Thursday, May 30, 2019

आंबा येथील एकांत रेसिडेन्सी मध्ये काजवा महोत्सव


काजवा महोत्सव म्हणजे नेमके काय हा प्रश्न आपणास जरूर पडला असेल या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ जरूर पाहावा. मान्सूनच्या अगोदर रोहिणी नक्षत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काजव्यांचे दर्शन होते. राधानगरी, दाजीपूर अभयारण्य, पाटगाव,आं या पश्चिम घाटातील ठिकाणी काजवा मोठ्या प्रमाणात आढळतो.

एकांत रेसिडेन्सी, आंबा येथे काजवा महोत्सव🐝          रविवार 02 जून रोजी  5 to 10 pm        
 संपर्क
मो. 8805070444



Friday, May 24, 2019

ब्रह्म साक्षात्कार





स्वतःमध्येही भगवंताचा वास आहे, याची प्रचिती जेव्हा येईल तेव्हा स्वतःतील "मी'पणा दूर होईल. तो दूर होणे आवश्‍यक आहे. तरच साक्षात्कार होईल.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 9011087406

कृष्ण कोपोनि ज्यासी मारी । तो पावे ब्रह्म साक्षात्कारी ।
मा कृपेने उपदेशु करी । तो कैशापरी न पवेल ।। 9।। अध्याय 8 वा

ओवीचा अर्थ - श्रीकृष्ण रागावून ज्याचा वध करतो, त्यास ब्रह्माचा साक्षात्कार होतो, मग ज्याला कृपेनें उपदेश करील तो ब्रह्मसाक्षात्काराला कसा पावणार नाही ?

आपल्या देशात राक्षसांना मारण्यासाठी भवानी, काली, दुर्गातेचा अवतार झाल्याच्या कथा सांगितल्या जातात. दुष्ट-दुर्जनांना मारण्यासाठी ही देवी अवतार घेत असते. या राक्षसांना मृत्युसमयी या देवीचा साक्षात्कार होतो. अनेक दुष्ट व्यक्तींनी साक्षात्कारानंतर सत्कर्मे केल्याची उदाहरणे आहेत. वाल्हा कोळीचा वाल्मीकी झाला. नंतर त्यांची देवळे, समाधी बांधण्यात आली. हीच आपली संस्कृती आहे. म्हणूनच अफझलखानाची समाधी छत्रपती शिवरायांनी बांधली. अफझलखानाचा वध छत्रपतींनी घेतलेला नृसिंह अवतारच होता. सद्‌गुरूंचे, भवानी मातेचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होते. त्यांच्या आर्शिवादातूनच त्यांना वाघनख्यांची कल्पना सुचली. अफजलखान मुंडी चिरडून मारणार आहे, हे त्याचे कपट छत्रपतींनी आधीच ओळखले होते. यातूनच शिवाजीराजे हे स्वयंभू होते, हेही स्पष्ट होते. अशी अनेक उदाहरणे सांगता येण्यासारखी आहेत. भगवंत, सद्‌गुरू आपल्या कृपेने आपणास उपदेश करत असतात, मग आपणास का भगवंताचा साक्षात्कार होणार नाही? यावर विश्‍वास ठेवायला हवा. साक्षात्कारासाठी आपले अवधान महत्त्वाचे आहे. सर्व विश्‍वात भगवंताचा वास आहे, असा अनुभव यायला हवा. ब्रह्म सर्वामध्ये आहे. सर्वामध्ये भगवंताचा वास आहे. कर्मामुळे प्रत्येक जण विभागला गेला आहे. समाजात सुख, शांती नांदावी यासाठीच ही रचना आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली आहे. पूर्वजांना आलेल्या अनुभवातून त्यांनी काही नियम केले. यातूनच समाज रचना उत्पन्न झाल्या. हा विचार सध्याच्या पिढीने योग्य प्रकारे समजून घ्यायला हवा. शांतीसाठी उत्पन्न केलेली ही रचना हा उच्च हा नीच, असा भेदभाव कसा करेल. सद्‌गुरूंच्या सान्निध्यात तर सर्वच जण समान आहेत. फक्त आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. सध्या जगात अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. दुष्कृत्ये करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा या बिकट काळात सद्‌गुरू कोणत्या ना कोणत्या रूपाने तुम्हाला मदत करत असतात. ही मदत सद्‌गुरूंची आहे, अशी अनुभूती यायला हवी. स्वतःमध्येही भगवंताचा वास आहे, याची प्रचिती जेव्हा येईल तेव्हा स्वतःतील "मी'पणा दूर होईल. तो दूर होणे आवश्‍यक आहे. तरच साक्षात्कार होईल. 


।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।। 




Wednesday, May 22, 2019

स्मरण गणेशाचे



चंगळवादी संस्कृतीचा वाढता प्रसार रोखणे आवश्‍यक आहे. नाही तर आपली संस्कृती आपणास शोधूनही सापडणे शक्‍य होणार नाही. यासाठी आता भारतीय संस्कृतीच्या जतनाचा श्री गणेशा करायला हवा. एक चळवळ उभी करायला हवी. चंगळवादी संस्कृतीमुळेच सध्या ताणतणावाचे वातावरण निर्माण होत आहे. हा ताणतणाव दूर करायचा असेल, तर भारतीय संस्कृतीच जतन आवश्‍यक आहे.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल - 9011087406

आत्मरूप गणेशु स्मरण । सकळ विद्यांचे अधिकरण ।
तेचि वंदू श्रीचरण । श्री गुरूंचे ।। 1 ।। अध्याय 13 वा
ओवीचा अर्थ - सर्व विद्यांचें आश्रयस्थान जें आत्मरूप गणेशाचें स्मरण, तेज श्रीगुरूंचे श्रीचरण होत. त्यांस नमस्कार करूं.

कोणत्याही शुभ कार्याची सुरवात करताना श्री गणेशाचे स्मरण केले जाते. ही आपली संस्कृती आहे. भाद्रपद शुक्‍ल चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी करण्यात येते. पूर्वी हा सण फक्त घरोघरी साजरा केला जात होता, पण स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्याला सार्वजनिक रूप आणले. त्यानंतर घरगुती गणपतीबरोबरच गल्लोगल्लीही श्री गणेशाची प्रतिष्ठापना होऊ लागली. भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी त्या परंपरा जोपासता याव्यात यासाठी ब्रिटिशांची राजवट भारतातून हाकलून लावणे आवश्‍यक होते. या उद्देशासाठी जनतेचे एकत्र यावे, लोकांमध्ये याबाबत जागृती केली जावी, यासाठी टिळकांनी हा उत्सव सार्वजनिकपणे साजरा करण्यास प्रोत्साहन दिले; पण सध्या या उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. त्यातील भक्तिभाव नष्ट झाला आहे. अशा उत्सवात पाश्‍चात्त्य संगीताच्या तालावर धामडधिंगा घातला जात आहे. खरे तर भगवंताचे नामस्मरण सतत राहावे यासाठी अशा सण, उत्सवांची सुरवात करण्यात आली; पण हा उद्देशच मुळात नष्ट झाला आहे. या चंगळवादी संस्कृतीचा वाढता प्रसार रोखणे आवश्‍यक आहे. नाही तर आपली संस्कृती आपणास शोधूनही सापडणे शक्‍य होणार नाही. यासाठी आता भारतीय संस्कृतीच्या जतनाचा श्री गणेशा करायला हवा. एक चळवळ उभी करायला हवी. चंगळवादी संस्कृतीमुळेच सध्या ताणतणावाचे वातावरण निर्माण होत आहे. हा ताणतणाव दूर करायचा असेल, तर भारतीय संस्कृतीच जतन आवश्‍यक आहे. या संस्कृतीच्या मुळाशी जाऊन सण, उत्सवांचे महत्त्व जाणून घेऊन त्यानुसार आचरण करण्याची गरज आहे. तरुण पिढीला याबाबत मार्गदर्शन करण्याची खरी गरज आहे. गणेश उत्सवांचे स्वरूप बदलायला हवे. त्यामध्ये भारतीय आध्यात्मिक संस्कृती जोपासण्यासाठी आवश्‍यक ते बदल करायला हवेत. गणेशाची आराधना हाच त्याचा मुळ पाया असायला हवा. भगवंताचे नामस्मरण कशासाठी केले जाते. याचा मुख्य उद्देश समजून घेऊनच असे उत्सव साजरे व्हायला हवेत. यामुळे आत्मज्ञान प्राप्तीसाठी आवश्‍यक असणारे स्वरूप या उत्सवात पाहायला मिळेल. आपली खरी आध्यात्मिक संस्कृतीही जतन केली जाईल.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Tuesday, May 21, 2019

