Friday, May 5, 2017

स्वेटर उद्योगातून दिला महिलांना रोजगार

कोल्हापूर शहराच्या रमणमळा परिसरातील मालती माधवराव बेडेकर यांनी घरची शेती सांभाळत स्वेटर विणण्याचा उद्योग सुरू केला. गेल्या तीस वर्षांत त्यांनी या व्यवसायात चांगले यश मिळविले. स्वतःसह शेजारच्या महिलांना स्वेटर निर्मितीचे मोफत प्रशिक्षण देऊन कायम स्वरूपी रोजगार मिळवून दिला.

राजेंद्र घोरपडे

एखाद्या कामाची आवड असेल तर त्यात निश्‍चितच मोठे यश मिळते. कोल्हापूर शहरातील मालती माधवराव बेडेकर यांना स्वेटर विणण्याची आवड होती. मालतीताई लग्नानंतर कोल्हापूर शहरालगतच असणाऱ्या रमणमळा येथे राहाण्यास आल्या. त्यांचे पती कोल्हापूर शुगरमीलमध्ये नोकरीस होते. रमणमळा येथे घरालगतच बेडेकर कुटुंबीयांची सहा एकर शेती आणि गुऱ्हाळ होते. सहा गायी, दोन म्हशी यांचा सांभाळ करत त्यांनी शेतीत विविध पीकपद्धतीचे प्रयोगही केले. सहा वर्षे मत्स्यशेती केली. ज्वारी बीजोत्पादनही घेतले. पुढे कोल्हापूर शहराच्या वाढत्या विस्तारात मात्र त्याच्या शेतीला मर्यादा आली.

स्वेटर व्यवसायाला झाली सुरवात ः
घरची कामे झाल्यानंतर फावल्यावेळेत काय करायचे? हा प्रश्न प्रत्येक महिलेला असतो. मोकळ्या वेळेत स्वेटर विणणे ही मालतीताईंची आवड. या आवडीनेच त्या स्वेटर निर्मितीत गुंतल्या. यात पुढे विकास करायचा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मालतीताईंनी मध्ये कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा "वूलन मशिन निटिंग' हा चार महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार योजनेखाली त्यांन स्वेटर निटिंग यंत्र खरेदी केले. तेव्हा या यंत्राची किंमत हजार रुपये होती. स्वेटर विणण्यास सुरवात केली, पण या आधुनिक यंत्राच्या वापराची फारशी तांत्रिक माहिती नसल्याने त्यांना अनेक अडचणी येत होत्या. यावर मात करण्यासाठी त्यांनी यंत्र खरेदीदाराकडून पुणे येथे यंत्र वापराबाबत प्रशिक्षण घेतले.

ओळखीतून वाढला व्यवसाय
स्वेटरचा वापर हा हंगामी आहे. त्यामुळे हिवाळी हंगामातच स्वेटरला मागणी असते. तरीही जिद्दीने मालतीताईंनी मध्ये निटिंग यंत्राचा वापर करून स्वेटर विणण्यास सुरवात केली. एकमेकांच्या ओळखीनेच स्वेटरची मागणी वाढत गेली. ओळखीतून प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या साधकांकडून पांढरे स्वेटर व शाल तयार करण्याची ऑर्डर त्यांना मिळाली. पहिलीच ऑर्डर असल्याने उत्सुकता होती. या कामात त्यांना त्यांचे पती माधवराव यांनी लोकरीचे गुंडे तयार करण्यासाठी मदत केली. व्यवसायवाढीच्या दृष्टीने मध्ये उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. उत्पादनाच्या विक्रीसाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने महिला उद्योजक समितीतर्फे आयोजित प्रदर्शनामध्ये त्यांनी सहभाग घेतला.

तीन यंत्रांची खरेदी ः
बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर व्यवसायात करून व्यवसाय वाढविणे ही काळाची गरज असते. च्या काळात बाजारात स्वेटर शिलाईची आधुनिक यंत्रे येत होती. उत्पादनांचा वेग वाढला होता. अशा काळात उत्पादनास असणारी मागणी विचारात घेऊन आधुनिक यंत्रे विकत घेण्याचा विचार मालतीताईंनी केला. अडीच लाखांचे कर्ज घेऊन दोन कॉम्प्युटराईज्ड आणि एक कार्डोमेट्रिक यंत्राची त्यांनी खरेदी केली. या यंत्रावर काम करण्यासाठी कामगारांची गरज होती. अशावेळी त्यांनी अन्य कामगार न निवडता परिसरात राहणाऱ्या महिलांना स्वेटर निर्मितीचे मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून दिला. या यंत्रामुळे दिवसाला तीन ते चार स्वेटर विणले जायचे.

