Saturday, February 25, 2012

ईश्‍वर निष्ठांची मांदियाळी

वर्षत सकळमंगळी । ईश्‍वर निष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ।।

जगामध्ये अनेक जाती, पंथ, धर्म आहेत. प्रत्येकाच्या चालीरिती वेगळ्या आहेत. मंदीराच्या रचनाही वेगवेगळ्या आहेत. एकाच हाताची पाचही बोटे जशी वेगवेगळ्या आकाराची असतात. तसा हा प्रकार आहे. पण सर्वांचे ध्येय एकच आहे. उद्दिष्ट एकच आहे. आत्मज्ञान प्राप्तीचे मार्ग वेगवेगळे असले तरी ते सर्व एकाच माळेचे मणी आहेत. हे वेगवेगळे पंथ एकत्र येणे फारच क्वचित प्रसंगीच पाहायला मिळते. पण वारकरी संप्रदाय याला अपवाद आहे. यामध्ये अनेक थोर संत होऊन गेले. यापुढेही होत राहतील. पण त्यांच्यामध्ये ऐक्‍य आहे. परंपरेचा उद्दिष्ठ महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे सर्व आज एकत्र आहेत. आदिनाथांपासून सुरू झालेल्या या परंपरेत अनेक महान संत झाले. त्यांनी वेगवेगळे पंथ तयार केले. पण हे सर्व संत एकत्र असलेले आपणाला पाहायला मिळते. ईश्‍वर निष्ठांची ही मांदियाळी नेहमी अशीच राहावी. सर्वावर सुखाचा वर्षत करत राहावी. असेच ज्ञानेश्‍वर महाराज सद्‌गुरूंकडे मागत आहेत. सध्या धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण केली जात आहे. धार्मिक विचार दुषित केला जात आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी ही मंडळी धर्मामध्ये दुषण करीत आहेत. त्यांचा हा उद्देश फार काळ टिकणारा नाही. सात्विक विचारांची बैठक भक्कम आहे. या बैठकीत हे दुषण दूर करण्याचे सामर्थ आहे. ईश्‍वराकृपेच्या या सात्विक व्यक्ती एकत्र आल्यातर निश्‍चितच त्यांच्या प्रेमामुळे जगातील दुष्टांचा नाश होईल. दुष्टांच्या मनातील दुष्टपणा दूर जाईल. यासाठी या मंडळीनी नेहमी एकत्र येऊन हा आनंदाचा, आत्मज्ञानाचा वर्षाव सतत भक्तावर करत राहावे.


राजेंद्र घोरपडे, 9011087406

Thursday, February 16, 2012

स्वधर्म सूर्याचा उदय

दुरितांचे तिमिर जावो । विश्‍व स्वधर्मेसूर्ये पाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ।।

मनुष्य समाधानी केव्हा होईल? त्याला जर इच्छित फळ मिळाले, तर तो निश्‍चित समाधानी होईल. कामाच्या ठिकाणी मनाप्रमाणे काम असेल तर, त्यात निश्‍चितच समाधान भेटते. आवडीने ते काम केले जाते. त्यात सुधारणा करण्याची, प्रगती करण्याची इच्छा होते. आपोआपच कल्पना सुचत जातात. प्रगती सहजरित्या होते. समाधानी मन हे सुखी मानसाचे लक्षण आहे. असा मनुष्य इतरांनाही सुख देतो. अशा व्यक्तीतून आनंदाचा झरा वाहत असतो. अशांच्या सानिध्यात, सहवासात इतरही सुखी होतात. सद्‌गुरूंच्या सहवासात ही अनुभूती निश्‍चितच येते. सद्‌गुरू हे समाधानाचे सागर आहेत. या सागरात डुंबकी मारायला शिष्याने शिकायला हवे. पोहता येत नसेल तरी डुंबायला हवे. तारणारे सद्‌गुरू आहेत. मग बुडण्याची भीती कसली. उलट सद्‌गुरू पोहायला शिकवतात. फक्त शिष्याने धाडसाने यात उडी घ्यायला हवी. आध्यात्मिक विचाराने भारताची प्रगती खुटली आहे. असा आरोप वारंवार केला जातो. पण खरे तर अध्यात्माच्या विचारामुळेच भारत आज महासत्तेची स्वप्ने पाहात आहे. तमोगुणावर अध्यात्माच्या विचारानेच मात केली आहे. चंगळवादी संस्कृती वाढत आहे. पण अध्यात्माच्या विचारामुळेच ही संस्कृती आटोक्‍यात आहे. अन्यथा भारतही अमेरिकेप्रमाणे मंदीच्या लाटेत भरडला असता. अध्यात्माने दुरदृष्टी येते. एक चांगला विचार, संस्कार त्यामध्ये असतो. दुरदृष्टीच्या अभावामुळेच अमेरिकेला वारंवार मंदीचा सामना करावा लागत आहे. यासाठी अध्यात्माची कास भारताने सोडता कामा नये. साऱ्या विश्‍वात या अध्यात्माचा प्रसार करायला हवा. विश्‍वाला हा स्वधर्म सांगायला हवा. प्रत्येक जीवाला सुखी करणारा हा विचार पटवायला हवा. यासाठी तसा भारत प्रथम घडवायला हवा. स्वतःपासूनच याची तयारी करायला हवी. स्वतःमधील स्व, अंहकार सोडायला हवा. मीपणा सोडायला हवा. मी कोण आहे? याची ओळख करुन घ्यायला हवी. मी आत्मा आहे. आत्मा अमर आहे. ही अमरत्वाची अनुभूती घ्यायला हवी. हा आत्मा सर्वामध्ये आहे. सर्वप्राणीमात्रामध्ये तो आहे. तो एकच आहे. देह वेगवगळा आहे. पण सर्वांठायी असणारा आत्मा एकच आहे. त्यात फरक नाही. त्याला रंग नाही. त्याला वास नाही. आणि त्यात भेदही नाही. हा भेदाभेद दूर करायला हवा. देहात आत्मा अडकल्यानेच हा भेद दिसतो आहे. ही दृष्टी आत्मसात करायला हवी. विश्‍वामध्ये या स्वधर्माच्या सूर्याचा उदय व्हायला हवा.


