Tuesday, May 21, 2019

स्वानुभूती


देहातील हाव आपण समजून घ्यायला हवी व आत्मरुपाची ओळख करुन घ्यायला हवी. हा अनुभव केव्हा येईल. जेव्हा आपण तसा विचार करायला लागू तेव्हा? यासाठीच तर साधना आहे.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 9011087406
तरी स्वानुभूति । लाभली म्हणोन । नुरे कर्तेपण । तयाठायीं ।।
स्वामी स्वरुपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी

आत्मरुपाचा अनुभव म्हणजे स्वानुभूती. पण आत्मरुप काय आहे? मी कोण आहे? याचा शोध म्हणजे आत्मरुपाचा शोध. मी देह नाही, तर आत्मा आहे. हे सर्वच जण सांगतात. यात वेगळे काय आहे? सर्व संत हेच सांगतात. सर्व धर्म हेच सांगतात. सर्व धार्मिक ग्रंथात याचाच उल्लेख आहे. तरीही आपल्या हे लक्षात येत नाही. आपण त्याकडे लक्ष देत नाही. आत्मरुपाचा अनुभव घेण्याची आपली इच्छा होत नाही. माझे अमुक नाव आहे. मी मोठा अधिकारी आहे. मला सर्व गोष्टीचे स्वातंत्र्य आहे. हे सर्व माझे आहे. हा मीपणा आहे. माझे माझे म्हणतो. पण आपले हे आहे कोठे? आपणास मीपणाचा हा अहंकार आला आहे. या अहंकारामुळेच आपण दुष्कृत्ये करु लागलो आहोत. इतरांवर अन्याय करु लागलो आहोत. हव्यासापोटी आपण इतरांना त्रास देऊ लागलो आहोत. हा हव्यास सुटायला हवा. यासाठीच तर आत्मरुपाची ओळख करून घ्यायला हवी. पण आजच्या बदलत्या काळात असे जगता येऊ शकेल का? असा व्यवहार जगात करून आपण जगू शकु का? अशाने आपणाला कोणी किंमत देईल का? आज फक्त पगाराचे आकडे मोजले जातात. आकड्यावरच तर सगळा खेळ खेळला जातो. हा इतका देतो. तो तितका देतो. जिकडे अधिक मिळतो तिकडे जातो. अशाने आपण अस्थिर झालो आहोत. याची जाणीवही येत नाही. पण या अस्थिरतेची भीती वाटत नाही. एकादृष्टीने ही मनाची उत्तम तयारी आहे. तसे हे योग्यही आहे. पण हा अहंकार आहे. हा अहंकार बळावणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. एकदा हा मीपणा बळावला तर तो मीपणा आपणासच खातो हेही लक्षात घ्यायला हवे. हा मीपणा येऊ नये यासाठीच तर आत्मरुपाची ओळख करून घ्यायची आहे. मला मिळाले ते माझ्या कर्तृत्वाने मिळाले. कर्तृत्व नसेल तर कोण विचारणार? हे ही खरे आहे. हा स्वाभिमान असायलाच हवा. पण त्याचा अहंकार नको. हा अहंकार येऊ नये यासाठीच हवे आत्मरुपाचे स्मरण. मी कोण आहे? मी आत्मा आहे. मला मिळाले ते माझ्या देहाला मिळाले. आत्म्याला नाही. कारण आत्म्याला वास नाही. गंध नाही. हव्यास नाही. तो तृप्त आहे. तो अमर आहे. तो जन्म ही पावत नाही आणि मरतही नाही. भूक आपणास लागते ती देहामुळे लागते. आत्म्याला भूक लागत नाही. यासाठी देहातील हाव आपण समजून घ्यायला हवी व आत्मरुपाची ओळख करुन घ्यायला हवी. हा अनुभव केव्हा येईल. जेव्हा आपण तसा विचार करायला लागू तेव्हा? यासाठीच तर साधना आहे. साधनेत त्यावर नियंत्रण मिळवायला हवे. म्हणजेच आत्मज्ञानाचा मार्ग सुकर होईल.


No comments:

Post a Comment