म्हणून जे काही आहे त्यात तो आहे. पाण्यामध्ये रस आणि वाऱ्यामध्ये स्पर्श यांच्या रुपात तो आहे. चंद्र आणि सूर्यामध्ये तो तेज, प्रकाशाच्या रुपात आहे. ही त्याची ओळख आपण करून घ्यायची आहे. ती अनुभवायची आहे. त्याचे अस्तित्व जाणून घ्यायचे आहे. सजिवाच्या जगण्याचे जे कारण आहे, ते त्याचे स्वरुप आहे. जगात जो जन्माला आला त्याला मरण हे आहे. पण आत्मा अमर आहे. याचा अर्थ सजिवांमध्ये असणारा तो अमर आहे. त्याला जन्म नाही ना मरण. याचाच अर्थ आपले अस्तित्व हे फक्त निमित्तमात्र आहे. आपण आपले खरे स्वरुप येथे जाणून घ्यायचे आहे. हे खरे स्वरुप आपणाला जेव्हा होईल तेव्हा आपल्यातील मीपणा, अहंभाव हा नष्ट होईल आणि तेव्हाच त्याचे खरे स्वरुप आपणास समजू शकेल. व्यक्तीशा आपण त्याचे अस्तित्व जाणून घ्यायचे आहे. प्रत्येक सजिवातील त्याचे अस्तित्व अनुभवायचे आहे. ही अनुभुती जेव्हा आपणास येईल, तेव्हा आपल्या खऱ्या स्वरुपाचा बोध आपणास होईल. आपणामध्ये जो आहे तोच या चराचरामध्ये सामावलेला आहे. याचा बोध होईल. म्हणजेच सृष्टीमध्ये जे घडते ते त्याच्याच मुळे घडते. ते त्याचेच रुप आहे. याचा बोध होईल. आत्मज्ञान प्राप्तीमध्ये मुख्य अडथळा हा मीपणाचा, अहंभावाचा आहे. तो जेव्हा जाईल तेव्हा आत्मज्ञानाचा खरा मार्ग सुकर होईल. यासाठी त्याच्या अस्तित्वाचा बोध होणे हे गरजेचे आहे. तोच स्वतःमध्ये आहे हेही अनुभवने गरजेचे आहे. पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावतःच असणारा शुद्ध वास हे त्याचेच रुप आहे. आकाशाच्या ठिकाणी असणारे शब्द आहेत, ते ही त्याचे रुप आहे. वेदांमध्ये ॐकार आहे तोही त्याचे रुप आहे. ही त्याची रुपे आपण अनुभवायची आहेत. या अनुभवातून आपल्यातील मीपण नष्ट होऊन आत्मज्ञानाचा मार्ग सुकर होतो. तपस्वींच्या ठिकाणी असणारे तप आहे ते सुद्धा त्याचेच रुप आहे. यातूनच आता आपले अस्तित्व हे निमित्तमात्र आहे याचा बोध होईल. यासाठीच आपण आपले खरे कार्य ओळखून, आपल्या जन्माचा उद्देश ओळखून त्यानुसार आचरण करणे गरजेचे आहे. आत्मज्ञानी होणे, ब्रह्मसंपन्न होणे हेच आपले ध्येय आहे. तेव्हांच आपणाला ते स्वामित्व प्राप्त होईल. तेव्हाच आपणास आपल्या जन्माचे सार्थक झाले असे म्हणता येईल.

Friday, March 20, 2020

बोल बुद्धीचां डोळां देखावे ।


साधनेचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष असे अनेक फायदे मिळत राहतात. यासाठी साधनेचा मार्ग आपण सोडायचा नाही. कधी ना कधी तरी साधनेची ती अवस्था आपणास प्राप्त होऊ शकते यावर विश्‍वास असायला हवा. ती प्राप्त का होत नाही, हे आपणच आपणास विचारायला हवे. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल - 8999732685

परी तें मनाचां कानी ऐकावें । बोल बुद्धीचां डोळां देखावे ।
हे साटोवाटीं घ्यावे । चित्ताचिया ।। 494 ।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात, पण तें मनाच्या कानानें ऐकले पाहिजे. माझे शब्द बुद्धीच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजेत. हे माझे शब्द चित्त देऊन त्याच्या मोबदला घेतले पाहिजेत.