स्वानुभूती


देहातील हाव आपण समजून घ्यायला हवी व आत्मरुपाची ओळख करुन घ्यायला हवी. हा अनुभव केव्हा येईल. जेव्हा आपण तसा विचार करायला लागू तेव्हा? यासाठीच तर साधना आहे.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 9011087406
तरी स्वानुभूति । लाभली म्हणोन । नुरे कर्तेपण । तयाठायीं ।।
स्वामी स्वरुपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी

आत्मरुपाचा अनुभव म्हणजे स्वानुभूती. पण आत्मरुप काय आहे? मी कोण आहे? याचा शोध म्हणजे आत्मरुपाचा शोध. मी देह नाही, तर आत्मा आहे. हे सर्वच जण सांगतात. यात वेगळे काय आहे? सर्व संत हेच सांगतात. सर्व धर्म हेच सांगतात. सर्व धार्मिक ग्रंथात याचाच उल्लेख आहे. तरीही आपल्या हे लक्षात येत नाही. आपण त्याकडे लक्ष देत नाही. आत्मरुपाचा अनुभव घेण्याची आपली इच्छा होत नाही. माझे अमुक नाव आहे. मी मोठा अधिकारी आहे. मला सर्व गोष्टीचे स्वातंत्र्य आहे. हे सर्व माझे आहे. हा मीपणा आहे. माझे माझे म्हणतो. पण आपले हे आहे कोठे? आपणास मीपणाचा हा अहंकार आला आहे. या अहंकारामुळेच आपण दुष्कृत्ये करु लागलो आहोत. इतरांवर अन्याय करु लागलो आहोत. हव्यासापोटी आपण इतरांना त्रास देऊ लागलो आहोत. हा हव्यास सुटायला हवा. यासाठीच तर आत्मरुपाची ओळख करून घ्यायला हवी. पण आजच्या बदलत्या काळात असे जगता येऊ शकेल का? असा व्यवहार जगात करून आपण जगू शकु का? अशाने आपणाला कोणी किंमत देईल का? आज फक्त पगाराचे आकडे मोजले जातात. आकड्यावरच तर सगळा खेळ खेळला जातो. हा इतका देतो. तो तितका देतो. जिकडे अधिक मिळतो तिकडे जातो. अशाने आपण अस्थिर झालो आहोत. याची जाणीवही येत नाही. पण या अस्थिरतेची भीती वाटत नाही. एकादृष्टीने ही मनाची उत्तम तयारी आहे. तसे हे योग्यही आहे. पण हा अहंकार आहे. हा अहंकार बळावणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. एकदा हा मीपणा बळावला तर तो मीपणा आपणासच खातो हेही लक्षात घ्यायला हवे. हा मीपणा येऊ नये यासाठीच तर आत्मरुपाची ओळख करून घ्यायची आहे. मला मिळाले ते माझ्या कर्तृत्वाने मिळाले. कर्तृत्व नसेल तर कोण विचारणार? हे ही खरे आहे. हा स्वाभिमान असायलाच हवा. पण त्याचा अहंकार नको. हा अहंकार येऊ नये यासाठीच हवे आत्मरुपाचे स्मरण. मी कोण आहे? मी आत्मा आहे. मला मिळाले ते माझ्या देहाला मिळाले. आत्म्याला नाही. कारण आत्म्याला वास नाही. गंध नाही. हव्यास नाही. तो तृप्त आहे. तो अमर आहे. तो जन्म ही पावत नाही आणि मरतही नाही. भूक आपणास लागते ती देहामुळे लागते. आत्म्याला भूक लागत नाही. यासाठी देहातील हाव आपण समजून घ्यायला हवी व आत्मरुपाची ओळख करुन घ्यायला हवी. हा अनुभव केव्हा येईल. जेव्हा आपण तसा विचार करायला लागू तेव्हा? यासाठीच तर साधना आहे. साधनेत त्यावर नियंत्रण मिळवायला हवे. म्हणजेच आत्मज्ञानाचा मार्ग सुकर होईल.


Sunday, May 19, 2019

सुख - निद्रा


बदलते जग वेगाने बदलत आहे. हा वेग पकडण्याच्या मागे लागलो आहोत पण सुखाने त्याचा वेग पकडायला हवा. दुःख गिळायला शिकले पाहिजे. तितके सामर्थ्यवान आपण व्हायला हवे. सुख-दुःख पचविण्यासाठी साधनेची गरज आहे. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 9011087406

सांग विस्तवाचे । अंथरुणावरी । लागेल का तरी । सुख-निद्रा ।। 946 ।।
स्वामी स्वरूपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी अध्याय 9 वा

आपल्या नावडत्या गोष्टींनी आपले मन विचलित होते. पण आवडत्या गोष्टींनीही आता मन विचलित होऊ लागले आहे. बदलती संस्कृती, वॉट्‌सऍप, स्मार्टफोनच्या जमान्यात आता फोन आला नाही, संवाद झाला नाही, पोस्ट टाकली नाही, कोणी लाईक केले नाही यामुळेही बेचैनी वाटू लागली आहे. सगळा वेळ यामध्येच जाऊ लागला आहे. संवाद आता कृत्रिम झाला आहे. विचार शांत होण्याऐवजी ते वेगाने वाढतच आहेत. अशाने मनाची शांतीच नष्ट झाली आहे. विस्तवाच्या अंथरूणावर झोपण्याचा प्रयत्न केल्यास झोप कशी लागणार?, पण आता नव्या जमान्यात या विस्तवाच्या अंथरुणावरच झोपणे शिकावे लागणार आहे. अध्यात्म बदलत्या परिस्थितीत कसे वागायचे हे शिकवते. काळ बदलला आहे. या परिस्थिती मनाचा समतोल ढळू देऊ नये हे शिकवते. कोणी पोस्ट टाकली नाही, कोणी आपला विचार केला नाही, कोणी बोलले नाही म्हणून नाराज होण्याची गरज नाही. मनाचा समतोल ढळू न देणे हेच अध्यात्म शिकवते. मन शांत ठेवावे, मनातील विचार शांत व्हावेत. यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठीच साधना आहे. साधनेने हे साध्य होते. पण साधनेतही मन रमत नाही. विचार राहात नाहीत. साधना करतानाही मोबाईलची रिंग वाजते. कोणाचा मेसेज असेल या उत्सुकतेने आपण त्याकडे वळतो. इतकी सवय या मोबाईलची झाली आहे. रटाळ मेसेज असेल तर मन भडकून उठते. आता ठरवायचे साधनेच्या वेळेत फोनकडे लक्ष द्यायचे नाही. थोडावेळ तरी शांत बसता आले, तरी आपण नियंत्रण मिळविण्यात यशस्वी होऊ. पण निर्णयच घेतला नाही मोबाईल मागे धावतच सुटलो, तर मग शांती कशी मिळेल. मोबाईल ही सुख वस्तू आहे. त्यापासून सुख घ्यायला हवे. पण मनाची शांती विचलित करून दुःख देत असेल तर त्यातील सुख कसे मिळवता येईल याचा विचार करायला हवा. सुखाच्या वस्तूतून समाधान घ्यायला शिकले पाहिजे. सुख-दुःखाचा विचार करत न बसता मनाला या विस्तवावर झोप लागेल याकडे लक्ष द्यायला हवे. तशी सवय अंगी लावायला हवी. बदलते जग वेगाने बदलत आहे. हा वेग पकडण्याच्या मागे लागलो आहोत पण सुखाने त्याचा वेग पकडायला हवा. दुःख गिळायला शिकले पाहिजे. तितके सामर्थ्यवान आपण व्हायला हवे. सुख-दुःख पचविण्यासाठी साधनेची गरज आहे. शांतीची गरज आहे. मनाला ही सवय लावायला हवी. तरच मनशांती भेटेल.

