Saturday, May 7, 2016

वडिलोपार्जित वसा जपण्याचा हसूरच्या डॉक्‍टरांचा ध्यास


वडिलोपार्जित शेती टिकवून ठेवायची, विकायची नाही, याच उद्देशाने गेली २४ वर्षे डॉ. सचिन कुलकर्णी (हसूरकर) शेती करीत आहेत. हसूर (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथे त्यांची शेती आहे. कोल्हापूर शहरातील वैद्यकीय व्यवसाय सांभाळत गावाकडची शेतीही ते पाहतात. पीक उत्पादनवाढीचे प्रयोग करीत डॉ. सचिन कुलकर्णी यांची शेतीमधील वाटचाल सुरू आहे. 

राजेंद्र घोरपडे 

कोल्हापूर शहरातील डॉ. सचिन विनायक कुलकर्णी (हसूरकर) हे व्यवसायाने त्वचारोगतज्ज्ञ. करवीर तालुक्‍यातील हसूर हे त्यांचे मूळ गाव. हसूर आणि बाटणवाडी परिसरात त्यांची वीस एकर बागायती आणि चार एकर डोंगराळ शेती आहे. बाकीची शेती जिरायती आहे. वडिलोपार्जित शेती असल्याने लहानपणापासूनच डॉक्‍टरांना पीक पद्धतीची माहिती होती. डॉक्‍टरांचे आजोबा काशिनाथ हरी कुलकर्णी हे भोगावती साखर कारखान्याचे संस्थापक संचालक होते. या भागातल्या शेतकऱ्यांना आजोबा मार्गदर्शन करत. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे डॉ. सचिन यांना शेतीची आवड निर्माण झाली. आजोबा त्याकाळी चांगल्या पद्धतीने गुऱ्हाळही चालवत. परंतु कारखाना सुरू झाल्यानंतर गुऱ्हाळ बंद झाले. आजोबांच्या इच्छेपोटी डॉ. सचिन यांचे वडील डॉ. विनायक हेसुद्धा डॉक्‍टरी व्यवसाय सांभाळत शेती पाहत होते. त्यांचाच वारसा आता गेली २४ वर्षे डॉ. सचिन चालवत आहेत.
शेती नियोजनाबाबत डॉ. कुलकर्णी म्हणाले की, वीस एकर बागायत शेती ही पाच ठिकाणी विभागलेली आहे. विविध ठिकाणची शेती पाहणे शक्‍य होत नाही. त्यामुळे शेताचे योग्य व्यवस्थापन ठेवण्यासाठी मी वाटेकरी नेमले आहेत. वाटेकऱ्यांच्यामुळे शेती टिकून चांगले उत्पादनही मिळत आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनाबरोबरच आठ कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचे समाधानही मिळते. शेतात उत्पादित होणारा चारा वाटेकरी त्यांच्या जनावरांसाठी वापरतात. काही वाटेकरी उसात चाऱ्यासाठी मक्‍याची लागवड करतात. या बदल्यात या वाटेकऱ्यांकडून शेतीस लागणारे शेणखत मिळते. वैद्यकीय व्यवसायामुळे आठवड्यातून दोन दिवस शेतीच्या नियोजनासाठी वेळ मिळतो. त्या वेळी शेतीमधील अडचणी आणि उपायांबाबत वाटेकऱ्यांच्या बरोबरीने चर्चा होते.
डॉ. कुलकर्णी यांनी प्रयोग परिवाराचे डॉ. श्रीधर दाभोळकर यांच्या मार्गदर्शनानुसार गांडूळ शेतीचा प्रयोग केला होता. शेतामध्येच गांडूळखत तयार केले. ठराविक आकाराचे खड्डे तयार करून त्यामध्ये शेणखत आणि ऊस पाचट कुजवून त्यामध्ये गांडुळे सोडली. खत तयार झाल्यावर हे खत शेतामध्ये मिसळून भुईमुगाचे चांगले उत्पादन घेतले. जमिनीचा पोत चांगला राहण्यासाठी सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर ते करतात. प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला त्यांना शेतीच्या नियोजनासाठी उपयुक्त ठरतो. डॉ. कुलकर्णी यांची काही शेती काळवट, पाणथळ आहे. जमिनीत पाणी साचून राहत असल्याने पिकांची वाढ व्यवस्थित होत नाही. त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. हे विचारात घेऊन त्यांनी या क्षेत्रामध्ये मुरमाड माती मिसळली. जमिनीचे सपाटीकरण केले. त्याचा पुढे पीक उत्पादनासाठी फायदा होणार आहे.