साधनेसाठी सद्‌गुरू मंत्र देतात. त्या मंत्राचा जप करायचा असतो. हा मंत्र आपण केव्हाही उच्चारू शकतो. केव्हाही त्याची साधना करु शकतो. त्याला काही बंधन नाही. कारण साधना आपली सुरुच असते. साधनेमध्ये कधीच खंड पडत नाही. आपण झोपेत असलो तरीही सोऽहम, सोऽहम चा जप सुरुच असतो. श्‍वास ही आपली साधना आहे. त्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्याचा हा सोऽहम चा स्वर आपण आपल्या कानांनी ऐकायचा आहे. मन त्या आवाजावर केंद्रित करायचे असते. मन त्यामध्ये गुंतवायचे असते. मनाने या शब्दांचा स्पर्श अनुभवायला हवा. हे शब्द पाहायचे सुद्धा असतात. बुद्धीच्या डोळ्यांनी ते पाहताही येतात. एकंदरीत सोऽहमचा स्वर आपल्या मनात, कानात, बुद्धीत, श्‍वासात, चित्तात साठवायला हवा. त्यावर एकाग्रता वाढवायला हवी. मनात, श्‍वासात, बुद्धीत, कानात, चित्तात जेव्हा सोऽहम एकाच वेळी असेल तेव्हा ती खरी साधना होय. साधनेची ही स्थिती आपण आत्मसात करायची असते. सद्‌गुरुंच्या कृपार्शिवादाने ती साध्य होते. ही स्थिती आपण गाठू शकलो तर आत्मज्ञानप्राप्तीचा मार्ग आपणासाठी सहज शक्‍य होऊ शकले. आत्मज्ञानाचा आपणास लाभ होऊ शकेल. यासाठी अभ्यासात सातत्य हवे. अभ्यास आणि एकाग्रतेने हे शक्‍य आहे. यावर विश्‍वासही तितकाच हवा. हे मिळू शकते का नाही याची शाश्‍वती अनेकांना नसते. पण असे नाही की ध्येय गाठता आले नाही म्हणून ते ध्येय सोडून द्यायचे. ध्येय जरी गाठता आले नाही तरी त्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपणाला लाभ होतो आहे हे लक्षात घ्यायला हवे. काही काळ जरी आपण एकाग्रता करू शकलो तरी त्याचे अन्य फायदेही आहेत. आरोग्याच्या दृष्टीने त्याचे लाभ आहेत. साधनेने मनाची प्रसन्नता वाढते. मन आनंदी राहाते. मनातील राग-द्वेषाची भावना कमी होते. साहजिकच मनाच्या या स्थितीने आरोग्यास लाभ होतो. चेहरा तजेलदार होतो. शरीराच्या कातडीसही तेज येते. या लाभाबरोबरच ही एकाग्रता आपल्याला अन्य कामातही उपयोगी ठरते. एकाग्रतेने काम केल्याने कामाचा ताण जाणवत नाही. काम सहज साध्य होते. साधनेचे असे अनेक फायदे आहेत. यासाठी अंतिम ध्येय गाठता आले नाही म्हणजे साधना सोडायची हा विचार योग्य नाही. साधनेचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष असे अनेक फायदे मिळत राहतात. यासाठी साधनेचा मार्ग आपण सोडायचा नाही. कधी ना कधी तरी साधनेची ती अवस्था आपणास प्राप्त होऊ शकते यावर विश्‍वास असायला हवा. ती प्राप्त का होत नाही, हे आपणच आपणास विचारायला हवे. तसे केल्यास आपल्याच चुका आपणास लक्षात येतील. त्या चुका सुधारत आपण मार्ग काढायचा आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।
राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये, कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - 
मोबाईल - 8237857621

Thursday, March 19, 2020

उपासना कशाची करायची ?


 मी म्हणजे ब्रह्म. मी म्हणजे आत्मा. मी म्हणजे सो ऽ हम. मी म्हणजे श्‍वास. श्‍वास आपण एका नाकपुडीतून आत घेतो. अन्‌ दुसऱ्या नाकपुडीतून सोडतो. पण यावर नियंत्रण ठेवायचे आहे. येथे साम्यावस्था साधायची आहे. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685


म्हणौनि आपणपां विश्‍व देखिजें । आणि आपण विश्‍व होईजें ।
ऐसें साम्यचि एक उपासिजें । पांडवा गा ।। 409 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - म्हणून आपल्या ठिकाणी जगत पाहावें आणि आपण जगत्‌ व्हावें, अशा एका साम्याचीच हे अर्जुना, तूं उपासना कर.