Thursday, May 16, 2019

कर्मे ती आघवीं । मज समर्पावी ।


संशोधनाचे प्रबंध हे गुरुंना समर्पित करावे. कारण ते गुरुंच्या कृपेमुळे त्यांच्या सहकार्यामुळेच ते पूर्ण झाले आहेत. त्यांनीच तर ते शिकविले आहे. अशा गुरुंना तो प्रबंध समर्पित करायला हवा. अध्यात्म गुरु आणि प्रत्यक्ष शिक्षण देणारे गुरु यामध्ये फरक आहे. पण शेवटी ते गुरु आहेत. गुरूंचा मान हा राखायलाच हवा.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 9011087406

म्हणोनि उचित । कर्मे ती आघवीं । मज समर्पावी । आचरोनि ।।311।।
स्वामी स्वरुपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी

प्रत्येक धार्मिक ग्रंथाच्या शेवटी ते पुस्तक सद्‌गुरुंना अर्पण केल्याचा उल्लेख असतो. ही परंपरा आहे. प्रत्येक कर्म हे सद्‌गुरुंना अर्पण करावे. म्हणूनच तसे कसे केले जाते. पुस्तक लिहिले गेले, विचार मांडले गेले ते सद्‌गुरुंच्या कृपेमुळे सुचले. नव्हेतर ते सद्‌गुरुंनीच सुचविले असा भाव असतो. सद्‌गुरुंच्या भावातून जे प्रगटले ते स्वतःचे आहे असे कसे म्हणता येईल. ते सद्‌गुरुंचेच आहे. सद्‌गुरुंना समक्ष भेटून जरी ते अर्पण करता आले नाही तरी तो भाव मनात कायम असणे म्हणजे ते सद्‌गुरुंना समर्पित करण्यासारखेच आहे. समर्पण म्हणजे शरणांगती. शत्रू समोर पत्करलेली शरणांगती आणि सद्‌गुरूंच्या समोरील शरणांगती यामध्ये फरक आहे. शरण जाणे म्हणजे सर्वस्व घालविणे अशी मनाची दुर्बलता करून घेणे चुकीचे आहे. सद्‌गुरु हे शत्रू नाहीत. मित्र आहेत. सहकारी आहेत. अशा थोर व्यक्तीच्या चरणी शरण जाणे हे सहजरित्या घडत नाही. याला काहीतरी अनुभव यावा लागतो. तरच हे घडते. शरण जाणे आणि पराभूत होणे यामध्ये फरक आहे. सद्‌गुरूंनी दिलेल्या अनुभवामुळे ही शरणांगती आहे. जे पुस्तक आपण लिहीले ते विचार त्यांचे होते हा अनुभव जेव्हा येईल. तेव्हा ते पुस्तक त्यांचे आहे. त्यांनाच समर्पित करायला हवे. असा भाव सहजच मनात प्रगट होतो. म्हणूनच धार्मिक पुस्तके ही सद्‌गुरुंना, भगवंताना अर्पण केलेली असतात. संशोधनाचे प्रबंध हे गुरुंना समर्पित करावे. कारण ते गुरुंच्या कृपेमुळे त्यांच्या सहकार्यामुळेच ते पूर्ण झाले आहेत. त्यांनीच तर ते शिकविले आहे. अशा गुरुंना तो प्रबंध समर्पित करायला हवा. अध्यात्म गुरु आणि प्रत्यक्ष शिक्षण देणारे गुरु यामध्ये फरक आहे. पण शेवटी ते गुरु आहेत. गुरूंचा मान हा राखायलाच हवा. गुरु हे ज्ञानाचे सागर असतात. त्यांच्यातून प्रकट होणाऱ्या ज्ञानातुनच तर शिष्याचा विकास होत असतो. यासाठी सद्‌गुरुंना समर्पण होण्याचा भाव सदैव मनामध्ये असावा. हा भाव कायम राहीला तर मीपणाची भावनाच राहणार नाही. आत्मज्ञानी होण्याचा मार्ग सुकर होईल.

Wednesday, May 15, 2019

कर्मयोगपंथ



मंदिर असो, मशिद असो, किंवा चर्च असो त्याचे पावित्र्य राखायलाच हवे. यासाठी कर्म करावे लागते. तो कर्माचा मार्ग हा शांतीचा मार्ग आहे. समस्त मानव जातीच्या विकासाचा मार्ग आहे. नमस्कार सर्वच धर्मात करतात. फक्त प्रत्येकाची पध्दत वेगळी आहे. पण मनातील विचार एकच आहे
- राजेंद्र घोरपडे,
मोबाईल 9011087406


 कर्मयोगपंथ । आक्रमोनि पार्था । चढे जो पर्वता । मोक्षरुप ।। 58 ।। अध्याय 5 वा
स्वामी स्वरुपानंद अभंग श्रानेश्‍वरी

जीवन जगायचे आहे तर त्यासाठी आवश्‍यक गोष्टी ह्या कराव्याच लागतात. ध्यानाला करतो आहे. म्हणून आयते जेवनाचे ताट कोणी समोर आणून ठेवणार नाही. पोटाची भूक भागवण्यासाठी आवश्‍यक ते नियोजन हे जीवनात करावेच लागते. मादूगरी मागूण जीवन जगता येते. पण देणाऱ्याने शुद्ध अंतकरणाने दान द्यावे इतकी पात्रता त्या व्यक्तीमध्ये असावी लागते. यासाठीही कर्माची आवश्‍यकता आहेच. मंदिर उभारले, मशीदीही आता ठिकठिकाणी दिसत आहेत. चर्चची संख्याही वाढत आहे. चांगली गोष्ट आहे. पण अशा या ठिकाणी कोणते कर्म केले जाते. कोणता विचार जोपासला जातो. कोणती सेवा दिली जाते याला महत्त्व आहे. ही ठिकाणे समस्त मानव जातीच्या रक्षणासाठी आहेत. मानव जातीच्या विकासासाठी आहेत. मानव जातीचा विकास, आध्यात्मिक विचाराचा विकास हे त्यांचे कार्य आहे. हे कार्य तेथे चालत नसेल तर ही मंदिरे ओस पडतात. वेगळ्या विचारांनी लोक एकत्र येतात. काही काळ ही एकी टिकूण राहते. पण मंदिराचे उद्दिष्ट ते नसल्याने त्याचे पावित्र्य राहात नाही. अशा मंदिरांना मग जनताच पाठ फिरवते. गावात, शहरात अशी अनेक मंदिरे आहेत. सर्वच मंदिरात गर्दी असते असे नाही. गर्दी हवीच असेही नाही. पण मंदिराचे पावित्र्य टिकूण असायला हवे. मंदिर असो, मशिद असो, किंवा चर्च असो त्याचे पावित्र्य राखायलाच हवे. यासाठी कर्म करावे लागते. तो कर्माचा मार्ग हा शांतीचा मार्ग आहे. समस्त मानव जातीच्या विकासाचा मार्ग आहे. नमस्कार सर्वच धर्मात करतात. फक्त प्रत्येकाची पध्दत वेगळी आहे. पण मनातील विचार एकच आहे. सर्वच धर्म दुष्ट विचारांना विरोध करतात. समस्त मानव जातीतील दुष्ट विचार दूर व्हावेत हेच हे सर्व धर्म सांगतात. मानव जातीच्या रक्षणाचा विचार हाच धर्म आहे. ही ठिकाणे त्याच विचारांनी विकसित करायला हवीत. तेथे हेच कर्म करायला हवे. तरच मोक्षाचे स्वरूप विकसित होईल.
       