राजेंद्र घोरपडे, 9011087406

Monday, February 6, 2012

मैत्र जीवांचें

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ।।

नव्या पिढीवर तणाव अधिक जाणवतो आहे. वाढत्या तणावामुळे आत्महत्या, खून, मारामाऱ्या यांचे प्रमाण वाढले आहे. माणसा-माणसातील प्रेम, आपुलकी कमी होत चालली आहे. ही परिस्थिती अशीच राहीली तर, याचे गंभीर परिणाम आपणास सोसावे लागणार आहेत. यासाठी सुधारणा होण्याची गरज आहे. माणसांमधील कुटीलपणा नाहीसा झाला तर, समाजात एकोपा निर्माण होईल. समाजात सुख शांती वाढीस लागेल. याचा विचार व्हायला हवा. जग बदलते आहे. माणसे बदलत आहेत. जुने पारंपरिक विचार बदलायला हवेत. म्हणून आपणही बदलायला हवे. हे जरी खरे असले तरी, जो विचार आपण स्वीकारत आहोत. तो फायदेशीर आहे का? यातून कोणत्या समस्या उद्‌भवू शकतात? यातून समाधान मिळेल का? याचा विचार व्हायला नको का? स्पर्धेच्या युगात तग धरून राहण्यासाठी बदल जरूरी आहे. पण तो क्षणिक समाधान देणारा नसावा. त्यातून कायमस्वरुपी समाधान मिळत राहावे. त्यात दुरदृष्टीचा विचार हवा. क्षणिक समाधान देणारे विचार कालांतराने बदलावे लागतात. हे ही लक्षात घ्यायला हवे. स्पर्धेतून कपटीवृत्ती वाढत आहे. यातूनच अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत. एखाद्याचे चांगले झालेले इतरांना बघवत नाही. दुसऱ्याची प्रगती खटकते. समाधानी नसल्यानेच असा विचार उत्पन्न होतो. समाधान नसल्याने मानसिक संतूलन बिघडते. संपत्तीतून समाधान प्राप्त होत नाही. यासाठी कायमस्वरूपी समाधान कशात मिळते याचा विचार व्हायला हवा. मनालाच समाधानाची सवय लावली तर? स्वार्थी स्वभावाने कपटीवृत्ती वाढते. यासाठी स्वार्थ बाजूला ठेवायला हवा. त्यागीवृत्ती वाढावी यासाठी प्रयत्न करायला हवा. सात्विक विचार, त्यागीवृत्ती आजकाल मागे पडत आहेत. अशी माणसे सध्याच्या व्यवहारात तग धरू शकत नाहीत. पण खरे पाहता अशीच माणसे सध्या टिकून आहेत. फक्त ती प्रसिद्धीपासून दूर आहेत. या गोष्टीची फारशी चर्चाही होत नाही. अशांततेच्या या जगात शांती नांदायची असेल तर, सात्विक विचारांची बैठक व्हायला हवी. सात्विक विचार वाढावा, यासाठी स्वतःपासूनच बदल घडवायला हवा. स्वतः बदललो तर, जग आपोआप बदलते. स्वतः बदलून आपणास मिळालेले यश इतरांना सांगाल तर, ते इतरांना पटेल. अन्यथा नाही.