जग बदलते आहे. विकास होतो आहे. पण हा विकास भौतिक विकास आहे. बाह्य विकास आहे. हा विकास हा काळानुरुप होतच राहाणार. त्यात बदल हा होतच राहाणार आणि त्या विकासानुसार आपणे जीवन हे बदलतच राहाणार. तो बदल हा आपणास स्विकारावाच लागणार. बाह्य अन्‌ अंतरंगातील विकास आपण समजून घ्यायला हवा. म्हणजेच संसार आणि परमार्थामधील फरक आपल्या लक्षात येईल. संसार हा बाह्यरंगातील विकास आहे आणि परमार्थ हा अंतरंगातील विकास आहे. मग जगात आपण कशासाठी आलो याचाही विचार करायला हवा. आपल्या जन्माचा उद्देश काय हेही समजून घ्यायला हवे. जगण्यासाठी संसाराची आवश्‍यकता आहे. आपणास जीवन व्यवस्थित जगता यावे, यासाठी संसाराची व्यवस्था उभी राहिली आहे. हे समजून घ्यायला हवे. आता संसारात काही नियम आहेत. ते संसार व्यवस्थित व्हावा. सुखी-समाधानी व्हावा यासाठी आहेत. हे लक्षात घ्यायला हवे. या संसारात गुंतून न पडता आपण अंतरंगाच्याही विकासाचा विचार करायला हवा. म्हणजेच स्वतःच्या व्यक्तिगत विकासाचा विचारही करायला हवा. जीवनाचा मुख्य उद्देश हा आहे हे विचारात घेऊन कार्य करायला हवे. संसारात राहूनच परमार्थाचे कार्य गाठता येते. कारण संसाराची निर्मितीच मुळात तो उद्देश साध्य करण्यासाठी आधार म्हणून झालेली आहे. त्यामुळेच संसार हा होत असतो पण परमार्थ मात्र आपणास करावा लागतो. जीवनाचा अर्थ शोधावा लागतो. या जगात आपण एकटे नाही तर हे जग म्हणजेच आपण आहोत. आपल्या ठिकाणी हे जग पाहायला शिकायचे आहे. म्हणजेच आपण आपली स्वतःची ओळख करून घ्यायची आहे व ही ओळख झाल्यानंतर त्याचेच स्मरण निरंतर ठेवायचे आहे. मी म्हणजे ब्रह्म. मी म्हणजे आत्मा. मी म्हणजे सो ऽ हम. मी म्हणजे श्‍वास. श्‍वास आपण एका नाकपुडीतून आत घेतो. अन्‌ दुसऱ्या नाकपुडीतून सोडतो. पण यावर नियंत्रण ठेवायचे आहे. येथे साम्यावस्था साधायची आहे. दोन्ही नाकपुडीतून श्‍वास आत घ्यायचा आहे, अन्‌ दोन्हीतूनच तो श्‍वास बाहेर सोडायचा आहे. ही साम्यावस्था साधायची आहे. जीवनातील हा मुख्य उद्देश आपणास गाठायचा आहे. ही उपासना आपणास करायची आहे. म्हणजेच आपणास या विश्‍वाचे आर्त सद्‌गुरुकृपेने समजू शकेल. आत्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकेल.

Tuesday, March 17, 2020

गडावरील जैवविविधता जोपासण्याची गरज; भुदरगडावर 319 प्रजाती


आपण अनेक गड - किल्ल्यांवर भटकंती करतो. त्यांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतो. त्या वास्तू आपणास नेहमीच प्रेरणा देत असतात. स्फूर्ती देत राहतात. याबरोबरच या किल्ल्यावरील जैवविविधताही जोपासणे तितकेच गरजेचे झाले आहे.
पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी हे आवश्‍यक आहे. यासाठी वनस्पती तज्ज्ञ डॉ. व्ही. बी. शिंपले, डॉ. मानसिंगराज निंबाळकर, डॉ. पी. आर. क्षीरसागर, डॉ. सूरज उमडाळे, डॉ. नीलेश पवार यांनी भुदरगडावर आढळणाऱ्या वनस्पतींचा अभ्यास केला. किल्ल्यावर आढळणाऱ्या वनस्पतींची मूलभूत माहिती उपलब्ध व्हावी, हा त्यामागचा त्यांचा उद्देश होता. या संदर्भातील त्यांचा शोधनिबंधही प्रकाशित झाला आहे. 
भुदरगड किल्ला हा 10 चौरस किलोमीटरमध्ये व्यापलेला आहे. किल्ल्याच्या परिसरात घनदाट जंगल आहे. संशोधकांनी या किल्ल्याची पाहणी केली व औषधी वनस्पतीसह मानवास उपयुक्त ठरणाऱ्या वनस्पतींचीही नोंद त्यांनी केली. संशोधनात 319 प्रजातींची नोंद त्यांनी केली, यात 75 कुळांतील तर 238 वर्गातील वनस्पतींचा समावेश आहे. तसेच किटक भक्षी वनस्पतीच्या 12 पेक्षा जास्त प्रजातींची नोंद त्यांनी केली आहे.
319 मध्ये 57 टक्के हे वृक्ष, 17 टक्के झुडपे, 11 टक्के औषधी वनस्पती तर 15 टक्के वेलीवर्गीय वनस्पतीं नोंदविण्यात आल्या. महत्त्वाचे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात वेडेलिया गाऊका या वनस्पतीची नोंद प्रथमच केली आहे, तर अत्यंत दुर्मिळ अशी व्हिग्ना सह्याद्रिका ही वनस्पतीही त्यांना आढळली. पश्‍चिम घाटातील स्थानिक म्हणून ओळखली जाणारी कुकुमिस इंडिकस ही प्रजाती तर कॉनवोलऊलेसी वर्गातील आयपोमिया अल्बा ही दुर्मिळ प्रजाती संशोधकांना आढळली. गडाच्या परिसरात नरक्‍या अमृता ही वनस्पती मोठ्या प्रमाणात संशोधकांना पाहायला मिळाली. 