Tuesday, May 14, 2019

श्वासाची लढाई




स्वामी म्हणाले अरे तुला कोण लढायला सांगते, फक्त निमित्त मात्र तर तुला व्हायचे आहे. लढाई तर तू लढतच आहेस. फक्त या लढाईकडे तुला लक्ष द्यायचे आहे. तु नको म्हणालास तरी ही तुझी लढाई सुरूच आहे. सुरूच राहणार आहे. फक्त तुझे अवधान हवे आहे. श्‍वासाची ही लढाई थांबली तर तुझे जीवनच संपणार आहे. फक्त सुरू असणाऱ्या या लढाईकडे अवधान दे. 

- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 9011087406
 

म्हणोनियां देवा। जळो जळो झुंज । माने ना हें मज। कांही केल्या ।। 335 ।।
स्वामी स्वरुपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी

ही झुंज कोणाशी आहे ? स्वतःच स्वतःशी ही झुंज आहे. पण मी पणामुळे ही झुंज नकोशी झाली आहे. हे माझं आहे? ते माझं आहे? या मोहाने लढण्याची इच्छाच नष्ट होऊ लागली आहे. धकाधकीच्या जीवनात साधना करायला वेळच नाही. एक-एक मिनिट मोलाचा झाला आहे. एक मिनिटात आपण साऱ्या जगभरात संदेश पोहोचवू शकतो. विकासाने इतका वेग घेतला आहे. विकासाच्या या वेगासोबत आपणाला राहावे लागणार आहे. हा वेग पकडला तरच उज्ज्वल भवितव्य घडणार आहे. हा वेग पकडण्यातच सगळा वेळ जात आहे. दैनंदिन जीवनात थांबायलाही वेळ नाही. अशी स्थिती उत्पन्न झाली आहे. अशावेळी साधनेसाठी वेळ कसा देता येऊ शकेल. आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी झुंज देण्यास वेळच नाही. दररोजच्या रोजी-रोटीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. अशावेळी आत्मज्ञानाचा विचार कसा येईल. ताज्या घडामोडीतच सगळा वेळ जात आहे. विश्रांती म्हणून फिरायला गेले तरीही तेथेही तेच सुरू होते. मोबाईल फोनमुळे सारे जीवनच व्यस्त झाले आहे. रेल्वेतून जाताना खिडकीतून डोकावायलाही वेळ नाही. निसर्गाचा स्वाद घेऊन मन मोकळे करायलाही वेळ नाही. जेवतानाही टिव्हीत डोकावतच जेवन होते. जेवनही त्याच विचारात होते. अशा धकाधकीच्या जीवनात साधनेचा विचार कसा येऊ शकेल. इतके व्यस्त जीवन झाले आहे. आत्मज्ञानासाठी झुंजण्याचा विचारच नकोसा झाला आहे. आत्मज्ञानी होऊन करायचे तरी काय? तिन्ही जगाचे ज्ञान घेऊन काय मिळवायचे? यापेक्षा नको ते आत्मज्ञान रोजचे जीवन धकाधकीचे असले तरी सुंदर आहे. सुखी आहे. या मोहाने आता आपण ग्रस्त झालो आहोत. जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यास आपणास वेळच नाही. समजून घेऊन तरी काय करणार? अशा विचाराने आता लढण्याचे सामर्थ्यही उरलेले नाही. अशा विचाराने आपण आत्मज्ञानी होऊ ही आशाच आता संपली आहे. अशा या ग्रस्त व्यक्तिला स्वामीनी सल्ला दिला. स्वामी म्हणाले अरे तुला कोण लढायला सांगते, फक्त निमित्त मात्र तर तुला व्हायचे आहे. लढाई तर तू लढतच आहेस. फक्त या लढाईकडे तुला लक्ष द्यायचे आहे. तु नको म्हणालास तरी ही तुझी लढाई सुरूच आहे. सुरूच राहणार आहे. फक्त तुझे अवधान हवे आहे. श्‍वासाची ही लढाई थांबली तर तुझे जीवनच संपणार आहे. फक्त सुरू असणाऱ्या या लढाईकडे अवधान दे. दिवसातील काही क्षणजरी तू दिलेस तरी तुझा विजय निश्‍चित आहे. सोऽहम, सोऽहम चा अखंड स्वर हा सुरूच आहे. तो फक्त तुला तुझा कानांनी ऐकायचा आहे. मनाने तुला तो अनुभवायचा आहे. त्या स्वरावर तुला तुझे मन नियंत्रित करायचे आहे. त्या स्वरात डुंबायला शिक. म्हणजे तुझा आत्मज्ञानावर विजय निश्‍चित आहे. या लढाईत फक्त तु निमित्त मात्र हो.

Monday, May 13, 2019

ऊठ तूं सत्वर जागा हो

क्षणिक आनंदाचा लाभ घेऊन जीवन पुन्हा दुःखी करू नकोस. खरा आनंद ओळख. आध्यात्मिक जीवनात दडलेला आनंद शोध. त्याचा लाभ घे. जीवनात कायमस्वरूपी आनंद नांदावा यासाठीच या मार्गाचा स्वीकार कर. हा मार्ग आहे तरी काय, हे जाणून घे.


- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 9011087406

आता धनुर्धरा । ऊठ तूं सत्वर । सर्वथा स्वीकार । धैर्यवृत्ती ।। 361।।
अध्याय 4 था स्वामी स्वरूपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी

मोहाचा पडदा पांघरूण गाठ झोपी गेलेल्या मानवा ऊठ, जागा हो. असे आवाहन स्वामी करत आहेत. स्वामींच्या या आर्त हाकेने जागे व्हा. पूर्वी सकाळी भूपाळी गायली जायची. सकाळच्या प्रसन्न वातावरणात ही भूपाळी दिवसाची सुरवात आनंदी करायची. दिवसभरात कितीही दुःखाचे प्रसंग आले तरी या भूपाळीच्या प्रसन्नतेमुळे त्यावर मात केली जायची. आता तसे घडत नाही. सकाळी उठतो पण कामाच्या तणावाने. या ताणतणावातच सगळा दिवस जातो. झोपतानाही तोच विचार असतो. कोठेही शांतता नसते. सध्या अनेकजण ऑफिसचे काम ऑफिसात घरी आल्यावर त्यावर चर्चाही करत नाहीत. इतके कंटाळवाणे काम झाले आहे. सदैव त्याच विचाराने आपण कंटाळलो आहोत. याचा परिणाम आपल्या शरीरावरही होत आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात मग कधी प्रवासाला जातो. भटकंती करतो. अशा पर्यटनाने थकवा दूर करावा लागतो. या क्षणिक आनंदाने ताणतणावाला थोडी उसंत मिळते खरी, पण कायमचा थकवा जात नाही. पुन्हा घरी परतले की तोच ताणतणाव, तीच धकाधकीची कामे सुरू होतात. असे हे धकाधकीचे जीवन आनंदी कसे करायचे? हे सांगण्यासाठी स्वामी आपणास हाक मारत आहेत. मोहमयी जीवनातून बाहेर काढण्यासाठी त्यांची ही आर्त हाक आहे. या जीवनाला कंटाळू नकोस. हे जीवन आनंदी कर. भगवंतांनी दिलेला प्रत्येकक्षण मोलाचा आहे. तो आनंदी कर. आनंदाने त्याचा स्वीकार कर. दुःख जरी झाले. तरी ते आनंदाने स्वीकार. धैर्याने त्याला सामोरे जा. दुःखावर आनंदाने मात कर. मन आनंदी राहिले, तर जीवनही आनंदी होईल. दुःखाचा विचार करत बसलास, तर जीवनच दुःखी होईल. याचा विचार करून दुःखावर आनंदाने मात कर. कामाचा आनंद घेण्यास शिकावे. जीवनाचा प्रत्येकक्षण आनंदी करण्याचा प्रयत्न करावे. म्हणजे आपले जीवनच आनंदी होईल. हा आनंद म्हणजे चंगळ नव्हे. हुल्लडबाजी नव्हे. क्षणिक आनंदाचा लाभ घेऊन जीवन पुन्हा दुःखी करू नकोस. खरा आनंद ओळख. आध्यात्मिक जीवनात दडलेला आनंद शोध. त्याचा लाभ घे. जीवनात कायमस्वरूपी आनंद नांदावा यासाठीच या मार्गाचा स्वीकार कर. हा मार्ग आहे तरी काय, हे जाणून घे. जीवनाच्या प्रत्येकक्षणी त्याचा प्रवास सुरू आहे. त्याची धडधड सुरू आहे. ती धडधड स्वतःच्या कानाने ऐक. स्वतःच्या मनाने ती अनुभव. गर्वाचा त्याग करून, अहंकाराचा नाश करून त्या अनुभवाचा आनंद घे. धैर्याने ही साधना अखंड सुरू असू दे. त्या आनंदात जीवन आनंदी कर. स्वामींचीही आर्त हा आता तरी ऐक. ऊठ तूं सत्वर जागा हो.


Thursday, May 9, 2019

ब्रह्मज्ञानी





अनुभवातूनच अध्यात्म शिकायचे असते. समाधी अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी आवश्‍यक साधने सांगितली आहेत त्याचा अभ्यास करायला हवा. तेथे पोहोचण्यासाठी आठ साधने उपदेशिली आहेत. यासाठी याला अष्टांगयोग असेही म्हणतात. 
- राजेंद्र घोरपडे, 
मोबाईल 9011087406


ते शांती पैं गा सुभगा । संपूर्ण ये तयाचिया आंगा ।
तैं ब्रह्म होआवयाजोगा । होय तो पुरुषु ।। 18।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - हे भाग्यवंत अर्जुना, ती शांति जेंव्हा संपूर्ण त्यांच्या अंगी येते, तेंव्हा तो पुरूष ब्रह्म होण्याला योग्य होतो.

अध्यात्माच्या वाटेवर आलेल्या प्रत्येक व्यक्तीची हीच इच्छा असते की, आपण ब्रह्मज्ञानी व्हावे. सद्‌गुरूंच्या प्रमाणे आपणही आत्मज्ञानी व्हावे. सद्‌गुरू हाच मार्ग तर शिष्याला शिकवतात. या वाटेवर कसे चालायचे तेच शिकवतात. हे ज्ञान शिष्याने घ्यावे आपल्या पदापर्यंत शिष्याने पोहोचावे यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असतो. गुरू पेक्षा शिष्य मोठा व्हावा. अशी प्रत्येक गुरूची इच्छा असते. पण शिष्य या पदापर्यंत पोहोचतो कसा? यासाठी त्याला काय करावे लागते? नेमका मार्गच अनेकांना माहीत नसतो. याचा गैरफायदा अनेक भोंदूबाबा घेतात. शिष्यांची फसवणूक येथेच होते. अंधश्रद्धा पसरविणारे अनेक भोंदूबाबा शिष्यांना आपल्या जाळ्यात पकडून त्यांचा वापर करून घेतात. ही फसगत होऊ नये असेल वाटत असेल तर अध्यात्माच्या वाटेवर प्रवास करणाऱ्या प्रत्येकाने ज्ञानेश्‍वरीचे वाचन, चिंतन, मनन करायला हवे. स्वतः त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा. साधनेचे विविध मार्ग अभ्यासायला हवेत. ते समजून घ्यायला हवेत. अध्यात्मात सहजतेला अधिक महत्त्व आहे. अनुभवही सहजच येत असतात. कोणताही त्रास न होता अनुभव यायला हवेत. अनुभवातूनच अध्यात्म शिकायचे असते. समाधी अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी आवश्‍यक साधने सांगितली आहेत त्याचा अभ्यास करायला हवा. तेथे पोहोचण्यासाठी आठ साधने उपदेशिली आहेत. यासाठी याला अष्टांगयोग असेही म्हणतात. आठ साधने असलेला योग असा याचा साधा सरळ अर्थ आहे. ही आठ साधने कोणती आहेत? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशीही योगाची आठ अंगे आहेत. आता ही आठ अंगे विस्ताराने पाहूया. यम हे पाच प्रकारचे आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह म्हणजे संपत्तीचा संग्रह न करणे. हे पाच यम आहेत. योग साधण्यासाठी हे पाच यम निरपवादरितीने सर्व प्रकारच्या अवस्थेत पाळणे आवश्‍यक आहे. हे एक प्रकारचे व्रतच आहे. म्हणून यास महाव्रत असेही म्हणतात. अहिंसा आपल्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात असायला हवी. कोणालाही दुखावून बोलणे ही सुद्धा हिंसा आहे. दुसऱ्याला टोचून बोलणे ही सुद्धा हिंसा आहे. दुसऱ्याबद्दल वाईट चिंतने ही सुद्धा हिंसा आहे. यासाठी मनातच अहिंसा असायला हवी. म्हणजे आपल्या बोलण्यात, वागण्यात, चालण्यात आपोआप अहिंसा येईल. सध्याच्या युगात असे वागणे हे खरोखरच संतांचे लक्षण आहे. अशी माणसे मिळणेही आजच्या परिस्थितीत कठीण झाले आहे. पण इतकी मृदुता आपल्यामध्ये यायला हवी. अनेकांना अध्यात्माच्या वाटेवर गेलेला मनुष्य वाया गेला असा वाटतो. पण खरे तर अध्यात्म हे जगात कसे वागायचे हे शिकवते. आजच्या युगात असे वागता न येणाऱ्या व्यक्ती याबाबत उलट बोलत आहेत. कारण असे वागणे तितके सोपे नाही. हळूहळू सरावाने मात्र वागण्यात, बोलण्यात फरक पडतो. यासाठी प्रथम प्रयत्न करायला हवा. तसा संकल्प करायला हवा. हे व्रत घ्यायला हवे. सत्य मेव जयते. सत्याचा नेहमी विजय होतो. याचा विचार करून वागायला हवे. चोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण आपण चोरी करतो. चोरी न केलेली व्यक्ती या जगात मिळणार नाही. खोट न बोललेही व्यक्ती या जगात मिळणार नाही. म्हणून काय आपण सदैव खोटे बोलत राहायचे का? नाही ना. स्वतःला सुधारत राहायचे. ब्रह्मचर्य पाळायला हवे. संपत्तीचा मोह टाळायला हवा. संपत्तीचा संग्रह करू नका याचा अर्थ पैशाची बचत करू नका असा नाही. बचत ही करायलाच हवा. त्याचे नियोजन हे असायला हवे. योग्यवेळी याची गरज भासते. संग्रह करून नका म्हणजे ती संपत्ती निक्रिय ठेवू नका असा आहे. जमिन खरेदी करायची आणि ती पडीक ठेवायची. हे योग्य आहे का? सध्या तरी असे करणे अयोग्यच आहे. कारण सध्या पडीक जमिनीचाही कर भरावा लागतो. गाडी खरेदी करायची आणि ती वापरायचीच नाही. फक्त दुसऱ्याला दाखविण्यासाठी गाडी खरेदी करायची. संग्रह याचा अर्थ असा आहे. नियम पाच प्रकारचे आहेत. शौच म्हणजे शरीर व मनाने अंतर्बाह्य पावित्र्य ठेवायचे. संतोष म्हणजे नेहमी समाधानी राहायचे. तप म्हणजे जीवनात येणारी सुख-दुःखे सहन करण्याची क्षमता अंगात असायला हवी. स्वाध्याय म्हणजे अध्यात्मविद्येचा अभ्यास करायला हवा. हे शास्त्र काय आहे याचे अध्ययन करायला हवे. आणि पाचवा नियम आहे ईश्‍वरप्राणिधान म्हणजे ईश्‍वराची भक्ती. साधना करताना मुख्यतः मांडी घालून बसायलाच हवे. आसन घातल्याने अंगात थकवा येत नाही. साधना योग्य प्रकारे होते. यासाठी आसनाचे महत्त्व आहे. सद्‌गुरूंनी दिलेल्या मंत्राचे ध्यान करणे हा प्राणायाम आहे. तो स्थिरपणे व आनंदाने करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. जबरदस्ती ही अध्यात्मात नाही. कोणत्याही कामात सहजता असायला हवी. प्रत्याहार म्हणजे मन स्थिर करण्यास करता सतत आवरणे. साधना करताना मनात अनेक विचार येतात. त्या विचारांना विराम देणे. मन गुरूमंत्रावर केंद्रीय व्हायला हवे. मन गुरूमंत्रावर स्थिर करायला हवे. ध्येयाविषयामध्ये चित्त स्थिर करणे म्हणजे धारणा. चित्त स्थिर होत असताना चित्त दुसऱ्या कोणत्याही ध्येयविषयाकडे न जाणे आणि ध्येयविषयात रमणे म्हणजे ध्यान. गुरूमंत्रावर मन स्थिर होणे हे आपले ध्येय आहे. त्या मंत्रात रममान होणे म्हणजे ध्यान लागणे. ध्येयविषयाबाहेरील सगळे विषय मनाने वगळणे म्हणजे समाधी होय. सततच्या अभ्यासाने हे साध्य होते. शिष्य हा अवस्थेत पोहोचतो. त्याच्या शरीरात शितलता येते. शांती येते. समाधी अवस्थेत त्याला सिद्धी प्राप्त होते. तो ब्रह्मज्ञानचा ठेवा मिळविण्यास प्राप्त होतो. हे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला भूत-भविष्याचे ज्ञान पूर्वजन्माचे ज्ञान, दुसऱ्याच्या मनाचे ज्ञान, मरणाच्या सूचक चिन्हाचे ज्ञान, हत्ती, गरुड, वायू इत्यादीकांची बलही त्याला प्राप्त होतात. सर्व विश्‍वाचे त्याला ज्ञान होते. क्षुधा व तृष्णा यांच्यावर तो विजय मिळवतो. सिद्ध पुरुषांचे दर्शन होते. दिव्य गंध, दिव्य रस, दिव्य स्पर्श, दिव्य रूप, दिव्य शब्द इत्यादींचे प्रत्यक्ष ज्ञान त्यास प्राप्त होते.



