Tuesday, March 19, 2019

राजा पराधीनु जाहला



राजाने संन्यास घेतला तरी त्यांच्या संन्यस्थातील वंशजांना आम्ही राजाचे वंशज आहोत अशी स्वतःची ओळख करून द्यावी लागत नाही. ते त्यांच्या कर्तृत्वातून आणि त्यांच्या पराक्रमातून त्यांची ही ओळख जनतेत आपोआप होते. आता नावापुढे छत्रपती लावणारे राजे आहेत.

राजा पराधीनु जाहला । कां सिंहु रोगें रुंधला ।
तैसा पुरुष प्रकृती आला । स्वतेजा मुके ।।1011।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - राजा शत्रूच्या आधीन झाला असतां, जसा निस्तेज होतो, अथवा सिंह रोगानें व्यापला म्हणजे जसा निस्तेज होतो, तसा पुरूष हा प्रकृतीच्या आधीन झाला की स्वतःच्या तेजाला मुकतो.

राजेशाही आज अस्तित्वात नाही. संस्थाने खालसा झाली आहेत. पण राजाचे वंशज आहेत. राजाची ओळख आता नावापुरतीच आहे. नावाच्या समोर छत्रपती लावले किंवा नावाच्या मागे राजे लावले तर तो राजा ठरत नाही. छत्रपती हा मान आहे. विधिवत त्याचा राज्याभिषेक केला जातो व त्यानंतर त्याला हा मान देण्यात येतो. स्वतः तसा पराक्रम, जनसेवा सिद्ध करावी लागते. चार भटजी गोळा करून त्यांना पैसे देऊन राज्याभिषेक केला जाऊ शकतो. पण तो राजा जनतेमध्ये फार काळ चर्चिला जात नाही. राजाजवळ संपत्ती आहे तोपर्यंत त्याची स्तुती करणारे भाट, शाहीर असतात. संपत्ती संपली की स्तुतीही संपते. मौज मजा, रंगरलीया करणारे अनेक राजे असतात. सत्तेचा उपभोग ते घेतात. पण जनतेच्या मनात घर करून ते राहू शकत नाहीत. जनता त्यांचा उत्स्फुर्तपणे जयजयकार करत नाही. सध्याच्या राजे महाराजांना पराक्रमी राजाचे आम्ही वंशज आहोत असे सांगावे लागते. जनतेला अशी ओळख करून द्यावी लागते. आम्हीच खरे वंशज अशी सांगण्याची वेळ या युवराजांच्यावर आली आहे. खरे युवराज असतात त्यांना स्वतःची ओळख सांगावी लागत नाही. आपोआप जनतेत त्यांची छाप पडते. राजाला आपण राजे आहोत असे सांगावे लागते ते कसले राजे. शत्रू समोर शरणागती पत्करलेल्या राज्यांपेक्षाही सध्याचे हे राजे वाईट अवस्थेत आहेत. असे म्हटले तर चूक होणार नाही. राजाने संन्यास घेतला तरी त्यांच्या संन्यस्थातील वंशजांना आम्ही राजाचे वंशज आहोत अशी स्वतःची ओळख करून द्यावी लागत नाही. ते त्यांच्या कर्तृत्वातून आणि त्यांच्या पराक्रमातून त्यांची ही ओळख जनतेत आपोआप होते. आता नावापुढे छत्रपती लावणारे राजे आहेत. आता लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सत्तेत आहेत. सुरवातीच्या काळात चांगल्या लोकप्रतिनिधींची निवड होत होती. पण आता मतांची गणिते मांडून कोणीही सत्तेत येत आहे. गुंड-मवालीही आता सत्तेत बसले आहेत. त्यांच्या सत्तेतील सहभागामुळे जनतेच्या विकासापेक्षा लुटीलाच अधिक प्राधान्य मिळत आहे. चंगळखोर राजाचे राज्य फार काळ टिकत नाही. अशा राजाच्या विरोधात जनता उठाव करते. पण आता सत्तेवर येणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात जनता उठाव करण्यास असमर्थ झालेली दिसत आहे. उठाव करणाऱ्यांचाच उठाव केला जात आहे. मध्यमवर्गातील जनता आता अशा राजकारणापासून दूर राहू इच्छित आहे. नेमका याचाच फायदा सध्याचे लोकप्रतिनिधी घेत आहेत. गरजू, गरिबांना पैशाचे आमिश दाखवून सत्तेवर येणारे हे प्रतिनिधी चंगळखोर राज्यांपेक्षाही भयाण आहेत. या अशा सत्ताधिशांच्या विरोधात आता उठावाची गरज आहे.

No comments:

Post a Comment