महिलांना मिळवून दिला रोजगार ः
स्वेटर व इतर लोकरीची कपडे तयार करताना विविध कामांसाठी वेगवेगळे कामगार लागतात. सध्या मालतीताईंकडे महिला यंत्रावर काम करतात, तर महिलांना हातावरचे काम आहे. लोकरीचे गुंडे, शिलाई या कामासाठी प्रत्येकी दोन महिला आहेत. सहा महिला या दररोजच्या रोजंदारीवर काम करतात. त्यांना कामानुसार महिना तीन ते पाच हजार रुपये इतका पगार दिला जातो. दहा ते पंधरा महिला घरचे काम सांभाळून शिलाई कामात मदत करतात. त्या महिलांना नगास सरासरी रुपये व शिलाईसाठी नगास रुपये दिले जातात. मालती यांच्याकडे स्वेटर शिलाई काम करणाऱ्या काही मुली होत्या. लग्नानंतर त्यांना स्वेटर काम करणे अवघड होते. अशा तीन मुलींना मालतीताईंनी स्वेटर विणण्याचे यंत्र घेऊन दिले. लोकरीच्या वजनावर त्यांच्याकडून काम करून घेतले जाते.
स्वेटर व इतर विविध प्रकारची उत्पादने करण्यासाठी रोज अंदाजे तीन ते चार किलोची लोकर लागते. वर्षाला अंदाजे किलो लोकर लागते. हा सर्व कच्चा माल दिल्ली व लुधियाना येथील मिलमधून मागविण्यात येते. दिवसाला साधारणपणे स्वेटर तयार होतात. महिन्याला अंदाजे हजार ते एक लाख रुपयांपर्यंतच्या स्वेटरचे उत्पादन होते. हंगामानुसार कमी-जास्त उत्पादन होते.

लोकरीची विविध उत्पादने ः
लहानांपासून मोठ्यांसाठी लागणारे विविध प्रकारच्या स्वेटरचे उत्पादन मालतीताई करतात. बेबी सेट, पायमोजे, बंडी, फ्रॉक, लहान मुलांचे स्वेटर, लेडिज टॉप, कुर्तीज, लॉंग स्वेटर्स, कार्डीगन्स, जेन्टससाठी हाफ व फुल हाताचे स्वेटर्स, नेहरू स्वेटर्स, बाहुल्या अशी विविध उत्पादने तयार केली जातात. टोप्या, जर्किनमध्येही विविध प्रकार आहेत. याव्यतिरिक्त ग्राहकाच्या मागणीनुसारही विविध प्रकारची उत्पादने तयार केली जातात. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर परिसरातील काही दुकानदार पूजेसाठी लागणारे आसन, रुमाल तसेच तोरण आदींची मागणी करतात. त्यांना त्यांच्या ऑर्डरनुसार मालाचा पुरवठा करण्यात येतो.

प्रदर्शनातून विक्री ः
सुरवातीच्या काळात हिवाळ्यामध्ये मालतीताई रमणमळा चौकात स्वतः मांडव उभारून स्वेटरची विक्री करीत होत्या. मालतीताईंनी थंडीच्या हंगामात इचलकरंजी, सांगली, सातारा, पुणे, महाबळेश्‍वर, बेळगाव येथे प्रदर्शने भरविली. आता स्वेटरच्या थेट ऑर्डर मिळत असल्याने गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी प्रदर्शने बंद केली. फक्त कोल्हापुरातच दिवाळीनंतर डिसेंबरअखेरपर्यंत प्रदर्शन भरवतात. याव्यतिरिक्त स्वयंसिद्धा, भगिनी महोत्सवातर्फे आयोजित प्रदर्शनामध्येही त्या स्वेटरची विक्री करतात. स्वेटर निर्मितीमधील धडपड पाहून त्यांना सकाळ (तनिष्का-मधुरांगण), रोटरी क्‍लब, स्वंयसिद्धा संस्थेने विशेष पुरस्कार देऊन गौरविले आहे.