Monday, May 6, 2019

कर्तव्यकर्म





कष्टाने कमवत आहे. मग कमीपणा कसला. त्याच्यावर तुमची पात्रता ठरत नाही. कमीपणा त्याने येत नाही. कोणतेही चांगले कर्म करण्यात कमीपणा नसतो. चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते. चुकीचे कर्म केल्यास कमीपणा येतो. जनतेची फसवणूक करून पैसा कमविला तर कमीपणा येतो. व्यवहार कसा करता यावर तुमची पात्रता ठरते.
- राजेंद्र घोरपडे. 
मोबाईल 9011087406

तैसें वर्णाश्रमवशें । जें करणीय आलें असे ।
गोरेया आंगा जैसें । गोरेपण ।। 887 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - गोऱ्या अंगाला जसा गोरेपणा (शोभतो) त्याप्रमाणे वर्णाश्रमधर्माप्रमाणें जें कर्तव्यकर्म ज्याच्या भागाला आले असेल, तें त्यालाच शोभतें.

सध्या असे बोलले जाते की आता काळ बदलला आहे. पूर्वीसारखे काही राहिले नाही. कोणत्याही जातीतील मनुष्य कोणतेही काम करताना पाहायला मिळत आहे. उच्चवर्णाची व्यक्ती क्षुद्राचे काम करताना दिसतो. उच्चनिच असा भेदभाव आता संपला आहे. ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार त्याला काम मिळत आहे. हे आत्ताच्या काळातच पाहायला मिळते असे नाही. तर इतिहासातही असे घडल्याची अनेक उदाहरणे देता येतील. क्षत्रियाने क्षुद्र कर्म करू नये असे कोठेही लिहिलेले नाही किंवा क्षुद्राने वेदपठण करून नये असेही कोठेही लिहिलेले नाही. राम वनवासात गेल्यानंतर पोट भरण्यासाठी त्यांना फळेपाणी गोळा करावेच लागले ना. ते म्हणाले असते मी राजा आहे. राज कुळातील आहे. राजाचा वंशज आहे. हे कर्म माझे नाही. मी फळेपाणी गोळा करणार नाही? मग मात्र त्यांना जगणेच अशक्‍य झाले असते. कारण तेथे कोणी त्यांना या गोष्टी आणून दिल्या नसता. तेथे त्यांना राजासारखे वागून चालणारे नव्हते. जंगलात जगण्यासाठी आवश्‍यक त्या सुविधा त्यांना स्वतः उभ्या कराव्या लागल्या. तेव्हा ते राजाचे वंशज नव्हते असे नव्हते. ते राजकुळातीलच होते. पण प्राप्त परिस्थितीत त्यांना ते कर्म करावे लागले. म्हणजे त्यांची पात्रता ढासळली असे होत नाही. 