राजेंद्र घोरपडे, 9011087406

Saturday, February 4, 2012

पसायदान

आतां विश्‍वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञे तोषावें ।
तोषोनि मज द्यावे । पसायदान हें ।।

दान कोणाकडे मागावे? देवाकडे, सद्‌गुरूंकडे. पण आजकाल सर्वच देवळात, मंदिरात, मठात, आश्रमात परिस्थिती नेमकी उलटी आहे. मंदिरांना, मठांना दान दिले जात आहे. तसा प्रचारही केला जात आहे. गल्लोगल्ली हेच चित्र पाहायला मिळते. देवाला दान करा असे सल्लेही दिले जातात. यासाठीच अध्यात्माचा खरा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. याचा अभ्यास यासाठीच करायला हवा. संत ज्ञानेश्‍वरांनी मला दान करा असे कोठेही सांगितले नाही. किंवा सद्‌गुरू, भगवंत हे दानाचे भुकेले आहेत. असे कोठेही म्हटले नाही. भगवंतांना, सद्‌गुरूंना फक्त पान, फुल, फळ लागते. तेही शुद्ध अंतकणाने, देण्याची इच्छा असेल तरच ते स्विकारले जाते. या व्यतिरिक्त कोणत्याही दानाचा स्वीकार केला जात नाही. पण आजकाल मठांना देणगी देणाऱ्यांची संख्याच मोठी आहे. पैशाने देव विकत घेता येत नाही. सद्‌गुरूही विकत घेता येत नाहीत. देवांना, सद्‌गुरूंना असे दान देण्याची मुळात गरजच काय? संत तुकारामांना छत्रपती शिवाजी महाराजांनी जडजवाहिरे, संपत्ती टोपली भरून पाठविली होती. पण संत तुकारांमांनी ती टोपली परत केली. त्याचा स्वीकार केला नाही. यातून संत तुकारांमांना हेच सांगायचे आहे की सद्‌गुरू फक्त पान, फुल, फळाचाच स्वीकार करतात. ते संपत्तीचे भुकेले नाहीत. सद्‌गुरू तर दान वाटायला बसले आहेत. घ्यायला नाही. कोल्हापूरच्या महालक्ष्मीलाही मोठ मोठ्या देणग्या देण्यात येतात. तिरुपतीलाही हाच प्रकार आहे. ही झाली मोठी देवस्थाने, छोट्या छोट्या देवस्थानातही हाच प्रकार चालतो. दान दिल्याने भरघोस संपत्ती मिळते अशी धारणा यामागे आहे. गणेश उत्सवासाठीही मोठ मोठ्या देणग्या मागण्याची पद्धत आहे. जैनधर्मामध्ये तर दानाचा लिलावच लागतो. हे कसले अध्यात्म? हा कसला धर्म? धर्मग्रंथात दान द्या असे कोठेही सांगितले नाही. मग हे कशासाठी? नेमके कोणते शास्त्र यामागे आहे? हा चुकीचा संदेश का दिला जात आहे? याचा विचार करायला हवा व दान द्यायला बसलेल्या, वाटायला बसलेल्या ज्ञानेश्‍वर माऊलीच्या तत्वज्ञानाचा अवलंब करायला हवा.

राजेंद्र घोरपडे, 9011087406

Friday, February 3, 2012

व्यक्तीमत्व विकास

म्हणौनि श्रवणें पापें जाती । आणि धर्म धरी उन्नती ।
तेणे स्वर्गराज्य संपत्ति । लाहेचि शेखीं ।।