रोप पद्धतीने ऊस लागवड ः 

डॉ. कुलकर्णी यांच्या शेतामध्ये मुख्यतः ऊस, भात, भुईमूग पिकांची हंगामनिहाय लागवड असते. पूर्वी ते उसाची पारंपरिक पद्धतीने लागवड करीत होते. पण बऱ्याचदा पिकाची व्यवस्थित वाढ होत नव्हती. यावर मात करण्यासाठी डॉक्‍टरांनी प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्ल्याने रोप पद्धतीने लागवडीचे नियोजन केले. चार फुटाची सरी ठेवून को- ८६०३२ आणि को-९२०५ या जातीच्या रोपांची लागवड सुरू केली. कांड्याने लागवड केलेल्या उसाचे एकरी उत्पादन ३० ते ३५ टनांपर्यंतच येत होते. आता रोप लागवडीमुळे ५० टनांपर्यंत पोचले आहे. खोडव्याचे उत्पादन ३५ टनांपर्यंत मिळते. रोप लागवडीमुळे दोन महिन्यांचा कालवधी आणि खर्चही वाचला. रोपांमध्ये मर कमी असल्याने वाढ चांगली होते. आलेल्या उत्पन्नातील जमिनीसाठीचा चौथाई हिस्सा डॉक्‍टर घेतात. उरलेले ७५ टक्के उत्पन्न निम्मे-निम्मे विभागून घेतले जाते. मशागतीपासून कापणीपर्यंतचा सर्व खर्च डॉक्‍टर स्वतः करतात. सर्व खर्च वजा जाता आणि वाटेकऱ्यांचा हिस्सा वजा जाता उसातून एकरी २० हजार रुपये मिळतात. ऊस काढल्यानंतर त्या शेतात भात लागवड केली जाते किंवा रान पड ठेवले जाते. भात पिकासाठी लागणारा सर्व खर्च डॉक्‍टर करतात. भाताच्या सुधारित जातींची लागवड करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. एकरी ३० क्विंटल भात उत्पादन त्यांना मिळते. त्यातील निम्मे-निम्मे उत्पादन वाटून घेतले जाते. येत्या काळात पाणीटंचाई लक्षात घेऊन सर्व क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचे त्यांचे नियोजन आहे.

बांधही देतो उत्पन्न 

डॉक्‍टरांनी शेतीच्या बांधावर शेवगा, आंबा, नारळाची लागवड केली आहे. यातूनही त्यांना उत्पन्न मिळते. डॉक्‍टरांच्या आजोबांनी लावलेल्या हापूस, पायरी आंब्याचे उत्पादन आजही त्यांना मिळते. फळझाडांची योग्य निगा राखली, तर उत्पादन नियमित मिळते, हा डॉक्‍टरांचा अनुभव आहे. झाडांना आळे करून खते, पाणी नियमित देत असल्याने आजही ही फळझाडे चांगले उत्पादन देतात.

अवजारे, ट्रॅक्‍टरची खरेदी 

बागायती शेती असल्याने वारंवार शेती अवजारे आणि ट्रॅक्‍टरची गरज भासते. शेती मशागतीची कामे वेळेवर झाली नाहीत, तर उत्पादनावर परिणाम होतो. मशागतीसाठी वेळेवर ट्रॅक्‍टर, अवजारेही मिळत नाहीत. वारंवार भेडसावणाऱ्या या समस्येवर मात करण्यासाठी डॉक्‍टरांनी ट्रॅक्‍टर आणि शेती व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या अवजारांची खरेदी केली. त्यामुळे शेती नियोजनाचे काम सोपे झाले. वेळेची बचत झाली.

रुग्ण देतात पीक व्यवस्थापनाच्या टिप्स 

डॉ. सचिन कुलकर्णी हसूर गावातही प्रॅक्‍टिस करतात. त्या वेळी अनेक रुग्ण त्यांच्या पीक व्यवस्थापनाची चौकशी करतात. रुग्णांसोबत डॉक्‍टरही स्वतःच्या शेतीतील प्रश्‍नांवर चर्चा करतात. उसामध्ये हुमणी आणि लोकरी माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता, तेव्हा डॉक्‍टरांनी औषधोपचारासाठी आलेल्या शेतकऱ्यांकडूनच उपाययोजना जाणून घेतल्या. त्यानुसार नियोजन केल्याने पिकाचे नुकसान कमी झाले. वेळोवेळी परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला पीक व्यवस्थापनासाठी उपयोगी ठरतो आहे.

संपर्क ः डॉ. सचिन कुलकर्णी (हसूरकर) ः ९८२२६८१०२६