दुर्मिळ असलेल्या वनस्पतींची नोंद 

या अभ्यासात स्थानिक दुर्मिळ आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या काही वनस्पतींची नोंदही करण्यात आली. यामध्ये अडिनून इंडिकम, अलिसिकारपस बेलगमिनसिस, कुकुमिस सेटोसुस, इरिनोकारपस निम्मोनिल आदींचा समावेश आहे. 

गडाबरोबरच जैवविविधताही जपायला हवी 

संशोधकांनी केलेल्या पाहणीत सुमारे 300 हून अधिक प्रकारच्या प्रजातींची नोंद केली आहे. येथे आढळणाऱ्या काही वनस्पती या प्रदेशनिष्ठ आहेत. त्या अन्यत्र कोठेही पाहायला मिळत नाहीत. यातील काही वनस्पती दुर्मिळ आहेत. काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी या वनस्पतींचे संवर्धन गरजेचे आहे. याचाही विचार आता गड-किल्ल्यांच्या संवर्धनात होणे अपेक्षित आहे. कोणत्याही ऐतिहासिक गडाचे संवर्धन करताना वास्तूबरोबरच तेथील जैवविविधतेचा ठेवाही जपला तर यातून इतिहासाबरोबरच पर्यावरणाचेही संवर्धन होऊ शकेल. पर्यावरणाबाबत जनजागृतीही करणे सोपे होईल. याचा विचार करून तसा आराखडा तयार करण्याची गरज आहे. भावी पिढीला हे निश्‍चितच मार्गदर्शक ठरू शकेल. 

जय जय स्वसंवेद्या ।


सद्‌गुरू आत्मज्ञान विकासासाठी त्याचे बीज अनुग्रहाद्वारे शिष्यामध्ये लावतात. हे बीज हळूहळू विकसित होते. तो शिष्य आत्मज्ञानी होतो. त्या नराचा नारायण होतो. त्याला देवत्व येते. इतके सोपे, सहज हे अध्यात्मशास्त्र आहे. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

 ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ।। अध्याय 1 ला

स्वतःच स्वतःला ओळखणे ही अध्यात्माची पहिली पायरी आहे. येथून अध्यात्माच्या प्रगतीला सुरवात होते. स्वतःला ओळखायचे म्हणजे नेमके काय? मी कोण आहे? हा प्रश्‍न स्वतःच स्वतःला विचारावा. मी राजा आहे. मी भिकारी आहे. मी उद्योगपती आहे. मी कारखानदार आहे. मी राजकीय नेता आहे. अशी एखादी ओळख आपली आहे का? जगात वावरण्यासाठी स्वतःचे नाव ही स्वतःची ओळख आहे. हे नाव ही आपण स्वतः ठेवलेले नसते. आपल्या वडिलधाऱ्यांनी ते दिलेले असते. ही आपली खरी ओळख आहे का? आपले नाव, आपला व्यवसाय ही आपली ओळख आहे का? ही सर्व ओळख देहाची आहे. देह जन्माला आल्यानंतर त्याचे नामकरण केले जाते. तो काही कर्मे करतो. यातूनही त्याची ओळख निर्माण होते. मग मी म्हणजे देह आहे का? देह हा पंचमहाभूतांपासून तयार झाला आहे. पृथ्वी, आप, वायू, तेज आणि गगन ही पंचमहाभूते आहेत. मृत्यूनंतर देह पंचत्वात विलीन होतो. मग आपली ओळख काय? देह जन्मतो, मृतही होतो. पण देह जिवंत कशामुळे असतो? त्याच्यात चैतन्य कसे येते ? ते काय आहे ? जिवंतपणा म्हणजे तरी काय ? श्‍वास आत येतो, बाहेर जातो ही क्रिया जोपर्यंत सुरू असते तोपर्यंत देह जिवंत असतो. ही क्रिया थांबली की देह म्हणजे निर्जीव वस्तू आहे. मग देह ही आपली ओळख कशी असेल. ही सुद्धा आपली ओळख नाही. देहाला जिवंतपणा कशामुळे येतो. देहात आत्मा आल्यानंतर देह जिवंत होतो. आत्मा देहातून गेल्यानंतर देह मृत होतो. मग मी म्हणजे कोण आहे ? मी एक आत्मा आहे. आत्मा ही आपली ओळख आहे. मी आत्मा आहे. पण हा आत्मा प्रत्येक देहात आहे. प्रत्येक देहात असलेला आत्मा वेगळा आहे का ? तो एकच आहे. मग सर्वांच्या ठिकाणी आत्मा हा एकच आहे. तर मग सर्वच जण हे एक आहेत. देहात आल्यानंतर त्यांची ओळख बदलली आहे. मी देह आहे हा अहंकार त्याच्यात आला आहे. या अंहकारामुळे आत्मा हा दिसतच नाही. खरी ओळख तो विसरला आहे. स्वतःची खरी ओळख ही आत्मा आहे. ही ओळख सदैव ठेवल्यानंतर आत्मज्ञानाची प्राप्ती होते. ही ओळख कायम स्मरणात राहावी, यासाठीच साधना केली जाते. साधनेने ही ओळख दृढ होते. पण यासाठी योग्य मार्गदर्शकाची गरज आहे. सद्‌गुरू हे मार्गदर्शक असतात. सद्‌गुरू आत्मज्ञान विकासासाठी त्याचे बीज अनुग्रहाद्वारे शिष्यामध्ये लावतात. हे बीज हळूहळू विकसित होते. तो शिष्य आत्मज्ञानी होतो. त्या नराचा नारायण होतो. त्याला देवत्व येते. इतके सोपे, सहज हे अध्यात्मशास्त्र आहे. सद्‌गुरूंच्या आर्शिवादाने हे शास्त्र आत्मसात होते. अशा आत्मज्ञानी सद्‌गुरुंचा जयजयकार असो. 


।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


Friday, March 13, 2020

कोल्हापूर जिल्ह्यातील यात्रा, जत्रांना ३१ मार्चपर्यंत बंदी


सार्वजनिक कार्यक्रम, जत्रा, उरुस आदींवर 31 मार्चपर्यंत बंदी
*जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश*

 *कोल्हापूर, दि. 13 (जि.मा.का.): कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता एका संक्रमीत रुग्णाकडून अन्य व्यक्तीस संपर्कात आल्याने होण्याची शक्यता विचारात घेवून जिल्ह्यामध्ये घेण्यात येणाऱ्या सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडास्पर्धा आदींवर 14 मार्च ते 31 मार्च पर्यंत बंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले. जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात पुजारी किंवा धर्मगुरु आदींना विधिवत पुजा करण्यास किंवा परंपरेने करावयाचे कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्यास बंदी असणार नाही.* 
 आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना या विषाणूचे संसर्ग बांधीत रुग्ण आढळत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. असे प्रवासी जिल्ह्यामध्येही परदेश प्रवास करुन आलेले आहेत व बरेच प्रवासी परतण्याच्या मार्गावर आहेत. कोरोना विषाणूचे संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्यची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचे संसर्ग असल्यास त्यास अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार येणार आहेत. परदेशी प्रवाशांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे इत्यादी बाबी टाळणे आवश्यक आहे.
  कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता, विषाणूची लागण संक्रमीत रुग्णाकडून अन्य व्यक्तीस/इसमास त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता विचारात घेवून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, कलम 34 मधील पोट कलम ग (c) व ड (m) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 43 लागू केले आहे. 
  जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात पुजारी किंवा धर्मगुरु आदींना विधिवत पुजा करण्यास किंवा परंपरेने करावयाचे कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्यास बंदी असणार नाही. खासगी कार्यक्रम फक्त कौटुंबिक स्वरुपात करण्यास बंदी असणार नाही. परंतु या दोन्ही बाबतीत सर्व वैद्यकीय सुरक्षा पाळणे बंधनकारक राहील. तहसिलदार किंवा मुख्याधिकारी नगरपालिका किंवा महापालिका आयुक्त  यांची त्यांच्या कार्यक्षेत्रातील कार्यक्रमांसाठी लेखी पूर्व परवानगी घ्यावी लागेल.
  शासकीय यंत्रणांनी अशाप्रकारे सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडास्पर्धा इत्यादीच्या आयोजना संदर्भात परवानगी देण्यात येऊ नये.
  जिल्ह्यातील सर्व तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी व मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद व महानगरपालिका आयुक्त यांनी त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच फक्त विधिवत पुजा व कौटुंबिक कार्यक्रमांना परवानगी देण्यासाठी प्राधिकृत करुन तसे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
 आदेशाचे किंवा तहसिलदार, मुख्याधिकारी किंवा आयुक्त यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन अध्या गर्दीचे कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधित संयोजकाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये कारवाई करण्यात येईल. यासाठी सर्व तहसिलदार, मुख्याधिकारी व आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आले, असेही आदेशात नमूद आहे.