पांडव वनवासात होते तेव्हाही त्यांना अशीच कामे करावी लागली. संसार चालविण्यासाठी ही कर्मे करावी लागतात. घरात लागणाऱ्या गोष्टी स्वतः आणण्यात लाज वाटण्यासारखे, कमीपणा मानण्यासारखे काही नाही. इतिहासातही असे कधी घडले नाही, मग आत्ताच्या उच्चशिक्षित पिढीला लाज का वाटते. शेती करताना लाज का वाटते? शेतात जाऊन नांगर धरला किंवा पिकांना पाणी दिले तर त्यात कमीपणा मानण्याचे काहीच कारण नाही. एखादा उच्चवर्णीय शिकलाच नाही, तर काय करणार? शेवटी त्याला काही ना काही तरी काम करावेच लागणार. ते काम हलके आहे. असे म्हणून चालणार नाही. कुटुंब सांभाळायचे तर त्याची जबाबदारी स्वीकारायलाच हवी. जबाबदारीने कामे करायलाच हवीत. घर सांभाळणे हे त्याचे कर्तव्य आहे. त्यासाठी योग्य कर्म करून संसारासाठी लागणारे साहित्य जमा करणे ही त्याची गरज आहे. कर्म हलके असले तरी चालते. वाईट मार्गाने तरी तो धनसंचय करत नाही ना. मग ते कर्म हे योग्यच आहे. ते त्याला शोभणारे नाही, असे कधीही होत नाही. घरात लागणारा भाजीपाला, दळण-कांडप स्वतः केले तर काय झाले. शेवटी स्वतःच्या घरचेच तर काम करत आहोत ना. घरात स्वच्छता राखण्यासाठी स्वतःच घरातील कचरा काढला तर किंमत कमी होते असे कोठेही लिहिलेले नाही. स्वतःचे घर स्वतःच स्वच्छ ठेवा असे सांगितले जाते. एक उच्चवर्णाची व्यक्ती महानगरपालिकेत भंगी कामास नोकरीला लागली. सर्वच जण त्याला नावे ठेवू लागले. तो चार पैसे कमवत होता. त्यात त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. आनंदाने तो त्याचे जीवन जगत होता. यामध्ये कमीपणा मानण्याचे काहीच कारण नाही. हे कर्म त्याला त्याच्यापात्रतेनुसार मिळाले आहे. तो शिकला असता तर उच्चपदावर काम करू शकला असता. पण तो शिकलाच नाही. यात दोष कोणाचा? आणि शिकला असता, पण बेरोजगार राहण्याऐवजी त्याने मिळेल ते चांगले कर्म केले तर त्यात कमीपण कसला? उलट ते कर्म ही त्याची गरज होती.

आजकाल शहरातील अनेक मुले दीपावली व उन्हाळ्याच्या सुटीमध्ये दुकानामध्ये कामे करतात. त्यांनी कमावलेला पैसा त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतो. कमवा आणि शिका हा मंत्र थोरांनी दिला आहे. असे वागणे हे आत्ताच्या पिढीचे कर्तव्यच आहे. मी उच्चवर्णीय आहे, ही कामे मला शोभणारी नाहीत. अशा कामाने माझी पात्रता कमी होईल, असे कधीही घडत नाही. कर्मधर्म संयोगाने जे काम मिळाले ते उत्तम प्रकारे केले तर त्याची प्रशंसाच होते. एका उच्चशिक्षिताने वडापावचा गाडा सुरू केला. त्यात त्याला अमाप फायदा झाला. सायकलवरून हिंडणारा तो पोरगा चारचाकीतून हिंडू लागला. त्याचा वडापाव खाण्यासाठी अनेक प्रतिष्ठित व्यक्ती स्वतः त्याच्या गाड्यांवर येत. तो म्हणाला असता मी उच्चशिक्षित आहे. मी वडापावचा गाडा का चालवावा. तर हा मान त्याला मिळाला असता का? नाही ना. चांगले कर्म केले, कर्तव्यपार पाडले तर ते कर्म त्याला शोभून दिसते. त्याची पात्रता ते कर्म करण्याची नाही असे म्हणता येत नाही. ज्याच्या त्याच्या हाताचा गुण वेगळा असतो. कोणाला उत्तम चित्रे काढता येतात. ही कला त्याने जोपासली व या कलेतून त्याने करोडो रुपये कमावले तर त्यात गैर काय? उच्चवर्णीयांनीच धर्म ग्रंथाचे पठण करावे. बाकीच्यांनी पठण करू नये असे कोठेही सांगितलेले नाही. सर्वांना तो अधिकार आहे. आपापल्या कर्मामध्ये पूर्णरत असलेल्या मनुष्याला वैराग्य प्राप्त होते. कोणतेही कर्म करा पण ते चांगले असावे. योग्य असावे. वाल्ह्या कोळीने शेकडो लोकांची हत्या केली. तो मरा, मरा असा जप करायचा पण मरा, मरा चा राम, राम असा जप केव्हा झाला हे त्यालाच कळले नाही. पुढे वाल्ह्याचा वाल्मिकी ऋषी झाला. दुष्कर्माचे सत्कर्मात रूपांतर झाल्यानेच हा बदल झाला.

राम, पांडव हे राजे होते. पण त्यांनाही वेळप्रसंगी क्षुद्र कर्म करावे लागले. हातात नांगर धरावा लागला. झाडे लावावी लागली. शेती करावी लागली. झोपडी उभी करण्यासाठी झाडे तोडावी लागली. मोळी उचलावी लागली. मग आपण घरची कामे करताना लाज का बाळगावी. स्वतःच्या शेतात उत्पादित झालेला भाजीपाला विकण्यात लाज का बाळगावी. चोरी तर करत नाही ना? कष्टाने कमवत आहे. मग कमीपणा कसला. त्याच्यावर तुमची पात्रता ठरत नाही. कमीपणा त्याने येत नाही. कोणतेही चांगले कर्म करण्यात कमीपणा नसतो. चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते. चुकीचे कर्म केल्यास कमीपणा येतो. जनतेची फसवणूक करून पैसा कमविला तर कमीपणा येतो. व्यवहार कसा करता यावर तुमची पात्रता ठरते. सर्वांनी उत्तम व्यवहार केला तर कमीपणा येण्याचे कारण नाहीे. हलके काम करताना मनाला कमीपणा वाटता कामा नये. कर्तव्यपार पाडण्यासाठी करावे लागणारे कोणतेही चांगले कर्म हे शोभूनच दिसते.

Friday, May 3, 2019

दगडातले देवपण





देह आणि आत्मा वेगळा आहे. तसा तो दगड आणि चैतन्य वेगळे आहे. मानसिकतेमुळे ते एकच वाटते. अज्ञानी राहू नका ज्ञानी व्हा. देव व दगड यातील फरक ओळखा. हा फरक ज्याला समजला तो आत्मज्ञानी.
- राजेंद्र घोरपडे, 9011087406



ऐसा विपायें देवो मानिजे । तरी पाषाणमात्रचि जाणिजे ।
आणि आत्मा तंव म्हणिजे । देहातेंचि ।। 571 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - कदाचित, देव मानला तर याप्रमाणे देव म्हणजे फक्त दगडाची मूर्तीच समजतो. आणि आत्मा तर देहालाच समजतो.