पाप पुण्याची भाषा आता नव्या पिढीला न पटणारी आहे. अशानेच अध्यात्म हे थोथांड आहे असा विचार आता रुढ होत आहे. पण आध्यात्मिक ग्रंथातील शब्दांचा शब्दशा अर्थ लावणे चुकीचे आहे. त्या शब्दाचा भावार्थ समजून घेणे आवश्‍यक आहे. स्वर्ग नरक हा विचार चुकीचा आहे. कारण स्वर्ग आणि नरक हे सर्व काल्पनिक विश्‍व आहे. पण तसे काही नाही. स्वर्ग नरक आहे कोठे असा प्रश्‍न विचारला जाणे स्वाभाविक आहे. विज्ञानाच्या प्रगतीने अंधश्रद्धा कमी होत आहे. पण अध्यात्म हे थोथांड आहे असे म्हणणे मात्र चुकीचे आहे. हे काल्पनिक विश्‍व समजून घ्यायला हवे. त्याचा भावार्थ जाणून घ्यायला हवा. तरच आध्यात्मातील विचार समजू शकतील. यासाठी अध्यात्माचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा. ज्ञानेश्‍वरीच्या नुसत्या श्रवनानेही पाप दूर होते. याचा अर्थ मनातील दुष्ट विचार नाहीशे होतात असा आहे. मनात उत्पन्न होणाऱ्या वाईट विचारांना ज्ञानेश्‍वरीच्या श्रवनाने फाटा फुटतो. हे विचार कमी कमी होतात. मनाला सत्कर्माची गोडी लागते. सत्कर्माची ओढ लागते. यातूनच हातून चांगली कामे होतात. चागली कामे करणे हाच तर धर्म आहे. यामध्येच प्रगती होते. मानवधर्माचा विचार मनात नांदतो. पाशवी विचार दूर जातात. नराचा नारायण होतो. त्याच्यात माणूसकी नांदते. या सुधारणेमुळेच अशा मानवामध्ये विकास घडतो. त्याला समाजात मानसन्मान प्राप्त होतो. त्याला सुख-शांती, संपत्तीचा लाभ होतो. हाच स्वर्ग त्याला मिळतो. त्याच्या वागण्यात झालेल्या बदलानेच त्याला हे ऐश्‍वर्य भेटते. यासाठीच ज्ञानेश्‍वरी वाचायला सवड जरी नाही मिळाली, तरी श्रवणाची सवय अवश्‍य लावून घ्यावी. व्यक्तीमत्व विकासासाठी अशा वाचनाची, श्रवणाची आज निश्‍चितच गरज आहे.

राजेंद्र घोरपडे, 9011087406

Thursday, February 2, 2012

ज्ञानाचा उपभोग

तैसा गुरू प्रसन्नु होये । शिष्य विद्याही कीर लाहे ।
परी ते फळे संप्रदायें । उपासिलिया ।।

गाय पाळली. तिला भरपूर खाऊ पिऊ घातले. तिची चांगली सेवा केली. पण तिचे दुध कसे काढायचे हेच माहीत नसेल तर त्या गायीचा उपयोग काय? गाडी विकत घेतली. उत्साहाने तिची सजावट केली. रोज तिला पाण्याने धुऊन स्वच्छ ठेवली. पण ती गाडी चालवताच येत नसेल, तर त्या गाडीचा उपयोग काय? कोणतीही गोष्ट साध्य झाली, पण तिचा उपभोग घेता येत नसेल तर त्याचा काय उपयोग? यासाठी प्राप्त गोष्टीचा लाभ घेता यायला हवा. अन्यथा ती निरर्थक ठरेल. शाळेमध्ये पहिला क्रंमाकाने पास व्हायचा. पुढे शिक्षणात मोठी प्रगती केली. अगदी पी.एचडीही मिळविली. पण त्या ज्ञानाचा व्यवहार उपयोग करता आला नाही. इतके घेतलेले शिक्षण व्यर्थच ना! पत्रकारातेची पदवी घेतली. त्यामध्ये पी.एचडीही केली. पण एखाद्या छोट्याश्‍या घटनेची बातमी लिहीता आली नाही तर या पुस्तकी ज्ञानाचा उपयोग काय? घेतलेले शिक्षण व्यवहारात उपयोगी पडले तर त्याचा उपयोग अन्यथा ते व्यर्थच. आजही ग्रामीण भागात अनेक अनपढ व्यक्ती पाहायला मिळतात. पण त्या व्यक्तींनी शेतीत मोठी प्रगती केली आहे. अनेक अंगठे बहाद्दुरांनी मोठे व्यवसाय, उद्योग उघडल्याची उदाहरणे आहेत. शिक्षणाचा योग्य उपयोग व्यवहारात करता आला पाहीजे. गुरुकडून विद्या घेतल्यानंतर, गुरूंचा अनुग्रह घेतल्यानंतर आत्मज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्नच केला नाही, तर त्या विद्येचा उपयोग काय? त्या अनुग्रहाचा, त्यांच्या आर्शिवादाचा उपयोग काय? यासाठी त्या विद्येचा योग्य उपयोग करून घ्यायला हवा. आत्मज्ञान प्राप्तीसाठी त्याचा उपयोग करायला हवा. ज्ञान प्राप्तीनंतरही परंपरेनुसार अनुष्ठान करता यायला हवे. तरच ती विद्या फुला फळाला येईल.

राजेंद्र घोरपडे, 9011087406