Thursday, March 12, 2020

विरक्ती म्हणजे काय ?


मन सोऽहमच्या नादामध्ये रंगायला हवे. त्यात आपण गुंग व्हायला हवे. बाकीचे स्वर आपोआप बंद होतात. साधनेला एक आध्यात्मिक उंची येते. आत्मज्ञान प्राप्तीचे दरवाजे खुले होतात. फक्त मन विरक्त व्हायला हवे. मनामध्ये सोऽहम व्यतिरिक्त अन्य कोणताही विचार येता कामा नये. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

जे अपेक्षिजे विरक्तीं । सदा अनुभविजे संतीं ।
सोऽहंभावें पारंगतीं । रमिजे जेथ ।। 53।। अध्याय 1 ला


ओवीचा अर्थ - वैराग्यशील पुरुष ज्याची इच्छा करतात, संत जें नेहमी अनुभवितात व सोऽहम्‌ भावनेनें पार पावलेले जेथें रममाण होतात.

विरक्ती यायला हवी म्हणजे नेमके काय? अध्यात्मात प्रगतीसाठी विरक्ती आवश्‍यक आहे. पण नेमके विरक्ती म्हणजे काय? मन विरक्त व्हायला हवे म्हणजे नेमके काय व्हायला हवे? अशा प्रश्‍न अनेक साधकांना पडतो. साधना करतो. म्हणजे नेमके काय करतो हा प्रश्‍न स्वतःला विचारला तर विरक्तीच्या प्रश्‍नाचे उत्तर निश्‍चित मिळेल. सद्‌गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करतो. एकाजागी निवांत बसून जप करतो. डोळे मिटून जप करतो. जप सुरू असतो पण मन मात्र जपावर नसते. दिवसभरातील घडामोडीवर ते भटकत असते. जप सुरू असतो. जपाची गणती सुरू असते. पाच माळा, दहा माळा असे ठरलेल्या माळा झाल्या की साधना पूर्ण होते. ही साधना आहे का? मनात सोऽहम नसतो. सोऽहम मात्र सुरू असतो. तुम्ही साधना करत नसला तरीही सोऽहमचा नाद सुरू असतो. मग आपण साधनेत नेमके काय करतो. नुसत्या जपाच्या माळा ओढत असतो. गणती करत असतो. आज एक हजार आठ वेळा जप केला. उद्या दहा हजार करायचा. ही गणती करून साधना सुरू असते. ही गणती नाही केली तरीही सोऽहम सुरूच असतो ना? मग गणती कसली केली जाते. जय जय राम कृष्ण हरी...जय जय राम कृष्ण हरी...हे काम करतानाही म्हणता येते. पण हा जप सुरू असताना मन मात्र इतरत्र भटकत असते. मनाचे हे भटकने थांबायला हवे. मन रिकामे व्हायला हवे. म्हणजेच विरक्त व्हायला हवे. मनात जपा व्यतिरिक्त इतर कोणताही विचार येता कामा नये. असे झाले तरच विरक्ती आली असे म्हणता येईल. मन विरक्त झाले असे म्हणता येईल. यासाठी प्रयत्न करायला हवा. मन भटकत म्हणून साधना सोडायची नाही. जपाची गणती सोडायची नाही. ती सुरूच ठेवायची पण मन त्यावर कसे केंद्रित करता येईल याकडे लक्ष द्यायला हवे. अवधान ढळता कामा नये. कधी पाच शब्दावर केंद्रित होईल. कधी एका माळेवर होईल पण ते केंद्रित व्हायला हवे. सोऽहमचा स्वर स्वतःच्या कानांनी ऐकण्याचा प्रयत्न केला तर मन निश्‍चितच भरकटण्याचे थांबते. तसा प्रयत्न सुरू ठेवायला हवा. मन सोऽहमच्या नादामध्ये रंगायला हवे. त्यात आपण गुंग व्हायला हवे. बाकीचे स्वर आपोआप बंद होतात. साधनेला एक आध्यात्मिक उंची येते. आत्मज्ञान प्राप्तीचे दरवाजे खुले होतात. फक्त मन विरक्त व्हायला हवे. मनामध्ये सोऽहम व्यतिरिक्त अन्य कोणताही विचार येता कामा नये. सद्‌गुरूंनी दिलेला मंत्रच स्वतःच्या कानांनी ऐकायला हवा. अशी अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हा असा साधक आत्मज्ञान प्राप्तीस योग्य होतो. अशी अवस्था सद्‌गुरूंच्या कृपेनेच प्राप्ती होते. ही कृपा व्हायला हवी. या कृपेसाठी प्रयत्न करायला हवेत.