दगडी कोरीव बांधकाम असलेले एक पुरातन मंदीर होते. त्यामध्ये अनेक रूढी परंपरा चालत आल्या आहेत. त्याकाळातील राजाने या परंपरा सुरू केल्या होत्या. गुन्हेगार गुन्हे कबूल करत नसत. त्यांना बोलते करणे हे राजासमोर मोठे आव्हानच होते. राजाने काही युक्‍त्या त्यावेळी लढल्या. गुन्हेगारांना बोलते करण्यासाठी या मंदीराचा त्याने आधार घेतला. मंदीराच्या प्रांगणात राजाने एक मोठा गोलाकार कोरलेला दगड ठेवला. प्रत्येक भाविक हा देवाचा दगड समजून उचलून पाहात. अनेकांना हा देवाचा दगड सहज उचलला जायचा. तो दगड उचलण्यासाठी तशी मानसिक तयारी असावी लागते. काही गोष्टी ताकदीपेक्षा युक्तीने लढल्या जातात. त्यात सहजता असते. त्यामुळे काहीजण हा दगड अगदी सहजपणे उचलत असत. हा दगड तयार करण्यामागे राजाचा मुख्य उद्देश हा गुन्हेगारांना बोलते करणे हा होता. राजा त्या मंदीरात गुन्हेगारांना घेऊन येत असे व सांगत असे तू गुन्हा केला नाहीस ना मग उचल पाहू हा दगड. खोटे बोलणाऱ्यांना हा दगड कदापी उचलत नाही. प्रत्येक गुन्हेगार काही धडधाकट नसत. ते हा दगड पाहूनच खरे बोलण्यास सुरवात करत. काही धडधाकट गुन्हेगार मात्र हा दगड उचलण्याचा प्रयत्न करत. गुन्हेगारांना गुर्मीच असते हे काम आपण सहज उचलू व राजाला मी गुन्हा केला नाही याचा प्रत्यय देऊ पण खरा गुन्हेगार दगड उचलण्याआधी राजाच्या मानसिक प्रश्‍नांचा बळी जायचा. राजा त्याठिकाणी गुन्हेगारांना अनेक प्रश्‍न करायचा. त्याची मानसिकता तपासायचा. गुन्ह्याची वारंवार त्याला आठवण करून द्यायचा. वारंवार गुन्ह्याची आठवण करून दिल्याने खऱ्या गुन्हेगाराची मानसिकता ढळायची. त्याच्याकडून तो दगड उचलला जात नसे. अखेर घाबरून तो सर्व गुन्हा कबूल करायचा. काही गुन्हेगार खरोखरच गुन्हा केलेले नसायचे पण काही कारणाने ते त्यात अडकले जायचे. ते त्या गुन्ह्याशी संबंधित नसल्याने त्यांच्यावर राजाच्या मानसिक तपासणीचा फारसा फरक पडायचा नाही आणि ते हा दगड सहज उचलत असत. राजाची ही युक्ती दैवी शक्ती मानली जायची. पुढच्या काळात ही युक्ती गावागावात वापरली जाऊ लागली. काही गावांची ही परंपरा झाली. मानला तर तो देवाचा दगड होता. गुन्हेगार अचूक शोधायचा. गुन्हेगारांसाठी, चोरांसाठी तो दैवी दगड होता. कारण ते त्या दगडाला घाबरायचे. तो दैवी दगड नव्हताच मुळी तो केवळ एक दगडच होता. पण मानसिकतेने त्यात देवत्व आले होते. अज्ञानी व्यक्ती त्याला दैवी दगड समजायचे. अज्ञानी व्यक्तीच देहाला आत्मा समजतात. तसाच तो प्रकार होता. देह आणि आत्मा वेगळा आहे. तसा तो दगड आणि चैतन्य वेगळे आहे. मानसिकतेमुळे ते एकच वाटते. अज्ञानी राहू नका ज्ञानी व्हा. देव व दगड यातील फरक ओळखा. हा फरक ज्याला समजला तो आत्मज्ञानी.

Wednesday, May 1, 2019

सूर्याभोवती खळे

सूर्या भोवती खळे हा काय प्रकार आहे. यावर अंधश्रद्धाही खूप आहे. ही अंधश्रद्धा दूर करून यामागचे शास्त्र समजावरू सांगण्यासाठी हा लेख प्रपंच...
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685



कोल्हापूरात आज सूर्याभोवती खळे पाहायला मिळाले. त्यानंतर विविध चर्चेला उधाण आले. यापूर्वी म्हणे हे खळे दिसले की एखादी राजकिय विपरित घटना घडते. सूर्याभोवती खळे हे दुष्काळाची चाहूल असते किवा काही भयंकर घटना घडण्याचे संकेत असतात. अशा चर्चा काणावर येऊ लागल्या. नव्वदच्या दशकापर्यंत हे सर्व ठिक होते. कारण त्याकाळात तंत्रज्ञानाचा विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला नव्हता. अपशकून, अंधश्रद्धेचे विचार त्याकाळात मानले जात होते. पण इंटरनेट आणि संगणकानंतर देशात तंत्रज्ञानाचा प्रसार झाला तसे जग हे जवळ वाटू लागले. साधे साधे शोधही खोलवर जाऊन मनावर राज्य करू लागले. जगात घडलेल्या घटनांचा, शोधांचा प्रसार लगेच होऊ लागला तसा अंधश्रद्धा कमी होताना पाहायला मिळाली. पण अद्यापही आज सूर्याभोवती पडलेल्या खळ्यामुळे अद्यापही समाजात अंधश्रद्धेचे भूत कायम असल्याचे जाणवले. तंत्रज्ञानाने प्रगती केली तरी सर्वसामान्य जनतेच्या मनातील भीती काही हटलेली नाही. मुळात याचाच फायदा हे बुवाबाजी करणारे लोक घेत असल्याचे यातून स्पष्ट झाले. बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी व त्यानंतर वारकरी संप्रदायातील अनेक थोर संतांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचे प्रयत्न केले व लोकांच्या मनातील भीती दूर करण्याचे काम केले. लोकांना शहाणे करण्याचे काम केले. पण नंतरही समाजात भीती ही होतीच. भीतीमुळेच लोक अंधश्रद्धेचे बळी पडतात. यासाठी शास्त्राचा अभ्यास करून लोकांच्या मनातील भीती घालवण्याची गरज आहे. संतांनी जनतेला अभय देण्याचा प्रयत्न नेहमीच केला. तसा प्रयत्नही आता होण्याची गरज आहे. समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आज त्याची गरज वाटते. 

आज सूर्याभोवती दिसलेले खळे किंवा रिंगण हे आपण शास्त्रीय दृष्टीतून पाहायला हवे. नेमके हे कशामुळे घडते. त्याचा अभ्यास करायला हवा. ते जाणून घ्यायला हवे. आज गुगलवर गेला तर या विषयावर इंतंभूत माहिती उपलब्ध आहे. पण आपण तसे फारसे करताना दिसत नाही. आता मात्र शास्त्रीय दुष्टीकोनातून सर्व गोष्टी पाहायला हव्यात. मानव चंद्रावर गेला आणि या विश्वाच्या पोकळीचाही शोध तो घेत आहे. विश्वाची निर्मिती कशी झाली याचाही शोध आता स्पष्ट होत आहे. 

कोल्हापुरातील खगोलशास्त्र अभ्यासक डाॅ. प्रा. मिलिंद मनोहर कारंजकर यांच्यामते सूर्याभोवताली पडणारे खळे हे फिजिक्समधील आॅपटिक्सचा हा भाग आहे. सूर्या भोवतालचा खळे किंवा रिंगण हा प्रिझममधून किरणे गेल्यानंतर जसे सप्तरंग दिसतात तसा हा प्रकार आहे. सूर्याभोवतीच्या खळ्यास इंग्रजीमध्ये हेलो (Halo) असेही म्हणतात. हॅलो यास मराठीमध्ये इंद्रधनुष्याचे प्रभामंडळ असे म्हटले जाते. वादळ आल्यानंतर आकाशामध्ये जवळजवळ 20 हजार फुटवर सिरस नावाचे ढग तयार होतात. या ढगामध्ये लाखोंच्या संख्येने लहान लहान बर्फाचे क्रिस्टल्स असतात. या क्रिस्टल्समधून सूर्याची किरणे गेल्यानंतर त्या किरणांचे रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅक्शन किंवा स्पिल्टिंग होते. यातूनच सूर्याच्या भोवती रिंगण किंवा खळे पाहायला मिळते. यामध्ये बर्फाचे तुकडे हे प्रिझमप्रमाणे काम करतात. पाण्याचा रिफरॅक्टिव्ह इंडेक्स 1.33 आहे. पाणी हे द्रव स्वरूपात आहे तर बर्फ हा घन पदार्थ आहे. हवेतून सर्याचे किरण जेव्हा घन पदार्थातून जातात. तेव्हा माध्यम बदलते.  1.33 रिफरॅक्टिव्ह इंडेक्समधून गेल्यानंतर या किरणांचे वक्रिकरण होते. यातून हे खळे दिसते. या गोलाची त्रिज्या 22 अंश डिग्री इतकी असते. यामध्ये या गोलाच्या आतील बाजूस लालरंग दिसतो तर बाहेरच्या बाजूस निळा रंग दिसतो. हे खळे फक्त सूर्या भोवतीच दिसते असे नाही तर चंद्राभोवतीही हे खळे दिसते.