Friday, March 6, 2020

साधनेचे स्थान कसे असावे ?



चिखल मळता मळता संत गोरा कुंभार नामस्मरणात रमून जायचे. काम करतानाही साधना करता येते याचे हे उत्तम उदाहरण आहे. मनाची तयारी ठेवली तर काहीच अशक्‍य नाही. मनाची स्थिरता हेच साधनेचे खरे आसन आहे. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल - 8999732685




म्हणौनि तैसें तें जाणावें । मन राहतें पाहावें ।
राहील तेथ रचावें । आसन ऐसें ।। 181 ।। श्री ज्ञानेश्‍वरी अध्याय 6 वा
ओवीचा अर्थ - म्हणून तें स्थान, तसें आहे कीं, नाहीं, हें समजून घ्यावें, आपलें मन तेथें स्थिर राहातें कीं नाहीं, तें पाहावें; आणि राहात असेल, तर तेथें असें आसन लावावें.
मंदिर, मठ, शिवालय यांची उभारणीच मुळात शांततेत साधना करता यावी यासाठी केली गेली आहे. पुरातन मंदिरात याची अनुभुती निश्‍चित येते. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता मंदिर, धार्मिक स्थळी गर्दी होते. यामुळे अशा पवित्र ठिकाणी साधनेचा विचारच डोकावत नाही. हळूहळू हा संस्कार लुप्त होताना पाहायला मिळत आहे. पण म्हणून साधना करायची नाही असे नाही. साधनेसाठी आसन, स्थान हे आवश्‍यक आहे. पण ते कसे असावे असा काही नियम नाही. मन जेथे स्थिर होते. मन जेथे स्थिर राहाते असे स्थळ, ठिकाण हे साधनेसाठी योग्य आहे. तेथे निश्‍चित आसन लावावे. कारण आध्यात्मिक प्रगतीसाठी मनाची स्थिरता, मनाची प्रसन्नता ही महत्त्वाची आहे. ती नसेल तर प्रगती होणार नाही. म्हणून उद्देश साध्य होण्यासाठी मुख्य गोष्ट विचारात घेणे गरजेचे आहे. मन केव्हाही, कोठेही स्थिर करता येऊ शकते. फक्त आपली तशी मानसिक तयारी हवी. चिखल मळता मळता संत गोरा कुंभार नामस्मरणात रमून जायचे. काम करतानाही साधना करता येते याचे हे उत्तम उदाहरण आहे. मनाची तयारी ठेवली तर काहीच अशक्‍य नाही. मनाची स्थिरता हेच साधनेचे खरे आसन आहे. ती असेल तर साधना कोठेही करता येऊ शकते.

Sunday, March 1, 2020

करवंदं अन्‌ नेर्लीकडे व्यावसायिक दृष्टीने पाहावे


मुख्यतः घनदाट जंगलात आढळणाऱ्या या वनस्पतींकडे उत्पन्नाचा स्रोत या उद्देशाने कधी पाहिलेच गेले नाही. जंगलात आढळणाऱ्या अनेक औषधी वनस्पतींची लागवड व्यावसायिकदृष्ट्या केली जात आहे. तशी करवंद व नेर्ली यांचीही लागवड करता येणे शक्‍य आहे. अन्य फळझाडांप्रमाणे यांचेही उत्पादन घेता येणे शक्‍य आहे; पण यावर अधिक संशोधन आपल्याकडे झालेले नाही.
- राजेंद्र घोरपडे

सह्याद्री घाटमाथ्यावर करवंद आणि नेर्ली या वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. करवंद हे झुडूप, तर नेर्ली ही वेलवर्गीय वनस्पती आहे. या दोन्हीही वनस्पतींवर फारसे संशोधन झालेले नाही. यामुळे या दुर्लक्षित वनस्पतींकडे लक्ष वेधले जावे, या उद्देशाने कोल्हापुरातील डॉ. राजाराम पाटील, संदीप पै, नीलेश पवार, विनोद शिंपले, राकेश पाटील, मानसिंगराज निंबाळकर यांनी या वनस्पतींच्या फळांमध्ये असणाऱ्या रासायनिक घटक आणि खनिजांच्या गुणधर्माचा अभ्यास केला. या संदर्भातील त्यांचा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित झाला आहे.

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर करवंदाची करिसा करंदस तर नेर्लीची इलॅग्नस कन्फेर्टा या जाती आढळतात. तसे करवंदाच्या जाती सर्वत्र पाहायला मिळतात; पण नेर्लीच्या जाती सह्याद्रीव्यतिरिक्त ईशान्य भारतात मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांत आढळतात.

फळ आणि बियांतील घटक संशोधनात नेर्लीच्या फळामध्ये ऍसकॅर्बिक ऍसिड अर्थात व्हिटॅमिन "सी'चे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. नेर्लीच्या फळामध्ये व्हिटॅमिन "सी'चे 8.20 ते 8.30 मिलीग्रॅम प्रति 100 ग्रॅम इतके प्रमाण असते. या व्यतिरिक्त करवंद आणि नेर्लीच्या फळ आणि बियांमध्ये कॉपर, मॅंगेनिज, फेरस, झिंक, कॅल्शियम, क्रोमियम, कोबॉल्ट, मॅग्नेशियम ही आठ मूलद्रव्येही आढळतात. यामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे.

प्रमुख मूलद्रव्यांचे प्रमाण असे (मिलीग्रॅम प्रतिकिलो)
कॅल्शियम 


नेर्ली फळ - 17.06  नेर्ली बिया - 28.60 

करवंद फळ - 29.26  करवंद बिया -49.56
 

मॅग्नेशियम 

नेर्ली फळ - 1358  नेर्ली बिया - 140 

करवंद फळ - 523  करवंद बिया - 407

विष, रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता
संशोधनामध्ये या दोन्ही फळांमध्ये रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता तसेच शरीरातील चयापचय क्रियेमध्ये तयार होणाऱ्या घातक घटकांचे विघटन करण्याची क्षमता (ऍन्टिऑक्‍सिडन्ट ऍक्‍टिव्हिटी) असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा औषधी गुणधर्मांचा सखोल अभ्यास करून तसेच या फळांचे महत्त्व विचारात घेऊन या वनस्पतींच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

व्यावसायिकदृष्ट्या लागवड गरजेची
मुख्यतः घनदाट जंगलात आढळणाऱ्या या वनस्पतींकडे उत्पन्नाचा स्रोत या उद्देशाने कधी पाहिलेच गेले नाही. जंगलात आढळणाऱ्या अनेक औषधी वनस्पतींची लागवड व्यावसायिकदृष्ट्या केली जात आहे. तशी करवंद व नेर्ली यांचीही लागवड करता येणे शक्‍य आहे. अन्य फळझाडांप्रमाणे यांचेही उत्पादन घेता येणे शक्‍य आहे; पण यावर अधिक संशोधन आपल्याकडे झालेले नाही. फक्त या फळांपासून जाम, जेली, वाईन, सरबत, लोणची इत्यादी उपपदार्थांचे उत्पादन घेता येऊ शकते, इतकेच प्रयोग झाले आहेत. तशी याची उत्पादनेही घेतली जात आहेत; पण त्याला मर्यादा आहेत. डोंगराळ भागात व्यावसायिक दृष्टिकोनातून यांच्या लागवडीच्या संदर्भात प्रयोग कोठे पाहायला मिळत नाही. डोंगरी लोकवस्तीतील घटकाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या लागवडीचा प्रयोग होणे गरजेचे आहे. यातून या डोंगरी लोकवस्तीचा विकास होऊ शकेल. त्यांचे जीवनमान उंचावणारा हा प्रयोग ठरू शकेल.